आभा... संघर्षालाही जिथे अर्थ मिळाला - भाग 1 Likhasa द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आभा... संघर्षालाही जिथे अर्थ मिळाला - भाग 1

भाग १


वाचकांनी कृपया नोंद घ्यावी ; ही कथा निव्वळ मनोरंजन करण्याच्या हेतूने लिहिली आहे. कथेतील कोणत्याही पात्राचे नाव, किंवा प्रसंग ह्यांमध्ये साधार्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.


आभा....संघर्षालाही जिथे अर्थ मिळाला (भाग १)



            पावसाने भरलेली ती रात्र....घराच्या खिडक्यांवर थेंबांची सततची टपटप चालू होती. रुग्णालयाच्या त्या पांढऱ्या कॉरिडॉरमध्येवेळ जणू थांबला होता.घड्याळाचे काटे पुढे जात होते,पण प्रत्येक सेकंद...कुणासाठी तरी खूप मोठा वाटत होत 

आणि मग....एक हलकासा, पण स्पष्ट आवाज त्या शांततेला भेदून गेला. नवीन जन्माचा पहिला रडका श्वास.नर्स हसत बाहेर आली.

“मुलगी झाली आहे.”

त्या एका वाक्याने एकाच वेळी अनेक आयुष्यं बदलली. आईच्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं, वडिलांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं,आणि जगात...

एक नवीन कथा सुरू झाली.


तिला हातात घेतल्यावर आईने हलकेच तिच्या कपाळावर चुंबन दिलं. मनात एकच विचार हिचं आयुष्य कसं असेल?कोणीच उत्तर देऊ शकत नव्हतं, पण त्या छोट्याशा हातात असं काहीतरी होतं जे सांगत होतं ही मुलगी फक्त आयुष्य जगणार नाही तर आयुष्याला अर्थ देणार आहे. आणि त्या रात्री पावसाचा आवाज, रुग्णालयाचा सुगंध,आणि एका नव्या जीवाचा पहिला श्वास एकत्र मिसळून 

कथेचं पहिलं पान लिहिलं गेलं.


सुमतीने बाळाला पहिल्यांदा मांडीवर घेतलं तेव्हा तिच्या मनात एक हलकी भिती आणि अनामिक प्रेम एकत्र दाटून आलं होतं. आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं नाही… तर प्रत्येक श्वासात कोणासाठी तरी जगणं असतं, हे पुन्हा आई होताना तिला प्रकर्षाने जाणवत होतं.

आई होणं म्हणजे…

आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं नसतं.....


ते असतं एका जीवाला स्वतःतून पुन्हा घडवणं …

आई होणं म्हणजे रात्री जागून

स्वप्नं दुसऱ्याची जपणं,

स्वतःच्या वेदनांना हसत लपवून

आपल्या बाळासाठी जगणं…

आई होणं म्हणजे

पहिल्या रडण्यावरही हसणं,

आणि पहिल्या पावलावर

डोळ्यांतून आनंद ओसंडून वाहणं 

आई होणं म्हणजे

स्वतःला विसरून कुणाचं तरी विश्व होणं ,

लहानशा हातात हात देऊन

पूर्ण आयुष्यभर चालत राहणं…

आई होणं म्हणजे त्याग नाही,

तो तर तिचा स्वभावच असतो,

कारण तिच्या प्रत्येक श्वासात

आपल्या बाळाचंच नाव लिहिलेलं असतं…

आई होणं म्हणजे…

देवाला सुद्धा न जमलेला एक चमत्कार....


सुमतीला आपलं कुटुंब आता पूर्ण झालं ह्या जाणीवेने अपरिमीत आनंद झाला.      


रुग्णालयातून घरी परतण्याचा तो दिवस…


आकाश अजूनही हलक्याशा ढगांनी भरलेलं होतं. पावसाने जरा विश्रांती घेतली होती, पण मातीचा सुगंध अजून हवेत दरवळत होता.


घराच्या दारात मालतीताई उभ्या होत्या … डोळ्यांत आतुरता, हातात आरतीचं ताट.

“आले का?” त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं.

मधुकरने हलकंसं मान हलवली…

आणि सुमतीने आपल्या कुशीतल्या त्या छोट्याशा जीवाला अजून घट्ट धरून ठेवलेलं होतं.

दारात पाऊल टाकताच…

मालतीताईंनी औक्षण करून ओवाळलं आणि भाकरतुकडा ओवाळून टाकला.

त्यांच्या डोळ्यांतलं पाणी त्या लपवू शकत नव्हत्या. डोळे आनंदाने तुडुंब भरले होते .

“देवा, सुखी ठेव…” त्या हळूच पुटपुटल्या .

घरात एक वेगळीच ऊब पसरली होती.

जणू त्या छोट्याशा बाळाने घरात येताच सगळ्या भिंतींना, कोपऱ्यांना… एक नवीन जीव दिला होता.

आतल्या खोलीत…

एक छोटासा पाळणा आधीच तयार करून ठेवलेला होता .

पांढऱ्या मऊ कापडांनी सजलेला …

त्यावर हलक्या निळ्या रंगाचं आजीने स्वतःच्या हाताने शिवलेलं छोटंसं दुपटं.

सुमतीने हलक्या हाताने बाळाला त्या पाळण्यात ठेवलं.

क्षणभर सगळे शांत झाले…

ती छोटीशी बोटं हलत होती…

डोळे मिटलेले, श्वास हळूवार…

जणू देवाने स्वतःच एक कोमल स्पर्श घरात ठेवला होता.

तेवढ्यात…

दारातून एक छोटा आवाज आला, “आई… मी बघू का?” तो होता अनिश. बाळाचा मोठा भाऊ. त्याच्या डोळ्यांत कुतूहल भरून राहिलं होतं. तो हळूहळू पुढे आला… जणू काही खूप मौल्यवान गोष्ट पाहायला चाललाय.

“हळू… आवाज करू नकोस,” सुमतीने सांगितलं.

अनिश पाळण्याजवळ उभा राहिला…आणि त्या छोट्याशा चेहऱ्याकडे पाहतच राहिला. “ही… माझी बहीण?”त्याने हळूच विचारलं.

मधुकर हसला,“हो… तुझीच.”

अनिशच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटलं. त्याने हलकंसं तिच्या हाताला स्पर्श केला…आणि त्या छोट्याशा बोटांनी त्याचा बोट घट्ट धरलं. क्षणभर…सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता, आश्चर्य आणि आनंद......


दिवस पुढे सरकत गेले…घरात आता एक नवीन rhythm तयार झाला होता. बाळाचं रडणं…सुमतीचा हलका आवाज…मालतीताईंचं अंगाई गीतं म्हणणं, बाळाला खेळवणं...आणि अनिशचे छोटे छोटे प्रश्न…

“आई, ती का रडते?”

“आई, ती कधी बोलेल?”

“आई, ती माझ्यासोबत खेळेल का?”

सुमती हसून म्हणायची …“लवकरच…”


काही दिवसांनी…घरात गडबड वाढली. बारशाची तयारी सुरू झाली होती. घर सजवलं जात होतं…फुलांचे हार…दरवळणारा अत्तराचा सुगंध…बाळाचा पाळणा छान सजवला होता. स्वयंपाकघरात लगबग सुरू होती…मालतीताई सगळ्यावर लक्ष ठेवून होत्या. “हे नीट लावा… आणि ती फुलं तिथे ठेवा…”

त्यांच्या आवाजात उत्साह होता. बारशासाठी…घरात नातेवाईक, शेजारी सगळे जमले होते. सगळ्यांच्या नजरा त्या छोट्याशा बाळावर होत्या. सुमतीने तिला सुंदरसं परकर पोलकं घातलं होतं, हिरव्या खणाचं...मधुकर तिच्याकडे बघतच राहिला... इवलुसा तो जीव परकर पोलक्यात भारी गोड दिसत होता. हिरव्या कंचं खणात गोरीगोमटी नाजूकशी ती परी खूप सुरेख दिसत होती.

“खरंच… आपलीच आहे ना?” तो हसत म्हणाला.

विधी सुरू झाला…मंत्रांचा आवाज घरात घुमत होता. हवा अधिकच पवित्र वाटत होती. त्या छोट्याशा बाळाला सगळ्यांच्या आशीर्वादात न्हाऊ घातलं जात होतं.

आणि मग…तो क्षण आला…नाव ठेवण्याचा. मालतीताईंनी बाळाला हलकेच उचललं…आणि पाळण्यात ठेवलं.बाळाची आत्या सुलभा आणि मामी नेहा... गोपा खेळवायला लागल्या..

कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या 

कुणी जानकी घ्या कुणी राधा घ्या...

आणि मग आत्याने हळूच बाळाच्या कानात कुर्रर्रर्र... करून नाव सांगितलं. बाळाच्या कानात नाव सांगितले की त्याला कळतं ; आता ही आपली ओळख असणार आहे 

आपल्याकडे परंपरेनुसार जे विधी केले जातात त्याला अर्थ आहे. सगळे शांत झाले… आणि छोटंसं ते पिल्लू अगदी कान टवकारून ऐकू लागलं. क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला…मधुकरने हळू आवाजात सांगितलं,“नाव ठेवलं आहे…”

सगळ्यांची उत्सुकता वाढली…

“आभा…”

एक हलकिशी कुजबुज पसरली…

“खूप सुंदर नाव आहे…”

“अगदी शोभून दिसतं…”

सुमतीच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं.

“आभा…”ती हळूच म्हणाली…

जणू त्या नावातच तिला तिच्या मुलीचं भविष्य दिसत होतं, प्रकाश, उब… आणि अर्थ.

अनिश तिच्या बाजूला उभा होता. तो हसत म्हणाला, “आभा… माझी बहीण…”

त्याच्या आवाजात प्रेम आणि एक जबाबदारीही होती. 


त्या दिवशी…घरात फक्त एक नाव ठेवलं गेलं नव्हतं…तर एक ओळख जन्माला आली होती. मधुकरने आपल्या लेकीसाठी कविता केली होती. पाळणा म्हणून झाल्यावर त्याने कविता म्हणली 


घरात काहीतरी बदललंय…

भिंतींनाही आता हसू आलंय,

दारातून येणाऱ्या वाऱ्यालाही

तुझं नाव कळलंय…


तू आलीस…

आणि वेळ थोडा थांबला,

क्षणांनी हलकेच

स्वप्नांचा हात धरला…


तुझ्या छोट्याशा हातात

काय जादू दडली आहे कोण जाणे,

स्पर्श तुझा लागताच

दुःखही हसून जाते…


तुझं ते निरागस हसू…

पहाटेचा पहिला किरण जणू 

आणि तुझं रडणं

मनाला वाटतं गोड गाणं…


तू झोपलीस की

रात्रही शांत होते,

तुझ्या श्वासांच्या तालावर

चांदणं हलकेच डोलते…


तुझ्यातच दडलंय

उद्याचं सगळं विश्व,

तूच एक उत्तर आहेस

प्रत्येक अनुत्तरित प्रश्नाचं…


बारशाचा कार्यक्रम उत्तम पार पडला 


रात्र झाली…सगळे थकले होते, पण मन मात्र भरून आलं होतं. सुमती आभाला जवळ घेऊन बसली होती…तिच्या केसांवरून हात फिरवत…मधुकर त्यांच्या बाजूला बसला होता…शांत, समाधानी. मालतीताई देवासमोर दिवा लावत म्हणत होत्या …

“देवा, हिच्या आयुष्यात प्रकाश ठेव…”

आणि अनिश…तो पाळण्याजवळ बसून तिला बघत होता. “मी आहे ना तुझ्यासोबत…” तो हळूच म्हणाला.

त्या छोट्याशा घरात…

एक नवीन कथा आकार घेत होती.

जिथे प्रेम होतं, स्वप्नं होती…

आणि एक छोटीशी “आभा” होती

जी हळूहळू सगळ्यांच्या आयुष्यात प्रकाश पसरवणार होती… 


Stay connected.....

******************************************


नोट : कथेत येणाऱ्या कविता ह्या स्वरचित आहेत.