आमची जिजाऊ Nagesh S Shewalkar द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आमची जिजाऊ

आमची जिजाऊ

सिंदखेडराजा! बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव! या गावात फार फार वर्षांपूर्वी जाधव घराणे राहात होते. लखुजीराव जाधव हे त्या घराण्याचे वंशज! अतिशय हुशार आणि पराक्रमी अशी लखुजीराव यांची सर्वदूर ख्याती होती. तो काळ अत्यंत धामधुमीचा होता. त्यावेळी महाराष्ट्रावर परकिय सत्तांचे जाळे पसरले होते. आपले मराठे सरदार अतिशय पराक्रमी असले तरीही त्यांचे स्वतःचे असे राज्य नव्हते. परकीय सत्ताधारी राजांच्या हाताखाली नोकरी करताना ही मंडळी समाधान मानत असे. लखुजीराव जाधव त्याकाळात निजामशहाकडे काम करत होते.

तो काळ होळीचा.... रंगपंचमीचा होता. जाधव घराण्यात एक परंपरा होती. दरवर्षी होळी सणाचे निमित्त साधून ते एक फार मोठा कार्यक्रम आयोजित करत असत. जहागिरीतील जनता, नातेवाईक, मित्रमंडळी यांना त्या कार्यक्रमाचे निमंत्रण असे. सोबतच जहागिरीच्या बाहेर असलेली मित्रमंडळी, सरदार मंडळी यांनाही आमंत्रण असे. त्यावर्षीही होळीच्या सणाचा फार मोठा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत होता. लखुजी जाधवांचे मित्र असलेले मोठमोठे पराक्रमी सरदार आवर्जून त्या कार्यक्रमाला हजर होते. वेरुळचे मालोजी भोसले हेही त्या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. त्यांच्यासोबत फार मोठा लवाजमा आलेला होता. मालोजी यांच्यासोबत त्यांचा शहाजी नावाचा मुलगाही आला होता. मस्तपैकी गप्पांचा फड रंगात आला होता. तिथे इकडून तिकडे धावणारी एक छोटी, चुणचुणीत मुलगी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तिचे वय जेमतेम तीन वर्षाचे होते. मालोजीरावांचेही लक्ष त्या मुलीकडे गेले. त्यांनी विचारले,

"लखुजीराव, ही गोड, लाघवी मुलगी कोण आहे हो?"

लखुजीराव काही बोलण्यापूर्वीच दुसरे एक सरदार म्हणाले,

"मालोजीराजे, असे काय विचारता? अहो, ती जिजा! आपल्या लखुजीरावांची कन्या...जिजाबाई!"

"काय सांगता?" असे म्हणून मालोजीरावांनी जिजाला जवळ बोलावले. ती जवळ येताच तिला जवळ घेऊन मालोजीरावांनी विचारले,

"काय नाव तुमचे?"

"आमचे नाव जिजाबाई लखुजीराव जाधव..." त्या धिटुकल्या मुलीने न घाबरता उत्तर दिले.

मालोजीराजे यांच्या शेजारी त्यांचा मुलगा शहाजी बसला होता. शहाजी दिसायला सुंदर होता. शरीर व्यायामाने कमावलेले होते. शहाजीकडे बघत लखुजीराव अचानक म्हणाले,

"मालोजीराव, आमची जिजा तुमची सून शोभून दिसेल. काय म्हणता?..." लगेच जिजाबाईकडे बघून हसतहसत लखुजीराव म्हणाले,

"जिजाऊ, हे शहाजीराजे! मोठे पराक्रमी आहेत. आम्हाला ते जावाई म्हणून पसंत आहेत? तुम्हाला पती म्हणून चालतील का?" ते ऐकून लग्न, संसार, पती, सासर कशाचाही गंध नसलेली ती चिमुरडी पटकन म्हणाली,

"चालतील की....." जिजाबाई तशी म्हणाली आणि वातावरणात सात मजली हसणे फुलले. हसतहसत मालोजीरावांनी लखुजीरावांचा प्रस्ताव स्वीकारला. ते म्हणाले,

"लखुजीराव, तुमची हा प्रस्ताव आम्हाला आवडला. तुम्ही विषय काढला नसता तर आम्हीच मागणी घालणार होतो."

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात तो कार्यक्रम संपन्न झाला. आलेली पाहुणे मंडळी, मित्रपरिवार आनंदाने लखुजीरावांचा निरोप घेऊन परतला. लखुजीरावांच्या पत्नीचे नाव गिरीजाबाई. सर्वजण निघून गेल्याचे पाहताच गिरीजाबाईंनी लखुजीरावांना बोलावले आणि नाराजीने त्या म्हणाल्या,

"जिजाच्या लग्नाचा निर्णय तुम्ही असा कसा तातडीने आणि परस्पर घेतला?"

"काय झाले? भोसले घराणे आहे ते. महापराक्रमी आहे ती मंडळी..." "म्हणून काय झाले? आपल्या तोडीचे आहेत का ते? तुमचे हे वागणे, हा निर्णय मुळीच आवडला नाही." गिरीजाबाई रागारागाने म्हणाल्या. शेवटी लखुजीरावांनी मालोजीरावांकडे 'सध्या जिजाच्या लग्नाचा कोणताही विचार नाही..' असे कळवले. परंतु म्हणतात ना, लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात. नियतीच्या मनात जसे असते तसेच घडते. कालांतराने मालोजीराजे यांचे निधन झाले. जहागिरीचा कारभार शहाजीराजे यांच्या नावे असला तरीही ते तसे वयाने लहान असल्याने सारे व्यवहार त्यांचे काका आणि मालोजीरावांचे लहाने बंधू विठोजीराजे पाहात होते. मालोजीराव यांच्या पत्नी उमाबाईंच्या मनात चिरंजीव शहाजीराजे यांच्या लग्नाचे विचार चालू होते. त्यांनी तसा विषय विठोजीराजे यांच्याकडे काढला आणि म्हणाल्या,

"शहाजीच्या लग्नाचे पाहावं असा विचार आहे. तुमच्या भावाच्या मनात लखुजीरावांची पोर होती."

"वहिनीसाहेब, काळजी करू नका. मी बोलतो लखुजीरावांशी." विठोजीरावांनी पुन्हा जिजाबाईला सून करून घेण्याचा निरोप लखुजीराव जाधव यांच्याकडे पाठवला. लखुजीरावांनी पत्नीसोबत विचार करून होकार कळवला.

काही दिवसातच लखुजीराव जाधवांची लाडकी मुलगी जिजा भोसले घराण्याची सून म्हणून त्यांच्या वाड्यात प्रवेश करती झाली. शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई यांचा संसार सुरु झाला. शहाजीराजे अत्यंत पराक्रमी होते. परंतु तेही कुणाच्या ना कुणाच्या दरबारी चाकरी करत होते. जिजाबाईंना एक प्रश्न नेहमी पडायचा, त्यांचे माहेरचे जाधव घराणे असो की, सासरचे भोसले घराणे असो किंवा इतर कोणतेही मराठा सरदार घराणे असो हे सारे शूरवीर मराठे परकियांच्या हाताखाली का काम करतात? ही सारी मंडळी एकत्र आली, परकीय चाकरीवर लाथ मारुन त्याच दुश्मनांविरुद्ध लढली तर ही सारी दुश्मन मंडळी, क्रुर सत्ताधीश हा आपला मुलुख सोडून पळून जातील. या साऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःचे राज्य, स्वराज्य स्थापन करावे पण ही मंडळी एकत्र तर येतच नाहीत पण या दुश्मनांच्या इच्छेखातर, त्यांच्या हुकुमावरुन आपसात लढताना एकमेकांच्या जीवावर उठतात, आपल्याच माणसांच्या नरडीचा घोट घेतात. आपल्याच रयतेवर जुलूम करतात... अशा आपापसातील दुश्मनीचा फटका सर्वात जास्त कुणाला बसला असेल तर तो जिजाबाईंना ! एकदा एक अगदी शुल्लक कारण घडले. निजामशाहीचा दरबार संपताच सारे सरदार बाहेर पडले. त्यात लखुजीराव जाधव, शहाजीराजे आणि त्यांचे बंधू संभाजीराजे हेही होते. परत फिरण्याच्या गडबडीत एक विशालकाय हत्ती पिसाळला. दिसेल त्याचा जीव घेत सुटला. त्याला आवरता-आवरता दोन पाहुण्यांची घराणी समोरासमोर आली. ती कुटुंबं होती भोसले आणि जाधव! मेहुणे-मेहुणे, सासरे-जावाई यांच्यात तुंबळ युद्ध पेटले. त्यायुद्धात संभाजीच्या तलवारीने दत्ताजीला यमसदनी पाठवले आणि जिजाईने स्वतःचा भाऊ गमावला. तर दुसरीकडे स्वतःचे पोर धारातीर्थी पडलेले पाहून जाधव संतापले, खवळले. ते संभाजीवर चालून गेले. भावाच्या मदतीला गेलेल्या शहाजीराजांना सासऱ्यांच्या तलवारीचा फटका बसला. ते रणांगणावर कोसळले. परंतु लखुजीरावांच्या तलवारीने संभाजीराजेंच्या रक्ताने स्वतःच्या तलवारीची भूक भागवली. त्या छोट्या घटनेत जिजाबाईंनी एकीकडे सख्खा भाऊ गमावला तर दुसरीकडे दीर! कुंकू बळकट म्हणून त्यांचे पती शहाजीराजे बेशुध्द पडले म्हणून वाचले. जिजाबाईने दोन मोहरे गेल्याचा शोक करावा की, त्या घटनेत माहेर आणि सासर दोघांच्याही विजयाचा आनंदोत्सव करावा? या घटनेनंतर जाधव-भोसले कुटुंबात कमालीचे शत्रूत्व निर्माण झाले आणि जिजाबाई माहेरच्या प्रेमाला मुकली. काय अवस्था झाली असेल त्यावेळी माऊलीची? कोणते विचार मनात दाटून आले असतील? ही पराक्रमी माणसे एवढी विचारशून्य का होत असतील? पराक्रमाच्या, बदला घेण्याच्या नशेत ही माणसे जवळची नाती कशी विसरु शकतात? जावयाच्या शरीराचा वेध घेताना त्यांना मुलीच्या कपाळावरील कुंकू आपण पुसतोय याचे भान राहू नये?

जिजाबाई हिंमतवान होत्या, धाडसी होत्या. प्रत्येक प्रसंगी त्या खंबीरपणे उभ्या राहात होत्या म्हणूनच त्यांनी शहाजीराजे सातत्याने कुटुंबापासून दूर असतानाही त्यांनी पुणे जहागिरीतील प्रत्येक गावाचा विकास केला. प्रत्येकाला मदत केली. पोटी जन्मलेल्या मुलाच्या....शिवरायांच्या मनात कायम स्वराज्य स्थापनेची बीजे रोवली. लहान असल्यापासून त्यांना रामायण-महाभारतातील आणि इतर पराक्रमी वीरांच्या गोष्टी सांगून त्यांच्यामध्ये शौर्य निर्माण केले. दुश्मनांनी जाळून उद्ध्वस्त केलेले पुणे दादोजी कोंडदेव यांच्या मदतीने पुन्हा उभे केले. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. शिवरायांच्या चळवळीचा बदला घेण्यासाठी, त्यांचे स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आदिलशहाने शहाजीराजांना धोक्याने अटक करून तुरुंगात टाकले. त्यावेळी एक पत्नी म्हणून जिजाबाईंच्या मनाची अवस्था काय झाली असेल? किती घालमेल झाली असेल परंतु जिजाऊंनी मनाची अवस्था चेहऱ्यावर येऊ दिली नाही. त्या खंबीरपणे शिवरायांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. शेवटी शिवरायांच्या मुत्सद्देगिरी- मुळे आदिलशाहीने शहाजी राजे यांची मुक्तता केली. पतीची सुटका झाली या गोष्टीचा जिजाऊंना प्रचंड आनंद झाला परंतु त्याहीपेक्षा जास्त आनंद झाला तो मुलाने केलेल्या कामगिरीची!

अफजलखानाच्या रुपाने स्वराज्यावर फार मोठे संकट आले. त्या दुष्ट, घातकी खानाला भेटायला जायचा निर्णय शिवरायांनी घेतला. एका महाकाय, महाअमानुष, दगाबाज म्हणून ख्यातीप्राप्त खानाच्या समोर शिवराय जाणार या जाणीवेने एका आईच्या पोटात कालवाकालव झाली असणार परंतु ती केवळ एका शिवाजीची माता नव्हती, जहागिरीतील हजारो गरीब जनतेची ती पालक होती. जिजाऊचा विश्वास जसा शिवरायांच्या मुत्सद्देगिरीवर होता, बुद्धीचातूर्यावर होता, त्यांच्या गनिमीकावा या अस्त्रावर होता तसाच विश्वास शिवशंभूवर होता, भवानीमातेवर होता. झालेही तसेच शिवरायांनी मोठ्या शिताफीने खानाचे दात त्याच्या घशात घालून त्याचा कोथळा बाहेर काढला. जिजाबाईंसह जहागिरीतील सर्व जनतेला प्रचंड आनंद झाला.

खानाच्या रुपाने आलेले महासंकट परतवून लावले. नंतर का कमी संकटे शिवाजी महाराजांवर आणि स्वराज्यावर आली? प्रत्येकवेळी शिवराय एखाद्या सिंहाप्रमाणे दुश्मनांच्या गुहेत शिरून त्याचा लचका तोडून बाहेर पडत. त्यानंतर पन्हाळगडावर राजे असताना सिद्दी जौहर या सरदाराने पन्हाळगडाला वेढले. शिवराय वेढ्यात अडकले. स्वराज्यवर पुन्हा एकदा भयंकर संकट आले. परंतु जिजामाता घाबरल्या नहीत, डगमगल्या नाहीत. जमेल त्याप्रमाणे जवळ असलेले सैन्य जौहरच्या दिशेने पाठवून त्याच्या सैन्यावर हल्ला करून वेढा खिळखिळा करण्याचा प्रयत्न करीत होत्या. परंतु कशाचाही परिणाम सिद्दीच्या वेढ्यावर होत नव्हता. जिजाऊंनी एक धडाडीचा निर्णय घेतला. स्वतःच जौहरवर चालून जाण्याचा, शिवबाला सोडवून आणण्याचा! परंतु तितक्यात स्वराज्याचा एक खंदा वीर नेताजी पालकरांच्या रुपाने त्यांच्यासमोर उभा टाकला आणि जिजाऊंना आश्वस्त करुन तो वाऱ्याच्या वेगाने पन्हाळगडाच्या दिशेने धावत सुटला. परंतु दुर्दैवाने सिद्दीच्या सैन्यासमोर नेताजीचा निभाव लागला नाही. दुसरीकडे का शिवराय शांत बसले होते ? मुळीच नाही. त्यांनीही फार मोठा धाडसी निर्णय घेतला. सिद्दीसोबत तहाच्या बोलणीचे नाटक करून शिवराय त्या वेढ्यातून सुटले. ते विशाळगडाकडे निघाले. सिद्दीचे सैन्य पाठीवर होते. बाजीप्रभू देशपांडे या वीराला परिस्थितीचे गांभीर्य आणि स्वतःचे कर्तव्य आठवले. त्याने शिवरायांना विशाळगडाकडे पाठवले आणि मोजक्या शूरवीर मावळ्यांच्या सहाय्याने शत्रूला घोडखिंडीत रोखून धरले. जीव गेला परंतु बाजीने एकही गनीम विशाळगडाकडे जाऊ दिला नाही. शिवराय विशाळगडावर पोहोचले ही बातमी जिजामातेला समजली. त्यांना आनंद झाला. तितक्यात बाजी धारातीर्थी पडला ही बातमी समजताच त्यांना खूप दुःख झाले.

सिद्दी जौहरने पन्हाळगडास वेढा घातलेला असताना शाहिस्तेखान नावाचे एक वादळ स्वराज्यावर चालून आले. एकाचवेळी दोन यमरुपी शत्रू चालून आलेले असताना शिवराय संकटात असताना जिजाबाई नावाची रणरागिणी डगमगली नाही, तिने हिंमत सोडली नाही. ज्याप्रमाणे पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या जौहरवर अधूनमधून हल्ले होत होते, त्याचप्रमाणे जिजाऊंनी शाहिस्तेखानालाही मराठमोळे दणके देण्याचे सुरुच ठेवले. शिवराय राजगडावर पोहोचले. विश्रांती घ्यायला कुठे वेळ होता? त्यांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवण्याचे ठरवले. खान जिथे वास्तव्य करून होता त्या लालमहालावर थेट हल्ला करून खानाची मस्ती जिरवण्याचा निर्णय! जिजाऊ! एक माता! एकानंतर एक संकटात शिवबा सापडत होता. थेट शत्रूच्या घरात प्रवेश करणे म्हणजे? जिजाऊचे चित्त थाऱ्यावर नसायचे, भीतीने काळीज फुटून बाहेर यायचे हे प्रसंग! परंतु जिजाऊ हार मानत नसत, शिवरायांच्या मार्गात आडव्या येत नसत. शिवबा करेल ते योग्यच ही त्यांची वेडी आशा नव्हती तर एक प्रचंड आत्मविश्वास होता. रयतेला दुष्टांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी स्वतः घेतलेला एक वसा होता. शाहिस्तेखानाची प्रचंड फजिती केल्यानंतर शिवरायांनी सुरतेच्या मोहिमेत भरपूर यश मिळवले. याचवेळी जिजाऊ, शिवराय यांच्यासह स्वराज्यावर फार मोठे दुःखाचे ढग आले. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना, कोणताही आजार नसताना शहाजीराजांचा मृत्यू झाला. जिजाऊचे सर्वस्व गेले. दुःखावेगात त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. शिवाजी महाराजांनी महत्प्रयासाने जिजामातेला त्या निर्णयापासून परावृत्त केले.

पाठोपाठ मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान यांच्या स्वरूपात आलेल्या शत्रूने तहाच्या रुपाने स्वराज्याचा लचका तोडला. मावळ्यांनी पराक्रमाने, शिवरायांच्या हुशारीने, धाडसाने कमावलेले तेवीस किल्ले आणि फार मोठा प्रदेश औरंगजेबाच्या घशात घालावा लागला. याहीपेक्षा दुर्दैवी घटना म्हणजे शिवरायांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्रा येथे जावे लागले. जिजामातेच्या धैर्याची, संयमाची जणू परीक्षा होती. पोटचे पोर शत्रूच्या प्रदेशात जाते नंतर त्या कपटी राजाच्या तुरुंगात राहते. खरेतर शिवरायांच्या जीवावर बेतण्यासारखा होता. परंतु शिवराय मोठ्या शिताफीने तिथून निसटले आणि जिजाऊंचा आनंद गगनात मावत नव्हता. अशा अनेक जीवावरच्या संकटांचा यशस्वीपणे सामना करत शिवराय माँसाहेबांच्या आशीर्वादाने स्वराज्य निर्मितीची घोडदौड चालू ठेवत होते.

जिजामातेला एक वेगळीच आस लागली होती ती म्हणजे शिवरायांच्या राज्यभिषेकाची! त्यांनी ती इच्छा शिवरायांजवळ व्यक्त केली. आईसाहेबांच्या इच्छेचा मान राखून शिवरायांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. तो नयनरम्य, कौतुक सोहळा पाहताना, शिवबाच्या डोक्यावर राजमुकुट पाहताना जिजामातेला आनंदाश्रू आवरत नव्हते शिवाय स्वतःच्या लहानपणापासून स्वराज्य स्थापनेचे पाहिलेले स्वप्न याची देही, याची डोळा पाहताना त्यांना आत्यंतिक समाधान होत होते. शिवरायांना राज्यभिषेक झाला आणि केवळ अकरा दिवस होत नाहीत तोच या थोर माऊलीने १७ जून १६७४ या दिवशी जगाचा निरोप घेतला. धन्य ती माऊली! जिजाऊ मातेला कोटी कोटी नमन!

नागेश सू. शेवाळकर

थेरगाव, पुणे.