Chetkin books and stories free download online pdf in Marathi

चेटकीण

चेटकीण

एक सुरुवात...

गुमनाम है.. बदनाम है कोई...

किसको खबर कौन है वो..

अंजान है कोई...

पांडया तो रेडिओ बंद कर आदी, रघु पांडुरंगला म्हणला. का घाबरला का काय? आर राच्याला एवढया लांब जायच म्हणुन आणला. बारकाच हाय पन आवाज चांगला येतय. आज आमोशा नाय मग नग भिवुस. तसा रघु चिडुन म्हणाला, आर घाबरत नाय, पन ही जागा लै वंगाळ हाय. इथं कदिबि काय पण व्हइल. आर तुझ्यासंगट साक्षात पांडुरंग हाय, तु काय घाबरू नगस.

म्या आईकलय गेल्या वर्षी हिकडं दोन वायरमन आलेलं ते परत कुणालाबी दिसलं नाय. रघ्या तू म्हणतुय ते खरं हाय, काय झालं असल रं त्यांचं? म्हाइत नाय, पण ती दोघ जिती अस्त्याल अस वाटत नाय. रघु अन पांडुरंगच बोलणं चालू असते तेवढ्यात एक पांढरा ढग त्या काळोख्या रात्री त्यांच्याकडे येताना त्यांना दिसतो. पांड्या आर ते काय हाय? पांडू आधीच पांढरा पडला होता. हळूहळू तो ढग त्यांच्याजवळ आला, दोघांना आता घाम फुटला. तो ढग त्यांच्या डोक्याजवळ आला आणि बरोबर डोक्यावर येऊन थांबला. पांss.. पांss… पांड्या म्हणून रघु ओरडत पळणार तेवढ्यात तो ढग हवेत विरला. दोघेही घामाने डबडबले होते, मग पुन्हा हळूहळू चालू लागले.

आता ते माळरान त्यांना भेसूर वाटू लागले, त्यांच्याच सावल्यांची त्यांना भीती वाटू लागली. मग पांडूने खिशातून देशी क्वार्टर काढली अन एक गावठी सणसणीत शिवी हासडली. तेच्या आयला त्या भुताच्या मला घाबरवतोय काय, येऊदे आता बघू कोण घाबरतय. त्यानं रघूला बाटली दिली तो नको मनाला. आर घे तिथं जाऊन फकस्त फुजच चेक करायची हाय. म्हणूनच नग झटका बसला मजी तिथंच जाळ अन धूर निघेल. तू हान समदी मी हाय काम करायला. चालत-चालत ते दोघे डीपीजवळ आले रघूने फ्यूज चेक केल्या, एक फ्यूज जळली होती. पांडुला आता चढली होती, त्याची बडबड चालू झाली. रघूने फ्यूज बसवली तसे दूरवर बरीकसे दिवे गावाच्या दिशेने दिसू लागले. आपलं काम पररररफेक्ट असतंय, आली का न्हाय लाईट. रघूने एक कटाक्ष टाकला अन पांडुला म्हणाला चला पांडुरंगा आता वारी गावाकडे चालू द्या. पांडू खिदळतो, चल भक्ता. पांडू हे माळरान झपाटतंय खरं हाय का? मला न्हाय माहिती पर हित काय वरसापूर्वी कोण्या बाईला जाळली व्हती म्हणं. जिवंत जाळली? रघुने विचारले. आर न्हाय त्या येळेला पावसानं नदीला पूर आला, मसूनवाटा पाण्यात गेला म्हणून तिला हिकडं माळावर जाळली म्हणत्यात लोकं. चालत-चालत ते पाटलाच्या गावाबाहेरच्या वाड्याजवळ आले.

पांडू हीत लाईट न्हाय का? पांडूने वाड्याकडे पाहिले अन त्याची उतरली, तो रघूला म्हणाला आतला फ्यूज चेक करू. आर समद्या गावात लाईट आली हित नाय म्हणजे वाडा बंद असलं. मग चांगलंच हाय की, काहीतरी कामाची वस्तू भेटल, पांडू म्हणाला तसा पांडूने रघूला ओढतंच वाड्याकडे नेले. ते दरवाज्याजवळ गेले अन दरवाजा ढकलला. आतमध्ये दाट काळोख पसरला होता. रघूने बॅटरी काढली, पांडू लयी अंदार हाय चल जाऊ. पांडू काही बोलणार एवढ्यात त्यांना अंधारामध्ये दोन डोळे चमकताना दिसले. रघुने बॅटरीचा उजेड तिकडे फिरवला तरीही तिकडे ते दोन डोळे चमकत होते. आता मात्र पांडुची सगळी उतरली. अचानक गार वारा सुटला, वाऱ्याने दरवाजा जोरात आदळून बंद झाला. पांडुची दातखिळी बसली पण रघू त्या चमकणाऱ्या डोळ्यांकडे बघत होता. आता ते डोळे एकदम जवळ आले आणि बाजूने निघून गेले. रघुने पांडूला भो केले. पांडू जोरात किंचाळत खाली बसला. रघु मोठ्याने हसत म्हणाला आर काजवं व्हतं ते त्याला बघून तुझी हातभार फाटली. मगा तर मोठ्या बाता मारत व्हता येऊदे भुताला म्हणून. पांडू अजून शॉकमध्ये होता. ते दरवाज्याजवळ आले, दरवाजा उघडला अन बाहेर आले. मग जरा पांडूला अवसान आले. अस व्हतं कदीतरी रघु गमतीने म्हणाला.

मग पांडू उसने अवसान आणत म्हणाला, मी दरवाजा बंद करतो. पांडू दरवाज्याजवळ गेला पुन्हा त्याला दोन काजवे दिसू लागली. एक शिवी देत दरवाजा बंद करणार तेवढ्यात तिथे अजून काजवे चमकू लागले. आर रघ्या आतमदी एवढं काजवं? रघुही आश्चर्यानं बघू लागला. आता तिथे इतके काजवे चमकू लागले की वाड्यातील सर्व दिसू लागले. ते बघून पांडूला परत हाव सुटली, तो भारल्यासारखं आत जाऊ लागला. रघु त्याला धरू लागला पण पांडू काही त्याकडे बघनाही. मग रघुही आत गेला अचानक सगळे काजवे पांडुभोवती फिरू लागले. रघूला थोडे विचित्र वाटू लागले काजवे मग दरवाज्यातून बाहेर जाऊ लागले. पुन्हा अंधार झाला, पांडू भानावर आला त्याला आतल्या गोष्टींनी मोहिनी घातली होती. काय दिसलंर तुला मला काय बी नीट दिसलं न्हाय. तेव्हढ्यात काहीतरी भांडं पडल्याचा आवाज आला. दोघेही दचकले अन आवाजाच्या दिशेने बघू लागले. आर मांजर असलं, पांडू म्हणाला.

पिया तू अब तो आजा… शोला सावन भडके आके बुझा जा… रेडिओ मोठ्या आवाजात ओरडू लागला. पांडू गडबडला, रेडिओ बंद करण्याच्या नादात खाली पडला. रेडिओचा सगळे पार्ट सुटसुटीत झाले. पांड्या रेडिओ सोड चल जरा आत जाऊन बघू. नग आधीच वली व्हता व्हता ऱ्हायली उगा नकु ईशाची परिकशा. आर तू पांडुरंग हाय तुला कशाच भ्या. होय नाय करत बॅटरीच्या बारीक उजेडात ते हळूहळू पुढे जाऊ लागले. दिवाणखाना ओलांडून पुढे एका दाराजवळ आले, दार ढकलले पण उघडले नाही. दोघेही एकमेकाकडे बघू लागले. मग खालीवर दरवाज्या बघितला कुलूप नाही, कडी नाही. म्हणजे आत कोणीतरी आहे रघु म्हणाला. पांडूने दरवाजावर थाप मारली. दोनतीन वेळा दरवाजा वाजवला, काहीच हालचाल जाणवली नाही. मग दोघेही परत फिरले तेवढ्यात आवाज आला कोण हाय भायेर? दोघेही दचकले. रघु म्हणाला आवाज तर एखाद्या म्हातारीचा वाटतोय. मग पांडू म्हणाला आमी वायरम्यान हाय लाईट चेक करायला आलोय. म्हातारी हळूहळू चालायचा आवाज येऊ लागला, दोनतीनवेळा खट खट आवाज झाला अन अंधुकसा उजेड दाराखालून दिसू लागला. पुन्हा चालत चालत म्हातारी दरवाजा उघडायला येऊ लागली.

म्हातारी काय बडबड करतीय र पांडू रघूला विचारू लागला. मलाबी न्हाय कळत म्हातारी हाय कायतरी आसल बडबडत. गंजलेल्या बीजागिरीचा आवाज आला करकर करत दार उघडले, दोघेही बघू लागले. अंधारात पाठीतून वाकलेली, हातात वाकडीतीकडी काठी अन कंदील, तोंडावर सुरकुत्या, पण नजर खुनशी. तिला बघून पांडू म्हणाला तुमचा फ्यूज चेक कराया आलोय. लाईट गेली न्हाय काय, बंद करून ठेवलीय. इकडे यायला लोक घाबरतात म्हणून, म्हातारी म्हणाली. रघु म्हणाला जातो म्हातारे, पांडूला खेचतच बाहेर ओढू लागला. म्हातारी आवाज चढवून म्हणाली थांबा बाहेर पाऊस पडतोय कुठे जाताय. आता तिचा आवाज वेगळाच वाटत होता. ते दोघे तसेच न थांबता बाहेर येऊ लागले. बाहेर येऊन बघतात तर काय, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस पडतोय.

गावातील लाईट पण गेलेली, आता काय करायचं पांडूने घाबरत विचारले. रघु म्हणाला आता काय इथेच थांबु वाड्यात. पाऊस थांबल्यावर परत फ्यूज चेक कराया लागलं. दोघेही परत वाड्यात आले, म्हातारी कुत्सितपणे हसत होती. चहा मिळेल का म्हातारे, पांडू म्हणाला. रघु रागाने त्याच्याकडे बघायला लागला अन पांडू ओशाळला. आणते हा च्या करून पण एकाच जागी बसा, इकडे तिकडे जाऊ नका वाड्यात नाहीतर तुमाला हुडकायला मला तास लागायचा. माझ्या अंगात जास्त ताकद न्हाय. म्हातारी उठली माजघराकडे जाऊ लागली. पांडू पुन्हा इकडेतिकडे बघून मोहित झाला. कंदिलाच्या उजेडात अंधुक का होईना त्याला भिंतीवर कोणाचातरी फोटो दिसला. रघुही बघत होता तो फोटो. कंदील जवळ घेऊन तो फोटो दोघेही निरखून पाहू लागले. एखादी सूंदर लावण्यावती अशी ती फोटोतील तरुणी होती. दोघेही बराचवेळ त्या तसबीरीकडे बघत होते. पांडुची नजर भिंतीवरील दुसऱ्या वस्तूकडे गेले. हरणाचे मुंडके होते ते, चित्त्याचे, रानडुक्कर असे बरेच होते. त्या वाड्याचे वैभव डोळे दिपवणारे होते, अधुनमधुन आता वीज कडाडल्या त्या उजेडात त्यांनाही वाडा स्पष्ट दिसायचा. हळूहळू कंदील विझायला लागला. रघु आर कुट हाय कंदील इजला की, आता काय? बघू म्हातारीची वाट रघूचा फक्त आवाज आला.

आता पावसाचा जोर आणखी वाढला अन दोघांनाही थंडी वाजू लागली. चल माजघराकडे जावून बघू म्हातारी काय करतीये. पांडू चाचपडत रघुचा हात धरून चालू लागला. माजघराच्या दरवाज्यातून आत आले तिथं थोडा उजेड दिसत होता. मांस भाजल्याचा दर्प दोघांच्याही नाकाला झिंजडून गेला. पांड्या म्हातारी च्या करतीय का जेवण. ते दोघे माजघरात आले पण आत काहीच दिसत नव्हते, एका देवळीत पणती जळत होती. तिकडे अजून एक दार होते त्यातून बारीकसा धुर येत होता. पांडू चल त्या दारापल्याड जाऊ रघुने पांडुकडे बघत म्हणले तर पांडू घामेजला होता. नग मी थांबतो हिकडं तू जा. रघु हळूहळू दरवाज्याकडे जाऊ लागला. मांस करपल्याचा दाट वास येऊ लागला. तो दरवाज्याजवळ गेला हळूच दरवाजा ढकलला पण दरवाजा उघडेना. मग त्याने जोरात धक्का दिला अन दरवाजा उघडला.

म्हातारी एका मोठ्या टिप्पाडासमोर (बॅरल) बसली होती टिप्पाडाखाली जाळ होता त्या जाळात म्हातारीचे पाय जळत होते. ते भयानक दृश्य बघून रघुची किंकाळी त्या भयानक वाड्यात घूमली. म्हातारी त्याच्याकडे बघून दात काढून हसू लागली, तिचे डोळे पूर्ण पांढरे होते, चेहरा भाजलेला होता. रघु धडपडत पळत सुटला, पांड्या पळ. रघूला बघून अन आवाज ऐकून पांडू अंधारात चाचपडत पळू लागला. पांडू पुढे अन रघु मागे असे पळताना दिवाणखान्यात आल्यावर रघुने बॅटरी काढली त्या उजेडात दोघेही पळत सुटले. अचानक धाडकन आवाज आला अन पांडू खाली पडला. एका चौकोनी आकाराच्या मोठ्या भुयारात पांडू पडला होता. एका दोरीला उलटा लटकत होता.

रघु बॅटरीच्या उजेडात पांडूला पाहू लागला. पांडू ओरडत होता, तू घाबरू नग मी काढतो तुला भायेर. रघुचा आवाज ऐकून पांडूला धीर आला, तो गयावया करू लागला. मला सोडून जाऊ नग ती मला मारून टाकल. रघु त्याला म्हणाला गप बघूदे जरा. रघु बारीकशा उजेडात बघत होता. अचानक त्याला जाणवले खूप शांतता पसरली आहे, पांडुचे हुंदके कानावर जोरदार प्रहार करत होते. हळूहळू खोलीत कंदिलाचा उजेड पडू लागला. रघु मागे वळून बघू लागला, माजघराकडे म्हातारीची तीच बडबड. दरवाज्यात म्हातारी आशाळभूत नजरेने हसत होती.

म्हातारी मघापेक्षा जास्त उंच झाली होती, दहा फुटापेक्षाही उंच वाटत होती. तिच्या हातात काठी होती ती काठी तिच्या अंगावर फिरू लागली. त्या काठीचा आता एक काळा नाग झाला होता. म्हातारीच्या जळालेल्या भेसूर चेहऱ्याला बघून रघु हनुमानाचे नामस्मरण करू लागतो. ते ऐकून म्हातारी अजून मोठ्याने हसू लागते. म्हातारीने तिच्या नागाला हळूच खाली सोडले. तो नाग हळूहळू पुढे सरकू लागतो. इकडे उलटा लटकलेला पांडू हनुमान चाळीसा म्हणत असतो. अचानक त्याला पायावरती काहीतरी फिरल्याचे जाणवते. हळूहळू कंबरेवर मग पाठीवर, गळ्याभोवती पीळ घालून त्याला नागाचा फणा त्याच्या डोळ्यासमोर दिसतो, अन त्याला एक आवाज ऐकू येतो रघुचा. मी लगीच गावकाऱ्यासनी घेऊन येतो, त्यापाठोपाठ म्हातारीचा भेसूर हसण्याचा. आता खरी सुरवात झाली, हा.. हा… आता खरी सुरवात झाली… म्हातारी मोठ्याने हसत असते.

इतर रसदार पर्याय