TypeTypeकोकणचे अंतरंग (२७/०५/२०२६ बुधवार)भाग एक
जर तुम्ही......दोन दिवसाच्या प्रवासात आध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक,पुरातत्त्व साईटस,भौगोलिक स्थळे,निसर्गदृश्ये,साहित्यिकांचीस्मारके आणि कोकणी खाद्यसंस्कृतीची विविधताकाया ...वाचा...मने अनुभवत असाल तर तुमच्या एवढा भाग्यवान दुसरा कोणी नाही हे नक्की!हो. मी हे भाग्य अनुभवलय. २७ व २८ हे रोजी आम्ही १९८२ विज्ञान शाखेतील सावंतवाडी एस.पी.के. चे विद्यार्थी रत्नागिरीच्या सहलीला बाहेर पडलो.सावंतवाडीतून ७.४५ आम्ही प्रवास सुरू केला.वाटेत ओरसला नाष्टा (पालव) केला.राजापूरच्या अलीकडे ५ की. मी . वर उजव्या बाजूला वळल्यावर पांगरे गावं लागत. राजापूर रेल्वे स्टेशन रस्त्यावर हे गाव आहे. इथे शिवानंद टेंब्ये स्वामींचा आश्रम आहे.तर त्याला लागून हरी हरेश्वर मंदिर आहे.उजव्या बाजूला गर्द वनराईने नटलेला डोंगर तर डाव्या बाजूला असलेली टेकडीया दोघांमध्ये हे नितांत रमणीय ठिकाण आहे. इथे आध्यात्मिक शांतीचा अनुभव येतो.शिवानंद स्वामींचे काळ्या दगडातील मंदिर आहे. त्यात स्वामींची तेजस्वी मूर्ती आपल्याला दिसते....त्यांची नजर तुम्हाला खिळवून ठेवते.सौम्य पिवळ्या रंगाचे पितांबर..वर फिकट मोतीया रंगाचा सदरा... डोक्यावर पगडीगळ्यात रूद्राक्ष माळा असा पेहराव. समोर फुलांची मोहक आरास केली होती.इथ एक हवी हवीशी वाटणारी शांतता होती.उजव्या बाजूला स्वामीच्या वापरातली खोली आहे.तिथे स्वामी वापरत त्या वस्तू ठेवल्या आहेत.पाठीमागच्या भिंतीवर एक वाघाचे कातडे आहे.या ठिकाणी पुरोहित नामजप करत होते.मंदिराच्या समोर मंडपाला लागून एक शेणाने सारवलेलीजमीन दिसत होती. मंदिराच्या डावीकडून थंडगार पाण्याचा पाट वाहत होता.त्यात इवले मासे उलट सुलट पळताना दिसत होते.खालच्या बाजूला हरी हरेश्र्वर मंदिर आहे.तिथे दोन शिवलिंगे असून त्यावर नाग फणांची छाया आहे.मंदिर मोकळं ...खेळती हवा असलेले आहे.तुळस बनवताना एकाउभ्या चि-यावर...एक आडवा चिरा ठेवून त्यावर माती थापून तुळस लावली आहे. प्रवेशद्वारावर सातशे वर्षांपूर्वीचा पिंपळ वृक्ष अखंड सावली धरून आहे. इथून आम्ही राजापूर जवळच गरम पाण्याच्या झ-यासाठी प्रसिद्ध असलेलं उन्हाळे गाठलं.ग्रामपंचायती समोरच महालक्ष्मी मंदिर परिसरात हे गरम पाण्याचे झरेआहेत.मंदिर बंद असल्याने बाहेरून नमस्कार केला.उत्सुकता होती सल्फरयुक्त गरम पाण्याच्या झ-याची. तिथलं पाणी उकळल्या सारखं गरम व जोरदार प्रवाहाच होत.पण काहीजण तिथे आंघोळ करत होते.कुणी कपडे धुत होत.साबणाच पाणी चौफेर पसरलं होतं.थोड वाईट वाटल.या स्थानच महत्व स्थानिकांना कळलंच नव्हतं.मला शाळेत शिकलेला संस्कृत श्लोक आठवला.मलय पर्वतावर चंदनाची झाडे अधिक तिथल्या भिल्लमहिलांना चंदनाच्या सुंगधाशी देणंघेणं नसते त्या चंदनाची लाकडे स्वयंपाक शिजवण्यासाठी वापरतात...असो! पुढे राजापूर गाठलं.डावीकडे वळलो.जीवघेणे चढ उतारकाढत अरूंद रस्त्याने आम्ही घूतपापेश्वर मंदिर गाठलं.गाड्या पार्क करून आम्ही प्रवेशद्वार ओलांडल.चि-यांचा रस्ता...दुतर्फा कोकणी पदार्थ विकण्यासाठी असलेली दुकाने...एक छोटेखानी पण रंगीत बोलक्या भिंती असलेली प्राथमिक शाळा...या रस्त्यावर चार - पाच मिनिटे चालल्यावर मुख्य मंदिराच प्रवेशद्वार दिसले.समोर जे दिसले त्याने डोळे निवले.भर उन्हात प्रवास केल्याचे सार्थक झाले.एक सुंदर देवालय दिसलं.एका रांगेत बारा दणकट लाकडीखांब अश्या चार रांगामिळून मंडप बनला होता . प्रत्येक खांबावर व मंडपात छानदार नक्षी कोरलेली होती.मंडपावर माडी होती.देखणा गाभारा ...लक्ष वेधून घेणारी स्वयंभू शिवपिंडी. मंदिराच्या डाव्या बाजूला कातळातून वाहणारी नदीदिसते.खाली विस्तारलेले कुंड आहे.इथे पावसाळ्यात झेपावणारे धबधबे दिसत असणार.माझ लक्ष वेधून घेतले ते पलिकडे काठावर असलेल्या पिंपळाच्या झाडानेत्याची लालसर कोवळी पाने हलक्या वा-यावर सतत लवलवकरत होती. धुतपापेश्वर मंदिराच्या पाठीमागे नदीवर एक देखाणा पुल आहे.तिथे श्री दत्तगुरूंच मंदिर आहे.त्या मंदिरात वर श्री यंत्राची मोठी प्रतिकृती तयार केलेली आहे. इथे ऑगस्ट ते डिसेंबर पर्यंत येणे चांगले.बाहेर येत आम्ही प्रवेशद्वारावर दुतर्फा असलेल्या देवड्यांवर आम्ही बसलो.विनय सौदागर ने शिवानंद ट्येंबे स्वामींशी निगडित एका एस.टी. अधिकार्याचा अनुभव सांगितला.तो अधिकारी एका अपघाताचा पंचनामा करण्यासाठी १९८० च्या आसपास पांगरे परिसरात ड्रायव्हर सहित गेला होता.येताना ते आश्रमात गेले पण तिनं वेळा वाट चुकले पण प्रत्येक वेळी एक वृध्द इसम कंदील घेऊन वाट दाखवायला आला होता.या अधिका-याने अनुभूती म्हणजे ' नेमकं काय 'असे स्वामींना विचारले.तेव्हा तिथे असलेल्या ग्रंथांपैकी कुठच्याही ग्रंथाचा एक अध्याय वाच असं स्वामी म्हणाले.ग्रंथाच पान उघडताच एक अनामिक गंध त्यांनां जाणवू लागला संपूर्ण अध्याय संपेपर्यंत तो गंध जाणवत होता.पण ग्रंथ बंद केल्यावर गंध येणे बंद झाले.या अनुभूतीने त्यांचे समाधान झाले.या गोष्टींचे सगळे उत्साहीत झालो. तिथून पुन्हा थोडं मागं येत आम्ही डावीकडे वळलो' देवाचे गोठण ' इथल्या कातळशिल्पाबध्दल आम्ही ऐकलं होतं त्यामुळे उत्सुकताही होती. प्रदीप पेडणेकरने जी.पी.एस.लावला होता तरीही कार खुपचं पुढे गेली.एका आशाताईंना विचारून मागे फिरलो.वाटेत एक दवाखाना दिसला.डॉक्टर बाहेर उभा होता.खुर्चीवर एक वृध्द बाई बसली होती.आम्ही डॉक्टरकडे चौकशी केली तो म्हणाला ' देऊळ वाडीत ' जावं लागेल. ह्या आजींना वाटेत सोडा बराच वेळ रिक्षा बघतेय.आम्ही तिला गाडीत घेतलं.तिचे उजवे पाऊल सुजून लाल झाले होते.आम्ही तिला गावात सोडलं.कदाचित तिच्यासाठीच आम्ही वाट चुकलो होतो.देवाचे गोठण येथे परशुराम मंदिर आहे. ओवाळच एक झाडमंदिराच्या उजव्या कोप-यात पण बाहेरच्या बाजूला आहे. आवारात मुलं अंडरआर्म क्रिकेट खेळत होते.दर्शन घेतल्यावर आम्ही चौकशी केली.ते म्हणाले बाजूच्या चिरेबंदी रस्त्याने पंधरा मिनिटे चालल्यावर कातळ शिल्पाचे ठिकाण आहे.दुपारचे बारा वाजले होते सुर्य अक्षरशः ललकारी देत होता.घामाघूम होत आम्ही आठजण चालत होतो.वाटेत हुप्प्या माकडांच एक टोळकं भेटलं. पुढे एक बांधलेला पार दिसला.तिथे बसून थोडी विश्रांती घेतली.अखेर बारा मिनिटांनी आम्ही एका विस्तीर्ण कातळ जमीनीवर पोहचलो.बराच वेळ शोधूनही शिल्प असलेली जागा दिसेना. अंगागांतून घाम निथळत होता.सुदैवाने आकाशात कुठूनशेढग आले.पाण्याचा एक सुखद शिडकावा आमच्यावरहोवू लागला.थोडा गारवा निर्माण झाला.काय करावे ते कळेना इथवर येवूनही जर शिल्प न बघता गेलो असतो तर हुरहूर लागली असती.तेवड्यात दूरवरून एक माणूस येताना दिसला.देवदूता सारखा तो आमच्याजवळ आला.त्याने हाताने निर्देश करत नेमकी जागा दाखवली. लक्षात येण्यासाठी शिल्पा भोवती दगड लावले आहेत.जे पाहिले आणि अनुभवले त्याने आम्ही आवक् झालो.पूर्ण उंचीचा एक मानव तिथे कोरलेला आहे.पाया पासून मानेपर्यंत ते शिल्प स्पष्ट दिसते.पण वर डोकं दिसत नाही.पण डोक्याची आऊटलाईन दिसते व तिथे ॲन्टेना सारखा भाग असल्याचा भास होतो..कदाचित त्याच तोंड डावीकडे वळलेली असावं...तसंच डाव्या हातात एखादी गोलाकार वस्तू असावी पण ते स्पष्ट असं कळतं नाही.(अंगावर पूर्ण पोशाख असावा व पायवरही आवरण असावंअसं मला वाटलं कारण बोटं कोरलेली दिसत नव्हती.)दोन पायांच्या मध्ये योग्य अंतर आहे.उजव पाऊल डाव्या पावला पेक्षा जाड आहे.पायांची लांबी ही सर्वसाधारण माणसांपेक्षा जास्त वाटते. या शिल्पाच्या कमरेपासून छातीपर्यंत चुंबकसूची नेल्यास चक्क नव्वद अंशातूनदिशा बदलतात. जिथे पूर्व दिशेची जागी चक्क उत्तर दिशा घेते.हे अतर्क्य आहे.कोणी बनवले हे शिल्प? आदिमानव..!की प्रगत मानवाने...की परग्रहवासीयांनी ?काहीच सांगता येत नाही.जो कोणी असेल त्याला सलाम करत आम्ही मागे फिरलो. देवाचे गोठण वरून आम्ही मागे फिरलो.पुलावरूनउजवीकडे वळत राजापूर तालुक्यातील कशेळी गावाकडे कनाकादित्य मंदिराकडे जाण्यासाठी वळलो.वाटेत सोलगांवयेथे डावीकडे हॉटेल प्रयाग दिसलं.तिथे जेवण घेतले.पुन्हा प्रवास सुरु केला.दुपार टळून गेल्यावर आम्ही कशेळी येथे पोहचलो. आदित्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार २०१८ मध्ये करण्यात आला आहे .संपूर्ण मंदिर हे सागाच्या लाकडापासून बनवलेले आहे.सुंदर नक्षीकाम इथे दिसते.आजबाजूला असलेली मंदिरे ही लाकडीच आहे.वर लाकडी माळी आहे.सूर्यनारायणाची पूर्णाकृती काळी मूर्ती दिसते.हि मूर्ती सहाशे वर्षांपूर्वी गुजरात प्रभास पट्टणम इथून(द्वारकेजवळ)जलमार्गाने जहाजावरुन नेली जात होती.पण जहाज कशेळी इथे आल्यावर हलेना. जहाजावरील कप्तानाला वाटलं की मूर्ती इथेच राहायचं म्हणते त्यांनी मूर्ती अरूंद अश्या किनार्यावर असलेल्या एका गुहेत ठेवली.( याला देवघळ म्हणतात) त्यानंतर जहाज आपोआप मार्गस्थ झाले. कालांतराने सूर्योपासना करणा-या देवदासीला दृष्टांत झाला,की किनार्यावरच्या गुहेत एक सूर्य मूर्ती आहे.तिने गावकर्यांना यांची कल्पना दिली.अखेर संपूर्ण गावाने ते ठिकाण शोधून मूर्ती गावात आणली व विधिवत स्थापना केली. मंदिराकडून अपं देवघळ तीन किलोमीटर वर आहे.रस्ता अरूंद...काही ठिकाणी खडीचा आहे.देवघळ हे किनार्यावरच उंच ठिकाण आहे.समुद्र एका अरुंद ठिकाणी आत घुसलेल्या आहे.उंच दगडी कडे....थोडी वाळू...मध्ये पंधरा एक फूट रुंद सपाट कातळ समुद्रात घुसलेला आहे.ती नैसर्गिक जेटी वाटते सध्या त्यावर कॉंक्रिट घातलेलं असून रेलिंग आहे.डाव्या कोप-यात एक मोठी गुहा (घळ) दिसते.या घळीतच सूर्यनारायणाची मूर्ती खलाशांनी ठेवली होती.हे एक सुंदर भौगोलिक ठिकाण आहे. खाली किनार्यावर जाण्यासाठी चि-्याच्या लयदार पाय-या केलेल्या आहेत. इथून पुढे पावसच्या दिशेने प्रवास सुरु झाला.स्वरुपानंदांचेदर्शन घेऊन आम्ही सायंकाळी रत्नागिरी येथील 'सी फॅन'या लॉजवर पोहचलो. समोर अथांग समुद्र... किनार्याकडे धाव घेणाऱ्या लाटा... सळसळता वारा... किनार्यावरील गर्दी हे दृश्य मनाला व शरीराला सुखद गारवा देऊन गेले. रात्री साडेआठ वाजे पर्यंत आम्ही किनार्यावर फेरफटका मारला.आमच्या बरोबर आलेल्या आमच्या सौभाग्यवतींनीसजवलेल्या टांग्यातून किना-्यावर फेरफटका मारला.'बालपणीचा काळ सुखाचा ' याची त्यांनी अनुभूती घेतली.तो अल्लडपणा...अवखळपणा ...आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसत होता.
भाग एक समाप्त
बाळकृष्ण सखाराम राणे
8605678026