शिवपुराणशौनक म्हणाले हे शिवजी, तुम्ही महा पंडित आहात. तुम्ही मला पुराणातील कथा सांगा. चांगले आचरण व भक्ती करुन विवेक कसा वाढतो व सज्जन लोक आपले विकारांवर नियंत्रण कसे ठेवतात ते सांगा.
कलियुगात कल्याण करणारी व पवित्र अशी कथा सांगा आणि भगवान शंकरांची प्राप्ती कशी होईल ते सांगा. सूत म्हणाले तुम्ही धन्य आहात.
मी तुम्हाला काळरूपी महासर्पाचा विध्वंस करणारे असे शिवपुराण सांगतो. हे स्वतः महादेवांनी सांगितले आहे. शिवपुराण हे परम श्रेष्ठ आहे. याच्या वाचनाने अथवा ऐकल्याने, यज्ञाने मिळते तेवढे पुण्य मिळते. हे दिवसातून एकदा थोडा वेळ ऐकावे किंवा शक्य नसेल तर पवित्र महिन्यात अवश्य ऐकावे.
वाचन व श्रवण केल्यास उत्तम फळ मिळते. जिथे कथा वाचन होत असेल ती जागा तीर्थक्षेत्राप्रमाणे समजावी. वाचन व श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होऊन शिवपद प्राप्त होते.वेद इतिहास व शास्त्रांमध्ये हे श्रेष्ठ आहे. फल देणारे आहे. त्रिताप नाशक सुखदायक व देवतांना प्रिय आहे.याच्या श्रवणाने पापी व दुराचारी पण शुद्ध होतात. निर्दय स्वभावाचे लोक पण त्याच्या ज्ञानाने शुद्ध होतात.
समुद्राजवळ एक गाव होते तिथे धर्म न मानणारे पापी लोक राहत होते. ते दुष्ट ,कामुक व शस्त्रबलावर विश्वास ठेवणारे होते. बुद्धी पशु समान होती.स्त्रिया स्वैर वृत्तीच्या होत्या.
त्यातच एक बिंदूग नावाचा अधर्मी ब्राह्मण राहात होता. तो पापी व कामुक वृत्तिचा होता. व पत्निला सोडून वेश्ये बरोबर राहत होता. त्याची पत्नी चंचुला पण तरुण होती.
ती पण काम वासनेने पिडीत होऊन दुसऱ्या पुरुषासोबत राहत असे. एक दिवस पतीने तिला परपुरुषासोबत पाहिले आणि तो रागाने तिच्याकडे धावला.पत्नीने त्या पुरुषाला पळून जाण्यास सांगितले. पतीने तीला मारण्यास सुरुवात केली तेव्हा ती म्हणाली मी सुंदर व तरुण असूनही तुम्ही बाहेर जाता, तुम्ही माझ्याजवळ येत नसल्याने मी माझ्या मनाप्रमाणे वागते. तो पती इतका वाईट होता की तो म्हणाला तू त्याच्यासोबत राहा पण निदान त्याच्याकडून धन मिळव आणि मला दे.यात दोघांचाही फायदा आहे त्यावर चंचुला हो म्हणाली. दोघेही आपल्या कुकर्मात मग्न झाले. नंतर तो पती मरण पावला व नरकात गेला नंतर तो विध्यांचल पर्वतावर पिशाच्च रुपात आला. इकडे पत्नी पण आपल्या मुलांसोबत राहत होती व पूर्वीप्रमाणे पुरुषांसोबत राहत होती. तिचे वय वाढत होते. ती योगायोगाने गोकर्ण क्षेत्रात गेली व तीर्थात स्थान करून तिथे भ्रमण करत होती.
एका ठिकाणी एक पंडित शिवपुराण सांगत होते.त्यात त्यांनी सांगितले की जी स्त्री परपुरुषा सोबत राहते ती नरकात जाते .
हे ऐकून ती घाबरली कथा संपल्यावर कथा वाचकाना म्हणाली की मी अत्यंत पापी आहे. तारुण्याच्या गर्वाने मी व्यभिचार केला आहे .तुमच्या कथनाने भयभीत झाले आहे. मला आता दुर्गती प्राप्त होईल. माझे आता रक्षण कोण करील ? यमदूत मला कसे नेतील व तेथे काय शिक्षा होईल? ते मी कशी सहन करेन.
मी पापबुद्धिने वाईट कर्मे केली आहेत.
धर्म सोडला आहे, मला खूप पीडा होत आहे. तरी माझे हे पाप कसे धुतले जाईल मला माहित नाही. हे ब्राह्मण तुम्हीच माझे गुरु आहात माझा उद्धार करा . ती त्यांच्या पाया पडली तिला उठवून ब्राह्मण म्हणाले की तू भाग्यवान असल्याने शिवपुराण श्रवण केले आहेस.
तू महादेवांना शरण जा. त्यांच्या कृपेने पाप नष्ट होईल आणि पश्चाताप झाल्यास पापातून मुक्ती मिळू शकते.ज्यांचे पाप पश्चातापाने शुद्ध होत नाही त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागते.
आणि पश्चातापाने चांगली गती प्राप्त होते .
तू शांत चित्ताने शिवाचे नामस्मरण कर म्हणजे तुला मुक्ती मिळेल .हे ब्राह्मण आपण शिवभक्त आहात परोपकारी आहात. एक शिवकथा ऐकून मी पापकर्माविषयी विरक्त झाले आहे ते कल्याणकारी पुराण पुन्हा श्रवण करण्याची माझी इच्छा आहे. त्यांनी तिला शिवपुराण सांगितले. ती कथा भक्ती ज्ञान व वैराग्य वाढवणारी होती.
चंचुलाला त्यामुळे सद्गती मिळाली व ती शिवलोकी गेली. नंतर काही दिवसांनी पार्वतीदेवीना म्हणाली माझ्या पतीची काय स्थिती आहे. तो पापी होता व माझ्या आधी मृत्यू पावला आहे त्याला कोणती गति मिळाली हे मला सांगा. तेव्हा देवीने सांगितले की तो खूप वर्षं नरकात राहून आता विध्यांचल पर्वतावर पिशाच्च योनीत फिरत आहे. तेव्हा तिने देवीला प्रार्थना केली की त्यांचा उद्धार करा तेव्हा देवीने सांगितले की त्याने शिवपुराण ऐकले तर त्याचा उद्धार होईल. तेव्हा चंचुलाने त्यांना विनंती केली की तशी घटना घडेल असे करा. तेव्हा पार्वती देवीनी तुंबरु गंधर्वाला सांगितले की तुम्ही विंध्याचल पर्वतावर जा.तेथे एक पिशाच्च आहे. तो मानव अतिशय पापी होता दुसऱ्याच्या घरात आग लावणारा होता, आणि कुसंगतीत राहणार होता.
तो आता नरकातून परत विंध्याचल पर्वतावर आला आहे . तू तेथे जाऊन शिवपुराण कथेचे आयोजन करून , त्याला ते ऐकवून त्याचा उद्धार कर.नंतर तुंबरु व चंचुला पर्वतावर गेले. तेव्हा त्यानी पाहिले की ते पिशाच विकट हास्य करत आहे . कधी रडत आहे. इकडे तिकडे उड्या मारत आहे. तेव्हा त्यांनी त्याला पाशबद्ध केले.शिवपुराणाचे आयोजन केले तिथे अनेक ऋषी आले. तुंबरुने शिवपुराण सांगितले. शिवपुराण ऐकल्यानंतर पिशाच्च योनितुन तो मुक्त झाला. तो व चंचुला भगवान शिवांचे गुणगान करू लागले. ते दोघेही आनंदी झाले. तेथे जमलेले सर्व शिवाचे गुणगान करीत घरी गेले. बिंदूग व चंचला शिवलोकात गेले त्या दोघांनाही महादेवाने आपल्याजवळ ठेवून घेतले.