स्वराज्यसूर्य शिवराय
【भाग दहावा】
खान धावला प्राणाला मुकला
शिवरायांची यशस्वी घोडदौड चालू असताना त्यांच्या जीवनात दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. एक अत्यंत वाईट तर एक आनंदी अशी. शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे हे लहानपणापासूनच शहाजीराजे यांच्यासोबत कर्नाटकात राहात असत. तेही अत्यंत शूर, धाडसी, पराक्रमी होते. त्यावेळी अफजलखान कर्नाटकातील कनकगिरीच्या गडावर हल्ला करण्यासाठी कर्नाटकात पोहोचला होता. त्याला मदत करावी असा आदेश आदिलशाहीने संभाजीराजेंना दिला होता. त्या हुकुमानुसार संभाजीराजेंनी अफजलखानासोबत कनकगिरीच्या किल्ल्याला वेढा घातला होता. गडावरूनही जोरदार प्रतिकार सुरू झाला. संभाजीराजे यांनी शेवटचा घाव घालताना गडावर हल्ला चढवला. त्यावेळी त्यांनी असा विचार केला की, आपल्या सोबतीला अफजलखान आहे. त्याची भलीमोठी फौज आपल्या मदतीला येईल आणि मग गड सहज जिंकता येईल. परंतु राजांचा अंदाज चुकला. खानाने विश्वासघात केला.अफजलखानाने राजांच्या मदतीला फौज पाठवलीच नाही.परिणामी संभाजीराजे यांचा पराभव तर झालाच परंतु दुर्दैवाने संभाजीराजे त्या युद्धात मारले गेले. त्या घटनेमुळे शहाजीराजे, जिजाऊ, शिवराय प्रचंड दुःखी झाले. भोसले कुटुंबावर फार मोठा आघात झाला. संभाजीराजांच्या पत्नी जयंतीबाईंचे दुःख बघवत नव्हते. त्यांना उमाजी नामक एक मुलगा होता. त्या दुःखद घटनेच्या पाठोपाठ एक आनंदी वार्ताही आली. शिवरायांच्या थोरल्या पत्नी सईबाईंना पुत्ररत्न झाले. सर्वत्र आनंदी वातावरण पसरले. शिवराय-सईबाईंच्या मुलाचे,स्वराज्याच्या राजपुत्राचे नाव मोठ्या थाटामाटात 'संभाजी' असे ठेवण्यात आले.…
दुसरीकडे शिवरायांनी मोठ्या चातुर्याने, कौशल्याने शहाजी राजे यांची सुटका तर केलीच परंतु सोबतच रायगड आणि प्रतापगड हे दोन भक्कम, मजबूत किल्लेही स्वराज्यात आणले. पाठोपाठ अनेक किल्ले जिंकून स्वराज्याचा डंका चौफेर वाजवायला सुरुवात केली. शिवरायांच्या अशा सर्वदूर पराक्रमामुळे आदिलशाही घाबरली. 'शिवाच्या बापाला पकडून कैदी बनविले पण हा शिवा घाबरला नाही. उलट आमच्यावरच डाव उलटवून शहाजीची सहीसलामत सुटका करून घेतली. नाही. शांत बसता येणार नाही. काहीही करून शिवाचा बंदोबस्त करायला हवा. काय करावे?' असा मनोमन विचार करणाऱ्या आदिलशाहाने पुन्हा जुनाच डाव खेळला. त्याने शहाजी राजेंना पत्र लिहून कळवले,"शहाजी भोसले, तुमचा मुलगा शिवाजी हा सातत्याने आदिलशाहीविरोधात गुंडगिरी, बंड करतो आहे. तुम्ही त्याला समज द्या. नसता आम्ही त्याचा बिमोड करायला समर्थ आहोत."
पत्र वाचून शहाजींना कमालीचा आनंद झाला तो यासाठी की, पत्रातली भाषा जरी धमकीवजा होती तरीही त्यावरुन आदिलशाही घाबरली असल्याचे स्पष्ट जाणवत होते. आदिलशाहीसारखी क्रुर, जुलमी, बळकट सत्ता आपल्या मुलाला घाबरली हे बघून शहाजींना आपल्या मुलाचे कौतुक वाटले. शहाजीराजे हे कच्च्या गुरूचे चेले नव्हते त्यांनीही तशाच भाषेत उत्तर दिले,
"शिवाजी हा आमचा पुत्र आहे परंतु तो आमचे काहीही ऐकत नाही. त्यामुळे आम्हाला अत्यंत दुःख होते आहे. शिवाजी आदिलशाहीला त्रास देतो आहे हे ऐकून आम्हाला अजून जास्त दुःख होते आहे. तुमच्या आज्ञेनुसार आम्ही त्याला अवश्य सांगून पाहू पण तो ऐकणार नाही. तेंव्हा आपणच त्याचा बिमोड करावा."
ते पत्र वाचून आदिलशाहा आणि त्याच्या सावत्र आईचा संताप अनावर झाला. शहाजींच्या पत्रातील गोम त्यांच्या लक्षात आली. शहाजी धूर्तपणे आपल्याशी डाव खेळत आहेत हे त्यांनी ओळखले परंतु उघडपणे त्यांना शहाजीराजेंविरूद्ध बोलता येत नव्हते शेवटी आदिलशाहा आणि बेगमेने दरबार बोलावला. आदिलशाहीचे झाडून सारे सरदार, जहागीरदार, मनसबदार, इतर सारे लोक जमल्याचे पाहून सेवकाने दरबाराच्या मधोमध असलेल्या चौथऱ्यावर एक तबक आणून ठेवले. दुसऱ्या नोकराने एक विडा त्या तबकात आणून ठेवला. दरबारात जमलेल्या सर्वांनी ओळखले. एखाद्या मोहिमेची तयारी दिसते आहे. आधीच शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा ऐकून गर्भगळीत झालेल्या सरदारांच्या चेहऱ्यावरील चिंता अजून घट्ट, ठळक दिसू लागली. तितक्यात पडद्याआड बसलेल्या बेगमेचा धीरगंभीर आवाज सर्वांना ऐकू आला. बेगम त्वेषाने म्हणाली,
"अरेरे! काय ही अवस्था? काय ही मरगळ? कोण कुठला तो शिवाजी नावाचा बच्चा आणि तो आदिलशाही गिळायला निघाला आहे. आदिलशाहीचे किल्ले, प्रदेश तो बळकावतो आहे. मुठ्ठीभर सैन्य असतानाही तो आमच्या ताकदवर सरदारांना आणि सैन्याला सळो की पळो करून सोडतो आहे. बोला. कोण तयार आहे त्या शिवाला पकडून या दरबारात हजर करायला? बोला. शिवाला नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलण्याची ताकद कुणाच्या मनगटात आहे? आहे कुणी मर्द?"
बेगमेने दिलेले आव्हान ऐकून सारा दरबारात शांतता पसरली. जो तो एकतर मान खाली घालू लागला किंवा शेजारी बसलेल्या सरदाराकडे पाहू लागला यावरून शिवरायांची भीती किती मोठ्या प्रमाणात पसरली होती याची कल्पना यावी. दरबारात हलक्या आवाजात कुजबूज सुरू झाली. एक जण दुसऱ्याच्या कानात म्हणाला,
"खरे सांगू काय, शिवाला पकडणे हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. पण शिवाजवळ म्हणे जादूटोणा आहे. त्याला पकडण्यासाठी गेले की, तो म्हणे हवेत उडून वर जातो. मग आपली मात्रा चालत .""मी तर असे ऐकले की, तो म्हणे एकाचवेळी अनेक ठिकाणी असतो....दिसतोही. खुद्द औरंगजेबाने ही गोष्ट खरी की खोटी ते आजमावून पाहिले आहे..."
"ते कसे?"
"औरंगजेबाच्या कानावर शिवाजीबद्दलची ही बाब गेली. त्याने ते तपासण्यासाठी म्हणे तीन हेरांना तीन किल्ल्यावर पाठवले. आश्चर्य म्हणजे त्या तिन्ही हेरांना शिवा एकाच दिवशी, एकाच वेळी वेगवेगळ्या किल्ल्यावर दिसला. जादू म्हणावी का भूत ?"
"तेच ना, तसे पाहिले तर शिवाची ताकद म्हणजे आपल्यापुढे काहीच नाही हो पण त्याला म्हणे भवानी देवी प्रसन्न आहे त्यामुळे तो विजयी होतो आहे....." अशी हलक्या आवाजात कुजबूज चालू असताना पुन्हा बेगम गरजली,
"दरबारात खरेच कुणी मर्द नाही का? आदिलशाहीने सारे नामर्द पोसले आहेत का?"बेगमेचे ते बोल सर्वांच्या ह्रदयी शिरले, लागले. पण बोलणार कोण? कारण विडा साधासुधा नव्हता तर शिवरायांना पकडून आदिलशाही दरबारात आणावयाचे होते. कोण पत्करणार ही जोखीम? कोण स्वतःचा जीव धोक्यात घालणार? तितक्यात एक प्रचंड ताकदीचा, देहाने धिप्पाड असलेला, मजबूत शरीरयष्टी असलेला एक यवन सरदार पुढे आला.
"बघा. अफजलखान.... अफजलखान विडा उचलतोय..."
"आता त्या शिवाजीची खैर नाही. काही दिवसातच तो साखळदंडांनी आवळलेला शिवाजी दरबारात असेल..." अशी कुजबूज चालू असताना अफजलखान तबकाजवळ आला. त्याने तख्ताच्या दिशेने कुर्निसात केला. विडा उचलून गर्जना केली,
"शिवा? कौन शिवा? मै जाता हूँ, उसे बंदी बनाकर हुजूरके सामने पेश करूंगा.."अफजलखानाची ती प्रतिज्ञा ऐकून दरबार आनंदाने फुलून गेला. इतर सरदादारांना खानाने स्वीकारलेली ती मोहीम अतिशय अवघड, संकटाची वाटत होती परंतु आडदांड, खुनशी अफजलखानाला ती कामगिरी अत्यंत सोपी वाटत होती. त्याला स्वतःच्या शक्तीवर, कामावर विश्वास होता. एक प्रकारची घमेंड होती. खानाने विडा उचलला आणि एकूण सारी आदिलशाही खुश झाली.
लगेच अफजलखानाने मोहिमेची तयारी सुरू केली. विजापूरमध्ये तंबू, घोडे, हत्ती, उंट, वैरण दारुगोळा यासह फार मोठ्या प्रमाणात सैन्य दाखल होऊ लागले. एकंदरीत काय तर विजापूरकर आणि तमाम आदिलशाहीला स्वप्ने पडू लागली की, काही दिवसातच आदिलशाहीचा एक मोठा शत्रू, आदिलशाहीच्या नाकात दम आणणारा तो शिवाजी अफजलखानाच्या पराक्रमापुढे चिरडला जाणार.
अफजलखानाने केलेली प्रतिज्ञा, त्याने सुरु केलेली प्रचंड तयारी सारे काही शिवरायांना कळत होते. त्या बातम्यांनी शिवराय घाबरले नाहीत, बिथरले नाहीत. खानाचा मुकाबला कसा करावा ह्याचा विचार, नियोजन ते करीत होते. दुसरीकडे अफजलखान मोठ्या तयारीने विजापूरहून निघाला. त्याच्या साथीला मोठमोठे पराक्रमी, शूर सरदार होते. त्यामध्ये अंबर, याकूत, मुसेखान, हसनखान, रणदुल्लाखान, अंकुश खान, सिद्दी हिलाल, अब्दुल सयद, सय्यद बंडा, अफजलखानाचा मुलगा फाजलखान, पुतण्या रहीमखान या मुसलमान सरदारांच्या सोबत घोरपडे, पांढरे नाईक, खराटे, यादव, झुंजारराव घाटगे, काटे, जिवाजी देवकाते, जावळीचे प्रताप मोरे, पिलाजी आणि शंकर मोहिते हे मराठी सरदारही निघाले. विशेष म्हणजे शहाजीराजांचे चुलत बंधू मंबाजी हेही निघाले. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा निष्णात वकीलही सोबत होताच. अफजलखानाची स्वारी जसजशी पुढे जाणार होती तसतसे अनेक सरदार स्वतःच्या फौजेसह खानाला मिळणार होते. जे सरदार शिवरायांना मिळालेले होते त्यांनाही आदिलशाहीने फर्मान पाठवून अफजलखानाला मदत करण्याची सक्त ताकीद दिली होती. अफजलखान मोठ्या ऐटीत, गुर्मीत स्वराज्यावर आक्रमण करायला निघाला. रस्त्यातील गावे लुटत, मंदिरांची नासधूस करीत तो निघाला. यामागे त्याचा हेतू असा होता की, जनतमध्ये एक दहशत पसरावी, भीतीचे वातावरण निर्माण व्हावे त्यामुळे आपणास कुणी विरोध करणार नाही. कदाचित आपला हा पराक्रम ऐकून खुद्द शिवाजी घाबरून जाईल आणि मग तो आपल्याला शरण येईल. म्हणून त्याने स्वराज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. शिवरायांच्या कानावर सारे पडत होते. ते काळजीत पडले परंतु डगमगले नाहीत. रयतेला होणाऱ्या त्रासामुळे ते दुःखी जरूर होते. त्याचबरोबर ते मनातल्या मनात काहीतरी आराखडे बांधत होते. नियोजन करीत होते. तिकडे अफजलखान का स्वस्थ बसणार होता? त्याने रयतेला दुप्पट जोमाने छळायला सुरुवात केली. तुळजापूर, पंढरपूर यासोबतच इतर देवस्थानांना उपद्रव द्यायला सुरुवात केली. मंदिरे उद्ध्वस्त,विद्रूप, खंडित करायला सुरूवात केली. सोबतच पशूप्राणी यांच्या कत्तली करायला सुरुवात केली. अशी स्वराज्याची राखरांगोळी करत खान वाई प्रांतात पोहोचला असल्याची बातमी शिवरायांना समजली. महाराज काहीसे चिंतेत पडले असताना त्यांच्या जीवनात अजून एक वाईट घटना घडली. त्यांच्या थोरल्या पत्नी सईबाईंचे निधन झाले. महाराजांना फार मोठा धक्का बसला, खूप दुःख झाले परंतु ती वेळ दुःख करीत अश्रू गाळण्याची नव्हती. स्वराज्यावर संकटाचे काळेकुट्ट ढग जमा होत होते. शिवरायांनी एक निर्णय घेतला. राजगड सोडून प्रतापगडावर जाण्याचा. त्याप्रमाणे त्यांनी तयारी सुरू केली. प्रतापगडावर निघताना शिवराय माँसाहेबाचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले असताना माँसाहेब दुःखी अंतःकरणाने म्हणाल्या,
"शिवबा, माता जगदंबा तुला यश देणार आहे. एक लक्षात असू द्या याच खानाने तुझ्या वडिलांना साखळदंडांनी बांधून विजापूरच्या रस्त्यावरून फिरविले होते. शिवाय तुझ्या भावाला- संभाजीलाही कपटाने मारले होते. त्याचबरोबर हेही ध्यानात ठेव, हा खान अत्यंत कपटी, क्रुर, बेईमान आहे. त्याच्या कोणत्याही शब्दावर विश्वास ठेवू नको. समोरासमोर भेटीची वेळ आलीच तर संयमाने, शांत डोक्याने विचार करून निर्णय घे."
"माँसाहेब, चिंता करू नका. खान दगाबाज आहे ही जाणीव आम्हाला आहे. महाराजांचा अपमान आणि संभाजीराजांना दिलेला धोका आमच्या कायम स्मरणात आहे. त्याने काही दगाफटका करू नये यासाठीच आम्ही प्रतापगडावर जात आहोत. काहीही करून खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येईल असेच शर्थीचे प्रयत्न आम्ही करू. त्याला आस्मान दाखवूनच आम्ही परत येऊ. तरीही काही दगाफटका झाला, अकल्पित घडलेच तर धीर सोडू नका. खंबीर व्हा. बाल संभाजीराजेंना गादीवर बसवा. सारा कारभार आपण स्वतः पहा. येतो आम्ही..." असे म्हणून माँसाहेबाच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेऊन शिवराय निघाले. आणखी एका कामगिरीवर.…
शिवराय प्रतापगडावर पोहोचले ही बातमी अफजलखानाला समजली. तो संतापाने लाल झाला. अनेक वर्षे जाई या प्रांताचा खान सुभेदार होता. त्यामुळे प्रतापगडावर चालून जाणे किती अवघड आहे, तो परिसर किती भयानक आहे याची त्याला कल्पना होती. झाडेझुडपे, दरेखोरे आणि महत्त्वाचे म्हणजे हिंसक जनावरांनी वेढलेल्या अशा प्रतापगडावर जाऊन शिवाजीशी लढणे सोपे नाही हे जाणून खानाने आपले वकील कृष्णाजी भास्कर यांना शिवरायांकडे पाठवले आणि त्यांना हे बजावले की, काहीही करून शिवबा आपल्या भेटीसाठी वाईला आला पाहिजे . तो एकदा वाईला आला की, मग त्याला पकडून विजापूरला नेणे अवघड नाही. त्याप्रमाणे वकील भास्कर प्रतापगडावर पोहोचले. शिवरायांनी त्यांचे भव्य, जंगी स्वागत केले. भास्कर शिवरायांना म्हणाले,
"शिवराय, अफजलखान जरी राज्याची नासधूस करीत असले तरीही त्यांच्या मनात तुमच्याबद्दल, तुम्ही करीत असलेल्या कामगिरीबद्दल कौतुक आहे.पण बादशहाचे चाकर असल्याने बादशहाच्या समाधानासाठी ते असे दुश्मनासारखे वागत आहेत,केवळ कर्तव्य करीत आहेत. त्यांनी मित्रत्वाच्या नात्याने मला पाठवले आहे. खानसाहेबांची अशी इच्छा आहे की, त्यांनी पुढे केलेला मैत्रीचा हात हाती घ्यावा. वाई मुक्कामी यावे. खानसाहेबांची भेट घेऊन तुम्ही घेतलेले आदिलशाहीचे किल्ले, प्रदेश परत करावा. अफजलखान तुम्हाला आदिलशाहाकडे घेऊन जातील. बादशहा आणि बेगमसाहिबा खुश होऊन तुम्हाला सन्मानाने मोठ्या दर्जाची सरदारकी मिळवून देतील." शिवरायांनी वकिलाच्या शब्दातील वरवर वाटणारी साखरपेरणी आणि त्यामागे असलेला खानाचा कपटी डाव तात्काळ ओळखला. शिवरायही विनयाने म्हणाले,
"वकिलसाहेब, आदिलशाहीचे आम्ही अपराधी असताना अफजलखान आमच्याशी दोस्ती करू पाहतात. खरेतर हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. परंतु खानसाहेबांची अनेक कपटाची प्रकरणे आम्हाला चांगली ठाऊक आहेत...."
"नाही. नाही. शिवाजी, खान तुमच्याशी दगा करणार नाहीत. आम्ही शब्द देतो."
"ते ठीक आहे. पण कृष्णाजी, खानसाहेबांनी एवढे मोठे मन केलेच आहे तर त्यांनी अजून मन मोठे करावे. आम्ही वाईला येण्यापेक्षा त्यांनी प्रतापगडावर यावे. त्यांना गडावर येणे प्रशस्त वाटत नसेल तर त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी यावे. तिथे त्यांच्या स्वागतासाठी आम्ही शामियाना उभारू. त्यांचा यथोचित आदरसत्कार करण्याची संधी आम्हाला द्यावी. "
शिवरायांनी खानाच्या वकिलाला गळ घातली आणि त्यांच्यासोबत खानाला रीतसर आमंत्रण देण्यासाठी म्हणून आपले वकील पंताजी गोपीनाथ यांना पाठवले. वाईला पोहोचताच भास्कर यांनी अगोदर खानाची भेट घेतली. ते म्हणाले,
"खानसाहेब, शिवाजीला भेटलो असताना एक गोष्ट जाणवली ती अशी की, शिवाजी प्रतापगडावर आपल्याला कटशह देण्यासाठी नव्हेतर आपल्याला भिऊन लपून बसलाय. आपल्यासारख्या मुरब्बी आणि प्रचंड फौजफाटा असलेल्या सरदारापुढे आपला टिकाव लागणार नाही हे त्याने ओळखले आहे. प्रत्यक्ष भेटीत शिवबा आपल्या मतानुसार सारे काही करण्यासाठी तयार आहे म्हणून त्याची इच्छा आहे की, आपणच त्याला भेटण्यासाठी गडाच्या पायथ्याशी यावे." त्यानंतर शिवरायांचे वकील पंताजी हेही खानाला भेटले. त्यांनीही तोच राग आळवून विनंती केली,
"शिवरायांना आपल्या सर्व अटी मान्य आहेत. तेंव्हा त्यांची विनंती मान्य करून आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांना भेटायला यावे." असे सांगून पंतांनी सोबत आणलेल्या भेट वस्तू खानाला तर दिल्याच परंतु छावणीत असलेल्या प्रत्येक सरदाराला आणि महत्त्वाच्या व्यक्तीला स्वतः फिरून नजराणे बहाल केले. यामागेही शिवरायांची दूरदृष्टी होती. पंत केवळ भेटवस्तूच वाटत बसले नाहीत तर खानासोबत किती सैन्य आहे, काय तयारी आहे याचे निरीक्षण त्यांनी चाणाक्षपणे केले. अफजलखानाने शिवरायांचा प्रस्ताव सहर्ष स्वीकारला. शिवाजी भिऊन प्रतापगडावर लपला या बातमीनेच त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
अफजलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी यायला तयार झाला ही बातमीच अर्धी लढाई जिंकल्याची प्रतीक होती. महाराजांनी लगेच खानाच्या स्वागताची तयारी सुरू केली. कोयनेच्या परिसरातील एक मोठे माळरान साफ, स्वच्छ करून घेतले. तिथे खानाच्या सेनेसाठी छावणी उभारण्यात आली.दोन्ही वकिलांनी मिळून भेटीचा सारा तपशील तयार केला. भेटीच्या दिवशी छावणीत थांबलेल्या सैनिकांसाठी मेजवानीचा मेनू ठरला. सोबतच महागड्या मद्याची व्यवस्था करण्याचे ठरले. वकिलांच्या भेटीत ठरल्याप्रमाणे खानाचे बहुतांश सैन्य छावणीतच थांबणार होते तर खानासोबत आलेले दहा हशमी हेही शामियान्यापासून ठरलेल्या अंतरावर उभे राहणार होते…
उजाडला! अफजलखान आणि शिवराय यांच्या भेटीचा दिवस उजाडला. अफजलखानाच्या स्वागतासाठी शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ हे सामोरे गेले. खानाचे यथोचित स्वागत करून पंताजी म्हणाले,"खानसाहेब, हे काय? प्रत्यक्ष भेट होईल त्यावेळी हजारो सैनिक असावेत असे ठरले नव्हते. आपल्यासोबत ही प्रचंड फौज पाहून शिवराय घाबरतील आणि भेटायला येणारच नाहीत." ते ऐकून खुश झालेल्या खानाने सोबत असलेले सैनिक छावणीकडे परत पाठवले. प्रतापगडावर शिवरायांनीही जोरदार तयारी केली. भेटीच्या वेळी खानाने काही बेईमानी केलीच तर संरक्षण व्हावे म्हणून कमरेपर्यंत सुरवार, चिलखत, जरीचा जाड कुर्ता,वरती अंगरखा घालून शिरावर जिरेटोप घातला. वेळ पडलीच तर स्वतःचा बचाव करण्यासाठी एका हाताच्या अस्तनीत बिचवा, दुसऱ्या हाताच्या बोटांमध्ये वाघनखे तर कमरेत कट्यार लपवून ठेवली. आपल्या विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करून अचानक उद्भवलेल्या घटनेनंतर काय काय काळजी घ्यावी त्या सुचना केल्या. प्रतापगडावर असलेल्या भवानीमातेचे दर्शन घेऊन शिवराय खानाच्या भेटीला निघाले. एका आत्मविश्वासाने, एका धैर्याने, एका निश्चयाने ते घोड्यावर स्वार झाले.शामियान्यात खान पोहोचला होता. त्याची पावलापावलाची माहिती शिवरायांना मिळत होती. एका हेराने शिवरायांना सांगितले की, खान शामियान्यात बसला असून त्याच्या कमरेला तलवार आहे. शामियान्याच्या दाराशी सय्यद बंडा उभा आहे. ते ऐकून शिवराय थांबले आणि त्यांनी खानाच्या जवळ असलेले आपले वकील पंताजी यांना एक निरोप पाठवला. तो निरोप खानाला देताना पंताजी म्हणाले,"खानसाहेब, महाराज यायला निघाले आहेत परंतु आपल्या जवळ असलेल्या तलवारीची आणि या सयद बंडाची शिवरायांना भीती वाटते आहे. तेंव्हा ही तलवार आणि सयद बंडाला थोडे बाजूला केले तर बरे होईल..." ते ऐकून खान जोरजोरात हसत सुटला. आनंदाने बेहोश झालेल्या खानाने कमरेची तलवार काढून त्याच्या वकिलाकडे दिली आणि सयद बंडाला शामियान्याच्या बाहेर जाण्यास सांगितले. हे झालेले बदल शिवरायांना लगोलग कळाले. शिवराय प्रतापगड उतरून शामियान्याच्या जवळ आले.घोड्यावरून उतरून दमदार पावले टाकत तेआत्मविश्वासाने शामियान्यात दाखल झाले. त्यांना पाहताच खान म्हणाला,
"या. शिवाजी या. आम्ही तुला राजे म्हणत नाहीत आणि म्हणणार नाहीत कारण दुसऱ्याचा प्रदेश ताब्यात घेणारास राजे नाहीतर लुटारू, चोर समजतात..." त्यावर शांत बसतील ते शिवराय कसले? शिवरायांनी खानाला सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले,
"मग आपण काय किंवा तो आदिलशाहा काय करता? ज्या सत्तेचा एवढा अहंकार आहे तो प्रदेश का त्यांना आंदन मिळाला आहे? हा सारा प्रदेश तर आम्हा मराठ्यांचा आहे तो तुम्हीच लुटला आहे ना?" शिवरायांचे ते रोखठोक उत्तर ऐकून अफजलखान मनोमन चरकला. शिवाजीशी अशा शब्दात बोलून चालणार नाही. कधी हा उखडेल आणि निघून जाईल सांगता येणार नाही. याच्या सोबत गोड बोलूनच याचा काटा काढणे हेच चांगले. म्हणून त्याने आवरते घेतले. तो जाग्यावरून उठला. शिवरायांच्या दिशेने निघाला. शिवरायही दमदार, सावध पावले टाकत खानाच्या दिशेने निघाले. चेहऱ्यावरील आत्मविश्वास ढळू न देता, करारी मुद्रेने खानाच्या डोळ्याला डोळा भिडवत..…
अफजलखानाच्या धिप्पाड शरीरयष्टीपुढे शिवराय तसे एकदम छोटे दिसत होते. दोघे समोर आले. खानाने शिवरायांना कवेत घेण्यासाठी हात पसरले. शिवरायांच्या प्रतिसादाची वाट न बघता खानाने शिवरायांना जवळ ओढले. शिवराय अलगद त्याच्या मिठीत शिरले. खानाने तात्काळ डाव साधला. त्याने दगा केला. धोका दिला. खानाच्या छातीजवळ आलेली शिवरायांची मान कपटाने स्वतःच्या डाव्या बगलेत जोराने दाबून धरली आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच कमरेत लपविलेली कट्यार उपसली आणि जोर लावून शिवरायांच्या छातीत खुपसण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तो प्रयत्न फसला. शिवरायांचा दूरदृष्टीपणा जिंकला. खानाची कपटी वृत्ती आधीच ओळखून शिवराय कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याच्या तयारीने आले होते. खानाच्या कट्यारीने घाव घातला परंतु तो घाव शिवरायांनी अंगरख्याखाली घातलेल्या चिलखताला घासून चर्रर्र असा आवाज करता झाला. आपला वार फुसका ठरला हे ओळखून खान घाबरला परंतु शिवरायांनी त्याला विचार करण्याची, पुढे काय करावे हे ठरविण्याची संधीच दिली नाही. शिवरायांनी उजव्या हातातील बिचवे जोर लावून खानाच्या पोटात घुसवले. त्या बिचव्यांनी सरळसरळ खानाच्या आतड्यांचा वेध घेतला. काय झाले ते कळायच्या आत खानाचे आतडे बाहेर आले. होणाऱ्या वेदना एवढ्या भयानक होत्या की खानासारखा मजबूत, धिप्पाड माणूस कळवळला. नुसता कळवळलाच नाहीतर जीवाच्या आकांताने ओरडला,
"दगा… दगा… धोका दिया है, शिवाने. मार डाला मुझे... पकडो...पकडो..." खानाची ती किंकाळी ऐकून सयद बंडाने तलवार उपसली. त्याने शिवरायांवर वार करण्यासाठी हात उंचावला. शिवरायांच्या शरीराचा वेध घेण्यापूर्वीच त्याचा उंचावलेला हात धडावेगळा झाला. ही किमया होती शिवरायांचा स्वामीभक्त असलेल्या जीवा महालाच्या तलवारीची. सयद बंडा शिवरायांवर वार करतोय हे पाहून जीवा महालाने कमालीच्या चपळाईने आणि तेवढ्याच ताकदीने शिवरायांच्या दिशेने येणाऱ्या बंडाच्या हातावर वार केला. सयद बंडा ठार झाल्याचे पाहून तिथे उभ्या असलेल्या कृष्णाजी भास्कर या वकिलाचे, एका मराठी माणसाचे इमान जागे झाले पण ते एका मराठी माणसासाठी, स्वराज्य स्थापन करण्यासाठी झटणाऱ्या एका मराठा राजासाठी नाहीतर सारे जीवन ज्या दगाबाजांसाठी अर्पण केले होते त्या आदिलशाहीच्या एका कपटी सरदारासाठी...दगाबाज अफजलखानासाठी! त्याने शिवरायांवर वार केला परंतु राजेंनी तो वार वरचेवर परतवला आणि त्या वकिलाला ठार केले. तिकडे वेदनेने तडफडणारा अफजलखान दोन्ही हातात पोटाबाहेर पडणारा कोथळा सावरत शामियान्याच्या बाहेर पडला. त्याची अवस्था पाहून गोंधळलेल्या सेवकांनी त्याला उचलून कसेबसे पालखीत कोंबले. ते पळत सुटले. परंतु संभाजी कावजी या मराठा शूरवीराच्या रुपाने जणू काळ खानाला कवेत घ्यायला सिद्ध होता. खान पळतोय हे पाहून संभाजी संतापला. तो त्वेषाने, चपळाईने पालखीकडे धावला. अत्यंत कठोरपणे आणि तितक्याच ताकदीने त्याने हातातल्या तलवारीने पालखी पळवणाऱ्या भोयांच्या पायावर वार करून त्यांचे पायच छाटले. पालखी खाली कोसळली. भयभीत झालेल्या, घाबरलेल्या अफजलखानाला तो त्वेषाने म्हणाला,
"काय झाले खानसाहेब? का घाबरलास? शिवरायांनी कशाची शिक्षा दिली ते समजले काय? अरे दुष्टा, तू तुळजापूरच्या भवानीमातेचा छळ केला म्हणून आमच्या महाराजांनी तुझी आतडी बाहेर काढली. तू आमच्या गाईंना, गोमातेला कापलेस त्याची शिक्षा भोगायला तयार हो..." असे म्हणत संभाजी कावजी या बहाद्दराने तलवारीच्या एकाच वारात खानाचे मुंडके कापले.ते मुंडके उंच धरून संभाजीने मोठ्या अभिमानाने गर्जना केली......'हर हर महादेव!.... हर हर महादेव !'
खान पडला. जीवानिशी गेला. ठरल्याप्रमाणे मावळ्यांनी तुतारी फुंकून गडावर इशारा दिला. पाठोपाठ गडावरून विजयाच्या तोफा धडाडल्या. प्रतापगडाच्या परिसरात नियोजनप्रमाणे लपून बसलेले मावळे इशारा मिळताच छावणीत लोळत असलेल्या खानाच्या सैन्यावर तुटून पडले. काय झाले, कसे झाले हे काहीही न समजता खानाची जवळजवळ अख्खी फौज कापल्या गेली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर थोडे लोक पळून जाण्यात यशस्वी झाले..…
अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूवर फार मोठा विजय मिळविलेले शिवराय प्रतापगडावर आले. सुवासिनींनी त्यांना ओवाळले. गडावरील जगदंबेचे दर्शन घेऊन शिवराय राजगडावर पोहोचले. जिजाऊंचा चरणस्पर्श करणाऱ्या शिवरायांना उठवून माँसाहेबानी आपल्या पराक्रमी, शूरवीर पुत्राला अभिमानाने कवटाळले. त्यांच्या त्या कृतीमध्ये अनेकानेक भावना ओसंडून वाहत होत्या. त्या भावना केवळ शिवरायांनाच कळल्या. तेवढा मोठा विजय मिळविल्यानंतर शिवरायांनी ताबडतोब अफजलखानाने कपटाने, क्रुरपणे ताब्यात घेतलेले वाई, सुपे, सासवड, शिरवळ हे भाग पुन्हा सन्मानाने स्वराज्यात समाविष्ट केले. सोबतच अफजलखानाची प्रचंड धनदौलत जप्त करण्यात आली. शिवराय लगोलग पुढील मोहिमेच्या तयारीला लागले. एखाद्या विजयश्रीने हुरळून जाऊन स्वस्थ बसणारे शिवराय नव्हते....…
नागेश सू. शेवाळकर