Romeo And Juliet books and stories free download online pdf in Marathi

रोमियो आणि जुलियट

रोमियो आणि जुलियट

कोणे एके काळी वेरोना नामक शहरी दोन अतिशय नामवंत घराणी राहत होती ‘माँटेग्यु’ आणि ‘कॅप्युलेट’. दोन्ही कुटुंब खूप सधन होती; आणि इतर सधन कुटुंबांप्रमाणे सुज्ञ आणि हुशारही होती. पण एका गोष्टीत ते अगदी टोकाचे दुराग्रही होते, ते म्हणजे त्या दोन्ही कुटुंबातील जुने वैर...! त्यातही इतर समजूतदार माणसांप्रमाणे हे प्रकरण मिटवायचे सोडून हे लोकं त्याचे भांडवल करीत असत, किंबहुना ते इतके चिघळवत ठेवत की ते कधीच संपता कामा नये. त्यामुळे माँटेग्यु किंवा कॅप्युलेट, दोन्ही घराण्यातील सदस्यांचा एकमेकांशी काहीच संवाद होत नसे, झालाच तर तो इतका असभ्य आणि उद्धट असे की ज्याचे रूपांतर वादविवादात होत असे. भरीस भर म्हणून की काय, पण त्यांचे नातेवाईक आणि नोकर मंडळीही अगदी रस्त्यावरसुद्धा क्षुल्लक कारणावरूनही भांडायला आणि शिवीगाळ करायला कमी करीत नसत. त्यामुळे ‘माँटेग्यु-कॅप्युलेट’ संघर्षातील आगीची धग अजूनच वाढ घेत असे. या दोन घराण्यातील वैमनस्यामुळे वेरोनातील शांतीपूर्ण वातावरण कायमच बिघडत असे.

***********************

अश्याच एके दिवशी, लॉर्ड कॅप्युलेट, जे कॅप्युलेट घराण्याचे प्रमुख होते, त्यांनी जंगी मेजवानीचे आयोजन केले, ज्यात स्वादिष्ट निशा-भोजनाचा आणि नृत्याचा कार्यक्रम होता; त्यातही लॉर्ड कॅप्युलेट इतके उदार यजमान होते की त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी उघड निमंत्रण ठेवले होते, अगदी कुणीही येऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकत होते; अर्थातच फक्त माँटेग्यु सदस्यांव्यतिरिक्त...!

त्याच वेळी एका युवक माँटेग्यु सदस्याने, दस्तुरखुद्द लॉर्ड माँटेग्यु ह्यांच्या मुलाने, ‘रोमियो’ने, मात्र ह्या कार्यक्रमाला आपली हजेरी लावली होती. ह्याचे कारण होते ‘रोजलीन’, जिला रोमियोने प्रेमाची मागणी घातली होती पण ती कधीच त्याच्याशी आपुलकीने वागली नव्हती. खरे तर एका माँटेग्यु सदस्याने कॅप्युलेट घराण्याच्या समारंभाला असे उघडपणे उपस्थित राहणे म्हणजे जीवाशी खेळण्यासारखेच होते. पण तरीही रोमियोच्या एका मित्राने, ‘बेन्वोलिओ’ने त्याला तेथे जाण्यास भरीस पाडले होते कारण बेन्वोलिओला रोमियोला हे दाखवून द्यायचे होते की वेरोना शहरामध्ये कितीतरी युवती आहेत ज्या रोजलीनपेक्षा अधिक सुंदर, सद्गुणी आणि मनमोहक आहेत. रोमियोने केलेली रोजलीनची निवड ही हिर्‍यांच्या खाणीतून काचेच मणी उचलण्यासारखे आहे. पण रोमियोचे मन हे सत्य मानायला तयार नव्हते. कारण त्यानी खूप मनापासून रोजलीनवर प्रेम केले होते. प्रेमाविषयीच्या त्याच्या भावना अतिशय उत्कट आणि प्रामाणिक होत्या. रोजलिनच्या आठवणीत तो तहान, भूक, झोप,... अवघे जग विसरून जात असे. ह्याउलट रोजलिन मात्र त्याच्या मनाचा अजिबातच विचार करत नव्हती; त्याच्याशी अगदी तुटकपणे वागत होती. रोमियोच्या प्रेमाची परतफेड करणे तर सोडाच पण निदान सौजन्यपूर्ण व्यवहारानेदेखील ती त्याच्याशी वागत नव्हती. उलट अगदी कठोर शब्दात तिने त्याचे प्रेम झिडकारले होते. म्हणूनच रोजलिनसारखी मुलगी रोमियोच्या प्रेमाच्या अजिबात योग्यतेची नाही असे बेन्वोलिओचे म्हणणे होते आणि ह्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तो रोमियोला त्या समारंभाला जाण्याचा आग्रह करत होता. बेन्वोलिओचे म्हणणे पटले म्हणून नव्हे तर निदान एकदा तरी रोजलीनला भेटता येईल ह्या आशेने रोमियोने बेन्वोलिओच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि वेशबदल करून, चेहऱ्यावर मुखवटा चढवून, सोबत आपल्या आणखी एका मित्राला, ‘मर्क्युशो’ला घेऊन ते त्या समारंभात येऊन पोचले.

लॉर्ड कॅप्युलेटने रोमियो आणि त्याच्या दोन्ही मित्रांचे स्वागत केले आणि हा नवयुवक सुद्धा अगदी आनंदाने मेजवानीत कार्यक्रमात सहभागी झाला. त्या सोहळ्याचे कौतुक तरी काय करावे...! हा कार्यक्रम खूपच सुंदर होता आणि कॅप्युलेट घराण्याची उदारता आयोजनामध्ये स्पष्ट जाणवत होती. ती वेरोनामधील एक सुंदर आणि आनंदी रात्र होती. वेरोना शहरातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्वे त्या कार्यक्रमात उपस्थित होती. शहरातील सुंदरात सुंदर स्त्रिया त्या कार्यक्रमाचे सौंदर्य अजूनच वाढवत होत्या. सर्व मंडळी उंची, मखमली आणि मुलायम पेहराव करून केलेली होती; एकीकडे पुरुषांच्या अंगरख्याचे गळे भरजरी आणि तलवारींच्या मुठी रत्नजडित होत्या, तर दुसरीकडे स्त्रियांचे गळे आणि मनगटं अस्सल रत्नांचे दागिन्यांनी भरले होते, आणि हिरे-माणिकांच्या अंगठ्या तर नुसत्या चकाकत होत्या. रोमियोसुद्धा त्याला साजेशी वस्त्रे परिधान करून आला होता; जरी त्याने चेहर्‍यावर काळ्या रंगाचा मुखवटा घातला होता; तरी त्या मुखवट्यातून लुकलुकणारे त्याचे तेजस्वी डोळे, त्याचा गौरकांती, चाफेकळीसारखे तरतरीत नाक, ओठांवरचे मनमोहक हसू आणि त्याच्या रुबाबदार ताठ मानेभोवती झुळझुळणारे रेशमी केस,... हे सगळे खूपच लोभस होते. इतर सगळ्यांपेक्षा अधिक आकर्षक, मनमोहक, स्वप्नातील राजकुमाराच जणू!!!

रोमियोचे तेथे आगमन झाले तेव्हा तेथील युवक आणि युवती लोकप्रिय संगीताच्या साथीने सामूहिक नृत्याचा आनंद घेत होती. रोमियोदेखील त्यांच्यात सामील झाला पण तेवढ्यात संगीताच्या तालावर नाचणारी त्याची पाऊले अचानक स्थिरावली. दूर आकाशात क्षितिजा पलीकडे शुक्राची चांदणी लकलकावी तशी ‘ती’ त्याच्या नजरेत भरली आणि मेघांनी दाटलेल्या आकाशात दैदिप्यमान विद्युल्लता चमकावी तशी प्रेमभंगाच्या निराशेने दाटलेल्या रोमियोच्या हृदयात प्रेमभावना उन्मीलित झाली. इतर युवतींबरोबर ‘ती’ सुद्धा नृत्याचा आनंद घेत होती. पण रात्रीच्या वेळी ‘ती’चे सौंदर्य असे दिसत होते जणू कोळशाच्या खाणीत हिरा चमकावा. ‘ती’ इतकी नाजूक आणि मनमोहक होती की वार्‍यालासुद्धा स्पर्श करताना विचार करावा लागेल. मुळातच असलेला तिचा गौरवर्ण मोत्यांनी समजवलेला मखमली अंगरख्यात अधिकच उजळून दिसत होता, तिच्याबरोबरच्या युवतींमध्ये तिचे सौंदर्य, तिचा नाजूक सुडौल बांधा असा उठून दिसत होता जणू काही बलाकमालेत सुवर्णहंस...! तिला बघताक्षणीच रोमियो वेगळ्याच भावविश्वात हरखून गेला, तिच्यापुढे त्याला उरलेले जग व्यर्थ आणि क्षुल्लक वाटू लागले. रोजलिनच्या आभासी प्रेमाचे मळभ आता त्याच्या मनावरून पूर्णपणे निघून गेले होते. आपल्या मनातील गुज तो आपल्या मित्रांना सांगू लागला, तेव्हा त्याचा आवाज तेथे उपस्थित लॉर्ड कॅप्युलेटच्या पुतण्याने, टायबॉल्टने, ऐकला. टायबॉल्ट अतिशय तापट आणि शीघ्रकोपी होता. त्याच्या तीक्ष्ण श्रवणेंद्रियांनी तो आवाज ओळखला. त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली कारण तो आवाज होता रोमियोचा, एका माँटेग्युचा. आपल्याला निमंत्रण नसतानासुद्धा रोमियोचे, एक माँटेग्यु सदस्याचे, वेश बदलून, मुखवटा चढवून कॅप्युलेट घराण्याच्या मेजवानीत सहभागी होणे हे अतिशहाणपणाचे आणि तिरस्कृत कार्य आहे, आणि त्याचा गंभीरपणे विचार केला गेला पाहिजे असे टायबॉल्टला वाटले. ह्या उद्दामपणासाठी रोमियोला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली पाहिजे ह्या विचारात तणतणतच टायबॉल्ट त्याची तक्रार लॉर्ड कॅप्युलेटकडे घेऊन गेला. पण लॉर्ड कॅप्युलेट, टायबॉल्टचे काका, एक अतिशय समजूतदार आणि अनुभवी सद्गृहस्थ होते. त्यांना त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कुणाशीच असभ्य वर्तणूक करून चांगल्या कार्यक्रमाच्या रंगाचा बेरंग करायचा नव्हता. आणि तसेही रोमियो एक माँटेग्यु असला तरी तो स्वभावाने अतिशय सात्विक होता. वेरोना शहरातील सर्वच जण त्याचे एक सुसंस्कारीत, जबाबदार आणि शिस्तप्रिय युवक म्हणून कौतुक करीत असत. म्हणून लॉर्ड कॅप्युलेट ह्यांनी टायबॉल्टला शांत राहण्याचा सल्ला दिला. त्याच्या सल्ल्यानुसार टायबॉल्ट शांत बसला खरा पण त्याचे तरुण रक्त त्याला शांत बसू देत नव्हते, काहीतरी कारण काढून आजच्या कर्माची शिक्षा देण्याच्या संधीच्या तो शोधात होता.

दरम्यान, रोमियो मात्र पूर्णपणे ‘त्या’ सुंदर तरुणीच्या विचारात हरवून गेला होता. आजूबाजूचे लोक नृत्य-गायनात रमली होती पण रोमियो मात्र तिथेच स्तब्ध उभा होता आणि त्याचे चित्त मात्र तिच्याभोवती रेंगाळत होते आणि विचार करत होते त्याने घातलेल्या मुखवट्याचा फायदा घेऊन अतिशय रूबाबात तिच्यापाशी जावे; तिचा हात हातात घ्यावा, तिचे चुंबन घेऊन मधुर शब्दात तिला आपल्या प्रेमाची कबुली द्यावी.

रोमियोला असा मध्येच उभा बघून ‘ती’ म्हणाली, “अहाहा! काय सुंदर मूर्ती आहे ही...!”

“स्वर्गातील अप्सरा अशी भूलोकावर अवतरल्यामुळे हा जीव हरखून गेला आहे.”, रोमियो भानावर येऊन म्हणाला. “हे सुंदरी, मी माझे सर्वस्व तुला अर्पण करतो. आता ह्या जीवाचे काय करायचे हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल...”

‘ती’ युवती रोमियोला काही उत्तर देणार तेवढ्यात त्या मुलीला तिच्या आईने बोलावणे पाठवल्यामुळे तिला तेथून जावे लागले.

‘ती’ कोण आहे हे जाणून घेण्यासाठी रोमियोदेखील तिच्या मागोमाग गेला. पण त्या युवतीची ओळख समजताच रोमियोवर जणू आभाळ कोसळले...! जिला बघताक्षणी तो जिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता ती तरुणी दुसरीतिसरी कुणी नसून त्याच्या जन्मजात शत्रूची, खुद्द लॉर्ड कॅप्युलेट ह्यांची कन्या ‘जुलियट’ होती. एकंदरीत परिस्थिती बघून रोमियोने आपली प्रेमभावना मनातच दाबून टाकली आणि अतीव दु:खाने आणि निराश मनाने त्यावेळी तेथून निघून गेला.

***********************

कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वजणांनी अतिशय आनंदाने एकमेकांचा निरोप घेतला. जुलियटसुद्धा तिच्या कक्षात निघून गेली. पण ती अजूनही ‘त्या’च तरुणाच्या विचारात होती. संध्याकाळच्या कार्यक्रमात आलेल्या रोमियोने, त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्वाने, त्याच्या खर्‍या प्रेमाच्या आणि समर्पणाच्या भावनेने केव्हाच तिचे मन जिंकून घेतले होते.

“ती मुखवटा घालून आलेली व्यक्ती कोण होती जी आपल्या नृत्य सोहळ्यात अशी मध्येच एखाद्या मुर्तीसारखी थबकून उभी होती?”, अत्यंत कौतुहलाने जुलियटने तिच्या दासीला विचारले.

“त्याचे नाव रोमियो आहे... एक माँटेग्यु! आपल्या सगळ्यात मोठ्या शत्रूचा एकुलता एक मुलगा.”, दासी उत्तरली.

जुलियटलासुद्धा हा एक मोठा धक्काच होता. नकळतपणे पहिल्या भेटीतच तिचे मन ज्या व्यक्तीकडे आकृष्ट झाले होते ती व्यक्ती एक माँटेग्यु होती. तिच्या मनात खूप घालमेल सुरू होती. एकीकडे रोमियो, ज्याच्याबद्दलच्या एक विलक्षण प्रेमभावना तिच्या मनात अतिशय खोलवर रूजू लागली होती; जणू काही पहिल्याच भेटीत जन्मोजन्मीचे ऋणानुबंध जोडले जावे. तर दुसरीकडे त्या दोघांच्या घराण्याचे जुने वैमनस्य, तिच्या घराण्याचा मान-सन्मान.

एक ना अनेक, हजारो गोष्टींचा विचार करत जुलियट तिच्या कक्षाच्या गवाक्षात उभी होती. तिच्या मनात विचारांचा गुंता सुरू होता, “काय करावे? करावे की न करावे? एकाच भेटीत झालेल्या प्रेमाला स्वीकारावे? की, ज्या प्रेमामुळे तिला तिच्या कुटुंबाचा तिरस्कार सहन करावा लागेल अश्या भावनांना इथेच थांबवावे...?”

इकडे रोमियोचे मनही अस्वस्थ होते. जुलियटचे सत्य कळल्यावर जड अंत:करणाने रोमियो सोहळ्यातून निघाला खरा पण त्याचे मन त्याला जुलियटपासून दूर जाऊ देईना. पण जाणे भाग होते. म्हणून जाण्यापूर्वी निदान एकदा तरी जुलियटला बघावे ह्या विचाराने तो तेथील उद्यानात, तेथील झुडुपांमध्ये लपून बसला होता. आता बरीच रात्र झाली होती. आकाशात चंद्र त्याच्या पूर्ण कलेत होता आणि त्याचे चांदणे बागेतल्या गवतावर सर्वदूर पसरले होते, जणू काही हिरवा-राखाडी, चमचमता गालीचाच अंथरला असावा. तेवढ्यात त्याची नजर गवाक्षात उभ्या असलेल्या जुलियटवर पडली. पूर्वेच्या लालीप्रमाणे तिचे मुखकमल प्रकाशमान होते. अंगणात लावलेली सुगंधित पुष्पलता बहरून वरपर्यंत चढून जुलियटच्या कक्षाच्या गवाक्षाभोवती अशी काही पसरली होती जणू काही त्याला सुशोभित करण्यासाठीच...! आणि अश्या धुंद वातावरणात, फुलांनी नटलेल्या त्या खिडकीत उभ्या जुलियटच्या चेहऱ्यावर पडणारे शुभ्र चांदणे... अहाहा! नवोदित हिरकणीच अवतरली जणू...! तळहातांवर आपली हनुवटी टेकवून ती खरे तर त्याच्याच विचारात गुंग होती; पण तिला अश्या विचारमग्न अवस्थेत पाहून रोमियोच्या भावना अनावर होत होत्या. त्यालाही तिच्या मखमली गालांना स्पर्श करावा असे वाटू लागले होते.

“अशी कशी मी?...”, जुलियट स्वत:शीच पुटपुटली.

तिचे स्वर तिथेच असलेल्या रोमियोच्या कानावर पडले. त्याचा आनंद गगनात मावेना. त्याने हळूच वर तिच्याकडे पहिले. नजरेसमोर अप्रतिम सौंदर्याने नटलेली जुलियट आणि कानांवर पडणारे तिचे मंजुळ स्वर... हे सगळे रोमियोला स्वप्नवत भासत होते; एखाद्या जादुई नगरीतील सुंदर आणि संमोहक उद्यानाचे स्वप्न... ज्याने तो मंत्रमुग्ध झाला होता. आणि तिचे शब्द ऐकण्यास अधीर...!

जुलियट अजूनही स्वत:च्याच भावविश्वात हरवली होती. नव्याने फुटलेले प्रेमांकुर आणि रात्रीची नीरव शांतता, तिच्या मनात वेगळीच स्फूर्ती भरून गेले. आणि आत्ता ती ज्याच्या आठवणीत रमली होती तो तिला बघत तिथेच लपला असेल ह्याची पुसटशीही कल्पना नसताना नकळतच ती तिच्या मनातील भाव मुक्तकंठाने मांडू लागली.

“ओह रोमियो, रोमियो!... तू ‘फक्त’ रोमियो का नाही? तू तुझ्या उपनामाचा त्याग कर, त्या घराण्याच्या पदवीला सोडून दे, माझ्यासाठी. आणि ते जर अशक्य असेल तर मी मा‍झ्या नावाचा, ‘कॅप्युलेट’ चा त्याग करेन. पण कायम माझाच राहा, तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे.”

जुलियटच्या ह्या शब्दांनी रोमियो उत्साह अधिक वाढत होता. त्यालादेखील तिला प्रतिसाद द्यायचे होता. पण त्याने स्वत:ला आवरले कारण त्याला तिचे बोलणे अजून ऐकत राहावेसे वाटत होते.

जुलियट अजूनही स्वत:शी तोच आलाप गात होती आणि रोमियोच्या माँटेग्यु असण्यामुळे, त्याचे एखादे दुसरे नाव नसण्यामुळे, त्याला जे नाव लागले ते त्याच्यापासून वेगळे करून तो फक्त तिचाच होणार नसल्यामुळे, किंवा त्याचे जे नाव त्यामुळे तो तिचाही पूर्णपणे स्वीकार करू शकणार नसल्यामुळे ती दु:खी होत होती.

“ओह रोमियो! माझा रोमियो, माझा प्राणसखा रोमियो,...!”, जुलियटच्या ओठांवर रोमियोच्या नावाचाच जप सुरू होता.

आपला विचार जुलियट इतक्या आर्ततेने करत आहे आणि आत्ता ती आपल्याला ‘प्राणसखा’ म्हणून संबोधत आहे म्हणजे तिने खरोखरच मा‍झ्या प्रेमाचा स्वीकार केला आहे; हे जाणल्यावर रोमियो स्वत:ला थांबवू शकला नाही आणि तो जुलियट म्हणाला, “’प्राणसखा’...! हो. अशीच हाक मारत जा मला. किंवा तुला जे योग्य असेल त्या नावाने मला हाक मार. नावात असे काय आहे? आणि ज्या नावाने तुला इतका त्रास होतोय तो मी आता राहिलोच नाहीये. माझे पुन: नामकरणच झाले आहे असे समज. मी आहे ’प्राणसखा’... तुझा ’प्राणसखा’.”

तो आवाज ऐकून जुलियट भानावर आली पण एका पुरुषाचा आवाज ऐकून ती गडबडून गेली. रात्रीच्या अंधाराच्या गैरफायदा घेऊन कोणी तिच्या मनातले गुपित ऐकले ह्या विचाराने ती अस्वस्थ झाली, घाबरून गेली. पण स्वत:ला सावरल्यावर तिने रोमियोच्या आवाजाला ओळखले. संध्याकाळच्या समारंभात त्यांचे फारसे संभाषण झाले नव्हते तरी तिच्या मनाला भिडलेला तो आवाज तिने ओळखला होता. हो! रोमियोचाच आवाज होता तो.

इतका वेळ त्या ऑलिअँडर्सच्या झुडुपांमध्ये लपलेला रोमियो अचानक जुलियटसमोर स्वच्छ चंद्रप्रकाशात येऊन उभा राहिला. दोघांची नजरानजर झाली. दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. जुलियटशी बोलता यावे म्हणून रोमियो वेलीच्या मांडवाचा आधार घेऊन तिच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू लागला. ती त्याला विरोध करत होती. कारण ते अतिशय धोक्याचे होते. आणि जर त्याला असे करताना घरातल्या कुणी सदस्यांनी बघितले असते तर त्याला एक माँटेग्यु म्हणून तडक मृत्युदंडाची शिक्षा दिली गेली असती. पण रोमियोला आता कशाचीच परवा नव्हती. तो तिच्यापाशी पोचला आणि तिची समजूत घालू लागला.

“असं कसं? मी स्वत:ला कसे थांबवू? माझ्यावर होऊ शकणार्‍या वीस तलवारींच्या घावाच्या भीतीपेक्षा तुझ्या डोळ्यातील आपल्या विरहाची भीती मला जास्त धोकादायक वाटते. मला तुझ्या डोळ्यात प्रेमाचे भाव बघायचे आहेत, मा‍झ्या प्रिये. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यापर्यंत पोचलेला मी ह्या गोष्टीचा पुरावा आहे की आपल्या प्रेमाची ताकद त्या लोकांच्या (माँटेग्यु-कॅप्युलेट) शत्रुत्वापेक्षा जास्त आहे. त्या शत्रुत्वाला जपताना मिळालेल्या मोठ्या आयुष्यापेक्षा तुझ्या प्रेमात आलेले अकाली मरणसुद्धा मला मान्य आहे.”

“पण तू इथपर्यंत कसा पोचलास? तुला कुणी मार्ग दाखविला?” – जुलियटने आश्चर्यचकित होऊन विचारले.

“प्रेमाने...! आपले प्रेमच मला एथपर्यंत घेऊन आले.” – रोमियो म्हणाला; “मी काही खूप मोठा खलाशी नाहीये ज्याला दिशांचे उत्तम ज्ञान असते. पण तू माझ्यापासून कितीही दूर गेलीस अमी तुझ्या पाऊलखुणा जरी विरून गेल्या तरी वार्‍याने पसरवलेल्या तुझ्या सुगंधावरून तुझी वाट काढत मी नक्की तुझ्यापर्यंत पोचेन.”

ती ज्याच्या प्रेमात पडली होती तो रोमियो दिसायला जितका रुबाबदार होता स्वभावाने तितकाच शालीन आणि सभ्य होता; आणि मुख्य म्हणजे तोही तेवढ्याच उत्कटतेने तिच्या प्रेमात पडला होता. हे पाहून जुलियटच्या चेहऱ्यावर लाजेने विजयी होकाराची लाली पसरली. खरं तर तिला लगेच त्याच्यासमोर तिच्या प्रेमाची कबुली द्यायची नहाती. कारण चांगल्या घरातल्या मुली अश्या लगेचच वहावत जात नाहीत. सुज्ञ आणि सभ्य मुली लाजाळू आणि स्वाभिमानी असतात, आधी त्या लटका नकार देऊन प्रेमाची परीक्षा बघतात. कारण लगेचच होकार दिला तर त्या सहजसाध्य आहेत का काय असा गैरसमज होऊ शकतो आणि मग सहज मिळालेल्या वस्तूची फार किंमत केली जात नाही. पण तिच्या बाबतीत हे शक्य नव्हते, उगीचच वेळखाऊपणा किंवा लटका नकार असे तिला काहीच शक्य नव्हते कारण मगाशी स्वत:शीच बोलताना तिने दिलेली तिच्या प्रेमाची कबुली दिली रोमियोने ऐकली होती. त्यामुळे आता उगीचच नवल वाटण्याचे सोंग करून पळवाट न काढत तिने लगेचच मोकळेपणाने तिचा होकार कळवला आणि मगाशी रोमियोने जे काही ऐकले होते त्या खरोखरच तिच्या मनातील भावना असल्याची कबुली दिली.

“मा‍झ्या प्रिय माँटेग्यु...!”, जुलियट थोडी मखलाशी करत म्हणाली कारण मगाशी तिने रोमियोच्या एक माँटेग्यु असण्यावर खेद केला होता ते आता तिला चुकीचे वाटत होते. आणि त्याला ती विनंती करू लागली की त्याने तिच्या मगासच्या बोलण्यावरून तिच्याविषयी गैरसमज करून तिला अंतर देऊ नये. उलट संध्याकाळच्या समारंभात झालेल्या त्यांच्या अनपेक्षित भेटीमुळे, पहिल्याच नजरेत प्रेमात पडल्यामुळे आणि नंतर त्या दोघांची खरी ओळख पटल्यामुळे तिच्या मनाची जी घालमेल झाली त्याचा विचार करावा. आणि खात्री बाळगायला सांगितली की आत्ता जरी ती त्याला समाजातल्या इतर घरंदाज तरूणींसारखी समंजस किंवा सुज्ञ वाटली नसली तरी तिचा स्वभाव आणि तिचे प्रेम मात्र नक्की खरे आहे; त्यात ‘त्या’ इतर उच्चभ्रू तरूणींसारखा दिखावा किंवा कपट नाहीये.

पण रोमियोच्या मनात जुलियटविषयी किंवा तिच्या प्रेमाविषयी तीळमात्र शंका नव्हती, आणि तिचा किंवा तिच्या प्रेमाचा निरादर करावा असे त्याच्या ध्यानीमनीही नव्हते. हे तो तिला शपथेवर सांगायला तयार होता पण जुलियटने त्याला शपथ घेण्यापासून थांबवले. कारण ती स्वत:च द्विधा मनस्थितीत होती. एकीकडे ती तिला रोमियो, तिचे खरे प्रेम मिळाले म्हणून आनंदी होती; पण दुसरीकडे अश्या अचानक आलेल्या तरुणाला लगेचच प्रेमाचा होकार देऊन खूपच अविचाराने आणि आगाऊपणाने वागल्याच्या शंकेने सैरभैर झाली होती. पण रोमियोला मात्र त्यांचे प्रेम त्याचवेळी वचनबद्ध करायची घाई करू लागला. पण जुलियटच्या मते तिने हे आधीच केले होते, जेव्हा रोमियो झुडुपांमध्ये लपून बसला आहे हे माहित नसताना तिने मुक्तकंठाने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती; पण ते तिला पुरेसे नव्हते, तिला तो आनंद परत एकदा अनुभवायचा होता. म्हणून तिने परत एकदा नव्याने, आणि आता रोमियोच्या समक्ष तिच्या प्रेमाची कबुली दिली. कारण आता ती प्रेमसागरात आकंठ बुडाली होती; तिचे प्रेम सागरासारखे अथांग आणि खोल होते. दोघांनाही त्यांच्या भावना व्यक्त करायला अधीर होते, तरीही त्यांचे संभाषण एखाद्या प्रेमग्रंथातील मधाळ शब्दसुमनांना गुंफल्यासारखे इतके मधुर होते की जणू काही एखाद्या शृंगार रसाने परिपूर्ण काव्यातील मंजुळ संगीत श्रवण व्हावे. प्रथम भेटीतच एकमेकांशी इतके ओढले गेलेले रोमियो-जुलियट एकमेकांच्या सहवासात इतके रममाण झाले की त्यांना काळ-वेळ, जाग कसलेच भान राहिले नाही.

पण काळ मात्र आपल्या गतीने चालत होता. जुलियटला तिच्या दासीने हाक मारली, कारण पहाट होत आली तरी जुलियट तिच्या पलंगावर निजण्यास आली नव्हती. तिच्या आवाजाने दोघंही भानावर आले. त्यांना त्यांच्या प्रेमविश्वातून वास्तव जगात यावे लागले. जुलियट रोमियोचा निरोप घेऊन निघू लागली तेवढ्यात काहीतरी आठवल्यामुळे परत आली आणि रोमियोला सांगू लागली की त्याचे प्रेम नक्कीच खूप खरे आणि श्रेष्ठ आहे, आणि तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे; त्यांच्या प्रेमाची परिणती विवाहाच्या रुपात व्हावी असे तिला वाटत होते. रोमियोचे ह्याबाबत काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी ती उद्या तिच्या दूताला त्याच्याकडे पाठवेल ज्याच्याकरवी त्या दोघांना, रोमियो-जुलियट ह्यांना त्यांच्या विवाहाची तिथी आणि मुहूर्त ठरवता येईल. जेणेकरून तिचे संपूर्ण आयुष्य ती त्याला समर्पित करून आजीवन त्याची सहधर्मचारिणी म्हणून जगेल. त्यांच्या भविष्याची सुंदर स्वप्ने रंगवताना जुलियटची दासी मात्र सारखी तिला हाका मारून बोलावत होती. विरहाच्या कल्पनेने दोघांचाही चेहरा परत निराश झाला.

“खरंच! प्रेमात पडल्यानंतर वेळ कसा चुटकीसरशी पुढे जात असतो. आत्ताच तर आपण भेटले होता आणि आता लगेच दूर जायचे... कित्ती असह्य आहे हे.”, रोमियो-जुलियट दोघंही ह्या विचाराने बेचैन झाले. पण निरोप घेणे भाग होते.

आता जाणे भाग आहे हे माहित असूनही दोघंही परत परत तिथेच रेंगाळत होते. जसजशी वेळ पुढे जात होती त्यांच्यातील भावना अधिक उत्कट होत होत्या. पण अखेर मनावर संयम ठेवत दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि उर्वरित रात्र साखरझोपेत घालवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जुलियटने ‘त्या’ गवाक्षाचा पडदा घट्ट लावून टाकला आणि तिच्या पलंगावर निजण्यास निघून गेली. रोमियोसुद्धा एखाद्या स्वप्नातल्या राजकुमारासारखा त्या शीतल, दवबिंदूंनी आच्छादलेल्या उद्यानातून बाहेर पडला.

***********************

पहाट होण्यापूर्वीच रोमियो आपल्या घरी पोचला. पण त्याच्या मनात अजूनही जुलियटचे विचार घोळत होते, नजरेसमोर अजूनही तिचेच लोभस रूप येत होते. जुलियटशिवाय त्याला त्याचे आयुष्य आता अपूर्ण वाटू लागले. जुलियट सतत आपल्यापाशी असावी अशी इच्छा आता त्याला सतावू लागली. सूर्योदय होताच, क्षणाचाही विलंब न करता रोमियो त्यांच्या मठातल्या धर्मगुरूंकडे, ‘फ्रायर लॉरेन्स’ ह्यांच्याकडे गेला. नित्याप्रमाणे सकाळी लवकर उठून ते साधनेला बसण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात त्यांनी समोरून रोमियोला येताना पहिले. इतक्या सकाळी सकाळी त्याला अश्या अवस्थेत येताना बघून त्यांना अंदाज आला की हा रात्रभर झोपला नसावा पण ह्याचे कारण दुसरा कुठला आजार नसून तरूणपणी होणारा प्रेमरोग असावा. रात्री घडलेली सगळी हकीकत रोमियोने त्यांना सांगितली. त्यांचा अंदाज खरा ठरला होता पण त्यांना वाटले होते की तो रोजलिनच्या प्रेमात होता पण मग त्यांना कळाले की सगळेच बदलले होते, तो आता जुलियटच्या प्रेमात होते. आणि आता थोडाही वेळ न दवडता जुलियटबरोबर त्याचा विवाह करून देण्याची याचना रोमियो धर्मगुरू लॉरेन्स यांना करू लागला. पण त्यांना प्रश्न पडला की कालपर्यंत रोमियो रोजलिनच्या प्रेमात होता आणि आज लगेच जुलियटच्या प्रेमात पडला. कालपर्यंत ह्याला रोजलिनच्या वागण्याबद्दल, तिच्या त्याच्याकडे असणार्‍या दुर्लक्षाबद्दल अनेक तक्रारी होत्या आणि आज लगेच जुलियटशी विवाहाचा प्रस्ताव??? ह्या विचारांच्या गोंधळातच त्यांनी रोमियोला टोमणा मारला की हल्ली तरुण मुलांचे प्रेम अंतरंगावर नसते तर नुसते बाह्यरूपावर असते. पण रोमियोने त्यांच्या शंकेचे निरसन केले की तो स्वत: खूप हवालदिल होत होता रोजलिनच्या एकतर्फी प्रेमात, पण ती त्याचा अजिबातच विचार करत नव्हती. आणि काही प्रतिसादही देत नव्हती. पण जुलियटचे तसे नव्हते. रोमियोच्या प्रेमाला तिने फक्त प्रतिसादाच दिला नव्हता तर ती आकंठ बुडाली होती त्याच्या प्रेमात. बरीच चर्चा झाल्यानंतर फ्रायर लॉरेन्स ह्यांना रोमियोचे मुद्दे पटले आणि त्यांनी विचार केला की कदाचित रोमियो-जुलियटच्या ह्या विवाहामुळे माँटेग्यु आणि कॅप्युलेट घराण्यातील जुना वाद संपुष्टात येईल ज्या वादामुळे सर्वाधिक दु:ख फ्रायर लॉरेन्स ह्यांना झाले होते कारण ते ह्या दोन्ही परिवाराचे जवळचे मित्र आणि हितचिंतक होते. कितीतरी वेळा त्यांनी ह्या दोन्ही कुटुंबांमध्ये समेत घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. पण दरवेळी निराशाच पदरी पडली होती. पण आता रोमियोच्या रुपात एक सुवर्णसंधी आपणहून चालत त्यांच्या दारी आली होती. म्हणून त्यांच्या हेतुपुर्तीसाठी आणि त्यांच्या लाडक्या रोमियोच्या प्रेमाखातर त्यांनी ह्या विवाहाच्या प्रस्तावास मान्यता दिली.

फ्रायर लॉरेन्स ह्यांच्या शब्दांमुळे रोमियो उपकृत झाला आणि ठरल्याप्रमाणे जुलियटची दासी जेव्हा रोमियोकडे निरोप घेऊन आली तेव्हा त्याने दासीला जुलियटपर्यंत निरोप पोचवण्यास सांगितले की फ्रायर लॉरेन्स ह्यांनी त्यांच्या म्हणजे रोमियो-जुलियटच्या विवाहाच्या प्रस्तावास मान्यता दिली असून त्याने त्यांच्या विवाहाची सगळी तयारी केली आहे आणि लगेचच दुसर्‍या दिवशी सकाळीच त्यांचा विवाह संपन्न होईल. आपल्या प्रेमाची परिणती विवाहात होणार म्हणून ते तरुण जोडपं खूपच आनंदात होते. त्यांच्या आनंदात जर त्यांचे कुटुंबिय सामील झाले असते तर हा आनंद द्विगुणीत झाला असता. पण त्या दोघांना त्यांच्या विवाहाकरिता त्यांच्या पालकांची संमती घेण्याचेदेखील धाडस होता नव्हते, कारण त्या दोन्ही घराण्यातील, कॅप्युलेट-माँटेग्यु घराण्यातील वैमनस्य.

दुसर्‍या दिवशी सकाळी-सकाळीच रोमियो आणि जुलियट न चुकता फ्रायर लॉरेन्स ह्यांच्या मठात पोचले. विवाहाचे विधी सुरू झाले. त्या दोघांचे हात एकमेकांच्या हातात गुंफले होते. धर्मगुरू फ्रायर लॉरेन्स ह्यांच्या आशीर्वादाने रोमियो-जुलियट विवाहबद्ध झाले. आणि त्यांनी त्या नवविवाहित जोडप्यासाठी आणि त्यांच्या निमित्ताने कॅप्युलेट-माँटेग्यु घराण्यातील मतभेद मिटवण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. त्या नवदाम्पत्याने एकमेकाला चुंबन दिले आणि दोघंही एकमेकांच्या आलिंगनात हरवून गेले. दोघांचे मन गहिवरून आले होते, डोळे पाणावले होते कारण आता त्यांना परत विरह सहन करायचा होता. गुप्तपणे विवाह केल्यामुळे त्यांना इतर नवविवाहित जोडप्यासारखे एकत्र राहता येणार नव्हते. त्यांना आपापल्या घरी जावे लागणार होते आणि त्यांच्या विवाहाची कल्पना त्यांच्या पालकांना देण्यासाठी योग्य वेळेची वाट पहावी लागणार होती. पण रोमियोने जुलियटला संध्याकाळी भेटण्याचे वचन दिले. आणि तिच्या दासीकरवी तिच्या कक्षाच्या गवाक्षातून दोरखंडाची शिडी खाली सोडायला सांगितले. म्हणजे तो त्या शिडीच्या सहाय्याने तिच्या गवाक्षापर्यंत पोचेल आणि त्याच्या नववधूशी एकांतात शांतपणे भेटू शकेल. मग मन घट्ट करून आणि संध्याकाळी वैवाहिक आयुष्य सुरू करण्याच्या गोड कल्पनेने दोघंही आपापल्या घरी निघून गेले.

पण त्यादिवशी आणखी एक भयंकर घटना घडली. टायबॉल्ट, लॉर्ड कॅप्युलेट ह्यांचा पुतण्या, जो ‘त्या’ संध्याकाळच्या मेजवानीपासून रोमियोवर खार खाऊन होता, तो सहज रस्त्यावरून जात असताना रोमियोचे आणि त्याचे ते दोन मित्र, बेन्वोलिओ आणि मर्क्युशो नेमके त्याच्या नजरेस पडले. त्यांना बघताक्षणी टायबॉल्टच्या रागाचा पारा चढला आणि भांडण उकरून काढण्यासाठी मुद्दाम रोमियोविषयी वल्गना करू लागला. रोमियो कसा भामटा आहे, खोटारडा आहे, एखाद्या खलनायकाप्रमाणे दुष्ट आहे, असे काहीबाही बोलून डिवचू लागला आणि त्यांना लढायचे आमंत्रण देऊ लागला. रोमियोला मात्र त्याच्याशी भांडण्यात अजिबात रस नव्हता कारण आता टायबॉल्ट त्याच्यासाठी शत्रू नव्हता तर त्याच्या पत्नीचा, जुलियटचा लाडका चुलत भाऊ होता. आणि तसंही रोमियोचा कधीच त्यांच्या घराण्याच्या वैमनस्यात रस घेतला नव्हता कारण तो अतिशय समजूतदार आणि सभ्य होता. आता तर कॅप्युलेट परिवार त्याचे शत्रू नव्हते तर त्याच्या प्रिय पत्नीचे माहेर होते. म्हणून नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आधीच तो त्याच्या रागावरच काय पण तोंडाने येणार्‍या शब्दांवर सुद्धा नियंत्रण ठेवत होता. स्वत: एक माँटेग्यु असूनही टायबॉल्टला एकेरी नावाने न संबोधता ‘प्रिय कॅप्युलेट’ असे आदराने बोलावले; खरं तर आता त्याला कॅप्युलेट नावाविषयी एक आपुलकी वाटू लागली होती कारण ते त्याच्या पत्नीचे नाव होते. पण टायबॉल्ट आता ईरेस पेटला होता. त्याने त्याची तलवार काढून सरळ रोमियोवर हल्ला केला त्यामुळे मर्क्युशोच्या सहनशीलतेचा अंत झाला. एक तर मुद्दाम आधी भांडण सुरू केले आणि तलवार घेऊन मारायलाच आला, टायबॉल्टच्या ह्या वागण्यामुळे मर्क्युशोने रागाच्या भरात स्वत:ची तलवार काढली आणि टायबॉल्टशी सामना करू लागला. पण दुर्दैवाने त्यात तो मरण पावला. आपल्या मित्राला धराशायी झालेले पाहून रोमियोचा संताप अनावर झाला. बाकीच्या सगळ्या भावना जाऊन त्याच्या डोक्यात आता फक्त त्या माणसाविषयी राग होता ज्याने त्याच्या मित्राला ठार केले. त्याने खरोखरच त्या दुष्ट खलनायकाचे रूप घेतले जसे टायबॉल्टने त्याला संबोधले होता. रागाच्या भरात त्याने आपली तलवार काढली आणि टायबॉल्टला ठार मारूनच त्याने ते भांडण थांबवले. भर दुपारी वेरोना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या ह्या धुमश्चक्रीमुळे शहरभर गोंधळ उडाला. शहरभर ही बातमी पसरली. सर्व नागरिक तिथे जमू लागले. लॉर्ड माँटेग्यु आणि लॉर्ड कॅप्युलेट आपापल्या कुटुंब-परिवारासह तिथे येऊन पोचले. वेरोना शहराचे युवराज स्वत: तिथे पोचले, जे मर्क्युशोचे नातेवाईक होते ज्याला टायबॉल्टने ठार मारले होते. पण माँटेग्यु आणि कॅप्युलेट परिवाराच्या ह्या नेहमीच्या कटकटीला आता सरकारसुद्धा कंटाळले होते. शहराची शांतता आणि सुव्यवस्था ह्यांच्या भांडणामुळे नेहमी बिघडत चालली होती. पण आता हद्द झाली होती; त्यामुळे आता काय तो सोक्षमोक्ष लावायचाच आणि गुन्हेगाराला कडक शिक्षा करायची असा निर्णय घेण्यात आला. बेन्वोलिओला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून युवराजांसमोर उभे करण्यात आले जेणेकरून घटनेच्या मुळाशी जाऊन योग्य न्याय करता येईल. बेन्वोलिओने घडला प्रकार सगळ्यांना सांगितला पण रोमियो त्याचा मित्र असल्याने भांडणातील त्याचा सहभाग वगळून आणि सौम्य करून सांगितला जेणेकरून त्याला काही हानी पोचणार नाही. पण लेडी कॅप्युलेट टायबॉल्टच्या मृत्यूमुळे अतिशय शोकाकुल झाल्या होत्या आणि त्याच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होत्या. गुन्हेगाराला कडक शिक्षा करण्यासाठी त्या युवराजांना उत्तेजित करू लागल्या. बेन्वोलिओच्या बोलण्यावर मुळीच विश्वास ठेवू नये, कारण तो रोमियोचा मित्र असल्यामुळे त्याची साक्ष पक्षपाती आहे असे वारंवार विनवू लागल्या. अजाणतेपणी त्या स्वत:च्याच जावयाकरिता, जुलियटच्या नवर्‍याकरिता मृत्यूची याचना करत होत्या. दुसरीकडे लेडी माँटेग्यु त्यांच्या मुलाची बाजू मांडत होत्या. त्यांच्या मते त्याचे वागणे न्यायसंगत होते. एकतर त्याने स्वत:हून हे भांडण सुरू केले नव्हते आणि टायबॉल्टचा झालेला वध हा त्याने केलेल्या मर्क्युशोच्या खूनामुळे त्याला केलेले शासन होते; त्यामुळे ते अतिशय योग्य होते. दोन्ही महिलांचे मुद्दे अगदी रास्त होते म्हणून युवराजांनी ते शांतपणे ऐकून घेतले; आणि खूप विचारांती त्यांनी त्यांचा निर्णय घेतला ज्यानुसार रोमियोला वेरोना शहरातून हद्दपार होण्याची शिक्षा सुनावली.

ह्या बातमीने जुलियटच्या काळजावर घणाघाती आघात झाले. जी नवपरिणीता होऊन काही तासच झाले होते तिच्याकरिता रोमियोला झालेले ह्या शिक्षेचे फर्मान म्हणजे जणू तिच्याकरिता कायमच्या घटस्फोटाच्या शिक्षेसारखेच होते. सुरुवातीला जेव्हा तिला ही बातमी कळाली की रोमियोच्या हातून तिच्या लाडक्या भावाची, टायबॉल्टची निर्घृण हत्या झाली तेव्हा तिचा प्रचंड संताप झाला. ती रोमियोचा तिरस्कार करू लागली. आणि त्याला वाटेल तसे बोलू लागली. तिच्या मते तो एक बहुरूपी होता; जसा भोळ्या चेहर्‍यामागे एखादा जुलूमी शासक, किंवा एखाद्या देवदूताच्या रूपातील सैतान, किंवा शांतीचे प्रतीक असणार्‍या कबुतराच्या रुपात एखादे क्षुधार्त गिधाड, किंवा मेंढीची कातडी पांघरलेला लबाड लांडगा, एक न अनेक अश्या कितीतरी विरोधाभासी नावांनी ती त्याला हिणवू लागली. खरे तर तिच्या मनात द्वंद्व सुरू होते, एकीकडे तिचे प्रेम आणि दुसरीकडे तिचा राग. पण अखेरीस तिचे प्रेम जिंकले. आणि आत्तापर्यंत रोमियोने केलेल्या टायबॉल्टच्या हत्येच्या शोकात जे दु:खाचे अश्रु वहात होते त्याऐवजी आनंदाश्रू वाहू लागले की टायबॉल्टच्या हातून रोमियो नाही मारला गेला. आणि ती देवाचे आभार मानू लागली. पण परत रोमियोला झालेल्या शिक्षेची आठवण झाली आणि ती शोकसागरात बुडून गेली.

बिचारा रोमियो! झाल्या प्रकारानंतर रोमियोची अवस्था अगदी बिकट झाली होती, अंगावरचे कपडे विदीर्ण झाले होते, जागोजागी तलवारीच्या जखमा झाल्या होत्या, अचानक घडलेल्या प्रसंगाने मेंदू सुन्न झाला होता. तशाच अवस्थेत तो फ्रायर लॉरेन्स ह्यांच्या मठीत आश्रयाला गेला, तिथे त्याच्या मनाला त्याला झालेल्या शिक्षेचा अर्थबोध होऊ लागला. ती शिक्षा देहदंडापेक्षाही कठोर होती. कारण आत्तापर्यंत वेरोना शहरच त्याच्यासाठी त्याचे जग होते, त्याच्यापलीकडचे जाग त्यानी कधी अनुभवलेच नव्हते. आणि आता जुलियटच त्याचे आयुष्य होते; तिच्यापासून दूर राहणे म्हणजे आयुष्याच संपल्यासारखे होते. कारण त्याच्याकरिता जिथे जुलियट तिथेच स्वर्गीचे नंदनवन नाहीतर सगळे जगच व्यर्थ आणि नरकासमान यातनामय होते. घडलेल्या घटनेमुळे फ्रायर लॉरेन्सही खूप हादरले होते. कारण सकाळीच पार पडलेल्या रोमियो-जुलियटच्या विवाहामुळे माँटेग्यु-कॅप्युलेट शत्रुत्व कायमचे मिटण्याची आस त्यांच्या मनात जागी झाली होती; पण ह्या प्रसंगाने आहे ती परिस्थितीसुद्धा आणखी चिघळली होती. तरीही स्वत:वर संयम ठेवत त्यांनी रोमियोचे सांत्वन करत त्याला चार हिताच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तो ह्या धक्क्यातून सावरेल आणि पुढचा विचार करू शकेल. पण रोमियो अगदी वेडापिसा झाला होता, फ्रायर लॉरेन्सचे सल्ले त्याला कानावर पडणार्‍या निरर्थक आवाजासारखे होते. वेडाच्या भरात तो स्वत:चे केस उपटू लागला, स्वत:ला जमिनीवर झोकून देऊन स्वत:च्याच थडग्याचे माप घेऊ लागला. अश्या विक्षिप्त मनस्थितीत असतानाच त्याला त्याच्या प्राणप्रिय पत्नीची, जुलियटची आठवण झाली. त्याने तिला दिलेले संध्याकाळी भेटण्याचे वचन आठवले आणि त्याचा मेंदू पुन्हा सचेत होऊ लागला. ह्याच संधीचा फायदा घेऊन फ्रायर लॉरेन्स त्याच्या अश्या नामर्द आणि भेकड वागण्याबद्दल त्याची कानउघाडणी करू लागले.

“रागाच्या भरात अविचाराने तु फक्त टायबॉल्टचीच नव्हे तर स्वत:चीसुद्धा हत्या केली आहेस, तुझ्या लाडक्या प्रेयसीची हत्या केली आहेस, किंबहुना तुझ्या आयुष्यात असणार्‍या सगळ्याच प्रियजनांची हत्या तू केली आहेस. कोणता कुलीन मनुष्य असा वागतो? सांग मला. शौर्याला धैर्याची साथ असावी लागते. पण तू तर अगदी मेणाचा पुतळा निघालास. खरं तर कायदा तुझ्याशी फार नरमाईने वागला आहे. देहांत प्रायश्चित्ताच्या ऐवजी युवराजांनी तुला केवळ हद्दपार करण्याची शिक्षा सुनावली आहे. तू टायबॉल्टला ठार मारलेस खरे पण टायबॉल्टने जर तुला मारले असते तर जास्त बरे झाले असते. जुलियट जोपर्यंत जिवंत तोपर्यंत कायम तुझ्यावर प्रेम करत राहील ह्या आशेने समाधानाने तू मेला असतास. विवाहप्रसंगी दिलेले माझे सगळे आशीर्वाद तू तुझ्या एका चुकीमुळे व्यर्थ घालवले.“

मग फ्रायर लॉरेन्सनी परिस्थितीने लाचार झालेल्या रोमियोला गदगदा हलवून भानावर आणले. आणि रोमियो थोडा स्थिर झाल्यावर त्यांनी त्याला सल्ला दिला की त्याने त्याच रात्री कुणाच्याही नकळतपणे जुलियटची भेट घेऊन तिचा निरोप घ्यावा; आणि सरळ ‘मँटुआ’ शहरी निघून जावे. आणि तोपर्यंत तिथेच वास्तव्य करावे जोपर्यंत फ्रायर लॉरेन्स एखादा चांगला प्रसंग पाहून त्याच्या आणि जुलियटच्या विवाहाची करत नाहीत. ज्यामुळे ही दोन्ही घराणी त्यांच्यातील वैर विसरून एकत्र येतील; परिणामी वेरोनामध्ये परत शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहणार असल्यामुळे युवराज खुष होतील आणि त्यांनी दिलेल्या शिक्षेचा फेरविचार करून रोमियोला परत बोलावून घेतील अशी खात्री फ्रायर लॉरेन्सना होती. आणि दरम्यानच्या काळात इथल्या घडामोडींची बातमी ते त्याला पत्राद्वारे कळवत राहतील असे आश्वासन दिले. रोमियोलाही त्यांचे म्हणणे पटले आणि त्याने त्यांचा निरोप घेतला. आणि ती रात्र त्याच्या पत्नीच्या सहवासात व्यतीत करून सूर्योदयापूर्वीच मँटुआकरिता प्रस्थान करण्याच्या प्रयोजनाने त्याने फ्रायर लॉरेन्सचा निरोप घेतला.

ठरल्याप्रमाणे रोमियो त्या रात्री दोरखंडाच्या शिडीवरून जुलियटच्या ‘त्या’ गवाक्षापर्यंत चढून गेला जिथे त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. दोघांची भेटही झाली. पण ती रात्र खूप अवघड होती. वातावरणात भयाण शांतता होती. विवाहाचा आनंद साजरा करावा की त्या दिवसभरात घडलेल्या घटनांचे दु:ख करावे, अश्या संमिश्र भावना दोघांच्या मनात होत्या. कुठून सुरवात करावी, काय बोलावे, दोघांनाही काही कळत नव्हते. पण आता पहाट झाली होती. लार्क पक्षाच्या आवाजाने जुलियटला जाग आली. पण तिला वाटले की तो भास असेल, रात्र अजून संपलीच नसेल आणि तो आवाज रात्रीच्या बुलबुल पक्ष्याचा असेल, म्हणून तिने उठून पहिले तर तो आवाज लार्क पक्ष्याचाच होता. पण त्यादिवशी लार्क पक्ष्याचा तो सुरेल आवाज तिला बेसूर आणि अपशकुनी वाटत होता कारण तो तिला सांगत होता की तिची आणि तिच्या प्रियकराच्या विरहाची वेळ झाली होती. आता परत ते कधी आणि कसे भेटू शकतील हे त्या दोघांनाही माहित नव्हते. रोमियोने रोज तिला मँटुआवरून एक पत्र लिहिण्याचे आश्वासन दिले. मनावर दगड ठेवून, सजल नेत्रांनी दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. जाताना त्याने जेव्हा तिच्याकडे कटाक्ष टाकला तेव्हा ती निस्तेज, शुष्क नजरेने एकटक त्याच्याकडे बघत होती, जणूकाही ती जिवंतपणी मरणयातना भोगत होती. रोमियोचीही तीच अवस्था होती. पण त्याला निघणे भाग होते कारण येणारा सूर्योदय वेरोना शहरात त्याच्यासाठी मृत्यू घेऊन येणारा होता.

***********************

पण ही तर फक्त सुरुवात होती त्या प्रेमयुगुलाच्या शोकांतिकेची, त्यांची ग्रहदशाच वाईट होती कदाचित. कॅप्युलेट कुटुंबिय टायबॉल्टच्या दु:खातून आता बर्‍यापैकी सावरले होते. रोमियोला जाऊन फार दिवसही झाले नव्हते तोच लॉर्ड कॅप्युलेट, जुलियटचे वडील आता तिच्या लग्नाचा विचार करू लागले. त्यांना रोमियो-जुलियटच्या विवाहाबद्दल काहीच कल्पना नव्हती. जुलियटकरता त्यांनी ‘काउंट पॅरिस’ नामक एका सज्जन युवकाची निवड केली, जो अतिशय पराक्रमी, स्त्रीदाक्षिण्य असणारा, सभ्य, सालस युवक होता आणि मुख्य म्हणजे जुलियटला साजेसा होता. जुलियटच्या आयुष्यात जर आधी रोमियो आला नसता तर ह्याला नकार द्यायला कुठेच जागा नव्हती.

आधीच शोकमग्न अवस्थेत असलेली जुलियट तिच्या वडीलांच्या ह्या विवाहाच्या प्रस्तावामुळे आणखिनच गोंधळून गेली. ती तिच्या वडीलांना विनवणी करू लागली की टी वयाने अजूनही लहान आहे आणि नुकत्याच झालेल्या टायबॉल्टच्या निधनाच्या शोकातून ती अजूनही बाहेर आलेली नाही. अश्या उदास मनाने, म्लान चेहर्‍याने ती तिच्या भावी नवर्‍याच्या आयुष्यात आनंद आणू शकणार नाही. किंबहुना कॅप्युलेट घराण्यात नुकतेच त्यांच्या स्व‍कीयाचं निधन झाले असूनही लगेचच ही मंडळी लग्नाचा सोहळा पार पाडत आहेत, हे किती असभ्यपणाचे वाटेल. जुलियटने तो विवाह टाळण्यासाठी हरप्रकारची कारणे देऊन बघितले, पण जे महत्त्वाचे आणि खरे कारण तेवढेच तिने द्यायचे टाळले होते ते म्हणजे ती आधीच विवाहबद्ध होती. पण लॉर्ड कॅप्युलेट कोणत्याच कारणाला बधत नव्हते. उलट त्यांनी तर फर्मान जारी केले की येणार्‍या गुरूवारी काउंट पॅरिस तिचे लग्न करण्यात येईल. तसेच तिला तंबी अशी दिली की काउंट पॅरिस सारखा श्रीमंत, उच्चकुलीन तरुण तिला पती म्हणून मिळतोय हे वेरोनामधील इतर मुलींपेक्षा कितीतरी भाग्याचे आहे म्हणून तिने त्याचा आनंदाने स्वीकार करावा; आणि स्वत:च्याच वागण्याने तिच्या भावी आयुष्यात अडथळे येतील असे काहीही वागू नये.

ह्या प्रसंगाला कसे सामोरे जावे हे जुलियटला कळत नव्हते म्हणून पुढे काय करावे ह्याविषयी सल्ला घ्यायला ती तडक फ्रायर लॉरेन्स ह्यांच्याकडे गेली कारण एक तर तिला कधीही, कसलीही अडचण आली तरी ती कायम त्यांच्याकडे जायची. त्यांच्या सल्ल्याने तिचा ताण हलका व्हायचा; आणि दुसरे म्हणजे तिच्या आणि रोमियोच्या प्रेमविवाहाचे ते महत्त्वपूर्ण साक्षीदार आणि मदतगार होते.

त्यांनी तिला विचारले, “रोमियोच्या प्रेमासाठी तू काय करू शकते? म्हणजे समजा मी तुला काही सल्ला किंवा औषध दिले जे तुला मरणाच्या दारात घेऊन जाईल तर ते तू करू शकशील का? घाबरणार तर नाहीस ना?”

“माझा प्रिया पती जिवंत असताना दुसरा विवाह करण्यापेक्षा मी जिवंतपणीसुद्धा मरणाचा स्वीकार करायलाही घाबरणार नाही.” क्षणाचाही विलंब न करता जुलियटने उत्तर दिले.

त्यांनी तिला तूर्त घरी जाऊन तिच्या वडीलांच्या इच्छेप्रमाणे काउंट पॅरिसशी विवाह करण्यासाठी तिची संमती आहे असे दर्शवण्याचा सल्ला दिला आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे तिच्या लग्नाच्या आदल्या रात्री तिला भेटायला बोलावले.

ठरल्याप्रमाणे जुलियट विवाहाच्या आदल्या रात्री फ्रायर लॉरेन्स ह्यांच्या मठीत जाऊन पोचली. त्यांनी तिला औषधाची एक कुपी दिली. आणि सांगितले की,

“ह्या औषधाचा परिणाम साधारण बेचाळीस तासांकरिता राहील. हे औषध प्यायल्यावर तुला आभासी मरण येईल, तू एखाद्या शवाप्रमाणे थंडगार आणि निष्प्राण दिसशील. आणि सकाळी जेव्हा तुझा भावी पती तुला घेऊन जाण्यासाठी येईल तेव्हा तू त्याला मृतवत भासशील. मग आपल्या प्रथेप्रमाणे तुला उघड्या शवपेटीतून तुमच्या म्हणजे कॅप्युलेट घराण्याच्या शवागारात पुरून टाकतील. तू जर का भीती न बाळगता ह्या प्रयोगाला तयार असशील तर मी खात्रीने सांगतो की औषध प्यायल्यानंतर बेचाळीस तासांनी तू परत शुद्धीवर येशील, जणू काही तू गाढ झोपेतून जागी झालीस. तू परत शुद्धीवर येण्यापूर्वी मी रोमियोला निरोप पाठवून इथे बोलावून घेईन, आपल्या योजनेची कल्पना देईल, आणि रात्रीच तुला इथून मँटुआला घेऊन जायला सांगेन. पण हे सगळे तू करू शकशील ना? घाबरणार तर नाहीस ना?” - फ्रायर लॉरेन्सनी चिंताग्रस्त होऊन जुलियटला विचारले.

रोमियोवरचे प्रेम आणि काउंट पॅरिसशी होणार्‍या विवाहाची भीती, ह्यामुळे जुलियटला हे भयानक साहस करण्याचे बळ आले. तिने ती औषधाची कुपी घेतली आणि फ्रायर लॉरेन्स ह्यांनी सांगितलेल्या सूचना लक्षात ठेवण्याचे आश्वासन देऊन तेथून निघून गेली.

मठातून घरी जाण्यापूर्वी ती काउंट पॅरिसला भेटायला गेली. अतिशय नम्रपणे विवाहासाठी होकार कळवला आणि त्याची नववधू होण्याचे वचन दिले. ह्याऐवजी तिने आपणहून तिच्या वडीलांना खरी गोष्ट सांगितली असती तर आजची परिस्थिती काही वेगळीच असली असती. पण असो...! ह्या बातमीने लॉर्ड कॅप्युलेट आणि त्यांच्या पत्नीला खूप आनंद झाला. वृद्ध लॉर्ड कॅप्युलेटच्या अंगी तर नवतारुण्य संचारले. जुलियट, जी इतके दिवस काउंट पॅरिसशी लग्नाला विरोध करून त्यांना नाराज करत होती, तिने त्यांच्या आज्ञेचे पालन करण्याचे वाचन दिल्याने ती अधिकच लाडकी झाली. घरातले वातावरण लग्नसराईमुळे गडबडीचे आणि धामधुमीचे होते. हा लग्नसोहळा वेरोना शहरातील एकमेवद्वितीय सोहळा व्हावा म्हणून कुठेही खर्चाची पर्वा केली जात नव्हती.

बुधवारची रात्र आली, औषध पिण्याकरिता जुलियट कुपी हातात घेतली. पण तिच्या मनात नानाविध विचार थैमान घालू लागले. सुरुवातीला तिला फ्रायर लॉरेन्सच्या हेतूविषयी शंका आली होती की त्यांनी तिचा विवाह रोमियोशी लावून दिला हा आरोप त्यांच्या माथी लागू नये म्हणून त्यांनी तिला औषधाऐवजी विषा तर नसेल ना दिले..? पण मग तिने विचार केला की फ्रायर लॉरेन्स हे संत म्हणून ओळखले जात होते, त्यांनी असं काही करणे अशक्य गोष्ट होती. मग तिच्या मनात भीती जागी झाली की जर रोमियो यायच्या आधीच जाग आली तर त्या भयानक शवागारात ती एकटीच असेल आणि आसपास असतील सगळ्या मृत कॅप्युलेटच्या विखुरलेल्या अस्थि, आणि टायबॉल्टचा रक्तबंबाळ मृतदेह त्याच्या प्रेतवस्त्रात पडला असेल. आणि हे कमी का काय म्हणून तिला आत्तापर्यंत ऐकलेल्या भुताखेताच्या गोष्टी आठवू लागल्या की अश्या ठिकाणी जिथे त्या माणसांना पुरलेले असते त्यांचे भूत तिथेच भटकत असते..... पण मग तिला रोमियोच्या प्रेमाची आणि काउंट पॅरिसबद्दलच्या नापसंतीची आठवण झाली आणि एका दमात तिने ते सगळे औषध पिऊन टाकले. आणि अचेतन अवस्थेत पडून राहिली.

अखेर, विवाहाचा दिवस उजाडला. काउंट पॅरिस वाजतगाजत त्याच्या नववधूला, जुलियटला घेऊन जाण्यासाठी आला. जुलियटची दासी विवाहाकरिता जुलियटचा शृंगार करून देण्यासाठी तिच्या कक्षात गेली. आणि तिला हाक मारून जागे करू लागली पण जुलियट काही उत्तरच देत नव्हती किंबहुना तिच्यामध्ये कसलीच हालचाल दिसत नव्हती, अगदी श्वासाचीसुद्धा...! हे पाहून दासी घाबरली आणि अकांत करू लागली...

“वाचवा! वाचवा! कुणीतरी मदत करा. मा‍झ्या मालकीणबाई काही उत्तर देत नाहीयेत. त्यांच्या पलंगावर त्या निष्प्राण पडून आहेत,... कुणीतरी या.... मला मदत करा....”

लेडी कॅप्युलेट तीरासारख्या धावत आल्या, त्यांच्या पाठोपाठ लॉर्ड कॅप्युलेट आणि काउंट पॅरिस धावत धावत जुलियटच्या कक्षात आले; तेव्हा त्यांनी पलंगावर पडलेला जुलियटचा निस्तेज आणि निष्प्राण देह पहिला. अश्रूंचा पूर वाहू लागला. पण त्याचा काहीच उपयोग नव्हता. कारण त्यांचा विलाप जुलियटला परत आणु शकणार नव्हता. काउंट पॅरिस शोकाकुल झाला होता. अजून त्या दोघे विवाहबद्ध झालेही नव्हते त्यापूर्वीच त्यांची ताटातूट झाली. लॉर्ड कॅप्युलेट आणि लेडी कॅप्युलेट ह्यांच्या दु:खाला तर पारावरच नव्हता. जुलियट त्यांचे एकुलती एक अपत्य होते. अश्या हसत्या खेळत्या मुलीला असे अकाली निधन का बरे यावे आणि तेही अशावेळी जेव्हा त्यांच्या मते ती तिच्या सुंदर भविष्याची सुरुवात करण्याच्या आनंदात होती अस प्रश्न ते देवाला करत होते.

अचानक सगळ्या घराचे वातावरणच पालटले. लग्नघराला मृत्यूची अवकळा आली. लग्नसोहळ्याचे रूपांतर जुलियटच्या अंत्ययात्रेत झाले. ज्या वस्तू तिचा विवाहमंडप सजवत होत्या त्या आता तिच्या अंत्ययात्रा सजवू लागल्या. विवाहाची मेजवानी आता दुखवट्याचे जेवण झाली होती. मंगलाष्टकांच्या ऐवजी आता शोकगीते आणि हुंदके ऐकू लागले. आशीर्वाद म्हणून उधळायला आणलेली फुले आता अंत्ययात्रेसाठी जमिनीवर विखुरली गेली. विवाहाचे मंत्र म्हणण्यासाठी आलेले धर्मगुरू आता तिच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करू लागले. तिला चर्चमध्ये नेण्यात आले पण ते लग्नविधीसाठी नाही तर अंत्यविधीसाठी...!!!

***********************

पण म्हणतात ना... वाईट बातमी वार्‍याच्या वेगाने पसरते. तोपर्यंत रोमियोचा एक नोकर ज्याला रोमियो-जुलियटच्या विवाहाचे गुपित माहित होते पण जुलियटच्या आभासी मृत्यूचे सत्य माहित नव्हते, त्याच्या कानावर जेव्हा जुलियटच्या अंत्ययात्रेची वार्ता पोचली तेव्हा तो तडक मँटुआला पोचला. खरे तर त्याला बघून रोमियोला आनंद झाला होता कारण त्याच रात्री त्याला एक खूपच अद्भुत आणि सुखद स्वप्न पडले होते; स्वप्नात तो मेला होता आणि तिथे त्याचे प्रिय पत्नी आली, जेव्हा तिने त्याला अशा अवस्थेत पहिले तेव्हा तिने तिच्या ओठांनी त्याच्या ओठांचे चुंबन घेत त्याच्यामध्ये नवीन प्राण फुंकले. आणि मग तो एक खूप मोठा सम्राट झाला होता. आपला सेवक त्या स्वप्नासारखीच सुखद बातमी घेऊन आला असेल असा रोमियोचा समज झाला होता. पण स्वप्न आणि सत्य ह्यामध्ये खूप अंतर होते. तो सेवक अत्यंत खेदजनक वार्ता घेऊन आला होता. दरम्यान फ्रायर लॉरेन्सनीसुद्धा मँटुआला गेलेल्या रोमियोला एका दूताला सत्यपरिस्थिती सांगायला पाठवला होते की त्याने म्हणजे रोमियोने कसलीही काळजी करू नये आणि तातडीने वेरोना शहरी परत येऊन ठरल्याप्रमाणे शुद्धीवर आल्यानंतर जुलियटला मँटुआला घेऊन जावे. पण दुर्दैवाने तो दूत रोमियोपर्यंत पोहचूच शकला नाही आणि पर्यायाने फ्रायर लॉरेन्स ह्यांचा निरोपही!

दुर्दैवाने हा सेवक रोमियोपर्यंत पोचला. त्याने जेव्हा रोमियोला त्याच्या पत्नीच्या, जुलियटच्या आकस्मिक निधनाची बातमी दिली आणि त्याला समजले की त्याचे पत्नी खरोखरीच मरण पावली होती आणि ती कुठल्याही चुंबनाने पुनर्जीवित होणार नव्हती तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने त्याचे घोडे तयार करण्याची आज्ञा केली. आणि तातडीने वेरोना शहरी जाऊन जुलियटला बघण्याचा निर्णय घेतला.

विनाशकाले विपरीत बुद्धी... म्हणतात तसे त्यावेळी रोमियोला एका वैदूची आठवण झाली. ज्याचे दुकान रोमियोला मँटुआ शहरात फेरफटका मारताना नजरेस पडले होते. अत्यंत हीनदीन अवस्थेत असणारा हा माणूस कित्येक दिवसांचा उपाशी असल्याचे भासत होते. त्याच्या पडक्या घरात मळकी फडताळे आणि त्यांच्यावर रिकामे डबे एवढाच त्याचा संसार होता. स्वत:च्या आयुष्याला कंटाळून, निराश होऊन एखाद्या निष्कर्षापर्यंत यावे तसे त्याने एकदा म्हणले होते की, “जर कुणाला कधी विष हवे असेल, जे मँटुआ शहरात मृत्यू विकण्याचा गुन्हा ठरते, तर त्याने त्याच्याकडे जावे, तो त्याला विषही विकेल.”

त्याचे हे वाक्य रोमियोच्या डोक्यात घोळत होते, म्हणूनच त्याने त्या वैदूला शोधले. थोडे आढेवेढे घेतल्यानंतर, रोमियोने दाखवलेल्या सोन्याच्या अमिषाने त्याला भुरळ पाडली. त्याची गरीबी ती संधी सोडू नाही शकली नाही. आणि त्याने रोमियोला विषाची कुपी विकत दिली, ते विष इतके जहाल होते की वीस माणसाची ताकद असणार्‍या मनुष्याने जरी ते प्यायले तरी एका क्षणात त्याचा मृत्यू झाला असता.

हे विष विकत घेऊन रोमियोने तडक वेरोना शहर गाठले. आधी जुलियटला शेवटचे बघायचे आणि तिथेच नंतर विषप्राशन करून आत्महत्या करायची असे त्याच्या डोक्यात होते. म्हणून तो थेट स्मशानभूमीत येऊन पोचला. त्याला तिथे पोचेपर्यंत मध्यरा‍त्र झाली होती. स्मशानभूमीच्या मध्यभागी कॅप्युलेट घराण्याचे पुरातन बंदिस्त शवागार होते, जिथे कॅप्युलेट परिवारातील सर्व मृतदेह विसावा घेत होते. त्यातच एक देह जुलियटचा होता. येतानाच तो त्याच्याबरोबर एक दिवा, कुदळ आणि फावडे घेऊन आला होता. एकेक करून तो तळघरावरचे दगडी आच्छादन बाजूला सारू लागला. तेवढ्यात त्याला कुणीतरी असे करताना अडवले.

तो काउंट पॅरिस होता, ज्याचा विवाह आज जुलियटबरोबर होणार होता. त्याच्या होणार्‍या पत्नीला भेटायला तो अश्या रात्रीच्या वेळी तिथे आला होता. जुलियटच्या फुले वाहून तिच्यापाशी बसून त्याचे मन हलके करण्यासाठी तो तिथे गेला होता. पण तिथे त्याने रोमियोला बघितले. रोमियो कोण होता किंवा आत्ता त्या शवागारापाशी त्याचे काय काम होते ह्याचा त्याला काहीच अंदाज नव्हता. त्याला फक्त एवढे माहित होते की तो एक माँटेग्यु होता आणि माँटेग्यु म्हणजे कॅप्युलेटचा शत्रू. ह्यावरून त्याने अंदाज लावला की ह्या वेळी तो इथे ह्यावेळी तो इथे कॅप्युलेटच्या मृतदेहांची अवहेलना करण्यासाठीच आला असणार. म्हणून तो रागाच्या भरात रोमियोला धमकावू लागला.

“अरे नराधमा, तू एक दुष्ट माँटेग्यु आहेस. तुझी हिम्मत कशी झाली इथे येऊन ह्या कॅप्युलेट परिवाराच्या मृतदेहांची अशी अवहेलना करण्याची?”

बिचारा रोमियो! आधीच तो जुलियटच्या मृत्यूने वेडापिसा झाला होता तरी तो नम्रपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करू लागला.

पण काउंट पॅरिस काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो रोमियोला धमकावू लागला, “तुला बजावले होते ना की परत जर का तू वेरोना शहरात पाऊल ठेवलेस तर तुझा वध करण्यात येईल तरीही तू का आलास?”

“हो... खरं आहे ते.”, रोमियो विनंती करू लागला. “पण मी इथे कुणालाही इजा पोहोचवायला आलेलो नाहीये. अरे सज्जन माणसा! कृपा करून मला एकटे सोड. जा... इथून निघून जा. मा‍झ्या जीवापेक्षा मला तुझी जास्त काळजी आहे. उगीच माझ्या रागाला डिवचू नकोस. माझ्याहातून काहीतरी बरेवाईट होण्याआधी तू इथून निघून जा.”

पण काउंट पॅरिसने त्याचे काहीही न ऐकता सरळ त्याच्यावर हल्ला केला आणि म्हणाला, “मी तुला अजिबात जुमानत नाही. आणि आता मी तुला ह्या गंभीर गुन्ह्याखाली अटक करणार आहे.”

रोमियोला त्याचा राग अनावर झाला. घोर निराशा आणि रागाच्या भरातच त्याने तलवार काढली आणि प्रतिहल्ला केला. बराच वेळ दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले, रोमियोची तलवार त्याच्या आरपार गेली आणि अखेरीस काउंट पॅरिस धराशायी झाला.

नंतर रोमियोने जेव्हा दिव्याच्या प्रकाशात हे बघण्याचा प्रयत्न केला की त्याने कुणाला मारले आहे तेव्हा त्याला दिसले की तो काउंट पॅरिस होता. जो रोमियोचा मँटुआला झालेला मित्र होता आणि नंतर त्याचेच लग्न जुलियटशी ठरले होते. त्याला वाईट वाटले की इतक्या चांगल्या माणसाला आपण दुर्दैवाने खूप वाईट समयी भेटलो. पण त्याने काउंट पॅरिसचा मृतदेह हातात उचलला आणि त्याला एका वीरगती मिळालेल्या सेनानीसारखी खास जागा द्यायची, म्हणून रोमियोने त्याचा मृतदेह जुलियटच्या मृतदेहापाशी ठेवला. आणि तो तिच्यापाशी बसून तिच्याकडे एकटक बघत राहिला. मृत्युमध्येही एवढी ताकद नव्हती की तो तिचे सौंदर्य, तिची कांती कमी करू शकेल, खरच कित्ती सुंदर दिसत होती ती अजूनही...!, रोमियो विचार करत होता. जणू काही मृत्यूने त्याचे मिष्टान्न म्हणून तिला राखून ठेवला असावे. पण खरं कारण तर वेगळेच होते, ती जिवंत होती म्हणून ती तशीच टवटवीत आणि सुंदर दिसत होती, औषधिमुळे ती अचेतन होती इतकेच. तेवढ्यात रोमियोची नजर शेजारी पडलेल्या टायबॉल्टच्या रक्ताने माखलेल्या प्रेतवस्त्रातील मृतदेह बघितला आणि त्या निर्जीव शरीराची माफी मागीतली. जुलियटच्या प्रेमासाठी त्याने त्याला ‘बंधु’ म्हणून संबोधले. आणि सांगितले की तो आता त्याच्या शत्रूची हत्या करून त्याच्यावर एक उपकार करणार आहे, म्हणजे स्वत:लाच संपवणार आहे. त्याने त्याच्या लाडक्या जुलियटचे शेवटचे चुंबन घेऊन, स्वत:च्या दुर्भाग्याचा ससेमिरा थांबवण्यासाठी त्या वैदूकडून आणलेले विष प्राशन करून प्राणत्याग केला. ह्या विषाचा परिणाम वास्तविक आणि प्राणघातक होता, जुलियटने प्यायलेल्या औषधिसारखा तात्पुरता नव्हता. ज्या औषधिमुळे ती आता थोड्या वेळातच जागी होणार होती आणि तक्रार करणार होती की रोमियोने त्याची वेळ नाही पाळली किंवा का तो खूपच लवकरच आला होता...?

आता तो क्षण आला होता ज्या क्षणी फ्रायर लॉरेन्सने सांगितल्याप्रमाणे जुलियटला शुद्ध येणार होती. पण त्यांना जेव्हा हे कळाले की त्यांची पत्रे घेऊन मँटुआला निघालेला त्यांचा दूत काही अपरिहार्य कारणांमुळे रोमियोपर्यंत पोहचूच शकला नाही तेव्हा लगबगीने ते स्वत:च कुदळ आणि कंदील घेऊन जुलियटला त्या शवागाराच्या कैदेतून सोडवायला निघाले. पण त्यांना आश्चर्य वाटले कारण कॅप्युलेट-शवागारात आधीच एक दिवा जळत होता. त्यांना यायला खूप उशीर झाला होता. त्यांच्या नजरेसमोरील परिस्थिती खूपच विषण्ण करणारी होती कारण जवळ जाऊन पहिले तर तिथे रक्ताने माखलेल्या तलवारी दिसल्या आणि शेजारीच रोमियो आणि काउंट पॅरिस ह्यांचे मृतदेह पडलेले होते.

समोर दिसत असलेल्या परिस्थितीवरून ते घटनांचा निष्कर्ष काढणार की असे काय झाले म्हणून दुर्दैवी प्रसंग ओढवला, तेवढ्यात जुलियट शुद्धीवर आली आणि फ्रायर लॉरेन्सना समोर बघून तिला ती कुठे आहे, का आहे हे सर्व आठवले. लगेचच तिने रोमियोची चौकशी केली. पण तेवढ्यात कसलातरी आवाज कानावर पडल्यामुळे फ्रायर लॉरेन्सनी तिला त्या शवागारातून बाहेर पडण्यास सांगितले कारण त्यांनी केलेल्या त्या अनैसर्गिक प्रयोगामुळे आसपासच्या अनेक शक्ती त्यांचा गैरफायदा घेऊ शकल्या असत्या. अचानक त्यांच्या कानावर लोकांचा आवाज आला आणि घाबरून अडखळून बाहेर पडले. तेव्हा जुलियटने तिथे पडलेला रोमियोचा मृतदेह बघितला आणि त्याच्या हातात एक कुपी होती. ते पाहून जुलियटच्या लक्षात आले की त्याने विषप्राशन करून आत्महत्या केली असणार आणि त्याचे कारण ती स्वत: असणार. तेव्हा तिचा स्वत:वरील ताबा सुटला, तिची घालमेल होऊ लागली, तिने धडपडत ती विषाची कुपी घेऊन स्वत:च्या तोंडाला लावली. तिलासुद्धा ते विष प्राशन करायचे होते, पण ते संपले होते. मग ती रोमियोच्या ओठांचे चुंबन घेऊ लागली की त्याच्यावर काही विषाचे थेंब असतील तर ते ती प्राशन करेल. पण त्याचा काहीच उपयोग नव्हता. लोकांचा आवाज जसजसा जवळ येऊ लागला तसे तिने रोमियोचे खंजीर घेतले आणि स्वत:च्या छातीत आरपार केले. आता मात्र ती रोमियोच्या हृदयावर डोके ठेवून चिरनिद्रेत सुखावली होती.

हे सर्व सुरू झाले, म्हणजे रोमियो आणि काउंट पॅरिस ह्यांची लढत जेव्हा सुरू झाली तेव्हा तिथे असलेल्या काउंट पॅरिसच्या हुजर्‍याने आसपासच्या रस्त्यांवर जाऊन आरडाओरडा करायला सुरुवात केली होती. तेव्हा येणार्‍या जाणार्‍या लोकांना नुसतेच, ‘काउंट पॅरिस’!!, ‘रोमियो’!! असे काहीसे ऐकू येत होते. म्हणून ते गोळा होऊ लागले. एव्हाना ही अफवा सर्वदूर पसरली. त्या गदारोळामुळे लॉर्ड कॅप्युलेट, लॉर्ड माँटेग्यु आणि युवराज तिथे पोचले आणि परिस्थितीची शहानिशा करू लागले. तेवढ्यात काही लोकांनी फ्रायर लॉरेन्सना तेथून संशयास्पदरीत्या पळून जाताना पकडले. फ्रायर लॉरेन्स गोंधळलेले, घाबरलेले आणि धापा टाकत तिथे उभे होते. एव्हाना कॅप्युलेट घराण्याच्या शवागाराभोवती भोवती मोठी वर्दळ जमा झाली होती. घडलेल्या ह्या विचित्र आणि विनाशकारी प्रसंगाचे सत्य जाणून घेण्यासाठी युवराजांनी फ्रायर लॉरेन्सना त्यांच्यासमोर हजार करण्याचे फर्मान सोडले.

आणि मग सर्वांसमक्ष फ्रायर लॉरेन्सनी त्यांच्या म्हणजे लॉर्ड कॅप्युलेट आणि लॉर्ड माँटेग्यु ह्यांच्या मुलांची विलक्षण प्रेमाची, त्यांच्या विरहाची, मृत्युच्या आभासाची, आणि नंतर त्यांच्या झालेल्या रोमियो-जुलियट आणि काउंट पॅरिसच्या दुर्दैवी अंताची कथा सांगितली. आणि हेही सांगितले की त्यांनीच त्यांच्या विवाहास मदत केली होती पण ह्यात त्यांचा केवळ एवढाच हेतू होता की कॅप्युलेट-माँटेग्यु ह्यांच्या घराण्यात पिढ्यानुपिढ्या चालत आलेले शत्रुत्व संपावे आणि सगळे आनंदाने एकत्र नांदावे. उर्वरित कहाणी काउंट पॅरिसच्या हुजर्‍याने सांगितली. तोपर्यंत रोमियोचा वेरोना शहरातील सेवकही तिथे पोचला, ज्याच्याकडे रोमियोने त्याच्या वडीलांना मृत्युपूर्वी लिहिलेले पत्र होते. ज्यात त्याने त्यांना फ्रायर लॉरेन्सशी त्यांचे असलेले संबंध तसेच ठेवायला सांगितले होते आणि त्याच्या आणि जुलियटच्या विवाहाची, आणि तिच्या मृत्युनंतर विषप्राशन करून आत्महत्या करणार असल्याची कबुली दिली होती. त्याच बरोबर एकंदरीत परिस्थिती साठी त्यांची माफीदेखील मागीतली होती.

त्यामुळे सर्वानुमते असे ठरवण्यात आले की ह्या घातपातामध्ये फ्रायर लॉरेन्स ह्यांचा काहीही दोष नाहीये. आणि मृत्युसारख्या सूक्ष्म गोष्टींवर ह्यांनी ताबा मिळवून त्याचा अनैसर्गिक वापर केला असला तरी त्यात त्यांचा काहीच स्वार्थ नव्हता. म्हणून त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले.

आता युवराजांनी त्यांचा मोर्चा वृद्ध लॉर्ड कॅप्युलेट आणि लॉर्ड माँटेग्युकडे वळवला. आणि म्हणाले, “आता तरी डोळे उघडावे. त्यांच्या क्रूर आणि विनाकारण असलेल्या शत्रुत्वामुळे आज एवढे मोठे अरिष्ट तुमच्यावर कोसळले. तुमच्या आपापसातील द्वेषामुळे खुद्द दैवाने तुमच्यापासून तुमची प्रेमळ आणि निष्पाप मुले अकाली हिरावून घेऊन तुम्हाला कठोर शिक्षा केली आहे.”

खरेच होते म्हणा, ह्या दोन्ही वृद्धांचे सर्वस्व देवाने हिरावून घेतले होते. आता पश्चातापाशिवाय हातात काहीही उरले नव्हते. म्हणून त्यांच्यातील वैर विसरून ते दोघे एकत्र आले आणि त्यांचे जुने शत्रुत्व त्यांच्या मुलांबरोबरच पुरून टाकायचे त्यांनी ठरवले. लॉर्ड कॅप्युलेटनी त्यांचा मैत्रीपूर्ण हात लॉर्ड माँटेग्युच्या समोर करून दोन्ही घराण्याच्या एकीचे प्रतीक म्हणून आणि त्यांच्या मुलांच्या विवाहाला स्वीकृती दिल्याच्या प्रतिमात्मक म्हणून त्यांना बंधु असे संबोधले. लॉर्ड माँटेग्युनी देखील त्यांचा मान ठेवून त्यांच्या मैत्रीचा स्वीकार केला आणि रोमियो- जुलियटच्या आठवणीत सोन्याची प्रतिमा बनवायची इच्छा व्यक्त केली, जेणेकरून संपूर्ण वेरोना शहर त्यांना कायम लक्षात ठेवेल. अश्या तर्‍हेने जुने वैर संपल्यानंतर त्या दोघांमध्ये चांगुलपणाची चढाओढ सुरू झाली. आता सर्वजण आनंदी होते, शत्रुत्व संपले होते, कुठलाही वाद नव्हता; पण ह्या सगळ्याची मोठी किंमत मोजली होती त्या दोन निष्पाप जीवांनी.... रोमियो-जुलियटनी.

इतर रसदार पर्याय