Pralay - 13 books and stories free download online pdf in Marathi

प्रलय - १३

प्रलय-१३

      मोहिनी त्या गरुडावरती बसून हवेत उंच उडत होती .  वाहणाऱ्या वाऱ्याबरोबरच तिचे केसही हवेत उडत होते .  ती कुठे चालली होती .....? तिलाही माहित नव्हतं .  तिची संवेदना जणू नष्ट झाली होती .  पूर्वीची मोहिनी आता राहिली नव्हती .  जणू तिचा नुकताच जन्म झाला होता .  बऱ्याच नवीन गोष्टी तिला आठवत होत्या . ज्या गोष्टी तिने कधीच अनुभवल्या नव्हत्या ,  त्या गोष्टी तिला आठवत होत्या.  आठवणी नव्याने लिहिल्या जात होत्या . 
   कोऱ्या पुसलेल्या पाटीवरती कोणीतरी अक्षरे लिहावीत त्या प्रमाणे तिच्या संपूर्ण  रिकाम्या झालेल्या मेंदू वरती आठवणीच्या आठवणी कोरल्या जात होत्या . तिला काहीच माहित नव्हते ,  पण आता सारं काही अचानक तिच्या डोक्यात घुसत होतं . तिला हव्या असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी तिने गरुडाला हाक दिली . 

     उंचच्या उंच डोंगरावरती काळ्या दगडाने बनलेली एक कपारी दिसत होत्या .  एके ठिकाणी आत गुहा होती .  त्या गुहेच्या समोरच्या बाजूला गरुड थांबवत त्यावरून ती खाली उतरली . त्या गुहेच्या आत संपूर्ण अंधार होता . त्या अंधारात कुठेतरी एक छोटीशी मशाल चमकली . मोहिनी निघाली , त्या मशालीच्या दिशेने.....

काही पाऊले अंधारात चालल्यानंतर तिचे डोळे अंधाराला सरावले . अंधारातच एक पायवाट सापडली व त्या पायवाटेने काही अंतर गेल्यावरती मशालींचा लख्ख उजेड पसरला होता . त्या मशालींच्या उजेडात बरेच लोक जमले होते.  ते सर्व लोक जणू तिचीच वाट पाहत त्या ठिकाणी उभे होते . त्या सर्व लोकांच्या समोर असलेल्या उंचवट्यावरती उभी होती . ती आत गेल्याबरोबर सर्वांनी एकच जल्लोष करत आरडाओरडा सुरू केला . 

ती काहीच न कळल्याने त्याच ठिकाणी उभी राहिली . नंतर तिच्या बाजूने , एक तिच्या सारखी  मुलगी आली .  तिच्याच वयाची असावी . ती आरूषी होती . तिने सर्वांना शांत करत बोलायला सुरुवात केली.....

" आता आपल्या सर्वांच्या समोर उभी आहे ती म्हणजे प्रलयकारिका . आपल्या सर्वांना युद्धात मदत करून ,  पुन्हा एकदा पृथ्वीतलावरती आपली सत्ता आणण्यासाठी ,  मारूतांची सत्ता आणण्यासाठी , ती आपली मदत करणार आहे......
प्रलयकारिकेची मदत घेऊन आपण सर्वप्रथम जंगली सेनेवरती आपले स्वामित्व प्रस्थापित करणार आहोत .  त्यानंतर जंगली सेना घेऊन आपण एकापाठोपाठ एक  राज्य जिंकत जाणार आहोत . ज्या ज्या लोकांनी वरती अन्याय अत्याचार केला त्या लोकांना आता हा प्रलय झेलावा लागणार आहे ........

दूर कुठे तरी .  तोच भिकारी पुन्हा एकदा तारस्वरात त्याचं गाण्याची आवर्तने करत होता . तो म्हणत होता....।

    जन्म तिचा झाला आहे 
      प्रलय काळ आला आहे
      मृत्यू आता तांडव करेल
     गिधाडांसाठी मेजवानी उडेल
     खरेखोटे सारे मरतील
    हवेचे राजे फक्त उरतील.......


     जलधि राज्याची सेना अजून त्याच ठिकाणी होती . संपूर्ण दिवसभर ते त्याच ठिकाणी थांबले होते . भिंती अलीकडे जलधि राज्याची सेना व भिंती पलीकडे त्रिशूळाची . त्रिशुळांची सेना दिवसभर आरोळ्या मारत होती , पण जसा सूर्यास्त झाला तसं त्या आरोळ्या बंद झाल्या . भिंतीपलीकडे कोणी आहे की नाही असा शुकशुकाट पसरला . ती सेना तिथेच होती , मात्र कोणावरही आक्रमण करत नव्हती . त्यामुळे जलधि राज्याची सेना संदिग्ध अवस्थेत होती .  महाराज कैरव व बाकी युद्धकुशल नेते पुढे काय कृती करावी यावर ती चर्चा करत होते . चर्चे अंतिम एक गोष्ट निष्पन्न झाली .  ती म्हणजे ज्या अर्थी त्रिशूळांची सैना आक्रमण करत नव्हती ,  त्याअर्थी भिंती अलीकडे येऊ शकत नव्हती . याचा अर्थ ते त्या सैन्यावर आक्रमण करू शकत होते बदल्यात ती  त्रिशुळांची सैना काहीही करणार नव्हती.....

  याचा अर्थ भिंत पडेपर्यंत ते सर्व सुरक्षित होते .  भिंत पडल्यानंतर पलीकडे असलेली विराट सैना आक्रमण करणार होती . त्यामुळे भिंत पाडायला तर थांबवायलाच हवी होती . त्या बरोबरच कसेही करून ती सैना नष्ट करायला हवी होती . महाराजांनी एक दहा हजारी तुकडी महाराज विश्वकर्मा यांच्या मागे पाठवली ,  जेणेकरून त्यांना महाराज विक्रमांना थांबवायला सोपे जावे . बाकी दहा हजारांची तुकडी घेऊन ते त्या त्रिशूळांच्या सैन्याविरुद्ध लढणार होते .

     सर्व सैनिक भिंतीवरती चढून धनुष्यबाण घेऊन उभारले . ज्या काही तोफा होत्या त्याही भिंतीवरती चढवल्या . मोठे दगडी गोळे टाकायची यंत्रे भिंती अलीकडे उभा होती . त्यावर ती खनिज तेल टाकून तीही तयार करण्यात आली .  जलदी राज्याकडे दारूगोळा विपुल प्रमाणात होता . सर्व तोफांमध्ये गोळे भरण्यात आले . भिंतीपलीकडे जरी विराट सेना असली तरी भिंत असेपर्यंत अलीकडील सैनिकांना काहीच धोका नव्हता . कारण आतापर्यंत तरी परिस्थिती तशीच राहिली होती.......

       मोहिनी व त्या लहान मुलघबाबत झालेल्या गोष्टीवरती विचार करत आयुष्यमान व भरत उत्तरेच्या जंगलात फिरत होते .  त्यांना कसेही करून लवकरात लवकर दक्षिणेकडे पोहोचायला हवं होतं . महाराज विक्रमांच्या आदेशाला कसंही करून थांबवायला हवं होतं .  जरी त्यांनी बिया टाकून पुढची व्यवस्था केली असली , तरीही काळी भिंत पाडण्यापासून महाराज विक्रमांना थांबवायलाच हवं होतं . त्यासाठी दक्षिणेकडे निघाले होते . मात्र राहून राहून त्या लहान मुलीचा विचार आयुष्यमान च्या डोक्यात होता . ती लहान मुलगी नक्की हवेत कशामुळे उडाली ....? तिच्यासोबत इतका क्रूर प्रकार का झाला असावा......?  या सर्व गोष्टींचं त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा स्पष्टीकरण नव्हतं .....? एका लहान व निष्पाप मुलवरती दैवाने इतके अन्याय अत्याचार का करावेत.....?  याचा त्याला मनस्ताप होत होता . त्याच्यासमोर एक लहान मुलीचा जीव गेला होता व त्याची प्रेयसी मोहिनी गरुडावर बसून दूर कुठेतरी निघून गेली होती . मोहिनी स्वतःहून त्याच्यापासून दूर जाणार नाही ,  याची त्याला खात्री होती ....मग ती दूर का गेले हा प्रश्न त्याला छळत होता . तो आतून चिडला होता .  त्याला खूप राग आला होता .....?  जे काही होतं , ज्याने कोणी त्याला मोहिनीपासून दूर केलं होतं व ज्याने कोणी त्या लहान मुलीचा जीव घेतला होता ; त्याला आयुष्यमान आता सोडणार नव्हता ......! तो आतून होरपळत होता...... प्रतिशोधाची ज्वाला त्याच्या अंतरात जळत होती.........

    त्या दृश्यरूपांतरण कापडावरती शौनक ने त्याच्या वडिलांना जे काही दाखवलं , त्याच्यामुळे त्या तंत्रज्ञाची झोप उडाली . भिंत पडल्यामुळे शृंखला सुरू होणार होती . त्या शृंखलेचा शेवट प्रलयाने होणार होता .  जरी शृंखला थांबवली नाही तर प्रलय काळाला सुरूवात होणार होती . जर भिंत पाडायचे थांबवले नाही तर पृथ्वीतलावरील सर्व जीवन धोक्यात येणार होते .  पृथ्वीतल पूर्वी हे बऱ्याच वेळा भिंती पलीकडील सम्राटाच्या छत्रछायेखाली आले होते आणि पुन्हा त्याच्या छत्रछायेखालून बाजूला होत त्याला भिंतीपलीकडे ही डांबले होते . पण  प्रलय हा भिंतीपलीकडील सम्राटाहूनही क्रूर होता .  तो प्रलय होता आणि प्रलय कुणाची कदर करणार नव्हता......

          आणि तो शोनकचा वडील असलेला तंत्रज्ञ हा साधासुधा नव्हता .  कैक पिढ्यांपासून त्यांने ही कला जोपासली होती . त्याचं आयुष्य आता पृथ्वीतलावरती असलेल्या कोणत्याही व्यक्ती पेक्षा मोठं होतं . सर्वात अनुभवी असलेला असा तो तंत्रज्ञ होता. त्याने त्याच्या आयुष्यात बऱ्याच युगाची सुरुवात बऱ्याच युगाचा अंत पाहिला होता आणि तोही या प्रलय काळाला पाहून अंतरातून घाबरला होता . भितीने त्याला भक्ष्य केले होते....

        त्या तंत्रज्ञाने आपल्याबरोबर बऱ्याच गोष्टी घेतल्या व उत्तरेच्या जंगलात असलेल्या सैनिकी तळाकडे निघाला . हेच ते सैनिकी तळ होते ज्या सैनिकी तळाकडे भिल्लव  सार्थक व त्याचे साथीदार आणि अधिरथ , अद्वैत , सरोज आणि त्यांचे साथीदार निघाले होते .  त्या तंत्रज्ञाचे हे छोटासे खोपटेही उत्तरेच्या जंगलातच होतं  . त्यातच तो तंत्रज्ञ व त्याचा मुलगा राहत होते.  तंत्रज्ञाला बऱ्याच गोष्टी अवगत होत्या . त्याने त्याला माहीत असलेल्या विज्ञानाच्या व तंत्राच्या साह्याने बऱ्याच गोष्टी माहीत करून घेतल्या .  व फटाफट निर्णय घेतले . तो स्वतः उत्तरेच्या जंगलात असलेल्या सैनिकी तळावर जाणार होता ,  आणि त्याने त्याच्या मुलाला त्याच जंगलात फिरत असलेल्या वारसदाराच्या सभेच्या प्रमुखाला शोधून त्या सैनिक तळावर आणण्याचा आदेश दिला.....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED