मी नास्तिक आणि वेदांताचा ब्रह्मन् - भाग 1 Gajagamini द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी नास्तिक आणि वेदांताचा ब्रह्मन् - भाग 1

मी कोण?

हा वेदान्तामधला “मी कोण?” हा प्रश्न नाहीये. हा प्रश्न लेखकाबद्दल आहे, तो माझ्याबद्दल आहे. “मी नास्तिक आणि वेदांताचा ब्रह्म ' हे शीर्षक वाचकाला कोड्यात पाडतं. एका बाजूला ईश्वराचं अस्तित्व नाकारणारी बाई आणि दुसऱ्या बाजूला थेट वेदान्ताची चर्चा? हा प्रश्न तुमच्याही मनात आलाच असेल. 

आपण तिथूनच सुरुवात करूया.

मी वेदांत पाहिलाय. आतूनही, आणि बाहेरूनही.

एखाद्या घरात आपण राहतो ना, तेव्हा तिथली चित्रं, तिथलं फर्निचर, त्या भिंतींचा वास, हे सगळं आपल्याला पुरतं माहीत असतं. पण आत बसून घराचा नेमका आकार कळत नाही. त्याची उंची किती, त्याची रुंदी किती? हे आतून नाही सांगता येत. त्यासाठी बाहेर डोकावावं लागतं. 

मी वेदांत जगलेय. अगदी मनापासून, श्रद्धेने आणि अभ्यासाने सुद्धा. पण आता? आता मी त्या चौकटीच्या पलीकडे उभी आहे. कधीकाळी जे घर वाटायचं, तिथून आता बाहेर पडलेय.

यामुळे मी खूप हुशार ठरते का? छे, मुळीच नाही. किंवा मग माझ्या बोलण्याला यामुळे काही खास महत्त्व मिळतं? अजिबात नाही. मग तुम्ही हे का वाचावं? कारण मी त्याच जुन्या वास्तवाकडे एका अशा कोनातून बघतोय जो कदाचित तुमच्यासाठी नवा असेल. 

कधीतरी दृष्टिकोन बदलून पाहणं गरजेचं असतं, नाही का? फक्त त्यासाठीच हा प्रपंच.

मी कोणत्या प्रकारची नास्तिक आहे?

नास्तिक असणं म्हणजे ईश्वर नाही आणि आस्तिक असणं म्हणजे ईश्वर आहे. हे समीकरण वरवर सोपं वाटतं, पण वैज्ञानिक नास्तिकवाद इतका सरळ नसतो. प्रश्न केवळ 'हो' किंवा 'नाही' असा उरतच नाही. मुळात या प्रवासात विचारांचे कितीतरी टप्पे येतात. 

"देव नाहीच, १००% नाही." असं विधान कोणताही सुशिक्षित नास्तिक करणार नाही. कधीच नाही. का? कारण एखाद्या गोष्टीच्या 'नसण्याची' अशी ठाम खात्री बाळगणं, ही सुद्धा शेवटी एक श्रद्धाच. एक विश्वास.

मी अशा टोकाच्या भूमिकेची समर्थक नाही. अजिबात नाही.

मग माझं किंवा माझ्यासारख्यांचं म्हणणं काय?

धर्माने उभा केलेला, वेगवेगळ्या कथा, भाकीतं, श्रद्धा, अंधश्रद्धा यांनी उभा केलेला पारंपारिक 'देव' अस्तित्वात आहे हे असणं कठीण आहे. पण 'देव' नावाची एखादी शक्यता? ती असू शकते का? हो, नक्कीच. देव असू शकतो. ती शक्यता आहेच की. 

“बघा! मानलं की नाही तुम्ही सुद्धा!” असं तुम्ही म्हणाल. पण नाही. ही काही तडजोड नाही. 

का? कारण शक्यता खूप स्वस्त असतात. अनेक असतात. त्यांच्या असण्याला किंमत फार थोडी असते. हे जग एखाद्या मगरीच्या अंड्यातून बाहेर पडलं असावं ही सुद्धा एक शक्यता आहे. आणि ते खरंही असेल, का नाही? 

मग घोळ कुठे होतो?

जेव्हा आपण एखाद्या 'शक्यतेला' कल्पनेचे कपडे चढवतो. तिला आकार देतो. तिथेच विज्ञानाची सीमा संपते. तर्क मागे पडतो. आपण वास्तवाच्या कक्षेबाहेर जातो की नाही? कदाचित हो, जातोच.

आपण पुढे जाऊ त्याआधी, एक डिस्क्लेमर देते. हे ऐतिहासिक आणि तात्विक अंगाने केलेले विश्लेषण आहे; यात कोणत्याही धार्मिक श्रद्धांना चुकीचे ठरवण्याचा किंवा त्यांचा विरोध करण्याचा हेतू नाही. हे लेखन पूर्णपणे वैचारिक अभ्यासावर आधारित आहे.

***

चार्वाक नावाचा तो मुलगा. जंगलातून पळत होता. वाटेत ओढा लागला. त्या गार पाण्यात पावलं टाकत तो पुढे निघाला. ओलं, मऊ गवत तुडवत तो बेभान धावत सुटला. त्याची नजर एका दगडावर खिळली. रोजचाच तो दगड. चार्वाक तिथेच विसावला. मग सगळं कसं संथ झालं. 

त्याच्या समोर वेदवती एका झाडाला उलटी टांगली होती. त्या फांदीवर आरामात झोके घेत होती. 

चार्वाक: “माझे बाबा नेहमी म्हणतात की त्यांना उपनिषदांचा ब्रह्मन् काय हे ठाऊक आहे. त्याबद्दल त्यांना पुरेपूर खात्री वाटते. त्यांच्या मित्रांशी यावर त्यांचे वादसुद्धा होतात. 

गंमत म्हणजे, त्यांचे मित्रही तेच म्हणतात—की त्यांनाही 'ब्रह्म' नीट माहितीये. पण मग पेच कुठे आहे? प्रत्येक जण काहीतरी वेगळंच सांगतोय. कुणाचाच ताळमेळ बसत नाही. आणि प्रत्येक जण म्हणतोय की मला हे ठाऊक आहे. 

मग हे सगळेच बरोबर आहेत? की सगळेच चुकीचे?

वेदवती किंचित हसली आणि म्हणाली: “त्यांना वाटतं की त्यांना सगळं उमगलंय. पण ज्याला ते ब्रह्मन् म्हणतात, ते प्रत्येकाच्या मना-मनात वेगळं, कल्पनेत वेगळं. इथे प्रश्न ते बरोबर आहेत की चुकीचे, याचा नाहीच मुळी. खरी अडचण त्यांना खात्री असण्यात आहे. 

जी गोष्ट इतकी अस्पष्ट आहे, जी मी नव्हते, तू नव्हतास आणि जेव्हा ते सुद्धा नव्हते त्या काळी लिहिली गेली, त्याबद्दल इतकी खात्री बाळगणं हाच मुळी विरोधाभास नाही का?”

चार्वाक: वेदवती, हे मी आधीही अनेकदा ऐकलंय. पण तुला नक्की काय वाटतं, ब्रह्मन् म्हणजे काय?

वेदवती: ब्रह्मन्? ही काही एका रात्रीत जन्मलेली संकल्पना नाही. काळानुसार ती बदलत गेली, विस्तारत गेली.

इतिहास काय सांगतो? सुरुवातीला वेदांमध्ये या शब्दाचा संदर्भच वेगळा होता. तेव्हाचं सगळं साहित्य कशाभोवती फिरत होतं? कर्मकांडाभोवती, यज्ञाभोवती. 

वेदांतली सूक्त, त्या सूक्तांमधले मंत्र, त्या मात्रांमधले देवता यांचा उद्देश काय? या सगळ्यांच्या उद्देश एकच होता—कर्मकांड सिद्ध करणं, यज्ञ पूर्णत्वाकडे नेणं. हा वेदांतामधला ब्रह्मन् सुद्धा त्याहून वेगळा नव्हताच मुळी. कर्मकांडाच्या मागे उभी असलेली एक सुप्त शक्ती म्हणजे वेदांचा ब्रह्मन्, जी यज्ञांना सिद्ध करते, इतकीच त्याची व्याप्ती होती.

पण पुढे? पुढे हे चित्र पालटलं. ब्रह्मन् या तत्वानं कर्मकांडाची ती चौकट ओलांडली. ती शक्ती केवळ यज्ञ, विधी यांपुरती मर्यादित न राहता विस्तारत गेली. विधी-रिचुअल्स हळूहळू मागे पडल्या.

चार्वाक: “विस्तारत गेली? म्हणजे नक्की कशी?”

वेदवती: “वेदांचा काळ, साधारण तीन ते चार हजार वर्षांपूर्वीचा. पुढे अडीच ते दोन हजार वर्षांपूर्वी ते लिखित रूपात एकत्र येत गेले. काही अभ्यासक खगोलशास्त्राचा आधार घेऊन हा प्रवास सात हजार वर्षं मागे नेतात. पण तो वादाचा मुद्दा आहे.

आपला मुद्दा हा की, इतक्या प्रचंड मोठ्या कालखंडात गोष्टी स्थिर कशा राहतील? काळ बदलला की सगळंच बदलतं. देवतांची रूपं बदलतात, आणि नावंही!

एक गंमत सांगू?

सुरुवातीच्या वैदिक काळात देवतांना चक्क 'असुर' म्हटलं जायचं. विश्वास बसत नाही ना? आज आपण ज्यांना राक्षस समजतो, तो शब्द तेव्हा देवासांठी वापरला जायचा.

त्वम॑ग्ने रु॒द्रो असु॑रो म॒हो दि॒वस्त्वं।

ऋग्वेदातील (२.१.६) या मंत्राचा अर्थ असा होतो—'हे अग्नी, तूच रुद्र आहेस, तूच त्या विशाल आकाशाचा असुर आहेस.'

'असु' म्हणजे काय? तर प्राणशक्ती. आणि 'रा'? ती शक्ती बहाल करणारा. या अर्थानं पाहिलं तर 'असुर' म्हणजे चक्क प्राण देणारा!

आज काळ किती बदललाय ना?

कुणी आपल्या देवतेला 'असुर' म्हटलं तर आज आपल्या कपाळाला आठ्या पडतील. तो तर थेट अपमानच ठरेल! पण प्राचीन काळात? इराणचे लोकही वैदिकांसारखे आपल्या देवतांना 'अहुर' किंवा 'असुर' संबोधायचे.

चार्वाक: खरंच वेदवती? 

वेदवती: होय. काणे आणि दांडेकर. या विद्वानांचंसुद्धा या बाबतीत एकमत आहे. 'असुर' हे मुळात देवांचंच एक विशेषण! त्याकाळी ते सन्मानाने वापरलं जायचं. 

सायनाचार्य हे मोठे विद्वान होऊन गेले ज्यांनी ऋग्वेदावर भाष्य लिहिलं जे आजही प्रमाण मानलं जातं. त्यांनी असुर या शब्दाचा विरोधाभासी अर्थ दिलाय. त्यांनी सुरुवातीला या शब्दाची फोड कशी केली? 'शत्रूणाम् निरसिताः'. म्हणजे शत्रूंचा नायनाट करणारा. पण पुढे? ऋग्वेदाच्या (१.३५.७) भाष्यात मात्र त्यांनी अधिक शास्त्रीय अर्थ स्वीकारलेला दिसतो. तिथे ते म्हणतात—'असुरः प्राणप्रदः अर्थात असुर म्हणजे प्राण देणारा.

ब्रह्मन् ही संकल्पनासुद्धा अशीच बदलत गेली. वैदिक काळात ब्रह्मन् हा पूर्णपणे यज्ञविधींच्या आणि कर्मकांडांच्या वर्तुळात बांधलेला होता. त्याचा संबंध केवळ आणि केवळ अग्नीशी निगडित यज्ञ-कर्मकांडाशीच होता. 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलात (१.१६४) एक महत्त्वाचं वचन

येतं: ब्रह्मायं वाचः परमं व्योम। 

याचा पूर्ण मंत्राचा मूळ गाभा काय? तर ती यज्ञाची वेदी. ती केवळ मातीची किंवा विटांची बनलेली भौतिक जागा नाही. तर तो यज्ञ वैश्विक आहे. 

आणि ब्रह्मन्?

या संदर्भात ब्रह्मन् म्हणजे दुसरं तिसरं काही नसून यज्ञाच्या मात्रांमागे असलेली वाणी. 

वेदांमध्ये ब्रह्मन् हे तत्त्व असं खूप कमी वेळा येतं आणि ते सुद्धा यज्ञाच्या संदर्भातच. म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनातून ब्रह्मन् हे वैदिकांचं ध्येय नव्हतं. त्यांची गाडी कर्मकांडाकडे निघाली होती, ब्रह्मन् कडे नव्हे.

पण उपनिषदांच्या काळात ऋषींनी ब्रह्मन् ला या कर्मकांडांच्या वर्तुळातून खेचून बाहेर काढलं. कर्मकांडांच्या साखळदंडांतून मुक्त केलं. आता ब्रह्मन् म्हणजे केवळ मंत्रांचा उच्चार राहिला नव्हता. तो एक स्वतंत्र असा शोध झाला होता. तिथूनच ही नवी ओळख जन्माला आली—'सर्वव्यापी चैतन्य'. जे सगळीकडे आहे.

चार्वाक: “पण मग सुरुवातीच्या या वैदिक अनुयायांनी याला विरोध नाही का केला? म्हणजे जे ऋग्वेद आणि इतर वेदांमधील यज्ञविधींचे पालन करायचे, त्यांना हे पटलं का? त्यांच्यासाठी कर्मकांड सर्वीपरी होतं. हो ना?

वेदवती: भारतीय परंपरेत विरोधाची पद्धत मोठी अजब आहे. इथे समोरच्याला चुकीचं ठरवून त्याचा पत्ता कट करायचा नसतो. मग काय करायचं? तर त्याला स्वतःमध्ये सामावून घ्यायचं. त्याला अगदी 'पचवून' टाकायचं.

समजा 'अ' ला 'ब' पेक्षा मोठं व्हायचं आहे. मग 'अ' काय करेल? तो 'ब' ला फेकून देणार नाही. उलट, तो 'ब' ला आपल्याच पोटात घेईल. स्वतःची व्याप्ती वाढवेल. 'ब' आता 'अ' चाच एक भाग होऊन जाईल.

पूर्व मीमांसा ही एक अशी परंपरा होती जी त्या काळच्या खूप शिस्तशीर अशा यज्ञमार्गावर चालत राहिली. उपनिषदांचे विचार प्रवाहामध्ये असतानाही, हे लोक आपल्या विधींना घट्ट धरून होते.

पण एक गंमत सांगू?

आजच्या आपल्या निकषांनुसार बघितलं, तर हे पूर्व मीमांसेचे अनुयायी खऱ्या अर्थाने 'ईश्वरवादी' नव्हतेच!

चार्वाक: ईश्वरवादी नव्हते? मग ते नास्तिक होते का? ते वेदांना मानत नव्हते का?”

वेदवती: पूर्व मीमांसक इंद्र, वरुण, आर्यमा, अग्नी, रुद्र या देवतांना मानायचे. ते मानायचे की या देवतांना स्वतःचं रूप आहे, स्वतःचा चेहरा आहे. हे देवता जिवंत आहेत. यज्ञ सुरू झाला की या देवता आपला हविर्भाग (यज्ञात जे आपण अर्पण करतो तो हवि) घेण्यासाठी समोर प्रकट होतात आणि त्याबदल्यात आपल्याला नाना गोष्टी पुरवतात. 

वैदिक ऋचा हजारो वेळा हेच तर सारखं सारखं सांगतात. की हे इंद्रा, रुद्रा, सूर्या, प्रकट हो. आम्हाला गायी दे, सोनं दे, धान्य दे, पाऊस दे आणि आमच्या अनार्य शत्रूंचा नाश कर. 

पण इथेच एक मेख होती.

या देवता त्यांच्या मते स्वतंत्र होत्या का? नाही. त्या पूर्णपणे बांधलेल्या होत्या. कशाला? वैदिक मंत्रांना. वैदिक मंत्रांच्या नियंत्रणाखाली. डिटर्मिनिस्टिक.

चार्वाक: डिटर्मिनिस्टिक म्हणजे?

वेदवती: हे देवता पाऊस देत, गुरंढोरं देत, सुबत्ताही देत. पण का? कारण ते मंत्रांच्या आधीन होते. मंत्रांनी बांधलेले होते म्हणजे डिटर्मिनिस्टिक. एखाद्या यंत्राचा विचार कर. हे जग म्हणजे एक मशीन आहे आणि वेद म्हणजे त्या मशीनचं मॅन्युअल. तू मॅन्युअल वाचलं आणि बटण दाबलं की मशीन सुरू होणारच. त्याचे वेगवेगळे भाग हलणार. त्या यंत्राला पर्याय नसतो. तू मंत्रांचे नियम पाळलेस की जे जे वैदिक मंत्र देणार आहेत ते ते तुला दिलं जाईल हे निश्चित. अगदी 'ऑटोमॅटिक' प्रक्रिया. याचा अर्थ देवता ह्या दुय्यम आणि वेदांचे मंत्र आणि त्यांचा उच्चार, कर्मकांड हेच मुळात सर्वश्रेष्ठ. 

पुराणांतही याचीच सावली आहे. तिथे असं म्हटलंय की मानवांनी यज्ञ करणं थांबवलं, तर देव अशक्त होतात. भूकेने व्याकूळ होतात. 

देवी भागवतातील (७.२८.१८) हा श्लोक असा आहे:

निर्जराः सजरा जाता हविर्भागाद्यभावतः ।

ज्यांना आपण 'निर्जर' म्हणतो, म्हणजे जे कधीच म्हातारे होत नाहीत, तेच देव वृद्ध झाले. थकले. का? तर केवळ यज्ञातील तो हविर्भाग त्यांना मिळाला नाही म्हणून.

या संदर्भात गीता ३.११ चा संदर्भही महत्त्वाचा आहे, जिथे म्हटलं आहे की यज्ञाद्वारे देव आणि मानव यांनी एकमेकांचे पोषण करावे.

याचा अर्थ हा नाही की देव कमकुवत आहेत किंवा मला देवतांना कमी लेखायचय. मी फक्त पूर्व मीमांसकांचं तत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतेय. त्यांनी वेदांच्या कर्मकांडाला, वैदिक नियमांना प्राधान्य दिलं देवतांना नाही. 

चार्वाक: पण ते देवांना तर मानत होते. मग ते निरीश्वरवादी कसे?

वेदवती: देवतांना मानणारे सुद्धा निरीश्वरवादी असू शकतात जर ते ईश्वराला नाकारतात. जसे नवबौद्ध. त्यांच्या विचारधारेत कोणत्याही एका 'सर्वोच्च' ईश्वराला किंवा विश्वावर सत्ता गाजवणाऱ्या एखाद्या ब्रह्मन् नावाच्या तत्त्वाला जागा नव्हती. त्यांच्यासाठी देव हे स्वतंत्र किंवा स्वतःच्या इच्छेने वागणारे नव्हते. ते केवळ एका नियमावलीचे भाग होते. आणि ती नियमावली म्हणजे वेद आणि त्यांचा ऋत पूर्व मीमांसकांसाठी सर्वश्रेष्ठ होतं.

चार्वाक: ऋत? ते काय असतं?

वेदवती: ऋत हे कर्मकांडाचं, यज्ञाचं मूक व्याकरण. ज्या नियमानुसार हे सगळं विश्व उभं आहे, पण ज्याला स्वतःचं असं मन नाही, भावना नाहीत की कोणतीही विशेष इच्छा नाही. ते फक्त आहे.

पण उपनिषदांनी मात्र या चित्रात रंग भरले.

उपनिषदांच्या ऋषींना ब्रह्मन् हे तत्त्व त्या अस्पष्ट धुक्यातून बाहेर काढून मानवी जाणीवेच्या केंद्रस्थानी आणायचं होतं. 

वैदिक ऋषी हे 'कर्मकांडाचे' पाईक होते. त्यांच्यासाठी गणितासारखे अचूक मंत्र आणि विधी हेच सगळं काही होतं. पण उपनिषदांचे ऋषी? ते 'ज्ञानकांडाचे' पाईक ठरले. त्यांनी डोळे मिटून ध्यान केलं, तात्विक वादविवाद केले आणि आपल्या आतल्या 'मी'ला प्रश्न विचारले.

त्यांना यज्ञ, कर्मकांड इत्यादींची गरज नव्हती. त्यांचा ब्रह्मन् हा तात्विक होता. त्यांनी कर्मकांड आणि ब्रह्मन् ची नाळ हळूहळू तोडली. 

याची सावली गीतेत सुद्धा आहे. 

यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।

वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ २.४२ ॥

कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।

क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ २.४३ ॥

याचा अर्थ: काही लोक वेदांमधील त्या “पुष्पितां वाचं” म्हणजे कठीण व अलंकारिक शब्दांनी भारावून जातात आणि असा दावा करतात की, यापलीकडे दुसरे काहीच नाही (न अन्यत् अस्ती इति।) यांच्या मनात नाना इच्छा असतात, कामना असतात. ज्यांचे ध्येय केवळ स्वर्गप्राप्ती असते. ते ऐश्वर्य मिळवण्यासाठी वेदांमधील अशा अनेक कर्मकांडांचा पुरस्कार करतात, जे केवळ पुनर्जन्म आणि कर्माची फळे देणारे असतात.

गीतेचा लेखक आणि उपनिषदांचे लेखक... दोघांचा सूर इथे  जुळतोय. 

चार्वाक: हो, गीतेत हे सुद्धा म्हटलंय, 

'यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥'

म्हणजे बघ, कर्मातून (कामना वा इच्छेतून) यज्ञाचा जन्म होतो आणि त्या यज्ञापासून पाऊस पडतो. 

वेदवती: हो. वैदिक संहितेच्या काळात 'कर्मकांड' ही केवळ एक पद्धत नव्हती, तर ते जगण्याचं एक पक्कं झालेलं सूत्र होतं. यज्ञ करा, विधी करा आणि हवं ते मिळवा. आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून हे काही नवं नाही. 

सुरुवातीचे अनेक धर्म, त्यांचा पायाच मुळात या 'देण्या-घेण्याच्या' व्यवहारावर उभा होता. पाऊस पडला नाही तर काय? वीज कोसळली तर? या शक्तींना प्रसन्न करणं हाच जगण्याचा एकमेव मार्ग वाटायचा. मग सुरू झाले ते नवस, ते बळी आणि ते विधी. "मी तुला हे अर्पण करतो, तू मला सुबत्ता दे"—असं हे साधं आणि थेट नातं होतं. जवळजवळ सगळ्या धर्मांमध्ये याच धारणा सुरवातीला प्रचलित झालेल्या दिसतात मग तो ग्रीकांचा झियुस असो, जर्मन थॉर असो, वा चिन आणि इस्रायल मधले प्राचीन देवता असोत.

पण एक गोष्ट लक्षात घे, उपनिषदं आली आणि कर्मकांड संपलं, असं अजिबात झालं नाही. त्या काळात वेदांचं जुनं कर्मकांड आणि उपनिषदांमधील नवा ब्रह्मन् हे दोन्ही प्रवाह एकमेकांच्या हातात हात घालून, एकाच वेळी अस्तित्वात राहिले. आणि यांना जोडणारा दुवा म्हणजे 'आरण्यकं'. 

संहिता (कर्मकांड) आणि उपनिषदं (ब्रह्मन्) यांना जोडणारा हा पूल आहे. आरण्यकांमध्ये यज्ञाच्या विधींना हळूहळू 'मानसिक यज्ञ' किंवा प्रतीकात्मक रूप देण्यास सुरुवात झाली. (वेदांचे चार भाग केले जातात, संहिता-ब्राह्मण-आरण्यक-उपनिषद. या प्रत्येक भागाची निर्मिती ही त्याच्या आधीच्या भागानंतर क्रमाने होत गेली. उपनिषद शेवटचे म्हणून ते वेदांत. सहितांपासून जसे आपण पुढे जातो तसतसं यात कर्मकांडांचं महत्त्व कमी होत गेलं आणि तात्विक फिलॉसॉफिचं प्रमाण वाढत गेले.)

गीता अगदी तेच करते जे उपनिषदांनी करायला सुरुवात केली होती. जुन्या कर्मकांडाच्या त्या वर्तुळात ती ब्रह्मन्'ला गुंफून टाकते.

तू सांगितलेल्या श्लोकानंतरचा पुढचा श्लोक पहा,

तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ।

म्हणजे ब्रह्मन् हा नित्य यज्ञात प्रतिष्ठित आहे. 

अर्थात कर्मकांडाला आधी दुय्यम दर्जा दिलाय पण त्यातही नंतर ब्रह्मन् लाच स्थान दिलय. तू म्हणालास ना विरोध का नाही केला, त्या विरोधाचंच हे चिन्ह आहे. वैदिक कर्मकांड आणि उपनिषदांचा ब्रह्मन् यातली ही तडजोड आहे. 

चार्वाक: पण ही उत्क्रांती इतकी स्पष्ट आणि नीटनेटकी होती का?

वेदवती: नाही, नक्कीच नाही... हे असं सरळसोट कधीच नसतं. त्यात कितीतरी अडथळे आले, कितीतरी फाटे फुटले असतील. आपण ज्याबद्दल बोलतोय ना, तो एक ढोबळ ट्रेंड आहे. ही काही शिडी नाही की एका पायरीनंतर दुसरी येईल, किंवा हे एखादं गणिती समीकरणही नाही. स्वयंपाकाच्या रेसिपी सारखं नीटनेटकं हे नाही कारण हा हजारो वर्षांचा इतिहास आहे. वैज्ञानिक पुरव्यांवर उभा आहे तो. पण चढ-उतारांनी भरलेला आहे. तरीही जेव्हा आपण या संपूर्ण चित्राकडे थोडं लांबून पाहतो तेव्हा ते चढ उतार काहीसे कमी होतात. 

आणि मित्रांमध्ये गप्पा मारल्यासारखं आपण बोलतोय... तेव्हा थोडं सोप्पं करून सांगितलं तर त्याची मुभा तू मला देशीलच की? यालाच फ्रेंचमध्ये "लाँज्ये ड्युरे" म्हणतात, हजारो वर्ष अका छोटेखानी वृत्तांतात सांगणं म्हणजे लाँज्ये ड्युरे. गप्पांमध्ये ही अशी मोकळीक लागतेच, नाही का? जिथे आपण इतिहासाच्या त्या धूसर वाटांवरून चालताना आपल्याला जे दिसतंय, जे उमगतंय, त्याबद्दल मोकळेपणाने बोलू शकतो. हे ओघवतं बोलणं, हे विचारांचं फुलणं... यातच तर खरी मजा आहे, हो की नाही?

चार्वाक: हो वेदा. पण थांब. पुन्हा मूळ विषयाकडे वळूया. तू उपनिषदांची बाजू सांगितलीस. पण पूर्व मीमांसकांनी या उपनिषदांच्या विचाराला विरोध नाही का केला?

वेदवती: इथेच तर खरी गंमत आहे! त्यांनी विरोध केला खरा, पण तू समजतोस तसा तो समोरच्याला खोडून काढणारा विरोध नव्हता. त्यांनी काय केलं? तर समोरच्याला चक्क 'दुय्यम' ठरवून टाकलं. म्हणजे थेट अंगावर न जाता, त्यांनी त्याला आपल्याच चौकटीत एका खालच्या पायरीवर नेऊन बसवलं.

भारतात एखादी जुनी, प्रस्थापित परंपरा जेव्हा नव्या विचारांकडे बघते, तेव्हा ती काय म्हणते? "तुमची विषयाची समज बऱ्यापैकी आहे, ही पूर्णतः चुकलेली नाहीये. पण ती फक्त एक सुरुवात आहे, एक पायरी आहे. तिथून पुढे गेल्यावरच, तुम्ही माझ्या स्तरावर पोहोचू शकाल. उत्तरकालीन विद्वानांनी पुराणांच्या बाबतीत हेच केलं.

चार्वाक: पुराणांच्या बाबतीतही असंच घडलं?"

वेदवती: अगदी तसंच नाही पण काहिसं सारखंच. म्हणजे बघ, हा खेळ किती रंजक आहे. आदि शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य... यांसारख्या दिग्गजांच्या काळातही पुराणं अजून लिहिली जात होती. ते जेव्हा आपल्यासारखे जिवंत होते तेव्हा वेगवेगळ्या राजांच्या दरबारांत सूत आणि पौराणिक भाट होते जे पुराणं लिहीत होते. त्यांच्या गोष्टी रचत होते. हे आता लिहिलं जातंय हे सगळ्या विद्वानांना ठाऊक होतं. 

पुराणांना त्यांनी कधीच 'खोटं' ठरवलं नाही, किंवा ते वेदांच्या विरोधात आहेत असंही म्हटलं नाही. त्यांनी फक्त एक छोटीशी पण महत्त्वाची रेघ ओढली. त्यांनी सांगितलं, "ही फक्त 'स्मृती' —म्हणजे माणसाने लक्षात ठेवलेलं साहित्य. पण श्रुती अर्थात वेद हे त्याहूनही वरचे. कारण ते आधीच हातात ठेवलेले, आधीच ऐकलेले. ते जे कोणी लोहिले ते लोक हजारो वर्षांआधी प्रस्थान पावलेलेले. मग त्यांचं स्थान स्वाभाविकपणे वरचं. 

आणि पूर्व मीमांसाकांनी काय केलं?

त्यांच्या काळात उपनिषदं नुकतीच आकाराला येत होती आणि वेदांचं स्थान अगदी अढळ होतं. या मीमांसाकांनी उपनिषदांना 'दुय्यम' ठरवून टाकलं. त्यांच्या मते, उपनिषदं म्हणजे दुसरं काही नसून केवळ 'अर्थवाद' आहेत. 

अर्थवाद म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर 'स्तुती'. एखादा माणूस यज्ञ करायला कचरत असेल, तर त्याला प्रवृत्त करण्यासाठी केलेली ब्रह्मन् ची किंवा ऋताची ती केवळ गोड स्तुती आहे, असं त्यांनी जाहीर करून टाकलं. म्हणजे, मूळ गोष्ट काय? तर यज्ञ-विधी! आणि उपनिषदं? ती फक्त त्या विधीला रंजक बनवण्यासाठी केलेली जाहिरात! उपनिषदांनी सुद्धा तेच केलं. 

चार्वाक: काय? उपनिषदांनी सुद्धा तेच केलं?

वेदवती: हो. उपनिषदांच्या ऋषींसाठी 'कर्मकांड' किंवा अग्नीचे ते विधी हे केवळ बाह्य उपचार होते. त्यांच्या मते, हे विधी 'ज्ञान' किंवा 'ब्रह्मज्ञाना'पेक्षा दुय्यम होते. ही एक अतिशय प्रभावी आणि चतुर रणनीतीच म्हणता येईल.

बघ हा मंत्र इशा उपनिषदातला ९वा मंत्र आहे: 

अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते ।

जे अविद्येची उपासना करतात, ते घोर अंधारात प्रवेश करतात. 

उपनिषदाच्या या लेखकासाठी ही अविद्या म्हणजे काय तर ती कर्मकांड. 

यावर महामती शंकराचार्यसुद्धा हेच भाष्य लिहितात. ते लिहितात की ही अविद्या म्हणजे ज्या ज्ञानाचा विषय विविध देवता आहेत (देवताविषयं ज्ञानम्) आणि ज्याचा संबंध कर्मकांडाशी आहे (कर्म-सम्बन्धित्वेन उपन्यस्तम्), जे ब्रह्मन् विषयक परमज्ञान नाही (न परमात्मज्ञानम्), ज्या विद्येने देवलोकाची प्राप्ती होते (विद्यया देवलोकः). 

पुढे ते याच मंत्राच्या भाष्यात म्हणतात: 

तामविद्यामग्निहोत्रादि-लक्षणामेव केवलामुपासते तत्पराः सन्तोऽनुतिष्ठन्तीत्यभिप्रायः ।

काही लोक त्या अविद्येची उपासना करतात. ही कोणती अविद्या? तर ही अग्निहोत्र आदि क्रियाकर्म, कर्मकांड रूपातील अविद्या. हा अर्थ या मंत्रात अभिप्रेत आहे. हे त्यांचे मूळ उद्गार. 

लक्षात ठेव, ही देवाणघेवाण अतिशय रंजक आहे. इतिहासाच्या नजरेतून पाहिले तर हा रसाळ गप्पांचा फड आहे. यात कोणताही हिंसाचार नाही किंवा द्वेष नाही. यात एक प्रामाणिक पणा आहे आणि एक हेल्दी कॉम्पीटिशन आहे. एक निकोप आध्यात्मिक व्यवस्था टिकून राहण्यासाठी जे काही केरते, तेच हे आहे आणि हे कौतुकास्पद आहे. 

इतिहासाकारांना या गोष्टीचं मोठं नवल वाटतं. इतर धर्मांच्या तुलनेत हे खूपच वेगळं आहे; जिथे सर्रासपणे "तू पाखंडी आहेस, तू खोटा आहेस, तुझं म्हणणं बनावट आहे," असं म्हटलं जातं. पण इथे तसं नाही. हे त्याही पलीकडचं आहे. हे अत्यंत निकोप आहे—एखादा वादविवाद किंवा एखाद्या संवादासारखं.

आणि हे ज्यांनी लिहिलं, त्यांनी कधीही असं म्हटलं नाही की, "तुझं म्हणणं वेदबाह्य आहे." उपनिषदांचे लेखक आणि कर्मकांडाचे पालक हे बऱ्याचदा एकाच वातावरणात वावरले, एकाच राजदरबारात गेले आणि कदाचित एकमेकांशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर एखादं मिश्किल हासूही उमटलं असेलच. कदाचित ते एकमेकांचे कॅज्युअल मित्र असावेत किंवा किमान त्यांचे एकमेकांशी औपचारिक संबंध तरी असावेतच. आणि हे खरोखरच रंजक नाही का?

 सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपला इतिहास स्वीकारला पाहिजे. आपण उपनिषदांच्या घरात राहत असू, किंवा वेदांच्या, पुराणांच्या वा गीतेच्या; पण त्या घराच्या कुठल्यातरी कोपऱ्यात अशी एक जागा असायला हवी, जिथे आपण त्यांच्या वैज्ञानिक इतिहासाची माहिती जी इतिहासकार सुसंमतीने स्वीकारतात ती जतन करून ठेवू शकू.

चार्वाक: ठीक आहे, आता पुरे झालं. माझी आई माझी वाट पाहत असेल. संध्याकाळ होत आली आहे. आपण उद्या भेटूया हो, वेदवती.

चार्वाक म्हणाला. तो काही पावले पुढे गेला आणि पुन्हा मागे वळला.

"आता जास्त वेळ अशी उलटी टांगून राहू नकोस, नाहीतर सरळ डोक्यावरच पडशील."

आणि असं म्हणत तो जंगलात अदृश्य झाला.

-

हा पहिल्या भागाचा शेवट आहे. 

हा संवाद मी खूप एंजॉय केला लिहिताना. याला वाचकांचा कसा प्रतिसाद मिळेल, हे मला माहीत नाही. एक वाचक म्हणून तुम्हाला यातला कोणताही भाग आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त वाटत असेल, तर कृपया मला सांगा, मी त्यात नक्की बदल करेन. मी ही मालिका पुढे सुरू ठेवावी का, याबद्दलही तुमचे मत सांगा, कारण सध्या मला याच्या प्रतिसादाबद्दल फारसा आत्मविश्वास वाटत नाहीये.

-

© २०२६ गजगामिनी 

सर्व हक्क सुरक्षित.

प्रताधिकार (Copyright): सर्व हक्क सुरक्षित. या पुस्तकातील कोणत्याही भागाचे प्रकाशकाच्या लेखी परवानगीशिवाय पुनरुत्पादन करणे, किंवा तो कोणत्याही स्वरूपात, डिजिटल किंवा प्रिंट, पुनर्प्रकाशित करणे हा कायद्याने गुन्हा असून तसे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.