हॉस्टेलची पांढऱ्या साडीची बाई आणि प्लँचेट भाग -२
शनिवारी रात्री परेशला ती बाई दिसली होती आणि त्या रात्री कोणाचे दारही वाजले नव्हते आणि कोणाच्या दारालाही कडी नव्हती लागली बाहेरून. कशाचीच कशाला लिंक लागत नव्हती. रविवारी रात्री आम्ही पाचही जण पुन्हा आमच्याच खोलीत झोपलो. सोमवार पासून पुन्हा तेच सत्र सुरू झाले. रात्री कोणीतरी दार वाजवायचे पण उघडल्यावर बाहेर कोणी नाही. रात्र झाली की सगळ्यांचे धाबे दणाणले म्हणून समजायचे. सिक्युरिटी काकांना सांगून झाले पण त्यांनी हसण्यावारी नेले. दोन रात्र त्यांनी पहारा दिला पण कोण कडी वाजवते ते कळलेच नाही त्यांना. कडी मात्र वाजत होती. तिसऱ्या रात्री ते काही पहारा द्यायला नाही आले आणि त्याच रात्री नेमकी दुसऱ्या मजल्यावरच्या दारांना बाहेरून कड्या लागल्या होत्या.
सगळ्यात जास्त तर आमची टरकत होती कारण संडास बाथरूम आमच्या खोलीच्या बाजूला होते आणि तिथेच ती खिडकी होती जिथे ती बाई बसली होती. रात्री झोपायच्या वेळेला किंवा अपरात्री कोणाला सू बी झाली तर आम्ही पाचही जण एकत्र जायचो आणि यायचो एवढी आमची टरकली होती.
आज शनिवार होता आणि परेशला ती पांढऱ्या साडीतली बाई दिसून आली होती. शनिवारी रात्री आम्ही लवकर जेऊन झोपून टाकायचा विचार केला होता. त्या रात्री दहा वाजताच आम्ही झोपून गेलो. झोप तर काय येत नव्हती. मध्यरात्र उलटून गेली तरी आम्ही जागेच होतो. आणि.....
अचानक दीड वाजता भयंकर किंकाळी ऐकू आली.
"भ.... भ... भूत......"
आम्ही धाडकन सगळे उठलो. आवाज ओळखीचा वाटला.
मी : "गणेशचा आवाज आहे हा."
नितीन (माझा रूममेट) : "गप रे, भूत कोणाचा सुद्धा आवाज काढू शकते."
"अरे हो रे."
महेंद्र (माझा दुसरा रूममेट) : "निघाला होता मोठा दार उघडायला."
माझे मन तयार होईना. काय करू उघडू काय असा विचार करत असताना परत गणेशचा आवाज आला, "सुयश, वाचव रे. ती बघ कशी दात विचकवत उठाबशा काढतेय. दार उघड रे" तो रडत होता मोठ्याने.
मी सरळ उठलो आणि बाकीचे नको नको करत असताना मी दरवाजा उघडला. पाहतो तर गणेश दारातच पडला होता आणि डोळे फाडून त्या खिडकीकडे पाहत होता. मी आजुबाजूला न बघता त्याला धरून आत ओढला आणि अचानक लाईट गेली. लाईट गेल्यावर आम्ही पाच जण आणि गणेश सगळ्यांची पाचावर धारण बसली. आम्ही सगळे बोंबटू लागलो. तो आवाज ऐकून सिक्युरिटी काकांनी शिट्या वाजवून इतर सिक्युरिटी लोकांना सावध केले. २ सिक्युरिटी धावत आमच्या हॉस्टेलकडे आले आणि एक सिक्युरिटी जनरेटर सुरू करायला धावला. आमचे बोंबटने सुरूच होते. हॉस्टेलचे कुलूप उघडून ते तडक वर आले. अंधारातून आमच्यावर बॅटरीचा उजेड आल्यावर आमची अजून फाटली. आम्ही अजून ओरडू लागलो.
"गप बसा रे."
सिक्युरिटी काकांचा आवाज होता तो. आमच्या जीवात जीव आला आणि जनरेटर सुरू झाल्याने लाईट सुद्धा आली. गणेश अजून बोंबलतच होता. काकांनी त्याला २ ठेवून दिल्यावर तो गप्प झाला. त्याचीही तीच स्टोरी परेशने सांगितली तशी आणि त्यात कहर म्हणजे गणेशने चड्डीतच काम उरकले होते घाबरून. स्टोरी ऐकल्यावर काका तिकडे बघायला गेले तर कोणीच नव्हते. आता मॅटर मोठा होत होता पण नाव खराब होऊ नये म्हणून त्यांनी गेल्या २ आठवड्यांचा कानोसा घेतला. म्हाळाचा महिना सुरू झाल्यावर रात्रीचे दार वाजणे आणि आपोआप कड्या लागणे हे प्रकार सुरू झाले होते. त्यातल्या त्यात बाई दिसणे हा प्रकार शनिवारी रात्रीच होत होता.
नितीन : "सुयश, आपण याचा छडा लावुया ."
मी : "तो कसा लावणार?"
"आपण पुढच्या शनिवारी दार उघडू ठेवून बसूया."
"दार उघडे कशाला, बाहेर व्हरांड्यात बसूया ना." मी नाराजीच्या सुरात बोललो.
"आईशप्पथ काय आयडिया दिले, ठरलं तर मग आपण पुढच्या शनिवारी आपल्या दारात व्हरांड्यात पत्ते खेळायचे."
महेंद्र बोलला, "मी काय येत नसतो, तुम्हाला बसायचे तर बसा पण मी दार लाऊन झोपणार."
"फट्टू" सगळे हसले. ३४ मध्ये राहणारे दोघे किरण, निलेश आणि मी, नितीन आम्ही चौघांनी येत्या शनिवारी बाहेर बसून छडा लावायचा ठरलं. आतून माझी जाम फाटली होती पण तोंडावर दाखवता येत नव्हते.
सोमवार ते शुक्रवार दार बाहेरून वाजले आणि आमच्याही दाराची बाहेरून कडी लागली होती पण आम्ही जास्त डोक्याला ताप करून नाही घेतला. शनिवार उजाडला, कॉलेज संपले आणि आम्ही रात्रीची तयारी सुरू केली. रोज रात्री १२ वाजता सिक्युरिटी काका एक फेरी मारायचे आणि निघून जायचे. ते गेल्यावर व्हरांड्यात बसायचे आमचे ठरले. आम्ही तयारी सुरू केली. तसेही महेंद्र येणार नाही बोलला म्हणून आम्हाला बाहेरच बसावे लागणार होते. सिक्युरिटी काका राऊंड मारून गेले आणि आम्ही बाहेर व्हरांड्यात चटई टाकली.
"महेंद्र, दार आम्ही बाहेरून लाऊन घेतो रे. तू आतून कडी नको लाऊ नाहीतर बाहेर आमचे मुडदे भेटतील." किरण बोलला.
"एवढी @ड फाटते तरी बाहेर बसायचे आहे तुम्हाला." महेंद्र बोलला.
"तू झोप रे @वड्या, फट्टू."
आम्ही चौघे बाहेर आलो. चटई वर बसलो आणि समोरासमोर भिंतीला टेकून बसलो. एका बाजूला मधोमध एका जाडजूड पुस्तकावर हनुमानाची मूर्ती ठेवली. त्यावर फुल ठेवली आणि उदबत्त्या लावल्या, एक दिवा तेलाने फुल भरलेला लावला. आजुबाजूला नजर टाकत आम्ही पत्ते खेळत होतो. हळूहळू आम्ही पत्ते खेळण्यात इतके गुंग झालो की २ वाजले तरी आम्हाला कळले नाही. माझ्या समोर नितीन बसला होता. २ वाजता आम्ही चौघे मिळून सू ला जाऊन आलो. भिती बऱ्यापैकी चेपली होती त्यामुळे तिथेच चौघे आडवे झालो. व्हरांड्यातल्या लाईट सुरू होत्या आणि बाहेर धोधो पाऊस पडत होता. वातावरण एकदम थंड होते त्यामुळे आम्ही ब्लँकेट घेऊन पहुडलो होतो आणि अचानक.......
अचानक लाईट गेली. त्यावेळी मोबाईल नावाचा प्रकार फक्त श्रीमंत लोकांकडे होता त्यामुळे फाटायची वेळ आली. हनुमानसमोर लावलेला दिवा फडफड करता होता कारण बाहेर जोरदार पाऊस सुरू होता आणि सोसाट्याच्या वाराही होता. खरेतर त्या दिव्याभोवती तो वाऱ्याने विझू नये म्हणून फायबरचे गोलाकार असे झाकण होते पण तरीही ते फडफडत होता. काहीतरी विचित्र नक्की घडत होते. पाऊस तुफानी आडवा तिडवा पडत होता त्यामुळे खिडकीच्या जवळची जमीन भिजली होती आणि पाणी साचले होते. आता फक्त फडफड करणारा दिवा होता आणि आम्ही चौघे. अचानक बाहेर वाहणारा वारा एकदम बंद झाला. फक्त जोरदार पावसाचा आवाज.
मी : "वारा कसा बंद झाला अचानक?"
किरण : "काय माहिती!"
नितीन : "पाऊस सुद्धा थांबला."
खरेच पाऊस थांबला आणि कुत्री मोठ्यामोठ्याने रडू लागली. आता आमची रडायची पाळी होती.
किरण : "ते बघ, मघाशी तिथली खिडकी जवळची लादी भिजली होती ना? आता सुकले."
मी : "पण या अंधारात फक्त फडफडणाऱ्या दिव्याच्या उजेडात...."
नितीन :"दिवा फडफडतोय बिना वाऱ्याचा."
मी : "आपल्याला एवढे क्लिअर कसे दिसत आहे पण?"
निलेश :"जय हनुमान ज्ञान गुन सागर, जय कपीस तिहुं लोक उजागर, राम दूत अतुलित बल धामा,
अंजनि पुत्र पवनसुत नामा..."
मी : "तुला काय झाले आता?"
निलेश डोळ्यानेच खुणवत होता खिडकीकडे "महाबीर बिक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन बरन बिराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा."
आधी काहीच समजले नाही पण नीलेश खुणावत असताना त्याला थरथर भरलं होत. आम्ही तिघांनी खिडकीकडे बघायला सुरुवात केली आणि दिवा एकदम स्थिर झाला. फडफड एकदम बंद. कुत्री जोरजोरात रडायला लागली. वारा आणि पाऊस बंदच झाला होता. खडकी खालची लादी पूर्ण सुकली होती आणि एवढ्या अंधारात आमच्या उलट्या बाजूला दिवा असूनही ती सुकलेली लादी आम्हाला स्पष्ट दिसत होती. हळूहळू नजर खिडकीत गेली तर.....
तर ती खिडकीत बसली होती, पांढरी साडी घालून. विस्कटलेले केस आणि डोळ्यात पांढरा भागच नाही. पूर्ण डोळे काळे. वेडसर माणसे हसतात तशी ती दात विचकावून हसत होती. आमच्या चौघांची बोबडी वळली. निलेशची हनुमान चालिसा बंद झाली. आता ती बाई उठाबशा काढायला लागली. मी हळूच निलेशला बोललो, "हनुमान चालीसा बोल." पण नीलेश काय बोलतच नव्हता.
मी : "निल्या चालीसा बोल. ती बघ हसतेय. निल्या चालीसा बोल." इतक्यात माझ्या अंगावर पाणी पडले आणि नीलेशचा आवाज ऐकू आला.
"अरे ऊठ @@च्या, @वड्या स्वप्नात पण भूत दिसायला लागली तुला."
"म्हणजे?" मी डोळे चोळत बोललो.
"डाराडूर झोपला होतास इथे व्हरांड्यात @वड्या."
सगळे हसायला लागले. च्यामारी स्वप्न होते ते. मलापण हसायला आले आणि अचानक लाईट गेली. पाऊस पण एकदम थांबला आणि वारे वहायचे बंद झाले. मला स्वप्न आठवले, मी पटकन बोललो, "आत जाऊया नाहीतर ती येईल."
किरण : "कोण येईल."
"ती बाई येईल."
"गप रे, कोणी नाय येत."
"बघ २ पण वाजलेत."
"अरे हो रे, फक्त माझ्या हातात घड्याळ आहे मग याला कसे कळले २ वाजले ते?" निलेश आश्चर्याने बोलला.
"थुक्का लावला असेल त्याने." किरण बोलला.
"नाही रे. आता बघ दिवा फडफड करेल." मी बोललो.
"ए बाहेर ये स्वप्नातून"
"हवा नसताना आणि कव्हर असूनही दिवा फडफडू लागेल बघच " मी म्हणालो.
"ह्याच्या डोक्यात घाल रे काहीतरी, स्वतः घाबरल आहे आणि......"
त्याचे वाक्य पूर्ण होते ना होते तोच दिवा फडफड करायला लागला.
"आता कुत्री रडायला लागतील." मी बोललो आणि कुत्री रडायला लागली.
"योगायोग आहे रे." निलेश बोलला.
"नाही. आता दिवा फडफड व्हायचा बंद होईल आणि अंधार असूनही खिडकीजवळ आपल्याला सगळ स्पष्ट दिसेल."
"खयाली पुलाव."
"ठीक आहे, मी चाललो आत. नंतर दिसेल ती तुम्हाला इथे बसलेली खिडकीत, पांढरी साडी, विस्कटलेले केस आणि काळेभोर डोळे. मग बसा बोंबलत." असे बोलून मी दार उघडायला गेलो तर फट्टू महेंद्रने आतून कडी लावली होती.
"काय झाले? जातोय ना आत."
"आतून कडी आहे."
तिघे हसायला लागले आणि अचानक दिवा फडफड करायचा थांबला. मी जिथे उभा होतो त्याच्या मागचे सगळ अगदी स्पष्ट दिसायला लागले. आमची पाचावर धारण बसली. एकतर आमची खोली ३३ आतून बंद आणि ३४ आम्ही बाहेरून लॉक केलेली पण चावी नव्हती. मी ब्लँकेटच्या आतमध्ये घुसून मुरगुटून बसलो. तिघे हसत होते मला बघून पण नंतर त्यांना खिडकीत हालचाल जाणवली तसे ते ब्लँकेटमध्ये घुसले. तिघेही गारठून गेलो होतो आणि निलेशने आता खरोखर हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली.
आम्हाला खिडकीच्या बाजूने कोणीतरी खिडकी हलवत असल्याचा आवाज येत होता आणि कुत्र्यांनी तर रडून रडून गोंधळ घातला होता. ब्लँकेट मधून बाहेर बघायची कोणाची हिंमत होत नव्हती. हनुमान चालीसा म्हणून पूर्ण झाली पण खिडकीतला आवाज काही कमी होत नव्हता. आता तर स्पष्ट पण दबक्या स्वरात बाईचा आवाज आला, "माझं बाळ कुठेय ओ? माझं बाळ कोणी बघितलं काय? इथेच अंगणात खेळत होते ओ. कुठेच दिसत नाहीये. मांत्रिकाने नेले नाही ना? नरबळी तर नाही ना दिला माझ्या बाळाचा?"
हे सगळ ऐकून डोक्यात विचारांचे काहूर माजले आणि पुन्हा तिचा आवाज आला पण यावेळी रागाने मोठ्याने, "हरामखोर, माझं बाळ कुठेय? कुठेय माझे बाळ." आणि अचानक आवाज थांबला, कुत्री रडायची बंद झाली. सोसाट्याच्या वाराही सुरू झाला आणि पाऊसही मुसळधार. जणू काही मध्ये जे घडले ते स्वप्न असावे पण आम्हाला ब्लँकेट मधून बाहेर यायचे धाडस काही होईना. आम्ही चौघे तसेच आतमध्ये थरथरत होतो.
(क्रमशः)