चक्रव्यूह Trupti Deo द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चक्रव्यूह

"चक्रव्यूहाच्या पलीकडचं आयुष्य"
✍🏻 सौ तृप्ती देव 
भिलाई 

लग्न... दोन व्यक्तींमधलं नातं. पण आपल्या समाजात, बाईसाठी ते फक्त दोन व्यक्तींमधलं राहत नाही. ती एकाएकी 'घर' बनते, 'संसार' उभारते आणि नकळतपणे एक चक्रव्यूहात अडकते. हसतमुखाने, स्वतःच्या भावना बाजूला ठेवून सर्वांच्या गरजा पूर्ण करत राहते. पण त्या चक्रव्यूहातून बाहेर पडून स्वतःचा मार्ग तयार करणाऱ्या स्त्रीची कथा स४माजाला नेहमी झणझणीत वाटते… कारण ती सोपी नसते.


"कविताच्या चहा" पासून सुरू झालेली गोष्ट… आणि रोजची सकाळ. आणि सकाळ संपते तो संध्याकाळ

"संध्याकाळी ५ वाजता माझं सगळं घर परत म्हणायचं, 'कविता, एक कप चहा होईल का?'"

कविता जोशी. पुण्यात राहणारी एक ३५ वर्षांची स्त्री. तिचं लग्न एका मध्यमवर्गीय, सुसंस्कृत कुटुंबात झालं. नवरा, दोन लहान मुलं, सासू-सासरे… वयाच्या २४व्या वर्षी तिनं संसारात पाऊल ठेवलं. सुरुवातीला खूप काही नवीन, गोंडस वाटायचं. पण हळूहळू…

"चहा झालाय का?"
"दूध संपलंय का?"
"संध्याकाळी माझ्या मित्राची बायको येणार आहे, स्वयंपाक थोडा चांगला कर."
"तूच कर बघू अभ्यास, आईला काम असतं."
"आई, माझं पाणी भरा बॉटलमध्ये!"

...या सगळ्या वाक्यांत 'कविता' कुठे हरवली?




"संसार" की "चक्रव्यूह"?

कविताचं आयुष्य म्हणजे एक वेळापत्रकाचं जाळं होतं. सकाळी ५.३० ला उठायचं, नवऱ्याचा डबा, मुलांचा डबा, नंतर सासूबाईंसोबत देवपूजा, मग थोडं झाडून-पुसून काहीतरी खायला बनवायचं… आणि मग सगळ्यांच्या मागे-मागे फिरणं.

संध्याकाळी थोडी शांत वेळ मिळेल, एवढंच वाटायचं. पण नाही… तेव्हा चहा, पाहुणे, गृहपाठ, भांडी, फडके, लादी…

"माझा दिवस संपलाय का?" — कवितेला असं स्वतःलाच विचारायचं वाटायचं. पण उत्तर मात्र कुठेच नसायचं.



"आई, तुझं नाव कधी सांगशील?" म्हणजे तू नक्की काय करते?

एकदा तिच्या सात वर्षाच्या मुलीने विचारलं,
"आई, तू काय करतेस? मी शाळेत सांगू का तू 'कुक' आहेस?"
कविता हसली. पण आतून हादरली.

" मला मला पण स्वतःला काहीतरी सिद्ध करायचं काहीतरी बनायचं आहे... पण मी 'काय' आहे?"
हा प्रश्न तिला त्या रात्री झोपू दिला नाही.




"मी पुन्हा कविता व्हायचं ठरवलं"

तिच्या आयुष्यात वळण आलं एका साध्या प्रसंगातून. स्थानिक वाचनालयात ‘महिलांसाठी लेखन कार्यशाळा’ सुरू झाली होती. शेजारच्या मैत्रिणीने तिला फॉर्म भरायला लावला. पहिल्यांदा तिने लिहिलं – “मी कविता आहे… आणि आता कवितांमधूनच जगणार आहे.”

ती दर आठवड्याला एका छोट्या कविता ब्लॉगवर कविता टाकू लागली. शब्दांमधून ती पुन्हा स्वतःला ओळखू लागली.

सासूबाईंना सुरुवातीला ते 'पोकळ' वाटलं. "कविता, घरात कामं वाढतायत, तुझ्या कविता पोट भरणार नाहीत."

पण कविता शांत राहिली. ती घरातलं कामही करत राहिली, पण स्वतःलाही वेळ द्यायला शिकली. ती पहाटे ५ ला उठून एक पान लिहायची. मग दिवस चालायचा.


---

"नाव कमवणं म्हणजे नेहमी टिव्हीवर येणं नसतं…"

ती कविता लिहायची, वाचनालयात वाचन करायची, हळूहळू काही स्पर्धा जिंकायला लागली. मग तिच्या दोन कविता स्थानिक दिवाळी अंकात छापून आल्या. ती वर्तमानपत्रात नाव झळकवणारं व्यक्तिमत्त्व नव्हती. पण तिच्या मुलाने शाळेत सांगितलं,
"माझी आई लेखिका आहे."

तेव्हा कविताच्या डोळ्यांत पाणी आलं.

नवऱ्याला पण हळूहळू तिचा बदल लक्षात आला. तो म्हणायचा, "तू खुश दिसतेस आता."
ती उत्तर द्यायची, "मी आता 'मी' आहे."
तृप्ती देव 

"चक्रव्यूह तोडायचा म्हणजे काय?"

हा लेख एखादी स्त्री उठली, मोठी कॉर्पोरेटमध्ये गेली, लाखो रुपये कमवले असं नाही.
हा लेख सांगतो — की 'स्वतःसाठी वेळ देणं', 'स्वतःची ओळख निर्माण करणं', आणि 'मी कोण आहे' हे शोधणं म्हणजेच चक्रव्यूह तोडणं.

संसार ही जबाबदारी आहे, पण स्वतःकडे दुर्लक्ष करत ती जबाबदारी पार पाडणं हे अंधारात चालणं आहे. त्या अंधारातून प्रकाशाकडे जाणं म्हणजे चक्रव्यूह तोडणं.


---

"चहा अजूनही करते, पण आता कडवट नसतो!"

कविता अजूनही संध्याकाळी चहा करते. अजूनही मुलांचं होमवर्क बघते. फरक इतकाच — आता तिला कोणी विचारलं,
"तू काय करतेस?"
तर ती उत्तर देते,
"मी कविता लिहिते… आणि जगते."


 #सौ तृप्ती देव 
भिलाई छत्तीसगड



लग्नानंतर स्त्रीला घराचं ओझं, जबाबदाऱ्या, समाजाच्या अपेक्षा याचं जाळं भेडसावतं. पण त्या जाळ्यांत अडकून राहणं हा स्त्रीचा धर्म नसतो.

ती जर ती स्वतःची ओळख विसरली, तर घराचाही गाभा हरवतो. पण जर ती स्वतःला जपली, ओळखली, वाढवली — तर ती घरालाही नवसंजीवनी देते.

म्हणूनच, चक्रव्यूह तोडा, स्वतःला शोधा, आणि 'संसाराच्या सावलीत स्वतःचा प्रकाश' नक्कीच मिळवा!

 गोष्ट आवडली तर ती कॉपी-पेस्ट करू नका नावासोबत शेअर करा. शेवटी ओरिजनल कॉपी राहते. काटकुट करू नका खालचे वरचे नाव कापू नका.