Spardhechya palikade - 2 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्धेच्या पलीकडे - (भाग २)

स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग २)

आपला मूळ प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला निघायला उशीर झालेला आहे. आणि आता जर आपण इथे भांडत बसलो तर तो उशीर अजून वाढतच जाणार आहे.

त्यामुळे तुमच्या या भांडणात किती वेळ घालवायचा हे तुमच्या सारख्या हुशार मुलांना माझ्यासारख्या मित्राने सांगणे उचित होणार नाही.

म्हणूनच मी समोर बसून चहा घेतो. भांडण संपले आणि नेहमीचे सोपस्कार झाले की मला कळवा. माझ्याकडे एक भन्नाट कल्पना आहे आपला हा वेळ भरून काढण्याची." - प्रकाश.

नेहमी प्रमाणेच प्रकाशच्या बोलण्यात तथ्य होते. त्याचे मत चौघांनाही पटत होते. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.

राहुल आणि मंदारने हात मिळवले, गळा भेट घेतली आणि एकमेकांचे कान धरून माफी मागितली. अर्थात ही प्रथाही प्रकाशनेच घालून दिली होती. ग्रुपमधली भांडणे कमी व्हावीत हा त्या मागील शुद्ध हेतू होता. ग्रुपमधले प्रत्येक भांडण याच प्रकारे मिटत असे. भांडण मिटल्यावर मात्र दोन मिनिटापूर्वी काहीच घडले नव्हते अशा अविर्भावात त्यांच्यात हास्यविनोद सरु झाले. सगळे परत एकदा चहाच्या टपरीवर आले आणि प्रकाशकडे पाहू लागले. प्रकाश मात्र काहीच झाले नाही या अविर्भावात चहा पित होता.

"पक्या आता जास्त भाव खाऊ नकोस, काय कल्पना आहे ते लवकर सांग." - राहुल.

"सांगतो, सांगतो.

कालच मला घरी नवीन तत्वज्ञान समजले आहे, अर्थात मा‍झ्या वडीलांनीच शिकवले आहे. त्यांचे म्हणणे आहे की स्पर्धा ही प्रगतीस कारक असते, मी काल अर्धा तास यावरून लेक्चर ऐकले आहे घरी." - प्रकाश

"पक्या, फार पकवू नकोस. एक तर सकाळीच मुडचे बारा वाजले आहेत. त्यात आता तुझी पक पक, लवकर तुझी आयडिया काय आहे ते बोल."- मंदार वैतागून बोलला.

"मंद्या, तुही थोडी वाट बघ. कळू दे की तुला पण कळू दे वाट पहायचे दुःख. सांगेल तो पण पाचच मिनिटात." - राहुल खोचकपणे म्हणाला पण तो मुद्दा सगळ्यांनाच पटल्याने सगळ्यांनी त्याला दाद दिली आणि मंदार ओशाळला.

"तर मित्रहो, आताच सांगितल्याप्रमाणे स्पर्धा ही प्रगतीस कारक असते असे मी कालच शिकलो आहे-" प्रकाश

"पक्या फार पकवू नकोस नाहीतर पकुन पकून कान दुखायचे, आणि मग आमचे कान दुखायचे दुःख तुला पण अनुभवायला लावू." - विनोद. सगळ्यांनी परत विनोदलाही दाद दिली.

"बाळ विनोद, केवळ आपले नाव विनोद आहे म्हणून आपल्याला कधीही फालतू विनोद करायचा जन्मसिद्ध अधिकार प्राप्त झाला आहे असा जर तुझा काही गैरसमज झाला असेल तर तो वेळीच दूर कर. आणि मी काय सांगतोय ते पूर्ण ऐक." – प्रकाश, प्रकाशच्या या विनोदावर मात्र विनोद ओशाळून शांत झाला.

"बोला गुरुदेव, आपण महान आहात. आपणास अडवून आम्ही घोडचूक केली आहे." – रमेश, प्रकरण सावरून घेत म्हणाला.

"तर कालच मी शिकलेले हे तत्वज्ञान व्यावहारिक कसोटी वर खरे ठरते का हे मला तपासून बघायचे आहे.

म्हणूनच मी सुचवतो की आज आपण शर्यत लावायची. इथपासून निघून गडाच्या पुणे दरवाजापर्यंत. जो आधी पोचल तो जिंकेल. जर माझे वडील बरोबर असतील तर आपण नक्कीच प्रगती करू, आणि एकूणच अंतर नेहमीपेक्षा वेगाने पार करू. म्हणजेच आपला वाया गेलेला अर्धा तास आपसूकच भरून निघेल...

तर कशी वाटती आहे माझी आईडिया?” - प्रकाश

“मी सहमत आहे. मी स्पर्धा लावायला तयार आहे. मेहनतीला योग्य शिस्तीची जोडी मिळाली तर विजय सुकर होतो, हे मला ही शर्यत जिंकून सिध्द करता येईल.” – राहुल, मंदारला उद्देशून बोलला.

“मी ही तयार आहे, मलाही दाखवून द्यायचे आहे, मी जरी बेशिस्त असलो तरी मेहनतीला कुठेच कमी पडत नाही आणि वेळ आली तर इतरांपेक्षा सरस कामगिरी करू शकतो.” – मंदार

“मी ही तयार आहे.” – रमेश

“विन्या लेका, तू काही बोलू नकोस. तू ही तयार असशील हे मी गृहीत धरतो.” – विनोद काही बोलायच्या आधी प्रकाश म्हणाला. सर्वांनी दंड थोपटले होते. आता प्रकाशने स्पर्धेचे नियम सांगायला सुरुवात केली.

“तर आता स्पर्धेचे नियम ऐका. स्पर्धा प्रामाणिक झाली पाहिजे. तुम्ही कुठलाही रस्ता निवडू शकता पण दुसर्‍याच्या रस्त्यात अडथळा आणायचा नाही, आणि दुसर्‍या कोणाचीही मदत घ्यायची नाही. गडाच्या पायथ्यापर्यंत सायकलीवर जायचे आणि पुढे गड चढून जायचे. पुणे दरवाज्यापाशी जो आधी पोहचेल तो जिंकेल. इतकी साधी ही स्पर्धा आहे. ” – प्रकाश

सगळ्यांनी माना डोलावल्या आणि सायकलीकडे जायला तयार झाले.

“अरे, लेकांनो !! इतकी घाई करू नका. तुम्ही सगळे खूपच हुशार आहात. म्हणूनच मला तुमच्या वर अजिबात विश्वास नाही. त्यामुळेच इथुन निघण्याआधी सगळ्यांनी त्यांची पाकिटे आणि मोबाइल दोन्ही गोष्टी माझ्याकडे जमा करायच्या आहेत. म्हणजे तुम्ही कोणाची मदत घेणार नाही किंवा मदत मागूही शकणार नाही.” – प्रकाश

प्रकाशची ही अट मात्र सगळ्यांनाच नवीन होती आणि थोडी धक्कादायक देखील. सगळ्यांनी त्याच्याकडे नाराजीने पहिले, त्याने मात्र अत्यंत गोड हसून त्यांच्यापुढे एक पिशवी धरली. प्रत्येकाने नाराजीनेच आपले फोन आणि पाकिटे त्याच्या पिशवीत ठेवली.

“तर मित्रांनो, आजच्या स्वारीला आपल्याला आधीच उशीर झालेला आहे. त्यामुळेच आपण एकमेकांशी ही स्पर्धा करायचे ठरवले आहे. ही स्पर्धा जिंकून आपले विचार सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला मिळणार आहे.

त्यामुळेच आता अधिक वेळ न दवडता, मी ही स्पर्धा सुरू झाल्याची घोषणा करतो.

जा!!! पळा!!! आपली सायकल घ्या आणि गडगडे कूच करा. हर हर महादेव!!!!!!!” – प्रकाश

सगळ्यांची मने कशी संमोहित करायची, याची एक वेगळीच कला प्रकाशकडे होती. त्याच्या त्या घोषणेनंतर सगळेच आपापल्या सायकलीकडे धावले. प्रत्येकाला ही स्पर्धा जिंकून दाखवायची होती. आपले म्हणणे खरे करून दाखवायचे होते.

जरी ती मित्रांबरोबरच केली असली तरी स्पर्धा होती. त्यात एक ईर्ष्या होती, मेहनत होती, आणि जो जिंकेल त्याला आत्मसन्मानाचे बक्षीसही मिळणार होते. त्या मुळेच अधिक विचार न करता चौघंही सायकलीवर बसले आणि पूर्ण ताकदी निशी त्यांच्या सायकली सिंहगडाकडे धावू लागल्या. प्रकाशही त्यांच्या मागे जाऊ लागला.

चौघंही सायकल चालवण्यात निपुण होते, त्यांनी बरीच मोठी मठी अंतरे सहज पार केली होती. दर रविवारी सकाळी सायकल घेऊन ते असेच दूर कुठे तरी जात असत. त्यामुळे दम लागण्याचा प्रश्नच नव्हता. सगळेच तुल्यबळ असल्याने थोड्याफार पुढे मागे त्यांच्या सायकली धावत होत्या.

आता शर्यत खडकवासला धरणापाशी पोहचली होती. इतर वेळी पाचही जण इथे थांबून थोडी विश्रांती घेत असत, धरणाचा नयनरम्य निसर्ग डोळ्यात साठवून घेत असत. थोडे चहा पाणी करून पुन्हा ताजेतवाने होऊन नव्या जोमाने पुढच्या प्रवासाला निघत असत.

“काय मंद्या? दमला असशील न? थांबायचे का धरणावर?” – राहुलने मंदारला विचारले.

मंदार मात्र सकाळचे भांडण पूर्ण विसरला नव्हता. किंबहुना आज पर्यंत राहुलने त्याला जे काही बरे वाईट ऐकवले होते ते खोडून काढायची ही नामी संधी त्याला वाया जाऊन द्यायची नव्हती. त्यामुळे राहुलच्या त्या प्रश्नावर त्याने राहुलकडे बघून केवळ एक विक्षिप्त हास्य केले. आणि आपली सायकल पुढच्या गिअरमध्ये टाकली. आपसूकच तो अधिक वेगाने पुढे जाऊ लागला.

राहुलला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. मंदार सहज हार मानणार नव्हता. त्यामुळे राहुलनेही त्याला प्रतिसाद द्यायचे ठरवले आणि त्याच्या बरोबर वेगात सायकल चालवू लागला.

असाच उंदीर मांजराचा खेळ पुढेही चालू राहला. रमेश आणि विनोद हे दोघं आता थोडे मागे पडले होत, प्रकाश तर कुठेच दिसत नव्हता. केवळ राहुल आणि मंदार या दोघांमध्येच आता ही शर्यत उरली होती. दोघंही जीव तोडून सायकल मारत होते. नुकतेच त्यांनी डोणजे फाटा पार केला होता, आता गड जवळ दिसू लागला. आपले लक्ष्य समोर दिसल्यावर माणसाला अधिक हुरूप येतो आणि नकळतच तो अधिक मेहनत करू लागतो. त्या दोघांचेही तसेच झाले. गड तर मगासपासून समोर दिसत होता पण आता तो आवाक्यात आल्याची भावना मनात निर्माण झाली आणि दोघं अधिक त्वेषाने सायकल चालवू लागले. दोघांनाही आपले म्हणणे सिद्ध करायचे असल्याने दोघंही हार मानायला तयार नव्हते.

सूर्य नुकताच उगवला होता आणि सूर्याची किरणांची दाहकता आता वाढू लागली होती. बरोबर घेतलेले पाणी पिण्याचेही त्यांना भान राहिले नव्हते. जेव्हा जेव्हा त्यांची नजर एकमेकांशी भिडत होती त्या त्या वेळेला आव्हान देण्या पलीकडे कसलेच काम तिने केले नव्हते. ही स्पर्धा आता त्यांच्यासाठी जणू काही युद्ध भूमी ठरत होती.

आता दोघंही पायथ्याशी पोहचले. थोडावेळ आधीच मंदारने आपली सायकल थोडी सावकाश मारायला सुरवात केली होती. त्याला माहीत होते, राहुल जरी लवकर पोहचला तरी सायकलीला तो नीट लॉक करणार, ती थोडी पुसून घेणार. सगळे कसे शिस्तीत करणार. आणि त्याचा वेळ निश्चितच वाया जाणार. म्हणूनच तो निश्चिंत होता, आणि आपली ऊर्जा गड चढण्यासाठी वाचवत होता.

राहुलनेही उलटा विचार केला होता. मंदार अजून आलेला नाही, त्यामुळे आपल्याला थोडा फार वेळ मिळाला आहे तर आपण सायकल पुसून घेऊ, त्यामुळे आपल्याला दम खाण्यासाठी वेळी मिळेल आणि सायकलही नीट राहील.

मंदारचा अंदाज बरोबर ठरला. राहुल अगदी तसेच वागत होता. त्यामुळे मंदार जेव्हा गडापाशी पोहचला तेव्हा राहुल सायकलच पुसत होता.

आतापर्यंत दोघांनी सायकल नेहमीपेक्षा जोरात चालवली होती. ऊनही वाढू लागले होते आणि समोर सिंहगड राजासारखा उभा होता. पुणे दरवाजा त्यांची वाट बघत होता. प्रथम तिथे पोहचून आपले म्हणणे सिध्द करायची संधी तो त्यांना देणार होता. दोघांनीही एकदा गडाकडे पहिले. मग एकमेकांकडे पहिले. परत एकदा नकळतच त्यांची नजर समोरच्याला आव्हान देऊन गेली आणि पूर्ण ईर्ष्येने ते गड चढू लागले.

तिकडे विनोद आणि रमेशची परिस्थितीही फार वेगळी नव्हती, पाच एक मिनिटाच्या अंतरावर तेही या स्पर्धेत सहभागी होतेच.

इथुन पुढे मात्र त्यांची खरी कसोटी होती. सिंहगड चढणे आणि सायकल चालवणे या मध्ये फरक होता. सायकल चालवायची त्यांना सवय होती, त्या उलट गड मात्र ते क्वचितच चढत असत. गड चढायला सुरुवात केल्यावर पाचच मिनिटात स्पर्धा किती कठीण होणार आहे याची जाणीव झाली.

- क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED