थोडं मनातलं Anant Khade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

थोडं मनातलं

 "आजपासुन मी तुला स्वातंत्र्य बहाल करतोय,स्वातंत्र्य विचारांचं .चांगलं,वाईट तु ठरवायचंस.विविध प्रवृत्तींमधे तुला एकटं सोडतोय.तुला कुणासोबत रहायचंय हे तु ठरव.कारण तु स्वतंत्र आहेस.फक्त एक लक्षात ठेव! ह्या स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ देऊ नकोस ,कारण अतिरेक झाला की माणुस स्वैराचारी होतो.आणि जर स्वैराचारी झालास तर संपुन जाशील."
    प्रिन्सिपल उमाळेंच्या कक्षातुन बाहेर आल्यानंतर बाबा बोलत होते .काँलेजच्या गेटच्या कोपऱ्यात एक पोस्ट ऑफिस होतं,बाबांनी काही पोस्ट कार्डस् आणि अंतर्देशीय पत्रांचा गठ्ठा माझ्या हाती दिला.म्हणाले"काही अडचण आली तर लिहायचं."
    त्यांनी रिक्षा थांबवली ,चल!येतो रे म्हणाले.बाबांच्या करड्या आवाजाला असलेली कातर स्वराची धार मात्र प्रकर्षाने जाणवली.माझ्याकडे न बघताच ते रिक्षात बसुन निघुन गेले.शिवाजी बहुउद्देशीय कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात मी आता खऱ्या अर्थाने एकटा होतो.
मी पाऊल उचललं.बाबांचा एकेक शब्द काळजात विसावला होता.
तो माझा काँलेजचा पहीला दिवस होता.
 .: गावातल्या मंदीराचा उंच कळस आणि त्यावर बांधलेल्या भोंग्यातुन प्रल्हाद शिंदेच्या दमदार ,मंगल आवाजाने पहाट दणाणुन जायची.वेलीवरची फुलं आणि तितक्याच नाजुकपणे हळुहळू उमलणारी विस्मयकारी पहाट ,बादल्यांचा आवाज ,पक्षांची किलबील,अंगणात शिंपल्या जाणाऱ्या सड्याचा सर्रsss सपाक् ध्वनी ,सडा शिंपडतांना आईच्या बांगड्यांची किणकिण,काकडा आरतीतला  टाळ आणि ढोलाचा टिन्न ज्याडुंब्ब हा लयबद्ध आवाज आणि दुरवर "जगी जिवनाचे सार..."किती आवाज!
उगवणाऱ्या दिवसाचं स्वागत करणारा पहाटेचा महासोहळाच तो.
तंबाखु तोंडात भरुन किंवा बिडीचं थोटुक तोंडात धरुन, हातात टमरेल घेऊन लगबगीनं लोकल पकडायच्या घाईनं जाणारी माणसं,तोंडात काळंशार कोळशाचं कुट भरुन रस्त्यावर पिचकाऱ्या मारणारी मंडळी ,गाईच्या पायाच्या मधे दुधाने फेसाळलेली बकेट घेऊन बसलेला गोठ्यातला पांडु.
   आज सकाळी असं काहीच नव्हतं.आमच्या यशोदानगरच्या घरासमोरुन जाणाऱ्या हायवेवरुन सुसाट वेगाने धावणाऱ्या ट्रक्सच्या कर्णकर्कश आवाजाने जाग आली.
अरे!ही आपली करतखेडची सकाळ नव्हे.आणि इथे तर आपण एकटेच आहोत हे लक्षात आलं .कधी कधी नको असलेली परिस्थिती सहज स्विकारतो आपण.त्यापासुन काढता पाय घेतल्यापेक्षा, परीणामाने असं काय काय बिघडेल ?अशी विरक्त भावना मनात येते आणि मग सामना द्यावाच लागणार म्हणुन आपण पुढचं पाऊल उचलतो.परिणामाची भिती मग नष्ट होते आणि माणुस निब्बर होत जातो.समाजातले बेगडी चेहरे ओळखण्याची कला ह्या निब्बरपणातुनच त्याला प्राप्त होते.आणि अश्या मुखवटे धारण केलेल्या मानवी जंतुंमधुन वाट काढत तो आयुष्याचा प्रवास पार पाडत असतो सबवे सर्फरमधल्या  कँरेक्टर सारखा गेम ओव्हर होईपर्यंत..
 भांबावलेपण आणि एकाकीपण सुद्धा वाट्याला आलं होतं जेंव्हा शिवाजी बहु.कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला तेंव्हा. यशोदानगरच्या घरात आईबाबा नोकरीनिमीत्त गावाला राहत असल्यामुळे मी त्या घरात एकटा रहायचो.तिथे विजही नव्हती.अंधार पडला की घर खायला उठायचं.रडु यायचं .बाबांनी आपल्याला शिक्षा दिली असं वाटायचं.त्यात भरीसभर म्हणजे घरासमोरच्या हायवेवर अपघात झाला किंवा मर्डर झाला अश्या बातम्या यायच्या.
   टवाळखोर मजनुछाप हिंस्त्र पशुसारखी पोरं घरासमोरच्या रस्त्याने गप्पा करत जायची "क्या भाव !अ तो मुन्ना पछेलने ऐसा काटा घुँसा दिया ना बावा पेट मे...के इतना खुन बह रा था पुछ मत.."आणखी एखादी खतरनाक शिवी.
   माझे हार्टबिट वाढायचे.
दुसऱ्या दिवशी सकाळी बघीतलं तर राँकेल संपलेलं. नितीन विधळे,संजय शिरभाते,सचीन काळे,नरु,मिल्या,घारड ई.च्या गप्पा चालल्या होत्या.मी संकोचुन बाजुला ऐकत होतो.तिकडुन अर्चना वर्धेकर एखाद्या लेडी डाँन सारखी हातात हाँकी स्टिक घेऊन सर्रकन निघुन गेली.मी उगीच घाबरलो.ह्यांच्या गप्पात तोंड खुपसुन हळुच म्हणालो"राँकेल संपलं यार,मिळेल का?
  नितीन बोलला "राँकेल कायले पायजे बे?पेतं काय?
    आतल्या आत रडुच आलं...बाकी मंडळी हसु लागली.मी चुप.
      सायंकाळी घरी परततांना नितीन जवळ आला "राँकेल खरंच पायजे काय तुले?चाल आपल्या घरी .आम्ही गेलो.
संजय शिरभातेही सोबत होता .नितीनने अख्खी कँन सोबत घेतली व माझ्यासोबत घरी आला.मग वारंवार येत गेला.
सरोज टाँकीजजवळ संजय रहायचा त्याची ताई पाट्यावर मसाला वाटुन द्यायची आणि आम्ही तिघे मटन बनवायचो ,जेवायचो.पुढे प्रेम आला.तो उंचपुरा .आम्हाला मजबुत दोस्त मिळाला.
   तेव्हापासुन नित्या ला सांगितले की अमुकेक गोष्ट करायचीय.की डन.काम फत्ते.
प्रविण नागदिवे सि.डी.100 घेउन यायचा काँलेजमध्ये .मला त्याचं अप्रुप वाटायचं.घरापासुन जवळ रहायचा .तो सुद्धा मित्र झाला.शहरात रहायचं तर शहरी मुलांसारखे स्टायलीश वगैरे वाटलो पाहीजे म्हणुन केस वाढवले.स्टाईल आयकाँन कोण तर फ्रेजरपुऱ्यातले मिथुन.
प्रभात टाँकीज समोर एका हातगाडीवर "कोई भी माल पाँच रुपये मे"मिळायचा.तिथुन एक राउंड ब्रश घेतला आणि माझे आणि आरशाचे संबंध फारच घट्ट झाले.मिथुनसारखे आपण काळे नाही ह्याचं दुःख होतंच.भुवयांमध्ये जबरदस्तीनं पापण्या घुसवुन मग फ्रेजरपुरी मिथुनसारखे चाळे सुरु झाले.पाच रुपयाचा एक काळा गाँगल देखील असायचा,पण तो मिथुनसारखा दाट केसांमधे रुतवलेला.
मग ह्या अवतारात एका रविवारी प्रविण च्या घरासमोरुन जातांना त्याला आवाज दिला.आईने ह्यापुर्वीसुद्धा मला पाहीले होते पण आज तिने मला आत बोलवले.मी गेलो.
प्रशस्त सोफ्यावर बसलो.आईने माझी चौकशी केली.आई बाबा कुठे राहतात रे तुझे?
गावाला,करतखेडला.
काय करतात?
"शिक्षक आहेत",मी तोऱ्यात उत्तरलो.मिथुन स्टायलीत.
मग काय हिरो वगैरे व्हायचंय का तुला?
बाबांनी पाहीले असतील ना केस तुझे.?
नाही!मी.
तु शिक्षकाचा मुलगा आहेस आणि असे केस वाढवुन फिरतोयस ,चांगलं दिसतं का हे?
मी चुप.
उगीच आलो प्रविणकडे असं वाटलं.ती बोलत राहीली,बराच वेळ .पण मला शेवटचं वाक्य ऐकायला आलं ."चल हात धुवून घे,जेवू आपण." प्रविणची छोटी बहीण पण होती.मी संकोचलो.भुक लागली होतीच.त्यांच्यासोबत जेवायला बसलो.मला माझ्या आईची खुप आठवण आली त्या दिवशी.
जेवण झाल्यावर प्रविणची आई म्हणाली,आज रविवार आहे,केस कापुन घे,आणि मला भेटायला ये.
मी उठलो,सलुनमधे जाऊन केस कापले.सोबतंच मिथुन सुद्धा डोक्यातुन काढुन टाकला.
पप्पूच्या आईला भेटायला मात्र गेलो नाही.पण त्या भल्या मोठ्या शहरात माझ्यावर सुसंस्कार करणारी ती पहीली व्यक्ती होती.
मी स्वतःला बदलायचं ठरवलं.माझ्या जवळच्या चांगल्या मित्रांच्या यादीत एक नाव आणखी कोरल्या गेलं.आमची
मैत्री जपल्या गेली,कान्हाने सुदामास आणि दुर्योधनाने कर्णास जपावे तसे सांभाळले ह्या मित्रांनी.
आणि एक दिवस क्लासरुममध्ये खुप गोंधळ चालु होता प्रेम म्हणाला...

   प्रेम म्हणाला ,आज क्लासचं काही खरं नाही.बंक मारुया.
   मी शांतच होतो.डेस्कवर बोटं फिरली.छान तबल्यासारखा आवाज आला.आनंद शिंदेंच्या पोपटानं महाराष्ट्रभर धुमाकुळ घातला होता.
   आणी मग क्लासमधे पोपटाचं गाणं झालं.गायक प्रेम .डेस्क वाजवतांना खुप मजा आली.
   दुपारचे चार वाजले असतील.
बाबांनी नवीन सायकल घेवुन दिली होती.प्रेमने चालवायला घेतली आणी थेट शाम चौकात पोहचलो.
शाम टाँकीज वर त्रिमुर्ती स्टुडीओ ने रंगवलेली पोस्टर बघत असतांना प्रेम कुणालातरी शोधत होता.
   अनंत!इकडे ये.
टाँकीजसमोरच्या मार्केटमधे राजा पेन हाउसच्या बाजुला अमरावती महानगरपालिकेत शिरणाऱ्या रस्त्यावर एक कठडं होतं त्यावर एक कृश शरीरयष्टीचा माणुस बसला होता.आजुबाजुला दहा बारा माणसं उभी होती. प्रेमसोबत त्या माणसाकडे निघालो.तिथे पोचल्यावर खाडकन् उभा राहीला तो.आजुबाजुची माणसं दुर सरकली.प्रेम आणी त्याची गळाभेट झाली,प्रेमने माझी त्याच्याशी ओळख करुन दिली.मला तो घाणेरडा माणुस फार काही आवडला नाही.
त्याचा एक डोळा बकरीचा होता,आणि अत्तराच्या उग्र वासाने  माझं डोकं भनानलं होतं.
    समोर रघूवीर हाँटेलमधे दोघांनी चहा घेतला.चहानं अत्तराच्या वासाचा प्रभाव कमी झाला.
   आम्ही त्याच्या घरी गेलो,सगळ्यांशी ओळख झाली.विशेषतः आईशी.
  माझ्या आईसारखीच खळाळुन हसणारी.आनंदाचा झराच जणु.
   आईने संध्याकाळच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं.मी सुद्धा फुलांचा बुके  घेऊन गेलो.तिथे हीsss गर्दी.
क्षणभर मला परत जावंसं वाटलं,पण आईला दिसलो तर तिने मला दोन तिन कामं सांगितली.त्या धावपळीचा मी सुद्धा एक भाग झालो.
मधुकरराव अभ्यंकर,दादासाहेब गवई,आणि मोठ मोठी मंडळी तिथे आलेली.
तो बकरीचा डोळा लावलेला माणुस आणि त्याचा गोतावळा सरंक्षकाची भुमीका बजावत होते.
     शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.मी ही बुके दिला.जेवनं झाली.
   मनात म्हणालो,च्यायला !प्रेम तर भारी माणुस दिसतो.
  पण त्याच्या कुटुंबात असा काही मिसळलो की नंतर प्रेम म्हणजे मी आणी मी म्हणजे प्रेम.आमचा आवाज,अक्षर,सवयी पण सारख्याच झाल्या.
त्याला दादा म्हणणारी मुलं मलासुद्धा दादा म्हणु लागली.मला मोठं झाल्याचा फिल आला.