प्रेमाक्षर - भाग 2 Shivraj Bhokare द्वारा कविता मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमाक्षर - भाग 2

तुझ्यासाठी लिहिलेली कविता

डायरीच्या एका कोपऱ्यात शांत,
फक्त तुझ्यासाठी एक कविता निजलीये.
तुझ्या एका संवादाच्या प्रतीक्षेत,
ती शब्दाशब्दाने आतून भिजलीये.

तिला नाही आवडत गर्दी जगाची,
ती फक्त तुझाच एकांत मागते.
तू वाचशील जेव्हा तिला हळूच,
तेव्हा ती तुझ्याच सुरात जागी होते.

त्यात संवादाचे काही मोकळे क्षण आहेत,
आणि पुन्हा जुळलेल्या नात्याची ओढ आहे.
तू दिलेल्या प्रत्येक सुुख-दुःखाची,
त्या पानांवर लागलेली गोड चव आहे.

ती कविता म्हणजेच माझे मन आहे,
जे तुझ्याशिवाय कुठेच रमत नाही.
तू वाचून घ्यावेस तिला एकदा,
कारण तुझ्याविना मलाही जमत नाही.
------------------------------

रुसवा तुझा गोजिरवा

लाजणे तर तिचे रोजचेच आहे,
पण तिचे रागावणे काही और असते.
गोड हसण्यापेक्षाही जास्त ती,
रागवून तोंड फुगवताना सुंदर दिसते.

नजर जेव्हा ती तिरकी करते,
आणि कपाळावर आठ्यांची रेघ उमटते.
तेव्हा शांत चाललेली माझी दुनिया,
एका क्षणात गरगर फिरू लागते.

ती चिडून जेव्हा पाय आपटते,
आणि ओठ थोडे दावून धरते.
माझ्या काळजाची धडधड तेव्हा,
तिच्या त्या तालावर नाचू लागते.

हा तिचा नखरा, हा तिचा तोरा,
मला प्रत्येक वेळी नव्याने जिंकतो.
तिच्या या सुंदर रागापुढे मग,
मी माझा सगळा शहाणपणा विसरतो.
------------------------------

अप्सरेचा तोरा

इंद्रसभेची अप्सराही फिकी पडेल,
असा तिचा जमिनीवरचा तोरा आहे.
तिच्या रूपामधल्या नखऱ्याला बघून,
स्वर्गाचाही शहाणपणा थोडा कोलमडला आहे.

तिचे चालणे जणू संथ नदीची लय,
आणि नजर जणू धारदार कट्यार.
तिच्या सौंदर्याची तारीफ करायला,
शब्दांचेही पडतात ग सखे हत्यार.

तिला आरशाची मुळीच गरज नाही,
ती उभी राहते तिथेच चांदणे पडते.
तिच्या नुसत्या असण्याने या विश्वात,
एक नवी सुगंधी जादू घडते.

निसर्गानेही तिला घडवताना नक्कीच,
सगळा निवांत वेळ दिला असणार.
म्हणूनच तिच्या या देखण्या रूपापुढे,
देवाचाही हात जरा थबकला असणार.
------------------------------

माझं हसू

जगाच्या बाजारात प्रत्येक जण,
काही ना काही मागून जातो.
पण तिचा हा एकच हट्ट मला,
हृदयापासून श्रीमंत करून जातो.

तिला नकोत हिरे, नकोत मोती,
ना सोन्याचा कोणताही दागिना.
फक्त माझ्या ओठांवरचं हसू,
हाच तिचा सर्वात मोठा खजिना.

मी जरा जरी खिन्न झालो ना,
तर तिचंही आभाळ भरून येतं.
माझ्या एका छोट्याशा हसण्यासाठी,
ती स्वतःचं सगळं दुःख विसरून जातं.

किती साधी, किती भोळी तिची ही इच्छा,
जी माझ्या जगण्याला नवा अर्थ देते.
काहीही न मागता ती प्रत्येक वेळी,
मला सर्वस्व देऊन जाते.
------------------------------

आहे तशी आवडते

तिला नीटनेटके जगणे कधी जमलेच नाही,
तिचा सगळा कारभार नेहमी विस्कटलेला.
पण मला मात्र तिचा तोच वेडेपणा आवडतो,
जो फक्त माझ्याच अवतीभवती रेंगाळलेला.

कधी उगाचच हसेल, कधी अचानक रडेल,
तिच्या मूडचा अचूक अंदाज कोणालाच नाही.
पण तिच्या याच अवखळ, अनपेक्षित वागण्यात,
माझ्या जगण्याचा सगळा सुगंधी आनंद आहे.

जग सांगते तिला जरा शहाणे व्हायला,
नियम आणि चौकटीत स्वतःला बांधायला.
पण मला वाटते तिने असेच वेडे राहावे,
माझ्या कोरड्या आयुष्यात रंग भरण्यासाठी
.
ती जशी आहे, तशीच माझी हक्काची आहे,
तिच्यातल्या कोणत्याही त्रुटी मला दिसत नाहीत.
तिच्या या सुंदर, निरागस वेडेपणाशिवाय,
माझ्या हृदयाचे ठोके आता चालतच नाहीत.
------------------------------

कितीदा करावं प्रेम तुझ्यावर?

दिवस संपतो, रात्र सरते,
पण तुझी ओढ मनात संपत नाही.
कितीदा करावं प्रेम तुझ्यावर सांग ना,
कारण माझं मन एकदा करून तृप्त होत नाही.

सकाळी उठून आरशात बघताना,
तिथेही चेहरा तुझाच दिसतो.
दिवसभरातल्या हजारो कामांत,
मी प्रत्येक क्षणी तुलाच विचारतो.

एका जन्माची ही पुंजी आपली,
तुझ्या पायाशी कधीच सरून गेली.
आता पुढच्या सात जन्मांची पानेही,
मी तुझ्याच नावाने लिहून ठेवली.

निसटून जाणाऱ्या या वेळेला थांबवून,
तुला डोळ्यात साठवून घ्यावे वाटते.
जितक्या वेळा तुला पाहतो सखे,
तितक्या वेळा पुन्हा नव्याने प्रेम करावे वाटते.
------------------------------

घाईत अशी जाऊ नको ना

दोन पावले चालून तुझी,
अशी मागची पाऊलवाट सुटू लागते.
तू घाईत निघतेस तेव्हा सखे,
माझ्या काळजाची धडधड वाढू लागते.

अजून तर फक्त सुरुवात झाली होती,
मनातल्या काही हळव्या गप्पांची.
तू नजर चोरून वेळ बघतेस,
आणि घाई होते तुला जाण्याची.

थांब ना जरा, थांबवून हा प्रहर,
निसटणारा काळ जरा अडवून धर.
तुझ्या जाण्याने उरतो फक्त एकांत,
माझ्या या वेड्या मनावर जरा तरी दया कर.

अशी अर्धवट सोडून निघू नकोस,
अजून बरेच काही सांगायचे बाकी आहे.
तुझ्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची,
माझ्या या डोळ्यांना अजून भूक बाकी आहे.
------------------------------

तुझा हा खट्याळपणा जरा कमी कर ना ग...

समोर येऊन अशी उभी राहतेस,
आणि डोळ्यांनीच काहीतरी मिष्कील खूण करतेस.
माझा शहाणपणा पार विसरून जावा,
असा तुझा हा खट्याळपणा जरा कमी कर ना ग.

कधी बोलता बोलता विषय बदलून,
तू गालातल्या गालात हळूच हसतेस.
मी गंभीर होऊन बोलायला गेलो,
की मागून येऊन डोळे माझे झाकतेस.

तुझ्या या नखऱ्याला आणि खोडकर वागण्याला,
मी तरी किती आणि कसा आवर घालू?
तू समोर आलीस की सुचत नाही काही,
मी आता पुढे नक्की काय बोलू?

चल, सोड आता हा अवखळपणा,
जरा शांत बसून माझ्याकडे बघ ना.
हा तुझा गोड खट्याळपणा आवडतो मला,
पण आधी जरा मनाचं ऐकून घे ना.
------------------------------

पुन्हा भेटू...नव्या शब्दांसह,
नव्या भावनांसह..........🙏