मला आई व्हायला आवडेल .........
त्याला भेटून जवळजवळ वर्ष पण झालं नसेल आणि मी त्याला नेहमी चिडवायचे की मला तुझ्यासारखी गोंडस मुलं हवीयेत .आणि मी त्याला हेही सांगितलेलं की मला मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये कोणताही भेदभाव नको आहे.मला काही मुलांना दत्तक सुद्धा घ्यायचे आहे जेणेकरून मला त्या मुलांसाठी काही करता येईल.त्यांनासुद्धा आईची माया देता येईल.त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलता येईल .माझ्या ज्या काही इच्छा अपूर्ण राहिल्यात त्यांच्या मार्फत त्या मोठ्या व्हाव्यात.मला ज्या अडचणींचा सामना करावा लागला त्या अडचणींना पार करून त्यांच्यासाठी मोठी संधी निर्माण करण्याचे स्वप्न बघितले होते मी लहानपणापासून .मी जवळजवळ प्रत्येक क्षणी ते स्वप्न उराशी बाळगून होते जेणेकरून ते नक्की साकार व्हावे.मी जेव्हा त्याला माझ्या स्वप्नांबद्दल सांगितले तेव्हा त्यानेही याला संमती दर्शविली.माझ्या स्वप्नपूर्तीसाठी आत्ता काहीच क्षण बाकी होते.लवकरात लवकर ते स्वप्न पूर्ण होणार होते असे मला वाटू लागले .
काही दिवसांपूर्वी माझ्यामध्ये आणि सुहास मध्ये एका गंभीर विषयावर बोलणे झाले की जर मी मुलांना जन्म दिला नाही तर चालेल का? यावर मात्र त्याचा थोडा आक्षेप होता की मी स्वतःच्या मुलाला जन्म द्यावा आणि मग दत्तक घेण्यास तो तसाही तयार आहेच.पण मी समाजावणीच्या सुरात म्हणाले की आधीच आपल्या देशात हजारो ,लाखो अशी मुले आहेत ज्यांची कित्येक स्वप्न अपूर्ण राहतात आणि पैशांअभावी त्यांना आपल्या मनातल्या इच्छा जगता येत नाही.परिणामी त्यांना वेठबिगारी किंवा कोणतेही पडेल ते काम करावे लागते .या मनुष्यदेहाचा पुरेपूर वापर त्यांना करताच येत नाही किंवा त्यांना कोणीही समजावून सांगण्याच्या भानगडीत पडतही नाही .त्यांना कुठे घरकामात ठेवणे किंवा हॉटेल मध्ये कामास ठेवणे किंवा मग वाईट मार्गास प्रवृत्त करणे अश्या गोष्टींचा अवलंब केला जातो आणि परिणामी आपल्याकडे मनुष्यबळ असूनही भारत आहे त्याच जागी स्थिर राहतो.विकसनशील देशामध्ये मोडणारा देश विकसित देशत यावा यासाठीचे प्रयत्न खूप कमी थरांतून आणि खूप कमी जणांकडून केले जाते.
खरं बघायला गेले तर प्रत्येक स्त्रीला आई बनण्याची निसर्गदत्त देणगी लाभालेलीच असते आणि तिचा पूरेपर उपयोग किंवा उपभोग हा प्रत्येक स्त्रीचा अधिकारच आहे पण तिला पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी ही प्रत्येक पुरूषाची असते . त्याचप्रकारे स्त्री ही तिच्या फार कमी काळासाठी एक मैत्रीण , सोबती ,साथीदार किंवा पत्नीची भूमिका निभावते .आजन्म ती फ़क़्त आणि फ़क़्त एक आईचं असते .
याप्रमाणे एखादी आई आपल्या पिलाची आजन्म काळजी घेते, जरी तो किंवा ती कितीही मोठी झाली तरीही तिचे लाड काही संपत नाही .तिच्यासाठी अजून तो तिचा लहान छोटासा पिल्लू असतो.
मी आणि सुहास जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडलो नं तेव्हा खरेतर मला त्याची एक गोष्ट खूप आवडलेली की तो आपल्या आजुबाजू असणाऱ्या प्रत्येकाची खूप छान रिस्पेक्ट करतो.प्रत्येकाला व्यवस्थित समजून घेतो.कोणाशी कसे आणि कधी काय बोलावे हे त्याला खूप छान प्रकारे कळते .आणि यामध्येही माझ्या जीवनसाथीला विचारण्याचा पुढाकार मीच घेतलेला .कारण त्याची छाप लगेच एखाद्याचे लक्ष वेधून घेते आणि समोरच्या व्यक्तीला आपलेसे करण्याचे सामर्थ्य आहे त्याच्यात.
तर मुद्दा असा की मी त्याला प्रत्येक प्रकारे समजावून सांगितलं.अगदी भारताच्या जनगणनेपासून ते आई म्हणजे काय असते इथपर्यंत.म्हणजे जर एखाद्या घरात आईबाबा नको असल्यावर त्यांना अनाथाश्रमात टाकले जाते तर नको असलेल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा असेच केले जाते .काही वेळेला ते मूल अनैतिक संबंधातून जन्माला आलेले असते तर काही वेळेला नको असलेले मूल काही जोडपी अनाथाश्रमात टाकतात.तर या बिचाऱ्यांचा यात काही दोष नसतानाही त्यांना आईबाबांचे प्रेम मिळत नाही .त्यामुळे त्यांना एकाकी जीवन जगावे लागते आणि यात अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जर का पोटातील गर्भ मुलगी असेल तर तिलासुद्धा काडीमात्र किंमत न देता मारण्यात येते अथवा लवकर लग्न लावून घराबाहेर काढले जाते .मग जर १०० सामजिक संस्था उभ्या राहूनसुद्धा हा प्रश्न सुटत नसेल तर मग आपण का पुढाकार घेऊ नये .आणि आपल्याकडे हल्ली जगण्याची वर्ष कमी होत चालालीयेत असं म्हणतात तर त्या कमी कालावधीत इतरांना काही देता येईल असे आपले प्रयत्न असतील तर काय वाईट.असं म्हणतात की माणूस तोडणं सहज शक्य आहे पण तीच माणसं जोडणे कठीण आहे.त्यामुळे माणसांचा पसारा जितका जास्त तितकी आपली सृष्टी हरीभरी होईल असे माझे मत आहे .आणि तेच मी सुहासला देखील सांगितले.
दुसरा दिवस उजाडला तशी मी माझ्या कामात मग्न झाले परंतु अर्धा वेळ तर कालचा विषय आणि सुहास काय विचार करत असेल यातच गेला.मलाही माझ्या स्वतःच्या मुलाची आई व्हायला आवडले असते पण संसारात एवढी सारी मुलं अनाथ आहेत तर त्याच्या वाट्याला आपण सुख का घेऊन जाऊ नये अश्या मतांची मी आहे.मग माझी साथ कोणी देवो अथवा न देवो.मी माझे काम पार पडणार म्हणजे पडणारच.
दारावरची बेल वाजली तशी भानावर आले.दरवाजा उघडल्यावर एक नाक बरबटलेला पोर घेऊन सुहास बाहेर थांबलेला.त्याला बघून मी थबकलेच .म्हंटल ,काय रे काय झालं? तेव्हा त्याच्याकडून असं कळलं की हा छोटा मुलगा सुहास जेव्हा सिग्नलवर चहा पिण्यासाठी थांबलेला तेव्हा गाडी पुसायला आला .आणि तेवढ्यात एका मांजराने गाडीच्या चाकावर पाणी सोडले तर या चिमुकल्याने ते साफ करण्यासाठी आपले पूर्ण कपडे खराब केले.एकतंर ते पोर एवढेसे आणि कष्ट घ्यायला गेले हेच मोठे काम त्याच्यासाठी .मला राहवले नाही म्हणून मी त्याला घरी घेऊन आलो.म्हंटलं पैशांची मदत देण्यापेक्षा त्याच्या आयुष्याला काही मदत केलेली बरी ,म्हणून मी आजूबाजूला चौकशी केली की हा कोणाचा पोर आहे किंवा याचे कोणी नातेवाईक किंवा याचे कोणी साथीदार वगैरे आहेत का, तर तिकडच्या ठिकाणी विचारपूस केल्यावर कळले की याचे इथे असे कोणी नाही.जवळजवळ ४ ते ५ महिने झाले असतील हा इथे असं उपजीविकेचे साधन म्हणून इथे चहा प्यायला येणाऱ्या गाड्या पुसतो आणि आपली उपजीविका चालवतो..असेल एक ८ ते १० वर्षाचे पोर .लहान आहे बिचारं म्हणून सर्व त्याला जितकी होईल तशी मदत करतात आणि कोणी खाण्याची तर कोणी पैशांची मदत करतात.पण पोर पण लय बेरकी ,हे जागा सोडून कुठे जात पण नाही .घुटमळला तर आजुबाजुला.जास्त लांब जात नाही त्यामुळे त्याच्या हरवण्याचा प्रश्न उद्भवत नाही .हा एकदा एक सामाजिक संस्था सर्व्हे करायला आलेली तेव्हा नेमके हे पोर संडासात जाऊन बसले त्यामुळे त्यांच्या हाती ते सापडले नाही ;नाहीतर त्याचे नक्की काहीतरी भले झाले असते .आम्हाला पण खूप वाटते की या पोराने असे इथे राहू नये.जागा चांगली आणि सुरक्षित असल्याने हा पोर सुखरूप आहे इथे.पण असेच किती दिवस चालणार.सर्व दिवस थोडी सारखे असतात.तिथल्या रहिवाशाने माहिती दिली.
असे सर्व कळल्यावर मी तडक त्याला माझ्यासोबत गाडीत बसण्यासाठी बोलावले तर पठ्ठ्या पहिले तयार नव्हता मग सांगितले की तुंला मस्त खाऊ देऊ आणि कपडे देऊ ...तरीही त्याला काही समजेना ..नन्तर ते बिचारे पोर पळत असताना मी त्याला कडेवर घेऊन सांगितले की आपण आईकडे जाऊया तर कशाचाही विचार न करता लगेच त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले आणि ते पोरगा रस्ताभर सहज ,अजिबात गोंगाट न करता माझ्यासोबत आले .गाडीत असताना त्याने अजीबात हु की चू केले नाही .मग जसे घर जवळ आले तसे मी त्याला सांगितले, कि आले आपल्या आईचे घर तसे लगेच त्याने गाडीतून टूनकन उडी मारली आणि दरवाजासमोर जाऊन उभे राहिले .दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न करत होते पण त्याला काही जमेना म्हणून मीच दारावरची बेल वाजवली.
हे सर्व ऐकत असताना माझे त्या छोट्या पोराकडेच लक्ष होते,सुहासचे बोलणे संपल्यावर त्याने लगेच मला मिठी मारली आणि शब्द उच्चारले..... ‘आई’.
मी सुहासच्या गळ्याभोवती मिठी मारली...माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता आणि मला काय करू आणि काय नको हे सुचत नव्हते .
©काजोल मधुकर नम्रता शिराळकर