इच्छा आणि वास्तव
माणसाचे आयुष्य म्हणजे इच्छा आणि वास्तव यांच्यात चालणारा एक अखंड प्रवास.माणसाच्या मनात असंख्य इच्छा जन्म घेत असतात. काही इच्छा अगदी छोट्या असतात, तर काही आकाशाला गवसणी घालणाऱ्या प्रत्यक्षात अशक्यप्राय असतात. काही स्वतःसाठी असतात, काही कुटुंबासाठी, तर काही आपल्या माणसांच्या आनंदासाठी. या इच्छांच्या जोरावरच माणूस मोठी स्वप्ने पाहतो, ध्येय ठरवतो आणि आयुष्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो.
इच्छा असणे यात काहीच गैर नाही. उलट इच्छा नसतील तर जगण्यातली उमेदच हरवून जाईल. इच्छा माणसाला जगण्याची प्रेरणा देतात. उद्याचा दिवस आजपेक्षा चांगला असावा, आपल्याला जे मिळाले नाही ते मिळवता यावे, जे अपूर्ण राहिले ते पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा प्रत्येकाच्या मनात असते. मात्र प्रश्न निर्माण होतो तो इच्छांच्या आणि वास्तवाच्या संघर्षाचा!
आपण मनाशी काहीतरी ठरवतो, त्याची स्वप्ने रंगवतो; पण प्रत्यक्षात घडते ते मात्र अनेकदा वेगळेच. आपल्याला हवे असते एक आणि मिळते दुसरेच. आपण आखलेला मार्ग सरळ असतो, पण वास्तवात अनेक वळणे, अडथळे आणि अनपेक्षित प्रसंग समोर येतात. आपल्या इच्छांवर आपले नियंत्रण असते; पण वास्तवावर नेहमीच आपले नियंत्रण असेल असे नाही. परिस्थिती, काळ, माणसे, नशीब आणि अनेक अनपेक्षित घटना आपल्या आयुष्याची दिशा बदलत असतात.
इच्छा आणि वास्तव यांच्यातील हे अंतर जितके मोठे, तितकी मनाची घालमेल अधिक. अपेक्षाभंग झाला की निराशा येते. आपण केलेल्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाले नाही की स्वतःवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. आपल्या व इतरांच्या आयुष्याशी तुलना सुरू होते. आपल्याला जे मिळाले नाही तेच अधिक महत्त्वाचे वाटू लागते आणि जे मिळाले आहे त्याचे मोलही कमी होऊ लागते.
खरे तर वास्तव स्वीकारणे म्हणजे इच्छांचा त्याग करणे नव्हे. उलट वास्तवाची जाणीव ठेवून इच्छांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे. आपल्या क्षमता, मर्यादा आणि परिस्थिती यांचे भान ठेवून ध्येय ठरवता आले पाहिजे. जे आपल्या हातात आहे त्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत आणि जे आपल्या आवाक्याबाहेर आहे ते स्वीकारण्याची मानसिक तयारीही ठेवावी.
आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी घडेलच असे नाही. काही गोष्टी आपल्या प्रयत्नांनी साध्य होतात, काही काळाच्या ओघात जुळून येतात, तर काही गोष्टी कायम अपूर्ण राहतात. पण म्हणून आयुष्य थांबत नाही. एखादे स्वप्न अपूर्ण राहिले म्हणून जगण्यातील आनंद संपत नाही. कधी कधी एखादी इच्छा अपूर्ण राहणेही आपल्याला नव्या वाटा दाखवून जाते.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इच्छांना मर्यादा असाव्यात. एका इच्छेची पूर्तता झाली की दुसरी इच्छा जन्म घेते. अपेक्षांचे हे चक्र कधीच संपत नाही. अधिक पैसा, अधिक प्रतिष्ठा, अधिक सुखसोयी, अधिक मानमरातब यांच्या मागे धावताना आपल्याजवळ असलेल्या समाधानाच्या क्षणांकडे दुर्लक्ष होते. जे मिळाले आहे त्याचा आनंद घेण्यापेक्षा जे मिळाले नाही त्याची खंत अधिक वाटू लागते. अशा वेळी इच्छांपेक्षा समाधानाचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे.
वास्तव कधीकधी कठोर असते, पण ते आपल्याला जगण्याचे धडेही देत असते. प्रतिकूल परिस्थिती माणसाला अधिक सक्षम बनवते. अपयशातून शिकण्याची संधी देते. अपेक्षाभंगातून समजूतदारपणा येतो आणि अनुभवातून इच्छांना योग्य दिशा मिळते.
मला वाटते, आयुष्य सुंदर होण्यासाठी इच्छा आणि वास्तव यांच्यात समतोल असणे आवश्यक आहे. इच्छा माणसाला पुढे जाण्याची ऊर्जा देतात, तर वास्तव त्याला जमिनीवर ठेवते. इच्छांच्या पंखांनी आकाशात भरारी घ्यावी, पण वास्तवाचे भानही सोडू नये.
शेवटी, आयुष्य म्हणजे केवळ इच्छांची पूर्तता नव्हे आणि वास्तवाशी केलेली तडजोडही नव्हे. तर इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न, अपूर्ण राहिलेल्या इच्छांचा स्वीकार आणि जे मिळाले आहे त्यात आनंद शोधण्याची वृत्ती म्हणजे खरे जगणे!
कारण आयुष्य आपल्या इच्छेप्रमाणे घडले तर आनंद मिळतोच; पण वास्तवाला आनंदाने सामोरे जाता आले तर समाधानही मिळते!
जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम समाधानी होणे आवश्यक आहे.
- प्रल्हाद दुधाळ