बी.एड्. फिजीकल - 15 Prof Shriram V Kale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बी.एड्. फिजीकल - 15

           बी. एड्. फिजीकल  भाग १५

आमच्या बाजूच्या रूममध्ये राहणारा एम्. आर. जाधव म्हणाला,“सगळ्यास्नी येक आनंदाची बातमी सांगतूय... मला आमच्या गावातल्या शाळेतच क्लीअर ह्येकन्सी जॉब मिळालाय..... आनी माजं लग्न बी ठरलंय. मिषेस प्रायमरी टिचर हाय. आज सगळ्यास्नी माज्यातर्फे क्वलड्रिंग......” जाधवची कोल्ड्रिंक्स घेतल्यावर बाकीच्याना चकमा देवून आमचा  ग्रूप नाष्टा करायला  स्टेशनवरच्या हॉटेल मध्ये गेलो.

 

        दुपारी मेसला खाडा टाकून आमच्या ग्रूपने हॉटेल मध्ये जेवायला जायचा बेत ठरवलेला. अर्थात ही पार्टी राऊळ देणार होता. तो नी मिसेस दोघही जॉबमध्ये होती.  गेले  दहा दिवस आमच्या ग्रूपमध्ये एक नवीन मेंबर जॉईन झालेला होता. तो म्हणजे  नाणिजचा लिमये. तो कोकणातला होता खरा पण सुरुवातीपासून तो आमच्या ग्रूपमध्ये न मिसळता  नगरच्या चव्हाण ग्रूप सोबत असायचा. आमच्याशी त्याने कधीच जवळिक  होवू दिलेली नव्हती. पंधरा दिवसापूर्वी इंटर्नल एक्झामच्या वेळेला परीक्षकानी त्याला कबड्डीतली घुटना पकड दाखवायला सांगितली. अशा वेळेला प्रतिस्पर्धी खेळाडूने को ऑपरेशन करायचं असत. पण त्याला ग्रूपमधला खेळाडू गोटिस पकडकरूच देईना. लिमयेच्या दोन तीन ट्राय हुकल्या . मग पुढच्याखेपेला लिमये जीवावर उदार होवून गोटिसचा घुटना पकडायला गेला मात्र त्याने लिमयेला थाड्कनलाथ मारली नी पकड करू न देताच तो गेला. लिमयेच्या गालावर लाल वळ उठला होता. त्या ग्रूपमध्ये चव्हाण होता पण तोही लिमयेची भंबेरी उडालेली बघून हसत नामानिराळा राहिला. 

      असेंब्ली संपल्यावर आम्ही बाहेर पडताना कधी नव्हे  तो आपण होऊन लिमये आमच्या ग्रूप सोबत आला. मेस जवळ गोटिस उभा होता. लिमये त्याला म्हणाला, “अरे मगाशी काय तुझ्या अंगात सैतान शिरला होता काय रे? तो काय खरा खेळ नव्हता , नी मी पकड केली म्हणून काय तुझे मार्क कमी होणार नव्हते.”गोटिस हा आडमुठा नी जानपद होता. तो रागाने गरगरत,“ काय रे  कस्तान्या .... मला सैतान बोलतो काय रे बामना? पेट्टाला तुझी मुंडी मुरगाळून टाकीन की कोंबड्या सारकी....” तो चाल करून आला. माझी कुवत नसूनही  सोबत प्रभू नी काझी असल्यामुळे मी पुढे होवून गोटिसला ढकलून दिला. तो बेसावध होता रस्ता ही घसरडा होता म्हणून तोल जावून धाडकन आडवा पडला. मागोमाग मुलींचा ग्रूप येत होता. विनोदबाला टाळ्या वाजवीत म्हणाली,“आरे वाह रे छोटे भैय्या... गोटिस को धोबीपछाड दे दिया....” चिडून उठल्यावर गोटीस माझ्यावर चाल करून येणार असता पण त्याला काझीनी प्रभु यानी एकेक हात धरून त्याला जागीच जखडला. “तू काळेला हात जरी  लावलास ना  तर तुला रक्त ओकेपर्यंत ठोकीन...” प्रभुने दम दिला.काझीला अजूनही हसू आवरत नव्हतं...... मी लोटल्यावर तो पडला यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. “अरे जाने भी दो गोटीस..... कुस्तीत हार जीत असतेच की..... तू काळेकडे नुसत बगितलस ना तरी मी तुला जिता सोडणार न्हाय. आता गप गुमान जानिघून.....”

       आमच्या बॅचमध्ये स्टेट लेव्हलवर मेडल मिळवलेले पाच सहा चॅम्पियन्स होते. त्यात तीन कुस्तिगीरअसे होते की त्यानी पूर्ण करियर मध्ये एकदाही हार पत्करलेली नव्हती, मांडवे पैलवान त्यातला एक पण तो भलताच घमेंडखोर! कुठे कुठे फड मारले याच्या बढाया तो मारीत असताना मी म्हणालो, “पण लेका वर्गात शिकवाय हुबारलास की पोरं तुला चितपट करत्यात.... अगदी पार बुकणा पाडत्यात त्याचं काय? म्या कदीतरी तुजी पाट टेकवून दावतो की नाय बग.....”ह्यावर सगळे हसले नी मी बाजुला गेलो. पाचेक मिनीटानी मी गुपचूपपणे त्याच्या मागे गेलो.मांडवे बेसावध होता. काय होतंय् हे कळण्यापूर्वी मी त्याचे दोन्ही खांदे धरून ओढला.मांडवेला तसाच दाबीत मी म्हणालो, “बघा हं नीट ..... ह्याची पुरी पाठ टेकली आहे जमिनीवर नी ह्याला अस्मान दाखवलं  मी.......” सगळे खो खो हसायला लागले. मोहिनी, चित्रे, विनोदबाला मध्ये पडल्या म्हणून मांडवेला माझ्यावर उट्टं काढता आलं नाही. त्यानी त्याला खिजवीत म्हटलं, “तुम्हे तो छोटे भैय्याने दिनमे तारे दिखाये.पीठपर मिट्टीके धब्बे देखो....”यातला विनोदाचा भाग लक्षात न घेता मांडवे  सिरीयसहोत म्हणाला, “ह्ये रडीचा डाव केलास की तू....त्वा मॅटवर  माज्या म्होरं ये की बेन्या.....” त्यावर देशमुख बोलला, “लई  बाता सांगत हुतास की मर्दा... आनी तू झोनल गाजवून आल्याला गडी.... तुला काय म्यां सांगाय हावं? काळेशी तुजी जोड न्हाई व्हायाची नी त्याच्याशी तुजी  कुस्ती कशी व्हनार?पर त्या बेन्यानं तुजी पाट जिमिनीवर टेकवून दावली की.......” 

       मीकंदिवलीत आलो तेंव्हा मी मुणगे हायस्कूलला असताना अत्यंत काटकसरीने राहून  दरमहा  ३३५ रुपये पगारातून  साठवलेले १४०० रुपये सोबत होते. सुरूवातीला गादी- सतरंजी, बेडशीट ,चादर , मच्छरदाणी  वगैरे सामान आणि  इतर खर्च भागवून उरलेली रक्कम जवळ नबाळगता  तिथल्या  युनायटेड कमर्शिअल  बँकेत  ठेवायचा सल्ला विजय दादाने दिला होता.त्याप्रमाणे कॉलेजची फी वगैरे भरून आय् कार्ड मिळाल्यावर मी स्टेशन जवळअसलेल्या  युको बँकेत गेलो. बँकेत  मॅनेजर, क्लार्क,कॅशियर  आणि  प्यून असा  चौघांचा स्टाफ होता.आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे आमच्या गावातलाच माझ्या भावाचा  वर्गमित्र गजानन दिक्षित हा कॅशियर होता. खातं उघडल्यावर गजाननने मला जवळच्या कँटिनमध्ये नेवून कॉफी पाजली. त्यानंतर मी जेंव्हाजेंव्हा पैसे काढायला जात असे त्या त्या वेळी तो मला खाऊ पिऊ घालीत असे. वर्षभरातमाझ्या बँकेत बरेचदा खेपा झाल्या . गर्दी तर कधीच  नसायची. क्वचित एखादा  खातेदार आलेला असे.

              बँकेत खातं उघडल्यावर मग मी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावून १० कार्डं नी दोन अंतर्देशिय घेतली. तिथे मोकळ्या काऊंटर समोर उभा राहून घरी पाठवायला पत्र लिहू  लागलो. माझं लिहून होता होता  दोन तीन बिहारी/ युपी चे  लोक मनिऑर्डर फॉर्म भरून द्यायला सांगू  लागले. मी  मनिऑर्डर फॉर्म भरून दिल्यावर त्यानी  मला आठ- आठ आणे दिले. मग जवळ जवळ १५/२० लोकानी  कोणी मनिऑर्डर फॉर्म  भरून घेतले, तर  एका दोघानी कार्डं लिहून घेतली. १००/२०० /५००अशा मोठ्या रक्कमेच्या मनिऑर्डर करणारानी मला एक रुपया/दीड रुपया/ दोन रुपये  लिहिणावळ दिली. मी मेहेनताना  कधीच मागत नसे . तिथे लिखापढी  करायला बसलेल्या बाबुने ठरवलेला  तो सर्वमान्य दर होता. तिथे मला  तासाभरात  बावीस रुपये कमाई  झाली. त्यानंतर वर्षभरात अधून मधून  सवड मिळाली की मी योजून बँकेत  पैसे काढायला गेल्यावर पोस्टात जाऊन महिनाभराच्या चहापाण्याच्या खर्चापुरती कमाई करीत असे. क्वचित कोणा कोणाची तार करायची असे. हॉटेल मध्ये / बंगल्यात  नोकरी मिळेल . अमुक अमुक बाबु/ भैयाला  ताबडतोब पाठवा असा मजकूर असे. मी इंग्रजीत तार  लिहित  असताना सांगणारा भैय्या  मोठ्या आदराने  पहात असे नी दोन रुपये काढून देत असे. त्यावेळी हॉटेल मध्ये  सगळीकडेच चहा २० पैशाला / भजी-वडा ५० पैशाला/ पॅटिस  ५० पैशाला / ४जिलब्या, ४ गुलाब जामुन प्लेट १ रुपयाला अणि चौकोनी लादी पाव ५ पैशाला / बनपाव १० पैशाला मिळे.   

                ऑगस्टमध्ये लेसन सुरू झाल्यावर दर शनिवारी संध्याकाळचीअसेंब्ली रद्द झाली. त्याऐवजी प्रत्येक अध्यापन पद्धतीच्या गटाला त्यांच्या विषयाच्याअनुषंगाने दीड तासाचा रचनात्मक कार्यक्रम सादर करावयाचा असे, तर कधी क्रीडा विषयक काही डॉक्युमेंटरी, काही वेळा गेस्ट लेक्चरर्सची व्याख्यानं  असत. मला संगीत, अभिनय याबद्दल चांगली जाण असल्यामुळेअगदी  प्रथम मराठी  मेथड चा कार्यक्रम झाला तेंव्हा चित्रे, मोने  या मुलीनी त्यांच्या  ग्रूपला मदत करायची मला गळ घातली. संध्याकाळची असेंब्ली झाली की जिममध्ये कार्यक्रमाचा सराव व्हायचा. त्या गटात माझ्याशी जवळीक असलेली अन्यपाच सहा जणंही  होती. त्या गटाचे मार्गदर्शक प्राचार्यच होते. मी ईशस्तवन, स्वागत गीत, चार अन्य देशभक्तीपर गीतं, आणि मराठीच्यापाठ्यपुस्तकांमधले नाट्य उतारे बसवून घेतले. दोन तीन दिवस झाल्यावर एकदा प्राचार्य चक्कर मारून गेले. ते माझ्यावर बेहद्द खुश झाले.     (क्रमश:)