तुझ्यावाचून करमेना - भाग 1 Ananya Joshi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझ्यावाचून करमेना - भाग 1

"अक्षय आज बघायचा कार्यक्रम आहे हे फायनल आहे कळलं ना? कामं जरा ठेव बाजूला." मायाताई त्याला ओरडत म्हणाल्या. 

हे ऐकताच त्याने लॅपटॉपमधून डोकं वर काढलं आणि वैतागून आईला म्हणाला,"अग आई फक्त २३ वर्षांचा आहे गं चाळीशीचा नाही झालोय."  

"अरे हो रे पण आता हळूहळू बघायला सुरुवात करायला हवी हो ना? माझ्या या राजबिंड्या राजकुमाराला एखादी सुंदरशी राजकुमारी शोधायला वेळ नाही का लागणार ? आणि मी काय अस म्हणतेय का की आज जी मुलगी  येईल तिला पसंत करून लग्न करुन टाक. अरे आत्ता पसंत पडलीच तरी आम्ही अजून दोन तीन वर्ष घाई करणार नाही. समजून घ्या एकमेकांना, वेळ द्या तुम्ही आणि आत्ता अनायसे स्थळ आलं होतं म्हणून बघायचं ठरवलं. बर तुझं तिच्यावर प्रेम होतं नंतर कोणाच्या प्रेमात पडलाच नाहीस तू म्हणून म्हटल बघून घ्यायला हरकत नाही. आणि अक्षय मूव्ह ऑन होण गरजेचं आहे तिने तुझा जो अपमान केलाय ना तो अजून आठवतोय "

  "म...मी तयार होतो आपण जाऊया बघायला."

" तू विषय टाळतोयस ते कळतय मला  पण..." 

" आई  नको काढू विषय प्लीज मला त्रास होतो त्याचा." 

"हो रे हो नाही काढत विषय बास." असं म्हणत मायाताई कपाटाजवळ गेल्या आणि त्यातून त्यांनी छानसा शर्ट काढला . 

"चल तुझं काम झालं की छान तयार हो,जायचं आहे पाच  वाजता." अशी सूचना देत त्या किचनमध्ये निघून गेल्या. 

त्याने एकदा त्या शर्टकडे पाहिलं आणि अचानक त्याला आठवल , तिचा आवडता रंग .... त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. "उगाच आपण त्रास करून घेतोय स्वतःला... हं.... ती असेल मजेत... " असं पुटपुटत तो पुन्हा कामाला  लागला.

म्हणता म्हणता पाच  वाजले. अक्षयने मोठ्ठा श्वास घेतला अन तो खोलीबाहेर पडला. आई मी तयार आहे , त्याने आईला हाक मारली. त्या वरच्या खोलीत तयार होत होत्या. 

अक्षयचे बाबा किरण खाली पेपर वाचत बसले होते , अक्षयला पाहताच ते म्हणाले "अक्षय अरे आईच आवरून नाही झालं.आजही नटतेय नुसती. जस काही हिच लग्न करायच आहे. तस जुळणार असेल तर जुळूदे माझ्यापाठची कटकट तरी जाईल."

"ऐकतेय म्हटल मी." असं म्हणत मायाताई खाली आल्या तसे किरण त्यांच्याकडे पाहतच राहिले. 

"बाबा...उशीर होतोय आपल्याला"अक्षय गालात हसत म्हणाला. तसे किरण गडबडीने नजर वळवत पुढे गेले. 
    
      तिकडे पटवर्धनांच्या घरी पाहुणे यायचे म्हणून गडबड चालू होती. त्यांची मुलगी तेवीस वर्षांची होती. खरंतर तिला या लग्नात इंटरेस्ट नव्हता. ती खोलीत बसून कोणाशीतरी कॉल वर बोलत होती.

"अरे हो माहितेय मला पण काय करू घरी अजून सांगितलं नाहीये कस सांगू हेच कळत नाहीये रे. हं असुदे तुला सोपं वाटत का सगळ .." तेवढ्यात दिप्ती..... अशी हाक तिच्या कानावर आली.

"चल बाय बाकीचं नंतर बोलू. अरे असं काय करतोस आई हाक मारतेय मला जायला हवं. हो बाबा लव्ह यू टू बाय" असं म्हणत, गडबडीत फोन ठेवून ती निघाली. आई सांगत होती त्याप्रमाणे ती सगळं करत होती. पण मनात मात्र वेगळेच विचार चालू होते. 

"हं सांगू का त्या मुलाला नकार द्यायला? तो घेईल का समजून? तसंही सुयशमध्ये नकार देण्यासारखं काही नाहीये. तो उद्या परवा येईल म्हणालाय." 

"अग काय करतेस दिप्ती हे? सगळी चटणी सांडलीस गधडे. कसला एवढा विचार चालू आहे हा?" 

"नाही गं काही नाही."

" काही नाही कसं....तू नक्कीच येणाऱ्या जीजूंची वाट बघत असणार तसे फोटोमध्ये हँडसम दिसत होते आता प्रत्यक्षात कधी बघते असं झालं असेल ना तुला." दिप्तीची आत्येबहिण तिला उगाच चिडवत म्हणाली. तशी हे ऐकताच दिप्ती तिच्या मागे तिला मारायला धावली.

"काय  चालू असत ना हिच देव जाणे कधी मोठी होईल ही." तिची आई  हसतच कामाला लागली.

सगळे पाहुणे जमले. तशी दिप्ती चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. अक्षयने तिच्याकडे एक नजर टाकली. चारचौघींसारखी दिसणारी. त्याला पुन्हा ती आठवली. का कोणास ठाऊक पण तिच्यात जो स्पार्क आहे ती जशी आहे तस कोणीच नाहीये. पण त्याने विचार झटकला आणि तो चहा पिऊ लागला. 

त्याने दिप्तीकडे पाहिलं तर दिप्ती आणि तिची आई यांच्यात जणू कोपरखळ्यांची स्पर्धा रंगली होती. आईने हळूच तिला सांगितलं अग सगळ्यांच्या पाया पड. तशी तिने  नाईलाजाने पाया पडायला सुरुवात केली अन अक्षयसमोर आल्यावर म्हारक्या म्हशीसारखा लूक देत ती पुढे गेली. अक्षयला समजलंच नाही की त्याने नेमकं काय केल. 

"अ..... मी काय म्हणतो... या दोघांना जरा बोलायला पाठवलं तर चालेल का... म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर.." दिप्तीचे बाबा म्हणाले.

इकडे दिप्तीचं नको नको आणि तिच्या आईच गप्प बस ह्याची जुगलबंदी आता चालू झाली होती. अक्षय, किरणराव ह्यांना तर फार हसू येत होतं पण सगळ्यांसमोर हसणं बर दिसलं नसतं म्हणून ते गप्प होते. माया ताईंना मात्र कशाशी देणं घेणं नव्हतं. त्यांचं बोलण चालूच होत.

"हो पाठवा ना काहीच प्रॉब्लेम नाहीये."किरणराव हसू दाबतच म्हणाले. 

"दिप्ती जा अक्षयला घेऊन जा."

" हो बाबा...." अस म्हणत ती घेऊन गेली आणि इकडे मोठ्यांच्या गप्पा पुन्हा सुरु झाल्या.

ते दोघ तिच्या खोलीत गेले. अक्षय तिकडच्या खुर्चीवर बसला. तस दिप्तीने एकदा रागाने कटाक्ष टाकला आणि ती मोबाईलवर टाईमपास करायला लागली.

  अक्षय मनात म्हणाला ,'सगळ्या मुली काही खडूसच असतात का.... एकतर हिच्या घरी आलोय.....हिच्या बाबांमुळे बेडरूम मध्ये बसावं लागतंय....आणि ही काही बोलायलाच तयार नाही.... माझा नकार तरी कसा सांगणार हिला.... तसं म्हणा, आईने नकार द्यायला परमिशन दिलेय.

काही मिनिट अशीच गेली शेवटी दिप्तीनेच  कंटाळून बोलायला सुरुवात केली ,"अम... हाय अक्षय, मी दिप्ती म्हणजे फॉर्मल ओळख झालीच असेल. खरं सांगू तर मला या बघण्याच्या कार्यक्रमात काही इंटरेस्ट वगैरे नाहीये ,  पण ते घरच्यांनी सांगितलं तयार हो म्हटलं मला काय जातंय तयार व्हायला." 

अक्षय मनात म्हणाला , " अरे यार हिची बुलेट ट्रेन तर थांबतच नाहीये." 

"बर ऐक ना म्हणजे तुला मी आगाऊ वाटेन  पण माझं एका मुलावर प्रेम आहे आणि त्याचही आहे. खूप चांगला मुलगा आहे तो. म्हणजे मी सांगितलं नाहीये घरी. पण का माहित नाही कम्फर्टेबल वाटतंय तुझ्याबरोबर. ओ हॅलो माझ्याकडे काय बघतोस मी काहीतरी महत्वाचं सांगतेय तुला  ,एक मिनिट.... लाईन वगैरे मारायचा प्रयत्न चालू आहे का ?

" ए बाई तुझ्यावर लाईन मारायला वेड नाही लागलंय मला कळलं तुला कोणीतरी आवडतो ते....."

" बाय द वे तुला कुठेतरी बघितलंय आधी अस राहून राहून वाटतय.....हं कुठे ते नाही आठवत...."

" अ....असुदे पण मी काय म्हणतोय मी नकार देऊ का तुला ?"

" का नकार देण्यासारखं काय आहे." 

"अग ए तुझाच नकार आहे ना  की मी देऊ  होकार? आणि तुझा होकार आहे हेही सांगतो."

"ए नाही हा प्लिज प्लिज नकार दे ना दया कर दो गरीब पर." अस दिप्ती ने म्हणताच अक्षय खळखळून हसला. 

"बर ऐक एक काम करूया , मी सांगतो आज आईबाबांना तू माझ्या टाईपची मुलगी नाहीयेस ओके? चांगली आहे तशी पण मला हवी तशी नाहीयेस." 
" हं ...चालेल.... हा..... आठवल... आठवल.."

"आता काय ?" 

" अरे मला सांग  तू कधी पी.जी.एस हायस्कुलच्या इथे आला आहेस का रे?"
" न..... न.... नाही...कधीच आलो नाहीये मी" 

"खर सांग मला वाटतंय तू आला होतास असं माझा अंदाज सहसा खोटा ठरत नाही." 

अक्षयचा चेहरा पांढरा पडला तो एकटक दिप्तीकडे बघायला लागला.

" अरे हा....." दिप्ती जणू काहीतरी हरवलेलं सापडल्याच्या उत्साहात म्हणाली , " ए तू तोच ना  हिमानीवर लाईन मारणारा ?"

" त ....तू.... तुला कस कळलं?" 

"अरे मी तिच्या वर्गात होते. आमची तशी खास मैत्री नाही रे म्हणजे नुसतं हाय हॅलो पुरतं पण माझ्या खास मैत्रिणीने सांगितलं मला.... गॉसिप जास्त लक्षात राहतात माझ्या.  आत्ता अचानक आठवल.... कॉलेज पण आपलं सेम होत ना सो तेव्हापण चर्चा चालायची की तू म्हणे तिला प्रपोज केलं होतंस.... तरी कालपासून अक्षय भावे नाव ओळखीचं वाटतंय.
पण तू कसा काय कार्यक्रमाला तयार झालास घरी माहीत नाही अजून  की ती तुला नाही म्हणाली?" 

" हे बघ....हा विषय नको दिप्ती , प्लिज
... मी पुढे गेलोय आता"

" खरं सांग मला... तुला खरंच नाही आवडत ती?"

" नाही आवडत."

"ओके चील , पण आपण आजपासून फ्रेंड्स. चालेल?"

" हो न चालायला काय? पण तुझा बिचारा बीएफ तो कसं काय सांभाळत असेल हा फार मोठा प्रश्न आहे."असं म्हणत तो हसू लागला आणि ती मात्र तोंड फुगवून बसली. 

थोडावेळ गप्पा मारून  ते दोघेही बाहेर आले.
"झाल्या का गप्पा मारून?"

" हो बाबा... "

"काय मग अक्षयराव पसंत आहे का मुलगी आमची."

" अ..आत्ताच कसं सांगू मी म्हणजे वेळ लागेल."

"हाहा आरामात सांगा काही घाई नाही."

थोड्यावेळाने एकमेकांचा निरोप घेत अक्षय आणि त्याचे आईबाबा घरी गेले. नंतर काही बोलणं झालं नाही पण रात्री जेवताना मायाताईंनी विषय काढलाच. 

"काय रे अक्षय कशी वाटली मुलगी ?"

"मुलगी चांगली  होती पण खरं सांगू ती मला हवी तशी मुलगी नाहीये."

" मग तुला कशी मुलगी हवेय?" किरणरावांनी प्रश्न विचारला. 

"नाही माहित." खरंतर त्याच्या डोळ्यासमोर हिमानीचा चेहरा येत होता पण त्याने विचार झटकले. 

"अरे नाही माहित मग कळलं कस ही तुझ्या टाईपची मुलगी नाहीये ते?" मायाताई  म्हणाल्या.

अक्षयला काय बोलावं ते कळतच नव्हत पण तेवढ्यात त्याला कॉल आला. तो फोन त्याचा जिगरी मित्राचा संकेतचा होता.
" बोला साहेब आज इतक्या रात्री आठवण आली ?"

"अरे हो  कारणच आहे ." तो अगदी उत्साहात म्हणाला  

"का काय झालं एवढं ?"

"  अरे आपण बघ मध्ये एका नोकरीसाठी इंटरव्यू दिलेला ऑनलाइन."

"  हा मग त्याचं काय ?" 

"अरे ते आपल्याला कळवणार होते आपण सिलेक्ट झालो की नाही तर आजच मला ईमेल आलाय आणि गेस व्हॉट मी सिलेक्ट झालोय !"

" काय !  पार्टी पाहिजे ब्रो....."

"  हा देऊया देऊया तसही तू ही येणारच आहेस ना मुंबईला तेव्हाच देईन."

"  अच्छा माझं सिलेक्शन झालं असेल कशावरून ?"

" तू इमेल चेक केलास का ?"

" नाही रे आज दिवसभरात  फोन चेक करता आला नाही."

" हा मग तो कर आधी आणि मग काय ते मला सांग." 

अक्षयने घाई घाईत फोन ठेवला आणि ई-मेल चेक केला  त्याच्या  चेहऱ्यावर आनंद अगदी स्पष्ट दिसत होता.

" काय रे काय झालं? कोणाशी बोलत होतास ?  कसलं सिलेक्शन ? " मायाताईंनी विचारलं. 

"अग  हो आई सांगतो..... मी बघ मुंबईला नोकरीसाठी अप्लाय केल होतं."

" हो...हो... त्याच काय?"

" अग मला नोकरीं मिळाली ती. नेक्स्ट वीक पासून काम सुरु पण आधी काही फॉर्मॅलिटिज आहेत त्या ह्या वीकमध्ये कंप्लिट होतील."

"अरे वा काँग्रट्स  चिरंजीव पार्टी हवी हा." किरण हसतच म्हणाले

किरण आणि माया अगदी आनंदात होते.  अक्षयलाही फार आनंद झाला होता. शेवटी स्वतःच्या ड्रीम कंपनीमध्ये जॉब  मिळाला होता.

तसंही त्याने आधीचा जॉब सोडलाच होता. फक्त काही पेंडिंग वर्क त्यालाच पूर्ण करावं लागणार होतं ते तो करून देत होता. 

माया आणि किरण तर अगदी उत्साहात  तयारीलाही लागले. बर झालं आता तरी लग्नाचा विषय थांबेल अस त्याच्या मनात आल अन  तोही त्याच्या तयारीला लागला.


क्रमशः