Sorab ni rustam - 3 books and stories free download online pdf in Marathi

सोराब नि रुस्तुम - 3

सोराब नि रुस्तुम

पांडुरंग सदाशिव साने

३. उदारांचा राणा

फार प्राचीन काळची गोष्ट आहे. तशा गोष्टी आता घडत नाहीत; परंतु त्या ऐकाव्याशा तर वाटतात कारण त्या गोष्टींतील धडे चिरंजीव असतात. असे अधीर नका होऊ. आता सागंतोच.

एका गावात एक सावकार होता. खूप धनदौलत त्याने मिळविली. बरे वाईट करून मिळविली. जिकडे तिकडे त्याची शेती. जिकडे तिकडे त्याच्या बागा. त्याचा वाडा चिरेबंदी, केवढा मोठा चौसोपी होता. जणू किल्लाच. घराला एक तळघर होते. त्यात अपार संपत्ती साठवलेली होती.

सावकाराचे नाना धंदे होते. नाना प्रकारची दुकाने होती. अनेक मार्गांनी तो पैसा गोळा करीत होता. त्याचे एक कापडाचे दुकान होते. प्रचंड दुकान. नाना ठिकाणची वस्त्रे त्या दुकानात होती. सुती होती, रेशमी होती, लोकरीची होती, तागाची होती. त्या दुकानात गेले म्हणजे मनुष्य चकित होई. हे घेऊ का ते घेऊ असे त्याला होई.

मोठमोठे श्रीमंत लोक तेथून माल नेत. मोठमोठे राजेरजवाडे तेथून माल नेत. शालू, पीतांबर, पैठण्या सारे तेथून नेत. श्रीमंत तेथे येत आणि गरीब कोठे जात? गरीबही तेथेच येत. सावकाराची शेते करणारे कुणबी तेथेच कपडेलत्ते घ्यायला येत. गरीब शेतकरी, गरीब मजूर तेथेच येत. जाडाभरडा कपडा घेऊन जात. घोंगड्या नेत. पासोड्या नेत. बायकोसाठी जाड सुती बाडं नेत; परंतु हे गरीब लोक उधारीने नेत. रोख पैसा त्यांच्याजवळ कोठला? त्यांच्याजवळ स्वत:चा घाम फक्त असतो. दुसरे काय असणार?

उधारीमुळे ते शेतकरी कर्जबाजारी होत. दोन रूपयांचा माल उधारीने न्यावा; परंतु पुढे त्याचे व्याज चढत जाई. शेतकरी कर्जात बुडे. हळूहळू त्याचे घरदार, असलेले शेतभात सावकाराच्या घशात जाई.

दिवसेंदिवस शेतकरी त्रस्त झाले. त्यांच्या अंगावर चिंध्या दिसत. कपडे कोठून घेणार? जवळ ना दिडकी. गहाण ठेवायला काही नाही. उधारही मिळेतनासे झाले. बिचारे उघडे राहू लागले.

त्या सावकाराला एक मुलगा होता. त्याचे नाव जयंत. तो मोठा झाला. वीस वर्षांचा झाला; परंतु त्याचे लक्ष कशात नसे. बापाला राग येई.

‘जयंत मी ही संपत्ती श्रमाने मिळविली. मी पूर्वी उन्हातून कापड खांद्यावर घेऊन गावोगाव हिंडत असे. वणवण करीत असे. ही संपत्ती का एकदम आली? तू आयतोबा आता या संपत्तीचा मालक होशील; परंतु तू लायक आहेस की नाही ते पाहिले पाहिजे. मला भीती वाटते की, तू सारी संपत्ती उधळशील. जयंत, मी सांगेन ते तू करशील?’ पित्याने एके दिवशी विचारले.

‘होय बाबा. तुम्ही सांगाल ते मी करीन. मला माझी लायकी सिद्ध करू दे. नालायकाचे जगात काय काम? सांगा. काय करू?’ जयंताने विचारले.

‘उद्या कापडचोपड खांद्यावर घेऊन जा. गावोगाव हिंड. ते सारे नीट विकून ये. बघू कसे करतोय ते काम. अनुभवाने शहाणपण येते. कष्टाने शहाणपण येते. केवळ बसून कोणी मोठा होत नाही. विद्या काय, संपत्ती काय, श्रमाशिवाय काही मिळत नाही. जाशील?’

‘हो बाबा, जाईन. सारी लाज सोडून जाईन. डोक्यावर गाठोडे घेईन किंवा पाठीवर बांधीन. खांद्यावर ठाणे टाकीन. जाईन गावोगाव. माल संपवून परत येईन.’

‘ठीक. उद्या नीघ.’ पिता म्हणाला.

जयंताच्या आईस वाईट वाटले. एकुलता एक मुलगा. सुखात वाढलेला. त्याला का असे वणवण हिंडायला पाठवायचे?

‘जयंताला का पायी कापड विकायला पाठवणार आहात?’ तिने विचारले.

‘हो. येऊ दे हिंडून. जरा अक्कल येईल. तू त्याला अगदी गुळाचा गणपती केले आहेस. लाडोबा केले आहेस. जरा टक्केटोणपे खाऊ दे. पैसा कसा पै पै करून मिळवावा लागतो ते शिकू दे. जे आपण श्रमाने मिळवतो ते राखतो. जे आयते मिळते ते उडवतो. जाऊ दे. काळजी नको करूस.’

‘मला काळजी वाटते. कसे होईल त्याचे? भूक लागली, काय खाईल? झोप आली, कोठे निजेल? ठेच लागेल; ऊन लागून घेरी येऊन पडेल. कोठे काटे असतील, कोठे दरी असेल. कोठे रान लागेल, कोठे नदी आडवी येईल. वाघ भेटायचे, साप फूं करायचे. नको ग बाई. नका हो जयंताला पाठवू. माझे ऐका. आईच्या हृदयाची तुम्हा पुरुषांना काय कल्पना?’

‘अग, जयंता का आता लहान आहे? असा हळुबाई करून कसे चालेल? जाऊ दे. झोप आली तर दगड उशाला घेऊन झोपेल. नाही खायला मिळाले तर पाला खाईल. होऊ दे धीट.’

शेवटी जयंत निघाला. सर्व लोकांना आश्चर्य वाटले. जयंत पायी निघाला. त्याने पाठीवर कापडाचे गाठोडे बांधून घेतले. खांद्यावरही काही ठाणे होती. नमस्कार करून तो निघाला. हळूहळू चालला. त्याला काही घाई नव्हती.

गाणी गुणगुणत तो चालला होता.

‘घ्या रे घ्या रे कापड. सुंदर सुंदर कापड. विटणार नाही. फाटणार नाही. पोते-यासारखे होणार नाही. अक्षय रंगाचे कापड. अक्षय टिकणारे कापड. घ्या रे घ्या कापड. हे कापड सर्वांना आवडते. लहानांना आवडते, मोठ्यांना आवडते, स्त्रियांना आवडते, पुरुषांना आवडते. सुंदर सुंदर कापड. घ्या रे घ्या कापड.’

‘या कापडाला प्रेमाचा रंग आहे. सुंदर सुंदर रंग. या कापडाला दयेचा रंग आहे. सुंदर सुंदर रंग. या कापडाला सहानुभूतीचा रंग आहे. सुंदर सुंदर रंग.’

‘घ्या रे घ्या कापड. न विटणारे कापड.’

अशा अर्थाची गाणी गात तो जात होता. त्याला गाव लागेना. माणूस भेटेना. गाव का सारे उठले, बेचिराख झाले? माणसे का परागंदा झाली? कोठे गेले गाव, कोठे गेली माणसे? त्यांना का खायला मिळत नव्हते म्हणून गेली? त्यांना का अंगावर वस्त्र नव्हते म्हणून गेली? त्यांना का राहायला घरदार नव्हते म्हणून गेली? कर्जात बुडाली म्हणून का गेली? गाईगुरे उरली नाहीत म्हणून का गेली? काय झाले?

जयंत पुढे पुढे चालला. तो ओसाड माळरान लागले. जिकडे तिकडे दगड. मोठमोठे काळवत्री दगड. मोठमोठे फत्तर. त्याला नीट चालताही येईना. ते दगड पायांना लागत. रक्तही येई. किती हे दगड! केव्हा संपेल हे दगडाळ माळरान असे त्याला झाले.

तो ते दगड बोलू लागले. ते कठीण कठोर दिसणारे दगड अमृताप्रमाणे बोलू लागले. त्या दगडांना जणू शेकडो जिभा फुटल्या.

‘अरे अरे जयंता, आमच्यावर रागावू नको, रुसू नको. जरा तुझ्या पायाला लागले, म्हणून शिव्याशाप नको देऊ. अरे तुझा केवढा चिरेबंदी चौसोपी वाडा आहे. आमचेच भाऊबंद त्या घरात चिणून ठार केले आहेत. तुझ्या वाड्याच्या पायात आमचे लाखो भाऊबंद पुरलेले आहेत. का आम्हाला नावे ठेवतोस? दगड तुम्हा मानवाच्या पदोपदी कामी येतात. दगडधोंडे रस्त्यावर तुम्ही पसरता आणि रस्ते तयार करता. दगडधोंड्यांनी तुम्ही पूल बांधता. आमची हाडे तुम्ही भरडता. खडी करता. रस्त्यावर पसरता. तुमचे गडगे, तुमचे बांध बांधताना तुम्हाला दगड लागतात. तुमची घरेदारे, तुमच्या विहिरी, तळी, पुष्करिणी बांधताना दगड हवेत. दगडांशिवाय तुमचे चालणार नाही. का नावे ठेवतोस? तुम्ही माणसे बुडता, परंतु दगडही रामनामाने तरतो. अरे, पाण्यावर गती देऊन आम्हास फेकता. दगड उड्या मारीत जातात. तुम्ही भाकरीचा खेळ नाही का खेळत?

आणि आमची तपश्चर्या बघ. रात्रंदिवस आम्ही दिगंबर राहून तपश्चर्या करीत आहोत. ऊन असो, थंडी असो, वारा असो. आम्ही सारे सहन करीत आहोत. तुम्हाला आम्हाला लवकर फोडता यावे म्हणून उन्हात तापून आम्ही आमच्या अंगाला भेगा पाडून घेतो. तुम्ही मग आमचे मोगरीने तुकडे करता. किती तुला सांगू?’

दगडाची वाणी ऐकून जयंता लाजला. त्याने त्या पाषाणांना प्रणाम केला आणि मग तो म्हणाला, ‘दगडांनो, तुमचे म्हणणे खरे आहे. तुमचे अपार उपकार आहेत. तुम्ही असे उघडेबोडके, उन्हातान्हात, पावसापाण्यात, थंडीवा-यात जगासाठी तप करीत असता. तुम्ही थोर ऋषी मुनी आहांत. मी तुम्हाला काय देऊ? माझ्याजवळ काय आहे? परंतु हे कापड आहे. तुमच्या अंगाखांद्यावर हे कापड मी घालतो. जणू तुम्ही देवाच्या मूर्तीच आहांत. हा सुंदर सुंदर माल मी तुम्हाला देतो.’

असे म्हणून जयंताने ते दगड शोभवले. कोणाला धोतर नेसवले, कोणाला लुगडे. कोणाच्या अंगावर उपरणे दिले, कोणाला घोंगडी दिली. एकाच्या डोक्याला पागोटे बांधले. मजाच मजा; परंतु ते एका गाठोड्यातील कापड कितीसे पुरे पडणार?

‘मी पुढच्या आठवड्यात आणखी घेऊन येईन हो. आज होते ते दिले. रागावू नका. जयंतावर प्रसन्न व्हा.’ असे म्हणून प्रणाम करून जयंत परतला.

रानावनांची शोभा बघत, नदीनाल्यांचे पाणी पित तो घरी आला. सुंदर सुंदर पक्षी, चपळ चपळ हरणे वगैरे बघत तो घरी आला. त्याला आनंद झाला. हसतमुख असा घरी आला.

‘जयंता, आलास? लागले वगैरे नाही ना? कोणी मारलेबिरले नाही ना? चोर नाही ना भेटले? वाघबीघ नाही ना भेटला?’ आईने विचारले.

‘आई, तुझ्या आशीर्वादाने सुखरूप परत आलो. वाघबीघ भेटला नाही, चोरांनी लुटले नाही. मी पुन्हा जाणार आहे. मला मजा वाटते. खरेच आई.’ जयंत म्हणाला.

बाप घरी आला. त्याला जयंत आल्याचे कळले. त्याने त्याला दिवानखान्यात बोलावले. जयंत नम्रपणे येऊन बसला.

‘जयंता, विकलास का माल? पसंत पडला का लोकांना?’

‘हो बाबा. सारा माल खपला. पसंत पडला. मी पुन्हा घेऊन जाईन. जास्त घेऊन जाईन. एका गाडीतच घालून नेला तर?’

‘परंतु पैसे कोठे आहेत?’

‘ते पुढच्या आठवड्यात देणार आहेत.’

‘असा उधार देऊ नये माल. पैसे घेऊन ये. जा गाडी घेऊन. म्हणजे बराच माल राहील. मात्र वाटेत जप. बैलांना पळवू नकोस. वाटेत खाचखळगे असतील. लक्ष ठेवून हाक.’

‘होय बाबा.’

आणि पुन्हा जयंत निघाला. गाडीत भरपूर माल घालून निघाला. बैल आनंदाने चालत होते. घणघण घंटा वाजत होत्या. जयंता गाणी गात होता.

‘ईश्वराने सर्व विश्वाला पांघरूण घातले आहे. त्याने कोणाला उघडे नाही ठेवले. पृथ्वीवर आकाशाचे न तुटणारे सुंदर वस्त्र त्याने घातले आहे. दयाळू देव! त्याने पाखरांना मऊमऊ ऊबदार पिसे दिली आहेत. मेंढ्याबक-यांना लोकर दिली आहे. दयाळू देव! तो झाडामाडांना दरसाल वसंत ऋतूत नवीन कपडे देतो. त्यांना वस्त्रांनी नटवतो. दयाळू देव!

‘अरे माणसांनो, देवाचे तुम्हाला लाडके व्हायचे आहे का? तर कोणाला उघडे पाडू नका. सर्वांच्या अंगावर कपडा आहे की नाही ते पाहा. कोणा कोणा श्रीमंतांकडे खंडीभर कपडे असतात; परंतु गरिबांच्या अंगावर लक्तरे असतात. त्यांची मुलेबाळे थंडीत गारठतात. असे नाही असता कामा. माणसांनो, असे नाही असता कामा. सर्वांनी आनंदाने राहावे. सर्वांनी सुखाने राहावे, एकमेकांस सांभाळावे.’

अशा अर्थाची गाणी म्हणत तो जात होता. वाटेत झाडाखाली तो स्वयंपाक करी. आनंदाने खाई. बैलांना पाणी पाजी, चारा घाली, विसावा देई, असे करीत त्या दगडाळ माळरानाजवळ गाडी आली. गाडी पुढे चालेना. थांबली गाडी. जयंत खाली उतरला व त्या दगडांच्या भेटीस निघाला.

परंतु ते दगड उघडेबोडके होते. ती वस्त्रे कोठे गेली? कोणी पळवली, लांबवली? ते दगड पुन्हा आपले दु:खी जणू.

‘का रे दगडांनो, मी तुम्हाला कपडे देऊन गेलो होते. कोठे आहेत ती वस्त्रे? कोणा दुष्टाने नेली?’

‘जयंता, उघडेबोडके शेतकरी आले. त्यांच्या अंगावर चिंध्या होत्या. त्यांच्या बायकांची अब्रू रक्षण होईल इतकेही वस्त्र त्यांच्या अंगावर नव्हते. पोरेही उघडी. जयंता, हे शेतकरी दरवर्षी दाणे पिकवतात; परंतु सावकार नेतात सारे. पुन्हा आपले उपाशी. पुन्हा पडतात उघडे. त्या शेतक-यांना पाहून आम्हाला वाईट वाटले. आम्ही त्यांना म्हटले, ‘अरे शेतक-यांनो, इकडे या. हे घ्या कपडे. घाला अंगावर!’ परंतु शेतकरी घेत ना. ते म्हणाले, ‘असतील कोणाचे. कसे घ्यावे? आम्ही मरू, परंतु दुस-यांच्या वस्तूस हात लावणार नाही!’ जयंता, किती सत्यवादी हे शेतकरी; परंतु त्यांना मोठे सत्य अद्याप समजले नाही. खरोखर सारे त्यांचेच आहे. श्रमातूनच सारे पिकते, निर्माण होते. आधी त्यांचा हक्क आहे सर्व अन्नवस्त्रावर; परंतु त्यांना कोण हे शिकवणार? केव्हा त्यांना कळणार? कळेल एके दिवशी. कळेल वेळ येईल तेव्हा. त्या शेतक-यांना आम्ही सांगितले, ‘अरे हे कपडे खरोखरच आमचे आहेत. एक उदार मुलगा आला होता. त्याने आम्हाला उघडे पाहून पांघरूण घातले. त्याला आमची दया आली; परंतु शेतकरी बंधूंनो, तुमची दया कोणीच करीत नाही. थंडी, वारा, ऊन, पाऊस यांची आम्हाला लाखो वर्षांची सवय आहे. आम्ही उघडे राहू शकतो. घ्या हो. हे कपडे तुम्ही घ्या. त्या मुलाने आम्हाला दिले. आम्ही तुम्हाला देतो. त्या शेतक-यांना ते कपडे घेतले. आम्ही दगड, परंतु आम्हीही आनंदाने हसलो. आम्ही दगड, परंतु आमच्या डोळ्यांतूनही श्रममूर्ती शेतकरी शृंगारलेला पाहून आनंदाश्रू आले. आम्ही दगड, परंतु त्या शेतक-यांचा आनंद पाहून आमच्या ओबड-धोबड काळ्यासावळ्या अंगावर रोमांच उभे राहिले. जयंता ते शेतकरी गेले.’

‘दगडांनो, आज मी गाडीभर वस्त्रे आणली आहेत. तुम्ही दगड असून किती उदार! तुम्ही दगड असून किती मायाळू व प्रेमळ! तुम्हाला शेतक-यांची कीव आली, परंतु शेटसावकारांना येत नाही. माणसाला माणसाची किंमत कधी कळेल? माणूस माणसाला कधी बरं सुखवील? दगडांनो, आज तुम्हाला सर्वांना मी नटवतो. सर्वांना शृंगारतो.’

असे म्हणून जयंताने त्या सुंदर सुंदर वस्त्रांनी ते दगड शृंगारले. त्यांच्या अंगाखांद्यावर वस्त्रे शोभू लागली. जयंताला कृतार्थ वाटले.

‘धन्य आहे तुझी जयंता,’ दगड म्हणाले.

‘धन्य तुम्ही दगड,’ जयंत म्हणाला.

‘जयंता, उदारांचा राणा हो, सर्वांना सुखी कर, तू थोर मनाचा आहेस. असा मुलगा आम्ही पाहिला नाही. पुढे पाहाणार नाही.’ ते दगड उचंबळलेल्या हृदयाने व सदगदित कंठाने म्हणाले.

‘तुमची कृपा माझ्यावर असेल तर सारे ठीक होईल. दगडांनो, तुमचे मंगल आशीर्वाद द्या. जातो मी.’

असे म्हणून जयंत निघाला. दगडांनी वस्त्रे हलवली. जयंताने बैल सोडले. गाडी बांधली. बैल पळत सुटले. त्यांना घरी जायचे होते आणि गाडीत ओझेही नव्हते. जयंताचे हृदय आनंदाने फुलले होते. तो गाणी म्हणत होता. बैलांची गाणी.

‘बैलांनो, बैलांनो, मला तुम्ही फार आवडता. कशी तुमची शिंगे, कसे रुंद खांदे. भरलेल्या गाड्या तुम्ही ओढता. जड नांगर तुम्ही ओढता. तुमचे काळे निळे डोळे, जणू पाण्याचे गंभीर डोह. फार सुंदर असतात तुमचे डोळे, फार आवडतात मला ते. तुम्हाला आम्ही मारणार नाही. तुम्हाला शिवी देणार नाही. तुम्हाला पराणी टोचणार नाही. तुम्हाला त्रास देणार नाही.

बैलांनो, तुम्ही आमचे आधार, तुम्हा आमचे अन्नदाते. तुमचे अनंत उपकार. तुम्हाला ‘राजा, सरदार’ अशा हाका मारू. तुमच्या गळ्यात घंटा घालू, साखळ्या घालू, तुमच्या कपाळावर गोंडे बांधू. पाठीवर झुली घालू. शिंगांना शेंब्या बसवू. बैलांनो, बैलांनो, मला तुम्ही फार आवडता. खरंच, फार आवडता; परंतु मी तुम्हाला आवडतो का? तुम्ही मनात काय म्हणत असाल? माणसाला काय म्हणत असाल?’ अशा अर्थाची तो गाणी म्हणत चालला.

गाडी घरी आली, जयंता आईला भेटला. तिने पाठीवरून हात फिरविला. ‘जयंता, आता नको जाऊस हो कुठे. किती दिवस हिंडायचे?’ आई म्हणाली.

‘आई, घरात राहणे मला आवडत नाही. बाहेर बरे वाटते. सारी सृष्टी जणू जवळ येते. झाडेपाडे जणू आपल्याजवळ बोलतात. दगडधोंडे बोलतात. आनंद असतो. मी जाईन पुन्हा.’

इतक्यात पिता आला.

‘काय जयंता, खपवलास का माल?’

‘होय बाबा.’

‘आवडला का लोकांना?’

‘फार आवडला.’

‘पैसे किती आणलेस?’

‘पुढच्या वेळेला देणार आहेत.’

‘आणि मागचे पैसे?’

‘तेही मिळतील.’

‘आणि आज का हात हलवीत आलास? अरे सारा माल उधार का द्यायचा? आणि काही चिठ्ठीचपाटी आहे का? वेडबंबूच दिसतोस. उद्या परत जा. सारे पैसे वसूल करून आण. एक पैही शिल्लक नको ठेवू. वाहवा रे! अशाने दिवाळे काढशील तू बापाचे. उद्या जा. समजलास?’

‘होय बाबा.’

आणि दुस-या दिवशी जयंता निघाला. गाडी घेऊन निघाला.

‘जयंता, गाडी कशाला नेतोस? पायीच जा.’

‘बाबा, तुम्हाला गाडीभर पैसे आणून देतो. पैसे ना हवेत तुम्हाला?’

‘अरे, त्या कापडाची इतकी का किंमत दोईल? फायदा जास्तीत जास्त घेतलास तरी कितीशी किंमत होणार?

‘परंतु मी गाडी भरून आणतो. नेतो गाडी.’

‘बरे, आण हो गाडी भरून.’

जयंता गाडीत बसून निघाला. बैल पळत होते. घंटा वाजत होत्या आणि पुढे रात्र झाली. बैल हळूहळू जात होते. वरती तारे चमचम करीत होते. रातफुलांचा सुगंध सुटला होता आणि जयंता गाणे म्हणत होता. काय होते गाण्यात?

‘पेरलेला एक दाणा शंभर दाण्यांचे कणीस आणतो. गरीबाला एक घास द्या, देव तुम्हाला कुबेर करील. गरिबाजवळ एक गोड शब्द बोला, देव तुमची स्तुतिस्तोत्रे गाईल. गरिबाला दिलेला एक दाणा सोन्याचा होऊन तुम्हास मिळेल. द्या, द्या. जवळ असेल ते देत जा. नाही कधी म्हणू नका. ते फुकट नाही जाणार. ते वाढेल, वाढेल.’

असे गाणे म्हणत होता. हळुहळू त्या दगडाळ माळरानाशी तो आला. त्याने गाडी सोडली. बैल बांधले. त्यांना चारा घालून तो दगडांकडे आला. पुन्हा आपले ते उघडे होते.

‘का रे दगडांनो, पुन्हा तुम्ही उघडेच?’

‘जोपर्यंत सारे शेतकरी वस्त्रप्रावरणांनी नटत नाहीत, तोपर्यंत आम्ही उघडेच राहू. तू आम्हाला देशील ते आम्ही त्यांस देऊ.’

‘दगडांनो, प्रेमळ उदार दगडांनो, या वेळेस मी रिकामा आलो. जवळ कापडचोपड काही नाही. बाबा रागावले. म्हणाले, पैसे वसूल करून आण. एका पैचीही बाकी ठेवू नकोस. आता काय करू?’

‘जयंता, किती होती किंमत? किती हवेत पैसे?’

‘मला काय माहीत? मीही त्यांना रागाने म्हटले, आणतो गाडी भरून पैसे तर म्हणाले, आण. बघतो कसे आणतोस ते. माझी अब्रू तुम्ही सांभाळा. नाही तर मी घरी जाणार नाही. माझे तोंड दाखवणार नाही.’

‘जयंता, रडू नको. चिंता करू नको. आमच्यातील तुला हवे असतील तेवढे दगड तू गाडीत भर व ने घरी. दे ते बाबांना. ते प्रसन्न होतील.’

‘दगडांना बघून का ते प्रसन्न होतील? माझ्या डोक्यात तेच दगड घालून ते मला मारतील.’

‘जयंता, आम्ही आता दगड नाही राहिले. तुझ्या प्रेमामुळे व उदारपणामुळे आमचे सोने झाले आहे. आम्ही दगड; परंतु शेतक-यांना आम्ही आमची वस्त्रे दिली. देवाने आम्हाला सोन्याचे केले आहे. तू घरी नेशील तो आम्ही सोने होऊ. तू जवळ असशील तो आम्ही सोने म्हणून राहू.’

‘दोन दगड पुरे झाले. फार कशाला?’

त्याने दोन मोठे दगड गाडीत घातले आणि निघाला. गाणी गात निघाला. काय म्हणत होता गाणे?

‘साधे दगड; परंतु ते प्रेमाने वागू लागले. जवळचे दुस-यास देऊ लागले आणि काय आश्चर्य? त्या दगडांचे सोने झाले. ते दगड कृतार्थ झाले.’

‘माणसांनो, अरे तुम्ही दगडाहून का नीच? तुम्हाला तुमच्या जीवनाचे सोने नाही का करायचे? करायचे असेल तर उदार व्हा. प्रेमळ व्हा. दुस-याला सुखवा. तुमच्या जीवनाचे सोने होईल. नराचे नारायण व्हाल. त्यागाची किंमत शिका. त्यागाचा स्पर्श होऊ लागला की, तुमच्या मातीचे सोने होऊ लागेल. व्हा. सोने व्हा. माती नका होऊ, कचरा नका होऊ. मोठे व्हा, क्षुद्र नका होऊ.’

असे म्हणते तो चालला होता.

गाडी घरी आली. बाप वाटच पाहात होता.

‘जयंता, काय आणलेस?’ त्याने विचारले.

‘गाडीत आहे ते घ्या,’ तो म्हणाला. बापाने गाडीत पाहिले. तो दोन सोन्याचे दगड. बापाचे डोळे दिपले. ते सोन्याचे दगड घरात नेण्यात आले. बापाला अत्यानंद झाला.

‘कोणी दिले हे दगड?’

‘ज्यांनी माल घेतला होता त्यांनी.’

जयंताचे सर्वांनी कौतुक केले; परंतु ते सोन्याचे दगड एका बाहेरच्या माणसाने पाहिले होते. तो त्या सावकाराकडे आला व म्हणाला, ‘माझा सोन्याचा एक दगड तुमच्याकडे आला आहे. मुकाट्याने द्या. नाही तर राजाकडे फिर्याद नेईन. घराची झडती घेववीन.’

सावकाराने एक दगड आणून त्याला दिला; परंतु त्या माणसाने तो घरी नेताच पुन्हा तो केवळ दगड दिसू लागला. कोठे आहे सोने? हा तर दगड. तो माणूस मनात म्हणाला, ‘जयंता वेडबंबू दिसतो. आणि बापही बावळट दिसतो; परंतु दगड सोन्यासारखा दिसत तर होता. जाऊ द्या. पुन्हा दगड होणारे सोने काय कामाचे?’

जयंता आनंदात होता आणि आता ती मोठी यात्रा येणार होती एका गावी. ते प्रसिद्ध तीर्थक्षेत्र होते. लाखाची यात्रा तेथे जमे. त्या वेळी दूरदूरची शेकडो दुकाने तेथे येत! सारे राष्ट्र तेथे जमे. यात्रा म्हणजे राष्ट्राच्या संसाराचे संमेलन, यात्रा म्हणजे सर्वांचे मीलन-स्थान.

‘जयंता, त्या यात्रेत जातोस का माल घेऊन? जा भरपूर माल घेऊन.’ बापाने सांगितले.

‘होय बाबा, जाईन.’ जयंत म्हणाला.

‘एके दिवशी पाच-पन्नास गाड्या जायला तयार झाल्या. त्यांच्यांत माल भरण्यात आला. जयंता निघाला. ते यात्रेचे ठिकाण आले. जयंताने पाल लावले. सारा माल तेथे त्याने मांडला. गाड्या परत गेल्या. यात्रा भरली. राव रंक सारे आले. जिकडेतिकडे गर्दी.

जयंताच्या दुकानात कोणाची ही गर्दी” हे श्रीमंत लोक नाहीत. हे सारे गरीब लोक आहेत. ह्या पाहा आयाबाया. अंगावर चिंध्या, उघडी मुले कडेवर. जयंता त्यांना फुकट कापड देत होता. त्या दुवा देऊन जात होत्या.

‘दादा, फुकट घेऊ नये परंतु आमच्याजवळ काही नाही,’ त्या आयाबाया म्हणत.

‘तुम्ही फुकट नाही घेत. किंमत भरपूर देत आहात.’ जयंता म्हणे.

‘कोठे रे दिली किंमत?’

‘तुमचे आशीर्वाद हीच किंमत. मनापासून मिळालेला आशीर्वाद म्हणजे अमोल वस्तू आहे.’

जयंताचे दुकान खलास झाले. तो आता बाजारात हिंडू लागला. यात्रा पाहू लागला. तो हजारो लोकांना नीट खायला नाही असे त्याने पाहिले. भावभक्तीने लोक यात्रेला आले; परंतु जवळ ना खायला ना प्यायला.

जयंता हा लक्षाधीश सावकाराचा पुत्र होता. त्याच्या दिलाची सर्वत्र प्रसिद्धी होती. जयंताने तेथील सावकारांकडू कर्ज काढले आणि एक मोठा रसोडा त्याने उघडला. कोणीही यावे व जेवून जावे अशी पाटी रसोड्यावर लावण्यात आली. मग काय विचारता? हजारो लोकांच्या झुंडी त्या रसोड्याकडे चालल्या. पंगतीवर पंगती उठू लागल्या. जयंताला मुलाबाळांचे, गरीब आयाबायांचे आशीर्वाद मिळत होते. ‘अन्नदाता सुखी भव,’ असे हजारो लोक मनापासून म्हणत होते. त्या सुखी लोकांच्या तोंडावरचे समाधान पाहून जयंताला मोक्ष मिळाला असे वाटे. यात्रा संपली लोक परतले.

जयंता आपल्या घरी आला.

‘काय जयंता? सारा माल खपला वाटते?’

‘हो.’

‘पैसे?’

‘उधारीने सारा माल विकला.’

‘अरे, यात्रेत आलेले लोक त्यांचा का ठावठिकाणा असणार? दाही दिशांतून आलेले लोक. ते कोठे भेटणार? त्यांची ओळख कशी राहाणार? कसा तू मूर्ख?’

‘बाबा, तुमचे पैसे मी परत जेईन. जेव्हा लागतील तेव्हा सांगा.’

बाप बोलला नाही. सोन्याचे दगड आणून देणारा जयंता काय चमत्कार करील कोणी सांगावे? परंतु थोड्या दिवसांनी त्या तीर्थक्षेत्रीच्या सावकारांकडून पत्रे आली.

‘जयंता सावकारांकडून कशाला घेतलेस पैसे?’

‘लोकांना जेवू घालण्यासाठी. लोक उपाशी मरत होते. मला पाहावेना. जवळ पैसे नव्हते.’

‘अरे, तू मांडले आहेस तरी काय? या सावकारांची एक कवडीही मी देणार नाही.’

जयंतच्या वडिलांनी तसे त्या सावकारांस लिहिले. ते सावकार रागावले. ते जयंताच्या वडिलांकडे आले

‘अहो, तुमच्या पतीवर आम्ही तुमच्या मुलाला पैसे दिले. तुम्ही नाकाराल हे आम्हाला नव्हते माहीत.’ ते सावकार म्हणाले.

‘परंतु दुकानातील माल सर्वांना उधार वाटणारा पोरगा काय किंमतीचा दे तुम्हाला समजले पाहिजे होते. मी या कर्जाला जबाबदार नाही. तो जयंता व तुम्ही काय वाटेल ते करा.’

‘काय रे जयंता, पैसे दे आमचे.’ सावकार म्हणाले.

‘आणि-जयंता, उधारीचे पैसेही घेऊन ये. जा दाही दिशांत. शोध कोणाला कापड दिलेस ते. जा. हो चालता.’ बाप म्हणाला.

‘सावकारांनो, उद्या मी उत्तर देईन. तुमचे पैसे तरू देईन नाही तर माझे प्राण तरी देईन.’ असे म्हणून जयंता आपल्या खोलीत गेला. तो आपल्या अंथरूणावर रडत होता. काय करावे ते त्याला सुचेना. रात्र झाली तारी तो उठला नाही. जेवायला गेला नाही. त्याची आई त्याला हाका मारायला आली.

‘जयंता, चल ना रे जेवायला. दोन घास खा. ऊठ.’

‘नको जेवण. नको काही. बाबांचे पैसे देईन तेव्हा येथे खाईन. उगीच त्यांच्या पैशांतून कशाला खाऊ?’

‘हे रे काय? ऊठ. तू नाही आलास तर मीही उपाशी राहीन.’

जयंता उठला. खाली गेला. दोन घास खाऊन पुन्हा खोलीत अंथरुणावर पडला. त्याला झोप लागली आणि झोपेत एक स्वप्न पडले. कसले स्वप्न? सुंदर असे देवाचे स्वप्न. स्वप्नात एक तेजस्वी पुरुष त्याच्याकडे आला व त्याला म्हणाला, ‘जयंता, धीर नको सोडू. जो गरिबांना जवळ घेतो, त्याला देव जवळ घेतो, तू देवांचा लाडका झाला आहेस. सारी त्रिभुवनातील संपत्ती तो तुला देईल. उद्या सकाळी उठल्यावर तुझ्या वडिलांना व त्या सावकारांना तू सांग, ‘चला माझ्याबरोबर, देतो पैसे.’ ते निघतील तुझ्याबरोबर. समुद्राकाठी जा आणि समुद्रात शिरा. भिऊ नका. तुम्हाला खांद्याइतके पाणी होईल. पुढे पुढे या आणि मग एक मोठे तळे लागेल. मोतीपोवळेयांचे तळे. हिरेमाणकांचे तळे. त्यांना सांग, ‘न्या वाटेल तितकी संपत्ती.’ समजलास ना रडू नकोस.’ असे संबोधून व जयंताच्या लवलेल्या मस्तकावर हात ठेवून तो दिव्य पुरुष दिसेनासा झाला. स्वप्न भंगले व जयंता जागा झाला. केव्हा एकदा उजाडते याची तो वाट पाहात होता.

पहाट झाली. दूरच्या मंदिरातील चौघडा वाजू लागला. पाखरांचीही किलबिल सुरू झाली. जयंता उठला. त्याने शौचमुखमार्जन केले. स्नान केले. देवाचे चिंतन केले. आईच्या पाया पडला आणि पित्याकडे गेला.

‘बाबा, चला माझ्याबरोबर. त्रिभुवनातील संपत्ती तुमच्यासमोर ओततो. चला. ते सावकारही बरोबर घ्या. चला.’ जयंता म्हणाला.

‘चावट आहेस.’ पिता म्हणाला.

‘चावटपणा नाही. खरेच सांगतो. तुमचीच शपथ.’

पित्याला वाटले, असेलही चमत्कार. तो निघाला. ते सावकारही निघाले. कितीतरी दिवस ते जात होते. वाटेत एक साधू भेटला त्यांना.

‘साधूमहाराज, कोठे जाता?’ पित्याने विचारले.

‘आम्ही विश्वसंचारी. जगभर हिंडतो.’

‘तुम्ही दगडाचे सोने झालेले पाहिले आहे?’

‘जगात नाना चमत्कार आहेत आणि ज्याच्यावर देवाची कृपा त्याला काय कमी? तुम्ही थोडे दिलेत तर देव अपार देतो. तुला एक गोष्ट सांगू? ऐक.

एकदा एक भिकारी भीक मागत जात होता. काखेला त्याची झोळी होती. इतक्यात शंखांचे आवाज, दुंदुभींचे आवाज कानी आले. कोण येत होते? राजाधिराज येत होते. चराचरांचा स्वामी सोन्याच्या रथात बसून येत होता. हिरेमाणके उधळीत येत होता. दरिद्री, भिकारी लोक वेचीत होते. जगाचे दैन्य दूर करीत राजाधिराज येत होता. आमचा भिकारी वाट पाहात होता. ‘राजाधिराजाचा रथ आपल्याजवळ येईल व तो माणिकमोती उधळील. ती आपण वेचू. जन्माची ददात जाईल,’ असे तो मनात म्हणत होता आणि तो रथ धडधड करीत आला. रथाला चन्द्रसूर्याची जणू चाके होती. वा-याचे जणू वारू होते. दिव्य रथ. भिकारी थरथरत उभा होता. आशेने उभा होता; परंतु तो राजाधिराजच रथातून खाली उतरला. तो त्या भिका-याजवळ गेला व म्हणाला, ‘मला भीक घाल? दे तुझ्या झोळीतील काही तरी.’ भिकारी लाजला, शरमला. ही काय थट्टा, असे त्याला वाटले. अशा ब्रह्मांडाधिपतीने माझ्यासमोर का हात पसरावा? परंतु त्याने हात पसरला आहे खरा. देऊ दे काही. असे मनात म्हणत त्या भिका-याने झोळीत हात घातला. त्याने झाळीतील एक अत्यंत लहानसा बारीकसा दाणा काढून त्या राजाधिराजाच्या हातावर ठेवला. राजाधिराज हसला. रथात बसून निघून गेला. तो भिकारी निराश झाला. माणिकमोत्यांची वृष्टी नाही. दुर्दैवी आपण. असे म्हणत तो आपल्या घरी आला. त्याने भिक्षेचे धान्य जमिनीवर ओतले, तो त्या धान्यात एक सोन्याचा दाणा चमकला! भिकारी चकीत झाला. ‘मी एक दाणा दिला, म्हणून त्याने हा सोन्याचा मला दिला. अरेरे, मी त्याला सारे धान्य दिले असते तर?’ असे त्या भिका-याला वाटले. संपली गोष्ट. छान आहे की नाही? जे काही थोडेफार देवाला तुम्ही द्याल, या दु:खी दुनियेला द्याल, ते अनंतपट होऊन तुम्हाला परत मिळेल. अहो, पेरलेला एक दाणा हजार दाण्यांचे कणीस नाही का घेऊन येत?’

‘साधूमहाराज, सुंदर सांगितलीत गोष्ट.’ जयंता म्हणाला. तो साधू निघून गेला. जयंता, त्याचे वडील व ते सावकार जाता जाता एकदाचे समुद्रकाठी आले. तो अपरंपार समुद्र उचंबळत होता. जणू जयंताला हृदयाशी धरण्यासाठी हजारो हातांनी पुढे येत होता.

‘बाबा, चला आता समुद्रात. चला माझ्याबरोबर. सावकारांनो, चला माझ्याबरोबर. घाबरू नका. भिऊ नका. मी बरोबर आहे. भीती नाही. छातीइतके फार तर पाणी होईल. चला, मोत्यापावळ्यांच्या राशी तुम्हाला देतो. हिरेमाणकांच्या खाणी दाखवतो. चला.’ असे म्हणून जयंता समुद्रास प्रणाम करून पाण्यात शिरला. तो बापाला व सावकारांना बोलावीत होता. हळुहळू तेही शिरले पाण्यात. घो घो लाटा वाजत होत्या. सो सो वारा वाहत होता. चालले सारे पाण्यातून. कमरेइतकेच पाणी. चालले पुढे. तो दूर प्रभा दिसली. समुद्राचे पाणी हिरवे निळे दिसत होते. कोठे लाल छटा होती. सुंदर देखावा, अपूर्व देखावा.ते सारे त्या विशिष्ट जागेपाशी आले. तेथे मोत्यांच्या वेली होत्या. मोत्यांचे घड लोंबत होते. किती रमणीय व कमनीय ती मोत्ये! आणि त्या पाहा पोवळ्यांच्या वेली, गुलाबी नयनमनोहर पोवळी आणि पलीकडे ते इंद्रनील मणी आणि या बाजूला पाचू. शेकडो छटा आसपास प्रतिबिंबित होत होत्या. त्या सर्वांचे डोळे दिपले. ती संपत्ती पाहून जयंताचा पिता व ते सावकारही चकित झाले.

‘बाबा, घ्या तुमचे पैसे. जितके पैसे मी देणे असेनन तितक्यांची घ्या संपत्ती. घ्या मोती-पोवळी, घ्या हिरे-माणके. सावकारांनो, बघता काय? लुटा संपत्ती. कोणी बोलणार नाही. घ्या.’ जयंता सांगत होता.

‘जयंता, परमेश्वराची तुझ्यावर कृपा आहे. नाही तर समुद्रातून आपण कसे आलो असतो? ही सागरसंपत्ती समोर कशी दिसली असती? तुझी धन्य आहे जयंता. तू गरिबांची पूजा केलीस. दरिद्रीनारायणाची सेवा केलास. परमेश्वराला ते पावले. तू आमचे डोळे उघडलेस. चल, माघारी जाऊ. आजपासून संपत्तीचा उपयोग कसा करावा ते आम्ही शिकलो. आम्ही जनतेच्या संपत्तीचे विश्वस्त आहोत. आमच्याजवळची संपत्ती आमची नाही. ती श्रमणा-यांची आहे. ती दरिद्रीनारायणांची आहे. ती त्यांना आम्ही दिली पाहिजे. त्यांना सुखी केले पाहिजे. जयंता, तुझ्यामुळे आम्ही धन्य झालो. आम्ही माणसे झालो आज. जणू माकडे होतो. आज आम्हाला माणुसकी आली. चल बाळ.’ असे ते सावकार म्हणाले. पिता तर आनंदाश्रू ढाळीत होता. ते सारे निघाले. ते सावकार आपल्या तीर्थक्षेत्राला गेले. जयंता व त्याचे वडील आपल्या घरी आले. ती गोष्ट सर्वत्र पसरली. जयंताची किर्ती सर्वत्र गेली.

पुढे जयंता आणखी मोठा झाल्यावर सर्व संपत्तीचा मालक झाला. त्याचे वडील वारले. पुढे आईही वारली. जयंताने लग्न केले नाही. तो जगाचा संसार करीत होता. स्वार्थाऐवजीपरमार्थ साधीत होता. पित्याची सारी संपत्ती त्याने सेवेत खर्च केली. सर्वांची ददात त्याने दूर केली. ‘उदारांचा राणा’ असे लोक त्याला म्हणत. कोणी त्याला दीनबंधू म्हणत, प्रेमसिंधू म्हणत.

जयंता पुढे मरण पावला. सारी दुनिया हळहळली, पशुपक्षी हळहळले. दगडधोंडे रडले. जयंताच्या गोष्टी त्या प्रांतात अद्याप ऐकू येतात. त्याचे पोवाडे म्हटलेले ऐकण्यात येतात.

कितीतरी वर्षे झाली; परंतु जयंताची कीर्ती कायम आहे. त्याचे उदाहरण जगाला स्फूर्ती देत आहे, मार्ग दाखवीत आहे. जीवनाचे सोने कसे करावे याची जादू जयंताचे आदर्श जीवन शिकवीत आहे. जयंता उदारांचा राणा झाला. आपणही थोडेफार उदार होऊ या.

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED