रानवाडीचं अधूरं प्रेम! 💔
उंचच उंच हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेलं ते एक छोटंसं आणि देखणं गाव... रानवाडी. याच रानवाडी गावात एक साधं, सुटसुटीत आणि हसतं-खेळतं लहानसं कुटुंब राहायचं. घराभोवती शेत, गोठ्यात बांधलेली गुरं आणि माणसं एकदम मायेची.
याच कुटुंबाचा जीव आणि घराचा सगळ्यात लाडका मुलगा म्हणजे आपला परश्या! स्वभावाने रगेल, बोलण्यात हुशार आणि मित्रांसाठी नेहमी आघाडीवर असणारा. परश्या आता इयत्ता १० वीच्या वर्गात नुकताच गेला होता.
परश्याचे वडील शेतकरी होते, जे दिवस-रात्र काळ्या मातीत घाम गाळून आपल्या संसाराचा गाडा ओढत होते. त्यांची संपूर्ण सोय बघणारी आणि घराला घरपण देणारी परश्याची आई देखील दिवसभर घरची कामं आटोपून शेतात काम करणारी एक कष्टाळू गृहिणी होती. आई-वडिलांच्या या कष्टाची परश्याला पूर्ण जाणीव होती. शेतीची कामं सांभाळत त्यांनी परश्या आणि त्याच्या बहिणीच्या शिक्षणात कधीच कोणती कमतरता पडू दिली नव्हती. म्हणूनच, यंदा परश्या १० वीत गेल्यामुळे आई-वडिलांच्या डोळ्यात एक वेगळीच आशा आणि स्वप्न तरंगत होतं.
शाळा चालू झाली आणि शाळेचा पहिला दिवस होता. सर्व मुलं-मुली आप-आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटण्यात मग्न होते. कित्येक दिवसांनी भेटल्यामुळे शाळेच्या आवारात एकच गलबला आणि हसण्याचे आवाज येत होते. पण त्या सर्व गराड्यात, एक नवीन आणि अनोखा चेहरा परश्याच्या नजरेत आला. पांढरा शुभ्र युनिफॉर्म, चेहऱ्यावर एक निरागस शांतता आणि डोळ्यात काहीशी अनोळखी भीती असलेली एक मुलगी तिथे उभी होती. रानवाडीच्या डोंगरावरून एखादा थंड पाण्याचा झरा यावा, तसाच काहीसा फील तिला बघून परश्याला आला.
परश्याची नजर तिच्यावरून हटेना. त्याने बाजूला उभ्या असलेल्या आपल्या खास मित्राला कोपराने ढोसकले आणि गावरान लहेजात विचारू लागला, "गण्या... लेका, कोण रे ही? हिला नाही कधी बघितलं आपल्या गावात?"
गण्याने आजूबाजूला बघत हळूच परश्याच्या कानात सांगितले, "अरे परश्या, ती आपल्या शेजारच्या गावात आलीये. तिच्या बापानं दारूच्या नादात तिकडं सगळं विकून टाकलं रे! शेवटी लय हाल झाले त्यांचे, म्हणून आता गावातल्या जमिनीवर शेती करायला माघारी आलेत. तिचं नाव काय हाय ठाऊक नाय मला अजून, पण कळेल लवकरच..."
गण्याचं हे बोलणं ऐकून परश्या क्षणभर सुन्न झाला. तिचा तो साधेपणा आणि चेहऱ्यावरची काळजी आता त्याला समजायला लागली होती. तो मनोमन तिच्याबद्दल विचार करतच होता, तेवढ्यात शाळेची मोठी घंटा वाजली—घण घण घण!
घंटा वाजताच मैदानावरची सगळी पळापळ थांबली आणि नेहमीप्रमाणे सर्व मुलं-मुली प्रार्थनेसाठी आपापल्या वर्गाप्रमाणे रांगेत उभी राहायला लागली. परश्या १० वीच्या मुलांच्या रांगेत उभा राहिला, पण त्याचे डोळे मात्र समोरच्या मुलींच्या रांगेत उभ्या असलेल्या त्याच नव्या चेहऱ्याला शोधत होते
परश्या मान उंचावून मुलींच्या रांगेत त्याच चेहऱ्याला शोधत होता. त्याची नजर फक्त तिच्यावरच खिळली होती. रांगेत तिला शोधत असताना, मागून गण्याने हळूच त्याच्या पाठीवर टिचकी मारली आणि कुजबुजत बोलला, "लेका! सर काय म्हणतात ते बघ आधी. इकडे तिकडे काय बघतोय? कोण नाय तिकडे!"
प्रार्थना संपली आणि सर्व १० वीची मुलं आपापल्या वर्गात आली. परश्या नेहमीप्रमाणे पुढे पहिल्या बाकावर बसला. पण पहिल्या बाकावर बसल्यावरही त्याची नजर चोरून मुलींच्या रांगेत त्या नवीन मुलीला शोधत होती आणि अखेर ती त्याला दिसली. परश्या सारखा मागे वळून बघत होता. तेवढ्यात वर्गात सरांची एंट्री झाली. "नमस्ते सर!" करत सर्व मुला-मुलींनी उठून सरांना नमस्कार केला आणि सगळे आपापल्या जागेवर खाली बसले.
सरांनी फळ्यावर '१० वी' असं लिहिलं आणि मुलांना समजावून सांगू लागले, "बघा मुलांनो, यंदा तुमचं १० वीचं बोर्डाचं वर्ष आहे. सर्वांनी अभ्यासाकडे नीट लक्ष द्या, चांगले मार्क्स मिळवा. तुमच्या घरच्यांची आणि तुमची स्वतःची स्वप्नं पूर्ण करायची हीच वेळ आहे." सर एवढं महत्त्वाचं बोलत होते, पण आपल्या परश्याचं लक्ष पुस्तकात नव्हतंच. तो सरांची नजर चुकवून सारखा सारखा मागे वळून बघण्याचा प्रयत्न करत होता.
परश्याची ही तगमग मागच्या बाकावर बसलेल्या गण्याच्या पूर्ण लक्षात येत होती. गण्याने त्याला डोळ्यानेच 'सर बघतील' अशी खूण केली, पण आज परश्याचं मन मागे वळून बघण्यावाचून कशातच लागेना.
तेवढ्यात सरांनी खडू खाली ठेवला आणि म्हणाले, "मुलांनो, यंदा आपल्या वर्गात एक नवीन ॲडमिशन आलं आहे..." सरांनी मुलींच्या रांगेकडे पाहत आवाज दिला, "कोण आहे ते? उठून उभं राहा आणि तुझं नाव सांग बाळा."
सरांचे हे शब्द ऐकताच परश्या कशाचीही परवा न करता झटकन जागेवरच मागे फिरला. ती नवीन मुलगी तिच्या बाकावरून उठून उभी राहिली. तिने दोन्ही हात जोडले आणि सर्वात आधी सरांना नमस्कार केला.
तिचा तो मंजूळ, काहीसा हळवा आणि गोड आवाज कानावर पडताच, परश्याच्या काळजात जणू एक वेगळंच वादळ उठलं! रानवाडीच्या डोंगरावर एकाच वेळी विजा कडाडाव्यात आणि पाऊस कोसळावा, तशीच काहीशी अवस्था पहिल्या बाकावर बसलेल्या आपल्या परश्याची झाली होती.
ती मुलगी म्हणाली, "नमस्ते सर माझं नाव गायत्री."
'गायत्री'—ते नाव ऐकताच परश्या जणू सुन्न झाला. तिच्या त्या मंजूळ आवाजात तिचं नाव ऐकताना त्याला आजूबाजूचा सगळा वर्ग, सरांचा आवाज, सगळं काही विसरल्यासारखं झालं. त्याच्या मनात फक्त 'गायत्री' हे एकच नाव गुंजत राहिलं.
"बरं बाळा, कुठून आलीस तू?" सरांनी पुढे विचारले.
गायत्रीने आपल्या डोळ्यांतील अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत हळूच आवाजात सांगितले, "सर, मी आधी शहरात होते... नाशिक. पण तिथे परिस्थिती खूप खराब झाली. वडिलांनी शेवटी गावात येऊन शेती करायचं ठरवलं, म्हणून आम्ही सगळं सोडून इकडे आलोय आणि आता शेजारच्या गावात मामाकडे राहतोय."
सरांनी धीर देत म्हटले, "काही काळजी करू नको बाळा. मुंबई सुटली तरी हे गाव तुला खूप प्रेम देईल. नीट अभ्यास कर."
गायत्री खाली बसली, पण पहिल्या बाकावर बसलेला परश्या मात्र आतून पुरता हलला होता. त्याच्या मनात विचार आला—‘नाशिक सारख्या एवढ्या मोठ्या शहरातून ही मुलगी आपल्या या दुर्गम भागात आलीये. किती अवघड जात असेल तिला इथल्या वातावरणात रुळायला...’
परश्याची नजर पुन्हा मागे वळली. गायत्रीने आपले जुने पुस्तक उघडले होते आणि ती शांतपणे सरांकडे बघत होती.
शाळेचा तो पहिला दिवस कसाबिसा संपला आणि सर्व मुलं-मुली आपापल्या घरी निघून गेले. परश्या घरी आला, पण त्याचं लक्ष कशातच नव्हतं. अखेर संध्याकाळी परश्या आणि गण्या गावाबाहेरच्या एका निर्जन ठिकाणी, एका टेकडीवर नेहमीप्रमाणे भेटले. तिथे गार वारा सुटला होता.
परश्या शांत बसला होता, हे बघून गण्या परश्याची मज्जा घेऊ लागला, "बाबो! एका दिवसात येडा झाला तू तर! काय रं, थेट नाशिकची हवा लागली की काय तुला?"
गण्याचं हे चिडवणं ऐकून परश्याने एक मोठा श्वास घेतला आणि तो गण्याला सांगू लागला, "अरे गण्या, मलाच कळेना लेका काय झालं होतं मला शाळेत! मित्रा, तुला तर माहीत आहे ना, याआधी कधी असं झालं आहे का माझ्यासोबत? माझं नको बाबा, अशा भानगडीत नाही पडायचं मला. यंदा १० वीचं वर्ष आहे रे." परश्या स्वतःच्या मनाला समजावण्याचा प्रयत्न करत होता.
पण गण्या कुठे ऐकणारा होता? त्याने परश्याच्या खांद्यावर हात ठेवला, खळखळून हसला आणि बोलला, "लेका! गेला तू आता. झाला तुझा गेम!
परश्या जेव्हा म्हणाला की मला या भानगडीत पडायचं नाही, तेव्हा गण्या त्याला धीर देत बोलला, बघ तू! उद्या तसं काहीच तुला दिसणार नाही. सगळं नीट होईल." त्यावर परश्या थोडा विचार करत म्हणतो, "हो का लेका? बघू उद्या..." आणि असं बोलून दोघेही गप्पा मारत मारत आपापल्या घरी गेले.
आपला परश्या शाळेत खूप हुशार होता. तो हुद्देबाज असला तरी अभ्यासाच्या बाबतीत कधीच आळस करायचा नाही. त्याने घरी आल्यावर शांतपणे बसून शाळेचा सर्व अभ्यास पूर्ण केला. १० वीचं वर्ष असल्यामुळे त्याचं कौतुक घरात होतंच. अभ्यास संपवून तो बसला असताना, आईने आवाज दिल्यावेळ तो जेवायला गेला.
आज परश्याच्या मनात एक वेगळाच उत्साह आणि आनंद होता. त्याचा चेहऱ्यावरचा तो वेगळाच नूर आणि चमक त्याची आई बघते आणि हसून त्याला म्हणते, "प्रशू, आज लयच खुश आहेस की रे! काय झालं शाळेत आज?" असं म्हणून ती त्याची मस्करी करू लागते.
परश्याने चटकन आपली थाळी समोर ओढली आणि मान खाली घालून गावरान सुक्या भाजीचा घास तोंडात टाकला. "काही नाही गं आई, शाळेचा पहिला दिवस होता ना, म्हणून जरा बरं वाटलं," असं म्हणून त्याने विषय टाळण्याचा प्रयत्न केला. पण चिमणीने तिथूनच त्याला डोळा मारला. परश्याला माहीत होतं की त्याच्या मनात रानमाळ्याच्या डोंगराएवढं गुपित लपलंय, ज्याचं नाव 'गायत्री' होतं. त्या रात्री परश्या डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करत होता, पण मनात मात्र उद्या सकाळी वाजणाऱ्या शाळेच्या पहिल्या घंटेची आणि गायत्रीच्या त्या मंजूळ आवाजाची आतुरतेने वाट पाहत होता...
दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. परश्याने उठून आपली स्वतःची कामं आणि गोठ्यातली सर्व कामं उरकली आणि शाळेत जाण्याची तयारी करू लागला. रोज तो घाईघाईत कसातरी शाळेत निघायचा, पण आज काहीतरी विशेष होतं. तो घरातल्या छोट्या आरशासमोर उभा राहिला. आरशात बघून नीट केस विंचरणं, तोंडाला थोडी पावडर लावणं आणि एवढंच नाही तर त्याने आज शाळेच्या युनिफॉर्मच्या ड्रेसवरही थोडी पावडर लावली, जेणेकरून तो एकदम फ्रेश दिसेल.
आज त्याला शाळेत जायला खूप घाई झाली होती. काळजात एक वेगळीच हुरहूर लागली होती. परश्या सायकल घेऊन शाळेच्या दिशेने निघाला. रस्त्यामध्ये नेहमीप्रमाणे गण्याचं घर लागलं. गण्या बाहेरच उभा होता, तिथून पुढे आता दोघं सोबत सायकलवरून निघाले.
रानवाडीच्या त्या मातीच्या रस्त्यावरून दोघे सोबत जात असताना, अचानक रस्त्यात त्याला गायत्री दिसली!
पांढरा शुभ्र युनिफॉर्म घातलेली, केसांची वेणी घातलेली गायत्री हातात दप्तर धरून संथ पावलानं चालली होती. योगायोग असा की, तीही त्याच रस्त्याने जात होती, ज्या रस्त्याने परश्या आणि गण्या रोज शाळेत जात होते. गायत्रीला पायी चालताना बघून परश्याच्या काळजाचा ठोका चुकला आणि त्याने नकळत सायकलचा वेग थोडा कमी केला.
गण्याने लगेच परश्याकडे बघून कोपर मारली आणि हळूच म्हणाला, "काय रं परश्या, मी कालच म्हणालो होतो ना! बघ, नाशिकची हवा आपल्याच रस्त्यावर पैंजण वाजवत चाललीये. आता सायकल पुढे घे की लेका!" परश्याचा चेहरा लाजेने लाल झाला, त्याने सायकलचे हँडल घट्ट पकडले आणि तो हळूहळू गायत्रीच्या जवळ पोहोचू लागला.
परश्याची सायकल गायत्रीच्या जवळून निघून गेली. ति शेजारून जात असताना गायत्री त्या दोघांकडेच बघत होती, पण परश्याने मात्र लाजेपोटी तिच्याकडे नजरसुद्धा मिळवली नाही. तो सरळ समोर बघत सायकल चालवत राहिला. सायकल थोडी पुढे जात असताना, गण्याने अचानक परश्याला सायकल थांबवायला लावली.
सायकल थांबताच गण्या परश्याला बोलू लागला, "उतर खाली! पायपीट करत जाऊ आपण पण तिच्यासोबत."
गण्याचं हे बोलणं ऐकून परश्या दचकला, त्याने आजूबाजूला पाहिले आणि म्हणाला, "लेका! पागल झाला का काय तू? बाकीचे लोक पोर आहेत की रस्त्याला. कोणी काही बघितलं किंवा गावात वात उठली तर?" परश्याला गावातल्या लोकांची आणि गायत्रीची काळजी वाटत होती.
त्या दोघांचे हे असे बोलणे चालू असतानाच, गायत्री मागून चालत येतच होती. ती जवळ आल्यावर तिने पुन्हा त्या दोघांकडे पाहिले. परश्याचं असं अस्वस्थ होणं, पावडर लावून टिपटॉप येणं आणि गण्याचं त्याला चिडवणं... हे सगळं बघून तिलाही कुठेतरी मनात जाणवू लागलं की या दोघांमध्ये काहीतरी गुपित (Secret) नक्कीच आहे, जे तिच्याशी जोडलेलं आहे. गायत्रीच्या चेहऱ्यावर एक छोटंसं मिश्कील हसू आलं, पण तिने काही न बोलता मान खाली घातली आणि ती पुढे चालू लागली. परश्या मात्र तिच्या जाणाऱ्या पावलांकडे बघत तिथेच खिळून उभा राहिला.
आता मात्र परश्याची चांगलीच घालमेल झाली. कारण गायत्रीने त्या दोघांकडे खूप थांबून आणि निरखून बघितलं होतं, हे त्याला चांगलंच कळालेलं होतं. गण्याने रस्त्यात सायकल थांबवून केलेला पोरखेळ गायत्रीच्या नजरेतून सुटला नव्हता. परश्या मनातल्या मनात स्वतःलाच शिव्या घालत होता, ‘लेका गण्या, तुझ्या नादात आज चांगलाच पोपट झाला आपला. आता ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल?’ त्याच्या कपाळावर पावडरीच्या सुवासासोबतच चिंतेचे चटके जाणवू लागले.
आणि दुसरीकडे, आता पुढे चालणारी गायत्री मनाशीच विचार करू लागली की, हे दोघं का असे वागत होते रस्त्यावर? आधी परश्याने नजर न मिळवता सायकल सुसाट पुढे काढली, मग गण्याने त्याला अडवून खाली उतरायला लावले आणि ती जवळ येताच दोघेही गुपचूप उभे राहिले. तिने याआधी मुंबईच्या शाळेत अशी मुले पाहिली होती, पण या गावातल्या रांगड्या मुलाच्या (परश्याच्या) चेहऱ्यावरचा तो निरागस आणि लाजाळू पणा काहीतरी वेगळाच होता. तिच्या लक्षात आले होते की, या दोघांच्या मनात नक्कीच काहीतरी गुपित शिजत आहे. गायत्रीच्या ओठांवर एक अगदी बारीक, कोणालाही न दिसणारं हसू उमटलं आणि तिने आपल्या दप्तराची फीत घट्ट पकडली.
दोघांमधील हे न बोलता सुरू झालेलं नातं रानवाडीच्या त्या मातीच्या रस्त्यावरून चालत चालत अखेर शाळेच्या वेशीपर्यंत पोहोचलं...