Swaraja Surya Shivray - 11 books and stories free download online pdf in Marathi

स्वराज्यसूर्य शिवराय - 11

स्वराज्यसूर्य शिवराय

【भाग अकरावा】

संकटाची मालिका

अफजलखानाच्या प्रचंड पराभवाचा आदिलशाहीने फार मोठा धसका घेतला होता. का घडले? कसे घडले? अफजलखानासारखा बलाढ्य सरदार केवळ पराभूतच होत नाही तर स्वतःच्या जीवाला मुकतो ह्या गोष्टीवर आदिलशाही दरबार विश्वास ठेवूच शकत नव्हता. पाठोपाठ शिवरायांनी वाई हा प्रांत, कोल्हापूरच्या आसपासचा फार मोठा प्रदेश ताब्यात घेतला असल्याचीही बातमी दरबारात पोहोचली. कोल्हापूर काबीज करून शिवाजी नक्कीच पन्हाळगडावर हमला करणार ही शक्यता लक्षात येताच आदिलशाही जबरदस्त हादरली. आदिलशाही बेगम आणि तिचा पुत्र अतिशय चिंतेत पडले होते. या शिवाजीचा बिमोड कसा करावा, त्याला कसे आवरावे ह्या काळजीत सारे होते. पण शिवराय एका मागोमाग एक धक्के देत होते. आदिलशाहीची शंका खरी ठरली. शिवरायांनी थेट पन्हाळगडाला धडक मारली. पन्हाळगडाला मराठ्यांनी वेढले ही बातमी पोहोचली आणि आदिलशाहीचे अवसान गळाले. तिकडे शिवाजीने गडाला वेढा घातल्याची खबर किल्लेदाराकडे त्याच्या खबऱ्यांनी पोहोचविली. किल्लेदार हैराण झाला. त्याला घडलेल्या घडामोडींची सुतराम कल्पना नव्हती. तो या आनंदात होता की, अफजलखान चालून गेलाय म्हटल्यावर त्याच्यापुढे शिवाजीचा टिकाव लागणे शक्यच नाही. शिवाजीचे सारे लक्ष अफजलखानाकडे आहे. त्यामुळे आपल्या ताब्यातील पन्हाळा अत्यंत सुरक्षित आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. परंतु अचानक स्वतः शिवरायांनी पन्हाळा वेढला हे समजताच त्याची बोबडीच वळली. शिवाजी इथे आला तर मग आपले खानसाहेब कुठे आहेत हा प्रश्न स्वतःलाच विचारत असताना खानाची कत्तल झाली, खान मारला गेला ही बातमी किल्लेदाराला समजली आणि तो गर्भगळीत झाला. परंतु त्याने प्रतिकार सुरु केला. गडावरील तोफा धडाडू लागल्या, गरजू लागल्या परंतु शिवरायांचे पठ्ठे गड चढत होते. रात्रीचा दिवस करून स्वराज्याचे शिलेदार हळूहळू परंतु निश्चितपणे गडाच्या माथ्याकडे सरकत होते. त्यांना ना भीती होती रात्रीची, ना भीती होती अंधाराची, ना भीती होती भिंतीमध्ये लपून बसलेल्या, रस्त्याने आडवे येणाऱ्या श्वापदांची, विषारी जीवाणूंची! धडाडणाऱ्या तोफांची त्यांच्या लेखी शून्य किंमत होती. मावळे उत्साहाने गडाच्या मोक्याच्या ठिकाणी आले. मशाली घेऊन गस्त घालणाऱ्या गनिमांना टिपण्याचा त्यांनी सपाटा चालवला. एकेक गनिमी कोसळत होता. त्याच्या सोबत्याचा धीर खचत होता. तोफा सांभाळणारे शत्रू शिवरायांच्या साथीदारांनी अचूक ठोकले. तोफा बंद पडल्या. मावळ्यांना जणू रान मोकळे झाले. दुप्पट उत्साहात मावळे तुटून पडले. गडाचा दरवाजा उघडला गेला. जाँबाज सैनिक आत शिरले. काही क्षण शत्रूने सामना केला. पण त्याचा प्रयत्न हाणून पाडत, गनिमांना कापत मराठा सैनिक आत घुसले. त्या आक्रमणाने आदिलशाही सैन्याचा धीर खचला, अवसान गळाले. शत्रू मोठ्या प्रमाणात मारला जात असताना बरचसे सैन्य जीव मुठीत धरून शरण आले. शिवरायांच्या सैन्याचा फार मोठा विजय झाला. पन्हाळ्यासारखा मजबूत किल्ला स्वराज्यात आला. किल्ल्यावर ताबडतोब भगवे निशाण फडकले. विजयाच्या नौबती झडू लागल्या. गडाच्या पायथ्याशी असलेले शिवराय मशालींच्या उजेडात मोठ्या आनंदाने, उत्साहाने गडावर आले. त्यांना पाहताच मावळ्यांचा उत्साह दुणावला. 'हर हर महादेव' या गर्जनांनी पन्हाळ्याची तटबंदी थरथरू लागली. अफजलखानाच्या वधानंतर लागलीच पन्हाळा किल्ला शानदार रीतीने, दिमाखात स्वराज्यात सामील झाला. शिवराय आणि मावळ्यांना विश्रांती लाभत नव्हती आणि त्यांना त्याची गरजही भासत नव्हती. आदिलशाही चिंताग्रस्त असताना बापाच्या वधाने खवळलेला फाजलखान पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने मराठी स्वराज्यावर हल्ला करायला निघाला. त्याच्या सोबतीला होता रुस्तमेजमान हा सरदार. शिवरायांचे हेर सर्वत्र पसरलेले होते. फाजलखान येत असल्याची बातमी हेरांनी शिवरायांपर्यत पोहोचविली.दक्ष असणारे शिवराय अजून सावध झाले. त्यांनी प्रतिहल्ल्याची तयारी केली. ते सावधगिरीने खानाच्या दिशेने निघाले. फाजलखानांच्या माणसांनी ती बातमी खानाकडे पोहोचविली. स्वतः शिवाजी आणि नेताजी आपल्या दिशेने येत आहे हे समजताच विजापूरच्या सैन्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरले. आता आपले काही खरे नाही, अफजलखानाच्या सैन्याप्रमाणे आपणही कापले जाणार, मारले जाणार ही जाणीव त्यांना अस्वस्थ करीत असताना आपल्या फौजेत आत्मविश्वास भरण्यासाठी म्हणून रुस्तमेजमान आपल्या सैनिकांना म्हणाला,

"समोरून मावळ्यांची फौज येत आहे. आदिलशाहीच्या आजवर झालेल्या अपमानाचा बदला घ्यायची हीच वेळ आहे. आपली बहादूरी, पराक्रम दाखविण्याची ही योग्य संधी आहे....." हे सांगताना कुणी कोणत्या बाजूने राहायचे, कुणी कुणावर हल्ला करायचा हेही पक्के ठरवून दिले. तिकडे शिवरायांचे नियोजन का कमी होते. त्यांनीही आपल्या फौजेला शत्रूच्या गोटात असणारी त्यांची प्रमुख माणसे वाटून दिली, सावज टिपणे सोपे व्हावे यासाठी ही सारी तयारी.उभय बाजूंची तयारी सुरु असताना दोन्ही फौजा एकमेकांच्या नजरेच्या टप्प्यात आल्या. शत्रूसेना पाहताच स्वराज्याच्या सेनेमध्ये वेगळाच उत्साह संचारला. त्यांचे बाहू शत्रूवर वार करण्यासाठी फुरफुरु लागले. त्यांच्या तलवारींना शत्रूच्या रक्ताची तहान लागली. हातातले भाले शत्रूच्या छातीचा वेध घ्यायला उतावीळ झाले. 'हर हर महादेव ' या घोषणांना उधाण आले. परंतु त्या मराठमोळी गर्जना फाजलखानाच्या सैन्यात धडकी भरवू लागल्या. भगवे झेंडे डौलाने फडकताना आकाशाला कवेत घेण्यासाठी झेपावू लागले. आपल्या रोखाने येणाऱ्या मावळ्यांना रोखण्याचे आदेश रुस्तमेजमान याने सैन्याला दिले. ते सैन्य मावळ्यांच्या दिशेने निघालेले पाहून मराठा शिलेदारांनी घोड्यांना टाचा मारल्या. फुरफुरणारे घोडे वेगाने दौडत निघाले. मावळ्यांनी तलवारी उपसल्या, भाले रोखले. शिवराय स्वतः आघाडीवर असल्याचे पाहून त्यांच्या शिलेदारांचा जोश, जोम, उत्साह दुपटीने वाढला. समोरासमोर येताच मावळ्यांनी आपापले सावज हेरले. प्रत्येक जण तुटून पडला. अंगी हत्तीचे बळ, विजेची चपळाई पाहण्यासारखी होती. युद्ध पेटले. तलवारीला तलवारी भिडल्या. त्यांचा नाद आसमंतात घुमू लागला. परंतु खानाची फौज आधीच गर्भगळीत झाली होती. त्यातच मराठा सेनेची चपळाई, त्यांची आक्रमकता, वारांमधला जोर,जोश, जोम पाहून त्यांची उरलीसुरली हिंमत नाहीशी झाली. ते पाहून मावळे तुटून पडले. चारही बाजूने खानाची फौज घेरल्या गेली. हातातून तलवारी गळून पडल्या. मोठ्या हिंमतीने आलेल्या फाजलखानची हिंमत खचली. तो एवढा घाबरला की, तलवार टाकून पळत सुटला. त्याच्या सैन्याची तीच परिस्थिती होती. पळणारा दुश्मन आणि त्याला गाठून त्याला कापणारे, यमसदनी पाठवणारे मावळे असेच चित्र निर्माण झाले. रुस्तमेजमानने सुरूवातीला आपल्या सैन्यात आत्मविश्वास निर्माण करून जोश भरण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे कुणी ऐकत नव्हते. सर्वांनाच मैदान सोडण्याची घाई झालेली पाहून रुस्तमेजमानने ताडले, आपले कुणी ऐकणार नाही. आपण लढत राहिलो तर आपलाही खात्मा होणार. हा विचार येताच रुस्तमेजमान हाही पळत सुटला. मराठा वीरांनी त्याचा पाठलाग सुरु केला परंतु नंतर त्याला जाऊ दिले. यामागे हा विचार होता की, घडलेल्या प्रसंगाचे, फाजलखान, रुस्तमेजमान यांच्या पराभवाचे विजापूरच्या दरबारात वर्णन करणारा अर्थात मराठ्यांचे गुणगान करणारा कुणीतरी असावा. झाले ही तसेच बादशहा आणि बेगमसाहिबा यांना ती हकीकत समजताच दोघांनीही आपापले कपाळ गच्च धरले. क्रोधाची सीमा झाली. असे कसे होऊ शकते? शिवाजी अफजलखान आणि पाठोपाठ काही महिन्यातच फाजल आणि रुस्तमेजमान यांचा भयंकर पराभव कसा काय करू शकतो. नाही. नाही. हे शक्य नाही. नक्की. नक्कीच. शिवाजी साधासुधा नाही. लोक म्हणतात त्याप्रमाणे त्याच्याजवळ नक्कीच काहीतरी जादू म्हणा, दैवी शक्ती म्हणा किंवा त्याला देव प्रसन्न असलाच पाहिजे. नाहीतर काय बिशाद आहे, अफजलखानासारख्या महाकाय सरदाराची मुंडी छाटण्याची? पाठवावे तरी कुणाला त्याचा बिमोड करायला? जो जातो तो एकतर जान गमावून येतो. नाहीतर पळून येतो.शिवाजी! शिवाजी!शिवाजी! कोण हा?आपल्या एका सरदाराचा.... चाकरमान्याचा ...शहाजींचा पुत्र! त्याची एवढी ताकद? सारी आदिलशाही अशीच खिन्न झाली होती, उदास झाली होती. शिवाजी हे नाव ऐकून पिसाळली होती. मार्ग सापडत नव्हता. सापडला तरीही इच्छित स्थळी पोहोचता येत नव्हते. बादशहाचे आपल्या जवळच्या लोकांसोबत 'शिवाजी' या एकाच विषयावर मंथन चालले होते, चर्चेचे गु-हाळ चालू होते. सापडले. एक नाव चर्चा करणारांच्या पुढे आले. सिद्दी जौहर! मुहम्मदनूर किंवा कर्नूळ या किल्ल्याचा किल्लेदार. अंगाने धिप्पाड! रंगाने काळाकुट्ट आणि काळे कारनामे करण्यात पटाईत! जौहर शूर असला, मेहनती असला, कर्तबगार असला, धाडसी, असला, इमानी असला तरी एक दुर्गुण त्याच्याजवळ होता. त्याच दुर्गुणमुळे तो बादशहाच्या मर्जीतील नव्हता. कुटुंबातील सावत्राप्रमाणे बादशहाची त्याच्यासोबत वागणूक होती. असा कोणता दुर्गुण सिद्दी जवळ होता की, ज्यामुळे तो बादशहाचा नावडता होता. बादशहाच्या पुढे पुढे करणे हे त्याला जमत नव्हते. आपण भले आपले कम भले ही त्याची विचारसरणी होती. बादशहाचे मन जिंकण्याची कला त्याच्याजवळ नव्हती. पण प्रसंग बाका होता. अशा निकडीच्या समयी बादशहाला प्रामुख्याने आठवण झाली ती सिद्दी जौहरची! काही गोष्टी ह्या आपोआप घडून येतात. तिकडे सिद्दी जौहरला काय वाटले कोण जाणे,त्याने बादशहाला निरोप पाठवला. म्हणाला,

"मी आजवर जे वागलो त्याबद्दल मला पश्चात्ताप होतो आहे. मी बादशहाची भेट घेऊन समक्ष माफी मागू इच्छितो. खाविंदांनी मला भेटीची परवानगी द्यावी. आमच्या योग्यतेनुसार एखादी जबाबदारी सोपवावी."

बादशहाच्या मनात चाललेल्या विचारांना काहीसा आराम मिळाला. एक दिशा मिळाली. भरकटणारे विचार स्थिर झाले. त्याने जौहरला उलट टपाली निरोप पाठवला. तो म्हणाला,

"जौहर, तुम्ही आपणहून निरोप पाठवला.आम्हाला अत्यंत आनंद झाला.दरबारात सध्या शिवाजीचा बिमोड कसा करायचा हा विचार चालू आहे. दरबारातील अनेक सरदार ही जबाबदारी घ्यायला तयार आहेत. कुणीही ते काम चोख पार पाडेल यात आम्हाला तीळमात्र शंका नाही. तुम्ही स्वतःहून जबाबदारी मागितली आहे म्हणून शिवाजीचा कायम बंदोबस्त करावा. भेटायला या." बादशहाने चाल खेळलीच. जौहरच्या लक्षात खरी परिस्थिती येऊ दिली नाही. उलट ही जबाबदारी जौहरवर टाकतो म्हणजे त्याच्यावर उपकार करतो अशी बतावणी केली. शेवटी हुकूम तो हुकुमच. आदिलशाही फर्मानानुसार सिद्दी जौहर विजापूर दरबारी हजर झाला. सोबत फार मोठी फौज घेऊन आला. सिद्दी जौहर आदिलशाही दरबारात पोहोचला. शिवाजीचा नायनाट, बंदोबस्त करण्यासाठी निघालेला सरदार म्हणून दरबारातील सर्वांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. बादशहानेही हातचे आणि तोंडचे काहीही न राखता सिद्दीचा गौरव केला. त्याची फार स्तुती केली. सोबत सिद्दी जौहरला बादशहाने 'सलाबतखान' ही मानाची पदवी दिली. शिवरायांवर चालून जाण्यासाठी मोठमोठे सरदार त्याच्या हाताखाली दिली. ज्यात प्रामुख्याने रुस्तमेजमान, सिद्दी मसूद, बडेखान, बाजी घोरपडे, मुधोळकर यांच्यासह अफजलखानाचा मुलगा फाजलखानासही जौहरसोबत जाण्याचे फर्मान काढले. विजापूरनगरी पुन्हा एकदा सैनिक, सैन्यासह जाणारे प्राणी यांनी दुमदूमली. सिद्दी एक काळजी सुरुवातीपासूनच घेत होता ती म्हणजे अफजलखानाची काय चूक झाली असावी याचा अभ्यास करून ती चूक टाळण्याचे सर्वांना बजावत होता.

शेवटी तीस हजारापेक्षा अधिक सैन्य, हत्ती, घोडे, उंट, प्रचंड शस्त्रास्त्रे, दौलत घेऊन सिद्दी जौहर निघाला. रस्त्याने जाताना वाटेतले सरदार त्या फौजफाट्यात सम्मिलीत होत होते. स्वराज्यावर भयंकर मोठे संकट येते आहे. सिद्दी जौहर नावाचा कर्दनकाळ चालून येतो आहे हे शिवरायांना तात्काळ समजले. महाराज त्यावेळी मिरजेच्या मोहिमेत गुंतले होते . महाराजांनी ताबडतोब मिरजेला दिलेला वेढा उठवला आणि त्यांनी पन्हाळगड गाठला. यामागेही शिवरायांचा एक मोठा हेतू होता. मोकळ्या मैदानावर जौहरसोबत लढणे सोपे नाही हे त्यांनी ओळखले. पन्हाळगडाऐवजी शिवराय राजगड, प्रतापगड किंवा दुसऱ्या तितक्याच बलशाली किल्ल्यावर जाऊ शकले असते परंतु स्वराज्यातील प्रमुख सारे किल्ले मध्यावर होते.शिवराय यापैकी एखाद्या किल्ल्यावर गेले असते आणि सिद्दीने त्या किल्ल्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला असता तर तो आणि त्याची प्रचंड फौज स्वराज्यातील रयतेचे, मंदिराचे नुकसान करत, मुक्या प्राण्यांना लुटत, त्यांना कापत गडाकडे आला असता.अफजलखानाने हेच डाव खेळून स्वराज्याची फार मोठी हानी केली होती. पुन्हा पुन्हा तेच प्रकार, तीच हानी, तसलीच दांडगाई शिवरायांना नको होती. पन्हाळगडाचे तसे नव्हते. तो स्वराज्याच्या एका टोकाला होता. राज्याच्या सरहद्दीवर होता. पन्हाळ्याच्या रोखाने त्याचे सैन्य आले तरीही ते फारसे नुकसान करु शकणार नव्हते. फारतर तो पन्हाळगडाला वेढा घालू शकतो आणि ते त्याच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. कारण त्याने वेढा घालताच नेताजी आणि त्याचे सैन्य मधूनमधून वेढ्यावर हल्ले करून सिद्दी आणि त्याच्या सैन्याला घायाळ करू शकले असते. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसात पावसाळा सुरू होतोय. एकीकडे नेताजीचा मारा आणि दुसरीकडे पावसाचे थैमान या दोहोंमध्ये सिद्दी चिरडला जाईल, त्याचा उत्साह संपुष्टात येईल. हाही एक विचार शिवरायांनी केला होता..…

आदिलशाहीने अजून एक चाल खेळली. त्याने मुघल बादशहा औरंगजेबास एक पत्र लिहून सांगितले, शिवाजीची सत्ता उलटवून टाकण्याची एक चांगली संधी आहे. आम्ही त्याच्या राज्यावर फार मोठे सैन्य पाठवले आहे. तुमच्याही फौजेने याचवेळी शिवाजीवर हल्ला केला तर त्याचे नामोनिशाण राहणार नाही. आपल्या फौजा त्याला चिरडून टाकतील. ते औरंगजेबालाही पटले. त्यानेही फार मोठे सैन्य स्वराज्यावर पाठवले. सर्व बाजूंनी संकटे आली. तितक्यात जौहरच्या जासुसांनी खबर आणली की, शिवाजी मिरजेची लढाई सोडून पन्हाळगडावर गेला आहे. ते ऐकून जौहर खुश झाला. त्याला वाटले, आपल्याला भिऊन शिवाजी लपून बसला आहे. पण किती दिवस असा लपून बसणार आहे? आपण पन्हाळगडाला भरभक्कम वेढा देऊया. माणूस तर सोडा मुंगीलाही गड उतरता येणार नाही. गडाखालून वर जाणारा रस्ता बंद करून त्याचे दाणापाणी बंद झाले आणि गडावरील शिदोरी संपली की, शिवाला शरण येण्याशिवाय अन्य पर्यायच उरणार नाही. शिवरायांनी पन्हाळ्यावर जाऊन चूक केली, आपणास विनासायास जिंकण्याची संधी दिली असे समजून सिद्दी जौहर मनोमन खुश झाला परंतु तो गाफील राहिला नाही. गडाच्या पायथ्यावरून आणि माथ्यावरून परस्परांच्या विरोधात तोफांचा मारा सुरू झाला. कितीही प्रयत्न केला तरी जौहरीची फौज गड चढताना एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे सरकत नव्हती. त्या टप्प्याची मर्यादा ओलांडायचा प्रयत्न केला की, वरतून मावळे तोफांचे गोळे सोडून टिपू लागले. जिथे स्वराज्याचे शिलेदार चढाई करीत होते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या लांब पल्ल्याच्या तोफा सिद्दी जौहरकडे नव्हत्या. खूप विचार करून त्याने एक निर्णय घेतला. राजापूरला इंग्रज व्यापारी राहात होते. सिद्दीचा वकील त्यांच्याकडे गेला. त्याने इंग्रजांना लांब पल्ल्याच्या तोफा आणि दारुगोळा विकत देण्याची मागणी केली. ती ऐकून साहेब विचारात पडले कारण ही मागणी मान्य करणे म्हणजे सरळसरळ शिवाजीच्या विरोधात जाऊन त्याचे वैर पत्करण्यासारखे आहे. परंतु पाठोपाठ त्याच्या मनात असाही विचार आला की, एकीकडून आदिलशाही आणि दुसरीकडून औरंगजेबाने शिवाजीला पुरते घेरले असल्याने शिवाजीचा पराभव अटळ आहे. उद्या आदिलशाहीची सत्ता असणार आहे. शिवाजीचे नामोनिशाण नसणार आहे. तेंव्हा जौहरला मदत करणे आपल्या आणि आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने अधिक फायद्याचे आहे. असा दूरदृष्टीने विचार करून साहेबांनी जौहरची मदत करण्याचा निर्णय घेतला आणि लगेचच पूर्तताही केली. ही गोष्ट शिवरायांना समजली. ते संतापले, चिडले. इंग्रजांच्या कृतघ्न वृत्तीचा त्यांना प्रचंड राग आला. शिवरायांनी काही महिन्यांपूर्वीच इंग्रजांना मदत केली होती. इंग्रज ते सोईस्कर विसरले होते. शिवरायांच्या चिंतेचा विषय होता, जौहरने घातलेला बळकट वेढा आणि महत्त्वाचे म्हणजे नेताजी पन्हाळ्याकडे निघाल्याची खबर येत नव्हती. विशेष म्हणजे येणारा पावसाळा लक्षात घेऊन सिद्दी जौहरने पावसापासून सैन्याचा बचाव व्हावा, पावसामुळे वेढा सैल पडू नये म्हणून त्याने वेढ्याच्या ठिकाणी छप्पर घालायला सुरुवात केली. दुसरीकडे औरंगजेबानेही आदिलशाहीचा प्रस्ताव मान्य करून आपला मामा, एक बळकट, चलाख, क्रुर, कपटी सरदार शाईस्तेखानास स्वराज्याचा नाश करण्यासाठी पाठवले. फार मोठी फौज घेऊन शाईस्तेखान निघाला. अहमदनगर, सोनवडी, क-हेपठार, सुपा, बारामती, शिरवळ असा सारा प्रवास करताना आलेले गाव लुटत,बेचिराख करत मार्गक्रमण सुरू ठेवले. शिवाजी पन्हाळगडावर अडकला आहे.सिद्दी जौहरच्या वेढ्यातून सुटून येणे अशक्य आहे. आपल्याला विरोध तो काय करणार या विचाराने शाईस्तेखान काहीसा गाफील राहिला आणि संधी साधून मावळ्यांनी त्याच्या फौजेवर हल्ला केला. कमीतकमी वेळेत शक्य तेवढा दुश्मन कापून, हाती पडेल तेवढी दौलत लुटून मावळे पसार झाले. असे हल्ले एकामागोमाग एक सारखे होऊ लागले. या हल्ल्याचे नियोजन राजगडावर असलेल्या माता जिजाऊ करीत होत्या. शिवराय वेढ्यात अडकलेले, शाईस्तेखानासारखा दुश्मन स्वराज्याचा घास घेण्यासाठी येतोय हे ऐकून ती माऊली घाबरली नाही. शरण गेली नाही तर खानाला सळो की पळो करून सोडले. शाईस्तेखान हे हल्ले पचवत, जमेल तसा मुकाबला करत, वाटेतील गावे लुटत अखेर पुण्याच्या लालमहालात दाखल झाला...

तिकडे पन्हाळगडावर वेढा आणि निर्माण झालेला तिढा सुटत नव्हता. नेताजी पालकर मदतीला येण्याची शक्यता दिसत नव्हती. पावसातही सिद्दी जौहरची फौज मागे हटत नव्हती. शिवराय चिंतेत असले तरीही घाबरले नव्हते, पराभवाचे काळे ढग गर्दी केलेले असतानाही मराठा वीर, जिजाऊंचा सुत आशावादी होता, सकारात्मक होता. काहीतरी मार्ग निश्चितच निघेल. माता भवानी, शिवशंभू मार्ग दाखवतील या आशेने ते विचार करत होते. आणि सापडला. शिवरायांचा विश्वास जिंकला. भवानीमाता पावली. शिवशंकर धावले. मार्ग दाखवते झाले. शिवरायांनी आपला विचार गडावरील सहकाऱ्यांना बोलून दाखवला. जोखीम होती, पकडले जाण्याची शक्यता होती पण डगमगून चालत नव्हते. जो प्रयत्न करतो त्याला मार्ग सापडतो...प्रयत्नांती परमेश्वर! ठरले. शिवरायांनी ठरविल्याप्रमाणे करायचे..…

नागेश सू. शेवाळकर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED