निशब्द अंतरंग - 4 Vishal Vilas Burungale द्वारा कविता मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निशब्द अंतरंग - 4

निशब्द अंतरंग

भाग - 4

भगवा .....|

जाग हे तरुना,

जागु दे वतना,

पेट हे हृदया,

पेटु दे जना,

उठा ! उठु द्या त्यांना ,

अंधाराच्या पतना,

तरच जागेल त्यांतुनी,

स्वराज्याचा दाता,

स्मरूनी पराक्रमा,

घालितो मुजरा,

मानाचा शिवबा |

रक्त शिवबाचे,

सळसळुदे अंगा,

घुमू दे नाद पुन्हा,

मराठीचा गगना,

राज तुतारीचे,

कळु दे जना,

ठसु दे त्यांच्या मना,

“ मरू किंवा मारू ” हाच अमुचा,

रणांगणीचा बाणा,

पलायनवाद कोण कुठला,

ठाऊक नसे आम्हा,

जाग हे तरुना,

जागु दे वतना |

बछडा तु वाघाचा,

सांग डरकुणी त्यांना,

देश हा मर्दांचा सारा,

नाही भेकडांना थारा,

जाणु दे त्यांना,......

की काळ आहे भगवा,

निघतो क्षणाक्षणा,

येथे बलिदानाचा फतवा,

जाग हे तरुना,

जागू दे वतना |

झापडं डोळ्यांची खोला,

ओळखा या पारसा,

अहो अमृताहूनही किमती,

माय मराठीचा वारसा,

ढोल ताशा निनादु दे पुन्हा,

गाण्या मायबोलीचा थोरवा,

जाग हे तरुना,

जागु दे वतना |

समृद्री असो वा कडेकपारा,

मर्द मराठा मीच आहे रांगडा,

मुंड्या चीत करण्या गनिमा,

सदैव तासले या मनगटा,

नाही पारावार कुठे,

माझ्या या साहसा,

जाग हे तरुना,

जागु दे वतना |

सोडा संस्कृतीचा शिमगा,

सोज्वळ दीप घ्या हाता,

पुरे झाला भ्याडपणा,

मर्दांनो पुन्हा नव्याने जागा,

‘ श्रीं ’ ची इच्छा अपुरी,

करा मार्गस्थ आपुल्या मार्गा,

...... मशाली पराक्रमाच्या

....... पेटु द्या पुन्हा,

अन् हिंद केशरी खुला,

होऊ द्या गगना,

जाग हे तरुना,

जागु दे वतना |

जेव्हा पेटतो सह्याद्री......|

पेटला उभा सह्याद्री,

अन् पेटली मराठी माती,

सवंगड्यांच्या खांद्यावरती,

.... स्वराज्याची तलवार रोखी,

हे शिवराज शिवशिरोमनी,

गद्गद् तवचरनावरती,

वाहतो सर्वस्व .....

अन् सारीच ती नातीगोती....|

कंपने अजुनही धडधडती,

पेटते अजुनही छाती,

गनिमास रोखण्या,

अजुनही सळसळती तलवार हाती,

अस्मानी असो वां सुलतानी,

संकटास अमुची वाटते भीती,

.... गरजतात जेव्हा तोफा तटी,

अन् हर हर महादेव,

सिंहनाद ओठी,

... निखळतात सारेच तख्त,

अन् होते उभ्या सलतनींची माती,

....... जेव्हा पेटतो उभा सह्याद्री,

अन् पेटते मराठी माती |

सोंग…|

अजाणतेपणात जाणतेपणाचे,कसे सोंग घेतात लोक,ठेवुनी भार शिरावर,मुक्तकंठे …… कसे गीत गातात लोक,हे सांगण्याचे ऐकण्याचे …. सायास व्यर्थ,तरीही …. पळत्यामागे …. का असे जातात लोक,अजाणतेपणात जाणतेपणाचे,कसे सोंग घेतात लोक

साधनेचा व्यर्थ बोबाटा,वासनेत किती वाया जातात लोक,भोगन भोगायचे सारे,अन ब्रम्हाचे भले गीत गातात हे लोक,जे प्रारब्धी …. तेच आपुले,कष्टापासुनी दर जातात लोक,अजाणतेपणात जाणतेपणाचे,कसे सोंग घेतात लोक।

मी लिहितो व्यथा तयांची,जयांच्या शब्दांसवे आसवे राहतात रोख,मी सांगतो व्यथा तयांची,जयांच्या मतीस,दुषणे रोज देतात लोक,मी पाईक असाचकुण्या ठिकाणचा,जयास …… व्यर्थ …. उगी म्हणतात लोक,अजाणतेपणात जाणतेपणाचे,कसे सोंग घेतात लोक।

अस्वस्थ

क्षण आजचा मजला,ऐसा अस्वस्थ करतो आहे,भेदण्या …. भयाच्या शृंखला,वाद अंगी भिनतो आहे,हे आज शंकांचे,अन कातरल्या अंकांचे ,भयनाट्य संपवितो आहे,हा चेतवूनी सिंहनाद उरीचा,मी …. रणी शंख फुंकीतो आहे,क्षण आजचा मजला,ऐसा अस्वस्थ करतो आहे।

मी न मानतो जात कुणाची,न उचनीच भेदही जाने,कतृत्व माझे शस्त्र अन,चारित्र्य हा रथ आहे,हा आक्रंद नव्हे…… जो शब्दांत माझ्या पुन्हा एकवटतो आहे,हा तर आक्रोश मनीचा,जो अंतरात माझ्या…. आग पेरतो आहे,हा सत्तेचाच बाजार अवघा,वेड भयाण मज अंगी भरतो आहे,क्षण आजचा मजला,ऐसा अस्वस्थ करतो आहे।

व्यथा दुष्काळी

मी तुला पिक, पाणी, पैसा,…. काही काही मागत नाही,अन उसन्या तोंडाने माझ्या उसनं काहीच बोलत नाहि आज जे बोलेल ती,…. तप्त …… तहानलेली अन भेगाळलेली जमीन बोलेल,आता …. जाब मी विचारणार नाहीच आता …. फक्त सापळ्यांत अडकलेले,मुके जीव …. शेवटचा हंबरडा फोडतील,अन कदाचित …… जगण्याचा शेवटचा श्वास,जगण्याची शेवटची धडपड,त्या शेवटच्या मुसमुसण्यात दडली असेल आता काही सांगावे असे,…. उरलेले दिसत नाही,शब्दांनी शब्दात वळावे …. असे भाष्यही मला सुचत नाही,पण राहवत नाही म्हणून …. भुकेने पिळवटलेली आतडी सांगतील काही,शेवटची विरत चाललेली धडधड बोलेल काही,कहाणी शब्दांत ऐकायची असेल …… तर आता उशीर फार झालाय …. जिव्हेस तर केव्हाच …… वा मारून गेलाय,जिथे निळ्या आभाळापलीकडलाही ,मुकाबहिरा अन आंधळा झालाय तिथे तुझ्यामाझ्यासारख्या माणसाची काय गत,पण जर ऐकायचीच असेल वेदना,तर कत्तलखान्यात अखेरचे श्वास मोजणाऱ्या

गायींच्या मुखांतून ऐक,कदाचित त्याहन वेगळा टाहो …… कुणालाच फोडता यायचा नाही ।

स्फुरण …।

भांडतात आकाशाशी,नभ असेच का उराचे,फिरतात सवेग दिशांत,वारे वेडावले फुकाचे,हे अंतरातले वारू,उधळते पुन्हा कशाने,हे प्राक्तनावरी आरूढ,क्षण भेदरले कशाने,आसवांत सबंध आता,दुःख उधळले जयाने,हासण्याचे वेड वेडे,त्यास लागले कशाने,पेरलेत पदोपदी…,कंटक वेदनेचे जयांनी,शब्दांस तयांच्या,वेड लावलेच ना कोणी,हि आवेग भरली भाषा,तोडते …… पाश सारेच या जगाचे, अन भांडतात आकाशाशी,नभ असेच का उराचे,फिरतात सवेग दिशांत,हे वारे वेडावले फुकाचे।

साकळून रक्त जरी…….|

साकळून रक्त जरी,जखमांत माझ्या वाहिले,जीवन खरे तेव्हाच वेड्या,मरणांत माझ्या मी पाहिले,बलवत्तर नशिबाचे,झेंडे जरी न वाहिले,कणखर बाहुंत तोलुनी,वितभरहि…. न विश्व आता राहिले,साकळून रक्त जरी,जखमांत माझ्या वाहिले,जीवन खरे तेव्हाच वेड्या,मरणांत माझ्या मी पाहिले।

सावर रे …।

सावर रे मन माझ्या,हुंकार अंतरी पेटतो आहे,रक्तात नाहल्या दिशा अन,कोण अंधार वेढतो आहे,सावर रे हे अंतरीचे,तुफान साजले आहे,आवेशात दैवाच्या,हे सैतान माजले आहे,हा आता होऊ दे झंकार,या ज्ञानाचा टंकार,प्रलय आता आसवांचा,न वेग हा कासवांचा,अविष्कार निर्वाणीचा,आज इथे घडतो आहे,सावर रे मन माझ्या,हुंकार अंतरी पेटतो आहे।

हे जगणे काय जगणे आहे,स्वत्वात जे धडपडते आहे,हे मरणे काय मरणे असेल,स्वार्थात जे बरबटले आहे,हे सारे पाहतो मी दुःख,मज समोर जे घडते आहे,हा पाहतो अन्याय असा,अन् तरीही मजसाठीच मी,रक्त जाळीत बसतो आहे,कशाचा शोक तुज हा,हे अज्ञान पामरा,जग असा झोकुनी प्राण,देऊनी त्राण ,झटकुनी अवघे दुःख,दे सारे जीवन तु दान,हा प्रण आता मुळाशी,अन् रोमरोमात सळसळतो आहे,सावर रे मन माझ्या,हुंकार अंतरी पेटतो आहे।

अधांतरी ……………..|

मी शब्दांखातर मौनाचे,

व्रत पाळले आहे,मी अर्थाखातर भ्रमाचे,

पिक जाळले आहे,या क्षणात माझिया,मी न वाटतो जसा,या रणात माझिया,मी न लढतो जसा,मी असंख्य आठवांचा,मांडून डाव बसलो,अन गुपित मनीचे ……. हे कोणास सांगूनी फसलो,मी अधीर भावनांस या ,थोडेच चाळले आहे,दुखास स्वतःहून कोठे,गळ्यात माळले आहे ,अन या शब्दांखातर मौनाचे,

मी व्रत पाळले आहे।

मज प्रत्येक भावना हि,

आसक्त फार आहे,मज प्रत्येक वेदना हि,

आरक्त फार आहे,परी तु राख करुनी साऱ्यांची,मज येऊनी भेटणार आहे,आसवांचा आहेर नाही,सहवास अनोखा,फुलणार आहे,हे दिवास्वप्न नव्हेच माझे,हे अंतरातले रत्न आहे,न होईन पारखा असा,माझा सदैव यत्न आहे,हि चव आशेची,मी चाखतो अशी,जरी निखाऱ्यांनी घातांच्या,मन कित्येकदा पोळले आहे,म्हणून शब्दांखातर मौनाचे,

मी व्रत पाळले आहे,मी अर्थाखातर भ्रमाचे,

पिक जाळले आहे।

अंत …. पाहिलेला …।

अंतरात माझ्या अंताचा,थरकाप उठतो आहे,अंधारात अस्मानाचा ,नाद खणखणीत घुमतो आहे,उषेची अपेक्षा ….आज… न राहिलीच काही,तमात अवघा अंध मी,मन चाचपीत फिरतो आहे,प्रलयाची चाहुल हि की,प्रत्यक्ष तांडव मी,प्रलयाचेच पाहतो आहे,अंतरात माझ्या अंताचा,थरकाप उठतो आहे ।

मी असीम आयुष्याचे,कुरवाळीत गीत बसलो,मी उगीच संसारात हे,मागित मित बसलो,न राहते प्रेम …न द्वेषही राहतो इथे ,कटुच सत्य मी ….जसे मज नयनांनी पाहतो आहे,अंतरात माझ्या अंताचा,थरकाप उठतो आहे ।

घे सुखाचे घोट पिऊनी,दे दुःखाचे लोट उधळूनी,जे म्हणते आज हि भुमी,शपथांचे टाळ नकोच म्हणोनी,प्राणांची आहुती …हवीच तिज जरी,परी प्राणांस माझ्या मखमली ….…… वलयात मी जपतो आहे,अंतरात माझ्या अंताचा,थरकाप उठतो आहे ।

बेगडी सारे …।

आज इतुके नक्की कळले ,जगात माणसांचे फक्त कळप उरले,आज इतुके नक्की कळले,ढोंगची असते सज्जनता,सैतानांनी रान भरले,कळले……असेही,कळले ……तसेही,उमगले असेही ,उमगले तसेही,थारोळ्यात भावनांच्या,लटकेच भाव …… इथेही अन तिथेही, हरतो मी अशा ठिकाणी,रडतो मी अशा ठिकाणी,जिथे … मुखवट्यात फुलांच्या,निखाऱ्यांची रास असते,पापण्यात आसू अन्,काळजातुनी राख उठते,उगीच थरथरते काळीज उरी,तेही फक्त व्यर्थ वेडे ठरले,आज इतुके नक्की कळले ,जगात माणसांचे फक्त कळप उरले… …… फक्त कळप उरले।

रिक्त अंतरात.....|

अंधारात कोंडला जो,

अंतरीचा मित आहे,

जखमांस माझ्या सांधते जे,

अवडंबराचे गीत आहे,

अहंकारास मनीच्या,

स्वत्वाचा आलाप माझा,

मीपणास अभिमानाचा,

साज रेशमीच माझा,

रोग बरा नव्हे द्वेषाचा,

अंत बरा नव्हे रोषाचा,

परी रक्तात माझ्या हा विषय,

..... ऐसा भिनला आहे,

मी आहे कोण ?

प्रश्न ...... मलाच कुठे सुटला आहे |

घे भरारी म्हणे….

मन माझेच मजला,

बांधुनी साखळदंड पाया,

ओढ म्हणे आभाळाची काया,

काय अंतची संपवेल आता ?

हि या जन्माची गाथा,

सांगावे कैसे ... बोलावे कैसे,

मौनात भांडतात किती,

मज मनीच्या आशा निराशा,

सोडले मी जल ज्यावरी,

तो संसार ......

आज जखडूनि वासनेत,

ठार मजला करतो आहे,

अन् आगतिक मी .....

दैवासाठी ..... देवापुढे झुकतो आहे,

हे मरणे माझे असेच ,

किती..... सारखे अन नित्य आहे,

बरळणेच माझे हे असे,

किती अन् मिथ्य आहे,

मी मानतो म्हणुनी,

जगाची हि रीत आहे,

अंधारात कोंडला जो,

अंतरीचा मित आहे,

जखमांस माझ्या सांधते जे,

अवडंबराचे गीत आहे |

पारख …………………।

मी पारखलीत माणसे,कि माणसांत दडलो मी,उरात जरी नसते काही,ज्वालांत का जळतो मी,आज मनी खंत न माझ्या,तरी का काळास ऐसा भिडतो मी,अंतिम श्वास हरक्षणास माझा,घुसमट का साहतो मी,अंगी असे तेज मज का ?का … भासात ऐशा जगतो मी,मी जपलीत ऐशी श्वापदे,कि श्वापद म्हणुनीच जन्मलो मी,हि अशी … मी पारखलीत माणसे,कि माणसांत दडलो मी ।

अधीर आत्म संचित आहे,हरक्षणास… का मी वंचित आहे,हे भावनांचे वादळ,… आजचे ना ?अंगात कोणते ,ज्वार उगा भरतो मी ,ठीक एकटाच …. सज्ज मी,प्रलयासहि आव्हान ,आज इथे करतो मी,मी मिटेन इथेच,वन्हित माझ्याच,न मरणास असा डरतो मी,मी अशी कितीशी…… पांघरलीत आसवे,कि आसवांनीच भुणभुणतो मी,मी पारखलीत माणसे,कि माणसांत दडलो मी।

अनुत्तरीत …………।

मनात या रणात या,पेटत्या तणात या ,शोधतो कुणास मी,काय पुसतो जनास मी ?

मी कोणता आवेग हा,भास कोणता सवेग हा,हे काय जे मी मांडले,हे काय जे मी सांडले,सांडल्यात भावना,सांडले विश्वासही,सांधल्यात मी खुणा,सांधलेत घावहीतरी पुन्हा पुन्हा कसे,वार होती आगळे,ज्यांस जाणले कधी,लोक … तेच का हे वेगळे ?

रक्तात माखणे कधी,कधी उगीच हासणे,आयुष्य एक कल्पना,कल्पनेतले भुत हे,हा कोणता मार्ग ,अन् काय कुठले सुत हे,न जाणवे कधीच जे,कोणते असे रूप हे,अगणित आसवे मी,ठेवली मनात या,एकटाच अन् स्वैर मी,हिंडतो वनात या,आता… नको… जागा… मजला जनात या,मनात या रणात या,पेटत्या तणात या ,शोधतो कुणास मी,काय पुसतो जनास मी ?

म्हणतात कोणी मी बोलत नाही…।

म्हणतात कोणी मज,असा मी बोलत का नाही,मौनाशी सदैव आर्तता,छंदात शब्द बांधत का नाही,…. का अशी बधिर वेदना,मनात कोणी …. ,कोणासाठी… राखत नाही,म्हणतात कोणी मज,असा मी बोलत का नाही।

भावनांच्या अस्तरास जेव्हा,अविश्वासाचा कौल जातो,रंगात येती द्वेष तेव्हा,आपलेपणा दुर जातो,सांभाळला ज्यांनी अंतरात,राग एवढा जो सुप्तपणे,मी तरी का बोलू त्यांसी,जाणतो जरी सारेच …

….. मी अस्खलितपणे,शंकास मग् तुमच्या … इथे जागाच राहत नाही,अन् उगीच पुन्हा म्हणतात कोणी,असा मी बोलत का नाही।

नात्यात गुंता असतो कितीसा,थोडासा नडीचा,चांगल्या घडीचा,स्वार्थी आम्हांस …. जरी म्हणतेच कोणी,स्थिर आम्ही आमचे ठायी ,उगाच बाजार भवनांचा,उघड्यावर मांडत नाही,अन तरीही …. म्हणतात कोणी मज ,असा मी बोलत का नाही ।

बहुत याद करता हु मै ….|

बहुत याद करता हु मै ,वो वाकीये वो हस्तीयाँ ,गुंजती है कानो मे,उस वक्त कि … गुढ पंक्तीया,बहुत याद करता हु मै ,वो जलवे हुस्न यार के,बेअसर उस दीदार के ,मांगती थी प्यार जो,प्यारी उस मुस्कान के,बहुत याद आती है अब ,वो रोशनी कि बारीशे ,और जन्नतो कि ख्वायीशे ,असर करती है अब भी,अधुरी हमारी … हर एक वो रंजिशे ,सोच मे आती रहि ,उन सर्दियो कि गर्मिया,बहुत याद करता हु मै,वो वाकीये वो हस्तीया ।

वज्र………।

सक्त माझ्या अंतरीचा,वज्र आज जागू दे ,होऊ दे सर्वत्र स्फोट ,अंगात तेज येऊ दे ,हे घना बरसून जा ,त्वेष माझिया अंगीचा ,हे रणा पेटून जा ,घेऊनी वसा जंगीचा ,हे लखलखती लपलपती …,दुरची तु वीजकांती,थोडी नसानसांतुनी तुझी ,होऊ दे आगळीच ती … विश्रांती,भिनुद्या दिशांच्याही,अंगात पेटत्या भावना,रंगूदे रंगात त्यांच्या ,सर्वांगीच्या पालव्या ,कणाकणांस आता सृष्टीच्या,सत्य अंतीचे मज सांगू दे,कोणी न इथे कोणाचा,भेद मनासी जाणू दे,सक्त माझ्या अंतरीचा,वज्र आज जागू दे ,होऊ दे सर्वत्र स्फोट ,अंगात तेज येऊ दे ।

घुसमट ………।

नको रे मना विसंबणे ,उगीच कोणावर कधी,नको रे मना निकट कुणाच्या ,सहवास अतीही नकोच रे,मन गुंतते जिथे,वेदना तिथे,तितकीच दाहक चुकते ना,नको रे आता कुणाचा विश्वास,अन् नको कुणाची शाबासकी,नको जगाचा विचार,अन् नको फुकाचाच …. व्यर्थ तो सदाचार,नको कोनाशी चांगले बोलणे,अन् नकोच कुणाशी… व्यर्थ भांडणे ,नको मुळी संवाद कुणाशी ,अन् नकोच तो विवाद हि ,स्वत्व अंतरी भरपूर आहे,शोध घेणे हेच बरे,जगाचा व्यवहार … कोणासी कळला,कोणी म्हणतो मीच तो पाळला,डावावरती प्रतिडाव टाकुनी,फासा त्यांनीही तसाच टाकला,नकोत अशी राजकारणी माणसे,नकोत उराशी तहाची तोरणे,जळलोच जरी एकटाच जळेन,हरलोच जरी एकटाच हरेन,परी …. सर्वस्वी स्वतःत मी,स्वतःस ऐसाच तारून धरेण ……स्वतःस ऐसाच तारून धरेण।

दाह……।

दाह माझ्या अंतरात अजुनी धगधगतो आहे,राह कोणती कोणास ठाऊक ,द्वेष अजुनी सळसळतो आहे,हा आक्रोश कोणता,हि कोणती अस्वस्थता ,हे कोणते परकेपण,अन् हा घेतलेला एकटेपणा,सांगितले कुणी मज ,ना ऐकतो मी कुणाचे कधी,मी निश्चल मज निच्छयावरती,अढळ राहतो सदाच जरी,त्रास होतो अंतरास ,रुक्ष वर्तनात बुडाल्या,कठोर त्या भोवतालचा,अन् त्रास होतो भोवताली,दाटलेल्या सर्पटांचा,मी क्षणात भोवताली,कुंपणे घातलीत सारी,मी अशीच कंटकांची,रास पेरलीच भारी,आतुनी परी नजाणे का?सारखा जीव हळहळतो आहे,घाव लागला मर्मावरती,सारखाच तो भळभळतो आहे,दाह माझ्या अंतरात,अजुनी धगधगतो आहे…………. …. अजुनी धगधगतो आहे ।

अंतरात भावनांचा……………….|

अंतरात भावनांचा उठला उठाव आहे,कुठे तू कुठे मी कुणाचा कशास कुठे ठाव आहे,आता भेटलेले ऐकलेले ,मनी तुझे ते गाव आहे,एकटा मी …. अन् एकटाच भाव आहे,खुळेपनाच जाणतो माझा मी,कि ..... तुला न आठवण माझी,अन् आठवणींचाहि तो फक्त बनाव आहे,अंतरात भावनांचा उठला उठाव आहे।

सारे कळते मला,पाहिलेले अन् न पाहिलेलेही,सारे जाणतो मी ,ऐकलेले अन् न ऐकलेलेही ,तरी मज सोडती ना ,मृदु शहार तुज स्पर्शांनी बावरलेले,तु येशील म्हणुनी ,मज काळजाने सावरलेले,परि… आज हसतो जो मजवरी,तो जुनाच... खुळा जमाव आहे,अंतरात भावनांचा उठला उठाव आहे।

ति. सर्वेश्वरास ………।

जन्मभरी हे खाच खळगे,सोबती मज असतील का रे?सोबतीस ज्याच्या सदैव ,दंश मज छळतील का रे ?असे स्वप्न मज ……

पहायचे का होते?जे दावलेस मजला …… …. ते अंतास जायचे का होते?तु केलेस वार …… मर्मावरती ,बेफिकीर मज कर्मावरती,मी शिकायचे काय …. प्रश्न या जगण्यावरती …. मी जगायचे काय … प्रश्न अवघ्या असण्यावरती ,म्हणतील कोणी ,काय …या शब्दांचा अर्थ ,जे लिहिले ते,जाईल सारे व्यर्थ … परी अंतरातला ज्वाला … ओळींत मी पेरला आहे,कोण उमजेल मजला ,कोण समजेल मजला,सोड … याची मला फिकीर नाही … प्रसंग बेताचे न जाने ,असेच … कितीदा येती जाती ,कैफियत मांडावी म्हणुनी … तुझ्या माझ्यात हि कविता होती ,आता यातुन गड्या … लवकरि सावरिन का रे ?का ऐसेच जगणे झुलून सारे ,झुलण्यात जन्म … … वायाच का रे ?जन्मभरी हे खाच खळगे ,सोबतीच मज असतील का रे?सोबतीस ज्यांच्या … सदैव ,दंश मज छळतील का रे ?

इथे आता अमुचे………।

इथे आता अमुचे ,कार्य नसे काही ,दिसते आजही आम्हा ,उगाची स्मशान घाई,इथे कुणाचेच कधी ,मार्ग नव्हते साधे,इथे कधीच नव्हती शांती ,शब्दांचेच उसासे ,इथे अंतापर्यंत झगडण्याची ,शर्थ जरी अमुची होती ,खड्ग राहिले हाती,वीरगती एका दमात आली,या जगण्यास ऐसा कोणता ,अर्थ उमगत नाही ,इथे आता अमुचे ,कार्य नसे काही ।

जितुका आत्मि तळमळतो ,जितुका अंतरी हळहळलो ,तो विषाद मनीचा कधी ,अंतासि भिडलाच नाही ,पाखरांच्या परांस जणु ,आघात ऐसा घडलाच काही,पंगु झाली आयुधे,विरली शब्दांची पालवी,आता राह न कुठली ,न राहिली आशाही काही ,इथे अमुचे आता ,कार्य नसे काही ।

भरदुपारी…………..|

भरदुपारी मला चांदण्यांचा भास होतोय ,क्षणात एक अन् क्षणात दुजा ,आभास नवा … असा मनी दाटून येतोय,भरदुपारी मला चांदण्यांचा भास होतोय।

उण्या दुपारी उणे वारे,झळ पांघरूनही शीतल झाले ,आठवण थोडी विसरू पाहतोय,मनात परी …. मनाचा कल्लोळ ,शब्दावाचून सुसाट वाहतोय ,भरदुपारी मला चांदण्यांचा भास होतोय।

सरकन कधी …. काटा उभा राहतोय ,भरदुपारी उन्हाखाली … रात्र जणू अशी त्या सूर्यास छळतेय," जा जा लवकर " जणु असचं म्हणतेय ,मग बिचारा तोही … थोडा उदास होतोय ,जडलेल्या भावना …. मनात ओढून घेतोय ,अन सा-यांसाठी नाही … पण माझ्यासाठी तरी …. भरदुपारी … सुर्यानारायनही विश्रांती थोडी घेतोय … म्हणूनच …. भरदुपारी मला चांदण्यांचा भास होतोय… ……… चांदण्यांचा भास होतोय।

रे मना…………..|

सांग रे मना , कोणता प्रमाद ,उगाचा उन्माद कशासाठी ,अमृताचे पेले, रिकामे ठेले, मनाचे वारू ,कामा नये,सोड आता, बोल आता ,जगाचा बाजार, झाला पुरे ।

तु बोल, ऐकतो मी ,तु सांग, पाहतो मी ,असे कित्येक व्यवहार,मांडू आता ।

हा उरीचा वन्हि ,जाना कधी ,सांगू किती ,कोणा कोणा ,मला न कल्पना,उगीची वल्गना ,करता येते मज नाही।

कर्माचे देता,येते घेता,ऐसे काही ,सांगा पाहू ,जगाचे वाद , नसे संवाद ,असे काही ,नाही जगी ।

पेटला खुळा बाजार.......|

आता पेटला खुळा बाजार….

माझ्या अंतरात आहे,केवड्याचा गंधही…

मज उत्तरात आहे,श्वास माझे माझी परीक्षा ,सतावते मज तीची प्रतिक्षा,उर भरतो क्षणात माझा,क्षणात विस्तावांचा ,चरचर काटा…

काळीज जाळतो आहे,कुण्या जन्मीचे पाप माझे,म्हणुनी आसवे…

चुपचाप मी ढाळतो आहे ,आता रसरसते यौवन कुठले,गुंडाळला जीव……

उधडल्या लख्तरांत आहे,आता पेटला खुळा बाजार …. माझ्या अंतरात आहे ।

पाठीत खुपसला खंजीर म्हणावा,तरी प्राण कुठे माझा… मज माझ्यात आहे ,वरवरची हि काया साजरी,अंतरंग सारा … तिनेच तर भरला आहे,का हि समस्या मज पडावी,जर … नकार तिचा स्पष्ट आहे ,समजून हि न समजण्याची,हि अशी काय गोष्ट आहे,आठवणींनी हादरतो मी आजही ,हेलावतात तेच वेडे प्राणही ,आता उरला जो श्वास… तोही केवळ या कंपनात आहे,अन् तोच पेटला खुळा बाजार …. माझ्या अंतरात आहे… माझ्या अंतरात आहे।

नको ...|

संपलो खरेच आता संपण्याचे भास नको,हरलो खरेच आता जिंकण्याची आस नको ,दुर गेला अंधकार अन जरी दुर सारी माणसे ,कोणता जपलास मीपणा ,अन कुठे राहिले… आपलेपण फारसे ,जाहला इतुका… तमाशा पुरे आहे,असे तुझे वागणे … हेही फार जुने आहे ,आता असावांनाहि… ओघळण्याचा त्रास नको ,सुख मोजून चार क्षण… पुन्हा दुःखाची रास नको,संपलो खरेच आता संपण्याचे भास नको,हरलो खरेच आता जिंकण्याची आस नको ।

निर्धार.....|

आज पुसण्यासी | हजार समस्या |

उद्धार करावा | कुणी कसा ||

उगाच वल्गना | फुकट गर्जना |

काळीज सशाचे | घेऊनीया ||

नाहीच उरला | अर्थ कृतकृत्या |

सांगुनिया उक्त्या | जन्म गेला ||

हातांसी चालना | भोगुनी वेदना |

देश घडविण्या | लढु आता ||

साम घेऊनिया | दाम देऊनिया |

दंड आजमावू | एकजूटी ||

घडेल किमया | नमेल दुनिया |

चरणी अपुल्या | खरोखरी ||

सोडुनी सर्वस्वा | प्राणासी मुकण्या |

मातेसी सुख हे | हवे आता ||

तोडुनी माणसे | परकी श्वापदे |

मिरवणे गळा | नको आता ||

स्वभुमी जननी | तेज जिच्या भाळी |

रेखु स्वर्ण भाग्य | हातांनी या ||

स्वदेश हा माझा | अभिमान ज्याचा |

भरला पुरता | रोमरोमी ||

माझाच शब्द हा | घडुनिया ज्वाळा |

तळपुदे आज | पुन्हा पुन्हा ||

तेजात जयाच्या | नाहुनी तरूणा |

आसमंत फिका | पाडु आता ||

भोग आजवरी | साहले मुक्याने |

द्वेष ते नव्याने | डाग आता ||

स्वकर्तुत्वाने जगी | हिच राष्ट्रकीर्ती |

रेख आसमंती | करांनी या ||

मनन...........|

तेजात जयाच्या | भरुनी तयाच्या |

आतुर नयना | बोल आता ||

मनात माझिया | दुःखाची किमया |

नवीच दुनिया | डोल आता ||

अधीर असाच | मनात तसाच |

शब्दांचा बराच | डाव त्यात |

जाणण्या अस्तित्वा | क्षणिक भावना |

आतुर कल्पना | कामी नाही ||

सदाचे झुलणे | शब्दांस जोडणे |

यमक चाळणे | नको आता ||

घडायचे काही | नव्यात हवेसे |

आजही वाटते | काय तसे ||

समजुन त्वरी | मनाभेदी जरी |

सावरली काही | इच्छा नवी ||

न्याय करायची | मनाची फिरकी |

आज मावळली | पुन्हा तीच ||

क्षणांच्या कल्पना | भेदण्या संकटा |

तयार माणसा | नव्यानेच ||

का कोण कसा हा | मनासी पुसण्या |

अधीर हि जिव्हा | झाली आता ||

शब्द खेळ हाची | मनात माझीया |

झुलुनी लीलया | आतुरला ||

म्हणुनी नव्याने | शब्द खड्गांसी |

सावरले मीही | धरुनिया ||

स्वप्न.........|

स्वप्न रेखियले | उज्वल भविष्या |

हे भारत देशा | तुजसाठी ||

पामरा वाटेल | मनासी भावेल |

देश हाची माझा | अहोजन्मी ||

शंका कुशंका हि | असतील बहु |

तेज देण्या यासी | कर्तुत्वाने ||

मान अपमान हा | देशासाठी हवा |

स्वअस्तित्व पहा | देशात या ||

राष्ट्राबांधवांसी | असतील काही |

द्वेष नि मत्सर | विसरू ते ||

आपुले पाउल | पुढते असावे |

मागे पाहुनिया | खचू नये ||

शब्द वाणी हिची | आदर्श व्हावीसी |

जयांनी ऐकावी | तृप्त व्हावे ||

वर्तन अपुले | ठेवुनी आदरे |

मोठ्यांसी जपणे | कर्तव्य हे ||

शब्दधार व्हावी | असत्या परीही |

पुरुनी उरावी | स्वधारेची ||

कर्तव्य आपुले | जाणुनी चांगले |

मार्ग चोखाळणे | न्याय्य हेच ||

समय पाळणे | व्यर्थ दवडणे |

असभ्य वर्तन | गुन्हा हाची ||

नमन तुजला | हे गणनायका |

क्षमस्वी धरावे | भक्तासी या |

नमन शिवासी | भस्म कपाळासी |

स्मशान निवासी | देव हाची ||

नमो सरस्वते: | हे देवी शारदे |

शरण चरणी | तुझिया मी ||

नमन आखिरे | करुनी तत्परे |

परम आत्म्यासी | सदाचेच ||

चिंतन............|

अस्तित्व पहेली | सुटली कधीही |

नाही कोणा-कधी | आजवरी ||

आशा नि निराशा | भेद जयामंदी |

वसतो सदाची | सुटला ना ||

सुख अन दुःख | हेही अतिक्लिष्ट |

प्रश्न बिकट हो | सुटणार ? ||

निरागस अति | बालक लहान |

सुख अकारण | जया भासे ||प्रौढ परी जना | जाणिव सकळा |

दुःख अकारण | का म्हणुन ?||

दुःखाची चटणी | चाखावी भोजनी |

भोजन चटणी | होऊ पाहते ||

सुख दुःखाचा हा | मेळ कधी कुणा |

बसेल का असा | जन्मोजन्मी ||

आशा न कशाची | ध्येय हि विरक्ती |

असेल जयाची | तोची भक्त ||

भक्तासी यश हे | मिळेल खचित |

भावना नसेल | जर काही ||

यशाची महती | शुन्य जयाठायी |

मोक्ष मार्ग खुला | तयासाठी ||

विरक्ती म्हणुनी | संसार सोडणे |

भ्याडाचे लक्षण | असे हेची ||

संसार नेटका | जरूर थाटने |

परमार्थी वहाणे | धर्म हाची ||

कर्माची तुलना | संन्यास संसारी |

करता कधीही | होते जाण ||

संसारी कर्म हे | फळ लगोलगी |

एकाच जनमी | प्राप्त होते ||

संन्यास कर्माही | फळ तितुकेची |

परी जन्म सात | लागताते ||

म्हणुनी संसार | परमार्थ ध्यान |

होतो यांनी ज्ञात | परमात्मा ||

तरी हे श्रीहरी | थोरांची जी तत्वे |

पटली मनास | सांगतो ती ||

कृपा आशीर्वाद ही | राहु द्या शिरासी |

कृपाळा अमुच्या | सदाचाच ||

|| श्री ||

श्री राम ईश्वर | वंदितो चरण |

वाहुनी सुमन | चरणांसी ||

श्री राम नामात | विश्वाचा अर्थची |

जाणुनि सत्वरी | गाईन मी ||

श्री नमन करा | घेऊनी नाम हे |

परम आनंदा | जाणुनिया ||

श्रींचे चरणासी | जाईल जन्मची |

नको अनाठायी | संसार हा ||

श्रीराम समर्थ | संकटे उन्मत्त |

पडतील धरा | पाहुनिया ||

श्री नामाचा अर्थ | कळला जयांस |

परमात्मा त्या | कळलाची ||

श्री राम जयाने | पाहीले मायेने |

पवित्र कायाची | झाली त्याची ||

श्री चरणी ज्योत | जीवन पणती |

सुकृतात जीव | आणील तो ||

श्रीराम सावळा | मनासी भावला |

भक्तीत तयाच्या | न्हाऊ आता ||

श्रीराम मनात | श्रीराम तनात |

भरलाच माझ्या | रोमरोमी ||

श्रीराम विभुती | परम दयाळू |

धरूया मस्तकी | नाम त्याचे ||

श्रीराम देव हा | एकपत्नी सत्य |

संसार दाविला | साजिरा रे ||श्रीराम मुखात | भजु या सुखात |

तारण्या जीवांस | संसारी या ||

|| राम ||

रामराज्य धरी | अवतरले कधी |

मागुनी मोक्ष मी | भजेन हा ||

राम नामांतरी | अभिनव शक्ती |

अवतरते उक्ती | ओठांतुनी ||

राम रामातची | राम विरला हा |

राम नामांनीच | अवतरला ||

राम कंठनाद | घुमतो अखंड |

मोक्ष मार्ग त्याचा | सुकर हो ||

राम आनंदाला | हर्षासी उपमा |

अमृताची आली | रामनामे ||

रामाची महती | जगतात कीर्ती |

सांगावी कशी ती | शब्दांत या ||

राम अधिष्ठित | स्वये प्रतिष्ठित |

हर एक जागी | सदाचाच ||

राम मंत्रानाम | सुखाचे राशीत |

पंख मखमली | फिरवते ||

राम जणु नाद | ह्रदय राउळी |

अखंड घुमतो | हाची खरा ||

राम न कल्पना | हि न संकल्पना |

अस्तित्व खरेची | आहे त्याचे ||

राम जयांनी हा | जाणला तयांनी |

अर्पिले सर्वस्व | तयाठायी ||

राम प्रार्थना हि | मार्ग सुकर हा |

करते सदाची | मोक्ष कामी ||

राम तेवतो ची | माझ्याच हृदयी |

दिसेल कैसा हा | बंद डोळी ||

|| जय ||

जय जय कार | नाम संकीर्तन |

ज्याची महिमा | अपरंपार ||

जय श्रीरामाचे | धरुनी चरण |

पाहिले स्वरूप | हे मधुर |

जय राम नाम | अतुलित गोडी |

भुलली हि जिव्हा | तयाठायी ||

जय राम हरी | भजितो श्रीहरी |

धरुनिया शिरी | चरण हे ||

जय असो सदा | नश्वर संसारी |

अमर कीर्तीचा | तुझ्यारूपे ||

जय जयकार | सदा रामनामी |

भजे निरंतर | जिव्हा हिच ||

जय राम कृष्ण | आवडे सदाची |

जीवन मार्ग हा | सुकर हो ||

जय आसमंती | घुमत राहील |

नामाची आरोळी | सदाचीच ||

जय राम मुर्ती | अखंड कीर्ती |

मनात वसते | जयासाठी ||

जय जय राम | जय सीता राम |

नामांत ध्यानांत | सुख सदा ||

जय घुमत हा | राहील मनाती |

अखंड काळचा | याच योगे ||

जय रघुवीर | सकळांचा दाता |

नमन सदाचे | चरणासी ||

वेड आसवांचे .....|

या आसवांचे वेड मजला,

की भावनांचा कोप झाला,

अन् वेडावलो इतका की,

मज वेडावण्याचा गर्व झाला |

घेतला मुठीत जीव,

कधी रोमांच अंगी आला,

सळसळता शहारा,

काळीज चिरून गेला,

हा आवेग फक्त इथेच,

की तुलाही ......

असाच काहीसा भास झाला,

या आसवांचे वेड मजला,

की भावनांचा कोप झाला,

अन् वेडावलो इतका की,

मज वेडावण्याचा गर्व झाला |

शोधीत राहिलो...

राना वनांत ......

अन् गंध भरल्या

.... मखमली फुलांत,

... तो छंद माझा

... ती धुंद वाचा,

शब्द ओठांत .... काळीज शोधात,

..... कसा प्रश्न मज हा पडला,

की खरेच ..... मजला,

तो प्रेमरोग जडला,

या आसवांचे वेड मजला,

की भावनांचा कोप झाला,

अन् वेडावलो इतका की,

मज वेडावण्याचा गर्व झाला |

डगमगताना दरीवरती……………….|

क्षणात गरजले ढग,

कंठात उरला फक्त धस्,

शब्द ना ओढ गाती,

बंद डोळे थरार सोसती,

डगमगताना दरीवरती,

सावरले मी आत्मवरती |

पुटपुटन्याही शब्द नव्हते,

जिव्हेस माझ्या,

उनाड भरते,

काय करू अन्,

काय स्मरू ,

काहीच कसे ना सुचते,

आकांक्षांची आली भरती,

डगमगताना दरीवरती,

सावरले मी आत्मवरती |

क्षणात पुन्हा मग,

विरळ धुके हे,

क्षणात बावरती,

उंच शिखरे,

सारीकडेच मग्,

थेंब झिरझिरती,

डगमगताना दरीवरती,

सावरले मी आत्मवरती |

धुंद मग सारी,

आज पुन्हा मावळली,

क्षणात वास्तव,

अन् स्वप्ने भंगली,

वेताळपिसी शांतता,

आज कंठानिशी स्थिरली,

डगमगताना दरीवरती,

सावरले मी आत्मवरती |

काहीसे चुकलेले .....|

ते गाव पारखे मजला,

तो देश पारखा झाला,

जीव लावला जेथे,

कसा तिथेच......

अंत मज हा आला,

श्वास हि मोकळा....

कोंदुनि आज गेला....

गुंतुनी आप्तांत साऱ्या,

जीव कसा पोरका झाला,

ते गाव पारखे मजला,

तो देश पारखा झाला |

भुकेल्या पोटी....|

धरावा कसा ध्यास,

आता कशाचा हव्यास,

कसा करावा संसार,

दाटला सारा अंधार अंधार ,

दीप होते जरी उशा,

ना तयांचा प्रकाश,

केविलवाणी सारी धडपड,

जीव घासास उधार,

तु म्हणशील लाख,

मती तुझी तुच सुधार,

पण पाहु कसं माझं,

सुनं सुनं मी शिवार,

कसा करावा संसार,

दाटला सारा अंधार अंधार |

मेलो तेव्हाच होतो,

जेव्हा .... इब्रतीस पडले खिंडार,

मेलो तेव्हाच होतो,

जेव्हा .... जीवावर बेतले घरदार,

आता शंख.....

तुज नावाने करतो,

जीव तुझ्या पायाशी धरतो,

आता तरी...

फुटू दे तुझ्या चरणांत,

... कृपेची .... ती धार,

कोंदलेल्या श्वासांनी तुला.....

आळवतो तुज कुमार,

कसा करावा संसार,

दाटला सारा....

अंधार अंधार .... सारा....

..... अंधार अंधार |

जन्मण्याचे भाग्य ......|

हे जन्मण्याचे भाग्य माझे,

हेच अंतरीचे शल्य माझे,

हा जिंकण्याचा उन्माद माझा...

हे रोजचे झुंजणे,

हे रोजचेच झिंगणे,

परिस्थितीस गुलाम झालो,

हे रोजचेच रडणे माझे,

हे जन्मण्याचे भाग्य माझे,

हेच अंतरीचे शल्य माझे |

मी शीला कोरूनी स्वस्थ होतो,

मी भावना शोषूनी शुष्क होतो,

हे तसे नव्हतेच माझे,

ते तसे नव्हतेच माझे,

आज कंठास छळती,

का कुणाचे दीर्घ उसासे,

आजही शब्दांस वेठते,

न संपणारे संचित माझे,

हे जन्मण्याचे भाग्य माझे,

हेच अंतरीचे शल्य माझे |

मी सांजवेळचा वारा,

मी पहाटेचा सुगंध न्यारा,

परी क्षणास टंच भरला,

तो बोचतो नयनांसी भाला,

जाळीत जाते न जाणे कशी,

कोणती मज ती ...

उग्र ज्वाला,

हे दंड कोणते ....

कोणती शृंखला आहे,

शब्दांत फक्त बोलतो मी,

अंतरी विजेचा,

दाहची जाचे,

हे जन्मण्याचे भाग्य माझे,

हेच अंतरीचे शल्य माझे |