निशब्द अंतरंग - 1

निशब्द अंतरंग

भाग १

तु नाहिस…।

तू नाहीस हि जरी अंतरास भेग आहे,त्या जुन्याच …… पिशाच्च सावल्यांचा,भरदाव वेग आहे,हा दडला तुझ्या मनीचा,आशय कोणता कळेना,मज रुततो जिथे तिथे का ?भार कंटकांचाच कळेना,हा आसवांचा भाव जरी,स्वरात न येतो कधी,काळजाचे चुकती ठोके,अन पदोपदि…. प्राणास माझ्या ठेच आहे,हि अशी कोणती परीक्षा,जिथे मजसाठी …. साराच मोठा पेच आहे,तु नाहीस हि जरी अंतरास भेग आहे,त्या जुन्याच …… पिशाच्च सावल्यांचा,भरदाव वेग आहे।

आज अनोळखी स्वरांचा ,मी आळवला राग आहे,स्वप्नांत वेदनांचा,पाठवला गाव आहे,उभारी हि नव्याने,पंखास भरतो आहे,तुझ्याविना विरलेले,मी गीत म्हणतो आहे,हि भावना अस्तित्वाची ,का छळते पुन्हा कळेना,अन वाटेवरती त्याच का?मन पळते पुन्हा कळेना,समजवावे कुणास आता,हि अजब सारी मेख आहे,अन् आजही छळणारी ती,तुझ्या माझ्यात रेख आहे,तु नाहीस हि जरी अंतरास भेग आहे,त्या जुन्याच …… पिशाच्च सावल्यांचा,भरदाव वेग आहे।

तिला सांगणं मात्र....।

शेवटपर्यंत .......

तिला सांगणं मात्र .... जमलंच नाही,

की नसल्यावर ती,

जीव किती हळवा होतो,

अन् असल्यावर देखील ती,

मी किती बावरा होतो,

शेवटपर्यंत जमलं नाहीच,

तिला तिचं रूप सांगणं ,

गोऱ्या गालात दडलं,

वेड गुज खोलनं ,

आता मी .....

आयुष्यावर पुरेल इतकी,

घुसमट घेतली उधार,

जीवावर चालवली मीच,

जणु विरहाची दुधारी तलवार,

आता मलाही कळत नाही,

की ... मी कसा .. अन् किती,

खोल अंतरात जातो,

तिला सांगणं मात्र .... जमलंच नाही,

की नसल्यावर ती,

जीव किती हळवा होतो |

ती समजली असती कदाचित,

किंवा नसत्याही उमजल्या,

तिला भावना ... क्षणिक ...

ती नसती बोलली कदाचित,

किंवा नसतंच पाहिलं पुन्हा..

तिनं वळुन अवचित,

पण असं मौनात घुसमटनं,

अन् टाळून तिला....

कुठं दुर दुर भरकटनं ...

यातचं मी इतका खुळा होतो..

नाहीच राहत जगाचं भान,

अन् ... आतुनच जणु..

काही वादळ चालुन येतं,

उधळुन लावतं ... सारी स्वप्नं...

सारी .... सुखं...

अन् कुण्या .....घनदाट...

अंधारात शमुन जातं,

आता ......

दिवसाही कधी चंद्र तर कधी...

रात्रीही सुर्याचा भास होतो,

तिला सांगणं मात्र जमलंच नाही....

की नसल्यावर ती....

जीव किती हळवा होतो ।

***

हालात कुछ ऐसे ढल रहे है,कि तु इतनी गुमसुम … क्या हमसे दुर जा पाओगी ?हजार कोशिशे करले ओ बेनशी ,क्या मेरी आदत को,तुम यु भूल पाओगी ?

***

तु असतीस तर ……?

विसरण्याचे भास काही,झाले होते मधल्या काळी,विसरण्याची हुलच सारी,खोटीच सारी दुनियादारी,झाकुनी मनपटलात माझ्या,केव्हाच जे मी ठेवले होते,तु असतीस तर ……?हे प्रश्न वेडे,मजला कधीच पडले नसते।

आठवांचा दफनविधी ,वेदनांत मी साहिला होता,हर एक इशारा तुझा,आसवांत मी ढाळला होता,दिवसांनी इतुक्या खरे,तुला आज आठवण झाली,मांडलेला खेळ नव्याने,त्यात तुझी लाट आली,विखुरले पुन्हा नव्याने,दुःख जे मी सावरले होते,भरले नव्हते घाव जिव्हारी,ना समजली तुझी … भूमिका व्यवहारी,विव्हळनेच अवघे,अंतरात जे अमाप होते,अन बेगडिच माझे त्यावरी,…. हासण्याचे लेप होते,काश समजले असते तुला कधी,कि काळीज … तुझ्यात … खोल किती रुतले होते,विश्व होते तुझ्यातची सारे,तुझ्यावीण असे … काहीचमाझे न उरले होते, या तर्क वितर्कांची उगीच मैफल,अन हे भास वेडे घडले नसते,तू असतीस तर ……?हे प्रश्न वेडे,मजला कधीच पडले नसते… ……मजला कधीच पडले नसते।

***

हे चंद्र तारे आज सारे,गगनात असे का दाटले,क्षण अवचित कोणी,भावनांना भावनांनीच गाठले,हि रीत वेडी प्रीत का अशी,…. आज शब्दांत वेड भारी साठले,मी … घुमतो उगाच असा का ?न जाने काय… भलतेच मजला वाटले,हे चंद्र तारे आज सारे,गगनात असे का दाटले।

***

बैठे रहे थे किसी बरामदे मे, उनकि चाहत कि खुशबू लेकर.… 

वो गुजर गये सामने से …… और बेशरम हम … अपने आपसे इतराते रहे।

***

तु ........ थोडा थोडा समीप ये..|

तु पाहुनी मोगरा असा हा,थोडा थोडा समीप ये,मोहरूनी काया अवघी,तु थोडासा अधीर ये,ये घेऊनी शहार बोलके,अन् हलकेच मकरंद हा लुटून घे,तु पाहुनी मोगरा असा हा,थोडा थोडा समीप ये।

शिळ अंधाराची जशी,तु चाहुल त्यास लागू न दे,ये सरळ मार्ग घेवूनी,श्वास हि रोखून घे,सोड रटाळ सारेच मागे,अन् होवुनी तु रसिक ये,तु पाहुनी मोगरा असा हा,थोडा थोडा समीप ये।

***

व्यर्थचे सांगत नाही,हा अनुभवाचा बोल आहे,करा वणवण कशीही,जिथे तिथे … हाच सारा झोल आहे,अरे प्रेमास कोठे कधी,सांग वेड्या मोल आहे,करणार तरी काय तु अन मी,इथे साली … दुनियाच सारी गोल आहे।

***

जात पाहुन…।

आज काल प्रेमदेखील माणसं,जात पाहुन करतात,अन जातीवाचून सारेच,साऱ्यांच्याच डोळ्यात सलतात,का कोण जाने,पण अशी माणसं ,जीवाला फार खलतात ,अन आज काल प्रेमदेखील माणसं,जात पाहून करतात।

पुरोगामी म्हणतात स्वताला सारेच,…. आपापल्या सोयीने,कारण नोकऱ्या देखील गाठायच्या असतात ना ,वशिल्याच्या बोटीने,हे सारं ठीक पण,भावनांचाही हे लोक,देव जाने कसा ,बाजार घाऊक मांडतात,अन् आज काल प्रेमदेखील माणसं,जात पाहून करतात ।

आमचं सोडा …. आमच्या नावेला कधी,शिडाचा धक्का मानवत नाही,अन् नकाराच्या दुनियेत आमच्या,होकार कधीच…. पक्का जाणवत नाही,होतं ते ठीक … पण स्वार्थापायी कधी कधी …. हेच लोक,नको त्या जनांतही ,कसे उगाच … वेळ पाहुन रमतात,अन् आज काल प्रेमदेखील माणसं,जात पाहुन करतात ।

***

मी अस्वस्थ इथे अन् ,तु स्वस्थ तिथे राहीलीस जरी,अंधारात निराशेच्या,सोडून मज चाललीस जरी,शपथेवर सांगतो मी, क्षण तुझेच तुला बघ,पुन्हा पुन्हा छळतील परी,वाटेल तुज बोलावे....,अन् माझी आसवेही न तुज भेटतील कधी।

***

भरल्या ओतप्रोत प्रेमाच्या………।

भरल्या ओतप्रोत प्रेमाच्या,घागरी उगा सांडू का ?नको तिथे व्यर्थ बडबड ,अन् लोकांशी मी भांडू का?जी असेल एखादी,मजसाठी थांबलेली,नजरेत शरम,अन गालात लाजलेली,हि ठेव अंतरातची बरी,तीजसाठीच जपलेली,पामरांस या कळणार कशी,अविट गोडिच न चाखलेली,अशी कोणासाठीही …. उगीच धडपड,अन शोक रिते मी मांडू का?भरल्या ओतप्रोत प्रेमाच्या,घागरी उगा सांडू का ?

तुला आठवेल असं …।

तुला आठवेल असं … काही उरलेलं दिसत नाही ,क्षणांत …… उर्मी मिळेल असं ,मनही भरलेलं दिसत नाही,माझी मात्र उगीच घालमेल,शब्दांची … शब्दांमध्ये …. उगीच असते रेलचेल,त्या शब्दांना हवी अशी ,तु मात्र कधीच असत नाही,तुला आठवेल असं … काही उरलेलं दिसत नाही ।

आजही गर्दीत माणसांच्या ,मी एकटा होऊन बसतो,आजही … धारांत पावसाच्या,कोरडाच राहून हसतो,या कोरड्या पापण्यांत … थरथरत्या ओठांत … न जाने किती … उत्कट वेदना दाबतो,पण हे कळण्या इतपत …. तु गुंतलीच कधी होतीस,अन् हे जाणण्याइतपत … तु वेडावलीच कधी होतीस,मी मात्र …… निरभ्र आकाशात … आजही तुझी आकृती शोधतो ,अन तु बसलीस शेजारी,म्हणुन उगाच … एकट्याशीच बोलतो,मी आजही भांडतो ………. त्या वाऱ्याशी …………. त्या पाण्याशी………….त्या झऱ्याशी ………….कि …. तुम्ही एकटेच का?…… तिला का नाही बोलावलत,पण वेडावून देखील असं ,प्रेम …. मनावर कुणाच्या ,कधी ठसत नाही,आणि....आता तुला आठवेल असं … काही उरलेलं दिसत नाही ।

अबोल एकटा ……।

पाणवठ्यावरती घागरींचा…

आवाज किणकीनत होता ,वाऱ्यावरती मोगऱ्याचा ….

गंध लहरत होता,मी वाटेवर त्याच तिथे ,जिथे पैजनांचा साज ….. पायात तुझ्या ,उगीच गुणगुणत होता,राहता राहिली जाणीव… तुला माझी,नव्हती जरी अपेक्षा… ठेवली मी ती ,लाटेस जैसा किनारा ,बाणास जैसा निशाणा,काळजात तैसाच उसासा,हलकेच किलबिलत होता ,पाणवठ्यावरती घागरींचा….

आवाज किणकीनत होता।

शब्दात का बांधशील सारे ?का धरशील आठवणींचे वारे,का ते स्मरशील जगाचे निखारे,दुःखाचे फवारे …. फुकाचे धुमारे कशासाठी ?आता जगायचे आपुल्यासाठी,आता जगायचे सांगण्यासाठी,दुःखात सुखाचे … बोलण्यासाठी,भावनांना अबोल खोलण्यासाठी ,.....क्षणात आठवणी,अन् मनात साठवणी ,कलह असाही…. उगीच भुणभुणत होता , पाणवठ्यावरती घागरींचा……

आवाज किणकीनत होता,वाऱ्यावरती मोगऱ्याचा….

गंध लहरत होता।

***

पडुनी ऐशा सरणावरती,

थुंकूनी पामर मरणावरती,

तुझी रात...

अन तुझी साथ....

तुझा स्पर्श...

अन् तुझी हाक....

अशा धुंदीत मी स्मरतो आहे...

पडुनी ऐशा सरणावरती,

थुंकूनी पामर मरणावरती,

मदनमस्त मी जळतो आहे,

.... मदनमस्त मी जळतो आहे |

***

तुझी आठवण……।

आभाळाचा करून किनारा ,आठवण काही बोलून जाते ,पाहत धरणीकडे …. वेड्या मनात …… सल वेडी भेटुन जाते ……… रात्र असते खुळचटलेली ,पहाटही मग वेडीच होते,जेव्हा… तुझी आठवण येते।

क्षणी पापण्यांची तडफड होते ,अन् नयनात वेडे पाणी येते,आणि नसतेस जिथे तू ,तिथे …… तुझ्यावाचून …… आभाळ आठवणींचे … असे बरसून जाते ,पाठवते ओले क्षण काही ,मग् काळीजहि ओलेच होते ,जेव्हा… तुझी आठवण येते।

कंकण तुझ्या हाती होते,…. स्वप्नी जे रूप तुझे ,आजच नाही …. हररोज …. खुळेच काही … वेड अन् वेडावून जाते ,घडतात क्षणांचे उसासे ,जखम परी खोल जाते ,वेदना कधी न दिसणारी ,वेदनेत परी …. स्वत्व हि माझे … कुठे विरून जाते … मग बोलायचे तुला काही … अन् दुजेच मन बोलून जाते … जेव्हा तुझी आठवण येते …. जेव्हा… तुझी आठवण येते।

भरदुपारी……|

भरदुपारी मला चांदण्यांचा भास होतोय ,क्षणात एक अन् क्षणात दुजा ,आभास नवा … असा मनी दाटून येतोय,भरदुपारी मला चांदण्यांचा भास होतोय।

उण्या दुपारी उणे वारे,झळ पांघरूनही शीतल झाले ,आठवण थोडी विसरू पाहतोय,मनात परी …. मनाचा कल्लोळ ,शब्दावाचून सुसाट वाहतोय ,भरदुपारी मला चांदण्यांचा भास होतोय।

सरकन कधी …. काटा उभा राहतोय ,भरदुपारी उन्हाखाली … रात्र जणू अशी त्या सूर्यास छळतेय," जा जा लवकर " जणु असचं म्हणतेय ,मग बिचारा तोही … थोडा उदास होतोय ,जडलेल्या भावना …. मनात ओढून घेतोय ,अन सा-यांसाठी नाही … पण माझ्यासाठी तरी …. भरदुपारी … सुर्यानारायनही विश्रांती थोडी घेतोय … म्हणूनच …. भरदुपारी मला चांदण्यांचा भास होतोय… … चांदण्यांचा भास होतोय।

आठवणी…।

आठवणी राहतात म्हणे ,जळलेल्या राखेतही ,नयन वेडे वाहतात म्हणे ,दाटलेल्या कंठातही ,अजुन न पुरता सावध मी ,तरीही … अर्थ वेडे भाव वेडे,शब्दात ओठ गातातही।

तुझे विस्मरण न होते कसे ,अंतरी गीत येते कसे,प्रश्न उठतात जसे ,प्राण शमतात तिथे ,तु ये सोडूनी … तोडूनी … अवघी बंधने … तु ये धावुनी …. जोडूनी … प्रीत स्पंदने …. हे शब्द आज बोलतात काही ते उद्या बोलतील काहि… जसा आज …श्वास भरतो आहे ,उद्या श्वासही नसतील काही ।

असे क्षण पेटतात म्हणे ,विझलेल्या काळातही ,कुणी कधी भेटतात म्हणे ,संपलेल्या पाठातही,आठवणी राहतात म्हणे, जळलेल्या राखेतही ,नयन वेडे वाहतात म्हणे ,दाटलेल्या कंठातही ।

अकस्मात …।

अकस्मात अंतरीचे गीत ओठी आले ,संपले भाव अन् नयन चिंब झाले,रात अशी कि आजही ,उशास ढाळते पाणी ,घुमतात रोज मनी,तिचीच ओली गाणी,मी ओळखीचे असे रंग शोधतो काही ,तिची नजर मात्र मज अनोळखीच पाही ,का दुखावल्या ओठांनी मी गातो रोज,तीच माझी आकसलेली वाणी,का आजही छळते तिची काया लोभसवाणी ,पापण्यांत मिटु काय,जीव हरलो तिच्यापायी,…… मी झालो वेडा जरी,सामावून हजार दुःखे उरी ,परी म्हणुनी … कृतघ्न या संसारात ,काय असे कुणाचे गेले अकस्मात अंतरीचे गीत ओठी आले ,संपले भाव अन नयन चिंब झाले।

ती अजुनही वावरते ,मज आसपास कुठे,आजही छळती मज ,तिज पावलांचे ठसे,मी कोण कसा ,काय उरलो आहे,मी कशासाठी कुणाचा ,कोणात गढलो आहे,राग अंतरीचा आता ,ठुमरीत घुमतो आहे ,अंतरी होते तांडव,अन् श्वासात आग आहे,पुरे झाले आता,मीच मला ,कधीचा समजावितो आहे ,परी तो सोडुन आता भाव,काळीज …. का कसे , व्याकुळ पुन्हा झाले,अकस्मात अंतरीचे गीत ओठी आले ,संपले भाव अन् नयन चिंब झाले।

ती अनोळखी …।

मला कुठे अत्तरांचा गंध उरला आहे ,मला कुठे भावनांचा छंद उरला आहे ,तिथे तू शृंगाराचे भाव मांडीत आहेस ,इथे मी आठवणींचे घाव मोजीत आहे,आता बारकावे जीवनाचे ,मोजतो मी एकांती,तीथेही तुझाच कसा … आसवांना माग आहे,गेलीस तु दुर कितीही …उधळलीस डोळ्यात धुळ अशी ही ,तरी कोरलेला काळजाचा ,तुच उरला भाग आहे,… हा रोग आजचा नव्हे,मागेच कधी तो जडला आहे,मला कुठे अत्तरांचा गंध उरला आहे ,मला कुठे भावनांचा छंद उरला आहे |

कणभरही तुझ्या मुखावर मजसाठी ताण नाही,मीही निरलस .. निर्लज्ज ,मलाही त्याचा राग नाही ,तु विसरलीस . …. जाणवते मला …तु टाळतेस … उमगते मला … ,परी आता अंतरात श्वास ,अन् कोमेजलेला ध्यास,तो फक्त तुझाच आहे ,हर एक क्षण तुझ्यावीण ,तोही फक्त उनाच आहे,आता आशेचाही … कंठ पार सुकला आहे,तो सर्वेश्वर हि ,न जाणे..... कोणापुढे झुकला आहे,आता कोंडलेला श्वास,जणु प्राणही …आठवणींत तुझ्या पुरला आहे,मला कुठे अत्तरांचा गंध उरला आहे ,मला कुठे भावनांचा छंद उरला आहे |

बोलता बोलता …।

बोलता बोलता शब्द माझे

… ओठांत अडू लागलेत,नसतानाही तु असण्याचे

…. भास घडू लागलेत,गेलीस जेव्हा तु टाकून एकटा ,देऊन आठवणींचा … निखारा पेटका,जीव पेटला क्षणोक्षणी ,...हाक माझी मनोमनी,परी तुज कुठे काही ऐकू आली,एकांती घुमलो मी...,…अन् माझीच मला दया आली,या भयाण राती …. वेदनेची धारदार पाती ...,वार मर्मावरती होऊ लागलेत,आजवर होती साथ तुझी … ,आता विरहाचेच शब्द … ,अंतरात माझ्या स्फुरू लागलेत,बोलता बोलता शब्द

… ओठांत माझ्या अडू लागलेत,नसतानाही तु असण्याचे… भास घडू लागलेत।

जेव्हा …।

आठवणी राहतात म्हणे ,

जळलेल्या राखेतही,

नयन वेडे वाहतात म्हणे,

... दाटलेल्या कंठातही,

अजुन न पुरता सावध मी ....

तरीही ....

अर्थ वेडे .... भाव वेडे,

शब्दांत ओठ गातात ही |

तुझे विस्मरण ....

न होते कसे ...

अंतरी हे गीत येते कसे,

प्रश्न उठतात जसे..

प्राण शमतात तिथे,

तु ये धावुनी ... जोडुनी...

प्रीत स्पंदने...

हे शब्द आज बोलतात काही,

ते उद्या बोलतील काही,

जसा आज .... श्वास भरतो आहे,

.... उद्या श्वासही नसतील काही,

असे क्षण पेटतात म्हणे,

विझलेल्या काळातही,

कुणी कधी भेटतात म्हणे,

संपलेल्या पाठातही,

... आठवणी राहतात म्हणे,

जळलेल्या राखेतही,

नयन वेडे वाहतात म्हणे,

दाटलेल्या अंतातही |

आठव कधीतरी……………।

अंतरास जाऊनी भिडला,

शब्द अन् शब्द सखे,

आसवांनी बांध फोडला,

वाहीली सहस्त्र पदे,

शब्दांस लेप माझ्या,

प्रेमसुखाचा प्रिये,

आठव कधीतरी मला,

जन्मजन्मात या सखे |

शोधीत काळ गेला,

शब्द झाले पारखे,

अतुलित झिजली काया,

जड झाली पाऊले,

सुखाची चाहुल दावया,

दुःखं विरहाचे भाजले,

म्हणुनच,

आठव कधीतरी मला,

जन्मजन्मात या सखे |

भोगण्यात काय जन्म गेला,

आता नको ते विरह जुने,

भाव फुलांनी बहरला,

परी तु न हे जाणले,

आकांक्षांचा ढीग भला,

रिते अस्तित्वची सलते,

म्हणुन,

आठव कधीतरी मला,

जन्मजन्मात या सखे |

सोन दिवस तोच ठरला,

दोन शब्द ते ओघळले,

झेलता झेलता ओंजळ हृदया,

अस्तित्व तुझे मावळले,

घुमत सदा मनासी राहिला,

न तुला हे कळले,

आखरी एकची सांगणे,

स्वप्ना तुझे अन्

तुझेच मी पाहिले,

आठव कधीतरी मला,

जन्मजन्मात या सखे |

अपराध छाया……।

अपुरेच शब्द माझे,

अपुरी अन् काया,

पारखेच हे गीत माझे,

पारखी तुझी माया,

झुरनेच मजभागी,

क्षण एक तुज पहाया,

सांग आज तुच सखे,

कोण ही अपराध छाया |

लहु अन लहु बावरले,

स्पर्श पवन तो सहाया,

हृदय खरेची आतुरले,

तुज गीत ते म्हणाया,

अलगद मन पाचुवरी ह्या,

अस्तित्व तुज वेचाया,

झुरतोच परी आहे,

प्रतिबिंबी प्रेम तुज पहाया,

सांग आज तुच सखे,

कोण ही अपराध छाया |

झिजले सुर सारे,

रित्या आठवणी गाया,

हरसमयीच मनी सलते,

आगळीच हि रुपछाया,

सावरले हे सारे,

मनाचेच मंद झोके,

सुख अगदीच भुलले,

दुःखं परी दिलेस वहाया,

सांग आज तुच सखे,

कोण ही अपराध छाया |

भवसागरात मनाच्या……।

क्षण आठवती,

अन् क्षण बावरती,

विरळ आठवणी,

नयनांतीरी बागडती,

घायाळ या हृदयी,

शब्द तुझेच आठवती,

भवसागरात मनाच्या,

थेंब थेंब साचवती |

आलीस अन् गेलीस तु,

तुला काय असेल जान,

मरत होतो क्षणोक्षणी,

तुला न कशाची आन,

सांगु तरी कसा मी,

शब्द तुजसाठी ना ओठी,

हृदयातले शब्द हृदयी,

जीव का ते झुरवती,

भवसागरात मनाच्या,

थेंब थेंब साचवती |

कधी भेटशील एकटी,

सांगण्या हृदयाची गणती,

कोणास ठावुक परी,

असशील का माझ्यासाठी ?

जन्मजन्मात या परी,

सढळ प्रेम माझे,

असेच मोकाट वाहते,

आठवूनी तुला,

क्षणामागुनी क्षण कंठते,

परी हृदयाच्या या आर्त लहरी,

तुला अन् तुलाच आळवती,

भवसागरात मनाच्या,

थेंब थेंब साचवती |

तोच ……आहे……।

पायात पैंजणांचा आवाज तोच आहे,

शब्दांत वेदनांचा रिवाज तोच आहे,

ते ओठ आजही थरथरते,

ते मन अजुनही भरभरते,

सावल्यांत आठवांच्या,

कायाच मज हळहळते,

आळवला जो आज,

तो रागही तोच आहे,

.... माझ्यातल्या तुझा,

असा भागही तोच आहे,

पायात पैंजणांचा आवाज तोच आहे,

शब्दांत वेदनांचा रिवाज तोच आहे |

क्षण असेही पारखे,

मन अस्वस्थही सारखे,

भिरभिर पापण्यांचा ...

आक्रोश तोच आहे ...

ओल्याच .... नयनांचा,

रोष तोच आहे,

अन् साऱ्यांतूनी उरला तरीही,

तो जोश तोच आहे,

दिलास जो नको असा,

हा दोषही तोच आहे,

पायात पैंजणांचा आवाज तोच आहे,

शब्दांत वेदनांचा रिवाज तोच आहे |

तो श्रावण ……।

श्रावणातील ती वेडी रिमझिम,

आजही बरसते....

त्याच झाडाखाली.....

त्याच बाकावर.....

पण आता .... त्या ओल्या बाकावर,

ओला असा मी एकटाच असतो,

ती तु ओली असत नाहीस,

आठवांचा पाऊस तर रिमझिमत असतोच,

पण मधूनच....

अंतरात काही जुनीच ती जखम,

पुन्हा नव्याने भळभळते .....

श्रावणातील ती वेडी रिमझिम,

आजही बरसते |

उन सावल्यांचा खेळ ....

श्रावण खेळतच असतो,

मीही भिजतो काही क्षण...

अन् पुन्हा उन्हांत सुकतो,

पैलतीर पाहतो फक्त दुर असे,

जिथे दिसतात तुझ्या पावलांचे ठसे,

पण ऐलतीरास इतका जखडलो मी...

की निघतात मुखातुन ....

.... फक्त वेडे उसासे,

अन गुदमरते मनही माझे,

गुंतुन तुझ्यात जरासे,

क्षणभर मग हसतो मी,

... पाउल सावरून बसतो मी,

त्यात थोडे का होईना,

दुःख माझे विरघळते,

श्रावणातील ती वेडी रिमझिम,

आजही बरसते....

....... अगदी तशीच बरसते |

वाटलं नव्हतं …।

वाटलं नव्हतं कधी,

असा ... प्रवास अर्ध्यावर टाकशील,

नसताना अशी काहीच,

अडचण तु करशील,

वाटलं नव्हतं कधी,

असा ... प्रवास अर्ध्यावर टाकशील |

आता दिगंतराचा प्रवास एकटा,

पापण्यांचा वनवासही नेटका,

क्षणभर उसळतात भावना,

पण .... आता सवय झालीय,

... आतल्या आत घुसमटायची,

श्वास दाबुन... भावना गुदमरवायची,

पण ... त्यावेळी ... का कोण जाणे,

वाटलं होतं....

की गेलीस दुर कितीही,

तरीही ..... माझे शब्द तु ऐकशील,

मी असेन वेदनेत,

अन् सांत्वना तु करशील,

पण .... मला कुठे खबर...

की अशा .... विरह वनव्यांत जाळशील,

वाटलं नव्हतं कधीच,

की असा ... प्रवास अर्ध्यावर टाकशील,

नसताना अशी काहीच,

अडचण तु करशील |

क्षणोक्षणी गात्रांतुनी……।

क्षणोक्षणी गात्रांतुनी,

तो गंध ......

अजुनही दरवळतो आहे,

तु नाहीस तरी,

असण्याचा भास,

हररोज मज छळतो आहे,

हे गीत ......तुझ्यावरचे प्रेम माझे,

हि प्रीत ..... अन तुझ्याविना.....

....जिने माझे,

या साऱ्यांत ..... माझे अस्तित्व,

अन् मीच जणु हरवतो आहे,

क्षणोक्षणी गात्रांतुनी,

तो गंध अजुनही दरवळतो आहे |

शब्द जुनेच ...भावनाही जुनी,

पण जीव नव्याने गुदमरतो आहे,

क्षणात इथे .... क्षणात कुठे,

मी असाच कुठेही धडपडतो आहे,

तु दिसतेस हरक्षणी जिथे,

तिथे ...... तुजसाठी पळतो आहे,

नाहीच गवसत कुठे म्हणुनी,

बेजार मी ......

आठवणींत तुझ्या भुलतो आहे,

केवळ अस्तित्वाचे भास,

परी अस्तित्वावीनाच तुझ्या,

हररोज मी हळहळतो आहे,

क्षणोक्षणी गात्रांतुनी,

तो गंध अजुनही दरवळतो आहे |

पण तु …।

तुझ्या पैंजणांची आस…..

….धरली असती कदाचित,

पण तु मागे वळलीच नाहीस,

तुझ्या शब्दांखातर ओंजळ काळजाची,

धरली असती कदाचित,

पण तु काही बोललीच नाहीस,

आता रुक्ष काही आठवणी,

ओल्या डोळ्यांत साठवतोय,

तुझ्या जपलेल्या साठवणी,

थरथरत्या काळजांत आठवतोय,

तुझ्यासाठी शर्थ जीवनाशी,

खेळलो असतो कदाचित,

पण तु ..... तशी वेळ आणलीच नाहीस,

तुझ्या पैंजणांची आस…..

…..धरली असती कदाचित,

पण तु मागे वळलीच नाहीस |

आता .....रात्री जागवायच्या ....

देहाचा सुंभ पुरता जळेपर्यंत,

आता .... डोळे नुसते कुजवायचे,

तु अगदी लख्ख आठ्वेपर्यंत,

पण हे सारेच निव्वळ व्यर्थ,

कशालाच या ...

आता आहे कुठे अर्थ,

तरीही वेस वेडपणाची ....

मी जपली असती कदाचित,

पण तु वेडात काही.....बोललीच नाहिस,

तुझ्या पैंजणांची आस…..

….धरली असती कदाचित,

पण तु मागे वळलीच नाहीस |

तु जाशील तेव्हा …।

तु जाशील तेव्हा,

आठवांचा ..... क्षण एक मागुण घे,

तु जाशील तेव्हा,

वेदनांचा व्रण एक मागुन घे,

तु जाशील मुक्याने,

स्पंदनांचा सुर तो मागुन घे,

तु भरशील .....उगा हुंकारे,

पण आसवांचा नुर वेडा,

तोही तु मागुन घे,

तु जाशील तेव्हा,

आठवांचा ..... क्षण एक मागुण घे |

मी प्रारब्धाची रीत होतो,

तु संचिताची प्रीत हो,

मी रक्ताळली होळी होतो,

तु अनुरागी गीत हो,

तु येशील ..... तु यावी,

...........

तु नभांच्या आसवांचा,

अर्थ तो जाणुन घे,

तु जाशील तेव्हा,

आठवांचा ..... क्षण एक मागुण घे |

झंकार………।

झंकारतात आजही,

काळजाच्या तारा,

तुझी आठवण येताच,

घुमू लागतात सुर वेणूचे .....अंतरात,

तुझे रूप आठवताच,

मग शब्दांखातर ... शब्दास दिलेली....

सारी वचने आठवतात,

नव्हतीस कधी जेव्हा,

पापण्यांना जडलेले आसूं देखील आठवतात,

अन होतीस .... तेव्हा.....

तुला पाहताना...

अंगभर उठलेले शहारही आठवतात,

पण आता तर तु ....

इतकी लांब चाललीस,

की .... माझा आवाजच काय.....

पण माझे शब्दही.....

तुजपर्यंत पोहोचु शकणार नाहीत,

आता तर तु ......

इतकी दुर चाललीस की,

तुझा अत्तरी गंध.....

तोही मजपर्यंत पोहचू शकणार नाही,

अन् जणु या प्रेमघटका शेवटच्या...

येतात दाटुन .... अंतरात...

पण वेडे ... तुला तर हेदेखील माहित नाही...

की .... मी .... तो वेडा...

जो ....तुला सांगणे ....

.......तुला बोलणे दुरच ....

पण जो पुरता ओशाळून जातो,

तुला पाहताच....

अन् अगदी वेंधळा होतो,

तु समोर येताच,

..... तशाच झंकारतात आजही,

काळजाच्या तारा....

तुझी आठवण येताच,

अन् घुमू लागतात,

सुर वेणूचे ..... अंतरात,

तुझे रूप आठवताच |

मला………।

मला चांदण्यांनी माळलेले,

आकाश नको होते,

मला आभासांनी मळकटलेले,

अवकाश नको होते,

मला हवी होती एक आठवण,

आयुष्यभर आठवण्यासाठी,

मला हवी होती एक साठवण,

आयुष्यभर साठवण्यासाठी,

तुला पाहण्याचे,

सुख नको होते,

वेडात बोलण्याचे,

दुःखं नको होते,

मला संवादाने भारलेले,

.... छंदहर्षही नको होते,

मला चांदण्यांनी माळलेले,

आकाश नको होते |

क्षणांसी अवघ्या,

दवापरी जडलीस तु,

रोमरोमांत माझ्या,

शहार बणुन स्थिरलीस तु,

तुझ्या अस्तित्वाची,

उणीव नको होती,

माझ्या कवित्वाची,

जाणिव नको होती,

ती तु....

तशी नको होती,

ती तु....

अशी नको होती,

का कोण जाणे ....

मला .... तु......

कशीच नको होती,

न जाणे तरीही .....

... आतल्या वादळांत,

.... धुरकट काही प्रतिमा,

ती मात्र तुझी होती,

अन् रात्रीत जडल्या वेडापायी,

पहाटही .....

तुझ्यावीण रिती होती,

मला तुझ्या आभासांचे,

छंद पोरके नको होते,

मला शब्दांनी भरकटलेले,

ते काव्य नको होते,

मला चांदण्यांनी माळलेले,

आकाश नको होते,

मला आभासांनी मळकटलेले,

अवकाश नको होते |

ती रात………।

ती रात एकटी होती,

ती धुंद बेरकी होती,

मजकडे पाहते जी,

ती वाट पोरकी होती,

ती सावली कधी उन्हाची,

वाटेत पाहीली होती,

ती सरली साथ तिची,

जी माझ्यात राहिली होती,

ती रात एकटी होती,

ती धुंद बेरकी होती |

साथीत कधी कुणाच्या...

शब्दांस विसरली होती,

ना उरली तीच प्रतिभा,

जी तिच्यात गुंफली होती,

ती रात एकटी होती,

ती धुंद बेरकी होती |

पाण्यातले तरंग,

अन् ती लाट ..... लाजरी होती,

प्रतिबिंब कधी माझेही ....

घेऊन हसली होती,

ती तिची छाया ....

कधी.....

तळ्यांत मी पाहीली होती,

ती रात एकटी होती,

ती धुंद बेरकी होती |

चांदन राती .... आकाशाची,

मैफिल ... पोरकी होती,

चंद्रास चांदण्यांची,

साथ बोलकी होती,

निमिषभर .... आभासांनी ,

आयुष्यभराची गुजं खोलली होती,

ती रात एकटी होती,

ती धुंद बेरकी होती |

आता तुझा असा………।

आता तुझा असा देह,

मी राखलाच नाही,

अन् तुझा असा श्वास,

मजजवळ उरलाच नाही,

आता .... फक्त राख...

ज्यात ...मी असा ... दडलोच नाही,

आता फुलतात निखारे ....

जळलेल्या माझ्या मढ्याचे,

आता ....उरले काही इशारे ,

खाक माझ्या मनाचे,

जो तुझाच होता .....

तो आत्मादेखील....

मागे आता उरलाच नाही,

आता ...तुझा असा देह,

मी राखलाच नाही,

अन् तुझा असा श्वास,

मजजवळ उरलाच नाही |

आता क्षणास .....

विरक्तीचे साखळदंड,

आचारास .....

बंधनांचे पिक उदंड,

आता .... पुसावयास हाल,

न ठेवला मित्र,

अन् जिव्हाळ्यासाठी असा,

सखा मज उरलाच नाही,

आता .... दिगंतराची,

केवळ मौन भाषांतरे...

त्यावीन दुजा....

विचार मनी भरलाच नाही,

आता तुझा असा देह,

मी राखलाच नाही,

अन् तुझा असा श्वास,

मजजवळ उरलाच नाही |

**********************************

आता कशी विसरणार तु मला,

आता तर माझी गीतं .....

तुझ्या काळजात .... वावरू लागलीत,

खरचं आता कशी विसरणार तु मला,

की ते विसरणे शक्यच नाही,

कारण .... आता तुझ्या श्वासाश्वासांत देखील ...... माझे श्वास गुंतू लागलेत....|

**********************************

हसकर मिटणे का गम .... तो हमे था,

आप तो युही .... रोकर चल पडे,

हसीन खाबो से आपके....

बचना तो हमे था,

आप तो बेवजहही ......

हमारी ख्वायीशो में जल पडे |

**********************************

तुझ्या आठवणींत ………।

रात्र बघ अशी झुरतच चाललीय,

तुझ्या आठवणी,

भावनांच्या पाठवणी,

क्षणांच्या साठवणी,

यातच बघ वेळ वठत चाललीय,

कुठं आठवतंय थोडं,

क्षणाक्षणांचं कोडं,

आभाळदेखील विरत चाललंय,

चांदण्यांनाही गिळत चाललंय,

आता उणीव फक्त .... तुझीच राहीलीय,

अन् रात्र बघ अशी झुरतच चाललीय....

.....रात्र बघ अशी झुरतच चाललीय |

तु………।

उधळताना अंतरंग

अडवलंस तु ....

मी नव्हतो आलो सांगायला,

पाहताना एकाएकी....

हसून एकाकी पाडलस तु ......

मी नव्हतो आलो बोलायला,

रात्र सरत होती... निवांत कधी....

जागावयास लावलं तु....

मी नव्हतो आलो ...छेडायला,

फाटक्या विश्वात....

फाटकासाच होतो मी,

बदलायला लावलंस तु....

मी नव्हतो आलो सजायला,

आता सारं उधळून ....

वेड जिव्हारी लावलंस तु.....

पण .....

मी नव्हतो आलो कधीच.....

तुझ्याकडे काही मागायला |

हे जे सारं ………।

हे जे सारं ... ते तुलाही होत असेल,

भावनांच्या गुंत्यात ....

मन तुझही .... वेड होत असेल.

कधी ....

हसता हसता भरून उगाच....

तुलाही येत असेल.....

हे जे सारं ..... ते तुलाही होत असेल |

मी काहीही झालं .... की ...

बसतो शब्दांशी खेळत....

नसेल कोण तरी ....

मनातलं सारं...

बसतो त्यांनाच सांगत...

मग तुझं मन....

तेही असचं करत असेल ....

माझे तर शब्दच सोबती...

पण तुला कुणाची सोबत असेल....

का .... तुलाही ... असचं शब्दांचं गाणं ....,

कुण्या स्वप्नगावी नेत असेल,

हे जे सारं....

ते तुलाही होत असेल |

संवेदना ………।

तु थोडं थांबायला हवं होतं,

मी असा .... येणारच होतो,

होतो जरा दुर...

अन् होता थोडा....

आभासांचा धुर .....

पण मन हि खंबीरपणे....

मीही बांधणारच होतो...

तु थोडं थांबायला हवं होतं,

मी असा येणारच होतो |

मी किती लाजरा,

मी किती बुजरा,

तुला वेगळं सांगावयास नको,

तरीही व्याकुळ अंतरात..

व्याकुळ वादळ...

असं लीलया पेलणार होतो,

मला ठाऊक होती... तुझी तगमग,

नको वाटत होती तुलाही,

माझ्याविना .... ती वेडी झगमग,

मीही ढाळत होतो आसवं...

नाही असं नाही,

पण त्यातुनही,

समेटून सारं बळ,

भरारीही घेणारच होतो,

तु थोडं थांबायला हवं होतं,

मी असा येणारच होतो |

ती वेळ गेली,

अन् ती तु....

तशी निघुन गेलीस,

आठवांच्या डोहात,

माझे डोळे तर ओलेच,

पण तुही...

ओल्याच डोळ्यांत ,

कुणास ठाऊक ....

आठवण कोणाची नेलीस,

त्याक्षणीही.....

तु थोडं जाणायला हवं होतं,

मी तर तेव्हाही,

साऱ्यांशी ... भिडणार होतो,

तु एका शब्दानं ...

सांगायला हवं होतं,

तु ..... थोडं थांबायला हवं होतं,

मी असा येणारच होतो |

दोन रेषा समांतर………।

दोन रेषा समांतर कधी,

मिळतात का मज सांग सखे,

साथ अखंड अगदी शेवटपर्यंत ...

परंतु हात एकमेकांस ...

न भिडतात कसे ....?

दोन रेषा समांतर कधी,

मिळतात का मज सांग सखे |

दुःखं याचे नाही की,

एकमेका आपण छेदत कैसे नाही,

दुःखं याचे नाही की,

परस्परांस एका बिंदुत,

भेटत का नाही,

दुःखं वाटते इतकेच की,

पाहुन तुही मला,

तुझी वेदना मला अन,

कधी माझी वेदना तुला,

परस्परांस परी,

कधीच .... व्यवहार न जमतो काही,

आज तरी सुचवू पाहतो स्वतःलाच,

कोडे हे सुटणार कसे,

दोन रेषा समांतर कधी,

मिळतात का मज सांग सखे |

गेलीस तेच बरे झाले………।

गेलीस तेच बरे झाले,उगी आसवांचे ओझे,मजलाही आता नको झाले,नको झाले ते क्षण सारे,जे डंखूनि पुन्हा पुन्हा,सदैव अस्वस्थ मज करते झाले,आतातो तुझ्या श्वासांचा गंधही नको,अन तो तुझ्या असण्याचा  अंध स्पर्शही नको, नाहीस हेच सुख,काय सांगू तुज,मज कितीसे झाले……  गेलीस तेच बरे झाले,…… …… …… माझा कधीच नव्हता अट्टाहास  पण तच म्हणायचीस वेळोवेळी,अन कसा विरोधाभास बघ  कि तुझ्याच हातून ,आज तेच सारे खरे झाले, गेलीस तेच बरे झाले।

हे उपकार तुझे,राहतील मजवरी …. कि …. शहाण्यांचे शहाणपण,वेळीच तुला बरे आले,अन वाळवंट होता होता,अवचित …. मज आयुष्यात  शीतल सारे झरे झाले,आज शांत मी…. न कुठली कटकट …. न उगाच वटवट,…. दिलेस इतके …. हेच काय उणे झाले,आता नको दुजे काही,इतकेच मजला पुरे झाले,तू गेलीस तेच …… ..... फार बरे झाले ।

तुझ्याविषयीचं असं  ……शेवटचंच ।

कदाचित आता तुझ्याविषयीचं असं,

हे लिहणं शेवटचंच असेल,

कारण ……

लिहिण्याच्याहि पलीकडे आता,

बरच काही घडलंय,

पण फक्त माझ्या आयुष्यात ,

फक्त माझ्या एकट्याच्या अंतरात,

आता तुला काय वाटत

हे समजण्यास मार्ग नाही,

अन समजुन घेण्याचा माझा

कुठला अधिकारही नाही

मी लाख म्हनेण

पण त आता

मला हवी अशी

र्ण जशीच्या तशी

मिळणं शक्य नाही,

हे अगदी कळतं ,

मनासही  पर्ण पटतं ….

पण …. काळजाचं काय ?

ते आजही फक्त

तुझ्या उल्लेखासरशी ,

वेड्यासारखं धडधडू लागतं

हात कापरं भरल्यासारख

थरथरू लागतात,

अन जिव्हा ….

अचानकचं पंगु होवून जाते,

आता माझं हे थरथरणं….

अन धडधडणं  कदाचित

तुझ्यासाठी नवीन नसावं,

कारण त ते पाहिलयसं

अन त्यासाठी मला झिडकारलंयस देखील,

पण तरीदेखील मी

माझ्याचं स्वाभिमानाची लख्तरं

उरास बांधुन

लंपटाप्रमाणे कित्येकदा

तुझ्या अस्तित्वाच्या ….

पालखुनाच शोधतोय,

अन तुझा एक शब्द ,

तुझी एक झलक ,

यासाठी रात्र रात्र झुरतोय

खरंच याला काय म्हणायचं …?

मला नाही ठाव

कारण …  याला प्रेम म्हणायची मुभा,

मला समाज देत नाही

अन त्याहनही

माझी स्वयंप्रेरणा त्यास

व्याभिचार म्हण

माझी सतत निर्भत्सना करते,

परंतु आता

तुझ्याविषयीचं हे वाटणं

फक्त त अन मी म्हणतोय म्हणुन

बंद होणं शक्य नाही

कारण ते आता या वरवरच्या तत्सम….

शारीरिक भोग संभोगाच्या ….

पार पुढे निघून गेलंय ,

अन अंतरातल्या निस्सीम अंधारात,

माझ्या स्वयंस्फुर्तीच्या आत्मरूपी जमिनीत ,

त्याची मुळं खोल रुतलीत,

अन ती इतकी घट्ट झालीत ,

कि माझ्या अस्तित्वाचा ,

शेवटचा ठसा असणाऱ्या,

माझ्याच अस्थिकलशातील,

राखेच्या प्रत्येक कणाकणातून

कदाचित ते तुला साद देतील

अन मला ठावक आहे कि ,

तेव्हाही…  तू माझी अशीच

अवहेलना मांडशील

……… जावू दे ….

आता तुला हे रडगाणं

कदाचित रोजचंच असेल ,

अन मी दाखवू पाहत असलेलं ….

दोन शब्दांमधल्या

रिक्त जागेतलं विश्व,

तुला कदाचितचं दिसेल

पणं आता  हे मात्र नक्कीच

कि तुझ्याविषयीचं असं

माझं लिहणं हे मात्र शेवटचं  

अन शेवटचंच असेल ।

***

***

रेट करा आणि टिप्पणी द्या

Raj 2 वर्ष पूर्वी

Santosh Dhakane 2 वर्ष पूर्वी

शेअर करा