अमोल गोष्टी - 14 Sane Guruji द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अमोल गोष्टी - 14

अमोल गोष्टी

पांडुरंग सदाशिव साने

१४. 'मुलांनो, सावध!'

ग्रीस देशातील इसापप्रमाणे पुष्किन् म्हणून एक रशियन ग्रंथकार शे-दोनशे वर्षापूर्वी होऊन गेला. त्याच्या गोष्टींपैकी एक गोष्ट पुढे देतो.एक लहानसा ओढा होता. उन्हाळयात पाण्याचा एक थेंब त्यात आढळेल तर शपथ. पावसाळयात मात्र त्याची कोण ऐट व मिजास! एकदा खूप मुसळधार पाऊस पडला, जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. आमचा हा लहानसा ओढा पाण्याने फुगून गेला. त्याच्या तीरावर धान्यांची सुंदर शेते होती. त्या नाल्याने आपले पाणी दूरवर पसरिले, ती सुंदर शेते वाहून गेली. त्या उध्दट धटिंगण ओढयाने सामर्थ्यांच्या जोरावर ती सुकुमार व उपकारक शेते वाहवून न्यावी ना? त्या शेतांमुळे या ओढयाचेच सौंदर्य वाढत असे, परंतु दुष्टाला दुस-याचे नुकसान करण्यात स्वतःचेही शेवटी नुकसान होईल हे दिसत नसते.त्या शेतांस वाईट वाटले. आपण मोठया नदीकडे फिर्याद न्यावी म्हणजे या गर्विष्ठ ओढयास ती चांगले शासन करील असे त्या गरीब शेतास वाटले. ती शेते उरलेले हिरव्या रंगाचे कपडे घालून महानदीकडे फिर्याद देण्यासाठी आली, परंतु एकदम '' पसरून चकित झाली. हजारो शेते, हजारो गावे, प्रचंड वृक्ष, त्या महानदीच्या प्रचंड ओघाने वाहून जात होती. या ओढयाने दोन चारच शेते बुडविली; परंतु ही सवाई राक्षसीण - हिने तर हजारो सुंदर शेतास मूठमाती दिली, गावच्या गाव उद्ध्वस्त केले ; स्वतःच्या संपन्मदाने मदांध झालेली ती बेफाम नदी पाहून आपली गा-हाणी सांगून दाद मिळण्याची आशा या फियादी शेतांस कोठून राहणार ?ती शेते खाली माना घालून, खिन्नपणे सुस्कारे सोडीत माघारी गेली.मुलांनो, पुष्किनने लिहिलेली ही कल्पित गोष्ट त्या काळातील रशियातील स्थितीवर कितीतरी प्रकाश पाडते. रशियातील अधिकारी गोरगरिबांस नाडीत असत. खालच्यापेक्षा वरचा अधिकारी जास्त उर्मट, बेजबाबदार, जुलमी ! खालचे पुरवले पण वरचे नको. सारांश, रशियन लोकांस कोणी त्राता नव्हता. हीच स्थिती वाढत गेली व रशियात पुढे क्रांत्या झाल्या.अधिकारी असतात ते जनतेचे नोकर असतात, परंतु आमच्याकडील पोलिस पाटलापासून तो थेट वरपर्यंत सर्वच मुळी बादशहा, लोकांस कस्पटासमान लेखणारे, त्यांस नाडणारे असे दिसतात. याचा परिणाम केव्हाही सुफलदायी होणार नाही. पुष्कळ वेळा युरोपियन अधिकारीही पुरवतात, परंतु आपली काळी नोकरशाहीच जास्त जाचते, 'कु-हाडीच दांडा गोतास काळ' म्हणतात ना, तशातली गत. मुलांनो, तुम्ही पुढे मामलेदार, मुन्सफ कोणी झालात तर प्रजेच्या सुखासाठी कामे करा. फुकटाफाकट पगार घेऊ नका व बादशाही ऐटीने आपल्याच बांधवांस दडपू नका.