Amol goshti - 15 to 22 books and stories free download online pdf in Marathi

अमोल गोष्टी - 15 - 22

अमोल गोष्टी

पांडुरंग सदाशिव साने

१५. पहिले पुस्तक

एक अत्यंत गरीब मुलगा होता. तो गरीब होता तरी त्याला शिकण्याची फार इच्छा होती. एक दिवस तो एका शेजारच्या मुलाजवळ खेळत होता. त्या मुलास तो म्हणाला, ''मला जर तू अक्षरे वाचावयास शिकवशील तर सहा अक्षरांस एक बैदुल याप्रमाणे मी तुला देईन.'' तो मुलगा तयार झाला. परंतु पुस्तकाची पंचाईत आली. तो गरीब मुलगा पुन्हा म्हणाला, ''पुस्तकाची व्यवस्था मी करतो.'' पुष्कळ प्रयत्न करूनही त्या मुलास पुस्तक मिळाले नाही. शेवटी त्याच्या कल्पक मेंदूने एक युक्ती शोधून काढली. मनुष्य मेल्यावर त्यास पुरतात व त्याच्या शवावर दगड ठेवतात व त्यावर त्या मृत माणसाचे नाव, जन्म, मृत्यू वगैरे लिहिलेले असते. तो गरीब मुलगा त्या शेजारच्या मुलास म्हणाला, ''चल रे, त्या कबरस्थानात कितीतरी पुस्तके आहेत. तेथे येऊन तू मला शिकव.'' त्या मुलाच्या लक्षात काही येईना. कबरस्थानात पुस्तके कोठून येणार? शेवटी ते दोघे प्रत्यक्ष कबरस्थानात गेले. त्या गरीब मुलाने त्या दगडावरील अक्षरे स्वतःस शिकवावयास त्यास सांगितले. त्या मुलाच्या लक्षात आता सर्व आले त्याने ती अक्षरे त्याला वाचावयास शिकविली. रोज तेथे येऊन तो ती दगडी पुस्तके वाची. हळूहळू तो वाचावयास शिकला.नंतर तो एका अनाथ शाळागृहात गेला. गुरूजींनी विचारले, ''तुला वाचता येते का?'' ''होय'' असे म्हणून आपण वाचावयास कसे शिकलो हे त्याने सांगितले. गुरूजींस ते खरे वाटेना, परंतु इतर मुलांनी ''हे खरे आहे'' असे सांगितले. गुरूजी त्या मुलास म्हणाले, ''या पुस्तकातील ही प्रार्थना वाच. जर वाचशील तर हे सुंदर पुस्तक तुला बक्षीस देईन.नम्रपणे तो गरीब मुलगा उभा राहिला व त्याने ती प्रार्थना वाचली. ते पुस्तक बक्षीस मिळाल्यावर त्याच्या चिमुकल्या हृदयास किती बरे खराखुरा आनंद झाला असेल! सारांश, दृढ इच्छेस उपाय हा असतोच.

***

१६. योग्य इलाज

गोल्डस्मिथ हा इंग्रजी भाषेतील नामांकित कवी अठराव्या शतकात झाला. 'विकार ऑफ वेफफील्ड' ही त्याची कादंबरी व 'ट्रॅव्हलर ऍण्ड डेझटेंड् व्हिलेज' या त्याच्या कविता जगप्रसिध्द आहेत. गोल्डस्मिथ हा कवी होता. त्याबरोबरच त्याला वैद्यविद्या पण थोडीफार अवगत होती. तो उदार म्हणूनही प्रसिध्द होता. एखाद्या जवळून घरखर्चासाठी कर्जाऊ पैसे तो आणी, पण वाटेत कोणी भिकारी भेटल्यास त्यास ते देऊन टाकी.एकदा एका गरीब बाईचा नवरा आजारी पडला. तेव्हा ती बाई गोल्डस्मिथकडे आली व म्हणाली, ''महाराज, कृपा करून घरधन्यांची प्रकृती पाहाल व औषध द्याल तर गरिबावर फार उपकार होती.''गोल्डस्मिथ लगेच त्या बाईकडे गेला. त्याने त्या बाईच्या नव-याची प्रकृती वगैरे तपासून पाहिली. परंतु त्यास रोग आढळला. तो एवढाच की पुरेसे अन्न वगैरे त्यास मिळत नाही.गोल्डस्मिथ त्या बाईस म्हणाला, ''माझ्याबरोबर तुमचा मुलगा पाठवा. मी त्याच्या हाती औषध पाठवून देतो.''गोल्डस्मिथ घरी गेला. त्या मुलाबरोबर दहा सोन्याची नाणी पिशवीत घालून त्याने पाठवून दिली.पिशवीतील औषध पाहून तो गरीब मनुष्य चकित झाला. आपला रोग दारिद्रयाचा होता हे गोल्डस्मिथने ओळखले, असे त्याला पक्के समजले. त्याने त्याला मनात धन्यवाद दिले.तो मनुष्य नीट बरा झाला. बरा झाल्यावर गोल्डस्मिथकडे जाऊन तो म्हणाला, ''महाराज, मी आपला कायमचा ऋणी आहे. तुम्ही मला वाचविलेत, नाही तर माझ्या चार कच्च्याबच्च्यांचा सांभाळ माझी एकटी बायको कशी करती ?''गोल्डस्मिथ म्हणाला, ''बाबारे, प्रत्येकाने दुस-यास शक्य ते साहाय्य करावे हे कर्तव्य आहे. मी मोठेसे काय केले ?''

***

१७. चित्रकार टॅव्हर्निअर

ज्यूलस टॅव्हर्निअर म्हणून अमेरिकेत एक मोठा चित्रकार होऊन गेला. एकदा एका लखपती व्यापा-याने त्याला आपल्या बंगल्याशेजारच्या बागेत बसून समोर देखावा दिसेल त्याचे मोठे चित्र काढण्यास सांगितले. टॅव्हर्निअरला हे काम सांगून तो व्यापारी युरोपमध्ये काही कामासाठी निघून गेला.टॅव्हर्निअर त्याच दिवसापासून ते चित्र तयार करून लागला. रोज त्या बागेत जाऊन जसे दिसेल त्याप्रमाणे चित्र तयार होऊ लागले. एक वर्ष ते चित्र तयार करण्यास लागले. पुढे वर्षभराने तो व्यापारी परत आला, तो ते चित्र तयार झाले होते. व्यापा-याने ते चित्र पाहून चित्राची तारीफ केली. परतु एक चूक त्याला दाखवावीशी वाटली. व्यापारी म्हणतो, ''ही झाडे वगैरे सर्व हुबेहुब आहेत; परंतु There ought to have been a few dashes of sublight. या सूर्यप्रकाशाचा रंग जरा जास्त उठावदार पाहिजे होता.'' चिता-याची चूक तर दाखविली पाहिजे म्हणून त्या व्यापा-याने दाखविली. परंतु टॅव्हर्निअर निःस्पृह होता. तो त्या धनिकास म्हणाला, ''या बाबतीत तुम्हास ईश्वराकडे तक्रार केली पाहिजे. सूर्याचा प्रकाश चित्र काढावयाचे वेळेस जसा होता, तसा मी दाखविला आहे. I have not the way to change the way the sun shines. I cannot paint what I don't see. सूर्याच्या प्रकाशाला मला बदलता येणार नाही. जे मला दिसत नाही ते मी चितारू शकत नाही.''टॅव्हर्निअरचे उत्तर ऐकून तो व्यापारी लाजला. त्याने योग्य ती किंमत दिली. हे चित्र अत्यंत उत्कृष्ट म्हणून कॅलिफोर्नियामध्ये प्रसिध्द आहे.

***

१८. मरीआईची कहाणी

एक आटपाट नगर होते. तेथे एक राजा होता. राजा मोठा पुण्याचा, मोठा भाग्याचा. पाच सुना; दोन्ही लेकी सासरी सुखाने नांदल्या सवरल्या. त्याचे राज्य म्हणजे सुखाचे. त्रास नाही, चिंता नाही. रोग नाही, राई नाही. कशाचा म्हणून उपद्रव नाही. सारे लोक सुखी होते. पण होता होता काय झाले, एकदा आखाडाचा महिना आला. झिमझिम पाऊस पडू लागला. शेते हिरवीगार दिसू लागली. गायीगुरांना चारा झाला; दूधदुभत्याची चंगळ झाली. शेतातील कामे संपली; सासुरवाशिणी माहेरपणाला माहेरी आल्या. आईबापांना आनंद झाला. माझी नव्या नवसाची, भरल्या चुडयाची बाबी आली, तिला कोठे ठेवू असे झाले. रोज नवी नवी पक्वान्ने होऊ लागली. नगरात आनंदीआनंद होता. खाण्यापिण्यात ताळतंत्र राहिले नाही.इकडे काय झाले? मरीआई देवीने हे सारे पाहिले. तिने मनात विचार केला, राजाच्या राज्यात जावे. लगबगा उठली. तिने कुंकवाचा मळवट भरला, केस मोकळे सोडले नि अनवाणी चालत निघाली. नगराच्या वेशीपाशी आली आणि तिने आत डोकावून पाहिले. तिला मोठा आनंद झाला. नगरात ती शिरली. तिचे रूप कसे होते? गाल बसलेले, डोळे खोल गेलेले, तोंड पांढरे फटफटीत व हाडांचा सांगाडा; फाटकेतुटके वस्त्र नेसलेली अशी ती होती.मरीआई रस्तोरस्ती फिरू लागली. प्रत्येक घरात डोकावून पाही. घाण दिसली, की शिरली तेथे, मरीआईची कृपा पुष्कळांवर होऊ लागली. लोक पटापट मरू लागले, मोठा कहर गुदरला. रोज पाचपन्नास माणसे मरू लागली. वार्ता राजाच्या कानी गेली. राजाला फार वाईट वाटले; माझी प्रजा कोण का मारते? मी कधी कुणाचे वाईट केले नाही. देवाच्या सेवेत अंतर केले नाही; गोरगरिबांना नाडले नाही; कर वाटेल तसे घेतले नाहीत. मग देवाचा माझ्या राज्यावर कोप का? राजा दुःखी झाला, त्याला खाणेपिणे रुचेना, सुखविलास सुचेना. अनन्यभावाने देवाला शरण गेला व म्हणाला, ''देवा नारायणा, शेषशायी भगवाना, चुकले-माकले क्षमा कर. माझी प्रजा सुखी कर.''

राजाच्या स्वप्नात देवाने दृष्टान्त दिला. ''राजा, राजा, उठ, अरे, निजतोस काय? तुझ्या नगरात मरीआईचा फेरा आला ना? तिला नगराच्या बाहेर घालव. ती उद्या राजवाडयाकडे येणार आहे. तिच्या स्वागताची तयारी ठेव.''राजा उठला. मरीआईच्या स्वागताची त्याने तयारी केली. सर्व राजवाडा झाडूनझुडून स्वच्छ केला होता; कण्या-रांगोळया घातल्या होत्या; धूपदीप लावले होते; चंदनाचे सडे घातले होते. घाणीचे कोठे नाव नव्हते. उंची उंची आसने मांडून राजा मरीआईची वाट पाहात बसला.मरीआई त्या दिवशी लवकर उठली व राजवाडयाकडे जाऊ लागली. परंतु राजवाडयातील स्वच्छता पाहून ती दुःखीकष्टी झाली. राजाने मोठया मानाने तिला सिंहासनावर बसविले. राजा म्हणाला, ''आई, आपण दुःखीकष्टी का? सेवेत काय न्यून आहे?'' मरीआई म्हणाली, ''काय सांगू? राजा, मला तुझ्या राज्यात फारसे खायला मिळाले नाही.'' राजा म्हणाला, ''आई, इतकी प्रजा बळी पडली तरी तू सुखी नाहीस?'' मरीआई म्हणाली, ''राजा, माझी भूक तुला माहीत नाही. मी जाते तेथे गावची पांढर (स्मशानातील राख) मात्र शिल्लक ठेवते. तुझ्या नगरात मला पोटभर खायले मिळाले नाही. मी उपाशी आहे.''

राजाने विचारले, ''आई, माझे राज्य तुला आवडले नाही का?'' ''नाही रे, तितकेसे काही आवडले नाही. तुझे लोक फार स्वच्छतेने वागतात. घर स्वच्छ दिसले की माझे कपाळ उठते. त्या घरात मी शिरत नाही. या नगरात शिरले नि काय पाहिले? लेकीसुना घरी आलेल्या, घरेदारे स्वच्छ केलेली, रंगरंगोटी दिलेली; खाणेपिणे बेताने चालले होते. शिळेपाके कोणी खाईना. पाणी गाळीत व तापवून पीत. अशा घरी शिरावेसे मला वाटेना!'' राजा बोलला, ''मग, मरीआई, माझी इतकी माणसे कशी मेली?'' मरीआई म्हणाली, ''राजा, थोडी घरे माझ्या आवडीची सापडली, त्या घरांत मी गेले. दारातच उकिरडे होते. तेथे घाणीची रास साचलेली, माश्यांचे घोंघावणे चाललेच आहे. राजा, ह्या जागा मला फार आवडल्या. काही लोकांनी खाण्यात धरबंध ठेवला नव्हता. वाटेल तेव्हा, वाटेल तितके, हवेतसे खात होते. त्यांच्यावर मी कृपा केली.''राजा बोलला, ''मरीआई, तुझी कृपया आणखी कोणावर होते?'' मरीआई म्हणाली, ''तरणीताठी मुले मला फार आवडतात. म्हातारीकोतारी, अशक्त दुबळी मला आवडत नाहीत. नियमित वागणारी व स्वच्छतेची भोक्ती माणसे, त्यांना भेटावयास मी मेल्ये तरी जाणार नाही. राजा, स्वच्छता मला आवडत नाही, लिंबाचा वास खपत नाही; जेवताना कोणी लिंबे खात असेल तर मी तेथून पळ काढते.''राजाने मनात विचार केला - मरीआईला स्वच्छता का आवडत नाही ? - ठीक आहे. राजाने नगरात दवंडी पिटविली, ''घरेदारे स्वच्छ ठेवा; दारात उकिरडे करू नका; शिळेपाके खाऊ नका; माश्या अन्नावर बसू देऊ नका; पाणी गाळून तापवून घ्या; जेवताना लिंबाचा सढळ हाताने उपयोग करा.''दवंडी लोकांनी ऐकली व लोक तसे करू लागले. मरीआई संतापली. रागाने खवळली, जशी नागीण. ती राजाकडे गेली व म्हणाली, ''राजा, मोठा रे कपटी आहेस तू; मला भुकेने मारतोस. मी तुझ्यावर कोपले आहे. तुझ्या राज्यात फिरून म्हणून येणार नाही.''राजाला आनंद झाला. लोक सुखी झाले. तुम्ही आम्ही पण सुखी होऊया. अशी ही साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफल संपूर्ण.

***

१९. कृतज्ञता

गंगा नदीच्या पवित्र तीरावर एक अंजिराची बाग होती, त्या बागेतील अंजिराचा ताजा मेवा खाण्यास हजारो पोपट येत व बागेतच राहात. या पोपटात एक पोपट फारच सुंदर होता. एका अंजिराच्या झाडावर तो सदैव असायचा. दरवर्षी या अंजिराची मधुर फळे खाई, गंगेचे निर्मळ पाणी पिई व मोठया संतोषाने असे.परंतु सर्वच दिवस सारखे नसतात. काही वर्षे गेल्यावर त्या वृक्षाचे सौंदर्य व सामर्थ्य नष्ट झाले. तो अंजीरवृक्ष वाळत चालला. त्या झाडास पाने फळे येतनाशी झाली. शेवटी राहता राहता सुकलेले शुष्क खोड मात्र राहिले. अंजिराच्या झाडात पुष्कळ ढोल्या होत्या व त्यातून भूस बाहेर पडत असे.तो तांबडया चोचीचा सुंदर हिरव्या पंखाचा पोपट कोठे होता? तो पोपट आपल्या जुन्या मित्रास चिकटून राहिला. ज्या झाडाने पूर्वी आपणास सुंदर अंजीर दिले त्या झाडाला त्याच्या शेवटच्या दिवसांत पोपटाने सोडले नाही. तो झाडाची वाळलेली साल व ढोलीतून गळणारा भुसाच खाई व गंगेत उतरून तृषा भागवी.त्या पोपटाची निष्ठा देवाने पाहिली. एका हंसाचे रूप धारण करून भगवान ब्रह्मदेव त्या अंजीरबागेत आले. हंसरूपी ब्रह्मदेव पोपटास म्हणाले, ''शुका, जेथे सुंदर फळे वगैरे असतात तेथे पाखरे राहतात, तू वेडयासारखा या वाळलेल्या खुंटावरच का बसून राहतोस?''पोपट म्हणाला, ''हे हंसा, हा वृक्ष व मी दोघे बालपणापासून मित्रमित्र आहो. हा वृक्ष अंगात शक्ती व सौंदर्य असेपर्यंत माझे पोषण करी - मला अंजीर देई. यावज्जीव ज्याने मजवर प्रेम केले, त्याला मी कसा सोडू? मी कृतघ्न कसा होऊ? मी येथेच मरेन पण उडून अन्यत्र जाणार नाही.''ब्रह्मदेवास आनंद झाला. त्याने आपले स्वरूप प्रगट केले व आपल्या कृपेने त्या वाळलेल्या झाडास पानेफुले आणलीण तो वृक्ष सुंदर दिसू लागला. मरेपर्यंत तो पोपट त्याच झाडावर राहिला.सारांश, पशुपक्षीसुध्दा कृतज्ञता व प्रेम दाखवतात मग विचारशील मनुष्याने किती थोरपणाने वागले पाहिजे बरे?

***

२०. श्रेष्ठ बळ

कुराणात पुढे दिलेला संवाद देवदूत व देव ह्यांच्यामध्ये झाल्याचे लिहिले आहे.देवदूत : प्रभो, या जगात दगडापेक्षा बलवान अशी कोणती वस्तू आहे का? सर्व वस्तू दगडावर पडून फुटतात, पण दगड मात्र अभंग राहतो.देव : होय. देगडापेक्षा, खडकापेक्षा कठीण अशी वस्तू आहे. लोखंड हे खडकापेक्षा बलवान आहेण कारण लोखंडी घण खडकास फोडू शकतो.देवदूत : लोखंडाहून प्रबळ अशी कोणती वस्तू आहे?देव : लोखंडाहून अग्नी प्रबळ आहे; कारण अग्नी लोखंडाचा रस करू शकतो.देवदूत : अग्नीपेक्षा प्रबळ काय आहे?देव : पाणी हे अग्नीहून प्रबळ आहे. कारण पाणी आग विझवू शकते.देवदूत : पाण्याहून प्रबळ कोण?देव : पाण्याहून प्रबळ वारा आहे. पाण्यास वारा हलवू शकतो.देवदूत : वायूहून प्रबळ काय आहे?देव : पर्वत वायूस अडवू शकतात, म्हणून पर्वत हे वायूपेक्षा प्रबळ आहेत.देवदूत : प्रत्येक वस्तूहून दुसरे काही तरी प्रबळ आहेच. सर्वांत प्रबळ असे काय आहे?देव : उजवा हात काय देत आहे हे डाव्या हातासही माहीत नाही. अशा गुप्त रीतीने परोपकार करणारे, दान करणारे सदय अंतःकरण हे सर्वात श्रेष्ठ होय.

***

२१. चतुर राजा

सालोमन म्हणून एक प्राचीन काळी पश्चिमेकडे राजा होऊन गेला. तो शहाणपणाविषयी फार प्रसिध्द होता. त्याच्या चातुर्याची कीर्ती दूरवर पोचली होती. कीर्तीही पंखाशिवाय उडत जात असते. एक दिवस सालोमन आपल्या दरबारात बसला होता. मोठमोठे अमीर, उमराव सरदार आपापल्या ठिकाणी बसले होते. इतक्यात दरबारात एक स्त्री आली. तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले.सालोमनने विचारले, ''बाई, आपले काय काम आहे? आपणास कोणी दुष्टाने त्रास दिला आहे का ? बोला, परंतु तुमच्या चर्येवरून तर तसे काही दिसत नाही. मग आपण का आल्या आहात?'' ती स्त्री म्हणाली, ''राजा, तुझ्या चातुर्याची कीर्ती ऐकून त्या चातुर्याची परीक्षा घेण्यासाठी मी आले आहे. हे पाहा, माझ्या हातात दोन हार आहेत, या दोन हारांपैकी कृत्रिम फुलांचा हार कोणता व ख-या फुलांचा कोणता हे आपण दुरूनच सांगा, जर आपण ओळखले तर आपण माझ्या परीक्षेस : उतरला असे मी समजेन.''ती सभा तटस्थ राहिली. राजास वासाने ओळखता आले असते. परंतु ती बाई दूर बसली होती. आपल्या राजाची एक बाई फजिती करून ािणात की काय असे सभासदांस वाटू लागले. राजा विचारात पडला. इतक्यात त्याला उत्कृष्ट युक्ती सुचली. ज्या खिडकीजवळ ती बाई बसली होती त्या खिडकीबाहेर मधमाश्या घोंघावत होत्या, राजाने आपल्या नोकरास ती खिडकी सताड उघडण्यास सांगितले. खिडकी उघडताच काही मधमाश्या आत आल्या व नेमक्या एकदम ख-या फुलांच्या हारावर बसल्या. झाले. ती बाई सर्व उमजली. ती राजास म्हणाली, ''आपला शहाणपणाचा लौकिक एकंदरीत खरा आहे.''मुलांनो, मधमाशी क्षुद्र प्राणी, परंतु तीसही कृत्रिमता आवडत नाही; खरी वस्तू त्या प्राण्यास आवडते. तुम्ही पण ढोंगीपणास भुलू नका, ख-या कामाची पारख करून ते आपलेसे करीत जा.

***

२२. सभाधीटपणा

फ्रान्स देशातला फोंतेन म्हणून एक गोष्टीलेखक होऊन गेला. त्याच्या पुष्कळ गोष्टी आहेत, त्यांपैकी एक देतो.पॅरिसमध्ये एक तरुण विद्यार्थी कायद्याचा अभ्यास करीत होता. तो विद्वान होता, परंतु वक्तृत्व त्याच्या ठिकाणी नसल्यामुळे स्वत:चे विद्वत्व व्याख्यानातून वगैरे त्यास दाखविता येत नसे. एकदा त्याचा बाप त्याला भेटण्यास आला त्याचा बाप त्याला म्हणाला, ''तुझ्या अंगात सभाधीटपणा आला पाहिजे. यासाठी तू अभ्यास करीत जा. शहराबाहेर बागेत, मळयात वगैरे जावे आणि तेथे मोठमोठयाने पाठ केलेले म्हणावे, अशा रीतीने आत्मविश्वास अंगी आला म्हणजे हू समाजात चांगलाच पुढे येशील.''वडील निघून गेले; मुलगा बापाच्या सांगण्याप्रमाणे वागू लागला. तो रोज एका कोबीच्या मळयात जाई व तेथील कोबीच्या कांद्यासमोर मोठमोठयाने व्याख्यान देई, काही दिवस असे चालले. त्या तरुणास आता असे वाटले की, आपण मोठया सभेतही व्याख्यान देऊ शकू, तो एका बडया कॉलेजच्या अधिका-यास भेटला व आपले व्याख्यान ठरवा असे तो म्हणाला. कॉलेजच्या अधिका-यांनी ही विनंती मान्य केली. दिवस ठरला, सर्व तयारी झाली, सभागृह भरून गेले, मोठमोठे प्रोफेसर तेथे आले होते, ठरल्या वेळी आपला हा तरुण व्याख्यान देण्यासाठी उभा राहिला, परंतु तो चारपाच वाक्ये जेमतेम बोलला आणि गडबडला, शेवटी तो म्हणाला, ''कोबीच्या बागेत कोबीच्या कांद्यास विद्वान श्रोते समजून मी व्याख्याने देऊ शकतो; परंतु या सभेत विद्वान श्रोत्यांस कोबीचे कांदे समजून मला व्याख्यान देण्यास धीर येत नाही.'' असे बोलून तो तरुण लज्जेने खाली बसला.मुलानो, सभाधीटपणा अंगी पाहिजे. त्याशिवाय आपणास पदोपदी अडचणी भासतील, तो जन्मतःच अंगी नसेल तर अंगी आणा, परंतु कोबीच्या बागेत अभ्यास न करता सभातूनच बोलण्याचा प्रयत्न व्हावा.

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED