सरताज... कथा वेड्या प्रेमाची - भाग 4 Likhasa द्वारा क्राइम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सरताज... कथा वेड्या प्रेमाची - भाग 4

भाग   ४

रात्रीचे साडेबारा वाजले होते. घरात सगळीकडे शांतता होती.

शर्वाणीच्या खोलीत मात्र अजूनही दिवा चालू होता. टेबलवर नोटबुक, संदर्भग्रंथ, फाईल्स आणि लॅपटॉपचा पसारा होता. तिने एकामागून एक निरीक्षणं वाचायला सुरुवात केली. 

काहींच्या बोलण्यात पश्चात्ताप होता.

काहींच्या बोलण्यात राग.

काहींच्या डोळ्यांत भिती.

काहींच्या चेहऱ्यावर बिनधास्तपणा.

पण सरताज...

तिने त्याचं पान उघडलं....ते जवळजवळ पानच रिकामं होतं.

काही निरीक्षणं. काही नोंदी. आणि उत्तरं नसलेले बरेच प्रश्न.

शर्वाणी खुर्चीला टेकली. विचार करत राहिली.

तो बोलत नव्हता. हे ठीक होतं.

पण त्याहून विचित्र गोष्ट म्हणजे...

तो स्वतःला वाचवण्याचाही प्रयत्न करत नव्हता.

स्वतःची बाजू मांडत नव्हता. स्वतःला निर्दोष म्हणत नव्हता.

जसं त्याला कुणाच्याच मताशी काही देणंघेणं उरलं नव्हतं.

तिने फाईल बंद केली. पण त्या रात्री झोपेपर्यंत तिच्या डोक्यात

एकच प्रश्न फिरत राहिला.

"हा माणूस असा का आहे?"


दुसऱ्या दिवशी ती जेलमध्ये पोहोचली. आज ती आधी कोणत्याही कोठडीकडे गेली नाही. कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या छोट्याशा लायब्ररीकडे ती वळली. जुन्या कपाटांचा वास. रचलेली पुस्तकं.

धुळीची हलकी किनार...आणि टेबलामागे बसलेले पांढऱ्या केसांचे लायब्रेरियन.

"नमस्कार."

"नमस्कार मॅडम."

त्यांनी हसत स्वागत केलं. शर्वाणी काही वेळ पुस्तकांकडे पाहत राहिली.

मग सहज विचारलं.

"कैदी पुस्तकं वाचतात का?"

लायब्रेरियन हसले.

"काही वाचतात. काही पुस्तक हातालाही लावत नाहीत."

"आणि सगळ्यात जास्त?"

त्यांनी ताबडतोब उत्तर दिलं.

"४१२."

शर्वाणीच्या भुवया उंचावल्या.

"सरताज?"

"हो."

लायब्रेरियनने बाजूला ठेवलेलं रजिस्टर तिच्यासमोर सरकवलं.

"बघा."

शर्वाणी पानं उलटू लागली.

पहिल्या काही महिन्यांतील नोंदी तिच्या नजरेसमोर आल्या.

भारतीय राज्यघटना.

एव्हिडन्स ऍक्ट 

क्रिमिनल प्रोसिजर कोड 

मानवी हक्क आणि न्यायव्यवस्था.

ती शांत झाली. पुढची पानं उलटली....मग पुस्तकं बदलली होती.

लॉन्ग वॉक टू फ्रीडम 

मॅन्स सर्च फॉर मिनिंग 

भगतसिंगांचे लेख.

मानसशास्त्र आणि मानवी वर्तन.

शर्वाणी बराच वेळ त्या यादीकडे पाहत राहिली. तिला त्यात एक प्रवास दिसत होता.

सुरुवातीला कायदा.

मग संघर्ष.

मग माणूस.

मग मन.

"सुरुवातीला खूप कायद्याची पुस्तकं घ्यायचा."

लायब्रेरियन म्हणाले.

"आणि नंतर?"

"नंतर बंद झाली."

"का?"

"माहित नाही."

त्यांनी खांदे उडवले.

"पण पहिल्या सहा महिन्यात जितकी कायद्याची पुस्तकं त्याने मागवली होती...तितकी मी आयुष्यात दुसऱ्या कुठल्याच कैद्याला मागवताना पाहिली नाहीत." ते थोडे हसले.

लायब्ररीतून बाहेर पडल्यावर शर्वाणी बराच वेळ विचारात चालत होती.

कॉरिडॉरमध्ये जाधव भेटले.

"काय मॅडम? आज बॅरेक नाही?"

"हो. आधी लायब्ररी बघितली."

"मग?"

"सरताज इतकी पुस्तकं वाचतो हे माहीत नव्हतं."

जाधव हसले. 

"तो फक्त पुस्तकंच वाचतो मॅडम."

दोघं चालू लागले. शर्वाणी काही क्षण शांत राहिली.

मग तिने विचारलं.

"पहिले काही महिने कायद्याची पुस्तकं वाचायचा म्हणे?"

जाधवांचा चेहरा गंभीर झाला.

"हो."

"का?"

"कारण त्यावेळी त्याला अजून आशा होती."

शर्वाणी थबकली.

"म्हणजे?"

"रोज अर्ज."

जाधव म्हणाले, 

"रोज अपील."

"रोज काही ना काही कागदपत्रं."

"ज्याला भेटेल त्याला एकच प्रश्न."

"माझ्या केसचं पुढे काय झालं?"

शर्वाणी शांतपणे ऐकत होती.

"मग?"

ती म्हणाली.

जाधव काही क्षण गप्प राहिले.

"मग हळूहळू कमी होत एक दिवस अचानक सगळं थांबलं."

"अचानक?"

"हो."

"एकदम."

दोघं आता हाय सिक्युरिटी विंगजवळ आले होते.

जाधवांची नजर दूर कुठेतरी स्थिरावली.

"मला आजही आठवतं."

ते हळू आवाजात म्हणाले.

"पूर्वी प्रत्येक भेटीच्या दिवशी तो दरवाज्याकडे बघायचा."

"आणि आता?"

शर्वाणीने विचारलं.

जाधव कडवट हसले 

"आता भेटीचा दिवस आहे की नाही हेही त्याला आठवत नसेल."

शर्वाणी काही क्षण गप्प राहिली.

मग पुन्हा विचारलं.

"त्याच्या घरचे कोणी येतात?"

"पूर्वी यायचे."

"आता?"

"खूप दिवस झाले कुणी आलं नाही."

कॉरिडॉरमध्ये काही क्षण शांतता पसरली.

मग जाधव म्हणाले 

"एक गोष्ट मात्र नक्की मॅडम ."

"काय?"

"सरताज आयुष्य भरभरून जगणारा माणूस होता."

शर्वाणीची नजर त्यांच्याकडे वळली.

जाधव पुढे म्हणाले,

"मित्रांचा जीव होता. घरच्यांसाठी काहीही करायचा. कायम हसत असायचा."

त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला.

"खरं काय खोटं काय माहीत नाही."

"पण जे माहिती आहे ते सांगतो...." जाधव काही क्षण शांत बसले.

"काय?"

जाधव हसले पण त्या हसण्यात उदासी होती.

"तो भरभरून आयुष्य जगत होता मॅडम...दिवस फक्त ढकलत नव्हता."

शर्वाणीची नजर नकळत ४१२ नंबरच्या कोठडीकडे गेली.

सरताज नेहमीप्रमाणे खिडकीजवळ बसला होता.

हातात पुस्तक.

डोकं खाली.

सावलीत हरवलेला.

तिला त्या क्षणी जाधवांचं वाक्य पुन्हा आठवलं.

"तो जगत होता..."

आणि तिच्या समोर दिसत होता एक माणूस...

जो फक्त अस्तित्व टिकवून होता.

ती कोठडीपाशी जाऊन थांबली. आजही त्याने वर पाहिलं नाही.

आजही काहीच बोलणं नाही.

आजही पुस्तकाची पानं संथपणे उलटत होती.

शर्वाणी काही क्षण शांत उभी राहिली.

मग हळू आवाजात म्हणाली,

"माणूस लढणं का सोडतो?"

पान उलटलं.

उत्तर नाही. फक्त शांतता....

"थकतो म्हणून?"

शांतता.....

"की आशा संपते म्हणून?"

सरताजने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

पण...

पहिल्यांदाच शर्वाणीच्या नजरेत एक गोष्ट आली.

पुस्तक धरलेली त्याची बोटं.

त्यांची पकड अचानक घट्ट झाली होती.... काही 

फक्त क्षणभर.

आणि पुढच्या क्षणी ती पूर्ववत झाली.

एवढंच.

पण शर्वाणीसाठी ते पुरेसं होतं.

कारण गेल्या अनेक भेटींमध्ये तिने त्याच्याकडून पाहिलेली ही सकारात्मक प्रतिक्रिया होती.

ती काही क्षण तशीच उभी राहिली.

मग हळूहळू मागे सरकली.

सरताज पुन्हा पुस्तकात हरवला होता.

जसं काही घडलंच नव्हतं.

त्या रात्री घरी परतल्यावर शर्वाणीने नोटबुक उघडलं.

काही क्षण पेन हवेत स्थिर राहिलं.

मग तिने लिहिलं:

"कैदी क्रमांक ४१२.

सुरुवातीला न्याय शोधत होता. आता अर्थ शोधतो आहे."

ती थांबली.

पुन्हा विचार केला.

आणि त्याखाली आणखी एक ओळ लिहिली.

"आज पहिल्यांदाच असं वाटलं...

माझ्या प्रश्नाने त्याच्या शांततेला स्पर्श केला."

शब्द पूर्ण झाले.

पण प्रश्न अजूनही तसाच होता.

सरताज सिंग...

नेमका कोण होता?

आणि असं काय घडलं होतं...

की भरभरून आयुष्य जगणाऱ्या माणसाने एक दिवस जगाशी बोलणंच सोडून दिलं होतं?

जाधव पुढे निघून गेले.

पण शर्वाणी काही क्षण तिथेच उभी राहिली.

कॉरिडॉरच्या शेवटच्या टोकाला असलेल्या छोट्याशा खिडकीतून आत येणारा प्रकाश जमिनीवर पडला होता.

तिच्या मनात मात्र विचारांचा गोंधळ सुरू झाला होता.

ती आतापर्यंत अनेक कैद्यांना भेटली होती.

काही निर्दोष असल्याचा दावा करणारे.

काही स्वतःच्या गुन्ह्याचं समर्थन करणारे.

काही पश्चात्तापाने तुटलेले.

पण सरताज...

तो कुठल्याच चौकटीत बसत नव्हता.

तो स्वतःला निर्दोष म्हणत नव्हता.

स्वतःला अपराधीही म्हणत नव्हता.

तो कुणाला दोष देत नव्हता.

आणि स्वतःची बाजूही मांडत नव्हता.

जणू सत्य, खोटं, न्याय, अन्याय...

या सगळ्याच्या खूप पुढे निघून गेला होता.

पण मग प्रश्न तोच उरत होता.

जर त्याला काहीच फरक पडत नसेल...

तर त्याने पहिल्या काही महिन्यांत एवढी धडपड का केली होती?

रोज अर्ज.

रोज अपील.

रोज नवे प्रयत्न.

माणूस तेव्हाच लढतो...

जेव्हा त्याला जिंकण्याची आशा असते.

मग नेमकं काय बदललं?

कुठल्या क्षणी त्याने हार मानली?

शर्वाणीने नकळत नोटबुक उघडलं.

एक नवीन पान.

वर तारीख.

आणि खाली तिने लिहिलं:

"अपराधभाव असलेली व्यक्ती आणि अन्याय सहन केलेली व्यक्ती यांच्या वर्तनात अनेकदा साम्य आढळतं.

दोघेही शांत होतात.

दोघेही लोकांपासून दूर जातात.

दोघेही स्वतःभोवती भिंत उभी करतात.

फरक फक्त एवढाच असतो की...

एक जण स्वतःपासून पळत असतो.

आणि दुसरा जगापासून."

पेन थांबलं.

तिने ते वाक्य पुन्हा वाचलं.

आणि पहिल्यांदाच तिच्या मनात एक विचार चमकून गेला.

कदाचित...

फक्त कदाचित...

ती सरताजला चुकीच्या नजरेतून पाहत होती.

ती पुन्हा चालू लागली.

हाय सिक्युरिटी विंग जवळ येत होता.

आत नेहमीची शांतता होती.

काही कैदी गजांआड बसलेले.

काही भिंतीकडे पाहत.

काही स्वतःच्या विचारात हरवलेले.

पण ४१२ नंबरच्या कोठडीपाशी येताच तिची पावलं आपोआप मंदावली.

खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात पुन्हा तेच हात दिसत होते.

सावळे..

शिरा उठून दिसणारे 

पुस्तक घट्ट धरलेले 

त्या हातांकडे पाहताना तिला अचानक एक विचित्र विचार मनात आला.

हे हात...

तिने फाईलमध्ये वाचलेल्या माणसाचे हात वाटत नव्हते.

तिने अनेक गुन्हेगार पाहिले नव्हते.

पण हिंस्रतेबद्दल वाचलं होतं.

मानसशास्त्राचा अभ्यास केला होता.

तरीही...

या माणसाबद्दल तिचं मन निष्कर्ष काढायला तयार होत नव्हतं.

आणि संशोधनात हीच गोष्ट सर्वात धोकादायक असते.

जेव्हा विषय तुमच्या निरीक्षणाचा भाग राहत नाही...

आणि तुमच्या विचारांचा भाग बनतो.


शर्वाणी जेलच्या मुख्य गेटमधून बाहेर पडून फोनवर बोलत काही अंतर पुढे आली.

अचानक मागून जाधवांचा आवाज आला.

"मॅडम..."

ती थांबली.

"एक गोष्ट सांगू?"

"हो."

जाधव काही क्षण गप्प राहिले.

जसं सांगावं की नाही याचा विचार करत होते.

मग म्हणाले,

"फाईलमधले कैदी क्रमांक ४१२ ...जास्त वेळ वाया घालवू नकात. ते काहीही बोलणार नाहीत."

जाधवांच्या तोंडून एका कैद्यासाठी आदरार्थी ऐकून शर्वाणीच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या. तरीही तिने विचारलं, 

"का?"

जाधवांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव उमटला.

आदर... की खंत... ते ओळखता येत नव्हतं.

"कारण ते फक्त कैदी क्रमांक ४१२ नाहीत मॅडम."

"ते.....इन्स्पेक्टर सरताज सिंग होते ."

शर्वाणी अक्षरशः स्तब्ध झाली.

क्षणभर तिच्या कानांवर विश्वासच बसला नाही.

"पोलीस अधिकारी?"

जाधवांनी मान हलवली.

मग लगेच पुढे म्हणाले,

"आणि प्रामाणिक अधिकारी."

"बाकी..."

"सध्या तरी मी यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही.... पुढे बघू....."

"अजून एक मॅडम.... हवालदार पाटील तुम्हाला अजून जास्त सांगू शकतील. ते सुट्टीवर आहेत सध्या."

तेवढं बोलून ते निघून गेले.

शर्वाणी मात्र जागच्या जागी उभी राहिली.

तिच्या हातात अजूनही नोटबुक होतं.

पण त्या क्षणी तिच्या संशोधनाचे सगळे प्रश्न बाजूला पडले होते.

तिच्या डोळ्यांसमोर फक्त एकच चित्र उभं होतं.

खिडकीच्या उजेडात दिसलेले राकट हात.

हातातलं पुस्तक.

आणि जगाशी बोलणं सोडून दिलेला माणूस.

इन्स्पेक्टर सरताज सिंग.


To be continued......

                       *****************