Pavsatil Ashru books and stories free download online pdf in Marathi

पावसातील अश्रू

पावसातील अश्रू-नागेश पद्मन

गायकाच्या गळ्यातून फिरत घेत सूर निघत होते, तसे इकडे त्या तालावर चित्रकाराचा कुंचला भराभर वळ्णं घेत होता. एका अदृश्य तारेतून ते सूर यावेत कुंचल्यापर्यंत अन् वळवत रहावं कुंचल्याला आलापीप्रमाणे; तसं कांहिसं.

बहुधा तो मेघमल्हार असावा.श्रावणातल्या हिरव्यागार कोवळ्या धरेवर नाचणा-या अवखळ पावसात, नुकत्याच वयात आलेल्या एखाद्या चंचल तरूणीप्रमाणे खळाळणा-या झर्‍यासारखी त्याची द्रुत अलापी वाटायची. तो सूर आहे गळ्यातून निघणारा की प्रवाह आहे खळाळत्या पाण्याचा, याचीही क्षणभर गल्लत व्हायची. कधी विलंबित लयीत धीर गंभीर चीज चाले; तेव्हा वाटायचं दूरवर धुरकट धुक्यातून हिरव्याकंच शेवाळलेल्या जंगलावर संततधार चालू आहे गच्च आभाळातून. मधूनच धुराचे लोट निघताहेत अन् झाडांचे काळपट तपकिरी बुंधेही शेवाळ्यामुळे निसरडे हिरवट पडले आहेत. तबल्याच्या तीन तालाबरोबर त्याच्या गळ्याची जुगलबंदी चाले तेंव्हा वाटायचं पावसामुळे साचलेल्या पाण्यात पऊस आपल्या असंख्य पावलानी बचाबच उड्या मारत खेळतोय,

बाजूलाच इझलवर लावलेल्या कागदावर चित्रकार रंग सोडत जायचा – त्याच्या गळ्यातल्या सुरांप्रमाणे, तेंव्हा गळ्यातले सूर रंग होऊन कागदावर उमटताहेत असंच वाटायचं. त्याचा सफाईदार ब्रश कधी पाण्यात तर कधी रंगात इतक्या वेगाने बुडायचा की कळायचही नाही, त्यानं कोणता रंग घेतलाय ब्रशवर अन् कोणता धुतलाय पाण्यात.पण तो कागदावर सोडायचा असे रंग; की बस्स! पहाणाराला वाटायचं, अरे पॅलेटवर तर नव्हताच हा रंग मग याने कुठून घेतला ब्रशवर? कागदावर रंग सोडताना हलकेच रंगाची एखादी धार उभ्या कागदावरून गळत गळत खाली यायची; एखद्या बंगाली बाबूच्या ओठांच्या कडातून पानाची लाल चुटूक थूंक गळत यावी तशी. अन् वाटायचं; झालं, आता हे चित्र खराब झालं, पण पुढच्याच क्षणी दुसर्‍या रंगाची एक धार गळत यायची पहिल्या धारेजवळ अन् मग धारावर धारा गळत यायच्या शेजारी शेजारी अन् त्याचं एक वेगळच चित्र व्हायचं तयार – गायकाच्या गळ्यातून गळणार्‍या तानेशी नातं सांगणारं.

तो एकामागोमाग एक कागद इझलवर चढवत रहायचा अन् गाण्यांची चित्र होउन कागदावर उमटत रहायची.

तास–दीड तासात कागदांची चवड रचली गेली.

मैफल संपली, तशी प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात दोघांनाही सलामी दिली. डग्गा-चाटी गुंडाळले गेले. तंबोरे खोळीत बांधले गेले. गायकानं हार्मोनियम पेटीत बंद केला. चित्रकाराने ब्रश-पॅलेट स्वच्छ धुतले. एका कपड्याने हलक्या हाताने ब्रश पुसले.अलगद कपाळाला लावले अन् एका छोट्या पेटीत ठेऊन दिले.

हॉलमध्ये भराभर चित्र लावली गेली अन् दुसरी मैफल फुलून आली.

सगळी चित्र आधाशासारखी डोळ्यात साठवून त्यानं घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे साडेनऊ होत आले होते. – ‘बापरे! साडेनऊ! बायकोनं येताना भाजी,किराणा आणायला सांगितलं होतं. आता कोणतं दुकान उघडं असेल?’ तो भानावर आला.

बाहेर अजूनही संततधार सुरूच होती. रस्त्यावर पाणी उडवत जाणार्‍या गाड्या, त्यांच्या दिव्यांची पाण्यातून चमकत जाणारी प्रतिबिंब, छत्र्यातून अंग चोरत चाललेली माणसं. – पाऊस असा पहायला बरा वाटतो. तेवढ्यात त्याचं लक्ष एका जोडप्याकडे गेलं. बहुधा त्यांचं नुकतच लग्न झालेलं असावं. एकाच छत्रीतून ते चालले होते. त्यानं तिचा हात घट्ट पकडला होता, अन् तो कांहिही बोलला तरी ती लाजत होती. तो मधूनच छत्री बाजूला करायचा अन् ती त्याला बिलगायची - घट्ट! पऊस जणू त्यांच्याचसाठी कोसळत होता. ‘बरं आहे बेट्यानो तुमचं. अजून तुमचा संसार किराण्यात घुसला नाही, तोवर घ्या भिजून पावसात. छत्री दुरुस्त करायची वेळ येईल तेव्हा याच पावसाचा चिखल होईल.’ तो मनाशीच हसला. तेवढ्यात एक सायकलवाला जीवाच्या अकांताने सायकलचे पायडल मारत त्याच्याजवळून निघून गेला. त्याच्या मनात विचार आला, केवढ्या जोराने चाललाय हा, याला घाम किती आला असेल. पण या पावसात भिजल्यावर घाम कुठला अन् पाणी कुठलं? पावसात भिजलेल्या देहाचा घाम कसा दिसेल? अन् अश्रू? ते तरी कुठं दिसतात पावसात?

तो हे सगळं पहात होता तरी त्याच्या डोक्यात मात्र चेडलेली बायको, भाजी, किराणा… हेच थैमान घालत होतं. एक चित्र हे अन् एक चित्र ते – मघाच्या मैफलीचं, अन् तो ऊभा होता दारात, गॅलरीच्या.

नाही म्हटलं तरी बरीच रहदारी होती रस्त्यावर. ‘एवढ्या पावसातही कशाला बाहेर पडतात लोक?’ तो स्वतःशीच चिडून म्हणाला. ‘अरे आपण नाही का बाहेर पडलो, हे प्रदर्शन पहायला तसंच असेल प्रत्येकाचं कांही काम.’ स्वतःशीच हसत तो म्हणाला. भाजी घेऊन सरळ घरी गेलो असतो तर पोरंही खुश झाली असती अन् बायकोही. पण तरीही आपण वाकडी वाट करून आलोच ना पावसात भिजत; हे प्रदर्शन पहायला. का हे प्रदर्शन पाहून लगेच कोनाड्यातले ब्रश शोधून आपण चित्र काढायला बसणार होतो थोडीच? पण असतो एक आपला; ज्याचा त्याचा आनंद वेगवेगळ्या गष्टीत. अगदी कट्ट्यावरच्या भाषेत सांगायचं झालं तर हा ‘कीडा’ जर असेल ना एखाद्याच्यात तर त्याला स्वास्थ्य नाही हेच खरं. आपली चित्रकला जर अशी वांझोटी राहिली नसती तर – तर आपण असलो असतो आज त्या चित्रकाराच्या जागी. किती नशिबवान आहे तो! आपल्या आवडीचं काम करण्यात एक वेगळीच नशा असते. मग हे चरफडत ऑफिसला जाणं, दिवसभर मनाविरुद्ध पाट्या टाकणं, रोज गुदमरत जगणं सगळं सगळं सुटलं असतं. अता नोकरी करतो म्हणजे काय – रिटायरमेंटची वाट पहात दिवस काढतो झालं! आणि जगतो म्हणजे तरी काय? रिटायरमेंटची वाट पहातच दिवस काढतो ना… चित्रकार असतो तर अशी घुसमट झाली नसती.

पण या जन्मात तरी ते शक्य नाही… या जन्मात शक्य नाही म्हणजे पुढच्या जन्मात आहे की काय?’ तो चमकला. ‘पण पुढचा जन्म आहे कशावरून? असेलही कदाचित, सगळे म्हणतात म्हणून! पण असला, तरी पुढचा जन्म माणसाचाच कशावरून मिळेल? कांहीच खात्री नाही. कदाचित, कदाचित मी एखादा चिलटही असेन किंवा एखादा डास, माशी; पालही असेन कदाचित, किंवा एखादा कुत्रा मांजर. कुणी सांगावं कदाचित एखादा सिंहही असेन मी, जंगलातला, किंवा सिंह असलो तरी सर्कशीतलाही असू शकेन – कोंडलेला, रिंगमास्टरचे फटके खाणारा – म्हणजे हाच जन्म पुन्हा सिंहाच्या रुपात – हंऽऽऽ! पण हे सगळं पुढचा जन्म असेल तर! पण असेलच कशावरून? म्हणजे माहीत नाही तोवर तरी नाही म्हणायला काय हरकत आहे. नाही तरी ‘आहे’ म्हणायला तरी काय पुरावा आहे अन् ‘नाही’ म्हणायला तरी काय पुरावा आहे?

------------------------------------------------------------------------------

दुसर्‍या दिवशी ऑफिस सुटल्या सुटल्या गाडीला किक् मारून तो सरळ आर्ट गॅलरीला गेला. उद्घाटनाच्या गर्दीत मागे गर्दीचा एक टिंब हऊन ऊभा राहिला. फीत कापली गेली, टाळ्या वाजल्या, कॅमेर्‍याचे फ्लॅश उडाले अन् क्षणात सगळी गर्दी हॉलभर सांडली. हर तर्‍हेचे चेहरे, कुणी अर्धा-अर्धा तास एखादं पेंटिंग न्यहाळणारे, कुणी भराभर पुढं सरकत रहाणारे, कुणी प्रेक्षकांचेच चेहरे न्यहाळणारे तर कुणी हॉलभर फेरफटका मारून बाहेर पडणारे. त्यातले कत्येक तर आपल्याला चित्रातलं फार कळतं हे दाखवायला आल्यासारखेच.

तो एकेक चित्र डोळ्यात साठवत पुढं सरकत होता. एका चित्राजवळ तो थबकला. ते न्यूड होतं. – ती बसलेली - पालथी मांडी घलून, मान किंचित खाली, अलिकडचा हात खाली जमिनीवर टेकलेला, दुसरा हात कोपर्‍यात वकवून डोक्याच्या मागे नेला होता. हात वर नेल्यामुळे उंचावलेले स्तन स्पष्ट दिसत होते. न्यूड असूनही ते पेंटिंग अश्लिल नव्हतं. स्त्री देहाची कमाल म्हणावी की चित्रकाराच्या कुंचल्याची जादू?

आणि हे कसलं पेंटिंग? माणसाच्या चेहर्‍यासारखंच तर दिसतंय, पण ठिगळं कसली एवढी? गोधडी म्हणावी, तर माणसाचा चेहरा दिसतोय अन् चेहरा म्हणावा तर ठिगळा-ठिगळांची गोधडी दिसतेय. तो खूप वेळ निरखत होता. तेवढ्यात मागून त्याला हलकेच आवाज आला – ‘ते चित्र माणसाच्या प्रारब्धाचं आहे.’ पेंटिंगजवळ जात चित्रकार सांगू लागला, ‘एक चेहराच आहे तो माणसाचा – सामान्य माणसाचा. त्याचं प्रारब्ध अनेक ठिगळांनी बनलेली जणू एक गोधडीच. कुठं लाल तर कुठं काळं, कुठं निळं तर कुठं राखाडी फक्त ठिगळं… त्यात काळ्या रंगाचीच ठिगळं जास्त, म्हणजे दुःखच जास्त. आणि माणसाचं आयुष्य म्हणजे तरी काय हो, गोधडीच की एक – ठिगळा-ठिगळांची…! कोलाज म्हणा हवं तर. आयुष्य असं एकसंध मिळतं कुठं सामान्याना? प्रत्येक पावलावर तडजोड करतच जगावं लागतं ना त्याना? आणि माणसाला सर्वात आधी कोण धोका देत असेल तर ते त्याचं नशीब! म्हणून, नीट पहा, या पेंटिंगमध्ये त्या चेहर्‍याच्या कपाळावरचे काळ्या ठिगळाचे धागे उसवलेत, आणि ही वीण एकदा का सैल झाली की मग बाकीचं कापड उसवत जायला कितीसा वेळ लगणार? नाही का?’

तो अवाक् झाला. त्या ठिगळा-ठिगळांच्या चेहर्‍याच्या जागी त्याला स्वतःचा चेहरा दिसायला लागला – कपाळावरची काळ्या ठिगळाची वीण उसवलेला.

---------------------------------------------------------------------------

उसवलेल्या ठिगळांचा विचार करतच तो घरी पोचला. मुलं केंव्हाच झोपी गेली होती. ती मात्र थांबली होती, जेवणासाठी. दोघांनी जेवून घेतलं. त्यानं हलकेच बेडवर अंग टाकलं; तसं ते न्यूड पेंटिंग त्याच्या डोळ्यापुढे तरळायला लागलं. तेवढ्यात आवर-सावर करून ती आली. त्यानं अलगद तिच्या अंगावर हात टाकला अन् हलकेच तिला कुशीत घेतलं.

----------------------------------------------------------------------------

दुपारची वेळ. कुकरमध्ये घालून उकडावं तसं उकडत होतं. संध्याकाळी मोठा पाऊस कोसळेलसं वाटंत होतं.

एका हातात औषधं, एका हातात रंग आणि कॅनव्हासची सुरळी घेऊन चित्रकार रस्त्याच्या कडेनं चालला होता. त्यानं पाहिलं आणि स्कूटर थांबवली.

‘कुठं घरी निघालात?’ तो.

‘हो.’ चित्रकार.

‘चला, सोडतो.’

‘नाही, जाईन मी.’

‘अहो, पाऊस केंव्हा कोसळेल नेम नाही. कॅनव्हास भिजेल.’

चित्रकार मागे बसला. एका जुन्या इमारतीसमोर स्कूटर थांबली.

‘चला घरी, थोडं सरबत घेऊ’, चित्रकार.

‘नाही, पुन्हा केंव्हा तरी…’ तो.

‘एक नविन पेंटिंग केलंय, पहा.’ चित्रकार.

अरूंद जिन्यावरून दोघही दोन मजले चढून वर गेले.चित्रकाराने खिशातून चावी काढून लॅचला लावली व दरवाजा उघडला.

‘अरेच्चा! हा एकटाच रहातो तर’ याच्या डोक्यात एक प्रश्न.

‘बसा’, कॅनव्हासची सुरळी खाली टेकवत चित्रकार म्हणाला.

एका जीर्ण झालेल्या सोफ्यावर तो बसला.

हॉल बराच अस्ताव्यस्त होता. टी-पॉयवर सकाळचा पेपर तसाच घडी न उघडलेल्या अवस्थेत पडला होता. शेजारी चहाचा कप होता. तो बहुधा सकाळपासून तेथेच असावा, त्याच्या तळाशी सुकून गेलेल्या चहावर माश्या बसल्या होत्या. कोपर्‍यात एका शोकेसवजा टेबलवर टी.व्ही. ठेवला होता. शोकेसमध्ये असंख्य पुस्तकं ऊभी करून व्यवस्थित ठेवली होती. वरती एक काचेचं शोकेस होतं, त्यामध्ये वेगवेगळी बक्षिसं, ट्रॉफ्या दाटीवाटीनं उभ्या होत्या. एका कोपर्‍यात इझल लावलेला होता. त्यावरील कॅनव्हासवर एक पेंटिंग अर्धवट अवस्थेत होतं. समोरच स्टुलवर पॅलेट ठेवलं होतं. त्यावरील रंगावर साय धरली होती. ब्रश एका भांड्यात उभे करून ठेवले होते. पूर्ण हॉलभर लिन्सिड ऑईल आणि पेंटचा वास पसरला होता. समोरच्या भिंतीवर पुलंचं एक मोठं पोर्ट्रेट लावलं होतं, त्याच्या शेजारी चार्ली चॅप्लीनचं एक पेंटिंग होतं. थोड्या अंतरावर दोन वयस्क स्त्री-पुरूषांची पोर्ट्रेट्स लावली होती. त्याना हार घातले होते. ते बहुधा चित्रकाराचे आई-वडील असावेत. एक सुंदर तरूणी ऊभी असलेलं एक देखणं पेंटिंग उजव्या हाताच्या भिंतीवर लावलेलं होतं.

एका ट्रे मध्ये सरबताचे तीन ग्लास घेऊन चित्रकार आला. ट्रे टी-पॉयवर ठेवला.

‘दोघांसाठी तीन गलास?’ तो विचारात पडला.

‘घ्या तुम्ही, मी आलोच’ असं म्हणत एक ग्लास घेऊन तो आत गेला.

‘शुभा, सरबत आणलंय, घे जरासं… आणि हो दुपारची औषधं घेतलीस?’ आतून चित्रकाराचा आवाज आला.

‘म्हणजे आंत कोणी आहे?’ विचार करतच त्याने ग्लास तोंडाला लावला.

तेवढ्यात तो आतून आला.

‘शुभा- माझी पत्नी’ चित्रकार.

‘बरं नाही का त्याना?’ तो.

‘हो… दोन वर्षापासून.’

‘काय?’ तो उडालाच.

‘हो… स्नायुंचा कसलासा आजार आहे. क्षीण होत जातात ते. झोपूनच असते ती.’

‘कांही उपचार… वगैरे…(?)’ तो.

‘कांही उपाय नाही त्यावर’ चित्रकार शांतपणे म्हणाला.

‘फारच त्रास होत असेल तुम्हाला – सगळं करायचं म्हटल्यावर…’ तो अचानक बोलून गेला.

‘माझं प्रेम आहे तिच्यावर’ चित्रकार आंत पहात म्हणाला.

तो फक्त चित्रकाराकढे पहात राहिला. त्याला काय बोलावं तेच सुचेना.

‘हे आई-बाबा का?’ विषय बदलावा म्हणून त्यानं भिंतीवरच्या पेंटिंगकडे बोट करत विचारलं.

‘हो, बाबा जाऊन पाच वर्ष झाली. आई मागच्या वर्षी गेली. त्याआधी आई एका बेडवर आणि शुभा एका बेडवर, अन् दोन पेशंटचा मी डॉक्टर!’ हसतच चित्रकार म्हणाला.

‘या हसण्याला कसलं हसू म्हणत असावेत?’ एक अनाहूत प्रश्न त्याच्या डोक्यात चमकून गेला.

‘एवढं सगळं करून पेंटिंग करायला तुम्हाला बळ कुठून येतं? तो.

‘पेंटिंग हेच माझं बळ आहे.’ चित्रकार हसत म्हणाला. ‘पेंटिंग करतो म्हणून तर मी जिवंत आहे.’

‘आणि ही पुस्तकं?’ तो.

‘तिचा वेळ जावा म्हणून आणत गेलो. पुलंचं पुस्तक वाचताना तिच्या चेहर्‍यावरचं हसू पाहून मला समाधान मिळतं. बोलता बोलता तो थोडावेळ थांबला. समोरच्या सुंदर तरूणीच्या पेंटिंगकडे पहात म्हणाला, हे तिचंच पेंटिंग आहे. एकाच सिटिंग मध्ये पूर्ण केलं होतं मी.’ बोलता बोलता तो मध्येच थांबला, त्या पेंटिंगकडे एकटक पहात म्हणाला ‘मनाला उभारी मिळते, ती ऊभी असल्याचं पाहून.’

पुढचे कांही क्षण भयाण शांततेत गेले. त्याला ती शांतता असह्य झाली.

‘निघतो मी…’ एवढंच म्हणून तो निघाला.

--------------------------------------------------------------------------------

त्याचं डोकं सुन्न झालं होतं. तो सदैव हसरा अन् प्रसन्न चित्रकार आणि त्याची बिछान्याला खिळलेली पत्नी त्याच्या डोक्यातून जायला तयार नव्हती. एक न्यूड पेंटिंग पाहिलं तर मोकळा केला आपण आपला पुरुषार्थ तिच्या कुशीत, अन् इथं प्रत्यक्ष त्या पेंटिंगचा निर्माता, ‘कला हीच माझी ताकद आहे’ असं म्हणत दोन वर्षापासून त्या जिवंत प्रेताबरोबर संसार करतो आहे, - ‘माझं प्रेम आहे तिच्यावर म्हणत.’ सगळंच त्याच्या विचारांच्या पलिकडचं होतं.

--------------------------------------------------------------------------------

अंधारा जिना उतरून दोघंही रस्त्यावर आले. बाहेर पावसाची रीप-रीप चालू झाली होती. त्यानं गाडीला कीक् मारली, अन् चित्रकाराचा निरोप घेण्यासाठी मागं वळून पाहिलं. चित्रकारानं हसतच हात उंचावला. त्याला मात्र चित्रकाराच्या डोळ्यात पाणी दिसल्याचा भास झाला. – की थेंब होता तो पावसाचा? कोणास ठाऊक, पावसात अश्रू कुठं दिसतात(?)

===============================================

-नागेश पद्मन

9881098389.

इतर रसदार पर्याय