Aathvanichya gaavat books and stories free download online pdf in Marathi

आठवणींच्या गावात

१) पेहेली तारीख ..

खुष है जमाना आज पेहेली तारीख है .

दिन है सुहाना आज पेहेली तारीख है .

.'रेडीओ सिलोन वर दर एक तारखेला सकाळी साडेसात ला लागणारे हे गाणे…

अचानक कुठून तरी हे सुर कानावर आले आणी त्यांनी मला चक्क" भुतकाळात" ओढून नेले

खरेच २० .२५ ..वर्षापूर्वी एक तारीख या गोष्टीला खुप महत्व होते ..

मला आठवतेय माझे वडील एक सरकारी कर्मचारी होते .

जेमतेम कमाई त्यात खाणारी तोंडे तीन .

शिवाय युद्ध काळामुळे महागाईची झळ त्यामुळे महिना कसातरी पार पडायचा

आणी .मग एक तारखेची वाट आतुरतेने पाहिली जायची ..

त्या काळी सर्व सरकारी नोकरांचे पगार एक तारखेला होत व तेही रोख पैश्यात

दर एक तारखेला सिलोन रेडीओवर सकाळी हे गाणे ऐकू आले की मनाला अतीव आनंद .होत असे .

.याचे कारण असे की

महिन्याचे अखेरचे दिवस खूप ओढ गस्तीचे असत

तेल.संपत आलेले, साखर डब्याच्या तळात..

चहापुड जेम तेम दोन ते तीन दिवस पुरू शकणारी ..,

भाजी आणणे शक्य नसलेने

पातळ पिठले ,अथवा घट्ट पिठले ,यावरच भागवले जात असे

अगदीच काही अडचण आली तर आईने तिच्या जवळ कधीतरी जपून ठेवलेले रुपया, दोन रुपये कामी येत असत ..!!

अशी महिना अखेरला कितीही ओढाताण झाली तरी कुठेही "उधार "उसनवार "केलेले आईला आवडत नसे.

घरात आहे त्यातच भागवणे इकडे तिचा कल असे .

त्यावेळी कुठलेही" कर्ज काढणे" ही गोष्ट नामुष्कीची समजली जात असे ..!

आपल्या ओढ गस्तीच्या संसारात सुद्धा आपल्या नवऱ्याच्या अंगावर कोणतेही कर्ज नाहीअसे बायका अगदी" अभिमानाने" सांगत असत ..!!

....आणी मग ज्याची आम्ही आतुरतेने .वाट पाहत असु ती" एक तारीख "येई .

त्या दिवशी वडील खुप आनंदात असत .

चकचकीत दाढी करून ,इस्त्रीचे कपडे घालून

जेवण करून बाहेर पडायची त्यांना गडबड असे,कारण ऑफिसचे पगाराचे काम त्यांच्याकडे असे .

आई पण आनंदाने त्याना निरोप द्यायला दारापर्यंत जात असे .

वडील पण त्यादिवशी खुषीत असल्याने "तुला काय आणू "असे आईला आवर्जून विचारत असत ..!

आई काही मागत नसे पण "इश्य" म्हणून एक छानसा मुरका मात्र मारत असे !

माझे सुध्धा त्या दिवशी शाळेत फारसे लक्ष लागत नसे .

कधी एकदा शाळा सुटते असे मला होत असे .

घरी गेल्यावर आई पण छान" वेणी,फणी"करून तयार असे .

मी देखील तोंड धुवून युनिफॉर्म बदलून तिच्या बरोबर देवळात जात असे .

घरी येईपर्यंत घड्याळाचा काटा सात पर्यंत पोचलेला असायचा .

मी आतुरतेने दारात जावून वाट पहात बसलेली असायची ..!

बरोबर सव्वा सात वाजता वडील घरी येत ..

ते आले की मी धावत जावून त्यांच्या हातातला डबा,व पिशवी घेत असे .

आईची लगबग चालू व्हायची

.आई त्यांच्यासाठी चहा ठेवायची .

वडील हात पाय धुवून येईपर्यंत आईने देवापुढे दिवा लावलेला असायचा

कपडे बदलून वडील पगाराचे रोख .पैसे मिठाईची पेटी आईकडे देत असत बरोबर एक" गजरा" पण असे .

गजरा पाहुन आईचा चेहेरा अगदी फुलासारखा खुलत असे .

."पैसे,मिठाई देवापाशी ठेवा "असे म्हणून ते चहाचा आस्वाद घ्यायला सुरवात करत .

आई पैसे आणी मिठाई एका तबकात ठेवून तबक देवापुढे ठेवत असे .

व देवाला नमस्कार करीत असे .

हा सोहळा झाला की वडील पण देवाला नमस्कार करून ते सारे पैसे लगेच आईच्या हातात देत .

आई त्या दिवशी अगदी "खरोखरीची "लक्ष्मी वाटत असे.

यानंतर आम्ही मिठाई खाण्यात गर्क होत असु

.आणी मग त्या पैश्याचे महिन्याच्या खर्च अनुसार वाटे केले जात .

वाणसामान ,फी ,दुधाचे बिल, वगैरे भागवले जाई.

आकस्मिक येण्याऱ्या खर्चाची पण तरतूद केली जात असे !

वडील ऑफिसमध्ये जरी हेडक्लार्क असले तरी घरचा मात्र सारा व्यवहार आईच्या ताब्यात असे.

अगदी महिन्याच्या खर्चाचे पैसे सुध्धा वडील आईकडेच मागत असत.

वडीलांचे चहा पाणी झाल्यावर मग आम्ही जवळच्या एका बागेत जात असु.

बागेतही आई वडिलांचे बोलणे महिन्याच्या हिशोबा विषयीच असे.

पण त्या दिवशी जवळ पैसे असल्याने त्या बोलण्यात भविष्याची "एक विशेष आशा "डोकावत असे.

मग आम्ही बागेत छानशी भेळ खात असु व घरी परत येत असु .

अशी ही "संस्मरणीय" एक तारीख अजुनही माझ्या मनाच्या कप्प्यात सुरक्षित आहे.

..........आता ते दिवस राहिले नाहीत पगारही आता एक तारखेला होत नाहीत.

शिवाय पगार रोख न मिळता बँकेतील खात्यावर चेकने वेगवेगळया तारखांना जमा होत असतात.

आई,वडील दोघेही "कमावते" असलेले व घरात एक किंवा दोन मुले असेलेने खर्च ही आटोक्यात आहेत .

पगार झाल्यावर लागणारे पैसे लागतील तसे व सवडीनुसारकाढले जातात .

त्यामुळे आजच्या जमान्याला "पेहेली तारीख ".हा प्रकार नाही समजणार.

ती मजा आता नाही !!!..

जीवनाची सगळी गणिते आता पुर्ण पणे बदलली आहेत ..!

त्यामुळे कदाचित हे वाचताना पण त्यातील "गंमत" कळेल का नाही कोण जाणे ?


२) सायकलचे दिवस ...

मध्यंतरी एका हॉटेल च्या जिम मध्ये सायकल दिसली

आणी चालवायचा मोह आवरता आला नाही ..खूप ,मस्त वाटले !!

आणी मग आठवले ते ..सायकल चे दिवस ..!

लहान असताना पहिल्यांदा वडिलांनी सायकल चालवायला सांगितले

मी म्हणाले तुम्ही शिकवा ..

मग त्यांच्याच जेन्ट्स सायकल वर जवळच्या मैदानावर रोज आमचा शिकण्याचा सराव सुरु झाला

तशी मी वडिलांची खूप लाडकी ..साधे मला खरचटले तरी त्यांना वाईट वाटत असे.

पण सायकल शिकवताना मात्र मी सायकल मध्ये पाय घातला

आणी प्याडल मारायला सुरुवात केली की ते हात सोडून देत असत ..

आणी मी धाडकन पडले की त्यांना हसु येत असे

मग मी रागावले मी ते म्हणत ..

“अग पडल्या शिवाय सायकल कशी येईल तुला ..?”

आणी एक लक्षात ठेव सायकल आणी पोहोणे एकदा शिकले की कधी विसरत नाही

मग मात्र सायकल छान चालवता येऊ लागली .

.पण विकत घ्यायची तेव्हा ऐपत नव्हती

त्यामुळे दुकानातून भाड्याने घेवून चालवायचे ..

कॉलेज मध्ये सुद्धा दोन किंवा तीन मुलीकडेच सायकल असे .

त्यांचा आम्हाला खूप हेवा वाटत असे मग त्यांच्या कडून आम्ही चक्कर मारण्या साठी सायकल मागुन घेत असु

त्या काळी वर्गातील एक श्रीमंत मुलगी “लुना घेवून येत असे

ती तर आम्हाला “झाशीची राणी वाटत असे ..!!

एकदा तर आम्ही जवळ जवळ दहा मैत्रिणीनी दुकानातुन भाड्याने सायकली घेवून

स्पोर्टस च्या परीक्षे.. साठी जायचे ठरवले होते

पण वाटेत इतके प्रोब्लेम झाले .

दोघींना सायकली भाड्याने मिळायला वेळ लागला

.त्यात दोघी नवशिक्या होत्या त्या पडल्या ..त्याना लागले थोडे ..

असे करत आम्ही ग्राऊंड वर पोचे पर्यंत परीक्षा संपली .

मग सरांकडून जे काही आम्हाला बोलून घ्यायला लागले ..की बस

त्यानंतर मग बँकेत नोकरी लागली त्यावेळी आमच्या शाखा दोन वेळा

असत सकाळी आणी संध्याकाळी

.घरापासून बँक बरीच दूर असल्याने बसने जाणे पण वेळखावू होवू लागले

मग ठरवले छान लेडीज सायकल घ्यायची

त्यावेळी बँकेत पण सायकल घेण्या साठी कर्ज मिळत असे

पण मी आपले पगारातून च सायकल घ्यायचे ठरवले ..

छान ,,माझ्या आवडत्या लाल रंगाची सुंदर सायकल घेतली !!.

तिला सुंदर लाल सीट कवर घातले ..आता रोज सकाळी तिला चकचकीत पुसून ठेवणे एक आवडीच काम झाले .

त्या वेळी पंजाबी किंवा जीन्स ..अशी फ्याशन नव्हती

आम्ही सर्व मैत्रिणी साडीच नेसत असु.

साडी नेसुन सायकल चालवणे हे सुद्धा एक “दिव्य” च असे !!

पदर वगैरे चांगला बांधुन.साडी वर खोचुन मगच सायकल वर चढावे लागे .

पण तेव्हा त्याचे काहीच वाटत नसे ..कारण स्वतची सायकल असणे हा खूप मोठा आनंद असे

त्यावेळी बँकेची वेळ दोनदा असल्याने माझ्या सायकलवरून बँकेत चार फेऱ्या होत

बँक घरापासून जवळ जवळ पाच किलोमीटर होती .

आणी पुर्ण रस्ता चढ आणी उतार यांचा होता ..

दुपारच्या वेळी घरी आले की जेवुन परत मी आणी माझी मैत्रीण सायकल घेऊन बाहेर पडत असु

आणी डबल सीट बसुन गाव भर हिंडत असु.

निरनिराळ्या मैत्रिणी कडे, नातेवाईका कडे ,सायकल वरून डबल सीट जाण्यात एक निराळीच “धम्माल ..असे ..

घरची माणसे पण म्हणत ,”अग कीती फिरता ग सायकल वरून दमाल ना “..

कारण इतके सायकल वरून फिरणे ..खूप च श्रमाचे होते .

पण आम्हाला त्याचे काहीच वाटत नसे. दमणूक तर अजिबात वाटत नसे !

माझ्या त्या वेळच्या साहेबांना माझ्या सायकलिंग चे खुप कौतुक वाटे .

ते मला म्हणत कीती सायकल चालवता तुम्ही.आणी दमत पण नाही

खरेच “लेडी जेम्स बॉंड.आहात तुम्ही !!!

त्यांच्या या पदवीचे मला फार हसू येत असे ..

जवळ जवळ सहा एक महीने हा माझा दिनक्रम चालु होता .

नंतर मात्र बँकेची परीक्षा द्यावी असे मनात आले.

आणी मग सायकल वरून जाण्यात उगाचच फार शक्ती खर्च होते आहे असे वाटू लागले

..

नुकतीच स्वयंचलित वाहनाची पण तेव्हा लाट येऊ लागली होती .

आणी मग जवळ पैसे पण असल्याने मी सायकल विकून “लुना घेतली

खूप वाईट वाटले होते ती सायकल विकताना..

जणु एखाद्या ..जवळच्या मैत्रिणीला कायमचा निरोप दिला .. ..!


३) युनिफॉर्म ..

सकाळी उठून बाहेर आले आणी बागेत काम करत असताना

स्कूल बस चा होर्न ऐकु आला .

ताबडतोब वरच्या मजल्यावरून शाळेत निघालेली मिहिका पळत आली

बॉब केलेल्या केसात लाल रंगाचा रिबन बो !!

टापटीप इस्त्रीचा ड्रेस

पांढरे मोजे तसेच पायातले पांढरे बुट

पाठीला स्याक त्यात पाण्याची बाटली रंगीत डब्बा ..

“ममा बाय “..असे म्हणून ती बस मध्ये बसली

आणी बस निघाली पण ..

तिच्या सारखेच तीचे अनेक मित्र मैत्रिणी बस मध्ये दंगा करत होते

ते दृश्य पाहून मी मात्र ..सहजच ..भुतकाळात गेले .

लहानपणी युनिफॉर्म म्हणजे नीळा स्कर्ट पांढरा ब्लाऊज

दोन ड्रेस् शिवलेले असत .एक आज घालायचा एक उद्या

वर्गातील बहुतेक मुलींची (तेव्हा मुली शक्यतो मुलीच्या शाळेत घालण्या कडे

पालकांचा कल असे ..मुलामुलींनी एकत्र शिकणे तितकेसे संमत नसे )

तेव्हा ड्रेस बाबत हीच परिस्थिती असे .

आमच्या ड्रेस ला इस्त्री वगैरे नसायची फक्त तो स्वच्छः धुतलेला असे इतकेच काय ते

काही श्रीमंत मुली मात्र इस्त्रीचे कपडे घालत असत

मुलीनी शाळेत दोन वेण्या घालणे अगदी कम्पलसरी असे

आणी त्या वेण्या लाल पिवळ्या अथवा काळ्या रंगाच्या रीबिनिनी वर बांधलेल्या असत

वर्गात केसांचा बॉबकट अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच मुलींचा असे .

तो पण हेडमास्तर बाईना फारसा संमत नसे .

त्यांना सुद्धा रिबीन ही घालावीच लागे .

चांगले चपचपीत तेल लावून आई सकाळीच वेणी घालून देत असे .

ती वेणी इतकी घट्ट असे की .

आम्ही कीती पण धुडगुस घातला तरीही दिवस भर सोडा ..दुसऱ्या दिवशी पर्यंत

त्यातली एक बट पण हलत नसे .

सकाळी आईसमोर वेणी घालत असताना बरीच रडारडी होत असे .

कारण आईचे भराभर केसातला गुंता काढणे आणी करकचून वेणी बांधणे..

वेणी घालताना हललेले आईला बिलकुल आवडत नसे ..लगेच पाठीत धपाटा बसे .

वेणीतून बटा बाहेर येणे हे अगोचर पणाचे लक्षण समजले जात असे .

वेणी घातली की लगेच आंघोळ करून युनिफॉर्म चढवणे .

एकदा घातलेला युनिफॉर्म दुसऱ्या दिवशी धुवायला पडत असे .

शाळेतून आले की कपडे बदल ..असला प्रकार शक्यतो नसे .

युनिफॉर्म व्यतिरिक्त इतर रंगाचे फ्रॉक अथवा परकर पोलके एखाद दोन च असत .

जे फक्त रविवारी संध्याकाळी बाहेर जाताना किंवा इतर कार्यक्रमाला घातले जात असत.

युनिफॉर्म शिवताना इतके मोठे शिवलेले असत ...

की शक्यतो दोन ते तीन वर्षे युनिफॉर्म वापरला गेलाच पाहिजे .

फारच उंची वाढली तर मग स्कर्ट ची दुमडलेली पट्टी उसवायची आणी तो मोठा करायचा .

अशा वेळी उसवलेल्या पट्टीचा रंग नवीन दिसत असे व स्कर्ट जुना दिसे .

पण त्याचे कोणाला काही वाटत नसे कारण जवळ जवळ सर्वच घरात ही परिस्थिती असे .

काही घरातून मोठ्या भावंडांचा युनिफॉर्म धाकट्याला वापरावा लागत असे.

शाळेत जाताना तोंडावर एक पावडरचा पफ फिरवणे

आणी डोळ्यात काजळ घालून ..कपाळाला कुंकू लावणे इतकेच फक्त असे .

शक्यतो सर्व घरात मुलीनी कुंकवाची टिकली लावायला हवी असा दंडक असे .

गळ्यात काही असो अथवा नसो पण हातात मात्र एखादी काचेची बांगडी तरी असेच ..

दप्तर हे एका ठराविक प्रकारचे गोणपाटाच्या कापडाचे शिवलेले असे

एका भागात पुस्तके आणी एका भागात वह्या असत .

डबा दप्तरात ठेवायचा असे.

तेव्हा पुस्तके नेण्यासाठी काही श्रीमंत मुली अल्युमिनुयम ची ब्याग वापरत

त्यांच्या विषयी तेव्हा खुप कुतुहुल वाटे .

शाळेत जाताना ..बुट मोजे ..ही तर . फार लांबची गोष्ट झाली

पायात चप्पल असले तरी पुष्कळ .!!.

बहुतेक वेळा चप्पल तुटलेले अथवा दुरुस्त केलेले पण असायचे .

मी कायम शाळेत अथवा मैत्रिणी कडे चप्पल विसरत असे .

व विसराळूपणा बद्दल आईची बोलणी खात असे .

मात्र चप्पल जर चुकून शाळेत अथवा देवळात हरवले

तर ते सापडणे महाकठीण असायचे ..

आणी मग आई बाबांच्या रागाला बळी पडावे लागायचे .

धांदरट..बावळट वगैरे शेलक्या भाषेत बोलून घ्यावे लागायचे .!!

आणी मग पुढील चप्पल बाबांच्या पुढील पगारात घेण्याचे आश्वासन मिळायचे .

तोपर्यंत अनवाणी चालत जाणे इतकेच ..हाती असायचे .

डबा साधा पोळी भाजीचा असे .इतर कोणतेच प्रकार मैत्रिणींच्या डब्यात पण नसत

पण दुपारच्या सुटीत पोळी भाजी ला “अमृताची “चव असे

बाकी बाटलीतून पाणी बरोबर नेणे हे प्रकार तेव्हा नसत .

पाण्याचे नळ शाळेत असत डबा खाल्ला की जाऊन तेथे पोटभर पाणी प्यायचे आणी खेळायला पळायचे

इतके जरी असायचे तरी परिस्थिती बद्दल कोणतीच खंत मनात नसे.

किंवा आपल्या मैत्रिणीला एखादी गोष्ट मिळाली तर ती आपल्याला पण मिळावी

असा अट्टाहास पण नसे

खूप आनंदी आणी समाधानी दिवस होते ते

आई वडील पण शक्य असतील तितके आणी परिस्थिती असेल तसे लाड करायचे ..

जरी गैर वागले तर त्यांचा धाक असला तरी प्रेम ही तितकेच असे ..!

३) “कवठ “..

बाजारात कवठ पाहिले आणी माझ्या वडिलांची आठवण झाली

माझे वडील .मी काका म्हणायचे त्यांना

त्यांना कवठ खुप आवडत असे !!

हिवाळ्या च्या दिवसात बाजारात कवठ दिसले रें दिसले की काका लगेच ते घेऊन येत

थोड्या मंद केशरी रंगावर असणारे हे फळ थोडे आंबट गोड असते

ते फोडले असता त्यात त्याच्या बिया व गर असतो

मग आई ते फोडायची त्यातला गर काढुन त्यात चवी प्रमाणे मीठ गुळ आणी तिखट घालायची

मग ही कवठाची चटणी नुसती अथवा ..पोळी बरोबर पण मस्त लागत असे

हिवाळा संपे पर्यंत काकांचा हा कवठ प्रकार आणणे एक दोन दिवसाआड चालुच असायचे

आम्ही कधी तासगावला गेलो तरी त्या बाजारात कवठे मस्त मिळतात म्हणुन तेथुन पण कवठे आणत

माझी आई शिक्षिका होती शाळेत जायची कायम सकाळची गडबड असायची

आणी सगळा स्वयपाक आवरून जेवायला बसावे तो वर काका परत बाजारात जाऊन कवठे आणीत

आणी लगेच त्याची चटणी कर अशी फर्माईश असे

आईची तेव्हा फार चीडचीड होत असे पण तरीही चटणी करावीच लागत असे

मगच काकांचा जीव शांत होत असे

त्यांचा स्वभाव तसा चिडका होता मना सारखे लागलीच व्हावे असे त्यांना वाटायचे

आई पण खरेच लौकिक अर्थी “पतिव्रता “होती

वडिलांचा कुठलाच शब्द ती खाली पडु देत नसे कधीही

आणी त्यांच्या रागीट स्वभावा विषयी कधी तिची तक्रार पण नसे !

वडिलांना रोज साग्रसंगीत स्वयपाक व गरम गरम पोळ्या जेवताना लागत

आई पण आपली नोकरी सांभाळून त्यांच्या मर्जी प्रमाणे सारे करीत असे

त्यांना शुगर चा त्रास होता व पथ्य पाणी फारसे न करण्या कडे त्यांचा कल असे

त्या बाबतीत ते कोणाचेच ऐकत नसत व मनाला येइल ते खात

त्यांना गोड पदार्थ खायचा प्रचंड सोस होता

यातच पायाला जखम झाल्याने पायाचे एक बोट काढावे लागले

हळू हळू जखम वाढत गेल्याने व शुगर वाढल्या कारणाने

कालांतराने काकांचा एक पाय काढुन टाकावा लागला

ती घटना खुप दुख्ख्द होती ....

आता पाय नसल्याने काकाना घरातच राहायला लागले

सदासर्वदा गाव भर भटकायची आवड असणाऱ्या माणसाला ही एक मोठीच शिक्षा होती !

दर महिन्याला त्यांची त्यांच्या आईला भेटायला पुण्याला जायची खेप चुकायची नाही

पण आता काहीच शक्य नव्हते

पण मनाने ते खुप खंबीर होते

शिवाय आईची भक्क्कम “साथ “होती त्यांना

त्यामुळे तसे ते मजेत होते ते

अशीच कित्येक वर्षे गेली आणी चालली होती

आणी अचानक एक अनपेक्षित घटना घडली

आईच्या डोळ्याचे ऑपरेशन करायचे ठरले

आईला पण शुगर चा त्रास होताच .,.

तसे सारे व्यवस्थित पार पडले पण घरी येताच शुगर खुप कमी झाल्याचे निमित्त

होवुन तिचा आकस्मिक मृत्यू झाला

आमच्या सर्वांना हा एक मोठाच धक्का बसला ..

आम्हाला वाटले काकांना तर प्रचंड च त्रास होईल

पण कसे काय कोण जाणे काकांनी तो धक्का सहज पचवला .

आता घरची सारी त्यांची सगळी कामे करीत असत

वरवर ते दाखवत नसत .

पण बहुधा प्रिय पत्नीचा विरह त्यांना जाणवत असावा

आणी मग हळूहळू त्यानी या ऐहिक जगातुन एक एक करून निवृती घ्यायला सुरवात केली

दिवसभर भावाच्या लहान मुलीशी चिडवा चिडवी करणारे.. तिच्याशी लुटूपुटू भांडणारे

आता तिच्याशी फार खेळेना झाले ..ती खेळायला आली की झोपु लागले

टीवी पाहायला बाहेरच्या खोलीत जाणे बंद केले

रोजचा पेपर आणी रेडिओ च्या बातम्या म्हणजे त्यांचा वीक पोईंट असे

पण आता रोजचा पेपर ते वाचायला मागेनात

रेडिओ लाऊन ठेवुन झोपु लागले

बातम्यात काहीच इंटरेस्ट घेईनात ..

घरी कोणी आले तर एके काळी भरपुर गप्पा करणारें ते ..

आता खोलीतुन बोलावले तरी बाहेर येईनात ..

फक्त जेवण करण्या पुरते च खोली बाहेर पडु लागले

बाह्य जगाशी पुर्ण संपर्क त्यांनी तोडून टाकला

दिवसातला सारा वेळ ते त्यांच्या खोलीत झोपुन असत ..

कोणी आत येऊन त्यांच्याशी बोलायला लागले तरी काहीच प्रतिसाद देईनात

आणी अशातच . त्याना “अल्जायमर”.ने गाठले

आता त्यांना काहीच आठवेना झाले

आपण कोण आहोत काय करतो आहेत कोण काय सांगते आहे

हे सारे त्यांना काहीच समजेना झाले

भूतकाळ तर विसरलाच पण वर्तमानातले पण त्यांना काहीच समजेना झाले

रोज नेमाने औषधे घेणारे ते ..आता गोळ्या तिथल्या तिथेच पडु लागल्या

भाऊ आणी वहिनीचे आता त्यांना वेळेवर गोळ्या देणे

आणी जेवायला बोलावणे हे काम वाढले ..

हळूहळू आपण जेवलो आहे का नाही याचेही त्यांना विस्मरण होऊ लागले .

जेऊन हात धुऊन बाहेर आले की ते परत डायनिंग टेबला वर येऊन बसत

आणी जेवायला वाढ असे म्हणत ..

किंवा जेवायला या असे बोलावले की मी आत्ताच जेवलो असे म्हणंत .

जेवताना पण आजकाल त्यांच्या तोंडात घास नीट जाईना

अर्धे अन्न बाहेर अर्धे अन्न आत असे कसे तरी जेवण होत असे .

हळू हळू माणसे पण ओळखेना झाले ते

भाऊ वहिनी म्हणजे कुणीतरी आहेत जे आपली काळजी घेत आहेत इतकेच कळत असावे त्यांना

त्यातही गंमत म्हणजे ते भाऊ वहिनी किंवा छोटीला ओळखत नव्हते

पण माझी त्यांना फार आठवण येत होती म्हणे

मी त्यांची खुपच “लाडकी “होते ..त्यामुळे असेल कदाचित .

“माझ्या ताईला कुणीतरी बोलावणे पाठवा तीला भेटायचे आहे मला

असे सारखे म्हणू लागले ..

मध्यंतरी काही घरगुती कामासाठी मला माझ्या सासरच्या गावी जावे लागले होते

जवळ जवळ महिना भर मी गावात नव्हतेच .

त्यामुळे त्यांची गाठच पडली नव्हती .फक्त फोन वर त्यांची खुशाली विचारत होते मी

मग एक दिवस मलाच भावाचा मला फोन आला

“ताई काकांची तब्येत अगदीच खराब आहे भेटून जा “

मग मात्र मी भावाकडे ताबडतोब निघाले .

त्यांना आवडते म्हणुन कवठाची चटणी करून घेतली

भावाच्या घरी पोचल्या वर वहिनी म्हणली

बघा हो ताई फक्त तुमचेच नाव घेत आहेत ..कधी एकदा तुम्ही याल असे झाले आहे त्यांना

तुम्हालाच फक्त ओळखतील असे वाट्ते

मी आत गेले त्यांच्या खोली ते कॉट वर बसले होते .

तब्येत पार बिघडली होती अगदी हाडे बाहेर आली होती .

पाहवत नव्हते त्यांच्याकडे ,,

नेहेमी अगदी व्यवस्थित राहणाऱ्या माणसाची ही ..हालत .!

कसे काय कोण जाणे पण .हसले मला पाहून .ते

मी म्हणाले “काका माझी आठवण काढत होता ना .?

आले बघा भेटायला तुम्हाला .

त्यांचे लक्ष माझ्या हातातल्या डब्याकडे गेले

मग मीच म्हणाले ..हे बघा तुम्हाला आवडते म्हणुन कवठाची चटणी आणलीये

डबा उघडून त्यांना चमचा घालून दिला

त्यांना खायची इच्छा असावी बहुधा पण खाता येत नव्हते .

मी चमच्याने त्यांना भरवु लागले

अर्धे तोंडात अर्धे अंगावर असे कसे तरी खात होते ते ..

मला तर त्यांची ही अवस्था पाहवेना झाली .

थोडे खाल्या वर नको असे खुण केली त्यांनी

मग मी रुमालाने तोंड पुसून घेतले त्यांचे आणी पाणी दिले प्यायला

मला बरे वाटले त्यांनी मला ओळखून माझ्या हातून चार घास तरी खाल्ले

पण माझा आनंद दोन मिनिटे पण टिकला नाही

कारण ते माझ्या कडे पाहत म्हणाले

कोण आहे हो तुम्ही ?..आमच्या ताईला ओळखता का .?

मी बोलावले आहे म्हणुन सांगा तीला ..आठवण येतीय तिची मला

माझ्या काळजात “चर्र “झाले

म्हणजे मला ही ते ओळखत नव्हते तर ..! ! !

ती त्यांची माझे शेवटची भेट होती ..


४) पत्रलेखन ...

मध्यंतरी माझ्या एका मित्राने पत्र लेखनाचा विषय काढला

आणी मला चक्क भुतकाळात घेऊन गेला ..!

पत्रलेखन ही खरच एक अद्भूत कला आहे

माझ्या तरुणपणी ,, मोबाईल इंटरनेट सारखी कोणतीच संपर्काची साधने

नसल्याने .फक्त पत्रेच होती माणसामधील दुवा ..!

नेहेमीची खुशाली .इतर काही कामाचा मजकूर. आणी अगदी प्रेम व्यक्त करायला पण पत्रच वापरले जात असे .

त्यावेळेस साधा मजकुर लिहिण्या साठी साधे पोस्ट कार्ड ज्यातील मजकुर कोणालाही दिसत असे .

व काही खाजगी लिहायचे असेल तर “अंतर्देशीय पत्र “ वापरत असत

ज्याचा रंग नीळा असे व जे पुर्ण पणे बंद करता येत असे

शिवाय त्याकाळी जी “प्रेमपत्रे “लिहिली जात त्यासाठी खास “गुलाबी “कागद मिळत असे

व तो ही गुलाबी पाकिटातून पाठवला जात असे !

अशी गुलाबी पत्रे घरच्या अथवा इतर कुणाच्या हाती पडू नयेत याची विशेष काळजी घ्यावी लागत असे .

पोस्टमन कडून पत्रांचे वाटप केले जात असे

त्यामुळे पोस्टमन आपल्या कडे कधी येतो आणी त्याने काय पत्रे आणली असतील याची उत्सुकता असे .

त्याकाळी फेसबुक वगैरे नसल्याने पत्र मैत्रीला खूप महत्व होते

अगदी कॉलेज जीवनापासून मला काही मित्र व मैत्रिणी होत्या

आम्ही दर आठवड्याला एकमेकांना पत्रे लिहीत असु ..

तेव्हा आम्ही एकमेकाना पेन फ्रेंड म्हणत असु.

माझे अक्षर खूप सुंदर होते (अजुन पण आहे )..

व माझी मराठी भाषा पण चांगली असल्याने .

.पत्रात ..कविता गाणी सुभाषिते म्हणी यांची “लयलूट “ असायची.

माझे पत्र वाचताना जणु मी स्वताच बोलत आहे असे मित्र मैत्रिणींना वाटत असे .

.ती पत्रे म्हणजे सर्वांसाठी “खजिना “ असायचा ..!!

माझ्या पत्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे ..नेहेमी पत्राची सुरवात “श्री “..अशी लोक करीत असत ..

पण माझ्या पत्रात कायम सुरवातीला “EVERGREEN “..असे मी लिहीत असे ,..

मला आठवते आहे माझी एक पत्र मैत्रीण नांदेड ला होती

तीचे लग्न ठरले तेव्हा तिने मला आमंत्रण केले होते

माझ्या वडिलांनी तेव्हा सुद्धा .कमी दळणवळणाची साधने असुन ,

माझे वय पण लहान असुन, मला एकटीला ..तिकडे आठ दिवस पाठवले होते ...

नुसत्या पत्र मैत्रीवर एखाद्या सोळा सतरा वर्षाच्या मुलीने कोल्हापूर पासून नांदेडला यायचे

ही त्या काळी खुप अपूर्वाईची गोष्ट होती .मैत्रिणीच्या घरचे लोक पण चकित झाले होते .

येता येता मी औरंगाबाद ला पण काका कडे पण एकटी जावून आले होते !

इतक्या लांब मी प्रवास करून एकटी आले ह्याचे काकाला व त्याच्या शेजारच्या लोकांना पण नवल वाटले होते!

.......................जेव्हा मला पहिली नोकरी टेलिफोन खात्यात लागली

तेव्हा मला तीन महिने नाशिक सेंटर वर ट्रेनिंग होते

मी आणी माझ्या दोन मैत्रिणी तेथे गेलो होतो

वीस एकवीस वयाच्या आम्ही मैत्रिणी प्रथमच नोकरी साठी बाहेर पडत होतो त्यामुळे

घरच्या लोकांना आमची काळजी खुप वाटत होती

तेव्हा वडीलांचा आणी माझा अगदी ..दोन तीन दिवसाआड पत्र व्यवहार चालत असे

मी माझ्या पत्रातून माझ्या अडचणी सांगत असे ..!

तर ते त्यांच्या पत्रातून कसे वागावे ..पैसे कसे जपून खर्च करावे हा उपदेश करीत असत ..!

आताही ती पत्रे वाचताना तो काळ जणु काही मी परत जगते .

माझ्या काही मैत्रीणींची..लग्ने कॉलेज संपले की लगेच झाली .

त्या सासरी गेल्यावर माझी पत्रे हा त्यांच्यासाठी विरंगुळा असायचा !!

आणी घरची बातमी पण अगदी सविस्तर समजायची ..

त्या म्हणत तुझी पत्रे म्हणजे ..जसे काही तुला प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव देतात .

माझे लग्न ठरले तेव्हा मला कोल्हापुरातले स्थळ मिळाले .

तसे आम्ही लग्ना पुर्वी रोजच भेटत असु

पण तरीही प्रेम पत्रांची मजा काही औरच ना !!

ही मजा घेण्या साठी आम्ही गावातल्या गावात एकमेकाना पत्रे लिहिली होती

आणी प्रेमपत्रांचा “रोमांस “अनुभवला होता .

माझी जिवलग मैत्रीण नोकरीसाठी प्रथम ....मुंबईला गेली ..

तेव्हा रडता रडता ..ती एकच म्हणाली

“..तु मला पत्रे लिहिलीस तरच मी जगेन !!”.

यातली अतिशयोक्ती जरी सोडली तरी ती त्या वेळची .तिची

गरज होती हे नक्की ..

माझ्या सर्व मैत्रीणी कडे ..अजूनही माझी पत्रे आहेत !!

(भलेही ती जीर्ण झाली असोत ...)!!

आता असे वाट्ते ..जावे त्यांच्या कडे आणी ती पत्रे मागून आणावीत

आणी परत सारी ..वाचून ..त्या काळातला आनंद घ्यावा !!

५) गुळांबा....

नुसते नाव जरी घेतले तरी तोंडाला पाणी सुटत ..

लहानपणी मी फार गोडखाऊ होते ,बटाटा ,भेंडी ,अशा एक दोन आवडीच्या भाज्या सोडता

इतर कोणत्याच भाजीला मी हात लावत नसे ..

मग तूप गुळ,तूप साखर ,गुळांबा साखर अंबा ,यांच्या बोली वरच मी जेवत असे .

एक पाउस पडला की गुळांबा अथवा मुरांबा करण्या साठी बाजारात कैर्या येऊ लागतात.

मग घरोघरी वर्षभराची “बेगमी “म्हणुन लोणची ,मुरांबे घातले जातात .जेणे करून पुढील

उन्हाळ्या पर्यंत ची काळजी मिटेल .

माझी आजी व काका काकू सर्व पुण्यात असत

गुळांबा करणे ही खास आजीच्या अखत्यारीतील बाब असे .

फक्त तिचीच त्यामध्ये मक्तेदारी असे .या तयारी साठी प्रथम आजी घरच्या एखाद्या सुनेला घेवून

बाजार करण्या साठी बाहेर पडत असे .मग बाजारात तिच्या ठरलेल्या माणसाकडून कैर्या

घेतल्या जात .चांगल्या हिरव्या दडदडीत मोठ्या कैर्या घेतल्या वर त्या घासाघीस करून आजी त्या

नेहेमीच्या माणसाला पैसे देत असे .

घरी आल्यावर एका मोठ्या पितळी पातेल्याय थोडे मीठ घालून या कैर्या भिजत घातल्या जात .

जेणे करून कैर्याचा चिक निघून जाऊन त्या स्वच्छ होत असत .

तसा गुळांबा करायचा कार्यक्रम दुपारी ठरलेला असे .

जेवणे झाली सगळ्या पुरुष माणसांची घरातून माजघरात अथवा वरच्या खोलीत रवानगी झाली

की मग आजी एक मोठे पातेले घेऊन त्यात गुळाचे खडे व थोडे पाणी घेऊन पाक करायला सुरु करीत

असे. मग तिच्या सुना पैकी एकजण त्या कैर्या स्वच्छ फडक्याने पुसून देत असे आणि दुसर्या दोघी जणी दोन वेळ्या घेऊन

कैरीच्या आधी साली काढून मग त्याचे छोटे छोटे पातळ काप करायला सुरवात करीत असत .

ही गुळांबा पाक कृती चालु असताना स्वयपाक घरात मोलकरीण अथवा इतर कुणालाच एन्ट्री नसे .

अगदी आम्हा मुलाना पण येऊ दिले जात नसे.

असे कोणीतरी आले की पदार्थाला “दृष्ट “लागते असे आजीचे ठाम मत असे .!!!

आता इकडे गुळाचा पाक तयार होऊ लागे आणि सगळीकडे पाकाचा घमघमाट सुटत असे .

आम्ही मुले स्वयपाक घराच्या बाहेर अगदी अस्वस्थ होत असू .

पाक चांगला दोनतारी झाला की आजी एका वाटीत पाणी घेवून त्यात दोन थेंब टाकत असे .

त्याची चांगली घट्ट कडक गोळी झाली की मग त्या कैरीच्या पातळ फोडी ती हळू हळू

पातेल्यात सोडत असे ,

आता पाक पातळ होऊ लागे

मग काही वेळ असेच उकळत ठेवल्या वर त्यातील एखादी फोड हलकेच बाहेर काढून आजी

बोटाने दाबून पाहत असे ..एव्हाना पाक पण घट्ट झालेला असे

फोड शिजलेली असेल तर आणखी पाच मिनिटात फडक्याच्या सहाय्याने ती पातेले खाली उतरवून ठेवत असे .

त्यात वेलदोडा जायफळ पूड मिक्स करून हलक्या हाताने तो हलवला जात असे

आता हे मोठे पातेले थंड करायला वर कट्ट्यावर ठेवले जात असे .

तोपर्यंत आजीच्या सुना घरातला सर्व पसारा आवरून ठेवत असत

आणि मग आम्हा मुलाना स्वयपाक घरात एन्ट्री मिळे.

एव्हाना आमची दुपार ची भुकेची वेळ झालेली असे

त्या काळी दुपारच्या भुकेला ही मुलाना पोळी च दिली जात असे

आम्ही पटापट आमच्या ताटल्या वाट्या घेवून गोलाकार बसत असू

आणि हा कोमट, ताजा ,चविष्ट गुळांबा आम्हाला वाटीत मिळत असे .

आंबट गोड असा गुळांबा खाताना अक्षरशःदेहभान हरपत असे ..

आणि आम्ही सर्व तृप्त होवून परत खेळायला जात असू ..

आता हां गुळांबा स्वच्छ केलेल्या चीनी मातीच्या बरणीत भरून ठेवला जात असे

बरणीला पातळ पांढर्या फडक्याचा दादरा बांधून बरणी आत फडताळात ठेवली जात असे .

यानंतर वर्षभर अनेक वेळा ही बरणी काढली जात असे ..

तोंडाला चव नसणे ,भाजी आवडीची नसणे ,अकस्मात कोणी पाहुणा येणे अशी त्याची कारणे असत .

लहानपणी मी घरी एकुलती एक होते त्यामुळे घरी मला खेळायला भावंड नव्हते

इतर सर्व नातेवाईक व माझी चुलत मावस भावंडे पुण्यात होती .

माझी वार्षिक परीक्षा संपत आली की माझ्या मोठ्या काकांचे कोल्हापुरला पोस्ट कार्ड येत असे

“जयुची परीक्षा झाली असेल तर तिला सुट्टीसाठी पुण्यात पाठवून द्यावे .

मागील वर्षीचा गुळांबा संपवायचा आहे .आजी वाट पहात आहे “

असा मजकूर त्यात असे ..

मग माझी रवानगी पुण्यात होत असे ,आणि जुना गुळांबा संपवुन नवीन गुळांबा आजीने घातल्यावरच

अस्मादिकांची स्वारी कोल्हापुरला परत येत असे ..

तेव्हाच पुढील वर्षीच्या शाळेची सुरवात होणार असे

सोबत नवीन गुळांबा बरणीत भरून आजीने दिलेला असेच ..

माझ्या लग्ना नंतर काही वर्षाने आजीचे निधन झाले ..

माझ्या मुलाला पण गुळांबा आवडत असे ..मी त्याच्या साठी करीत असे ,पण आजीची खास

चव त्याला नसे .

काही वर्षानंतर माझ्या एका मैत्रिणीने मला हापूस आंब्याचा साखर अंबा शिकवला होता .

हापूस च्या फोडी वाफवून त्यात केशर आणि साखर घालून मी करीत असे ,हा साखर अंबा तीन चार महिने

बरा टिकत असे .मात्र त्यावर हक्क फक्त आणि फक्त माझ्या मुलाचा असे ..!

६) भुई कमळ

एकदा माझ्या एका मित्रा च्या बागेत या फुलाचा ताटवा दिसला

ती सुंदर फुले आणी वास पाहून ..नाव विचारले तर “भूईकमळ म्हणाला ..

बरेच वर्षे आमची मैत्री होती

पण नोकरी निमित्ताने खूप दूर जाण्याची पाळी आली त्याच्यावर

मग त्याच्या बागेतले हे ..गड्डे तो मला देवून गेला

त्याची आठवण म्हणून ..

मला पण ही फुले खूप आवडत असत

उन्हाळ्याच्या दिवसात अचानक एक हजार फुले फुलल्या सारखे त्यांचे आगमन होत असे

आधी छोटी छोटी फळे ..मग ती थोडी कडक होत असत ..

आणी मग त्यातून कळ्या बाहेर पडत ..

आणी मग अचानक एके दिवशी सुंदर वासाचा हा गुछ्..बाहेर पडे

खूप मोहक वास ..पांढरा शुभ्र ..आकर्षक रंग

आणी एकंदरच हिरव्या मोठ्या मोठ्या आणी गोल आकाराच्या पानाच्या आडोशातून डोकावणारी ही फुले

पाहणाऱ्या माणसाला अगदी मोहून टाकत!!

आमच्या कडे येणारा प्रत्येक जण आवर्जून या फुलाची चौकशी करे

ह्याचा बहर ..पण बरेच , दिवस राहत असे

पहिल्या वर्षी त्याला फुले आली तेव्हा मला खूप बरे वाटले

मित्राची आठवण प्रकर्षाने आली ..

“नंतर मात्र काय झाले कोण जाणे

त्या छोट्या झुडपाचे आस्तित्व च संपले

आणी अचानक ते सारे वैभव नाहीसे झाले

मला मनातून खूप वाईट .. वाटले

त्या झुडपाच्या जवळच मी नुकतेच

कमळाच्या फुलासाठी तळे बांधायला काढले होते

कामगार पण काम करीत होते

मला वाटले त्यांनीच काही धसमुसळेपणा केला असेल आणी त्यामुळे हे झुडूप मेले

त्या कामगार मुलावर पण मी खूप ओरडले

पण ओरडून थोडेच ..ते झुडुप परत येणार होते ...

मनात आले मित्राने आठवण म्हणून पाठवले ..पण झाड गेले

तर आठवण थोडीच जाणार आहे ?

असेच मग काही दिवस गेले

बागेतल्या इतर सर्व फुलांच्या नादात मी या फुलांना विसरून गेले

आणी मग अचानक पुन्हा उन्हाळ्या ची चाहूल लागली ..

उष्ण वारे वाहू लागले

जमीन नुसती उन्हाने तावून निघाली

या वेळी उन्हाळा थोडा जास्त आहे की काय असेही भासू लागले

आणी मग ..अचानक लक्षात आले बागेतल्या तळ्या जवळ जमिनीला मोठ्या भेगा पडल्यात

घुस वगैरें लागली की काय ..असे वाटले ..

रात्री जोरदार वळवाचा ..पाऊस पण पडला .

आणी दुसऱ्या दिवशी सकाळी पाहते तो काय

चक्क जमिनीतून तोच जुना कंद बाहेर पडत होता

दोन तीन दिवसात पुन्हा आहे तसे रुप त्या कन्दाने धारण केले

आणी आठ एक दिवसात त्याची मोठी मोठी हिरवी पाने पण तयार झाली

ही वाढ इतकी वेगाने होत होती की

पंधरा दिवसात कळीचे फुल होवून ..

पुन्हा हिरव्या मोठ्या मोठ्या पानांच्या साथीने भूईकमळ ..बाहेर पडले सुध्धा

आणी त्या सुंदर मोहक मंद वासात आसमंत ..डुंबून गेला

आणी मग असेच दर वर्षी उन्हाळ्यात ठरल्या सारखेच

या फुलांचे आगमन माझ्या कडे होत असते

जणु काही उन्हाळी पाहुणाच ..

हा पाहुणा मात्र याच्या रुपाने आणी वासाने आमच्या उन्हाळ्याची

शीतलता वाढवत असतो ..

खूप ऋणी आहे मी त्या निसर्गाची ..ज्याने माझ्या बागेत भरभरून सारे दिले आहे

आणी ऋणी आहे मी माझ्या बागेची ..

जिच्या मुळे आमच्या जीवनाला “अर्थ ..प्राप्त झाला आहे !!!

७) गीतरामायण ,,

एक महान खंडकाव्य म्हणुन गीतरामायण ओळखले जाते

गदिमा चे काव्य आणी सुधीर फडके यांचे संगीत आणी गायन .केवळ “अप्रतिम “

सध्या याचे हीरक महोत्सवी वर्ष चालु आहे

रामाच्या संपूर्ण आयुष्यावर आधारोत हे काव्य बावन त्रेपन गाण्यात गुंफले गेले आहे .या प्रत्येक गीताची जवळ जवळ बारा तेरा कडवी आहेत

ज्यातून रामाचा जीवन प्रवास उलगडला जातो

असे म्हणतात की गदिमांना रोज एक गाणे सुचत होते

आणी अशा तऱ्हेने बावन दिवसात हे काव्य त्यांनी लिहून पुर्ण केले

या गोष्टीतला खऱ्या खोट्याचा भाग जरी वगळला तरी

एखादे गीत आणी त्याची तेरा चौदा कडवी संपूर्ण भावनात्मक रित्या मांडणे

खुप कठीण काम आहे ..

असे म्हणतात जेव्हा राम जन्माचे गाणे लिहायचे होते तेव्हा गदिमा दिवसभर अंगणात बसुन होते पण काही केल्या त्यांना रामजन्माचे गीत सुचेना

संध्याकाळ झाली तेच तुळशी वृंदावना जवळ दिवा ठेवुन त्यांची बायको निघून गेली

अखेर रात्र पडू लागली तेव्हा त्यांच्या बायकोने विचारले की

काय सुचतेय की नाही रामजन्माचे गीत

तेव्हा माडगुळकर उत्तरले

अग तो सामान्य माणसाचा जन्म नाही

साक्षात ,,”रामजन्म “आहे त्यामुळे इतका वेळ लागला

घरी माझा धाकटा काका छान गाणे म्हणत असे

त्याच्या आवडीची होती गीत रामायणाची गाणी .पुस्तक पण होते त्याच्याकडे

त्यातील सर्व गाणी त्याला मुखोद्गत होती

आणी खुप आवडीने आणी समरस होवून तो ती गाणी गात असे

घरात कोणताही छोटा मोठा प्रसंग असो काकाला गीत रामायण म्हणायचा आग्रह

जरूर होत असे ..तेव्हा पासुन च ही गाणी मनात ठसली होती

राम पहिल्या पासुन एक अत्यंत आवडता देव होता याचे मुख्य कारण म्हणजे

माझ्या आजोळी बावधन तालुका वाई जिल्हा सातारा इथे आमचे स्वतचे एक

सुंदर राममंदिर होते माझी आजी रामाची निस्सीम भक्त होती

रोज दुपारी तीन वाजता ती जवळपासच्या बायका ना जमवून रामाची पोथी वाचत असे .

त्या काळी बायका खुप अशिक्षित होत्या त्यात बावधन हे आडवळणी खेडेगाव

त्यामुळे आजीचे पोथी वाचन तिथे फार महत्वाचे ठरत असे !!

रामायणाच्या अनुषंगाने इतर ही काही उपदेश आजी करीत असे

आजीची रामभक्ती इतकी होती की अष्टौप्रहर तिच्या तोंडी रामनाम असे

अगदी आम्हाला नातवंडाना हाक मारताना पण आधी रामाचे नाव मगच आमचे ..नाव बोलावत असे

एकत्र जमले की बाकीच्या पण गप्पा चालत

एक प्रकारचे गेट टुगेदर च म्हणा ना

त्या वेळी पोथी वाचणारी माझी आजी मला खुप “ग्रेट “वाटायची

रोज तीन वाजता हा कार्यक्रम असे त्याची तयारी म्हणजे झाडून काढणे सतरंज्या घालणे .

.पोथीचे टेबल लावुन त्यावर आतील पोथी आणून ठेवणे

आजीला बसायला बस्कर घालणे

बायका साठी तांब्या भांडे पाण्याने भरून ठेवणे

आणी अगदी वेळेवर आजीला बाहेर बोलावणे ही कामे करण्यात खुप धन्य वाटे !!

दरवर्षी रामनवमी साजरी करायला आम्ही बावधन ला जात असू

संपूर्ण गावात ते एकच देऊळ होते त्यामुळे आजूबाजूच्या सर्व पंचक्रोशीतील

सर्व लोक राम नवमी व प्रसादाला येत असत

यानंतर माझे लग्न ठरले आणी माझ्या भावी पती बरोबर

मी मुंबईला माझ्या मोठ्या दिरांच्या घरी गेले .पती आणी घरचे सारे लोक नवीन

त्यातच मला तिथेच त्यांना पहिल्यांदा दाखवायला नेले होते

मनात एक धाकधूक होती कशा असतील जाऊबाई

कशी असतील ही सारी माणसे .?

घेतील न सामावून आपल्याला ..वगैरे

पण घरी गेल्या गेल्या जाऊ बाईनी मला देवघरात नेऊन कुंकू लावले

देवघरात पाहते तो काय ....तोच माझा ओळखीचा “राम “सीता आणी लक्ष्मणा सोबत माझ्याकडे पाहत हसत होता

खुप छान वाटले तेव्हा ,,अगदी आधार मिळाल्या सारखा ..!!

त्यानंतर मग जेव्हा मुलाचा जन्म झाला तेव्हा पहिले काही महिने आईकडे मुक्काम होता माझा

त्या छोट्या पिलूला वाढवताना फार आनंद होत होता

एक महिना पार पडला आणी बाळ चांगले हुंकार देऊ लागले

हसु लागले..माणसे ओळखु लागले

रोज त्याला पाहायला कोणी ना कोणी घरी येऊ लागले

मग आईने मला सांगितले रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावायचा

बाळाला मांडीवर घेऊन रामरक्षा म्हणायची

आणी मग बाळाला देवाचा अंगारा लावायचा म्हणजे बाळाचे राम रक्षण करतो

लहानपणा पासुन संध्याकाळी देवाजवळ स्तोत्रे म्हणत असल्याने रामरक्षा येत होती

आता बाळासाठी म्हणायची असल्याने आणखी जवळची वाटु लागली

कधी संध्याकाळी बाळ रडू लागले तर आई म्हणायची

बघ आज रामरक्षा म्हणली नाहीस ना ?..रडायला लागला तो

बाळाला दृष्ट झाली असे वाटले तरी आईचा रामबाण उपाय “रामरक्षा “..होता

सासरी तर गोंदवलेकर महाराज घराण्याचे गुरु असल्याने

रामावर भक्ती होतीच

त्यात एकदा माझ्या पतींनी रामनाम जप करायचे मनावर घेतले

त्यांचा दवाखाना होता पण पेशंट पाहता पाहता जप करायचे त्यांनी ठरवले

मग श्रीराम जयराम जय जय राम हा त्रयोदश अक्षरी जप निवडला

आणी कोऱ्या कागदावर जमेल तसे लिहायला सुरवात केली

साधारण एक वर्ष भरात हा जप एक लाख एक हजार पुर्ण झाला

मला पण खुप कौतुक वाटले कारण काम करता कर्ता असा जप थोडे कठीण काम होते ना

मग आम्हीच एका रामनवमी ला त्या जपाच्या वहीची पुजा केली आणी देवघरात ठेवुन दिली

काही दिवसांनी सहज एका मैत्रिणीला बोलता बोलता हे सांगितले

तेव्हा ती म्हणाली अग शिवथरघळ ला रामदास रामाचे मंदिर बांधत आहेत

मी जाणार आहे तिकडे ..त्याचा मुहूर्त कार्यक्रमाला

तुझे जप देणार असलीस तर दे त्याच्या पायात घालायला ..

आम्ही पण विचार केला ठीक आहे रामदास स्वामी रामाचे निस्सीम भक्त होते

कदाचित या जपाची योग्य जागा तीच असावी

अशा रीतीने हा जप रामाच्या पाया पाशी गेला

आणि जपाचे सार्थक झाले ...

इतर रसदार पर्याय