धुनी "अंधारलेल्या प्रकाशवाटा"(कांदबरी) - प्रकरण १
सावरखेडच्या वेशीवर तांबडं फुटलं होतं. राघू-मैनांच्या किलबिलाटानं शिवाराला जाग आली होती. पुण्यातून येणारी लालपरी (एसटी) खडखडचा आवज करत गडगडत वेशीपाशी थांबली आणि धुराचा लोट सोडून निघून गेली. तेव्हा त्या बस चा दरवाजा उघडून, धुरळ्यातून बाहेर पडला तो आशिष. हातातली बॅग सावरत त्यानं गावातल्या वेशीवरच्या मातीला स्पर्श करत, त्या मातीचा टिळा आपल्या कपाळी लावला आणि आपल्या गावच्या मातीत पाऊल ठेवल्या बरोबर एक खोल श्वास घेतला. "पाच वर्षं झाली... पण मातीचा हा वास पुण्यातल्या सेंटमध्ये कुठं सापडणार?" तो स्वतःशीच पुटपुटला.
त्यानं लॅपटॉपची बॅग खांद्यावर नीट केली. गावात शिरताना त्याला जाणवलं की रस्ते सिमेंटचे झालेत खरे, पण गटारं तुंबलेलीच आहेत. वेशीवरच्या पारावर बसलेली म्हातारी माणसं त्याच्याकडे 'हा कोण उपरा?' अशा नजरेनं बघत होती. आशिषला शहरातल्या कॉर्पोरेट नोकरीचा कंटाळा आला होता. तिथलं एकंदरीत वातावरण आणि 'वर्क कल्चर' च्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आणि एकमेकांचे पाय खेचण्याची वृत्ती याला कंटाळून मनापासून गावची नाळ जोडलेली राहवी हा विचार करून तो आपल्या मुळ गावाकडे, म्हणजे सावरखेडकडे परतला होता....
गावातल्या जुन्या वळणानं आशिष, सत्यजितच्या वाड्यापाशी पोहोचला. तिथं पोहचल्यावर सर्वत्र नजर फिरवत आशिष वाड्यात शिरला..
कोरीव लाकडी दरवाजा आणि अंगणातली तुळस अजून तशीच होती. ओसरीवर सत्यजित बसला होता. त्याच्या समोर संत ज्ञानेश्वरांनी, मराठी प्राकृत भाषेत लिहिलेली भावार्थ दीपिका अर्थात "ज्ञानेश्वरी" (ग्रंथ -पोथी) उघडी होती, सत्यजित नुकताच ज्ञानेश्वरी मधील ओव्या वाचून, शेवटची विश्वशांततेची प्रार्थना - संत ज्ञानेश्वरांनी रचलेले पसायदान म्हणून, स्वतः चे डोळे मिटून थोडावेळ शांत बसला होता....
तेवढ्यात "राम कृष्ण हरी, सत्या दादा!" आशिषनं साद घातली.
सत्यजितनं डोळे उघडले. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच शांतता आणि धार होती. "आलायस तर? आशिष, मी वाटच पाहत होतो. शहरातल्या काचेच्या बंगल्यात मन नाही लागलं वाटतं तुझं पण..?"
आशिष खाली बसला. "नाही रे. तिथं फक्त शरीर जगत, पण जसं काय माझं, मन मात्र मेलं होतं. इथं काय चाललंय? गावात येताना पाहिलं, टेकड्या कापल्या जात आहेत. विकासासाठी काय ही उठाठेव मांडली जात आहे..?"
सत्यजितचा चेहरा गंभीर झाला. "हेच तर दुखण आहे. वाढत्या शहरीकरणानं गावच्या नाड्या आवळल्यात. अन् गावात भ्रष्टाचार असा घुसलाय की, पार लगे गावच्या माणसाची माणुसकी हरवलीय. मी इथं 'सेवाग्राम' नावाची संस्था काढली खरी, पण सत्ताधाऱ्यांचे डोळे आता माझ्या या वाड्यावर आणि शेतकऱ्यांच्या जमिनीवर आहेत."
तेवढ्यात अंगणात एक सायकल थांबली. संस्कृती आली होती. अंगात साधी, साडी-ब्लाऊज, मस्त सुरेख केसांची वेणी आणि हातात काचेचे गोठ (बांगड्या) घातलेल्या होत्या... ती महानुभाव पंथातल्या विचारांत वाढलेली, पण कृषी विज्ञानाची पदवी घेतलेली मुलगी. अभ्यासात आणि व्यवहारिक जीवनात सुद्धा तेवढीच समृद्ध आणि हुशार असलेली 'संस्कृती'
"जय श्रीकृष्ण, दंडवत.. दादा!" ती उत्साहानं म्हणाली, पण आशिषला बघून, मध्येच थांबली...
सत्यजितनं ओळख करून दिली, "हा आशिष, माझा मित्र. आणि आशिष, ही संस्कृती. ही आपल्या गावातली 'सॉईल डॉक्टर' आहे."
संस्कृतीनं हातातली माती आशिषला दाखवली. "हे पहा आशिष दादा. ही माती आता विष ओकतेय. एमआयडीसीच्या कंपन्यांनी आपल्या गावच्या जमिनीत सांडपाणी सोडलंय. ते बऱ्याच अंशी विषारी आहे... आणि आपण म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण प्रत्यक्षात आपण आपल्या आईचा, म्हणजे मातीचा गळा आवळतोय." तिचं बोलणं जितकं सोपं होतं, तितकंच ते काळजाला भिडणारं होतं.
बोलणं चालू असतानाच वेशीतून सखाराम काका धावत आले ; त्यांचे डोळे रडून सुजले होते. "सत्या भाऊ... घात झाला.! घात ..! माझ्यासंग घात..! माझा सातबारा कुणीतरी कोरा केला. तलाठी म्हणतोय तुझी जमीन आता एका मोठ्या साहेबाच्या नावावर झालीय. मी सही नाय केली, अंगठा नाय दिला... मग माझं रान गेलं कुणीकडं?"
आशिषनं सखाराम काकांचे कागदपत्रं पाहिले. तो चकित झाला. "सत्या, हे तर डिजिटल फसवणूक आहे. कुणीतरी सखाराम काकांच्या नावाचा गैरवापर करून ऑनलाईन ट्रान्सफर केलीय. हे खालच्या थराचं राजकारण आहे."
सत्यजितचे हात मुठीत आवळले गेले. "हे काम आमदार नामदेवराव गटाने यांच्या माणसांचंच असणार. त्यांना वाटतं शेतकरी अडाणी आहे, काहीच करणार नाही. पण त्यांना माहीत नाही की, आता माणुसकीची तलवार तळपणार आहे."
दुपारी हे तिघेही गावातल्या जिल्हा परिषद शाळेत गेले. तिथे सदाशिव गुरुजी एकटेच फाटकी पुस्तकं सावरत बसले होते. "या बाळांनो," गुरुजींचा आवाज कातर झाला होता. "बघा या शाळेची अवस्था. अनुदान येतं पण ते खाल्लं जातं. गरिबांची मुलं शिकून मोठी होऊ नयेत असंच व्यवस्थेला वाटतंय. शिक्षण आता माणुसकी शिकवत नाही, तर फक्त पैसा कमवायची शर्यत शिकवतंय."
संस्कृती म्हणाली, "गुरुजी, आपण ही शाळा पुन्हा जिवंत करू. आशिष दादांना तंत्रज्ञान येतं, मला विज्ञान येतं आणि सत्यजित दादांकडे संघटन आहे. आपण 'नैतिक शिक्षणाची' नवी पद्धत सुरू करू."
संध्याकाळी गावात आमदारांची सभा होती. नामदेवराव गटाने व्यासपीठावर चढले. "आम्ही गाव सुजलाम सुफलाम करू! कारखाने येतील, भरभरून पैसा मिळेल!" त्यांनी घोषणा केली.
सत्यजित गर्दीतून ओरडला, "आमदार साहेब, पैसा मिळेल पण आरोग्य कुणाकडे मागणार? सखाराम काकांची जमीन कोणत्या कायद्यानं हडपली?"
सभा गोंधळात पडली. आमदारांनी सत्यजितला खुनशी नजरेनं पाहिलं. "सत्या, राजकारण खेळायचं असेल तर मैदानात ये, हे समाजसेवेचे फंडे आमच्याकडे नकोत. लक्षात ठेव, ज्या दिवशी जमिनीचा व्यवहार पूर्ण होईल, त्या दिवशी तुझं अस्तित्व पुसलेलं असेल."
रात्री वाड्यावर शांतता होती. आशिष लॅपटॉपवर जमिनीच्या घोटाळ्याचे धागेदोरे शोधत होता. अचानक वाड्याबाहेर गाड्या थांबल्याचा आवाज आला. खिडकीच्या काचेवर मोठा दगड येऊन आदळला.
"सत्यजित, बाहेर ये!" कुणीतरी ओरडलं.
आशिष घाबरला, पण सत्यजित शांतपणे बाहेर गेला. बाहेर सहा-सात गुंड हातात काठ्या घेऊन उभे होते. "हा शेवटचा इशारा आहे. ही जमिनीची फाईल आणि तो आयटीवाला पोरगा, दोघांनाही उद्या शहराबाहेर पाठवून दे, नाहीतर वाड्याला आग लागेल."
संस्कृती सुद्धा तिथे पोहोचली होती. तिने गुंडांकडे पाहून म्हटलं, "विनाशकाले विपरीत बुद्धी! तुम्ही माणुसकी विसरला असाल, पण आम्ही आमचा धर्म विसरलो नाहीये." गुंड निघून गेले, पण वातावरण तणावपूर्ण झालं होतं.
रात्रीचे दोन वाजले होते. आशिष, सत्यजित आणि संस्कृती पुन्हा ओसरीवर बसले. आशिषला लॅपटॉपवर एक गुप्त फाईल सापडली होती, ज्यामध्ये एमआयडीसीच्या भ्रष्टाचाराचे कच्चे चिट्ठे होते.
"सत्या, ही लढाई आता मोठी आहे. यात फक्त आमदार नाही, तर मंत्रालयातले लोकही आहेत," आशिष म्हणाला.
सत्यजितनं विठ्ठलाच्या मूर्तीसमोर हात जोडले. "हरकत नाही. वारकरी संप्रदायाने आपल्याला शांती शिकवली, तर महानुभाव पंथाने तर्क. आणि नाथ संप्रदायाने शक्ती. आपण या तिन्हीचा वापर करू. माणुसकीचा हा धर्म आपल्याला या अंधारातून बाहेर काढेल."
त्या रात्री सावरखेडमध्ये एक वेगळीच 'धुनी' पेटली होती. ही केवळ अग्नीची नव्हती, तर ती अन्यायाविरुद्ध पेटलेल्या मशालीची होती. आशिषनं ठरवलं होतं की आता तो पुण्यात जाणार नाही. संस्कृतीनं ठरवलं होतं की ती माती वाचवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि सत्यजित? तो आता एका मोठ्या क्रांतीचा नायक झाला होता.