Swaraja Surya Shivray - 6 books and stories free download online pdf in Marathi

स्वराज्यसूर्य शिवराय - 6

स्वराज्यसूर्य शिवराय

भाग सहा

॥॥ पुणे-बंगरूळ-पुणे ॥॥

'नवा भिडू नवे राज्य ' अशीच काहीशी अवस्था शहाजीराजे यांची झाली होती. सारखी धावपळ आणि युद्ध. या सततच्या दगदगीतून चार क्षण विश्रांतीचे मिळावेत, कुटुंबातील व्यक्तींसोबत राहता यावे, लहानग्या शिवबाच्या बाललीला पाहता याव्यात, शिवबाला चांगले शिक्षण द्यावे या हेतूने शहाजीराजे स्वतःसोबत जिजाऊ आणि शिवबा यांना घेऊन विजापूरला दाखल झाले.परंतु तिथेही त्यांना फार काळ व्यतीत करता आला नाही. त्यांना मिळालेला महलनुमा वाडा घोरपडे सरदारांच्या हट्टामुळे आदिलशाहाने घोरपडे यांना दिला आणि त्याचवेळी शहाजींची बदली बंगरूळ येथे केली. झाले. पुन्हा शहाजींना कुटुंबासह स्थलांतर करावे लागले. अशारितीने भोसले कुटुंबीय बंगरूळ येथे दाखल झाले. तिथे शहाजीराजे यांनी शिवबाच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली. स्वतः शहाजीराजे संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होते. शहाजीराजे यांच्या दरबारात अनेक भाषेंवर प्रभूत्व असणारे पंडित होते. निरनिराळ्या कलांमध्ये पारंगत असणारे कलावंत होते. हुशार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिवबाचे शिक्षण सुरु झाले. अक्षर ओळख झाली आणि शिवबाला वाचनाचा छंद निर्माण झाला. रामायण, महाभारतातील कथा तो आवडीने वाचू लागला. माता जिजाऊ यांच्याकडून ऐकलेल्या कथा वाचताना तो तल्लीन होऊ लागला. तल्लख बुद्धी असलेला शिवबा कोणतीही गोष्ट तात्काळ समजावून घेत असे. सोबतच शिवबाला शहाजीराजांचा दैनंदिन कार्यक्रम जवळून अभ्यासण्याची संधी मिळाली. शहाजींचे नेतृत्व, त्यांची निर्णय क्षमता, सत्तेचा यथोचित वापर जनकल्याणासाठी करण्याची त्यांची हातोटी, त्याचबरोबरीने राज्यकारभारासाठी उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी यासोबतच युद्धसमयी वापरायची आयुधे, युक्ती इत्यादी अनेक बाबींचे प्रत्यक्ष प्रशिक्षणासारखे अनुभव मिळाले. ती फार मोठी शिदोरी शिवरायांना मिळाली. शहाजीराजांकडे एकापेक्षा एक हुशार, कर्तबगार, धाडसी, निष्ठावंत, पराक्रमी असे सरदार, सेनापती होते. या शूरवीरांकडून शिवबाला प्रत्यक्ष लढाईच्या वेळी मैदानावर अंमलात आणावयाची नीती, कुटनीती, डावपेच, हल्ला-प्रतिहल्ला इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. शिवबा सारे काही तन्मयतेने ऐकत असे, तल्लीन होऊन पाहत असे, लक्षपूर्वक ऐकत असे. मनोमन काही गोष्टी ठरवत असे. एक निश्चित अशी बैठक नकळत शिवबाच्या मनात तयार होत होती.

शिवरायांच्या शिक्षणाच्या बाबतीत एक उल्लेख असा आढळतो की, जे शिक्षक शिवबाला अक्षर ओळख करून देण्यासाठी येत होते. ते शिवबाची प्रखर बुद्धीमत्ता पाहून प्रभावित होत असत. शिवबासोबत अध्ययनाला येणारे इतर विद्यार्थी आणि शिवबा यांच्या बुद्धीमध्ये विलक्षण फरक असल्याचे त्यांना नेहमीच जाणवत होते. शिवबाचे उच्चार स्पष्ट, ठाम, आणि आत्मविश्वासाने ओतप्रोत असे असायचे. शिवबाला एखादे अक्षर लिहायला, वाचायला शिकवावे तर ते त्याने आधीच आत्मसात केलेले असे. एवढेच नाहीतर शिवबा त्याच्यापुढचे अक्षर लिहून-वाचून दाखवत असे. कुणाला ही अतिशयोक्ती वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु शिवबाची जी ही हुशारी होती, चतुरस्त्रवृत्ती पदोपदी दिसून येत होती त्यामागे स्वतः शहाजीराजे आणि माता जिजाऊची तळमळ, दूरदृष्टी होती. शिवबा शिक्षकाने शिकवलेले अक्षर जिजाऊ आणि शहाजींना वाचून, लिहून दाखवत असेल आणि ते दोघे खुश झाले, शिवबाला शाबासकी देत असताना शिवबा त्यांच्याकडे पुढचे अक्षर शिकविण्याचा हट्ट धरत असेल आणि अशारीतीने शिवबा शिक्षकांनी शिकविण्यापूर्वीच पुढील अक्षर शिकून घेत असावा. काहीही असले तरी शिक्षकाला शिवबाच्या या जिज्ञासू आणि नवनवीन शिकण्याच्या स्वभावाचे कौतुक वाटत होते.ते चकित होत होते. एकदा का संपूर्ण लिपीवर, बारखडीवर प्रभूत्व स्थापन झाले की, शिवरायांनी जे हातात पडेल ते वाचण्याचा सपाटा लावला. शिवराय अल्पावधीत अनेक विद्या शिकले. ह्या साऱ्या विद्या त्यांना भविष्यात फायदेशीर, उपयुक्त ठरणार होत्या. विविध प्रकारचे शस्त्र चालवायला शिवबा जसा युद्धकलेचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांकडून शिकला त्याचप्रमाणे युद्धकलेत पारंगत होण्यासाठी, प्राविण्य मिळवण्यासाठी अनेक बारीकसारीक कला, गोष्टी शिवबा प्रत्यक्ष शहाजीराजे आणि माता जिजाऊ यांच्याकडूनही शिकला. एक महत्त्वाची गोष्ट किंवा विद्या शिवराय त्यांच्या आईवडिलांकडून शिकले ती विद्या म्हणजे 'इंगित!' इंगित म्हणजे जाणणे. संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या हावभावावरून,त्याच्या अभिनयातून किंवा त्याच्या शारीरिक हालचालींवरून त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे ते जाणून घेणे. दुसऱ्या अर्थाने मनकवडा! शिवबा या विद्येतही प्रवीण झाले होते. या सर्वामागे शिवबाजवळ असलेली उपजत प्रतिभा, बुद्धी! शिवरायांना लाभलेली समज,समजून घेण्याची पक्वता,एकाग्रता, नवीन गोष्ट जाणून घेण्याची जिज्ञासा या गोष्टी शिवरायांच्या जीवन प्रवासात निर्णायक आणि शिवरायांना यशोशिखरावर नेण्यासाठी सहाय्यभूत ठरल्या.

शिवरायांचे शिक्षण सुरु असतानाच शहाजीराजे आणि जिजाऊ यांनी निर्णय घेतला की, जिजाऊ आणि शिवबा यांनी पुन्हा पुणे येथे जाऊन तिथल्या परंपरागत जहागीरीचा कारभार पाहावा. शिवबाच्या जन्माच्या वेळी शहाजीराजे जिजाऊंना सोडण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर असताना चिडलेल्या आदिलशाहाने पुण्यावर फार मोठी फौज पाठवून पुणे बेचिराख केले होते. ते सावरायला पाहिजे. शिवाय शहाजीराजेंना राहून राहून एक गोष्ट सारखी वाटत होती, एक खंत त्यांना सारखी बोचत होती की, किती दिवस परक्यांची चाकरी करायची, त्यांच्या उत्कर्षासाठी स्वतःचे रक्त सांडायचे. शहाजींनी दोनवेळा स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने त्यांना प्रत्येक वेळी अपयश आले आणि म्हणून आपले अपूर्ण स्वप्न आपल्या शिवबाने पूर्ण करून जनतेला स्वातंत्र्य सूर्याच्या कोमल प्रकाशात मनसोक्त विहार करण्याचा आनंद द्यावा म्हणून त्यांनी शिवबाला साऱ्याच गोष्टींमध्ये, विद्येमध्ये, कलांमध्ये पारंगत केले होते. दुसरीकडे जिजाऊ तर वर्षानुवर्षे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहात होत्या. शहाजी-जिजाऊ यांनी निर्णय घेतला की, जिजाऊ यांनी शिवबाला घेऊन महाराष्ट्रात परतावे. तिथल्या जहागीरीचा कारभार पाहताना 'स्वराज्य' स्थापनेसाठी प्रयत्न करावेत. ही गोष्ट शिवबाच्या कानावर गेली. त्यांनी मातेला विचारले,

"माते, आपणास पुणे येथे जायचे आहे का? तिथे आपला वाडा आहे का?"

"नाही. तिथे आपले फार मोठे असे दोन वाडे होते. परंतु तुमच्या वडिलांवर चिडलेल्या शत्रूंनी विशेषतः आदिलशाहीने आपल्या दोन वाड्यासह पूर्ण पुणे जाळून खाक केले. तिथे काहीही शिल्लक राहिले नाही. काही लोक नव्याने झोपड्या बांधून राहतात. आपल्याला ही नवीन वाडा बांधून होईपर्यंत असेच राहावे लागेल...."

"आऊसाहेब, चिंता नसावी. आपणही त्यांच्या सोबत राहूया. पण शत्रूने पुन्हा हल्ला केला तर?""तर मग शिवबा आपल्याला हातात शस्त्रे घेऊन शत्रूला कापून काढावे लागेल. आपण श्री प्रभूरामचंद्राचे वंशज आहोत. आपल्या जहागीरीत आजही शूरवीर लोक आहेत, पराक्रमी लोक आहेत. त्यांना एकत्र करुया. त्यांच्या हातामध्ये तलवारी, भाले देऊन शत्रूचा बिमोड करुया."

"ठीक आहे. आपण म्हणाल तसेच होईल. मी आपल्या आणि तातसाहेबांच्या शब्दाबाहेर नाही."

शिवबा ठामपणे म्हणाले. त्यांचा तो आत्मविश्वास, चेहऱ्यावरचा निर्धार पाहून जिजाऊ मनोमन संतोषल्या..…

त्याप्रमाणे जिजाऊंनी पुणे येथे प्रस्थान करण्याचे ठरवले. काय घ्यायचे, काय ठेवायचे हे मनोमन ठरवले. शहाजीराजे यांनी मेणे, पालख्या, भालदार-चोपदार, धनदौलत, घोडे, हत्ती, उंट, विविध प्रकारची शस्त्रास्त्रे आणि मोठ्या प्रमाणावर सैन्य सोबत दिले.सोबतच अध्यापक मंडळीही दिली. शिवबाचे शिक्षण चालू होते. त्यात खंड पडू नये हा त्यामागचा हेतू होता. त्याचवेळी शहाजींनी पुणे-सुपे जहागीरीचे प्रमुख म्हणून शिवबाची नेमणूक करीत असल्याचा लखोटा शिवबाकडे सुपूर्द केला. सोबतच दादोजी कोंडदेव या अत्यंत विश्वासू, प्रामाणिक, हुशार, राजकारणाची उत्तम जाण असलेल्या शिलेदाराला शिवबाचे सहाय्यक, मार्गदर्शक म्हणून सोबत पाठवले. ठरलेल्या मुहूर्तावर, ठरलेल्या वेळी तो सारा लवाजमा शहाजीराजे आणि इतरांचा निरोप घेऊन पुण्याच्या दिशेने कूच करता झाला. बंगरूळहून निघालेला शिवबा एका वेगळ्याच तेजाने, आत्मविश्वासाने मार्गक्रमण करीत होता. शिवबा एकदम प्रौढ झाल्यागत दिसत होता. शहाजीराजे यांनी एखाद्या राजाला निरोप द्यावा अशी तयारी शिवबाला निरोप देताना केली होती. शहाजी-जिजाऊ या दोघांचीही मनोमन इच्छा अशीच होती की, शिवरायांनी एखाद्या राजाप्रमाणे जहागीरीचा कारभार पहावा त्यामुळे पुणे मुक्कामी जाताच शिवरायांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, आलीच छोटीमोठी अडचण तर ती तिथल्या तिथे दूर व्हावी यादृष्टीने शहाजीराजांनी सारी काळजी घेतली होती, सारी व्यवस्था केली होती..…

आदिलशाहने पुणे पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. घर गेले, माणसे गेली, शेती, धनदौलत गेली शिवाय पुन्हा कुणाची स्वारी येईल आणि लचका तोडून घेऊन जाईल या भीतीने आणि संकटसमयी रक्षण करण्यासाठी कुणी मदतीसाठी नाही या सर्व परिस्थितीचा विचार करून अनेक लोकांनी कुटुंबासह स्थलांतर केले होते. आदिलशाहीचे आक्रमण होण्यापूर्वीचे पुणे आणि आदिलशहाने हल्ला केल्यानंतरचे पुणे यात स्वर्ग आणि स्मशान यासारखे अंतर होते. या संदर्भात असाही उल्लेख आढळतो की, पुण्याची बेचिराख अशी हालत केल्यानंतर, पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवल्यानंतर एका महत्त्वाच्या जाग्यावर आदिलशाहच्या सैनिकांनी एक लोखंडी पहार रोवून त्यावर फाटक्या तुटक्या चपलांची माळ करून तोरण लटकवावे त्याप्रमाणे ती माळ लटकावली होती. त्यामागे हेतू हाच की, पाहणारांनी समजावे की, हे पुणे म्हणजे आता एक प्रकारचे स्मशान आहे. इथे राहायचा कुणी प्रयत्न करु नये. असे असले तरी काही कुटुंब मात्र हेही दिवस जातील, कुणीतरी वाली... रक्षणकर्ता येईल या आशेने तग धरून, जीव हाताशी धरून बसले होते. हळूहळू इतरही काही कुटुंबीय तिथे आली परंतु ती संख्या नगण्य होती

अनेक वर्षांनंतरची ती पहाट उगवली. आश्चर्य वाटत असतानाच भीतीची एक थंडगार लहर शरीरात पसरली. उगवत्या सूर्याच्या साक्षीने, त्याने पसरवलेल्या मनमोहक तांबूस छटांच्या साथीने घोडांच्या टापांचा आवाज पुणे जहागीरीत भीतीने दडी धरून बसलेल्या लोकांच्या कानावर पडू लागला. दुसऱ्याच क्षणी नक्कीच एखादे संकट, शत्रू पुन्हा चाल करून येत तर नसावा अशी भीतीदायक जाणीव शरीरातील प्राण जातात की काय अशी अवस्था निर्माण करण्यासाठी पुरेसा झाला. लोक एकत्र जमले. भीतीने शरीर थरथरत होते. घाम फुटत होता. घसा कोरडा पडला होता. आता आपले काही खरे नाही कदाचित आपला अंत समय जवळ आलाय. शत्रूच्या रुपाने यमदूत येतात की काय या शंकेने सर्वांनी एकमेकांचे हात हातात घेतले. तो स्पर्श हिंमत देत असावा. धीर देत असावा. तितक्यात समोरून येणारे स्वार अस्पष्टपणे दिसू लागले. वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्याआकृत्या स्पष्ट होण्यासाठी कितीसा वेळ लागणार? अचानक कुणीतरी ओरडले, "अरे, घेऊन घाबरून जाऊ नका. येणारा गनीम नाही...""कशावरून म्हणतोस?"

"बघा तर, भगवे झेंडे दिसत आहेत. याचा अर्थ येणारी फौज आपली आहे. आपलाच कुणी..."

"अरे, भगवा झेंडा लावून शत्रू येणार नाही कशावरुन? अरे, गनिमांकडे चाकरी करणाऱ्या आपल्या सरदाराने भगवा लावला नसेल कशावरून?...." तशी चर्चा रंगत असताना तो लवाजमा त्या जनतेजवळ आला. समोरचे घोडेस्वार खाली उतरले. कुर्निसात झाले. तसा एक सैनिक पुढे होऊन घाबरलेल्या लोकांना म्हणाला,

"घाबरू नका. शहाजीराजांची पत्नी माँ जिजाऊ साहेब आणि युवराज शिवाजी आले आहेत. सोबत दादोजी कोंडदेव हेही आहेत.... " तो सैनिक सांगत असताना दादोजी आणि जिजाऊंसोबत शिवराय त्यांना सामोरे गेले. ते पाहून त्या लोकांना अत्यंत आनंद झाला. लोकांनी वाकून नमस्कार केला. पाठोपाठ जयजयकार झाले. तो बेचिराख परिसर, उद्ध्वस्त झालेले संसार, मंदिरे, मठांची झालेली दुर्दशा पाहून जिजाऊंचा संताप अनावर झाला. त्यांचे डोळे भरून आले. पुण्याचे पूर्वीचे वैभव, सौंदर्य त्यांच्या डोळ्यासमोर आले. माणसांनी गजबजलेले पुणे, सुवासिनींच्या नाजूक पावलांनी रोमांचित होणारे पुणे, चिमुकल्यांच्या पावलांनी हर्षभरीत होणारे पुणे आज कुठे आहे? निसर्गरम्य पुण्यात हे कोणते झाडं आणि हिंस्र पशू हिंडत आहेत? पुण्याची ती अवस्था पाहून जिजाऊ मनोमन चिडल्या, संतापल्या, त्यांचा क्रोध अनावर आला. कुणीतरी आपली माणसे आली आहेत हे पाहून इतरही मंडळी जमू लागली. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद, विस्मय, उत्सुकता इत्यादी अनेकानेक भाव दाटलेले पाहून जिजाऊ पुढे झाल्या. त्या म्हणाल्या,

"घाबरू नका. पुणे-सुपे जहागीर ही भोसले घराण्याची जहागीर आहे. ती पुन्हा उभी करण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी शहाजीराजे भोसले यांनी त्यांच्या मुलाला.... शिवाजीला सारे अधिकार देऊन पाठवले आहे. पुण्याला पुन्हा त्याच डौलाने, त्याच आत्मविश्वासाने उभे करायचे आहे परंतु यासाठी शिवबाला तुमची गरज लागणार आहे. तुम्ही मदत केली तरच पुन्हा सारे वैभव प्राप्त होणार आहे...." जिजाऊंचे ते बोल ऐकून उपस्थितांच्या जीवात जीव आला. शरीरात जणू पंचप्राण फुंकल्या गेले. एक माणूस पुढे येत म्हणाला,

"आईसाहेब, काळजी करू नका. आपल्या येण्याने, आपल्या शब्दांनी आम्हाला नवी उभारी मिळाली आहे. आम्ही पडेल ते काम करायला, राजे शिवबांना मदत करायला तयार आहोत."

सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे जिजाऊ आणि शिवबा यांनी राहायचे कुठे? त्यांच्यासाठी सुरक्षित अशी जागा कुठेही दिसत नव्हती. त्यांचे पूर्वीचे वाडे पार जमीनदोस्त झाले होते. कोणतेही अवशेष शिल्लक राहिले नव्हते. त्याच ठिकाणी झांबरे पाटील नावाचे गृहस्थ राहात होते. त्यांनी उद्ध्वस्त झालेल्या स्वतःच्या वाड्याला पुन्हा नव्याने उभे केले होते. जिजाऊ आणि शिवराय यांनी त्यांच्या वाड्यात राहावे असा प्रस्ताव झांबरे यांनी मांडला. दुसरा पर्याय नसल्याने सर्वांनी तो प्रस्ताव आनंदाने स्वीकारला. जिजाऊ आणि शिवराय त्या वाड्यात राहायला गेले. शिवरायांच्यावतीने, त्यांना साथीला घेऊन दादोजी कोंडदेव यांनी पुणे-सुपे जहागीरीचा कारभार सुरू केला. दूर्दम्य इच्छाशक्ती असली तरीही परिस्थिती भयंकर होती. वाट बिकट होती. शून्यातून विश्व निर्माण करावयाचे होते. रसातळाला, लयाला गेलेल्या स्वर्गाची पुन्हा निर्मिती करावयाची होती. दादोजींनी आधी सारा परिसर स्वच्छ करायची मोहीम हाती घेतली. झाडी-झुडुपे कापायला सुरूवात झाली. अधूनमधून चोरी करण्यासाठी येणाऱ्या चोरांना बेड्या ठोकण्यात आल्या. धुमाकूळ घालणाऱ्या लांडग्यासारख्या प्राण्यांचा बंदोबस्त लोकांच्या मदतीने करण्यात आला. लोकांमध्ये जाऊन, त्यांच्यासोबत चर्चा करून जहागीर पुन्हा उभारण्यासाठी काय करता येईल हे जाणून घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे जनतेमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला. ही भोसले मंडळी खरोखरच आपल्या मदतीला, आपल्यासोबतच पुण्याला पुन्हा उभे करण्यासाठीच आली आहे हे लोकांना पटू लागले. लोकही भरभरून प्रतिसाद देत असताना हिरीरिने जहागीर उभारणीच्या कामात मदत करू लागली. पाहता पाहता परिसर, गावे स्वच्छ होऊ लागली. या सोबत दादोजींनी जिजाऊ आणि शिवराय यांच्यासाठी एक मोठा महाल ...वाडा बांधायला सुरुवात केली. जणू शिवरायांच्या स्वराज्याची पहिली राजधानी..... लालमहाल! स्वतः शिवराय दादोजींसोबत राहून जनतेमध्ये मिसळत होते, त्यांच्याशी बोलताना त्यांना काय हवे, काय नको ते जाणून घेत होते. स्वतः शिवराय आपल्यासोबत येताहेत हे पाहून जनता आनंदित होत होती. जनतेमध्ये वेगळेच चैतन्य, स्फूर्ती, इच्छाशक्ती, आत्मविश्वास निर्माण होत होता. सोबतच शिवरायांनी सोबत आलेल्या शिक्षकांकडून विविध प्रकारचे शिक्षण घेणे सुरु ठेवले.

आदिलशाहीनेही खुश होऊन शिवरायांना पुणे-सुपे या जहागीरीच्या सोबतच 'कोंढाणा' हा सुभा देखभालीसाठी देताना शिवरायांची नेमणूक कोंढाण्याचे 'सुभेदार' म्हणून केली. हा एक प्रकारचा शुभशकून होता. दादोजींच्या सुचनेनुसार आणि माता जिजाऊंच्या इच्छेनुसार शिवरायांनी ती सुभेदारी स्वीकारली. जहागीरीचा कारभार दादोजी चोखपणे पाहत होते. त्यांचा स्वभाव करारी आणि न्यायी होता. कुणावर अन्याय होऊ नये यासाठी ते आग्रही असायचे. कोणत्याही भांडणात ते विचारपूर्वक, सर्वांचे म्हणणे ऐकून निर्णय घेत असत. एखादेवेळी त्यांनी दिलेला न्याय कुणाला पटला नसेल तर ते स्वतः ते प्रकरण जिजाऊ आणि शिवराय यांच्याकडे नेत असत. तिथे दादोजी, जिजाऊ, शिवराय यांच्यामध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाई.

अशाप्रकारे पुणे-सुपे या प्रदेशाची घडी हळूहळू परंतु निश्चितपणे पूर्वपदावर येत होती. शिवरायांचा आत्मविश्वास, निर्णयशक्ती वाढत होती. ज्याप्रमाणे गुन्हेगारांना शासन मिळत होते, शिक्षा मिळत होती त्याचप्रमाणे चांगली कामगिरी बजावणाऱ्या माणसांचा यथायोग्य सत्कार करून त्यांना चांगले बक्षीसही देण्यात येऊ लागले त्यामुळे शिवराय असोत, दादोजी असोत किंवा जिजाऊ असोत ही मंडळी आपल्यासाठी काम करतेय, जनतेच्या भल्यासाठी झटतेय हा विश्वास रयतेमध्ये निर्माण होण्यासाठी वेळ लागला नाही.…

नागेश सू. शेवाळकर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED