Village operation books and stories free download online pdf in Marathi

गावठी ऑपरेशन

गावठी  आप्रीशन  भाग १

 

              वीस जूनला मिशाळ साहेबांची बदली झाली आणि जमालुद्दीन रऊफकडे बीडीओ पदाचा चार्ज आला. त्यानंतर पाच दिवसांनी देशात आणीबाणी लागू झाली. सीईओ साहेबांनी सर्व तालुका स्तरावरच्या क्लास वन / क्लास टू अधिकारी वर्गाला मीटिंगमध्ये सरकारच्या बदललेल्या धोरणानुसार कर्मचारी वर्गाने कोणती दक्षता घ्यायला हवी याची कल्पना दिली. तसेच कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत तालुका निहाय स्त्री-पुरुष कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे टारगेट ठरवून दिले. रऊफ साहेबाला पदोन्नती मिळवायची असल्यामुळे तो जिद्दीने कामाला लागला. तालुक्यातल्या सर्व ग्रामसेवकांची यादी मागवून घेऊन त्यातले अविवाहित उमेदवार वगळता उर्वरित अगदी वर्ष-दोन वर्षांत निवृत्त होऊ घातलेल्या ग्रामसेवकांना टाक्याची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी बळजबरी सुरू केली. ज्यांचे राजकीय लागेबांधे होते त्यांनी नाना लटपटी-खटपटी करून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया टाळण्याचे शिकस्तीचे प्रयत्न सुरू केले.

                    काही ग्रामसेवकांना एकच मुलगी होती त्यांनी साहेबाला भेटून मुलगा होण्यासाठी आणखी एक अपत्य होण्याची संधी मिळावी, त्यानंतर आपण शस्त्रक्रिया करून घेऊ अशा विनवण्या केल्या. पण रऊफ साहेबाने कोणाचीच गय केली नाही. अर्थात मुस्लिम ग्रामसेवकांना शस्त्रक्रियेतून सूट देण्यात आली होती. या दुटप्पी धोरणामुळे ग्रामसेवक चिडलेले होते. पण त्यावेळी असा माहौल होता की थोडाही विरोध केला तरी अटक करून स्थानबद्ध करण्याची दहशत होती. म्हणून नोकर वर्ग मूग गिळून गप्प बसला होता. ऑपरेशन तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रात करावयाचे असल्यामुळे बीडीओ साहेबांची जीप आणि आरोग्य केंद्रातली जीप संबंधित गावांमध्ये पाठवून तिथून ग्रामसेवकांना आणणे व ऑपरेशन झाल्यावर संध्याकाळी पुन्हा गावात नेऊन पोहोचवणे ही चोख सुविधा ठेवलेली होती. आणीबाणीत गावोगावी विरोधकांना अटक करून स्थानबद्ध केले जात होते. त्या गोष्टीची लोकांनी एवढी दहशत घेतली होती की जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात जवळजवळ नव्वद टक्के टारगेट पूर्ण होत आलेले होते. ज्यांचे राजकीय लागेबांधे होते असे काही महाभाग अजून बिचलेले नव्हते. रऊफ साहेबाने अद्याप शस्त्रक्रिया न केलेल्यांची बित्तंबातमी काढून त्या ग्रामसेवकांच्या भेटी घेऊन धाक दपटशा सुरू केला. त्यांच्यापैकी फक्त दोघा-तिघांच्या पाठीराख्या आमदार-खासदारांनी रऊफ साहेबाला फोन करून संबंधितांना सूट देण्याची गळ घातली.

              स्वतः रऊफ साहेबाचे अंतुले साहेबांपर्यंत हात पोहोचलेले असल्यामुळे फोन करणाऱ्या आमदार-खासदारांना त्यांचा वकूब बघून अंतुले साहेबांचे नाव पुढे करून प्राप्त परिस्थितीत आपल्यावर वरून दट्ट्या असल्यामुळे आपला नाईलाज आहे असे सांगून सरळ पळ काढला. महिना अखेर पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या संदर्भात प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा आयोजित केलेली होती. तो मौका साधून प्राथमिक शिक्षकांना वेठीला धरून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घ्यायची सक्ती करायचे रऊफ साहेबाने योजलेले होते. तालुका स्कूलमध्ये सभेचे आयोजन केलेले होते. साडेदहा वाजता तालुका मास्तरांचा निरोप आला. पण त्या वेळी अन्य काही कामासंदर्भात व्हिजिटर आलेले असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा वगैरे आटोपल्यावर उशिराने पावेणेबारा वाजता रऊफ साहेब तालुका 

स्कूलमध्ये पोहोचले.

                    क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी फंडिंगचा प्रश्न आल्यावर रऊफ साहेबाने पंचायत समितीकडे पुरेसा निधी नसल्यामुळे तालुक्यातल्या सर्व शिक्षकांकडून स्वेच्छा वर्गणी स्वरूपात रक्कम मासिक पगारातून कापून घेण्याची सूचना केली. त्यावर शिक्षक संघटनेचे बांदकर मास्तर संतापले. ते गाबीत समाजाचे आणि जिल्हा मच्छिमार संघाच्या कार्यकारणीत असल्यामुळे त्यांची मोठी वट होती. त्यांनी निम्मे खर्च पंचायत समितीच्या फंडातून व निम्मे प्राथमिक शिक्षकांकडून स्वेच्छा वर्गणी रूपाने घ्यावी अन्यथा संघटना विरोध करील असे उघड उघड आव्हान दिले. त्यावर आवाज चढवीत "संघटना वगैरेना मी मोजित नाही, तुम्ही शिक्षक आहात, अपनी औकात में रहना... वरना सबक सिखाना पडेगा", म्हणून खुलेआम धमकी दिली. बांदकरांना संघटनेच्या जीवावर अरेरावी करायची सवय होती. त्यांनी कायद्याची भाषा करीत, "तुम्ही स्वेच्छा वर्गणी मासिक वेतनातून कापून घ्यायचा लेखी आदेश दिलात तरच त्याची अंमलबजावणी होईल, अन्यथा आमचा विरोध राहील," असे स्पष्ट सांगून टाकले. तालुका मास्तरांनी काहीतरी रदबदली करीत तो विषय थांबवला.

                      सालाबादप्रमाणे क्रीडा समितीचे गठन करून झाल्यावर रऊफ साहेबाने कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या विषयाला हात घातला. ज्या शिक्षकांना दोन अथवा तीन अपत्ये आहेत पण ज्यांनी अद्याप शस्त्रक्रिया करून घेतलेली नाही त्यांनी तात्काळ ती करून घ्यावी. अन्यथा या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग न दिल्याबद्दल संबंधितांविरुद्ध खातेनिहाय चौकशी करून शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. केंद्र सरकारचे तसे स्पष्ट आदेश असून उच्चस्तरावरून आम्हा अधिकारी वर्गावर कडक निबंध घालण्यात आलेले आहेत. तालुका मास्तरांनी येत्या चार दिवसांत युद्ध पातळीवर काम करून अद्याप शस्त्रक्रिया न केलेल्या शिक्षकांच्या याद्या तयार करून आमच्या कार्यालयात सादर कराव्यात, अशी बजावणी केली.

           यावरही बांदकर मास्तरांनी,"आजची सभा ही क्रीडा स्पर्धांच्या नियोजना संदर्भात असून आजच्या अजेंड्यावर राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा विषय नाही. सबब बीडीओ साहेबांनी त्या संदर्भात स्वतंत्र सभा आयोजित करावी. तोपर्यंत शिक्षक याद्या तयार करणे तालुका स्कूलवर बंधनकारक असणार नाही." आता मात्र रऊफ साहेबांचा संयम संपला. जरबेच्या आवाजात ते म्हणाले, "आम्ही तालुका मास्तरांना आदेश दिलेले आहेत त्याचे पालन करणे न करणे त्यांचे त्यांनी ठरवावे..." असे बोलून रऊफ साहेब उठून मार्गस्थ झाले.

                     दुसरे दिवशी अकरा वाजता दोन पोलीस कॉन्स्टेबल तालुका स्कूलमध्ये दाखल झाले आणि बांदकर मास्तरांना अटक करून घेऊन गेले. तालुका मास्तरांसह सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. पाच मिनिटांत तालुका मास्तर भानावर आले आणि बीडीओ साहेबांनी कालच्या सभेत दिलेल्या आदेशाप्रमाणे सहकारी शिक्षकांना शाळा निहाय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया न केलेल्या शिक्षकांची माहिती मागवण्यासाठी परिपत्रके पाठवण्याच्या कामाला जुंपले. तालुक्यातल्या बहुसंख्य गावांनी त्याकाळी संध्याकाळी वसतीच्या गाड्या सुटत. संबंधित गावात वसती करून सकाळी त्या गाड्या तालुक्याच्या ठिकाणी परत येत असत. शाळांना पाठवायचे टपाल त्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या लोकांकरवी पोहोच केले जात असे. प्रत्येक गावात मध्यवर्ती असणाऱ्या शाळेला केंद्र शाळा म्हणत. त्या शाळेत टपाल पोहोचले की तिथले मुख्याध्यापक गावातल्या इतर शाळांना वितरित करण्याचे काम करीत. तालुक्याला पाठवायचे टपालही केंद्र शाळेत जमा व्हायचे आणि तिथून ते सकाळी सुटणाऱ्या एसटीने तालुक्याला रवाना केले जायचे. रोज संध्याकाळी आणि सकाळी तालुका स्कूलमधला शिपाई गाड्यांच्या वेळेवर मुख्य चौकात उभा राहून टपाल देणे आणि घेणे हे काम करायचा. संपर्क सुविधा दुस्तर असलेल्या त्या काळात ही व्यवस्था एवढी चोख आणि विनामूल्य होती की, तालुक्यावरून शाळा-शाळांना पत्रे रवाना झाली नी तिसऱ्या दिवशी बहुसंख्य शाळांकडून याद्या आल्यासुद्धा.

इतर रसदार पर्याय