रुद्रा ! - १ suresh kulkarni द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रुद्रा ! - १

रात्रीचे अकरा वाजून गेले होते. रहदारीच्या रस्त्यापासून दोन एक किलोमीटर तो एकाकी 'नक्षत्र' नावाचा टुमदार दोनमजली बांगला ऐटीत उभा होता. हमरस्त्यावरून 'नक्षत्र 'कडे जाणाऱ्या वाटेवर दुतर्फा दाट झाडी होती. त्या झाडांच्या पसाऱ्यात लाईटचे खांब हरवल्या सारखे उभे होते. त्यांच्या प्रकाशाला पानांच्या फटीतून मार्ग हुडकावा लागत होता.
डार्क ब्लु जीन आणि काळा शर्ट घातलेल्या रुद्राने आपली मोटरसायकल एका झाडाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात स्टँडला लावली. सव्वा सहा फूट उंचीचा रुद्रा, कपड्याच्या रंगामुळे त्या अंधाऱ्या वातावरणातली एक छाया होऊन गेला होता. त्याने काही दिवसान पूर्वी या परिसराची कुरियर वाला बनून रेकी करून ठेवली होती. सेक्युरिटी म्हणून एकच दणकट बाउन्सर वाटावा असा गार्ड मेन गेट जवळच्या केबिन मध्ये तंगड्या पसरून बसलेला असायचा. त्याच्या कडे बंदुकी सारखे घातक शस्त्र नव्हते,पण एक भरीव काळा दंडुका मात्र होता. सम्पूर्ण बंगल्या भोवती साधारण दहा फूट उंचीचे आणि दीड फूट रुंदीचे भक्कम दगडी कंपाउंड होते. बंगल्याला वळसा घालून जाणारी एक लहानशी बोळ होती, ती त्या बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या दूरच्या वस्ती कडे जात असे.
रुद्राने आपला मोर्च्या बंगल्या मागे जाणाऱ्या बोळी कडे वळवला. बंगल्यामागे असलेल्या झाडाच्या आधाराने तो कंपाउंड वॉलवर चढला आणि अलगत आत उडीघेतली.मागील बाजूस कम्पाउंडला लागून दोन सर्व्हन्ट क्वार्टर होते. एकात तो गार्ड एकटाच रहात असे. आणि दुसरे रिकामेच होते. रुद्राला मिळालेल्या 'टीप' प्रमाणे त्या रिकाम्या क्वार्टर मध्ये उजेड दिसत होता. रुद्राने त्याचे दार, हलकेच ढकलून पहिले. ते आतून बंद होते. तो बाजूच्या फ्रेंच विंडो जवळ सरकला. ती मात्र अर्धवट उघडी होती. रुद्रा सरळ आत घुसला. खिडकीतून तो ज्या खोलीत उतरला होता ती बेड रूम होती.
शेजारच्या बैठकीच्या खोलीत एक म्हातारा पाठमोरा, समोर कॉम्पुटर टेबलवर लॅपटॉप ठेवून काही तरी पहात होता. त्याचे पांढऱ्या केसावरुन 'हाच तो 'म्हणून रुद्राने क्षणात ओळखले! तो त्या म्हाताऱ्याच्या पाठीशी आला. म्हातारा लॅपटॉपवर 'चावट 'क्लिप पहात होता. 'काय नालायक थेरडा आहे?'असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. क्षणभर दीर्घ श्वास घेऊन तो पुतळ्या सारखा उभा राहिला. आणि मग वेळ न दवडता मागून त्या म्हाताऱ्याचं नाक चिमटीत धरले आणि त्याच हाताचा आपला राकट पंजा त्याच्या तोंडावर दाबला! म्हातारा हातपाय झाडू लागला , तसा रुद्राने जोर वाढवला. तरी म्हातारा गतप्राण व्हायला दहा मिनिटे लागलीच! त्या दहा मिनिटात त्याच्या कमावलेल्या मनगटाला चांगलीच रग लागली होती. त्याने त्या म्हाताऱ्याची नाडी तपासून, खरेच मेल्याची खात्री करून घेतली. लॅपटॉपच्या उजेडात त्याचे बाहेर पडलेले डोळे आश्चर्याने चकाकत होते. त्याने तो म्हातारा चेहरा एकदा शेवटचा पाहून घेतला , याचाच फोटो त्याला मिळालेला होता! हाच तो नौकर होता! काम फते झाल्याची खात्री करून तो समाधानाने ,आल्या मार्गाने म्हणजे खिडकीतून बाहेरच्या अंधारात मिसळून गेला.!
रुद्रा गेल्या नंतर पंधरा मिनिटाने एक काळी छाया आता आली. क्षणभर त्या म्हाताऱ्याच्या मृत देहाकडे पहिले,आणि समोरच्या भिंतीवरून काहीतरी काढून खिशात टाकून ती छाया निघून गेली!
०००
या गोष्टीची सुरवात गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी झाली होती. 'लैला'नावाचे एक ठिकाण आहे. त्याच्या खालच्या मजल्यावर हुक्का पार्लर आणि त्या वरच्या मजल्यावर बार आणि रेस्टोरंट आहे. नावाने हुडकायला गेलात तर सापडणार नाही. कारण त्याचा कोठेही साइन बोर्ड नाही. पण माहितगारांना असल्या गोष्टींची अडचण पडत नाही! रुद्राचे हे नेहमीचे 'विरंगुळ्याचे 'ठिकाण. त्याच्या साठी बार मधले अकरा नंबरचे टेबल कायम रिझर्व्ह असे. आजही तो तेथेच होता. उजव्या ओठाच्या कोपऱ्यात फोर स्क्येयरची किंग साईझ सिगारेट अलगद धरून त्याने पेटवली. कसल्या तरी गंभीर विचारात तो गढून गेला.
आज रुद्रा एक गुन्हेगार होता. गुन्हेगारांच्या वर्तुळात त्याचे नाव आदराने घेतले जायचे. तो कुठल्याही 'गॅंग 'चा सदस्य नव्हता. एखंडा शिलेदार. भरदार छाती, सणसणीत उंची,कमावलेले शरीर,देखणा 'हि मॅन '. जितका ताकतवान तितकाच चपळ,आणि बुद्धिमान. त्याला पाहिल्यावर, हा 'सुपारी 'घेऊन मुडदे पाडतो हे खरे वाटले नसते, इतका सोज्वळ चेहरा त्याला लाभला होता. हे झाले आजचे. काही दिवसाखाली तो असा नव्हता. तो एका लहानश्या कॉलेजात प्राध्यापक होता! देखणं रूप, हजरजवाबीपणा, आणि सोफिस्टिकेटेड वागणे. थरो जण्टलमन ! कुण्याही तरुणीला भुरळ पडावी असे लोभस व्यक्तिमत्व. विद्यार्थ्यात कमालीचा लोकप्रिय! डॉ. रागिणी त्याच्या सिनियर आणि हेड ऑफ डिपार्टमेंट. त्याच्या पेक्ष्या पाच सहा वर्षांनी मोठ्या. कॉलेजमधील एक आदरणीय व्यक्ती.
"रूद्र, संध्याकाळी काय करतोयस?"रागिणी मॅडमनी विचारले.
"नथिंग!फक्त जिम ला जाणार आहे. का? काही काम होत का ?"
"मग ती जिम कॅन्सल कर. ये घरी. मस्त डिनर करूत सोबत!"
"अरे,वा! ते लोणच्याच्या फ्लेवरच चिकन कराल का? एकदम मस्त करता तुम्ही!"
"हो तेच करीन. सगळा बेत तुझ्या आवडीचा असेल! फक्त तू ये !"
"चिकन!मग तर येणारच!! आणि हो,येताना सरानं साठी जोसेफ मर्फीचे सायकॉलॉजिवरील पुस्तक पण आणतो. अहो खूप दिवसान पासून त्यांनी सांगून ठेवलंय मला."
"नको! रवी सकाळीच कॉन्फरन्स साठी गेलाय दिल्लीला!" रागिणीच्या डोळ्यातील चमक रुद्राला 'काय ' ते सांगून गेली! त्या नजरेत 'आव्हान 'स्पष्ट दिसत होते!
"मग?"
"मग-बिग काही नाही! रवी नसला तरी मी आहे कि ! आणि तू येणार आहेस !"रागिणी अधिकार वाणीने म्हणाल्या आणि पिरेडवर निघून गेल्या!
खरे तर डॉ.रागिणी हे रुद्राचे श्रद्धा स्थान,अन हे असलं काही होईल हे त्याला अपेक्षित नव्हते. तो विचारात पडला. जावे तर ,अशी पुरावृत्ती होत रहाणार!आणि न जावेतर हेड ऑफ डिपार्टमेंटच्या नाराजीचे परिणाम भोगावे लागणार! शेवटी त्याच्या सद्सद्विवेक बुद्धी आणि संस्कारांनी त्याला जाऊ दिलेच नाही !
०००
दुसरे दिवशी डॉ. रागिणी कॉलेजात सामान्य वागत होत्या. कालचे आमंत्रण जणू त्या विसरूनच गेल्या होत्या. त्यामुळे रुद्रा रिलॅक्स झाला. डिपार्टमेंटच्या केबिन मध्ये त्या आणि तो दोघेच होते.
"सॉरी मॅडम, काल नाही जमले हो यायला! तुमचे चिकन मात्र वाया गेले असेल. नाही ?"
"रुद्र !, माझे 'काय' वाया गेले हे तुला पक्के माहित आहे! तो माझ्या तारुण्याचा आणि भावनांचा अपमान होता! आणि त्याची मी भरपाई करून घेणार आहे! आत्ता! या येथेच!" रागिणी रुद्राच्या थेट डोळ्यात पहात म्हणाल्या. त्यांचा आवाज कमालीचा खुनशी,आणि थंडगार होता!
त्याच्या अंगावर सरसरून काटा आला!
काय होतंय कळायच्या आत, रागिणीने अंगावरची साडी विस्कटून टाकली! ब्लाउज झटक्यात फाडून टाकला! डोक्यावरचे केस विस्कटत जोरदार आरोळी ठोकली.
"हेल्पSSS !हेल्प SSS !!!"
आख कॉलेज गोळा झालं.!
पोलीस आले.!
विनय भंग आणि बलात्काराचा प्रयत्न. यांची कलम लागली!
आणि रुद्रा गुन्हेगार झाला! करियरची स्वप्नांची राख रांगोळीझाली!
पेटून उठलेल्या रुद्राने मोका बघून पोलिसांना गुंगारा देऊन आणि पळून गेला!
०००

(क्रमशः )