सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 4 Prof Shriram V Kale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 4

रस्त्याचं काम हे भाऊच्या आहारा बाहेरचं. तो काय पैशाची मोट बांधून बसलेला सावकार गडी थोडाच होता? एवढी  मोठी  गडी पैऱ्यांची  फैलं   सांभाळायची म्हणजे काय चेष्टा नव्हे. महिना दोन महिने गेल्यावर कामगार मजुरीला हात पगळणार. सरकारी पैसा  काय झटपट थोडाच मिळणार? सरकारी काम नी सहा महिने थांब अशी  लांबड लागणार. एकदा पत गेली विषय संपला. म्हणून ह्या व्यवहारात भाऊने चार आणे ? आठ आणे  भागीदारी आपल्याला द्यावी. खर्च सगळा  आपण उचलू. मात्र या कामात खुटवळ नी  सिलीपाट  असेल  तो सगळा बळीला द्यायचा. ती रक्कम वजा करून राहिलेली रक्कम जेंव्हा कधी  सरकारी  पैसा येईल  तेंव्हा सावकाश  मिळाली तरी चालेल. असा प्रस्ताव बळीने दिला. तीन्ही  टप्प्यात  साधारण किती खुटवळ नी सिलीपाट किती मिळेल  याचा बळीने  सांगितलेला अंदाज एवढा अचूक होता की भाऊ अक्षरश: थक्क झाले.  सगळं सांगून झाल्यावर  बळी  म्हणाला, “तुमी नीट इचार करा नी हप्त्याभरात  काय तां येवजून  माका सांगा..... आता तुमी माज्या दारात खेटे घालू नुको माका निरोप द्येवा मी  येयन्....”  

              बळीची  मागणी  ऐकून भाऊ पुरते चक्रावून गेले. ही म्हणजे नस्ती आफतच होती. परत जाताना बाबल्या आणि धाकू दोघानीही बळीची संगत बिलकूल करू नये असा सल्ला दिला. धाकू म्हणाला “ह्येच्यो  भंडार बढायो फकस आयकोच्यो.....  ह्येचे येक येवार  धड नाय...... आदी  रुपयाची  वस्तू  दर पाडून चार पैशाक घ्येनार. तरी दुकू   येवार पन धड पुरो करनार नाय...... ह्येका काट्यो  घालनारे ल्वॉक सांगतत ना...... आवंदाचो माल  दिलास तर  ग्येल्या शिजनचो हिसाब भागवनार,  तेका म्हाल नाय दिलास तर पैशे डुबले..... तेच्याशी  येवार करणारांचो   अडकून स्शिताराम म्हंतत  तशी गत झालेली हा.” त्यावर बाबल्या बोलला, “धाकू म्हंताहा तां अगदी हजार हिश्श्यान बरोबर हा. बळी म्हंजे येक नंबरचो   लोळगो…..  बाता मोट्यो मोट्यो  सांगॉन आयकणाराक अगदी  गार करीत. पन तांबडो पैसो सोडताना दुकू  धा येळा  इचार करनार. ह्येच्ये येवार धड्या गांडीन पुरे व्हनान नाय. माका  अनबव हा...... नवेदरात ह्येचो अडीज हज्जार हात गडगो आमी  घालून दिलाव. बोली  करताना  ठरलेलो दर  येवार तोडताना  कापलान...... ह्या काम माज्या आंगाभायर् ग्येला..... दोनव बायकांचे डागिने नी मंगळसुता इकून तुमचे पैशे भागवूची पाळी माज्यार इली अशी रड लावलान,   आज आदी मी फुडे करतय ते पैशे घेवा..... दिवाळी झाल्यार  काटयो नी खुटवळाचे हिशोब इलो  मग्ये बाकीची रक्कम  बगुया.  आमचा  हातार प्वॉट.अशी रडखड करून  आमका फसवलान.  नाविलाजान  तेना दिलान  ते पैशे घेवन्  गप बसोची  पाता इली..... खरा सांगोचा तर  आमची आंग मजूरी दुकू पुरी भागली नाय..... नुकसान  चौघात्री  वाटून घ्येवन  आमी गप बसलाव......” 

       भाऊनी आठवडाभराने बळीला बोलावून घेतले. थेट नाही म्हणून सांगून त्याचे शत्रूत्व पत्करणे  परवडणारे नव्हते. भाऊनी  नाही  न म्हणता  त्याला आशेवर ठेवायचे  असा  डाव खेळला. “ आता बानखिंडी पावत ह्यो पयलो टप्पो  हा  ह्यो काय माका भारी नाय. तेची लय कमी  जोडणी  मी केलेली हा. अगदी  पंदरा दिवसापूर्वी  मजूरीचो  हिसाब करूच्या वक्ती माका पैशाची  जरूरी  हुती  म्हंताना खुटवळ नी शिलीपाट  देवच्या बोलीवर मी बाबुराव देसायाकडना  रक्कम उकललेली हा. आता ते काय सवता खुटवळाचो धंदो करीत नाय पन ते आपल्या वगीतल्या  कोनाक तरी  फुडे करनार....... तुमची माजी काय लय सवगव नाय  म्हंताना त्ये टायमाक तुमका  शिलीपाट घालुची बोली करून पैशे उकलूची  बात माका काय सुचली नाय.......  तुमी  गैरसमज करून घेव नुको......  ”  त्याने मग़ सिलीपाटाचा नी खुटवळाचा काय दर ठरला ह्याची चौकशी केली. भाऊनी  बळीच्या दरादामाची चौकशी  केलेली होती. त्याच्या दरापेक्षा अधिक पण अवास्तव वाटणार नाही   इतपत वाढीव दर सांगितला. 

            भाऊंची मात्रा वर्मी  लागू पडली होती. निदान तोंडावर तरी बळी  नाराजी दाखवू शकत नव्हता. धंद्यातल्या अंतर्गत वैरामुळे  बाबुराव देसायाना  भेटून सांगितल्या गोष्टीची  खातरजमाही  बळी करू शकला नसता. भाऊनी त्याला हलकेसे मधाचे बोट लावले. “आता  तू   अगदी मोक्याच्या येळी  मदतीचो हात फुडे करतहस  त्येची  जाण मी ठ्येवीन.... त्येंचो हिसाब  भागवून लय थोडो शिलीपाट मी तुमका घालीन....” बळी  मनोमन पुरता खट्टू  झालेला होता. पण भाऊ हा काही धंद्यात  मुरलेला बेरकी माणूस नाही. तो साधा सरळ भटगडी आहे अशी बळीची  धारणा होती. त्यामुळे भाऊ बद्दल काही किल्मिष  न ठेवता   बळी  उठून  निघून गेला. त्यानंतर  अधून मधून कामाच्या ठिकाणी येवून बळी फेरी मारून जायचा. काम करणाऱ्या गडी पैऱ्यांना  चढ्या आवाजात खडसावायचा, “अरे अक्करमाशानु,  रेंगत न  ऱ्हवता  सोयन्  कामा करा...... तुमी ग़ांड आळशीपान क्येलास  तर बिचाऱ्या भटाक  रखेत बसवशा...... त्येका जगवलास तर तुमचो रोज शाबूत ऱ्ह्वात ह्या समजून काम करा.”  भाऊ  हसून म्हणायचे , “बळीदा, आता हत त्येतू तरी लबाडी करणारो कोण नाय..... त्येंका कामाची अगत हा......” त्यावर बळी  म्हणायचा, “तुमी झालास तरी भटगडी, मी अनभव खाल्लेलो मानूस हय...... ह्या कुळवाड्याचो  भरवसो बर्मद्येव  देव शकणार नाय. ह्या भडव्यांची शिक (शिंक )  दुकु  खोटी   आसता.  कुळवाडी म्हंज्ये  त्येच्या गांडीत छपन्न मोडी ...... ही जात म्हंज्ये खाल्लेल्या  जाग्यार हगणार नी  आन न खाल्ला   त्या  इस्टारीक (पत्रावळ/पान)  ढुंगण फुसणार....... ह्येंच्या मानेर पाय हा तंवसर चीप ऱ्हवणार..... त्येतू ढिलाय क्येलास तर कदी  तुका खड्ड्यात घालती  त्येचो प्त्त्याबी लागणार नाय.......”

                माघी पौर्णिमा उलटून दोन दिवस झाले नी  पहिल्या टप्प्याचं काम पुरतावलं. अंदाजा बाहेर  आठदहा दिवस जादा लागले होते.  तोडलेला खुटवळ नी  कवळाचे भारे यांची निर्गत लावायची होती. खुटवळाचे ४७ डेपो मारलेले होते. सिलिपाट  वासे - सरी च्या भरीचे म्हणजे साधारण मांडी एवढ्या जाडीचे नग , त्याचे पाच थप  नी   दोन हाता पासून ते चार हाती वेढ असलेल्या अनगळ  गंडोऱ्यांचे  तीन थप होते. कवळाचा उपयोग शेत जमिनींची  भाजावळ करण्या परता आणखी काहीच होणारा नव्हता. तोडपाच्या मजूरीचा अंदाज करून  पंचवीस भारे दोन रुपये किंवा  अर्धा मण भात  या दराने द्यायला हरकत नाही असा बाबल्या नी धाकू यांनी दर केला.   (क्रमश:)