अंजली पुढे जात होती . गण्या मागे . आता एक कॉलनी नजरेत पडत होती. कॉलनीत सारी घरे एक सारखीच दिसत होती . रात्रीच्या बारा वाजून गेल्याने साऱ्या घरातल्या लाईट बंद होत्या . फक्त एकच घराच्या दुसऱ्या मजल्यावर ती पिवळसर उजेड तेवत होता .
त्या उजेडाकडे बोट करत अंजली म्हणाली
"त्याच घरात जिथे उजेड दिसतोय ना तिथल्या एका माणसाला वाचवून बाहेर आणायचं आहे
" पण मीच का...? आणि कोण आहे तिथे ....
" कारण तुझीच निवड झाली आहे आणि तिथल्या माणसा वरतीच माझं भवितव्य अवलंबून आहे .....
हे ऐकून गण्या त्या घराकडे पळतच निघाला .....
घराचं दार उघडंच होतं . त्याने ते सताड उघडलं आणि आत शिरला . दाराच्या झरोक्यातून येणाऱ्या उजेडात त्याची उंचच्या उंच काळी सावली अभद्र दिसत होती . त्याने उजव्या बाजूच्या भिंतीवरील बोर्डाची सारी बटणे दाबली पण कुठेच उजेड पडला नाही . बाहेरून पडणाऱ्या अर्धवट उजेडात त्याला डावीकडे वर जाणारा जिना दिसला . तो जिन्यावरून चढून वर पोहोचला . एकाला एक लागून तीन खोल्या होत्या .
तीनीही दार लावली होती . मधल्या दाराच्या फटीतून उजेडाची लकीर समोर पसरली होती . तो सरळ गेला आणि दार उघडलं . इतका वेळ निर्भय व निडरपणे वावरणारा गण्या भीतीने म्लान झाला . समोरचं अमानवी , अघोरी किळसवाणे दृश्य पाहून त्याचं काळीज पिळवटून निघालं....
ती संपूर्ण खोली गोगलगायांनी गच्च भरली होती . टेबलावरच्या दिव्याच्या प्रकाशात सरपटणाऱ्या गोगलगायींचा रक्ताचा स्राव किळसवाणा दिसत होता . खोलीत जमीन किंवा कुठलीच वस्तू दिसत नव्हती फक्त त्यांचा आकार जाणवत होता...
" पण या इथे आल्याच कशा ....?
या प्रश्नाला काहीच अर्थ नव्हता . तो अशा शक्तींच्या विरोधात लढत होता . जिला काहीही शक्य होतं . गण्याला सर्वत्र गोगलगाय दिसत होत्या . कुठे माणूस दिसतच नव्हता , ज्याला वाचवायचा होतं तोच दिसत नव्हता . त्याला कळेना कि अंजलीने त्याला कोणाला वाचवायला सांगितलं होतं .
सरपटणाऱ्या गोगलगायींची लयबद्ध हालचाली पेक्षा वेगळ्या हालचाली त्याला जाणवल्या . समोर खुर्चीवरती कोणीतरी होतं . त्याचं शरीर दिसत नव्हतं . गोगलगायींच्या खाली अच्छादला होता . तो आत जाऊ शकत नव्हता कारण त्यालाही मृत्यूचं भय होतं . पण तो थांबूही शकत नव्हता. त्याला त्या खुर्चीवरचा माणसाला वाचवायला हवं होतं . पण त्याचा पाय पुढे पडायला तयार नव्हता .
पण माणसाच्या मनाचा थांगपत्ता कुणालाच लागला नाही . इतका वेळ घाबरून आत जायला नको म्हणणार त्याचं मन क्षणार्धात तयार झाले आणि त्याने खोलीत पाय टाकला . त्याने पाय टाकायला आणि गोगलगाय आणि बाजूला सरकून जागा व्हायला एकच गाठ पडली . त्याचा पाय गोगलगायावरती न पडता जमिनीवर पडला....
आणि काय आश्चर्य पुढची सारी पाउले जमिनीवरच पडत गेली . गोगलगाय बाजूला सरकत त्याच्या पाऊलाला जागा करून देत होत्या.
' पण का ....?
ज्या गोगलगायींनी त्या खुर्चीवरचा इसमाला जेरबंद करून त्याचा जीव घ्यायचा घाट घातला होता त्याच गणाच्या बाबतीत इतक्या सौम्या का होत्या ? त्या गोगलगायींचे आणि गण्याचे जूनं काही नातं होतं का.....?
तो खुर्चीजवळ पोहोचला तेव्हा जेरबंद असलेला इसम , गोगलगायींनी ज्याला यमसदनी काढायचं ठरवलं होतं , तो मोकळा झाला . तो चांगलाच धष्टपुष्ट व हट्टाकट्टा होता . दोन गड्यांना जागेला भुईसपाट करू शकेल इतका पैलवान गडी होता . त्यावरून कळत होतं की त्या गोगलगायी मध्ये किती ताकत होती .
तो खुर्चीवर बेशुद्ध पडला होता गण्याकडे फार वेळ नव्हता . सध्या तरी गोगलगाई त्याला जागा करुन देत होत्या . पण पुढचा अंदाज तो बांधू शकत नव्हता . त्याने त्या इसमाचा एक हात आपल्या खांद्यावर घेत त्याला आधार देऊन चालवायचा प्रयत्न केला . पण तो खूप जड होता त्याला शुद्धीवर आणि गरजेचं होतं . त्याने त्याला खुर्चीवर बसवलं . एवढ्यानेच गण्याची दमछाक झाली . त्यामुळे त्यांनी आधारासाठी टेबलावर हात ठेवला . टेबलावरच्या गोगलगाय बाजूला झाल्या . तिथेच त्याला पाण्याची बाटली दिसली . गण्याने त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले .
तो शुद्धीवर आला.
" ती डायरी , ती डायरी ...
गण्याने त्याला आधार देत उठवलं . दोघही दरवाजाकडे जाऊ लागले. आताही गोगलगाय रस्ता करून देत होत्या . तो इसम बाहेर पोहोचला .
" ती डायरी , टेबलावरची ...लवकर आण....
गण्या पुन्हा आत वळला . पण या वेळेला गोगलगायींनी जागा दिली नाही . त्याने गोगलगाय वरती पाय दिला . गोगलगाय मधून रक्तस्राव झाला . आणि तेव्हाच त्याच्या सर्वांगावर गोगलगायींचा वेढा पडला . तो गोगलगायींनी असून अच्छादुन जाऊ लागला . तो खाली कोसळला गोगलगाई त्याला पायापासून डोक्यापर्यंत आच्छादून टाकत होत्या . त्याला दरारून घाम फुटला . मृत्यू त्याच्या पुढे दिसत होता . हळूहळू त्याचं सर्वांग गोगलगायींनी आच्छादून टाकलं . त्याला श्वास घ्यायला अडचण होऊ लागली . त्याच्या नाकातोंडात सर्वत्र गोगलगाई भरून उरल्या .
मृत्यु फार दूर नव्हता....
क्रमशः