Spardhechya palikade - 3 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्धेच्या पलीकडे - (भाग ३)

स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग ३)

इथुन पुढे मात्र त्यांची खरी कसोटी होती. सिंहगड चढणे आणि सायकल चालवणे या मध्ये फरक होता. सायकल चालवायची त्यांना सवय होती, त्या उलट गड मात्र ते क्वचितच चढत असत. गड चढायला सुरुवात केल्यावर पाचच मिनिटात स्पर्धा किती कठीण होणार आहे याची जाणीव झाली. त्यांच्या जवळचे पाणी वापरायला त्यांनी सुरुवात केली होती. थकवा जाणवायला सुरुवात झाली होती. केवळ घाई करून गड चढल्याने जिंकता येणार नाही हे त्यांना जाणवले.

त्यामुळेच त्यांनी आपापल्या धोरणात बदल केले. राहुलने आपली चाल मंद केली. तो आता आपली ऊर्जा वाचवून पुढे जात होता. त्या उलट मंदार अधिक धोक्याची वाट पकडून वेळ वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. दोघांनाही एकमेकांची धोरणे काही वेळातच समजली आणि अधिक धैर्य एकवटून ते पुढचा गड चढू लागले.

रमेश आणि विनोदही आता गड चढू लागले होते. थोड्याच वेळात त्यांनाही राहुल आणि मंदार सारखीच आव्हाने येणार होती.

मंदार धोक्याची वाट निवडत असल्याने राहुलच्या पुढे जात असे, मग मात्र थोडावेळ थांबून तो राहुलच्या गतीचा अंदाज घेत असे आणि दम खात असे. राहुलने मात्र स्वतःची शिस्त मोडायची नाही असे जणू काही ठरवलेच होते. सहसा तो मूळ मार्ग सोडत नसे, ठराविक वेळाने विश्रांती घेऊन थोडे पाणी पिऊन पुढे निघत असे. आपल्याप्रमाणेच मंदारही दमत असणार याची त्याला पूर्ण कल्पना होती. याच पद्धतीने विनोद आणि रमेशही गड चढत होते.

निम्मा गड पार झाला तेव्हा बहुतेक सगळ्यांचीच दमछाक झाली होती. जवळचे पाणी संपत आले होते. सूर्य आता वैरी वाटू लागला होता. पण या सगळ्यावर जिंकण्याची ईर्षा मत करत हाती आणि त्यांना पुढचे मार्गक्रमण करण्यास प्रवृत्त करत होती.

मंदार आता दमला होता, राहुल त्यामानाने सावकाश चढत असल्याने कमी दमला होता. आता गडाचा शेवटचा टप्पा नजरेत आला होता आणि विजयश्री समोर दिसू लागली होती. यावेळी राहुलने आपल्या धोरणात बदल केला. तो त्याच्या ठराविक वेळेनन्तर थांबलाच नाही, उलट त्याने चालण्याचा वेग वाढवला आणि या वेळी त्यानेही मुळ मार्ग सोडून धोक्याची वाट पत्करली. मंदारला हे सगळे दिसत होते, आणि आपण हरतो की काय अशी भीती त्याला वाटू लागली. त्यामुळेच यावेळी धोक्याची वाट संपल्यावर जी विश्रांती तो घेत असे ती त्याने घेतली नाही.

डोक्यावर चढणारा सूर्य, जवळची संपलेली पाण्याची बाटली, थकलेले शरीर आणि समोर दिसणारा पुणे दरवाजा अशा विचित्र परिस्थितीत मंदार आणि राहुल समोर समोर आले. परत एकदा त्यांची नजर एकमेकांना आव्हान देऊन गेली आणि स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले.

पूर्ण गड चढून झाला होता, राहुल आणि मंदार यांच्यात अगदीच थोडे अंतर शिल्लक होते, पुणे दरवाजा समोर होता. अशा वेळी मंदारने आजू बाजूचे भान विसरून पुणे दरवाजाकडे पळायला सुरुवात केली.

हा राहुलसाठी मोठा धक्का होता. मंदार आपल्याप्रमाणेच थकला असेल आणि पळू शकणार नाही असा त्याचा अंदाज होता. पण मंदार मात्र पळत होता आणि क्षणा क्षणाला पुणे दरवाजा जवळ करत होता, त्यामुळे आपल्यालाही पळण्याशिवाय पर्याय नाही हे राहुलला समजले व तो देखील मंदारमागे धावू लागला. राहुलही पळतो आहे हे पाहून मंदार बिचकला आणि अधिक वेगाने पळू लागला आणि स्पर्धेला गालबोट लागले. मंदारचा पाय घसरला आणि तो पडला. पुणे दरवाजा केवळ दहा पावलांवर दिसत होता. पण पायाला लागले असल्याने तो लगेच उठू शकला नाही आणि राहुलने संधी साधली.

राहुलने पुणे दरवाजा सर केला आणि वरील बुरुजावर जाऊन तो विजयाच्या उन्मादात ओरडू लागला. त्याच्या इशार्‍यामुळे तो जिंकल्याचे गड चढणाऱ्या विनोद आणि रमेशला समजले.

थोड्याच वेळात मंदारही वर आला. पायाला लागल्यामुळे तो अजूनही अडखळत चालत होता.

"राहुल्या, छान खेळलास तू." - असे म्हणून त्याने राहुलचे अभिनंदन केले आणि त्याला आलिंगन दिले.

त्या अलिंगनामुळे राहुलही भानावर आला आणि त्याला त्याची चूक उमगली.

एरवी एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी सुद्धा तो मदतीला धावून जायचा पण आज स्पर्धा सुरु असताना त्याचा जवळच मित्र जखमी झाला तरी त्याने दुर्लक्ष केले होते. आता मात्र त्याचे मन त्याला खाऊ लागले आणि त्याने मंदारची रितसर माफी मागीतली. थोड्याच वेळात विनोद आणि रमेशही दरवाज्यावर पोहचले. त्यांचीही अवस्था राहुल आणि विनोद सारखीच होती. जवळचे पाणी संपले होते आणि दोघंही दमल्यामुळे धापा टाकत होते.

गडावरील वाऱ्यामुळे सगळ्यांचाच थकवा पाचच मिनिटाच्या विश्रांतीत दूर झाला आणि पोटातील भूक जाणवू लागली. तसेही सकाळी घेतलेल्या चहाशिवाय त्यांनी पोटात काही ढकलले नव्हते. इतर वेळी आता पर्यंत त्यांनी निदान दोन वेळा तरी नाष्टा केला असता. त्याच वेळी चौघांनाही एक गोष्ट समजली ती म्हणजे आता त्यांच्याकडे त्यांचे पाकिट आणि मोबाइल दोन्ही गोष्टी नव्हत्या त्या मुळे प्रकाशची वाट बघण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. सगळे एकमेकांकडे बघून हसले. प्रकाशची सावकाश येण्यामुळे टर उडवू लागले.

पुढची पाच दहा मिनिटे प्रकाशची यथेच्छ टर उडवल्यावर मात्र पोटातील भूक त्यांना प्रकर्षाने जाणवू लागली आणि प्रकाशची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही हे सगळ्यांना समजले. पोटातील भुकेमुळे त्यांना जाणारा वेळ संथ झाल्याचा भास होऊ लागला. त्यांना आपल्या हतबलतेची जाणीव प्रकर्षाने होऊ लागली आणि नाराजीनेच ते प्रकाशची वाट पाहू लागले.

दर थोड्या वेळाने रमेश बुरूजावरून प्रकाश दिसतो का हे वाकून बघत होता. राहुल सतत घड्याळाकडे बघत होता. जवळ जवळ अर्धा तास उलटून गेला होता आणि प्रकाश कुठेच दिसत नव्हता. वाट बघण्या पलीकडे चौघंही काही करू शकत नव्हते.

“राहुल्या, किती उशीर झाला आहे रे प्रकाशला?” – मंदार

“अर्धा तास, पण का रे?” – राहुल

“नाही, सकाळी मी जेवढी बोलणी खाल्ली आहेत किमान तेवढे तरी त्याला ओरडला नाहीस तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव.” – मंदार

“मंद्या, तू डोक्याला फार ताण देऊ नकोस. चल त्या झाडाखाली जाऊन सावलीत बसूयात. प्रकाश आला की हा रमेश आवाज देईलच आपल्याला.” – विनोद

विनोद आणि मंदार जवळच्या झाडाखाली जाऊन बसले. राहुल घड्याळाकडे बघत राहिला आणि रमेश बुरूजावरच उभा राहिला. प्रकाशची वाट बघत. साधारण अर्धा तास झाल्यावर रमेश आनंदाने नाचू लागला.

“पक्या आला रे!!! पक्या आला रे!!!”

ते शब्द ऐकण्यासाठी त्या तिघांचेही कान आतुरले होते. तिघंही बुरूजाकडे पळाले. बुरूजावरून प्रकाशला हाक मारू लागले. प्रकाशनेही हात दाखवून त्यांना खूण केली आणि विश्रांतीसाठी तिथेच बसला. तो दिसत होता त्या जागेवरून त्याला वर यायला अजून पंधरा मिनिट तरी लागणार होती. ती पंधरा मिनिटे त्या चौघांसाठी अतिशय संथ गेली, प्रत्येक मिनिट त्यांना तासासारखे भासू लागले होते.

सरते शेवटी प्रकाशही धापा टाकत बुरूजावर पोहचला. राहुल परत एकदा रागाने लाल झालेला पाहून प्रकाशला हसू आवरले नाही.

“राहुल, ओरडण्या आधी एक गोष्ट लक्षात घे. ही स्पर्धा होती. इथे पोहचण्याची कुठलीच वेळ मी तुम्हाला दिली नव्हती. मी मा‍झ्या क्षमते अनुसार वेळेत आलो आहे. त्यामुळे जर तुला असे वाटत असेल की मी उशिरा आलो आहे तर ते पूर्णपणे चुकीचे आहे.”

प्रकाशचा हा तर्क कसा खोडून काढावा हे काही राहुलला सुचत नव्हते. त्यामुळे तो परत आपल्या जागेवर जाऊन बसला. मंदार मात्र काहीच बोलला नाही. त्याने प्रकाशच्या हातून पिशवी खेचून घेतली आणि सगळ्यांची पाकिटे परत केली. रमेश मात्र पाणी आणि वेफर्स घेऊन येतो असे म्हणून तेथून निघून गेला.

रमेशने आणलेले वेफर्स आणि पाणी पिऊन सगळे आता शांत झाले होते. प्रकाशनेही दम घेऊन झाला होता. प्रकाशने सगळ्यांना समोर येण्याची खूण केली.

“पक्या, आता पकवू नकोस हं.” – विनोद.

विनोदच्या त्या विनंतीला प्रकाशने कुत्सित हसून उत्तर दिले आणि आपल्या पुढे पर्याय नाही हे ओळखून चौघंही प्रकाशने सांगीतले तसे उभे राहिले.

“तर मित्र हो!! या आजच्या स्पर्धेत आणि मा‍झ्या प्रयोगात मनापासून भाग घेतल्यामुळे मी तुमचे मनापासून आभार मानतो.

तर आजच्या प्रसंगातून स्पर्धा प्रगतीस कारक असते हे सिध्द झालेले आहे. कारण या स्पर्धेमुळेच तुम्ही सगळे जण जवळ जवळ अर्धा तास तरी लवकर या जागी पोहचला आहात.” – प्रकाश

“पक्या, अर्धा नाही एक तास. आणि तू उशीर का केलास ते आम्हाला कळले तर अधिक बरे होईल.” – मंदार रागाने म्हणाला.

त्यावर प्रकाश पुन्हा एकदा शांतपणे हसला.

“ते होय. त्या साठी मला तुमची प्रामाणिकपणे माफी मागायची आहे.” – प्रकाश

“”ते तर आहेच, पण आधी कारण सांग.” – विनोद

“तर मित्रांनो मी तुमची मनापासून माफी मागतो. मी तुम्हाला अर्धवट माहिती दिली. म्हणजे मी तुम्हाला माझे वडील काय म्हणाले ते सांगीतले पण त्यावरची माझी मते सांगितली नाहीत.

खरे तर मला वडील बरोबर की माझी मते हे तपासून बघायचे होते, त्यामुळे असे करणे भाग पडले.” – प्रकाश

“पक्या नक्की काय ते लवकर बोल. पोटातले कावळे कोकलत आहेत इथे.” – राहुल

“राहुल्या सगळे सांगतो. तरीही त्या आधी आजच्या स्पर्धेची समीक्षा करणे मला भाग वाटते म्हणून सांगतो.

राहुल्या तुझे ना त्या महाभारतातल्या अर्जुनसारखे आहे. तुला नेहमी केवळ पोपटाचा डोळाच दिसतो. आजूबाजूचे काहीच दिसत नाही. त्यामुळे तुझी नजर नेहमीच केवळ ध्येयावरच असते आणि तू ते नेहमीच साध्य करतोस.

तुझा हा गुण तुला अर्जुनाप्रमाणे केवळ एक उत्तम धनुर्धारी बनवू शकतो, पण तू त्यापुढे जाऊ शकत नाहीस. आणि जर तू महाभारत पूर्ण बघितले असशील तर तुला समजलेच असेल, अशा अर्जुनाला कधी ना कधी गीता ऐकवण्याचे काम कृष्णाला करावेच लागते.” – शेवटचे वाक्य बोलताना प्रकाशला आपणच कृष्ण असल्याचा भास झाला आणि नकळतच कृष्णाप्रमाणेच त्याचा हात राहुलला आशीर्वाद देण्यासाठी वर जाऊ लागला.

“देवा जमिनीवर या आणि आमच्याबद्दलही दोन शब्द बोला.” – मंदार त्याला चिडवत म्हणाला.

आपली चूक उमगल्याने प्रकाशने आपला हात झटकन खाली खेचला.

“मंद्या तू आहे ना, भीमा सारखा आहेस. सगळे गुण चार आणे जास्तच आहेत पण त्याला नियंत्रित करण्यासाठी तुला धर्मराज युधिष्ठिर शोधला पाहिजे.” – प्रकाश गंभीरपणे म्हणाला.

“आणि आम्ही दोघं जणू नकुल आणि सहदेवच नाही का. मंद्या तुला ना महाभारताचा ओव्हर डोस झाला आहे. वाचन जरा कमी करत जा.” – विनोद बोलला आणि सगळे हसू लागले. प्रकाश पुन्हा एकदा ओशाळला. थोडावेळ शांत होऊन त्याने परत एकदा बोलण्यास सुरुवात केली.

“तर मित्रहो,

माझे वडील म्हणतात तसे स्पर्धा ही प्रगतीस कर्क असते हे तुम्ही सगळ्यांनी अथक परिश्रम करून सिध्द केले आहे पण त्याच बरोबर स्पर्धेचे दुष्परिणामही अनुभवले आहे. तुमच्या थकलेल्या, भुकेलेल्या चेहर्‍याकडे बघून इथुन जाणार्‍या प्रत्येक माणसाला ते नक्कीच जाणवले असतील याची मला खात्री आहे.

स्पर्धेमुळे तुम्ही पाकिटे माझ्याकडे दिलीत. तहान भूक विसरून परिश्रम घेतलेत. तुम्ही थकत होतात तरीही केवळ जिंकण्याच्या ईर्ष्येमुळे तुम्ही शरीराने दिलेले संकेत नाकारून परिश्रम केलेत. शरीर थकत होते तरीही तुम्ही धावतच राहिलात. शेवटी स्पर्धा संपल्यावर मात्र त्याचा आनंद फार काळ टिकला नाही आणि शरीराचे झालेले श्रम तुम्हाला दहा पटीने जाणवू लागले आणि अशा हताश वेळी तुम्हाला माझी वाट पाहण्या पलीकडे फार काही करता आले असेल असे मला वाटत नाही.

त्या उलट मी केले. नेहमीप्रमाणे खडकवसल्यापाशी थांबलो. विश्रांती घेतली. चहा घेतला. पाच दहा मिनिटे निसर्गाचा आनंद घेतला. गडाखाली आल्यावर ताक घेतले. गड चढताना मावशीकडून करवंदे घेतली. गड चढायचा आनंद घेतला, सोबतीच्या एका गटाबरोबर ओळखही झाली आणि गड चढायला मदतही मिळाली.

इथे वरती पोहचल्यावर कदाचित माझ्याकडे स्पर्धा जिंकल्याचा आनंद नव्हता, पण त्याची भरपाई नक्कीच प्रवासातील आनंदाने केली होती असे मला वाटते.

एकंदरीतच माझा हा प्रयोग यशस्वी झाल्याचे आणि मा‍झ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाल्या सारखे वाटते.

पण तुम्हाला म्हणून विचारतो, तुम्हीच सांगा आजची स्पर्धा कोण जिंकले? आणि आमच्या वादात बरोबर कोण होते? मी कि माझे वडील?” – प्रकाश प्रामाणिकपणे विचारत होता चौघंही संमोहित होऊन ऐकत होते.

“अरे लेकांनो!!!! उत्तर द्या!!!!” – प्रकाश

“तुम्हीच गुरु देव तुम्हीच!!!!” – मंदारने सर्वात आधी उत्तर दिले आणि प्रकाशला सांष्टांग नमस्कार घातला. इतर तिघांनीही त्याचे अनुकरण केले.

प्रकाशला परत एकदा आपण श्रीकृष्णाप्रमाणे गीता सांगितल्याचा भास झाला आणि नकळतच त्याचा हात आशीर्वाद देण्यासाठी उचलला गेला.

समाप्त.....

“In search of your destiny, do not forget to enjoy your journey towards it…..”

– स्वप्नील तिखे.

इतर रसदार पर्याय