सरताज... कथा वेड्या प्रेमाची - भाग 1 Likhasa द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सरताज... कथा वेड्या प्रेमाची - भाग 1

भाग १


"शर्वाणी, पुन्हा रात्रीचे दोन वाजलेत."

आईचा आवाज आला तशी शर्वाणीने लॅपटॉपवरून नजर वर केली.

टेबलवर पुस्तकांचा, कागदांचा आणि नोट्सचा अक्षरशः पसारा झाला होता. कॉफीचा कप कधीच रिकामा झाला होता. स्क्रीनवर अजूनही तोच दस्तऐवज उघडा होता.


"गुन्हा, शिक्षा आणि अपराधभाव : एक मानसशास्त्रीय अभ्यास"


शर्वाणीने कपाळ चोळलं.

"हो आई... पाच मिनिटं."

आई तिच्या खोलीत आली. टेबलवरचे कागद बघितले आणि नेहमीसारखीच हसली.

"हे पाच मिनिटं मागच्या दोन तासांपासून ऐकतेय मी."

शर्वाणी हसली.

"उद्या जेलमध्ये जायचं आहे. पहिल्यांदाच "

आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

"झोप आता. उद्या फ्रेश डोक्याने जा."

शर्वाणीने मान हलवली. आई आत गेली. पण तिची नजर पुन्हा स्क्रीनवर स्थिरावली. तिने दस्तऐवज बंद केला आणि बाजूला ठेवलेल्या फाईलकडे हात वाढवला. उद्या भेटायच्या कैद्यांची यादी.

एकामागून एक नावं.

वय.

गुन्हा.

शिक्षा.

तिने सहज पानं उलटली.

शर्वाणी काही क्षण त्या नावांकडे बघत राहिली.

नंतर फाईल बंद करून बाजूला ठेवली.


दुसऱ्या दिवशी सकाळ.

तुरुंगाचे प्रचंड लोखंडी दरवाजे उघडताना झालेला आवाज शर्वाणीच्या अंगावर काटा आणून गेला. बाहेरच्या जगात हा फक्त एक आवाज असता. इथे मात्र... तो स्वातंत्र्य आणि कैद यांच्या मधली रेषा वाटत होता. जेलर तिच्यासोबत चालत होते.

"मॅडम, तुमच्या संशोधनासाठी परवानगी मिळाली आहे. पण काही नियम आहेत."

"हो."

"कैद्यांशी अंतर ठेवा. काही वैयक्तिक माहिती देऊ नका. आणि कुणी सहकार्य केलं नाही तर जबरदस्ती करू नका."

"ठीक आहे."

त्यांनी पहिला कॉरिडॉर पार केला. लोखंडी गज. सिमेंटच्या भिंती. ओलसरपणाचा वास. कुठेतरी भांड्यांचा आवाज. कुठेतरी कोणाचं हसणं. कुठेतरी शिव्या. सगळं काही एकत्र मिसळून एक विचित्र वातावरण तयार करत होतं. जेलर तिला वेगवेगळ्या कैद्यांकडे घेऊन जाऊ लागले.

कुणी स्वतःहून बोलायला उत्सुक.

कुणी स्वतःला निर्दोष म्हणणारा.

कुणी आपल्या पश्चात्तापाच्या कथा सांगणारा.

शर्वाणी नोट्स घेत होती. प्रश्न विचारत होती. निरीक्षण करत होती.

पण हळूहळू तिला जाणवायला लागलं... बहुतेक लोक बोलत होते.

कधी खरं. कधी खोटं. पण बोलत होते. शब्दांच्या मागे स्वतःची बाजू मांडत होते. स्वतःला वाचवाचवायचा विनाकारण प्रयत्न करत होते.

स्वतःला सिद्ध करत होते. माणसं अशीच असतात. कोणीच स्वतःला खलनायक मानत नाही.

दुपारच्या सुमारास जेलर एका वेगळ्या विंगमध्ये वळले. इथे वातावरण बदललं होतं. आवाज कमी झाले होते. कॉरिडॉर अधिक शांत झाला होता.

"हाय सिक्युरिटी बॅरेक." जेलर म्हणाले.

"इथे काही कैदी आहेत जे फारसे मिसळत नाहीत."

शर्वाणीने मान हलवली. ती चालत राहिली. मग अचानक जेलर एका कोठडीसमोर थांबले. काही बोलले नाही. फक्त नजरेने आत दाखवलं.

शर्वाणीने गजांआड पाहिलं. आणि प्रथमदर्शनी...तिला तिथे कोणी आहे हेच कळलं नाही. कोठडीच्या एका कोपऱ्यात खिडकी होती. त्या खिडकीतून येणारा उजेड जमिनीवर पडला होता. त्या उजेडाच्या चौकटीत...फक्त हात दिसत होते.

सावळसर. मनगटावर उठून दिसणाऱ्या शिरा.

बोटांमध्ये धरलेलं पुस्तक.

पान उलटण्याची संथ हालचाल.

एवढंच. बाकी सगळं सावलीत हरवलं होतं. शर्वाणी नकळत काही क्षण तशीच उभी राहिली.

"सरताज सिंग."

जेलरचा आवाज आला. पुस्तकाचं पान उलटलं. पण दुसरी कोणतीही हालचाल झाली नाही.

"मिस्टर सरताज?"

शर्वाणीने हाक मारली.

काहीच प्रतिसाद नाही.

"मी शर्वाणी. संशोधनासाठी आले आहे."

शांतता.

तिने पुन्हा प्रयत्न केला.

"मला काही प्रश्न विचारायचे आहेत."

काहीच प्रतिक्रिया नाही.

तिला क्षणभर वाटलं कदाचित त्याने ऐकलंच नसेल. पण नाही... त्या हाताच्या पकडीत झालेला अगदी क्षीण बदल सांगत होता...

त्याने ऐकलं होतं. आणि दुर्लक्ष केलं होतं.

"तो बोलत नाही." जेलर सहज म्हणाले.

"म्हणजे?"

"म्हणजे बोलत नाही."

"कधीपासून?"

"आठवत नाही."

शर्वाणीने त्याच्याकडे पाहिलं.

"कोणाशीच नाही?"

"कोणाशीच नाही."

तिची नजर पुन्हा कोठडीत गेली. तो अजूनही पुस्तक वाचत होता.

जणू त्यांच्या अस्तित्वाचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता.

"मी फक्त काही प्रश्न विचारणार आहे."

शांतता.

"तुम्हाला इथे किती वर्षं झाली?"

.......शांतता.

"तुमचा दिवस कसा जातो?"

.......शांतता.

"तुम्ही एवढं वाचन का करता?"

.......शांतता.

जेलर हसले.

"मॅडम, वेळ वाया घालवू नका."

पण शर्वाणी तिथून हलली नाही. तिला काहीतरी विचित्र जाणवत होतं.

तो माणूस तिला मुद्दाम दुर्लक्षित करत होता. पण त्याचवेळी...तो पूर्णपणे तुटलेलाही वाटत नव्हता. तिने नोटबुक उघडलं. काही टिपणं लिहायला सुरुवात केली. वेळ गेला. कॉरिडॉरमधून काही कर्मचारी गेले. काही कैद्यांचे आवाज आले. पण त्या कोठडीतली शांतता तशीच राहिली.

आणि तेव्हाच...

शर्वाणीच्या हातातून पेन निसटलं. जमिनीवर पडलं. पेन बॅरेक च्या आत जाऊन पडलं. पेनच्या धातूच्या टोपणाचा कॉरिडॉरमध्ये आवाज घुमला. 

क्षणभर.....फक्त क्षणभर.

पण पुस्तकाची हालचाल थांबली. शर्वाणीची नजर सरताजकडे गेली.

पहिल्यांदाच....खिडकीच्या उजेडातून एक उंच आकृती पुढे सरकली.

रुंद खांदे. 

चेहऱ्यावर विस्कटलेले वाढलेले केस.

दाढीची अस्पष्ट रेष.

अंधारातून बाहेर आलेला फक्त काही सेकंदांचा आकार.

त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं. जमिनीवर पडलेल्या पेनकडे.

आणि पुढच्याच क्षणी...

तो पुन्हा मागे गेला.

सावलीत.

जिथे त्याचा चेहरा पुन्हा हरवून गेला.

शर्वाणी तशीच उभी राहिली. का कोण जाणे...पण त्या काही सेकंदांनी तिच्या मनात काही प्रश्न निर्माण केला होते.

जर त्याला कोणाशीच काही देणंघेणं नसेल...

तर तो अजूनही पुस्तकं का वाचतो?

जर त्याने जगाशी नातं तोडलं असेल...

तर प्रत्येक पान इतक्या लक्षपूर्वक का वाचतो?

जर तो पूर्णपणे हरला असेल...

तर अजूनही स्वतःला जिवंत का ठेवतो?

"चला मॅडम." जेलरचा आवाज आला.

"बाकी बॅरेकही बघायच्या आहेत."

शर्वाणीने नजर हटवली. नोटबुक बंद केलं. आणि पुढे निघाली. पण दिवस संपेपर्यंत...वेगवेगळ्या कैद्यांच्या मुलाखती घेतानाही...वेगवेगळ्या नोट्स लिहितानाही...

तिच्या डोक्यात वारंवार तोच उजेडाचा चौकोन येत राहिला.

ते हात.

ते पुस्तक.

आणि.... काही सेकंदांसाठी सावलीतून बाहेर आलेली ती उंच आकृती.

काही माणसं त्यांच्या शब्दांनी लक्षात राहतात.

काही त्यांच्या कृतींनी.

पण सरताज सिंग?

तो तर तिच्या लक्षात राहिला होता त्याच्या शांततेमुळे.

आणि तेच तिला सर्वात जास्त अस्वस्थ करत होतं.

कारण शांतता कधीच रिकामी नसते.

तिच्यामागे नेहमी एखादी गोष्ट दडलेली असते.

प्रश्न एवढाच होता...

सरताज सिंगच्या शांततेमागे नक्की काय दडलं होतं?

ती  निघून गेली. पण जाताना एक गोष्ट पाहिली.....

सरताजने संपूर्ण वेळ तिच्याकडे पाहिलेलंही नव्हतं.


तरीही...

पेन खाली पडल्यावर त्याची नजर क्षणभर त्या आवाजाकडे वळली होती. म्हणजे तो पूर्ण तुटलेला नाही. तो सगळं पाहतो आहे. फक्त प्रतिसाद देत नाही.

शर्वाणी जेलच्या बाहेर उभी होती. तिने हातातली फाईल पुन्हा बघितली.

त्यावर लिहिलेलं होतं.

कैदी क्रमांक ४१२ — सरताज सिंग

तिने पुढच्या पानावर टिपण लिहीलेलं होतं.

"आज मुलाखत झाली नाही....

पण हा माणूस माझ्या संशोधनातील सर्वात महत्त्वाचा विषय ठरू शकतो."

संध्याकाळी घरी परतल्यावर तिने बॅग बाजूला ठेवली. लॅपटॉप उघडला.

आजच्या निरीक्षणांच्या नोट्स लिहायला सुरुवात केली.

एकामागून एक कैद्यांची नोंद.

निरीक्षणं.

टिप्पण्या.

मग शेवटी...

ती एका नावापाशी थांबली.

कैदी क्रमांक ४१२ — सरताज सिंग

काही क्षण कर्सर तसाच चमकत राहिला.

मग तिने लिहिलं....

"मुलाखत झाली नाही.

प्रतिसाद मिळाला नाही.

निरीक्षणासाठी पुरेसा संवाद झाला नाही."

ती थांबली.

पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं.

आणि आणखी एक ओळ टाइप केली.

"तरीही...

या कैद्याकडे पुन्हा जाण्याची गरज आहे."

शर्वाणी स्वतःच त्या वाक्याकडे काही क्षण पाहत राहिली.

कारण...तिच्याकडे त्याचं कारण नव्हतं. अजून तरी नव्हतं.

पण त्या दिवसात पहिल्यांदाच...

तिला तिच्या संशोधनात एक असा प्रश्न मिळाला होता...

ज्याचं उत्तर फाईलमध्ये नव्हतं. तिने फाईल बंद केली.

खिडकीबाहेर रात्रीचा अंधार पसरला होता.

पण तिच्या संशोधनात आज पहिल्यांदाच एक असं दार उघडलं होतं ...

ज्याच्या पलिकडे फक्त प्रश्न होते......उत्तरं नव्हती.

शांभवीच्या मनात रात्रीच्या शांततेत एक विचार अलगद उमटला...

"लोक शांत राहतात तेव्हा त्यांच्याबद्दल सर्वात जास्त जाणून घ्यावंसं वाटतं. कारण शब्द लपवता येतात. शांतता नाही."

तिला तेव्हा कल्पनाही नव्हती... की हा अभ्यास फक्त एका कैद्याच्या मानसिकतेचा राहणार नव्हता. तो एका उद्ध्वस्त आयुष्याच्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास ठरणार होता.



To be continued......

                          *******************