Aathvanichya gavat - 2 books and stories free download online pdf in Marathi

आठवणींच्या गावात भाग - २

“सायकल चे दिवस ...

मध्यंतरी एका हॉटेल च्या जिम मध्ये सायकल दिसली
आणी चालवायचा मोह आवरता आला नाही ..खूप ,मस्त वाटले !!
आणी मग आठवले ते ..सायकल चे दिवस ..!
लहान असताना पहिल्यांदा वडिलांनी सायकल चालवायला सांगितले
मी म्हणाले तुम्ही शिकवा ..
मग त्यांच्याच जेन्ट्स सायकल वर जवळच्या मैदानावर रोज आमचा शिकण्याचा सराव सुरु झाला
तशी मी वडिलांची खूप लाडकी ..साधे मला खरचटले तरी त्यांना वाईट वाटत असे.
पण सायकल शिकवताना मात्र मी सायकल मध्ये पाय घातला
आणी प्याडल मारायला सुरुवात केली की ते हात सोडून देत असत ..
आणी मी धाडकन पडले की त्यांना हसु येत असे
मग मी रागावले मी ते म्हणत ..
“अग पडल्या शिवाय सायकल कशी येईल तुला ..?”
आणी एक लक्षात ठेव सायकल आणी पोहोणे एकदा शिकले की कधी विसरत नाही
मग मात्र सायकल छान चालवता येऊ लागली .
.पण विकत घ्यायची तेव्हा ऐपत नव्हती
त्यामुळे दुकानातून भाड्याने घेवून चालवायचे ..
कॉलेज मध्ये सुद्धा दोन किंवा तीन मुलीकडेच सायकल असे .
त्यांचा आम्हाला खूप हेवा वाटत असे मग त्यांच्या कडून आम्ही चक्कर मारण्या साठी सायकल मागुन घेत असु
त्या काळी वर्गातील एक श्रीमंत मुलगी “लुना घेवून येत असे
ती तर आम्हाला “झाशीची राणी वाटत असे ..!!
एकदा तर आम्ही जवळ जवळ दहा मैत्रिणीनी दुकानातुन भाड्याने सायकली घेवून
स्पोर्टस च्या परीक्षेसाठी जायचे ठरवले होते
पण वाटेत इतके प्रोब्लेम झाले .
दोघींना सायकली भाड्याने मिळायला वेळ लागला
.त्यात दोघी नवशिक्या होत्या त्या पडल्या ..त्याना लागले थोडे ..
असे करत आम्ही ग्राऊंड वर पोचे पर्यंत परीक्षा संपली .
मग सरांकडून जे काही आम्हाला बोलून घ्यायला लागले ..की बस
त्यानंतर मग बँकेत नोकरी लागली त्यावेळी आमच्या शाखा दोन वेळा
असत सकाळी आणी संध्याकाळी
.घरापासून बँक बरीच दूर असल्याने बसने जाणे पण वेळखावू होवू लागले

मग ठरवले छान लेडीज सायकल घ्यायची
त्यावेळी बँकेत सायकल घेण्यासाठी कर्ज मिळत असे
पण मी आपले पगारातून च सायकल घ्यायचे ठरवले ..
छान ,,माझ्या आवडत्या लाल रंगाची सुंदर सायकल घेतली मी !!.
तिला सुंदर लाल सीट कवर घातले ..
आता रोज सकाळी तिला चकचकीत पुसून ठेवणे एक आवडीच काम झाले .
त्या वेळी पंजाबी किंवा जीन्स ..अशी फ्याशन नव्हती
आम्ही सर्व मैत्रिणी साडीच नेसत असु.
साडी नेसुन सायकल चालवणे हे सुद्धा एक “दिव्य” च असे !!
पदर वगैरे चांगला बांधुन.साडी वर खोचुन मगच सायकल वर चढावे लागे .
पण तेव्हा त्याचे काहीच वाटत नसे .
.कारण स्वतची सायकल असणे हा खूप मोठा आनंद असे
त्यावेळी बँकेची कामकाज वेळ सकाळ संध्याकाळ असल्याने माझ्या सायकलवरून बँकेत चार फेऱ्या होत
बँक घरापासून जवळ जवळ पाच किलोमीटर होती .
आणी पुर्ण रस्ता चढ आणी उतार यांचा होता ..
दुपारच्या वेळी घरी आले की जेवुन परत मी आणी माझी मैत्रीण सायकल घेऊन बाहेर पडत असु
आणी डबल सीट बसुन गाव भर हिंडत असु.
निरनिराळ्या मैत्रिणी कडे, नातेवाईका कडे ,सायकल वरून डबल सीट जाण्यात एक निराळीच “धम्माल ..असे ..

घरची माणसे पण म्हणत ,”अग कीती फिरता ग सायकल वरून दमाल ना “..
कारण इतके सायकल वरून फिरणे ..खूप च श्रमाचे होते .
पण आम्हाला त्याचे काहीच वाटत नसे.
दमणूक तर अजिबात वाटत नसे !
माझ्या त्या वेळच्या साहेबांना माझ्या सायकलिंग चे खुप कौतुक वाटे .
ते मला म्हणत कीती सायकल चालवता तुम्ही.आणी दमत पण नाही
खरेच “लेडी जेम्स बॉंड.आहात तुम्ही !!!
त्यांच्या या पदवीचे मला फार हसू येत असे ..
जवळ जवळ सहा एक महीने हा माझा दिनक्रम चालु होता .
नंतर मात्र बँकेची प्रमोशन परीक्षा द्यावी असे मनात आले.

आणी मग सायकल वरून जाण्यात उगाचच फार शक्ती खर्च होते आहे असे वाटू लागले
..
नुकतीच स्वयंचलित वाहनाची पण तेव्हा लाट येऊ लागली होती .
आणी मग जवळ पैसे पण असल्याने मी सायकल विकून “लुना घेतली
खूप वाईट वाटले होते ती सायकल विकताना..
जणु एखाद्या ..जवळच्या मैत्रिणीला कायमचा निरोप दिला .. ..!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पत्रलेखन ...

मध्यंतरी माझ्या एका मित्राने पत्र लेखनाचा विषय काढला
आणी मला चक्क भुतकाळात घेऊन गेला ..!
पत्रलेखन ही खरच एक अद्भूत कला आहे
माझ्या तरुणपणी ,, मोबाईल इंटरनेट सारखी कोणतीच संपर्काची साधने
नसल्याने .फक्त पत्रेच होती माणसामधील दुवा ..!

नेहेमीची खुशाली .इतर काही कामाचा मजकूर.
आणी अगदी प्रेम व्यक्त करायला पण पत्रच वापरले जात असे .
त्यावेळेस साधा मजकुर लिहिण्या साठी साधे पोस्ट कार्ड असे , ज्यातील मजकुर कोणालाही दिसत असे .
व काही खाजगी लिहायचे असेल तर “अंतर्देशीय पत्र “ वापरत असत
ज्याचा रंग नीळा असे व जे पुर्ण पणे बंद करता येत असे
शिवाय त्याकाळी जी “प्रेमपत्रे “लिहिली जात त्यासाठी खास “गुलाबी “कागद मिळत असे
व तेही गुलाबी पाकिटातून पाठवले जात असे !
अशी गुलाबी पत्रे घरच्या अथवा इतर कुणाच्या हाती पडू नयेत याची विशेष काळजी घ्यावी लागत असे .

पोस्टमन कडून पत्रांचे वाटप केले जात असे
त्यामुळे पोस्टमन आपल्या कडे कधी येतो आणी त्याने काय पत्रे आणली असतील याची उत्सुकता असे .
त्याकाळी फेसबुक वगैरे नसल्याने पत्र मैत्रीला खूप महत्व होते
अगदी कॉलेज जीवनापासून मला काही परगावचे मित्र व मैत्रिणी होत्या
आम्ही दर आठवड्याला एकमेकांना पत्रे लिहीत असु ..
तेव्हा आम्ही एकमेकाना पेन फ्रेंड म्हणत असु.
माझे अक्षर खूप सुंदर होते (अजुन पण आहे )..
व माझी मराठी भाषा पण चांगली असल्याने .
.पत्रात ..कविता गाणी सुभाषिते म्हणी यांची “लयलूट “ असायची.
माझे पत्र वाचताना जणु मी स्वतःच बोलत आहे असे मित्र मैत्रिणींना वाटत असे .
.ती पत्रे म्हणजे सर्वांसाठी “खजिना “ असायचा ..!!
माझ्या पत्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे ..नेहेमी पत्राची सुरवात “श्री “..अशी लोक करीत असत ..
पण माझ्या पत्रात कायम सुरवातीला “EVERGREEN “..असे मी लिहीत असे ,..
मला आठवते आहे माझी एक पत्र मैत्रीण नांदेड ला होती
तीचे लग्न ठरले तेव्हा तिने मला आमंत्रण केले होते
माझ्या वडिलांनी तेव्हा सुद्धा .कमी दळणवळणाची साधने असुन ,
माझे वय पण लहान असुन, मला एकटीला ..तिकडे आठ दिवस पाठवले होते ...
नुसत्या पत्र मैत्रीवर एखाद्या सोळा सतरा वर्षाच्या मुलीने कोल्हापूर पासून नांदेडला यायचे
ही त्या काळी खुप अपूर्वाईची गोष्ट होती .
मैत्रिणीच्या घरचे लोक पण चकित झाले होते .
येता येता मी औरंगाबाद ला पण काका कडे पण एकटी जावून आले होते !
इतक्या लांब मी प्रवास करून एकटी आले ह्याचे काकाला व त्याच्या शेजारच्या लोकांना पण नवल वाटले होते!
.......................जेव्हा मला पहिली नोकरी टेलिफोन खात्यात लागली
तेव्हा मला तीन महिने नाशिक सेंटर वर ट्रेनिंग होते
मी आणी माझ्या दोन मैत्रिणी तेथे गेलो होतो
वीस एकवीस वयाच्या आम्ही मैत्रिणी प्रथमच नोकरी साठी बाहेर पडत होतो त्यामुळे
घरच्या लोकांना आमची काळजी खुप वाटत होती
तेव्हा वडीलांचा आणी माझा अगदी ..आठवड्याला पत्र व्यवहार चालत असे
मी माझ्या पत्रातून माझ्या अडचणी सांगत असे ..!
तर ते त्यांच्या पत्रातून कसे वागावे ..पैसे कसे जपून खर्च करावे हा उपदेश करीत असत ..!

आताही ती पत्रे वाचताना तो काळ जणु काही मी परत जगते .
माझ्या काही मैत्रीणींची..लग्ने कॉलेज संपले की लगेच झाली .
त्या सासरी गेल्यावर माझी पत्रे हा त्यांच्यासाठी विरंगुळा असायचा !!
आणी घरची बातमी पण अगदी सविस्तर समजायची ..
त्या म्हणत तुझी पत्रे तुला प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव देतात .

माझे लग्न ठरले तेव्हा मला कोल्हापुरातले स्थळ मिळाले .
तसे आम्हीलग्ना पुर्वी रोजच भेटत असु
पण तरीही प्रेम पत्रांची मजा काही औरच ना !!
ही मजा घेण्या साठी आम्ही गावातल्या गावात एकमेकाना पत्रे लिहिली होती
आणी प्रेमपत्रांचा “रोमांस “अनुभवला होता .

माझी जिवलग मैत्रीण नोकरीसाठी प्रथम ....मुंबईला गेली ..
तेव्हा रडता रडता ..ती एकच म्हणाली
“..तु मला पत्रे लिहिलीस तरच मी जगेन !!”.
यातली अतिशयोक्ती जरी सोडली तरी ती त्या वेळची .तिची
गरज होती हे नक्की ..
माझ्या सर्व मैत्रीणी कडे ..अजूनही माझी पत्रे आहेत !!
(भलेही ती जीर्ण झाली असोत ...)!!
आता असे वाट्ते ..जावे त्यांच्या कडे आणी ती पत्रे मागून आणावीत
आणी परत सारी ..वाचून ..त्या काळातला आनंद घ्यावा !!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

युनिफॉर्म ..
सकाळी उठून बाहेर आले आणी बागेत काम करत असताना
स्कूल बसचा होर्न ऐकु आला .
ताबडतोब वरच्या मजल्यावरून शाळेत निघालेली मिहिका पळत आली
बॉब केलेल्या केसात लाल रंगाचा रिबन बो !!
टापटीप इस्त्रीचा ड्रेस
पांढरे मोजे तसेच पायातले पांढरे बुट
पाठीला स्याक त्यात पाण्याची बाटली रंगीत डब्बा ..
“ममा बाय “..असे म्हणून ती बस मध्ये बसली
आणी बस निघाली पण ..
तिच्या सारखेच तीचे अनेक मित्र मैत्रिणी बस मध्ये दंगा करत होते
ते दृश्य पाहून मी मात्र ..सहजच ..भुतकाळात गेले .
लहानपणी युनिफॉर्म म्हणजे नीळा स्कर्ट पांढरा ब्लाऊज !!!
दोन ड्रेस् शिवलेले असत .
एक आज घालायचा एक उद्या
वर्गातील बहुतेक मुलींची (तेव्हा मुली शक्यतो मुलीच्या शाळेत घालण्या कडे
पालकांचा कल असे ..मुलामुलींनी एकत्र शिकणे तितकेसे संमत नसे )
तेव्हा ड्रेस बाबत हीच परिस्थिती असे .
आमच्या ड्रेस ला इस्त्री वगैरे नसायची फक्त तो स्वच्छः धुतलेला असे इतकेच काय ते
काही श्रीमंत मुली मात्र इस्त्रीचे कपडे घालत असत
मुलीनी शाळेत दोन वेण्या घालणे अगदी कम्पलसरी असे
आणी त्या वेण्या लाल पिवळ्या अथवा काळ्या रंगाच्या रीबिनिनी वर बांधलेल्या असत
वर्गात केसांचा बॉबकट अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच मुलींचा असे .
तो पण हेडमास्तर बाईना फारसा संमत नसे .
त्या मुलीना सुद्धा रिबीन ही घालावीच लागे .
चांगले चपचपीत तेल लावून आई सकाळीच वेणी घालून देत असे .
ती वेणी इतकी घट्ट असे की .
आम्ही कीती पण धुडगुस घातला तरीही
दिवस भर सोडा ..दुसऱ्या दिवशी पर्यंत
त्यातली एक बट पण हलत नसे .
सकाळी आईसमोर वेणी घालत असताना बरीच रडारडी होत असे .
कारण आईचे भराभर केसातला गुंता काढणे आणी करकचून वेणी बांधणे..
वेणी घालताना हललेले आईला बिलकुल आवडत नसे ..लगेच पाठीत धपाटा बसे .
वेणीतून बटा बाहेर येणे हे “अगोचर” पणाचे लक्षण समजले जात असे .
वेणी घातली की लगेच आंघोळ करून युनिफॉर्म चढवणे .
एकदा घातलेला युनिफॉर्म दुसऱ्या दिवशी धुवायला पडत असे .
शाळेतून आले की कपडे बदल ..असला प्रकार शक्यतो नसे .
युनिफॉर्म व्यतिरिक्त इतर रंगाचे फ्रॉक अथवा परकर पोलके एखाद दोनच असत .
जे फक्त रविवारी संध्याकाळी बाहेर जाताना किंवा इतर कार्यक्रमाला घातले जात असत.
युनिफॉर्म शिवताना इतके मोठे शिवलेले असत ...
की शक्यतो दोन ते तीन वर्षे युनिफॉर्म वापरला गेलाच पाहिजे .
फारच उंची वाढली तर मग स्कर्ट ची दुमडलेली पट्टी उसवायची आणी तो मोठा करायचा .
अशा वेळी उसवलेल्या पट्टीचा रंग नवीन दिसत असे व स्कर्ट जुना दिसे .
पण त्याचे कोणाला काही वाटत नसे कारण जवळ जवळ सर्वच घरात ही परिस्थिती असे .
काही घरातून मोठ्या भावंडांचा युनिफॉर्म धाकट्याला वापरावा लागत असे.
शाळेत जाताना तोंडावर एक पावडरचा पफ फिरवणे
आणी डोळ्यात काजळ घालून ..कपाळाला कुंकू लावणे इतकेच फक्त असे .
शक्यतो सर्व घरात मुलीनी कुंकवाची टिकली लावायला हवी असा दंडक असे .
गळ्यात काही असो अथवा नसो पण हातात मात्र एखादी काचेची बांगडी तरी असेच ..
दप्तर हे एका ठराविक प्रकारचे गोणपाटाच्या कापडाचे शिवलेले असे
एका भागात पुस्तके आणी एका भागात वह्या असत .
डबा दप्तरात ठेवायचा असे.
तेव्हा पुस्तके नेण्यासाठी काही श्रीमंत मुली अल्युमिनुयम ची ब्याग वापरत
त्यांच्या विषयी तेव्हा खुप कुतुहुल वाटे .
शाळेत जाताना ..बुट मोजे ..ही तर . फार लांबची गोष्ट झाली
पायात चप्पल असले तरी पुष्कळ .!!.
बहुतेक वेळा चप्पल तुटलेले अथवा दुरुस्त केलेले पण असायचे .
मी कायम शाळेत अथवा मैत्रिणी कडे चप्पल विसरत असे .
व विसराळूपणा बद्दल आईची बोलणी खात असे .
मात्र चप्पल जर चुकून शाळेत अथवा देवळात हरवले
तर ते सापडणे महाकठीण असायचे ..
आणी मग आई बाबांच्या रागाला बळी पडावे लागायचे .
धांदरट..बावळट वगैरे शेलक्या भाषेत बोलून घ्यावे लागायचे .!!
आणी मग पुढील चप्पल बाबांच्या पुढील पगारात घेण्याचे आश्वासन मिळायचे .
तोपर्यंत अनवाणी चालत जाणे इतकेच ..हाती असायचे .
डबा साधा पोळी भाजीचा असे .इतर कोणतेच प्रकार मैत्रिणींच्या डब्यात पण नसत
पण दुपारच्या सुटीत पोळी भाजी ला “अमृताची “चव असे
बाकी बाटलीतून पाणी बरोबर नेणे हे प्रकार तेव्हा नसत .
शाळेत पाण्याचे नळ असत
डबा खाल्ला की जाऊन तेथे पोटभर पाणी प्यायचे आणी खेळायला पळायचे
इतके जरी असायचे तरी परिस्थिती बद्दल कोणतीच खंत मनात नसे. !!
किंवा आपल्या मैत्रिणीला एखादी गोष्ट मिळाली तर ती आपल्याला पण मिळावी
असा अट्टाहास पण नसे
खूप आनंदी आणी समाधानी दिवस होते ते
आई वडील पण शक्य असतील तितके आणी परिस्थिती असेल तसे लाड करायचे ..
जरी गैर वागले तर त्यांचा धाक असला तरी प्रेम ही तितकेच असे .

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------


इतर रसदार पर्याय