बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट - भाग १ MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट - भाग १

श्रावणाच्या सरी कोसळत होत्या...शेतीची कामे करायला बळीराजा नव्या जोमाने तयारी करत होता...राजगडाला सह्याद्रीच्या राक्षसी पावसाचा आणि भन्नाट वाऱ्याचा अभिषेक सुरु झाला होता...गेली चार वर्षे शाहिस्तेखानाने स्वराज्याला पिळवटून टाकले होते...त्यातुन स्वराज्य आत्ताच कुठे सावरले होते... पण आपला राजा सर्व काही ठीक करतील यावर जनतेचा विश्वास होता...सर्व काही निवांत होते...निसर्गाने कृपा केली होती पाऊस हात देत होता.


पण राजगडाच्या पद्मावती मंदिरात राजे अस्वस्थपणे येरझारा घालत होते....स्वराज्य शांत असले तरी राजांच्या मनाला शांतता नव्हती...स्वराज्य उभे राहत होते नाही ते धावते करायचे होते... स्वराज्याला मलमपट्टी करायची होती..अनेक उध्वस्त संसार नव्याने मांडायचे होते....पण कसे करणार सर्व ... राजांच्या भव्य कपाळावरचे दुभोटी गंध चिंतेमुळे आक्रसले जात होते... राजांची नजर राजगडापासून दीडशे कोस दूर असलेल्या औरंगजेबाच्या "सुरतेवर" रोखली होती...पण लगेच आज ठरले आणि उद्या निघाले असे करून चालणार नव्हते ...कामगिरी फत्ते करण्याआधी तिथली खडानखडा माहिती हवी होती...अनेक ठिकाणी मोगलांची ठाणी होती..खडी सेना होती...आणि स्वराज्यालातले काही घरभेदी हि होते आणि मुख्य म्हणजे ती सुरत हि काही ऐऱ्या-गैऱ्या ची नव्हती.. साक्षात औरंगजेबाची होती...


तेवढ्यात मंदिराचे पुजारी राजांसमोर आरतीचे ताट घेऊन आले ....राजांची नजर त्या पुजाऱ्याच्या चेहऱ्यावर लागली होती...तो नेहमीचा पुजारी वाटत असला तरी तो नव्हता... त्या माणसाने अगदी त्या पुजाऱ्याच्या वेष अगदी हुबेहूब वठवला होता....दोघांची नजरानजर होता...राजांच्या कपाळावरचे दुभोटी गंध शिवाच्या तिसऱ्या डोळ्यासारखे अगदी स्थिर झाले...चिंता जाऊन चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा उमटली...आणि राजे बोलते झाले...व्वा बहिर्जी व्वा... आणि राजांनी बहिर्जीना आपला मनसुबा सांगितला....मंदिरा बाहेरच्या सैनिकांना वाटत होते राजे नेहमीच्या पुजाऱ्याशी बोलत आहेत..किंबहुना त्यांच्या लेखी "बहिर्जी नाईक" नावाची कोणीही व्यक्ती अस्तित्वातच नव्हती....थोड्या वेळाने राजे निवांत होऊन दर्शन करून मंदिरातून निघाले आणि "बहिर्जी नाईक" पाली दरवाजातून पाली गावात उतरून आले... ते फकिराच्या वेषात...एका घरासमोर उभे राहुन भिक्षा मागितली...आणि एका तिथल्या मशिदीत माथा टेकुन गावजवळच्या जंगलात रवाना झाले...आणि काही वेळाने तो भिक्षा देणारा आणि मशिदीच्या समोर असणारा भिकारी येऊन बहिर्जीना भेटले....

बहिर्जीनी आपल्या साथीदारांना राजांचा मनसुबा सांगितला आणि त्यांनी त्या जंगलात सांकेतिक भाषेत आवाज दिले ... ते ऐकून त्यांना त्याच सांकेतिक भाषेत उत्तर आले आणि काही वेळातच अजुन काही साथीदार येऊन त्यांना भेटले...थोडा वेळ त्या सर्वात काही बोलणं झाले आणि सर्व वेग वेगळ्या वाटांनी औरंगजेबाच्या सुरतेला रवाना झाले ..... कामगिरी तशी सोप्पी नव्हती ...स्वःत राजे जातीने कामगिरी पार पाडणार होते...कुठेही कसूर झालेली चालणार नव्हती.. एकवेळ सुरतेचा खजिना नाही आलं तरी चालेल...पण लाखांचा पोशिंदा... स्वराज्यच धनी... सुखरूप परत आणायचे होते .... त्याच विचारात बहिर्जीचा घोडा सुरतेच्या दिशेने उधळला...राजगड आणि राजे आता अगदी निवांत झाले होते...पावसाने जोर धरला होता ....बहिर्जी आणि त्यांच्या साथीदारांनीसुद्धा....

खूप मोठी मोहीम होती...आपल्या साथीदारांना आवश्यक ते सूचना देऊन आणि त्यानां सुरतेच्या दिशेच्या रवाना केले ... आणि स्वतः मात्र राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या निबिड जंगलात धाव घेतली...बहिर्जी जसे जंगलात आत जात होते तसे जंगल अजून दाट होते होते ... सकाळीही सूर्याची किरणे जमिनीवर यायला बिचकत असत त्यात हा राक्षसी पाऊस ... संध्याकाळ का सकाळ काहीही काळत नव्हते..बहिर्जीनी एका ठिकाणी घोडा थांबवला आता पुढे पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता ... एक दोन टेकाड ओलांडून बहिर्जी जंगलात एका ठिकाणी मोकळ्या जागेवर येऊन उभे राहिले .... आसपासचा अंदाज घेतला आणि समोर असणाऱ्या मोठ्या वडाच्या झाडाला वळसा घालून त्या झाडाच्या पाठच्या बाजूला येऊन उभे राहिले... आणि समोर असणाऱ्या निवडुंगाच्या झाडीकडे वाटेतले दगड धोंडे आणि एक छोटी नदी पार करून चालते झाले ... ती निवडुंगा ची झाडी चांगली २ ते ३ पुरुष उंचीची होती...पुढे जायला अजिबात रस्ता नव्हता ... मग बहिर्जी का आले होते तिथे.???.. सुरतेचा रस्ता तर दुसरा होता ! मग काय कारण होते?? ......... बहिर्जीचे जमिनीवरचे साथीदार तर तयार झाले होते....पण आकाशातले साथीदार ते सुद्धा येणार होते ना...अहो राजा येत होता स्वतः मग ते असे पाठी राहतील...स्वराज सर्वांचे होते.. एका खारुताईने नाही का प्रभू रामचंद्राला सेतू बांधायला मदत केली होती.

निवडुंगाच्या झाडी जवळ आल्यावर बहिर्जीनी एक सांकेतिक आवाज काढला... आणि तसाच आवाज दोन तीनदा झाडीच्या पलीकडून आला... आणि अलिबाबाच्या गुहेचे दार उघडावे तसे त्या निवडुंगाची भिंतीत एक दरवाजा उघडला गेला... आणि बहिर्जीनी मोकळ्या मैदानात पाय ठेवला नसेल तेवढ्यात ६ ते ७ बहिरी ससाणे ,काही गरुड, कबुतरे यांनी कल्ला करायला सुरवात केली...आपल्या पोशिंद्याला त्यांनी बरोबर ओळखले होते...आणि तेवढ्यात लगबगीने जिवाजी आणि भिवाजी धावत आले... हे जिवाजी आणि भिवाजी बंधू पक्षी आणि प्रांण्यांचे आवाज काढण्यात एकदम पारंगत होते आणि प्रांण्यांची भाषा सुद्धा जाणत होते...बहिर्जीनीच त्यानां शोधले होते... बहिर्जीनी त्या बंधूंना काही सुचना दिल्या तसे त्यांनी ३ ते ४ बहिरी ससाणे २ गरुड आणि काही कबुतरे यांना मोकळे केले...आणि त्या स्वराज्याचा मूक शिलेदारांनी...त्या राक्षसी पाऊसाला न जुमानता आकाशात झेप घेतली ... जिवाजी आणि भिवाजी आपल्या माणसांना काही खास सूचना दिल्या...आणि ते बंधू आणि बहिर्जी त्या निवडुंगाच्या झाडीतून बाहेर आले... आणि बहिर्जीनी मगाशी घोडा थांबवलेल्या ठिकाणी आले.
तिथुन उत्तर दिशेला ४ ते ५ मैल ती तिघे चालत गेले आणि एक डोंगरावर चढले आणि जंगलातली ती सर्वात उंच जागा असल्यामुळे तिथुन आसपासचे जंगल नीट नजरेत येत होते .....तिथेच बहिर्जीनी आणि जिवाजी आणि भिवाजी बंधूनी थोडा आराम केला आणि पाठीशी बांधलेला भाकर तुकडा तोडला.. काही वेळ आसपास चा अंदाज घेतला... आणि अंदाजे एक ते दोन तासापूर्वी सोडलेले दोन बहिरी ससाणे आणि एक गरुड.. ते तिघे आराम करत असलेल्या जागी आले... तेव्हा त्यांच्या पायाला चिट्ठ्या बांधल्या होत्या...त्यांत सांकेतिक स्वरूपात काही माहिती होती....कोंढाणा आणि राजा जसवंतसिंगाबद्दल
राजगडा पासून ३० ती ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या " कोंढाणा " किल्ल्याला राजा जसवंतसिंग वेढा घलून बसला होता..... पण फक्त बसलाच होता.. सह्याद्रीचा पाऊस आणि जंगल ह्याच्यापुढे त्याचे काहीच चालत नव्हते..... बहिर्जीना आधी मिळालेली माहिती खरी होती आणि आता तर त्यावर शिक्कामोर्तब झाले होते...राजा जसवंतसिंग आणि त्याचे १० हजाराचे सैन्य काहीच करत नव्हते... अहो अश्या पावसाची कुठे सवय होती त्याना आणि मराठे पण त्याला काहीच त्रास देत नव्हते बसतोय तर बसुंदे आता पुढे कूच करायला काहीच हरकत नव्हती...
त्या चिट्ठ्या वाचून बहिर्जी बोलले... " जिवाजी आणि भिवाजी फार मोठी जोखीम आहे...आता उन्ह उतरतील आपले घोडे तयार ठेवा...रातच्या पहिल्या पहारी निघू... जिवाजी बोलले पण बहिर्जी रातच्याला का ??? आणि सकाळी दिवसा उजेडी का नग...बहिर्जी हसले आणि बोलले... अर आपलं धनी पण आपल्यसंगट येणार हायेत ??? कुणाची नजर नको पडायाला ??? कुठं जातोय काय करायला जातोय ?? काहीच नग समजायला !!!!
काही वेळाने बहिर्जी ,जिवाजी आणि भिवाजी डोंगर उतरून खाली आले आणि सरळ सोपा मार्ग सोडून जंगलातल्या वाटेनेच...दौडत सुरतेच्या दिशेनेच निघाले ... आता काही दिवस रात्रीचा उजेड करायचा होता... औरंगजेबाच्या सुरतेवर आता हात मारल्याशिवाय बहिर्जीना आता चैन पडणार नव्हती....

बहिर्जी, भिवाजी आणि जिवाजी दौड करतच होते....सोबतीला कोण होते..किर्र काळोख....रानवेडा पाऊस... भर्राट वारा...घनघोर जंगल... वेडया वाकड्या वाटा... डोंगर दऱ्या आणी स्वराज्य सांभाळणारा सह्याद्री.... आई भवानी आणि राजांचा हात होता डोक्यावर मग घाबरायचंय कशाला.. पाऊस थांबला होता...झुजूमुंजू होत होते..बळी राजा आपल्या सोनपिवळ्या शेताच्या दिशेने चालला होता...कोंबडे जिवाच्या आकांतने ओरडत होते...स्वराज्य हळूहळू जग होत होते . आता तिघांनी घोडे अजूनच जंगलात पिटाळले.. त्या तिघांची नजर काहीतरी शोधतं होती... एखादी चोरवाट, भुयार... जंगलाच्या पोटात लपलेली एखादी मोकळी जागा... येणारा खजिना सांभाळून आणायला काहीतरी जागा नको ... एवढे पाच-सहा हजार मावळे..तेवढेच किंबहुना जास्त घोडे.. मग ते थांबणार कोठे...ठिकठिकाणी मोगली सरदार... ठाणी... खडे सैन्य होते..

एका छोट्या टेकडीवर चढून...भिवाजीने आपल्या दोस्तांना आवाज दिला आणि हुकमेसरशी बहिरी ससाणा आकाशात घिरट्या घालू लागला .. पुढे गेलेल्या साथीदारांनी निरोप पाठवला होता.. रस्ता सांगितला होता ...जागा पहिल्या होत्या....पुढे सात -आठ दिवस बहिर्जी, भिवाजी आणि जिवाजी यांचा तो परिपाठच होऊन गेला होता... रात्री दौड आणि सकाळी थोडा आराम करून जंगलाचा कानोसा.

आता "सुरत" नजरेच्या टप्प्यात होती... बहिर्जी मोगली सैनिकाचा वेष परिधान करून एकटेच पुढे झाले...भिवाजी आणि जिवाजी तिघ्यांच्या घोड्यांची आणि पाठून येणाऱ्या पाच ते सहा हजार मावळ्यांची आणि त्यांच्या घोड्यांची व्यवस्था लावण्यासाठी पाठी थांबले .

"सुरत" .... दक्षिणेला भरभक्क्म बुरहाणपूर दरवाजा... मुख्य रस्ता तिथूनच होता... बाजूला खळाळता समुंद्र...समुद्रावर सज्ज असलेली कित्येक मोगली जहाज... डच ,इंग्रज , पोर्तुगीच,अरब त्यांच्या वखारी... व्यापारी बहरजी बोहरा, हाजी कासम, हाजी बेग ,अब्दुल जाफर यांचे उंची महाल...मोठमोठे वाडे... त्याला सोन्याचे खांब ...नक्षीदार कमानीच्या खिडक्या... प्रशस्त रस्ते त्या वरून धावणाऱ्या मेणा,पालख्या , इंग्रज्यांच्या चार चाकी बग्ग्या...व्यापारी आणि यात्रेकरू यांच्यासाठी बांधलेल्या सराया... देशोदेशीचे वकील..खास औरंगजेबासाठी नजराणा म्हूणन आणलेले जातिवंत २०० अरबी घोडे...कित्येक प्रकारची दुकाने होती सुरतेच्या सुभेदार " इनायत खानाच्या" किल्ल्याबाहेरच.... कुठं केशर,कस्तुरी,चंदन,अत्तर,हस्तिदंत,रेशीम आणि जरीचे कापड,उंची वस्त्रे होती'... गुलामांचा आणि स्त्रियांचा व्यापार त्यातून मिळणारे रग्गड उत्त्पन.....पण राजांना यातील काही नको होते...फक्त सॊने, चांदी, माणिक, मोती , बस्स एवढेच हवे होते....सागरातून फक्त तीन ते चार मुठी हव्या होत्या ...श्रीमंत योगी होता आपला राजा. सोन्याचा धूर येत होता...औरंगजेबाची सोन्याची राजधानी होती ती...कुबेराची श्रीमंती सुद्धा त्याच्यापुढे काडीमोल होती...