योगायोग Shobhana N. Karanth द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

योगायोग

कधी कधी आयुष्यात असे अनपेक्षित क्षण समोर येतात कि त्या योगायोगाच्याच गोष्टी समजल्या जातात . काही असेही प्रसंग जीवनाच्या प्रवाहात येतात आणि त्यात सफलता न मिळाल्याने विसरले हि जातात . परंतु योगायोग असा एक क्षण आहे कि असंभवतेला संभव बनवून यशस्वी जीवनाच्या अनुषंगाने मनाला मोहरून टाकतात . तेव्हा आपल्याला जीवनाची हीच सत्यता समोर येते कि नशिबात असते ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही ; आणि जे नशिबात नसते ते मागूनही मिळत नाही.

माझ्या जीवनातही तसेच झाले. मी पुण्याला कॉलेजच्या होस्टेलवर राहूनच शिक्षण घेत होते. त्याच कॉलेजला माधवही शिकत होता . माधव आमच्याच बाजूच्या गावात राहात होता . गावात कॉलेजची व्यवस्था नसल्याने आम्ही दोघही हॉस्टेलवरच राहात होतो. त्यामुळे आमची चांगलीच दोस्ती झालेली होती आणि हळू हळू दोस्तीतून एकमेका विषयी प्रेम जुळत होते. सुट्टीच्या दिवशी आम्ही समुद्रावर फिरायला जात असत तर कधी पिक्चरला जात होतो. माधव फार चांगला मुलगा होता. घरची परिस्थिती सुद्धा चांगली होती . माधव स्वभावाने प्रेमळ आणि निर्व्यसनी मुलगा होता. लग्न करिन तर माधवशीच असे मी नेहमी मनाशी म्हणत असे. परंतु तो आमच्या जातीच्या नसल्याने माझे आई -बाबा त्याला पसंद करतील कि नाही हि शंका होती.माधवही माझ्याच बरोबर लास्ट इयरला होता. ग्रॅज्युएशन नंतर माधवने सी .ए. करण्याचे ठरविले होते. आणि मी एम. कॉम. करूनच घरी जाण्याचे ठरविले होते. दिवस मागून दिवस जात होते. आम्ही दोघही लास्ट इयरची परीक्षा देऊन एकत्रच पुण्याहून गाडीने घरी जाण्यास निघालो. पहिले माझे गाव हसनगाव लागत होते आणि अर्धा तासावर माधवचे माणिकपूर होते.

घरी जाणार या गोष्टीचा आनंदही होता. आणि माधव पासून दूर जावे म्हणजे उदासही होत होते . एकमेकांची थट्टा मस्करी करत, गप्पा मारत मारत मी रात्री माझ्या घरी पोचले. आई -बाबा माझी वाटच बघत होते. आई दारातच उभी होती . मला बघताच "माधवी ,एवढा कां उशीर झाला ...? तू तर नऊ वाजता येणार होतीस आणि आता तर अकरा वाजले गं...!" आई कपाळाला आढ्या आणत म्हणाली . मला ती सहा महिन्यांनी बघत होती म्हणून मला भेटण्याची आतुरता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. "आई , अग रस्त्यात किती ट्रॅफिक असतो हे तुला माहित आहे नं....!" मी तिचे समाधान करत म्हणाले . तेवढ्यात बाबांनी येऊन माझ्या हातातली बॅग घेऊन म्हणाले ' अगं सीमा, तिला आत तरी येऊ दे..!' आम्ही तिघेही व्हरांड्यातून आत गेलो. जेवणाची वेळ झालेलीच होती . म्हणून आईने लगेच मला हात-पाय धुण्यास सांगून जेवायला बसण्यास सांगितले . आईने सर्व जेवण माझ्या आवडीचेच बनविले होते. कॉलेजच्या सर्व गमती जमती आई - बाबांना सांगत हसत खेळत आम्ही जेवण उरकली.

मी माझ्या रूम मध्ये गेले. दिवसभराच्या प्रवासाने थकवा आलेला होता. त्यामुळे डोळ्यावर झोप आली होती माझे डोळे पेंगळलेले होते. परंतु घड्याळात बाराचा टोला पडला आणि मला माधवची आठवण झाली . बरोबर बारा वाजता माधव मला फोन करणार होता . आत्ता येईल ... पाच मिनिटाने येईल असे करून रात्रीचा एक वाजला तरी फोनचा पत्ता नव्हता .त्यासाठी मला न राहवून मीच त्याला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला . फोन लागला परंतु बेल वाजत होती . माधव फोन कां उचलत नाही ...? या गोष्टीची मला चिंता वाटू लागली. तशी त्यांच्या घरचींहि मला फारशी माहिती नव्हती .काय करावे काहीच समजत नव्हते . कदाचित घरी आई-बाबांच्या भेटीत तो मला फोन करायचा विसरून झोपून गेला असावा ...! या विचाराने मी सुद्धा झोपून गेले.

सकाळ कधी झाली समजलेच नाही. तशी उठायचीही घाई नव्हती . कारण होस्टेलवर चहाच्या ,जेवणाच्या वेळा सांभाळळ्याची मोठी कसरत असायची . माझी रूम पार्टनर गीता चहा पिऊन यायची आणि येताना माझा चहा हि घेऊन यायची. कारण मी कधीच लौकर उठत नसे. तरि आईची स्वयंपाक खोलीतून हाक ऐकू आलीच . " मधू ss , आता उठ बरं , घड्याळात साडे आठ झाले बघ ...!" मलाही माधवला फोन करायचा होता म्हणून मी ताबडतोब उठले . तोंड वगैरे धुऊन आईने दिलेला गरम गरम चहा पित पित माधवला फोन लावला . परंतु काहीच रिस्पॉन्स मिळत नव्हता . रात्री निदान फोनची बेल तरि वाजत होती. काय झाले असावे काहीच समझत नव्हते . तेवढ्यात आई समोर आली आणि म्हणाली, " मधू, आता लौकर आंघोळ करून घे आणि मला स्वयंपाकाला मदत कर..! त्या आधी ते कांदे पोहे बनविले आहेत ते खाऊन घे ...!" असे म्हणून आई देवपूजेला देवघरात निघून गेली . बाबा बागेमध्ये झाडांना पाणी घालत होते.

पंधरा दिवस होऊन गेले . तरी माधवचा काहीच पत्ता नव्हता . त्यामुळे मला पुनः होस्टेलवर जाण्यास मन होईना . तसेच लग्नाची मुलगी घरापासून दूर राहणे ठीक नाही असे आई-बाबाना वाटत होते . आई-बाबांच्या मनात मी शिक्षण पुरे करून इथेच राहून जॉब करावा , असे त्यांना वाटत होते . मी फर्स्ट क्लास मध्ये पास झाले . परंतु माधवच्या रिझल्ट विषयी जास्त काही समजले नव्हते . मी माझ्या सर्टिफिकेट साठी पुण्याला जायचे ठरविले . कॉलेज मध्ये निदान माधव विषयी काही समजेल या हेतूने मी दोन-तीन दिवसातच पुण्याला जायचे निश्चित केले. कॉलेजला माझी पार्टनर गीता सुद्धा भेटणार होती. म्हणून मी सकाळीच सातची एस टी पकडून पुण्याला बारा वाजता पोचले. गीता माझी वाट बघतच होती . परंतु माझी नजर माधवला शोधत होती. कॉलेजच्या आवारात माधव कुठेच दिसत नव्हता . आम्ही सर्व मित्र -मैत्रिणींचा ग्रुप एकत्र भेटून , आता पुढे काय करणार ...? कुठल्या लाईनला जाणार ..? या विषयी चर्चा करत होते. "माधवी , तू आता एम कॉम ची परीक्षा देणार आहेस नं...? गीता म्हणाली . " माझे आई बाबा म्हणतात कि घरी राहूनच जॉब कर ...! त्यामुळे मला होस्टेलवर येता येणार नाही ...! तू आता काय करायचे ठरविले आहेस ..? मी गीताला विचारले . अग , मला सी ए करायचे आहे परंतु हा माधव हि कुठे आहे , त्याचा पत्ता नाही . नाहीतर आम्ही दोघ मिळून अभ्यास केला असता ...! गीता म्हणाली . " चल, आपण सरांकडे जाऊन विचारूया कि माधव बी कॉम पास झाल्याचे सर्टिफिकेट घेऊन गेला का..? मी गीताचा हात पकडत म्हणाले आणि आम्ही दोघी ऑफिसच्या दिशेने चालू लागलो . सर फोनवर कोणाशी तरी बोलत होते . म्हणून आम्ही थोड्यावेळ बाहेरच उभे राहिलो. तेवढ्यात एक गृहस्थ ऑफिसमध्ये गेले आणि ते सरांशी बोलत होते. ते बोलत होते म्हणून आम्ही कॅंटीन मध्ये चहा प्यायला गेलो आणि चहा पिऊन पुनः ऑफिसकडे आलो तर तिथे सर नव्हते तसेच ते वयस्कर गृहस्थही नव्हते . परंतु प्युन कडून आम्हाला समजले कि ते माधवचे वडील होते. परंतु माधव विषयी प्युनलाही काही माहित नव्हते त्यामुळे आम्हालाही त्याच्या विषयी काहीच समजले नाही.

दुपारची दोन ची गाडी होती म्हणून मी सगळ्यांना भेटून त्यांचा निरोप घेतला . परंतु माझे मन अस्वस्थ झाले होते. माधव कां आला नाही ...? कदाचित त्याची तब्येत ठीक नसावी असे म्हणून मी मनाचे समाधान केले. मी रात्री दहा वाजता घरी पोचले . रात्रीची जेवणं उरकून मी माझ्या रूममध्ये झोपायला गेले. परंतु माधवच्या आठवणीने झोप येत नव्हती . रात्रभर तळमळत तळमळत सकाळ झाली आणि एवढ्यात आईची हाक ऐकू आली. मी लगेच उठले आणि तोंड धुऊन नाश्ता बनवायला घेतला. उपमा बनवता बनवता माधवची आठवण येत होती . कारण माधवला उपमा फार आवडायचा. कॉलेजच्या कॅंटीन मध्ये माधवचा नाश्ता म्हणजे उपमाच मागवत असे. नाश्ता करून मी वर्तमानपत्र हातात घेतले . कुठे "पाहिजे" मध्ये जाहिरात दिसते कां ...? हे मी पाहू लागले . तेवढ्यात बाबा आले आणि म्हणाले "माधवी , आपल्या गावाच्या बाहेर सिटी मध्ये एक 'मदर्स मेरी ' म्हणून कॉन्व्हेंट स्कुल आहे . तिथे जे प्रिन्सिपॉल देशपांडे म्हणून आहेत ते माझ्या ओळखीचे आहेत . तर तू टीचर म्हणून काम करायला आवडेल कां ..? मला काम हवेच होते. कारण रिकामं बसणं म्हणजे सारखी सारखी माधवची आठवण येत होती. त्याला विसरण्याचा म्हणजे हा एकच उपाय होता. म्हणून मी बाबांना लगेच " हो बाबा ss मी तयार आहे. आपण कधी जाऊया ? मी उत्सुकतेने विचारले.

मला टीचर म्हणून जॉब मिळाला . तीन महिने उलटून गेले तरी माधवचा फोन हि आला नाही किंवा त्याची खुशालीही समजली नाही. हळू हळू घरातून माझ्या लग्नाचा विषयही निघू लागला . परंतु मी लग्नाचा विषय टाळायचा प्रयत्न करत होते. माधव विषयी काहीच समजत नव्हते . म्हणून त्याच्या विषयी आई बाबांना सांगूही शकत नव्हते . मनाची नुसती चलबिचल होत होती. असे वाटत होते कि ऐनवेळी माधवने मला धोका दिला होता. घरातून स्थळं बघव्याचा कार्यक्रम चालूच होता. टाळं टाळ करूनही मी कुठपर्यंत लग्नाच्या विषयाला टाळत राहणार ? शेवटी मला एका स्थळाला होकार द्यावाच लागला. परंतु मन माधवकडे खेचले जात होते. आई-बाबांसाठी मी लग्नाला उभी राहिले होते . तसा मुलगाही चांगला होता. स्वतःचा बिझनेस होता. त्यामुळे परिस्थिती उत्तम होती. मात्र त्याचे आई -वडील जुन्या विचारांचे होते.माझ्या कडून होकार मिळताच आई-बाबांनी बघण्याचा कार्यक्रम ठेवला. आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि विशालने एकमेकाला पसंद केले आणि साखरपुड्याची दोन महिन्या नंतरची तारीख ठरली.

साखरपुड्याच्या दिवस उजाडला आणि माझे मन आतून धड ss धड ss करत होते. असे वाटत होते कि आज माधवचा फोन आला तर मी त्याला काय उत्तर देईन ..? घरात आई-बाबा खूश होते. त्यांच्या खुशीसाठीच तर मी हे सर्व करत होते. सासरची मंडळी आली . सासूने तर मला बघून डोक्यावरून दोन्ही हात ओवाळून जमिनीवर बोट मोडली . " माझ्या सुनेला कोणाची नजर लागायला नको हं ...! असे म्हणत माझ्याकडे कौतुकाने पहात राहिली . तिला मी खूप आवडले होते. म्हणून सारखी माझी स्तुती करत होती . " माझी सून म्हणजे लाखात एक आहे ...! सासूबाई विशाल कडे बघून म्हणाल्या. विशालनेही लगेच माझ्याकडे चोरटा कटाक्ष टाकला . लगेच मी विशालच्या नजरेला टाळून स्वयंपाक खोलीत गेले. मुहूर्ताच्या वेळेप्रमाणे भटजी आलेच कार्यक्रम सुरु झाला . एकमेकाला अंगठी घालण्याचा कार्यक्रमाबरोबर नाश्ता पाण्याचाही कार्यक्रम अगदी आनंदात व्यवस्थितपणे पार पडला . सर्व पाहुणे मंडळी जाण्यास निघाली . " आता लौकरच ये आमच्या घरी असे म्हणत माझ्या गालाला प्रेमाने गालगुच्चा घेतला . मी सर्वांना नमस्कार केला आणि सर्वांना निरोप दिला.

लग्नाची तारीख चार महिन्यावर ठरली होती. अचानक माझ्या बाबांची शुगर वाढल्याने तब्येत बिघडली . ताबडतोब त्यांना शहरातल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. माझे बाबा ज्या वॊर्ड मध्ये होते, त्याच वॊर्डमध्ये एक डोक्याला पट्टी बांधलेला मुलगा कॉट नं. १० वर झोपलेला होता. त्याला बघून मला माधवची आठवण झाली . परंतु त्याचा चेहरा तितकासा स्पष्ट दिसत नव्हता . कारण चेहऱ्यावर सुद्धा काही पट्या होत्या. माधव तर नसेल या शंकेने मी त्याच्या जवळ गेले. आमची दोघांची नजरा नजर झाली. परंतु त्याने काहीच प्रतिक्रिया दाखविली नाही. तो शून्य नजरेने माझ्याकडे बघत होता . परंतु त्याचे डोळे तो माधव असल्याचे सांगत होते . परंतु माझे मन म्हणत होते कि तो माधव असेल तर त्याने मला ओळख कां नाही दिली ..? माझ्याशी तो कां हसला नाही..? अशा अनेक शंकांनी मन बेचैन झाले आणि मी पाठी फिरून बाबांच्या सहा नंबर कॉटजवळ आले . बाबांना झोप लागली होती . थोड्या वेळाने माझी आई , बाबांसाठी जेवणाचा डबा घेऊन आली. " माधवी, आता तू घरी जाऊन आराम कर. मी इथे बसते .डॉक्टरांनी काही सांगितले कां ..? बाबांची तब्येत आता कशी आहे..? आई प्रश्नावर प्रश्न विचारात होती. परंतु माझे लक्ष त्या दहा नंबर कॉटकडे होते . " अगं माधवी , तुला मी काय विचारतेय ..? तू फार थकली आहेस कां ..? असे म्हणत आईने मला जबरदस्ती घरी जाण्यास सांगितले . मी घरी जाऊन जेऊन घेतले आणि जरा आडवी झाले. कधीच्या कधी डोळा लागला समजलेच नाही. अचानक जाग आली, घड्याळात बघितले तर संध्याकाळचे पाच वाजत आले होते . लगेच उठून घाई घाईने चहा बनवून बाबांसाठी थर्मोस रेडी केला. आणि हॉस्पिटलला गेले. आई माझी वाटच पाहात होती. बाबाही उठून बसले होते. त्यांचा चेहराही आता प्रसन्न दिसत होता.

बाबांना डिस्चार्ज मिळाल्याने मी बाबांचे कपडे घेऊन हॉस्पिटलला गेले . आजच्या आज त्या मूला विषयी जाणून घ्यायचे या विचारानेच बाबांच्या वॉर्ड मध्ये गेले. दहा नंबर कॉटवर माझे लगेच लक्ष गेले. परंतु त्या बेडवर दुसराच कोणी पेशंट दिसत होता. मी समजून गेले कि दहा नंबर ला डिस्चार्ज मिळाला असावा . मी मनातून नाराज झाले . मी बाबांचे हॉस्पिटलचे बील चुकते केले आणि बाबांना घरी आणले . हळू हळू बाबांची तब्येत सुधारत गेली. तसेच हळू हळू लग्नाचा दिवसही जवळ येत होता . घरात लग्नाची खरेदी सुरु झाली. घरातही एक उत्साहाचे वातावरण होते परंतु माझे मन माधवला विसरत नव्हते . माझे मलाच सावरायचे होते. म्हणून मी माधवचा विचारच मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करू लागले आणि माझ्या मनाच्या कसोटीचा दिवस उजाडला. मी लग्नाच्या बोहल्यावर चढले . सर्व काही विसरून मी विशालला स्वीकारले होते. माहेरचा निरोप घेऊन मी सासरी येऊन नवीन जीवनाला सुरवात केली.

लग्नाला दीड वर्ष झाले परंतु घरात पाळणा हलला नाही . म्हणून सासूबाईचे टोमणे मारणं सुरु झालं होतं . त्या नेहमी ऐकवत असायच्या कि " वंश चालवायला वारस नाही ; तू वांझोटी आहेस , तुझ्यातच दोष असणार , आधी माहित असते तर तुला सून म्हणून आणलीच नसती ..!" असे नको नको ते ऐकून ध्यावे लागत होते. मी सर्व चुपचापपणे सहन करत होते. परंतु सहन करायलाही काही मर्यादा हि असतेच. दिवस जसे जात होते तस तसे हा विषय गंभीर बनत चालला होता. कोणी म्हणत होते कोणाच्यात दोष आहे..? तर सासूबाई लगेच माझ्याकडे नजर फिरवत असत. तर कोणी घटस्फोटापर्यंतच्या गोष्टी करत होते. त्यासाठी मीच स्वतः विशालकडे चेक अप करण्यासाठी पाठी लागले. निदान कळून तर येईल कि कोणाच्यात दोष आहे ..? नाही ... हो ... नाही... हो म्हणता कसाबसा विशाल तयार झाला . आमच्या दोघांची चाचणी झाली . त्यातून दोष माझ्यातच निघाला होता. त्यामुळे सासूबाईंना बोलण्याचा मौका आणखिनच मिळाला . मला काय करावे काहीच समजत नव्हते . शेवटी माझा मीच निर्णय घेऊन विशालला सांगून टाकले कि ' जर तुम्हाला दुसरे लग्न करायचे असेल तर मी तुम्हाला घटस्फोट द्यायला तयार आहे, मी तुमच्या आईला वारस देऊ शकत नाही ..! त्यावर विशाल काही बोलला नाही . परंतु त्याच्या चूप राहण्यात त्याच्या मनात काय आहे हे मी समजून गेले.

सहा महिन्यातच आमचा घटस्फोट हि झाला. मी माहेरी आले. आई-बाबांना शॉक बसला . परंतु मी त्यांना सत्य परिस्थिती समजावून त्यांचे समाधानकेले. कितीही झाले तरी ते माझे जन्मदाते आई -बाबा होते. वरून काही दाखविले नाही तरि आतून ते दुःखी झाले होते. मी स्वतःला सावरून आई-बाबांना सुद्धा सावरण्याचा प्रयत्न करत होते. जस जसे दिवस पुढे पुढे जात होते तस तसे घरातील वातावरण पूर्ववत होत होते. घटस्फोटाला दोन वर्ष होऊन गेली . लोकांना माहित होते कि मूल होत नसल्याने नवऱ्याने घटस्फोट दिला आहे. त्यामुळे लग्न करायचे म्हटले तरि विघ्न ही येणारच . म्हणून आई-बाबा हि लग्नाविषयी काहीच बोलत नव्हते . मी नोकरी आणि घर असे नेहमीचे रुटीन करत होते.

एक दिवस शाळेत जात असताना शाळेच्या गेट जवळ मी माधवला बघितले . लगेच मी त्या दिशेने पट पट पाऊल उचलून त्याच्या जवळ गेले परंतु तो माधव आहे कां ..? अशी मला शंका आली. कारण त्याने माझ्या कडे बघूनही ओळख दिली नाही. मी समजले कि कदाचित माधवने लग्न केले असावे. ती त्याच्या बरोबर असणारी मुलगी हि त्याचीच असावी .क्षणभर मला माधव विषयी तिरस्कार वाटला . कारण माधवने मला केवढा मोठा धोका दिला होता. एक मन म्हणत होते कि त्या मुलाची विचारपूस केल्याशिवाय आपण निर्णय घेणं चुकीचं ठरेल. तो मुलगा त्या छोट्या मुलीला सोडून निघून गेला . मी त्या मुलीच्या पाठोपाठ गेले. ती मुलगी चौथीच्या वर्गात शिरली. मी ऑफिस मध्ये जाऊन रजिस्टरवर साइन करून प्रार्थना झाल्यावर माझ्या नववीच्या वर्गावर गेले. दोन तासाने माझा कुठल्याही वर्गावर तास नसल्याने मी टीचर्स रूम मध्ये गेले. तेवढ्यात प्रिंसिपॉलनी मला चौथीच्या वर्गाच्या टीचर न आल्याने त्या वर्गावर जाण्यास सांगितले . मी खुशीतच त्या वर्गात प्रवेश केला. मुलांना पाठांतराचे काम देऊन त्या मुलीला मी जवळ बोलाविले. आणि तिचे नाव विचारले . तेव्हा ती म्हणाली , " नंदिनी मधुकर सावंत " असे ऐकताच मी म्हणाले " तुला शाळेत सोडायला कोण येत ..? " माझे काका येतात, माझ्या बाबांना ताप आला आहे नं..!" नंदिनी म्हणाली . मी तिला आपल्या जागेवर जाऊन बसण्यास सांगितले . माझ्या मनात गोंधळ होत होता. उलटे सुलटे प्रश्न उभे रहात होते. संध्याकाळी शाळा सुटल्यावर मी शाळेच्या गेट मधून बाहेर पडत असताना नंदिनीची हाक मला ऐकू आली. " टीचर , आमच्या गाडीतून या नं..! मी पाठी वळून बघितले तर नंदिनीचे काका हि मला इशाऱ्याने गाडीत बसायला सांगत होते. मी नाहीच म्हणत होते परंतु गाडी थांबून राहिली म्हणून मी पाठच्या सीटवर बसले. नंदिनीची बड बड चालू होती. " काका , या माझ्या टीचर आहेत . आपण यांना रोज गाडीने त्यांच्या घरी सोडूया ..!" नंदिनीचे काका नुसते होss म्हणत होते . पंधरा वीस मिनिटांनी माझे घर आले तसे मी नंदिनीला म्हणाले " आता मी उतरते , माझे घर आले, चल येतेस माझ्या घरी..?" मी नंदिनीच्या गालाला हात लावत म्हणाले . तेवढ्यात तिचे काकाच म्हणाले " नंतर कधी येऊ ..! आणि लगेच गाडी वेगाने पुढे गेली. परंतु माझे मन वेगाने कॉलेजच्या जीवनातील आठवणी कडे खेचले गेले.

रोज नंदिनीच्या गाडीतून घरी येत असल्याने नंदिनीची आणि माझी चांगलीच दोस्ती झाली होती. असेच एक दिवस आमची गाडी समोरून वेगाने येत असणाऱ्या ट्रकला आपटणार होती म्हणून नंदिनीच्या काकाने गाडी पटकन साईडला घेतली . परंतु समोर एक झाड असल्याने गाडी झाडावर आपटली आणि नंदिनीचे काकांचे डोकं स्टिअरिंग वर आपटले आणि डोक्याला मार लागून ते बेशुद्ध झाले . आम्ही दोघी पाठी असल्याने आम्हाला काही झाले नाही .मात्र नंदिनी घाबरून काकाs काकाs म्हणून रडू लागली. तिला मी जवळ घेऊन सावरले आणि लोकांच्या मदतीने नंदिनीच्या काकांना हॉस्पिटलला घेऊन गेले. नंदिनीला घरचा फोन नंबर विचारून लगेच माझ्या मोबाईल वरून फोन लावला आणि त्यांच्या घरच्यांना बोलावून घेतले. तो पर्यंत नंदिनीच्या काकांना ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले. ते बाहेर येईपर्यंत मी तिथेच थांबून वाट पहात होते. नंदिनीने आपल्या बाबांची तसेच आजी-आजोबांची ओळख करून दिली. थोड्या वेळातच स्ट्रेचरवरून नंदिनीच्या काकांना वॉर्ड मध्ये आणले . त्यांच्या डोक्याला बँडेज बांधलेले होते. त्यांना झोपेचे इंजेक्शन दिल्यामुळे ते झोपलेलेच होते . दोन तास तरी ते उठणार नाहीत म्हणून मी सर्वाना सांगून जाण्यास निघाले . तेवढ्यात नंदिनीची आजी म्हणाली , " तुम्ही होता म्हणून बरं झालं , तुमचे कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत. माझ्या माधवच्या या आधी म्हणजे अडीच - तीन वर्षीपूर्वी सुद्धा मोठा अपघात झाला होता आणि त्याचा डोक्याला मार लागल्याने त्याची स्मृती गेली . तो आम्हाला कोणालाच ओळखत नाही. म्हणून तो कोणाशीच बोलत नाही. परंतु डॉक्टरांनी सांगितले कि एक दिवस जरून त्याची स्मृती येईल .त्यावेळी माधव बरेच महिने हॉस्पिटल मध्ये होता. त्याच्या चेहऱ्यात गाडीच्या अपघाताने खिडकीच्या काचा रुतल्या होत्या. त्या जखमा भरायला बरेच महिने लागले. तेव्हा सुद्धा माधव याच हॉस्पिटल मध्ये होता..!" नंदिनीची आजी डोळ्यात आलेले पाणी पुसत बोलत होती. मला लगेच आठवले कि बाबा हॉस्पिटल मध्ये होते तेव्हा तिथेच दहा नंबर कॉटवर माधवच होता. परंतु त्याची स्मृती गेल्याने त्याने मला ओळखले नव्हते .आपलं नाव काय ?" मी माधवी , नंदिनीच्या शाळेत टीचर आहे..! असे म्हणून मी घरी जाण्यास निघाले. खूप उशीर झाल्याने आई-बाबा माझी वाटच बघत होते. मी आईला सर्व वृत्तांत सांगितला . परंतु आई काहीच बोलली नाही. परंतु मी मात्र मनातून खुश होते. माझा माधव पुनः माझ्या समोर आला होता. तरी मनात कुठेतरी एक भीती होती. ती म्हणजे मला मूल होत नाही म्हणून विशालने मला सोडले होते. असेच माधवचे जीवन मी कां दुःखी करू..? नाहीss नाही माधवने आज ना उद्या मला ओळखले तरि मला त्याच्यापासून दूर रहायला हवे ..!" असा विचार करून मी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला न जात सरळ शाळेत गेले. परंतु नंदिनी शाळेत आली नाही.

माधव हॉस्पिटल मधून घरी आला होता. तो सर्वांना ओळखू लागला होता. झालेल्या अपघातातून माधवची स्मृती परत आली होती. त्याला कॉलेजचे दिवस आठवू लागले. लास्ट इयरची परीक्षा झाल्यानंतर घरी येताना माधवी उतरून गेल्यावर जो अपघात झाला त्याविषयी त्याला सर्व आठवू लागले. गाडी एका झाडावर आपटून माधव कसा जखमी होऊन बेशुद्ध झाला होता हे त्याला आठवले. परंतु त्यापुढे काय झाले काहीच माहित नव्हते . माधवला माधवीची आठवण झाली. माधवी आता कुठे असेल, तिचे लग्न ही झाले असावे या विचाराने त्याने मोबाईल उचलला . परंतु नवीन मोबाईल मुळे माझा नंबर हि नव्हता. मनात जुन्या आठवणी वर येऊ लागल्या तस तसे माधवचे मन बेचैन होऊ लागले. माधव कॉटवर झोपूनच खिडकीतून बाहेर बघत विचार करत होता. संध्याकाळ झाली होती . नंदिनीची शाळेतून घरी येण्याची वेळ झाली होती. माधवने नंदिनीची आठवण काढताच गाडीच्या हॉर्न चा आवाज आला. थोड्या वेळातच नंदिनी धावत धावत माधवकडे गेली ." काकाs काकाs माझ्या शाळेतल्या टीचर आल्या आहेत तुम्हाला बघायला..! " नंदिनी माझा हात धरून माधवच्या रूमकडे घेऊन जाता जाता म्हणाली . नंदिनीचा आवाज ऐकून माधव कॉटवरूनच दरवाजाकडे बघू लागला .मला समोर बघताच लगेच माझा हात पकडून म्हणाला , " माधवी, तू इथे कशी आणि तू कुठे आहेस..? तर माधवने मला ओळखले होते . मी माधवला नंदिनीच्या शाळेत टीचर आहे ..! एवढेच सांगितले . कारण माधवच्या मनस्थितीला सांभाळणे आवश्यक होते. थोड्या वेळातच माधवची आई चहा घेऊन आली आणि म्हणाली , " या टीचर होत्या म्हणून तू वाचलास, हिचे आपण कितीही आभार मानू तरि थोडेच आहेत..!" माधव हि आईचे बोलणे ऐकून माझ्याकडे कृतज्ञतेने पहात राहिला . तेव्हा मला संकोचल्या सारखे वाटत होते. थोड्या वेळाने चहा पिऊन कप बशी स्वयंपाक खोलीत ठेवण्याच्या निमित्ताने मी उठले आणि तेवढ्यात आईनी माझ्या हातातली कप बशी काढून घेऊन म्हणाल्या , " राहू दे माधवी, दे इकडे..!" मी जाण्यास निघाले तेव्हा माधव माझ्याकडं एकटक नजरेने बघत होता आणि गालातल्या गालात हसत होता. हे मात्र आईच्या नजरेतून चुकले नव्हते.

माधवची तब्येत आता चांगली झाली होती आणि एक दिवस त्याने मला बाहेर भेटण्यास सांगितले . त्या प्रमाणे मी माधवला भेटण्यास तयार झाले . परंतु आतून मन घाबरलेले होते. कारण माझ्या विषयीची सत्य परिस्थिती माधवला सांगायची होती. थंडगार वारा वहात होता. समुद्राच्या लाटा उंचावर उसळत होत्या . जणू त्या आमच्या मिलनाच्या आनंदाने बागडत होत्या. पाण्याचे शिडकावे उडवत होत्या. त्या शिडकाव्याने मन प्रसन्न होत होते. बोलता बोलता माधवने माझा हात हातात घेत म्हणाला , " माधवी ,आपले प्रेम खरे आहे म्हणूनच आपण योगायोगाने पुनः भेटू शकलो. खरच , तुझ्या विना मी अधुरा आहे . एवढ्या मोठ्या गाडीच्या अपघातातून वाचलो हे तुझ्यासाठीच नं ...!" माधव भावना विवश होऊन आपलं प्रेम व्यक्त करत होता. त्यामुळे माझी मनःस्थिती आणखीनच विचलित होत होती. परंतु हिम्मत करून मी माधवला माझे पूर्वसंचित जे घडलेले होते ते सर्व सांगितले. तरी माधवच्या मनावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. " माधवी, मला तू हवी आहेस.तुझ्यातील कुठल्याही

कमी ला स्वीकारून मी तुझ्यावर प्रेम करतो . जसे योगायोगाने आपण एकमेकाला पुनः भेटलो तसेच त्या योगानेच आपले लग्न होऊन आपल्या खऱ्या प्रेमाची निशाणी म्हणून आपल्या जीवनात तुझे आणि माझे एक चिमुकले फूल ही फुलेल ..! माधवच्या शब्दात विश्वास होता. त्या विश्वासापुढे मी काहीच बोलू शकले नाही.

लगेच माधव सी ए पास झाल्यावर आम्ही विवाहबद्ध झालो. आणि आमच्या जीवनात वर्षभरात दोन जुळ्या कळ्या उमलल्या . एक माझी सीता आणि एक माधवची गीता . तेव्हा मला समजले कि विशालने आपली कमी, आपल्यातला दोष लपविण्यासाठी आपल्या पुरूषत्वाच्या अहंकाराने बनावटी रिपोर्ट बनवून माझ्यात दोष दाखवला. परंतु मला माझा माधव परत मिळाल्या होता. हा योगायोगच म्हणायचं नं....!