Sunn - a rude shadow books and stories free download online pdf in Marathi

सुन्न - एक अभद्र सावली

सुन्न -एक अभद्र सावली ( भयकथा) मी नेहमी प्रमाणे गावी आलो की रोज सायंकाळी बंदरावर जाऊन बसतो. इथे वेळ सहज निघून जातो.भन्नाट वारा...समोर उसळणाऱ्या फेसाळ लाटा...रंगीत ढग , मासेमारीसाठी जा ये करणा-या होड्या.संध्याकाळी बंदरावर ताजे मासे खरेदी करण्यासाठी एकच गर्दी उसळलेली असते. दरात घासाघासी करून लोक प्रॉन्स, पापलेट ,सौंधाळे ,बांगडे किरकोळ किंवा घाऊक मध्ये खरेदी करत असतात.आजही मी असाच कठड्यावर बसून समोरचे मनोहर दृश्य न्याहाळत बंदरावर बसलो होतो.तेवड्यातच माझं लक्ष बाजूला बसलेल्या इसमाकडे गेले.मी प्रचंड दचकलो.त्याच वय पन्नाशीच्या आसपास असावं.तो खूप थकलेलावाटत होता.त्याचे केस अस्ताव्यस्त होते. डोळे निस्तेज व शून्यात स्थिरावल्या सारखे वाटत होते.पण माझ्या दचकण्याचे कारण वेगळेच होते. त्या माणसाच्या हातांच्या शिरांकडे माझं लक्ष वेधलं गेले होते.त्याच्या हाता वरच्या शिरा जाड व फुगलेल्या होत्या. त्यांचा रंग खूपचनिळा जांभळा होता.त्या शिरा सारख्या स्फुरण पावत होत्या.त्या शिरा साप (?) वळवळतो तश्या वळवळत होत्या.तो इसम सारखा उसासे टाकत होता. कदाचित तो खूप मानसिक तणावाखाली जगत असावा." आपलं नाव काय?" मी त्याला विचारले.पहिल्यांदा तो गप्प राहिला.बहुधा तो बोलायला तयार नव्हता." वेंगुर्ले येथील आहात का?" मी पुन्हा चिकाटीने विचारले." नाही, वायंगणी येथे राहतो..दाभोलीच्या थोडं पुढे."" मी , वेंगुर्ले कुबलवाडा येथील आहे.पण मी मुंबईला एका हायस्कूल मध्ये शिक्षक आहे."" बंदरावर आल्यावर सगळं विसरायला होतं नाही का?"तो म्हणाला." हो तर." मी म्हणालो.माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे मी बाजूला बसल्यावर त्या वळवळणा-या शिरा स्थिर झाल्या होत्या.काही वेळाने तो उठून गेला. अर्थात जाई पर्यंत त्याने आपले नाव सांगितले नव्हते.पण मी मात्र पार अंधार पडेपर्यंत बसून होतो.तो प्रसन्न वारा मला रोमांचित करत होता.सध्या दिवाळी असल्याने रोषणाईने परीसर उजळला होता.अगदी सागरेश्वर...मोचेमाड इथले लुकलुकणारे दिवे मस्त दिसत होते. मुंबईत मी संमोहन क्लिनिक चालवतो.आजपर्यंत मी अनेकांना नैराश्यातून बाहेर काढले होते.तसेच हे काम करत असताना मला बरेच चमत्कारीक प्रसंगांना सामोरे जावे लागले होते.संध्याकाळी आठ वाजता मी किना-यावरून उठलो.मोटरसायकल स्टार्ट करणार एवढ्यातच फोनची रिंग वाजली.फोन नंबर अनोळखी  होता.मी नाईलाजाने फोन उचलला." हॅलो, कोण बोलतोय, बोला."" मंथन,मी रितेश गवंडी बोलतोय."रितेश हा माझा हायस्कूल मधला वर्गमित्र." बोल,  अरे माझी मोठी बहीण.. सरिता खूप तणावाखाली आहे. लवकर उपाय केले नाहीत तर ती पुढे काय करेल सांगता येणार नाही. तू संमोहन करतोस ना?"मी क्षणभर गप्प राहिलो.खरतर मी विश्रांतीसाठी आणि मनोसोक्त भटकण्यासाठी आलो होतो.पण जुना मित्र आहे शिवाय त्यांची बहीण कोणतेही पाऊल उचलेल असं तो म्हणत होता." ठिक आहे. बघतो मी. पण ती माझ्याघरी येईल का?"" मी घेऊन येईन. उद्या येऊ का?"मी त्याला सकाळी दहा वाजता बोलावले.        दुसर्या दिवशी सकाळी सव्वादहाला बेल वाजली.मी दरवाजा उघडला समोर रितेश व सोबत एक स्त्री उभी होती.खरतर मी त्याच्या बहिणीला लहानपणी पाहिलं होतं.पण आता समोर असलेली स्त्री वेगळी वाटत होती." बसा. "दोघंही बसताच मी त्या स्रीचे निरीक्षण केले. सडपातळ..चेहरा आक्रसलेला...समोरचे केस अकाली पांढरे झालेले... डोळ्याखाली काळी वर्तुळे...नजर शून्यात होती.खरच ती खूपच तणावाखाली होती.शिवाय खूप घाबरलेली वाटत होती." रितेश, ही खरंच तूझी बहिण सरीता आहे?"" हो, खूप बदल झालाय तिच्यात."मी दोघांना बैठकिच्या खोलीत नेले." मी इथे थांबू की बाहेर बसू."" थांब."प्रत्यक्ष संमोहन करण्यापूर्वी मी सरीता कडून काही माहिती जाणून घेतली. तिचे घर वायंगणी इथे आहे.त्या घरातील कुटुंबापैकी गेल्या दोन वर्षात चार जण अचानक मृत्यू पावले होते.तिचे दोन सख्खे दिर तर एकाच दिवशी दोन तासांच्या अंतरात निधन पावले होते.त्यापैकी एक हार्ट ॲटकने तर दुसरे मनस्वास्थ्य बिघडल्याने महिनाभर अस्वस्थ होते आणि नंतर भाऊ मृत्यू पावला याने ताण घेऊन किंवा घाबरून मृत्यू पावले होते.मृत्यूवेळी त्यांचे डोळे विस्फारलेले दिसत होते.त्यापूर्वी एक वर्ष आधी सासरे व एक काका निधन पावले होते.आता तिला सतत वाटत होते की आता तिच्या नव-याचा किंवा तिचा नंबर आहे.याच मृत्यूच्या भितीच्या सावलीत ती वावरत होती.मला असं वाटलं की ती काही तरी सांगायचे टाळत आहे.मी काही न बोलता तिला संमोहित करायला सुरुवात केली.तिला सर्व शरीर रिलॅक्स करायला सांगितले.सूचना देत तिला संमोहनाच्या दुस-या अवस्थेत नेलं. " ताई, तुमचे मिस्टर व तुमच्या मध्ये काही भांडण झालय का?" मी हलकेच विचारले." भांडण असं नाही.पण मुलगा दारु घेतो म्हणून ते सतत ओरडत असतात.पण मी मुलाला सावरून घेते म्हणुन तेचिडचिडेपणा करतात."मी हळूहळू पासेस टाकत तिला संमोहनाच्या तिसऱ्या अवस्थेत नेलं.तिचे डोळे गच्च मिटलेले होते." ताई, तुम्हाला आणखी कशाची तरी भिती वाटते का?"तिचे ओठ दोन -तिन वेळा अर्धवट उघडले पण लगेच दोन्ही ओठ एकमेकांवर दाबून धरत ती गप्प राहिली.मी पुन्हा सूचना दिल्या." ताई , तुम्हाला काही तरी सांगायचे आहे.आठवून सांगा घाबरु नका."" म..मला घराच्या आसपास सतत तिनं माणसे दिसतात व ती अचानक नाहीशी होतात."" कोण माणसं ? कशी दिसतात.?"" एक पुरुष,एक बाई व एक छोटा मुलगा.सगळे काळ्याकुट्ट रंगाचे." सरीता म्हणाली." ती काही बोलतात. काही करतात.?"" नाही. पण त्यांची नजर भयानक व विखारी दिसते."" ठिक आहे.तुम्ही अजिबात घाबरू नका.मी तुमच्या सोबत आहे.आता तुम्हाला खूप बरं वाटेल." काही क्षणांनंतर रिव्हर्स पासेस देत मी तिला संमोहनातून बाहेर काढले. मनातली भिती बोलून टाकल्यामुळे तीचा चेहरा ब-यापैकी उजळला होता.रितेश मात्र तिने सांगितलेली गोष्ट ऐकून हादरला होता.मी दोघांना थंडगार सरबत दिलेसरीताच्या दोन समस्या होत्या.एक तिच्या किंवा कुटुंबातल्या कुणाची तरी मृत्यूची भिती आणि दुसरी म्हणजे घराच्या आसपास दिसणारी तिनं अज्ञात माणसे.या दोन्ही समस्या एकमेकांशी संबंधित तर नाही ना?मृत्यूची भिती हा मानसिक भाग होता जो सगळ्यांमध्ये असतो पण तिला खरंच ती माणसे दिसत होती की भास होत होता ... हे शोधणे गरजेचे होते." ताई, तुम्ही सोडून अजून कुणाला ती तिनं माणसं दिसली आहेत का?"सरीता दचकली.डोळे विस्फारून ती माझ्याकडे पाहत राहिली.( संमोहनाच्या अवस्थेत आपण काय सांगितलेते तिला आठवत नव्हते.)क्षणभर थांबून ती म्हणाली.." मला नाही सांगता येणार."   " उद्या मी तुमच्या घरी येतो.चालेल ?"" या.माझ्या मिस्टरांशीही बोल."" रितेश, अजून दोन वेळा ताईला इथं यावं लागेल.तिच्या मनातलं भय मी काढून टाकेन. उद्या तू तिला घेऊन ये.मग आपण तिघही माझ्या कारनं वायंगणीला जाऊ."  मला हे प्रकरण गूढ व गंभीर वाटत होते. सरीताच्या घरी गेल्याशिवाय गूढ उकलले जाणार नव्हते हे नक्की.-----------*******--------*****-------*****  दुस-या दिवशीच्या सेशन नंतर आम्ही तिघे माझ्याच कारने सरिताच्या घरी गेलो. वायंगणी समुद्रकिनारी वसलेले गाव आहे.सतत लाटांचा आवाज कानी पडत होता. कार अलिकडे पार्क करून आम्ही तिच्या घरी गेलो.अरुंद चिंचोळी पाणंद पार करत  घरी पोहोचलो.तिचे घर त्या वाड्याच्या शेवटी होत.छोट पण टुमदार घर बाहेर मोठ अंगण तर पाठीमागे परसदार होत.आम्ही आत शिरलो.समोर खुर्चीत बसलेली व्यक्ती पाहून माझे डोळे विस्फारले.परवा वेंगुर्ले बंदरावर माझ्या बाजूला बसलेलातोच इसम समोर होता.होय...निळ्या जांभळ्या वळवलणाऱ्या शिरांवाला .मी सरिताकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले." माझे मिस्टर जय वायंगणकर."एकाच घरात एक नव्हे दोन पेशंट होते. त्यांनी माझ्याकडे त्रासिक नजरेने पाहिले." आपण परवा बंदरावर भेटलो होतो."मी हसत त्यांना आठवण करून दिली.त्यांनी कळलं अशाअर्थाने मान हलवली.ते बाहेर पडायच्या तयारीत होते.वेंगुर्ले तहसिलदार ऑफिसमध्ये ते एका विभागात सिनिअर क्लार्क होते.मी त्यांच्याकडून फोन नंबर घेतला.आपल्या पत्नी बाबत ते त्रयस्थ असल्यासारखे वाटत होते.ते बाहेर पडल्यावर मी सगळ्या घराचे निरिक्षण केले.घर बाहेरून छान वाटत होतं पण आत प्रकाश व्यवस्था बेताचीच होती... शिवाय मधल्या हॉलमध्ये वर लाकडी माळी होती. त्यामुळे खोल्या अंधा-या व कुबट होत्या.एक उदास नकारात्मक भावना आपोआप तिथे निर्माण होत होती. त्याशिवाय आणखी काहीतरी वेगळं अधिक भयावह तिथे असावं अस मला वाटू लागलं होत." ताई, तुला ते तीन इसम कुठे दिसले होते?"" दोन वेळा मागच्या बाजूच्या खिडकीजवळ...तर एकदाआमच्या झोपण्याच्या खिडकी जवळ."" तिथून ते कुठे गेले?"" मागच्या कुंपणाच्या डाव्या कोपऱ्यात."" साधारण कोणत्या वेळी?"" तिन्ही वेळा, सायंकाळी." " तुमचा मुलगा?"" तो क्रिकेट टूर्नामेंट खेळायला गेला असावा."" ताई, त्याला थोड खडसावा, उद्या हाताबाहेर जाईल.आणि हो उद्या शेवटच सिटिंग आहे या."  मी व रितेश पुन्हा वेंगुर्ल्यात आलो.दिवसभर मीताईच्या केसचा विचार करत होतो.ताईला दिसणारीती तीन माणसं कोण असावीत? काहीच कळत नव्हतं.मी पुन्हा त्या दिवशी सायंकाळी बंदरावर गेलो.नेहमीच्या जागी बसलो.गार समुद्री वाऱ्यामुळं मला थोड बरं वाटलं." मंथन सर!" आवाज आल्याने मी मागे पाहिले.बाजूलाच जय वायंगणकर उभे होते.बहुधा ते रोज इथे येत असावेत.मी सहज त्यांच्या हाताकडे नजर टाकली.आज त्या शिरा अधिकच फुगल्या होत्या व विचित्रपणे उडत होत्या. ते माझ्या बाजूला बसले." मला तुमच्याशी बोलायचं आहे."" बोला." वायंगणकरांनी मला जे सांगितले.त्यावरून ते गेले वर्षभर तणावाखाली वावरत असल्याचे जाणवले.मुलाच व्यसनाधीन होणे.बायकोचे मुलाची बाजू घेणे...तिचं डिप्रेशन मध्ये जाणे ,ऑफिसमध्ये वरिष्ठ जाच आणि वाळू माफियांचा दबाव तर खूपच होता.कारण वाळू काढण्याचं लायसन्स व त्यांच्या अटी ,नियम यांचं टेबल ते हाताळत होते... शिवाय गेले काही महिने तीन साप आपला पाठलाग करताहेत असं स्वप्न त्यांना रोज पडायचे यामुळे ते घाबरून गेले होते.तीन सापांचे स्वप्न पडत हे ऐकून मी विचारात पडलो.सरिताला तीन माणसं दिसत होती. यांना तीन साप स्वप्नात दिसत होते.शिवाय त्यांच्या हातावरच्या शिरा चक्क सापासारख्या वळवळत होत्या.नेमका या सर्व गोष्टींचा अर्थ काय होतो हे मला कळत नव्हते." तीन साप ? "" होय. दोन मोठे तर एक लहान त्यातली एक नागीन असावी असं वाटतं."सरिताला एक पुरुष ,एक स्री व एक लहान माणूस दिसत होता. वायंगणकर यांच्या घरात काहीतरी गूढ व भयावह घडत होतं हे नक्की." तुम्हाला कधी कुणी वेगळी माणसं घराच्या आसपास दिसली काय?"" नाही."  मी जय वायंगणकर यांना काही गोष्टी समजावल्या .ऑफिस मध्ये न घाबरता नियमाला धरुन काम करा कोणीही तुमचं वाकडं करू शकणार नाही हे मी त्यांना सांगितले.मुलाच्या बाबतीत कडकपणा दाखवा वाटल्यास व्यसनमुक्ती संघटनेशी संपर्क करायला सांगितले.बायकोशी समजूतीने वागा.ती सध्या तणावाखाली आहे लवकरच ती यातून बाहेर पडेल याची मी त्यांना खात्री दिली." सर, आज तुमच्याशी बोलून खूप मोकळं वाटतंय."" सगळं ठीक होईल.मी उद्या सायंकाळी तुमच्या घरी येणार आहे. मला एक सांगा तुमच्या हातावरच्या या शिरा एवढ्या का स्फुरण पावत आहेत? तुम्हाला त्याचा काही त्रास होतो का?"त्यांनी चमकून आपल्या हाताकडे पहिले. म्हणजे या पूर्वी ते त्यांच्या लक्षात आले नव्हते काय? की मलाच ते तसं वाटत होत ?" नाही.कोणताच त्रास नाही.थोड्या निळ्या झाल्या एवढच.पण अस का विचारलात?" सहज."    ते गेल्यावर मी विचार करू लागलो. निश्चितच सापांचाइथे काहीतरी संबंध असावा .दुसऱ्या दिवशी मी व रितेश सायंकाळी पाच वाजता वायंगणकरांच्या घरी गेलो. आज जय घरी होते. मी मुद्दाम मागच्या खिडकीकडे तोंड करून उभा होतो.मी मनोमन इच्छा करत होतो की मला ती तीन माणसे दिसावीत.  मी जय यांच्याशी बोलत होतो." हे घर कधी बांधल गेल?"" विस वर्षांपूर्वी."" काही वेगळे असं त्यावेळी घडलं होतं का?"" तसं काही नाही.बाबांनी मूळ घर काकांना सोडून इथे घर बांधले.पूर्वी ही पडिक जमीन होती. इथे मोडावळ करुन नंतर घर बांधलं."  एवढ्यात माझा लक्ष समोरच्या आंब्याखाली उभ्या असलेल्या तीन आकृत्यांकडे गेले. एक पुरुष,एक स्री व लहान मुलगा असे तिघे तिथे उभे होते.मी जयना विचारलं...." तिथं आंब्याच्या झाडाखाली कुणी उभं आहे का?"" नाही.कुणीच नाही."मी रितेशकडे नजर फिरवली पण त्यानेही नाही म्हणून मान हलवली. पण सरिताने मात्र नजरेने होय म्हतले.याचा अर्थ ते तिघे फक्त मला आणि सरितालाच दिसत होते. तेवढ्यात त्या स्त्रीने व पुरुषाने तोंड उघडले व सापासारख्या दोन विखारी लांब जिभल्या बाहेर आल्या.ते दृश्य भयानक होतं.    मी हळूच मागचं दार उघडले व बाहेर पडलो.सरिताताईच्या मनात भय दाटले ती अस्पष्ट कुजबुजली" मंथन, नको, बाहेर नको जाऊस..."तो पर्यंत मी आंब्याच्या झाडाच्या जवळ पोहोचलो होतो.माझी चाहूल (?) लागताच ते तिघे वेगाने तिथून सरकले.पण चालत किंवा पळत नव्हे तर चक्क जमिनीवरून सरपटत होते! डोकं चक्रवणार आणि डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असं ते दृश्य होतं.ते चक्क सापासारखे वेगाने पळत होते.बघता - बघता ते कुंपणाच्या डावीकडे पोहचले.त्यांचे पाय आता शेपटीसारखे वळवळत पळताना दिशा बदलत होते.तर हात फने सारखे डोक्यासमोर एकत्र झाले होते.त्यांच संपूर्ण शरीर काळे ठिक्कर होते... अंगावर भले मोठे खवले होते व त्यांच्या तोंडातून विचित्र असाहिस्स् ...हिस्स्...असा भयावह आवाज येत होता कुंपणाच्या कोप- यात गेल्यावर ते अगदी माझ्या नजरेसमोरून नाहिसे झाले.    मी रितेश व जयला फावडे घेऊन बोलवले. माझ्या मनात घटनांचे एक जाळे तयार झाले होते.त्याची सत्यतातपासण्यासाठी मी ते साप सदृश प्राणी जिथे नाहिसे झाले होते तिथे खोदायला सांगितले.रितेशने खोदायला सुरुवात केली.आम्ही सगळेच सभोवताली उभे होतो.सुरुवातीला फूटभर घट्ट माती खोदल्यावर पुढे अगदीभुसभुशीत माती लागली.अचानक रितेश बोलायचं थांबला व घाबरून उडी मारत बाजूला झाला.त्या भुसभुशीत मातीत तिनं सापांचे सांगाडे होते .ते दृश्यं बघून अंगावर काटा उभा राहिला.मन सुन्न होऊन गेले.दोन सांगाडे तीन फूटांपेक्षा लांब व एक फूटभर लांबीचा असावा. ते सापाच एक कुटुंब होतं. पण त्यांचे सांगाडे जमीनीखाली कसे गाडले गेले होते?  सगळे माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.   " तुमचं घर बांधताना इथे मोडावळ केली तेव्हा आग लावली गेली व जमिनीवरच्या वारुळातल हे सापाच कुटुंब पळण्याची संधी न मिळाल्याने जळून गेले.त्यांना त्या वेळी प्रचंड यातना झाल्या.नंतर कुणाला तरी ही जळलेलेसापांचे सांगाडे सापडले.त्याने गुपचुप ते इथे पुरले.कदाचित ते  'जयचे ' वडील असतील किंवा एखादा कामगार असेल. त्यावेळी जे घडलं तो एक अपघात होता.पण सापांनी ज्या वेदना भोगल्या त्याचा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला त्रास होत होता." सरिता ,जय व रितेश यांचे चहेरे भयाने आक्रसले होते.सरिता तर थरथर कापत होती." पुढे काय करायचं?" जयने विचारलं." घाबरू नका. विस वर्षांपूर्वी जे घडलं त्यात कुणाचाच दोष नव्हता. फक्त इथं उभं राहून मनोमन माफी मागा...अभय... मागा.हे सांगाडे समुद्रात किंवा खाडीत सोडा.अगदी आत्ताच!"जयने ते सांगाडे काठीने एका प्लॅस्टिकच्या पोत्यात भरले." तुमच्या घरावरच मळभ गेलं. आता सगळं ठीक होईल.आणि हो घरात प्रत्येक खोलीत भरपूर प्रकाश व हवा खेळती राहिली यांची काळजी घ्या."" सरिता ताई आता तुला ते तिघे दिसणार नाहीत.ते आता मुक्त होतील."सरिताने भारावून तिथेच मला नमस्कार केला.जयने तर घट्ट मिठी मारली.  जय ते प्लास्टिक पोत मोटरसायकलवरून घेऊन दूर समुद्राच्या जवळ असलेल्या कड्याच्या दिशेने गेले.आश्चर्य म्हणजे त्याच्या हातावरच्या वळवळणा-या शिरा आता सामान्य झाल्या होत्या.निदान मला तरी ते जाणवलं होत.नंतर मी व रितेश वेंगुर्ले येथे परतलो.   दिवाळीची सुट्टी संपल्यावर मी मुंबईला गेलो. दोन महिन्यानंतर मला रितेशचा फोन आला.वायंगणकर कुटुंब सुखात आहे.सरिताच्या मुलाने दारूसोडली होती तो आता जबाबदारीने वागत होता.जयला प्रमोशन मिळाले होते.तो खुष होता.आता सरिताला खिडकीतून कुणी दिसत नव्हता.रितेश फोनवर पुन्हा -पुन्हा माझे आभार मानत होता.

बाळकृष्ण सखाराम राणे 

इतर रसदार पर्याय