एक निरोप असाही... - 1 Ashish Devrukhkar द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक निरोप असाही... - 1

आपल्या एकुलत्या एक बहिणीच्या लग्नासाठी तो सुट्टी टाकून आला होता. बहिणीच्या साखरपुड्याला त्याला यायला जमले नव्हते म्हणून तो थोडा लवकरच म्हणजे फक्त ३ दिवस आधीच आला होता. कारणही तसेच होते कारण त्याच्या कर्तव्यासमोर सगळी नाती गौण होती.

तसा हा कोल्हापूरला राहणारा पण बहिणीचे लग्न कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात होत. बहिणीला हळद लागत होती आणि सगळे बेफाम होऊन नाचत होते पण याचे लक्ष सतत टीव्हीवर सुरू असलेल्या बातम्यांकडे लागून होते. आता बहिणीला हळद लावायची वेळ त्याची होती. सगळे त्याला हाका मारत होते पण याचे लक्ष बातम्यांमध्येच. शेवटी कोणीतरी येऊन त्याला बाहेर घेऊन गेले. आंब्यांच्या पानांनी हळद घेऊन तो त्याच्या बहिणीला हळद लाऊ लागला. कठोर, दगडी हृदयाचा तो बहिणीला हळद लावताना मात्र हळवा झाला. तरीही भावना आवरून हसत हसत त्याने बहिणीला हळद लावली.

"शेंबडे, फायनली तू जाणार उद्या."

तिच्या चेहऱ्याला हळद लावताना मात्र त्याचा बांध फुटला. बहिणीने सुद्धा त्याला मिठी मारली आणि दोघे खूप रडले. त्यांना बघून इतरांचे डोळे देखील पाणावले. मग सुरू झाला नाचण्याचा कार्यक्रम. नवरी मुलीसोबत सगळेच बेफाम नाचत होते याचे लक्ष मात्र टीव्हीकडेच.    जान्हवी त्याची बायको, तिचे लक्ष होतेच याच्याकडे. तिला राहवले नाही, तिने येऊन विचारलेच.

"अहो. काय झालंय? सतत काय टीव्हीवरच्या बातम्या पाहताय?"

"काही नाही ग, तू सांभाळून नाच ५ महिन्यांची गरोदर आहेस."

"माझे आहे लक्ष बरोबर, तुम्हाला काय झालंय सांगा? एकतर साखरपुड्याला नव्हता. सगळ्यांना उत्तर देऊन नाकी नऊ आलेले."

"अग, तुलाही माझ्या कर्तव्याची जाणीव आहे, मला नाही जमलं यायला."

"माहितेय मला पण निदान आता तरी भाऊ, मुलगा, नवरा असल्याचं कर्तव्य पार पाडा ना."

"हो पण..."

"पण बिन काही नाही, काय झालंय मला सांगा."

"अग..."

"अग बिग पण नको, काय झालंय ते सांगा."

"पाकिस्तानने द्रास भागात घुसखोरी केलीये अशी खबर मिळत होती."

"हो माहितेय मला, त्याच काय?"

"तर आपल्या आर्मीची एक टीम कॅप्टन सुमित आणि त्याचे १० साथीदार पॅट्रोलिंगसाठी ६ दिवसांपूर्वी गेले होते."

"हो, तुम्ही यायला निघाला तेव्हा त्याच दिवशीची घटना आहे."

"हो बरोबर, पण गेल्या ३ दिवसांपासून कॅप्टन सुमित आणि त्याच्या १० साथीदारांचा बेस कॅम्पशी संपर्क होत नाही."

"अरे देवा. ते ठीक असतील. डोंगराळ भागात हरवले असतील."

"तसेच असावे."

"पण तुम्ही एवढे चिंताग्रस्त का?"

"त्यांना शोधायला कॅप्टन जेडी आणि त्यांचे १० साथीदार गेलेत."

"सापडतील ओ सगळे, काही नाही होणार."

"कॅप्टन सुमित आणि कंपनीकडे ५ दिवसांचे खाणे होते. मला कारगिलची पुनरावृत्ती होते की काय वाटू लागलंय."

"नाही होणार आणि झाली तर आपली आर्मी त्यांना सोडणार नाही. त्यावेळी सुद्धा सोडले नाही आणि यावेळी सुद्धा सोडणार नाही."

"कारगिल पुनरावृत्ती नकोच."

इतक्यात न्यूजवर बातमी येऊन धडकली.

'कॅप्टन सुमित आणि कंपनीला शोधायला गेलेल्या कॅप्टन जेडी यांचा एकच संदेश आला आणि त्यांच्याशी सुद्धा संपर्क तुटला. कॅप्टन जेडी यांचा  पहिला आणि शेवटचा संदेश होता, we lost captain Sumit & company.'

ब्रेकिंग न्यूज म्हणून ती बातमी यायला लागली तसा हा उठला आणि त्याने पटकन टीव्ही बंद करून आपल्या खोलीत निघून गेला. बातमी खूपच धक्कादायक होती. जान्हवी त्याच्या पाठोपाठ आत गेली तर हा आपला युनिफॉर्म इस्त्री करत होता.

"अहो."

"मला जावे लागेल."

"मी तुम्हाला नाही अडवणार पण ....."

"प्लिज जान्हवी."

"आर्मी अजून एक कंपनी पाठवेल, तुम्हाला कॉल नाही आलाय ना."

"कॉल नाही येणार कदाचित, त्यांना माहितेय मी लग्नासाठी सुट्टीवर आहे. कदाचित न्यायला येतील इथे नाहीतर मीच कॉल करून कळवतो मी सुट्टी रद्द करून येतोय."

"जसे तुम्हाला पटेल तसे, तुमच्या कर्तव्याच्या आड मी नाही येणार."

तो त्याचा निळा युनिफॉर्म इस्त्री करू लागला. इकडे तो दिसत नाही म्हणून त्याचे वडील त्याला शोधत खोलीत आले. 

"काही इमर्जन्सी आहे का?"

"हो पप्पा, मी निघालो तेव्हाच घुसखोरीची खबर आलेली पण आता वातावरण खूपच नाजूक आहे."

"कर तू तयारी."

"अहो बाबा.." पल्लवी.

"सुनबाई, कर्तव्य आधी मग बाकीचे."   

एव्हाना घरात सगळ्यांना कळलं होतं की सीमेवर वातावरण नाजूक आहे, केव्हाही युद्धाला तोंड फुटू शकत. ती रात्र कशीबशी गेली पण त्याच्या खोलीत घडलेले फक्त त्याची बायको जान्हवी आणि वडिलांनाच माहीत होतं. आई, बहीण आणि इतर कोणालाही याची पुसटशी कल्पना नव्हती. ती अख्खी रात्र त्याने बातम्या बघण्यातच घालवली. सारखा सारखा तो मोबाईल चेक करत होता.    

लग्नाचा दिवस उजाडला. वऱ्हाडी मंडळींची एक बस हॉलकडे रवाना झाली. दुसरी बस भरत होती. बहिणीला नेण्यासाठी ह्याची इनोव्हा तयारच होती. अगदी नववधू सारखी सजवलेली. सगळा रुखवत दुसऱ्या बसमध्ये भरला जात होता. ह्याने रात्री इस्त्री केलेला युनिफॉर्म आणून गाडीत लटकवला, शूज सुद्धा ठेवले. हा मस्त शेरवानी घालून होता आणि जान्हवी शालूमध्ये. आई, वडील आणि बहीण आले. इनोव्हाच्या मागच्या सीटवर आई वडील बसले आणि मधल्या सीटवर बहीण, सोबत पाठराखीण म्हणून जाणारी चुलत बहीण बसलेली. गाडीचे सारथ्य स्वतः जान्हवी करणार होती. तो बाजूच्या सीटवर बसला.

"दादा, तू काय शायनिंग मारायचं सोडणार नाहीस."

"आता काय केलं मी?"

"युनिफॉर्म घेऊन आलाय तू."

"हो मग."

"सगळ्यांना माहितेय की आता, कशाला युनिफॉर्म दाखवतो अजून."

"तसे काही नाही."

"अहो वंस काय तुम्ही ह्यांना विचारता. मी सांगते." जान्हवी मध्येच बोलली.

"जान्हवी."

"गपा ओ तुम्ही. हे न युनिफॉर्म मुद्दाम घेऊन आलेत. सासरची मंडळी धाकात राहतील ना म्हणून." 

एकाच हशा पिकला गाडीत पण त्यातल्या तिघांचे हसू खोट होत. कारण तिघांना खरे कारण माहीत होतं युनिफॉर्म आणण्याचे.    पुढे ही सजवलेली इनोव्हा, मागे जान्हवीच्या माहेरची स्विफ्ट, मागे चुलत भावांची, मामाची, मावशीची अशी रांग लागलेली आणि शेवटला वऱ्हाडी मंडळींची दुसरी बस. हा भलामोठा ताफा तासभराने हॉलवर पोहचला. जंगी स्वागत झाले. प्रत्येक स्त्रीला गुलाबांची फुले देण्यात आली. धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. ह्याचे लक्ष मात्र  मोबाईलवर सुरू असलेल्या बातम्यांकडे.   

तेवढ्यात आणखी एक बातमी येऊन धडकली.

'कॅप्टन सुमित आणि कंपनीचा शोध घ्यायला गेलेल्या कॅप्टन जेडी आणि कंपनीशी सम्पर्क तुटून १२ तास उलटून गेल्यामुळे भारतीय वायुसेनेचे मिग २१ बायसन घेऊन गेलेल्या स्कॉड्रन लीडर अजित आपल्या विमानसह बेपत्ता. संपर्क तुटून १ तास उलटून गेलाय.'   

बातमी बघताच ह्याचा जीव वरखाली झाला. त्याचे कशातच लक्ष नव्हतं. समोर आई, वडील आणि बहीण बसले होते. धार्मिक विधी सुरू होता. जान्हवी तिथे सगळं सांभाळत होती. हा उठला आणि बहिणीच्या बाजूला जाऊन बसला आणि त्याच्या बाजूला जान्हवी येऊन बसली. हॉल भरगच्च भरला होता. नवऱ्या मुलाकडचे सुद्धा खूप लोक होते. विधी सुरू होते आणि इतक्यात......

   इतक्यात भारतीय आर्मीचा तो भलामोठा ट्रक हॉलच्या गेटवर येऊन थांबला.