Rudra - 8 books and stories free download online pdf in Marathi

रुद्रा ! - ८

कालच्या 'राजयोग' डिनरच्या वेळची राधाने दिलेली माहिती राघव पुन्हा पुन्हा आठवत होता.आणि त्या बरोबर खळखळून हसणारी सुंदर राधा पण नजरे समोरून हालत नव्हती! तरी त्याने आपले मन केस वर फोकस केले. तो मनोहर नेमका कोण होता? तो संतुकरावांना कशासाठी भेटायला गेला होता? त्या दोघात कसलेही साम्य नव्हते. संतुकराव अति श्रीमंत, तर तो त्या मानाने दरिद्री! काही नाते असेल का? हा भेटायला आल्या पासून संतुकराव आऊट हाऊस मध्ये का झोपू लागले? का तो फक्त त्यांचा विक्षिप्त पणा होता? नाही तो विक्षिप्तपणा खचितच नसावा. कारण विक्षिप्तपणा चार-दोन दिवस टिकेल, महिनाभर नाही! मनोहर पासून काहीतरी धोका आहे हे संतुकरावांना जाणवले होते! मनोहर आणि खून्याचे सापडलेले पुरावे, हे मनोहर खुनी नसल्याचे स्पष्ट संकेत देत होते. बुटाच्या ठश्याचा आकारातून तो सहा फुटाच्या आसपास उंचीची व्यक्ती होती! पण एक मात्र नक्की होते कि मनोहर आणि संतुकरावांचा खून यांच्यात संबंध होता! पण काय? बरे हा मनोहर अचानक कुठून उगवलंय? याची पाळंमुळं खणून काढावी लागणार होती! या चारदोन दिवसात त्यांनी सर्कुलेट केलेल्या स्केचचा रिस्पॉन्स अपेक्षित होता.
राघवने फोन उचलला.
"राकेश, त्या स्केच संबंधी काही माग लागतोय का? काही क्रिमिनल रेफरन्स?"
" आम्ही शोधत आहोत. अजून काही हाती आलेलं नाही. काही वाटले तर लगेच कळवतो."
" ठीक. बर त्या जसवंतच्या प्रिंट मॅच करून पाहिल्यात का?"
"अरे हा, मी त्या साठीच फोन करणार होतो! तेव्हड्यात तुमचाच फोन आला."
" जमतात!"
" नाही सर! अजिबात जमत नाहीत. जसवंत खुनी नाही! कुणीतरी वेगळीच व्यक्ती आहे! "
राघवाची एक आशा मावळी. जसवंत नाही तर मग कोण?
त्याने जाधवकाकाला आवाज दिला.
"जाधवकाका, तो जसवंत कॅनवास शूज का घालतो ते विचारलंत?"
" हो. त्याचा एक कातडी बूट कुत्र्याने पळवलाय !"
यावर राघव बिचारा काय बोलणार? फक्त त्याने असहाय्य्यपणे जाधवकाका कडे पहिले.
राकेशच्या फोन वाजला.
"सर, मी जॉन बोलतोय!"
"बोल!"
" तुमचा तो 'स्केचवला' माणूस माझ्या समोर चालतोय! त्याला अटक करू का ?"
"नको! त्याच्यावर लक्ष ठेव! तो कोठे रहातो ते कळले तर पहा!"
" तो भोसेकर चाळीत भाड्याने खोली घेऊन राहतोय आणि त्याचे नाव-----"
"मनोहर आहे!"राघवने त्याचे वाक्य पूर्ण केले!
जॉन वेड्या सारखा फोनकडे पहात राहिला. या राघव साहेबाला भूत-बीत वश आहे का? मी साल चार दिवसा पासून आडून आडून चौकशी करतोय आणि याना आधीच कस कळत?
जॉनचा फोन चालू होता तेव्हा एक इनकमिंग कॉल येत होता. जॉनशी बोलून झाल्यावर राघवने मोबाईल स्क्रीनवर पहिले, तोच पुन्हा फोन वाजला.
"सर, शकील हियर!" कोण शकील? मग राघवला जाधवकाकानी सांगितलेले आठवले शकील जसवंतला फालो करत होता.
"बोल शकील!"
"सर आज जसवंत किसीको मिलने हाय वे के 'पंजाब ढाबे' पे जाने वाला है!"
" किसको?"
"पता नही!"
"कब?"
"रात आठ बजे!"
"शकील, तू उसको फालो कर. मै भी आ रहा हु!"
"जी, मै रस्ता देखुंगा!" राघवने फोन कट केला.
०००
रुद्राचा आजचा दिवस भयानक बिझी जाणार होता, हे त्याला कोणी सांगितले असते तर त्याने सांगणाऱ्याला वेड्यात काढले असते. सिगारेट संपली म्हणून तो फ्ल्याट खालच्या टपरीवर आला ,तर ती आज बंद होती. तो तसाच दोन गल्ल्या पलीकडे असलेल्या 'बियर शॉपी' कडे निघाला. एखादी चिल्ड बियर आणि तेथल्याच टपरीवरून सिगारेटचं पाकीट घ्यावे असा विचार त्याने केला. बियर बाटली घेऊन तो टपरीकडे वळला.
" कतरी सुपारी, खिमाम पट्टी, तिनसो बीस, एक्सोबीस उप्परसे बाबा रत्ना, गिला कत्ता! दो बनाव एक पार्सल, एक यहींच खाऊंगा! " टपरी वरील एकुलतं एक गिऱ्हाईक ऑर्डर देत होत.
हातातल्या पानाला चुना लावत गादीवरल्या चाचानी आपली टकळी चालू केली.
"बम्बईके नाही लागते! कहा से आये हो जनाब?"
" हम सोलापूर से आया हय !"
मधेच शंभराची नोट रुद्राने चाच्याकडे सरकवली. रुद्रा, चाचाचे नेहमीचे गिऱ्हाईक. न बोलता त्यांनी रुद्राचे सिगारेट पाकीट दिले. रुद्राला पाहून ते गिऱ्हाईक सटपटल्याचे रुद्राच्या नजरेतून सुटले नाही. त्याचा बोलण्यातला सोलापुरी हेल ओळखीचा वाटला. रुद्राने चार पावले लांब सरकून पाकिटातली सिगारेट काढून ओठात धरली. ती पेटवताना त्याने त्या माणसाचे बारकाईने निरक्षण केले. सुपारी देणारा साधारण याच उंचीचा होता. याचे गाल आणि नाक सामान्य होते पण पॅडिंग केले तर तो तसाच दिसणार होता! फक्त पांढऱ्या केसांचा टोप आणि गॉगल कमी होता! तो गृहस्थ रुद्राला पास करून पुढे गेला. अन रुद्राची खात्रीच पटली! त्याचाही चाल किंचित फेंगडी होती! हाच तो,ज्याने त्याला खुनाची सुपारी दिली होती !
०००

पानाची ऑर्डर देऊन मनोहर गादीवरल्या चाचाच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना, अचानक रुद्रा समोर दिसला. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. पण क्षणभरच. एक तर रुद्राच्या डोळ्यात काही संशय किंवा ओळखीच्या खुणा दिसत नव्हत्या, दुसरे तो कसा ओळखणार? त्यावेळेस त्याने वेषांतर केले होते. चेहरा बदला होता,आणि मोठ्या गॉगलने चेहऱ्याचा खूप कमी भाग दिसत होता. अजिबात भिण्याचे कारण नव्हते! मनोहरने मनाची समजूत घातली. चाचाने दिलेले पान दांढे खाली कचकावून धरले. पार्सल पान अलगद खिशात टाकले. दोनचार मिनिटे तेथेच उभारून पानाचं चांगलं चर्वण केले, तोंडातील पान मस्त जमून आलं होत. तंबाखूचा नशील रस तोंडभर धडका मारत होता. वा! झकास!. चार झुरके मारून रुद्रा निघून गेला होता. मनोहर मग ऐटीत तीनशे वीस, एकशेवीसच्या तंद्रीत, आपण महागड्या मर्सिडिसच्या मागे रेलून बसलो आहोत आणि आपला ड्राइव्हर आपल्या साठी डझनभर पानाची ऑर्डर देऊन टपरीवर थांबला आहे, असे स्वप्न पहात तो भोसेकर चाळीकडे निघाला होता. त्याने चुकून जरी मागे नजर टाकली असती तर? तर त्याला पाठलाग करणारा रुद्रा दिसला असता!

०००

'आनंद टी सेंटर' सारखा चहा, जगाच्या पाठीवर कोठेच मिळत नाही असे जसवंतचे व्यक्तिगत मत होते. पुडी लावून झाली ली तो हळूच येथे यायचा. आणि एक 'कडक मिठ्ठी' चहा ढोसायचा! गंजावर गोड खाल्लेकि माणूस लवकर हवेत तरंगतो, हे त्या मागचे छुपे तत्व होते. इतरांच्या चहात दीड चमच्या साखर टाकणारा भट्टिवाल कार्ट जसवंतच्या चहात तीन चमचे टाकत असे. नेहमीच्या गिऱ्हाईकाच्या खोड्या अश्या लहान सहान 'हाटेली'त जपल्या जातात. जसवंत येऊन बसल्या बरोबर त्याने 'कडक मिठ्ठी'ची ऑर्डर दिली. आज तो बेचैन झाला होता. आता संतुकराव मेले होते. कीतीही नाही म्हणले तरी मनोहरचा या खुनात हात नक्की होता! त्याला चिंता होती ती फुकट मिळणार गांजा बंद होणार याची. मनोहर खुनाच्या रात्री संतुकराव येण्या पूर्वी त्या आऊट हाऊस मध्ये काही काळ होता! जसवंतने याचेच भांडवल करण्याचे नक्की केले. इतके दिवस मनोहर आपल्या जवळच्या माहिती साठी 'माल' देत होता, आता हि तो देतच रहाणार होता! आत्तापर्यंत माहित सांगण्यासाठी द्यायचा आता, असलेली 'माहिती' न सांगण्याबद्दल 'माल' देणार होता! त्याने मनोहरला फोन लावला .
" महत्वाचे काम आहे! तुला खूप महत्वाची माहिती सांगायची आहे! तू आज रात्री आठ वाजता 'पंजाब ढाबा',तिथ ये! नाही आलास तर तुझेच नुकसान होऊ शकते! येताना आपला तो 'माल ' आण!"
"जसवंत, मीच तुला फोन करणार होतो! माझे पण तुझ्या कडे एक काम आहे! बरे झाले तू फोन केलास! पोलिसांना तुझाच संशय आला आहे! राघव तुझ्या मागावर आहे! तेव्हा जपून रहा!" मनोहरने जसवंतला घाबरवण्यासाठी एक फुसका बार टाकला!
"ते आपण भेटीत बोलू! संशय कुणाचा आहे?"जसवंत तुसडेपणाने म्हणाला.
आपले बोलणे त्याचा पाठीला टेकून बसलेल्या चौकटी घराची लुंगी लावलेल्या हमालाने ऐकल्याचे त्याला कळण्याचे कारण नव्हते. खरे तर तो इतक्या मोठ्याने फोनवर बोलत होता कि अर्ध्या हॉटेलला ते ऐकू गेले असते. पण त्याच्या बोलण्याकडे कोण लक्ष देणार?
मनोहरने जसवंतचा फोन कट केला. जसवंतची लिंक कट करणे भाग होते. तो त्या आऊट हाऊस मध्ये गेला होता हे जसवंतला ठाऊक होते. राघवच्या तावडीत जसवंत कितपत टिकाव धरू शकेल शंकाच होती! दोन रट्ट्यात पोपटा सारखा बोलणार होता. जसवंतची रिस्क फारकाळ घेता येणार नव्हती! आज त्यानेच बोलावले आहे. पाहू काय करायचे ते !
०००
हाय वेच्या डाव्या बाजूला तो 'पंजाब ढाबा ' होता. रात्रीचे आठ वाजून गेले होते. ढाब्याच्या समोरच्या बाजूला दिवाळी सारखी चकाचक रोषणाई केलेली होती. विस्तीर्ण पटांगणात मोठाले हॅलोजन लॅम्प्स लावले होते. पटांगणातील चार-सहा झाडांवर लाल निळ्या लाईटच्या माळा सोडलेल्या होत्या. पन्नासच्या आसपास बाजावर, आडव्या लाकडी फळ्या टाकून जेवणाची ताट ठेवण्याची सोय केली होती, जेणेकरून बाजेवर मांडी घालून बसून जेवता येईल. जेवण वेळ झालीच होती. ढाबा चांगलाच गजबजला होता. हवेतला गारवा अन भाज्यांच्या मसाल्याचा वास पोटातली भूक वाढवू जात होता! रुचकर सामिष डिशेस साठी हे ठिकाण प्रसिद्ध होते. पार्किंग लॉट मध्ये राघवची 'डस्टर' डौलात उभी होती!
ढाब्याच्या मागच्या बाजूस मंद उजेडाचे लॉन होते. खास दर्दी लोकांसाठी हि जागा होती. सावकाश बियरचा बाटल्या रित्या करून चिकन भाकरीवर ताव मारणारे, अजिबात घाई नसलेले लोक येथे बसत. तेथेच जसवंत एक टेबल पकडून कोणाची तरी वाट पाहत होता. तो खूप अधीर झाला असावा, कारण सारखा घड्याळाकडे त्याची नजर जात होती.
शकील चौकटी घराची लुंगी, वर पांढरा झब्बा,अन डोक्याला जाळीची टाळूला घट्ट चिकटलेली गोल टोपी घालून जसवंतच्या मागे चार टेबल सोडून बसला होता. तो जेथे बसला होता तेथून जसवंतच्या हालचाली स्पष्ट दिसत होत्या,पण तो जसवंतला दिसत नव्हता. नॉक आऊट बाटली शेजारच्या रोस्टेड काजूचा एक एक दाणा तो मनलावून तोंडात फेकत बियरची चव घेतोय असेच पाहणाऱ्याला वाटले असते. पण त्याचे सगळे लक्ष जसवंतवर केंद्रित होते.
"क्या शकीलभाय! अकेलीच बैठे है! आपुन को भूल गये क्या?" एका पांढऱ्या दाढीच्या माणसाने त्याच्या पाठीवर सलगीची थाप मारत विचारले. क्षणभर शकील चकित होऊन त्या माणसाकडे पहातच राहिला. हा बाबा कोण मधेच उपटला? जान न पहिचान मै तेरा मेहमान! पण दुसऱ्या क्षणी ओळख पटली. तो राघव होता! जसवंत भलेही शकीलला ओळखत नसेल पण राघवला लाखात त्याने ओळखले असते. म्हणून हे वेषांतर करावे लागले होते!
"कोन? रहीम चाचा! आयी ये! तशरीफ राखिये! क्या लेंगे?" शकीलने दिलखुलास स्वागत केले.
" अब तो हम आपके मेहमान है! जो आप खिदमद करेंगे सो हमे मंजूर है!" शकील शेजारी राघव बसत म्हणाला.
"सर, क्या लाजवाब मेकअप किया है ? घडीभर मै भी चक्कर खा गया! " शकील हळू आवाजात पुटपुटला.
" जसवंत कुठाय?"
"तो समोरच बसलाय!" नजरेनंच निर्देश करत शकील म्हणाला.
जसवंत चांगलाच अधीर झाल्या सारखा वाटत होता. तो सारखा चुळबुळ करत होता. क्षणा -क्षणाला घड्याळात नजर टाकत होता.
आणि जसवंत तटकन उभा राहिला.! शकील आणि राघव एकदम सावध झाले. बहुदा तो ज्याची आतुरतेने वाट पहात होता ती व्यक्ती त्याच्या दृष्टीपथात आली होती. जसवंत ज्या दिशेला पाहत होता, त्या दिशेला राघवन नजर टाकली. राघव आश्चार्यचकित झाला. कारण समोरून येणारी व्यक्ती 'मनोहर' होती!
मनोहर आणि जसवंत! काय कनेक्शन असावे?
हि संतुकरावच्या खुनाची केस दिवसेन दिवस क्लिष्ट होत चालली होती! हे मात्र खरे होते.

(क्रमशः )

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED