सोराब नि रुस्तुम
पांडुरंग सदाशिव साने
१. वामन भटजींची गाय
कोण राहते त्या घरात? त्या जुन्या पडक्या घरात? त्या भयाण घरात? पहाटेच्या वेळेस पाखरांची किलबिल सुरू होते व त्या घरातून मंगल वेदमंत्र कानांवर येतात. कोण म्हणते ते मंत्र? तेथे भूत तर नाही ना राहत? कोणी ब्रह्मसमंध तर नाही ना? कोण आहे त्या घरात?
त्या घरात वेदमूर्ती वामनभटजी राहातात. विद्वान आहेत हो. दशग्रंथी आहेत. वेद म्हणजे त्यांच्या हातचा मळ. सारा ऋग्वेद त्यांच्या ओठांवर जसा खेळतो आहे. वेद म्हणजे त्यांची करमणूक, त्यांचा आनंद. शहरातील लोकांच्या तोंडी बोलपटांतील गोड गाणी असतात. वामनभटजींच्या तोंडी वेदमंत्र असत.
वामनभटजींचे वडील बंधू मोठे शास्त्री होते. भावाजवळच वामनभटजी बरेचसे शिकले. मधुकरी मागून शिकले. वडील भाऊ जरा तामसी व संकुचित वृत्तीचे होते. वामन भटजींस लहानपणापासून प्रेमाचा ओलावा मिळाला नाही. मोठ्या कष्टाने वेदविद्या त्यांनी संपादन केली.
त्यांनी आता स्वतंत्र व्हायचे ठरविले. त्यांचे लग्न झाले होते की नाही, माहीत नाही. कोणी म्हणतात, झाले होते; परंतु वामनभटजींची पत्नी कोणी कधी पाहिली नाही. आज तीस वर्षे त्या गावात ते आहेत; परंतु ते एकटेच आहेत.
तो पालगड गाव ब्राह्मणवस्तीचा होता. शेसवाशे ब्राह्मणांची घरे. तेथे वामनभटजींचे बरे चाले; परंतु त्यांचा वेळ कसा जावयाचा? वेद शिकविण्याची त्यांनी शाळा काढली. काही मुले त्यांच्याकडे सकाळी शिकायला येत. दुपारी शिकायला येत; परंतु ही मुले त्यांना भीत. ते त्या मुलांवर एकदम घसरा घालायचे. कधी कधी त्यांना बेदम मारायचेही! ते शिकवीत छान; परंतु जर का तब्बेत गेली, तर मात्र जमदग्नीचा अवतार; परंतु एखादे वेळेस त्या मुलांनाही प्रेमाने जवळ घ्यायचे, त्यांना खाऊ द्यायचे. त्यांच्या घरची प्रेमाने चौकशी करायचे. काही भाजी घरी असली, त्यांना कोणी दिली असली व जास्त असली तर मुलांना म्हणायचे, ‘जा रे घरी घेऊन, आईला द्या.’
त्यांच्या अंगात कधी नसायचे. नेसूचा एक पंचा व खांद्यावर एक लहानसा फडका. मात्र तपकिरीची डबी कनवटीस नेहमी असायची आणि त्यांना कोणी भेटला तर तपकिरीसाठी त्यांचा हात सहज पुढे व्हावयाचा.ते एकटे होते; परंतु एकट्याला काय नको? दिवसेंदिवस वेदविद्येला मानही कमी होत चाललेला. उद्या म्हातारपणी काही आधार नको का? थोडी पुंजी नको का? मग काय करावे? वामनभटजींनी भाड्यासाठी एक बैलगाडी करण्याचे ठरविले. सुंदर गाडी त्यांनी विकत घेतली. सुंदर, रुंद खांद्यांचे, आखूड शिंगी, एकरंगी बैल त्यांनी विकत घेतले. गाडी तयार झाली. वामनभटजी गाडीवान झाले.बैलांची ते किती काळजी घ्यायचे! बैलांच्या अंगावर सुंदर झुली होत्या. वामनभटजींचा नेसूचा पंचा फाटका असेल, खांद्यावरचा फडका जीर्ण झाला असेल, परंतु त्या झुली नीट असत आणि बैलांच्या कपाळावर गोंडे बांधलेले. त्या शुभ्रवर्ण बैलांच्या कपाळावर निळ्या रंगाचे ते गोंडे किती खुलून दिसत आणि गळ्यात घणघण वाजणा-या घंटा, शिवाय पितळी साखळ्या. ते बैल पाहताच पाहणा-याच्या डोळ्यांचे पारणे फिटे. असे बैल आपण कोठे पाहिले नाहीत असे सारे म्हणत.
वामनभटजी बैलांना कधी चाबूक मारायचे नाहीत की शिमटी लावायचे नाहीत. एकदा त्यांची व दुस-या एका गाडीवानाची पैज लागली होती. बैलाला काठी न लावता, चाबूक न मारता आधी कोण जाऊन पोचतो! आणि वामनभटजी एक तास आधी जाऊन पोचले होते. त्यांनी नुसते शब्दाने खुणावले, आवाज करून इशारत दिली, तरी बैलांना कळे.
मधूनमधून आपल्या बैलांना ते कढत पाण्याने आंघोळी घालायचे. कोठे खरचटलेले असले तर त्यावर तेल लावायचे. किती प्रेमाने ते बैलांना स्नान घालीत! त्या वेळेस अर्जुनाच्या घोड्यांचा खरारा करणारा श्रीकृष्णच आपण पाहात आहोत की काय असे वाटे आणि बैलांच्या अंगावर तांब्याने पाणी घालताना मुखाने मंगल वेदघोष सुरू असावयाचा. मोठे प्रसन्न, पावन असे ते दृश्य असे.
एखादे वेळेस वामनभटजींची गाडी येत असावी. पहाट झालेली असावी. थंडगार वारा सुरू असावा. बैलांच्या गळ्यातील मंजुळ अशा घंटा वाजत असाव्यात. आकाशात चार ठळक तारे अद्याप चमकत असावेत. पाखरांची रस्त्याच्या कडेला असणा-या झाडांवरून थोडी गोड किलबिल सुरू झालेली असावी आणि गाडीवर बसलेले, हातात कासरा असलेले वामनभटजी वेदमंत्र म्हणण्यात रंगून गेलेले असावेत! ते बैलही जणू आनंदत. त्यांच्या अंगावरही जणू रोमांच उभे राहात. अर्जुनाच्या घोड्यांनी भगवंतांनी सांगितलेली गीता ऐकली. वामनभटजींचे बैल वेद ऐकत.
या वेदमूर्ती भटजींस भय माहीत नसे. कोठे साप आला, कोणाच्या घरात घुसला तर काठी घेऊन ते धावत जायचे. एकदा गाडी हाकीत असता रात्री रस्त्यात बैल एकाएकी गजबजू लागले. वाघ आहे की काय जवळपास? अरे होय रे होय! तो पाहा वाघ. ते पाहा जळजळीत डोळे! जाळीजवळ तो उभा आहे. घेणार का उडी? वामनभटजींनी खाली उडी घेतली. ते जोखडाजवळ वेदमंत्र म्हणत उभे राहिले. तो निर्भय पुरुषव्याघ्र पाहून वनव्याघ्र प्रणाम करून निघून गेला.
परंतु वामनभटजींचा हा आनंद दैवाला बघवला नाही. ते बैल म्हणजे जणू त्यांचे कुटुंब. बैलांना खायला घालायचे, पाणी पाजायचे. बैलांना आंघोळ घालायची, झुली घालायच्या. बैलांचे गोंडे नवे आणायचे, घंटांची दोरी नवीन रंगीत करायची, असा बैलांचा संसार चालू असे; परंतु पायलागाचा रोग आला आणि हे दोन सुंदर बैल लागले. त्यांच्या पायात क्षते पडली. काडीला तोंड लावीत ना. पाय सारखे झटकीत. वामनभटजींनी सारे उपाय केले; परंतु गुण येईना. त्या बैलांजवळ ते बसत. ते बैल कृतज्ञतेने आपल्या धन्याकडे बघत. वामनभटजी त्यांच्या अंगावरून हात फिरवीत. प्रेमळ ममताळू हात! ज्या हातांनी कधी चाबूक मारला नाही, आर टोचली नाही, असे हात! बैलांच्या काळ्यानिळ्या सुंदर डोळ्यांतून ते पाहा पाणी येत आहे. खांद्यावरच्या फडक्याने वामनभटजी बैलांचे ते अश्रू पुशीत आहेत. करूण असा तो प्रसंग होता.
आणि एके दिवशी त्या पडवीत ते दोन्ही बैल मरण पावले. त्या स्वच्छ सुगंधी पडवीत त्या उमद्या व दिलदार प्राण्यांनी पवित्र वेदमंत्र ऐकत राम म्हटला. वामनभटजी रडत बसले. त्या बैलांना त्यांनी गडीमाणसे बोलावून वाशाला बांधून उचलून नेले. फरफटत नेले नाही. एका शेतात खोल खोल खड्डे खणून त्यांना त्यांनी मुठमाती दिली आणि पुढे काही दिवसांनी त्या ठिकाणी त्यांनी दोन आंब्याची झाडे लावली. मधून मधून त्या जागेला ते भेट द्यायचे. क्षणभर सदगदित होऊन बसायचे व निघून जायचे.
वामनभटजींच्या ओटीवर बैठकीच्या खोलीत तुम्हाला काय दिसेल? तेथे राजाराणीच्या तसबिरी नाहीत. कसली प्रशस्तीपत्रे नाहीत. ते गोंडे आहेत. त्या आठवणी, ती स्मृतीचिन्हे वामनभटजींनी ठेवली आहेत.
त्या गावात दुसरेही असेच एक एकटे गृहस्थ होते. त्यांची थोडी शेतीवाडी असे. तेही हाताने स्वयंपाक करीत. वामनभटजींना त्या गृहस्थांविषयी सहानुभूती असे. ते कधी कधी त्यांच्याकडे जायचे. तेथे चहा करायचे. स्वत: थोडा घ्यायचे व त्या मित्रासही द्यायचे. कधी उन्हाळ्याच्या दिवसात कच्ची कैरी किसायचे. तिच्यात गूळ, थोडे तिखटमीठ घालून त्या मित्रास द्यायचे व स्वत: खायचे. कधी आंब्याचे पन्हे करायचे. पावसाळ्याच्या दिवसात कोवळ्या कोवळ्या गराच्या अमृताप्रमाणे लागणा-या काकड्या दोघे खायचे. असा वामनभटजींचा व त्या गृहस्थांचा लोभ होता. त्या गृहस्थांचे नाव भाऊराव.
बैल मेल्यापासून वामनभटजी दु:खी होते हे भाऊरावांच्या ध्यानात आले होते. भाऊरावांना वेळ जायला कोर्टकचेरीचे वेड होते; परंतु त्यांच्या मित्राचा वेळ कसा जायचा? भाऊरावांकडे एक गाय होती. ही गाय वामनभटजींस द्यावी असे त्यांच्या मनात आले.
एकदा दोघे बोलत बसले होते. बैलांच्या आठवणी निघाल्या होत्या.
‘वामनभटजी, तुम्हाला एक गोष्ट सांगू?’
‘कोणती?’
‘तुम्ही बैलांची सेवा केलीत, आता बैलांच्या आईची करा. गोमातेची सेवा करा. मी तुम्हाला एक सुंदर गाय देतो. कराल तिची सेवा? तुमचा वेळ जाईल. करमणूक होईल. गाईसारखे जनावर नाही बघा. किती निर्मळ, सौम्य, सुंदर असते गाय! नाही? देऊ का तुम्हाला?’
‘द्या. खरेच माझा वेळ जाईल.’
‘परंतु दूध नाही हो ती फार देत.’
‘देईल तेवढे देईल. कामधेनू जर प्रसन्न झाली तर सारे देईल.’
‘परंतु ती कामधेनू हवी.’
‘भाऊराव, दुर्जनच एक दिवस संत होतात. कोळशांचेच म्हणे हिरे होतात. साध्या गाईतूनच कामधेनू तयार होत असतील. द्या तुमची गाय. ती माझी कामधेनू होईल.’
आणि एके दिवशी भाऊरावांनी ती काळी गाय वामनभटजींस दिली. वामनभटजींनी तिचे सावळी असे नाव ठेवले. जेथे पूर्वी ते बैल असत तेथे आता सावळी शोभू लागली.
ते स्वत: ती पडवी झाडीत. गोठा कसा आरशासारखा ठेवीत. पावसात घरात इतरत्र गळले तरी चालेल, परंतु गायीच्या पडवीवरची कौले नीट ठेवली जात. गोमातेच्या गोठ्यात नाही गळता कामा. पावसाळा सुरू झाला असावा. हिरवे हिरवे गवत तयार झालेले असावे. वामनभटजी मोठ्या पहाटे उठत व पाऊस नसला तर सावळीस घेऊन पसा-याला जात. पसारा म्हणजे पहाटे गुरांना पावसाळ्यातील हिरवे हिरवे गवत खायला घेऊन जाणे. वामनभटजी गाईचे गोवारी झाले. त्यांनी गुराख्यांकडून एक बांबूची बासरी करून घेतली. पहाटे रानात सावळी चरत असावी व भटजींची बासरी सुरू असावी. मध्येच बासरी थांबे व वेदमंत्र त्या वनात सुरू होत.
वेळच्या वेळेस ते पाणी पाजायचे. वेळच्या वेळेस चारा घालायचे. कधी दुपारी, कधी रात्री तिच्या मानेखाली हात घालून खाजवायचे. तिच्या अंगावरून हात फिरवायचे. सावळीही प्रेमाने त्यांचे अंग मग चाटायची.
उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी आटायचे. लांबून पाणी आणावे लागे. ते पाणी गढूळ असे. विहिरीच्या तळाचा गाळ त्यात असे. वामनभटजी ते पाणी गाळीत, निवळू देत आणि मग सावळीला ते निर्मळ पाणी पाजीत.
सावळी या सेवेने प्रसन्न झाली. अर्धा शेर दूध देणारी सावळी पाच शेरांचा लोटाभर दूध देऊ लागली. लोकांना आश्चर्य वाटले. वामनभटजी आता दुधावरच राहू लागले. कोणाला औषधाला गाईचे दूध लागले तर तो वामनभटजींकडे येई. कोणाला गाईचे तूप लागले तर तो वामनभटजींकडे येत. तूप कसे पिवळे रसरशीत दिसे!
सावळीचे दूध-तूप ते विकित नसत. गाय आधीच निर्मळ असते; परंतु वामनभटजीही तिला इवलीसुद्धा घाण लागू नये म्हणून जपत. तसेच थंडीच्या दिवसांत तिच्या अंगावर काही घालीत. बैलांच्या गळ्यातील त्या साखळ्या त्यांनी सावळीच्या गळ्यात घातल्या.
एकदा काय झाले, वामनभटजींवर कोठे तरी दूर जाण्याचा प्रसंग आला, कित्येक वर्षांत ते दूर कोठे गेले नव्हते; परंतु काही तरी महत्त्वाचे काम होते खरे. काय होते कुणास ठाऊक! दोन महिने तरी त्यांना तिकडे लागले असते. आता सावळीची काळजी कोण घेणार?
भाऊरावही कोठे दूर गेलेले होते. वामनभटजी जरा चिंतेत पडले. कोठे ठेवायची सावळी? त्या गावात पिलंभटजी म्हणून एक वैदिक होते. वामनभटजींच्या सावळीची ते नेहमी स्तुती करीत असत. त्यांच्याकडे गाय ठेवावी असे वामनभटजींनी ठरविले.
‘पिलंभटजी, मग ठेवाल ना दोन महिने तुमच्याकडे गाय? दुभती आहे-’ वामनभटजींनी विचारले.
‘किती देते दूध?’
‘पाच शेर तुम्हाला होईल. तुमची मुलेबाळे आहेत. जपा मात्र.’
‘बाकी तुमची सावळी म्हणजे रत्न आहे. अशी गाय मी माझ्या सा-या जन्मात पाहिली नाही आणि भाऊरावांकडेसुद्धा ती फार दूध देत नसे. तुम्हा काय खायला घालता?’
‘लोक घालतात तोच चारा. माझ्याजवळ का काही जादूमंत्र आहे? वेळच्यावेळेस तुम्ही तिला पाणी पाजा. चारा द्या. मी येईपर्यंत माझे हे प्राण सांभाळा.’
‘ठीक आहे. माझी चार गुरे आहेत त्यांत तुमची सावळी राहील.’
वामनभटजी घरी गेले. ते सावळीजवळ वेदमंत्र म्हणत उभे राहिले; परंतु पुढे त्यांच्याने म्हणवत ना ते मंत्र. डोळे अश्रुमंत्र म्हणू लागले. सावळीजवळ ते तिच्या पाठीवरून हात फिरवत उभे होते.
‘सावळ्ये, दोन महिन्यांनी मी येईन हो. दु:खी नको होऊ. कष्टी नको होऊ. चारा खात जा, पाणी पीत जा. हट्ट नको करू. पिलंभटजी तुझी काळजी घेतील हो बये.’ असे ते तिला म्हणाले.
मोठ्या दु:खाने त्यांनी तिचे दावे सोडून हातात धरले. गाय घेऊन आले. त्यांच्या गोठ्यात त्यांनी सावळीला बांधले. तिच्यापुढे आपल्या हातांनी त्यांनी चारा घातला. पाठीवरून हात फिरवून. मानेखालून हात घालून, तिला निरवून ते निघाले.
वामनभटजी गेले. दूर दूर गेले. सावळी हंबरत राही. जणू आपल्या प्रेमळ वत्साला, प्रेमळ भक्ताला हाका मारी. तिला तिचा प्रेमळ भक्त दिसेना. ती ना खाई नीट चारा, ना पिई नीट पाणी आणि पिलंभटजी तिच्याजवळ प्रेमाने थोडेच बोलणार! ते आपल्या गाईम्हशींना नीट चारा घालीत. जाडा भरडा सावळीला घालीत. तो दुजाभाव सावळीला असह्य होई. तो अपमान होता परंतु अपमान गिळून तू दिवस कंठीत होती.
पिलंभटजी पाच शेरांचा लोटा हातात घेऊन दूध काढायला बसत; परंतु सावळीला पान्हाच फुटेना. कास भरून येईना. पिलंभटजी संतापत व ‘वामनभटजी म्हणजे गप्पाड्या’ असे म्हणत. आपल्या भक्ताची टिंगल सावळीला खपत नसे. ती मग थोडेसे तरी दूध देई.
‘अहो, तिला दोन सोटे मारीत जा व दूध काढायला बसत जा.’ धोंडभटजी म्हणाले.
‘माझ्याही मनात तेच आहे. ढोराला शेवटी चाबूकच हवा’, पिलंभटजी म्हणाले.
आणि आता दुधाच्या लोट्याबरोबर ते सोटाही घेऊन जात. आधी दोन सोटे मारून मग ते कासेला हात लावीत; परंतु ती तेजस्वी गाय मग एकदम लाथा मारी. पिलंभटजी रागावे व भराभरा वाटेल तितके मारी. कळवळे ती गाय!
हळूहळू सावळी अजिबात आटली. एक थेंबसुद्धा दुधाचा निघेना. तिला आता खाणेपिणेही पोटभर मिळेना. तिचे डोळे खोल गेले. हाडे दिसू लागली. सावळी दोन महिने केव्हा होतात याची वाट पाहात होती.
तिकडे वामनभटजींस रोज सावळीची आठवण यायची. पानात एक लहानसा घास सावळीसाठी काढून ठेवायचे. सावळीसाठी रामरक्षा म्हणायचे. सावळी सुखरूप असो म्हणून देवाची प्रार्थना करायचे.
वामनभटजींचे काम संपले आणि ते आपल्या गावी परत यायला निघाले. एके गावी मोटारीने येऊन तेथून ते आपल्या गावी परत यायला निघाले. वेद म्हणत येत होते. सावळीची आठवण काढीत येत होते. आला गाव. गावाच्या हद्दीत ते शिरले. तो लोक रस्त्यातून भेटू लागले.
‘सावळी कशी आहे हो माझी?’ ते विचारीत.
‘मेली नाही अजून. तुमच्यासाठी जीव धरून आहे.’ श्रीधरपंत म्हणाले.
‘म्हणजे?’ त्यांनी धक्का बसून विचारले.
‘अहो, एक थेंबभर दूध देत नाही. पिलंभटजी काय फुकट खायला घालील? हात लावावा कासेस तर फाडफाड लाथा मारते. तुम्ही उगाच फुशारकी मिरवीत असा. पाच शेर दूध देते नि अशी आहे नि तशी. माझी कामधेनू आहे सा-या गप्पा. तरी आम्हाला वाटतच होते.’
‘अहो, खरंच ती कामधेनू आहे. तुम्ही पाहाल. ती लोटाभर दूध देईल.’ वामनभटजी म्हणाले.
वामनभटजींभोवती लोक गोळा झाले. घरी सामान ठेवून हातपाय धुवून वामनभटजी पिलंभटजींकडे आले. एकदम गाईजवळ गेले. गाय हंबरली. वामनभटजींनी तिच्या अंगावरून हात फिरविली. त्यांच्या डोळ्यांतून पाणी आले. तिच्याही आले.
‘सावळ्ये आलो हो मी.’ ते म्हणाले.
सावळी हंबरली. तिने त्यांचे अंग चाटले.
‘दाखवा ना दूध काढून वामनभटजी.’ जमलेले लोक म्हणाले.
‘अहो, ती भाकड कसले दूध देणार?’ पिलंभटजी म्हणाले.
‘परंतु ता वामनभटजींची कामधेनू आहे. बघू या कामधेनूचा महिमा पिलंभटजी, आणा तुमचा पाच शेरांचा लोटा. वामनभटजी सरसावा पुढे. नाही तर पैज हरलो म्हणा.’ लोक टिंगल करीत म्हणाले.
‘आणा लोटा.’ वामनभटजी म्हणाले.
सारे खो खो हसले. आणखी गर्दी जमली. लहान मुलेमुलीही आली. आयाबायाही जमल्या. सर्वांचे डोळे लागले आणि पिलंभटजी भांडे घेऊन आले. वामनभटजींना सावळीच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरविला.
‘सावळ्ये, मी भुकेलेला आहे. मला पोटभर दूध पाज. दोन महिन्यांचा मी उपाशी आहे हो.’ असे म्हणून ते दूध काढण्यासाठी बसले. कासेला त्यांनी हात लावला. कास भरून आली. जणू चार समुद्रच चार आचळांत येऊन उभे राहिले.
भांड्यात धार वाजली. भरभर दूध निघू लागले. भांड्यात दुधाच्या धारा भरत होत्या आणि वामनभटजींच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुटत होत्या. भांडे भरले!
‘दुसरे भांडे आणा पिलंभटजी, दुसरे आणा.’ मुले ओरडली.
दुसरे भांडे आले. तेही भरले आणि ‘पुरे हो सावळ्ये, पोट भरले,’ असे म्हणून वामनभटजी उठले.
‘खरी कामधेनू आहे.’ आयाबाया म्हणाल्या.
‘गाईगुरेही प्रेम ओळखतात.’ लोक म्हणाले.
‘पिलंभटजी, फुकट तू!’ कोणी उपहासाने म्हणाले.
वामनभटजींनी सावळीचे दावे सोडले.
‘चल सावळ्ये’ ते म्हणाले व निघाले. सावळी पाठोपाठ आली. आपल्या पहिल्या घरी ती आली. वामनभटजींनी तिला चारा घातला, पाणी पाजले. वेदमंत्र म्हणत किती तरी वेळ तिच्या अंगावरून ते हात फिरवीत उभे होते, मानेखालची पोळी खाजवीत होते.
वामनभटजी व त्यांची गाय म्हणजे पालगड गावाची एक कौतुकाची वस्तू होऊन राहिली आहे!
***