Pyar mein.. kadhi kadhi - 5 books and stories free download online pdf in Marathi

प्यार मे.. कधी कधी (भाग-५)

“देख कर तुमको.. यकीन होता है..
कोई इतना भी हसीन होता है..
देख पा ते है कहा हम तुमको…
दिल कही.. होश कही होता है॥”

जगजीतच्या आवाजातले मला गाण्याचे ते शब्द आठवले जेंव्हा प्रितीला मी मॅक्डीला पाहीलं. आई-शप्पथ, काय दिसत होती मस्त.

पिंक कलरचा टाईट फिटींग्सचा कुर्ता आणि व्हाईट कलरचे लेगींज्ज होते आणि स्ट्रॉबेरी रंगाच्या ओढणीने तिने आपले केस बांधले होते.

“थोडी ओल्ड फॅशन्ड स्टाईल नाही ही?“, मी मनाशीच विचार केला.. “म्हणजे रेट्रो मुव्हीज मध्ये नितु सिंग, किंवा मुमताज ना मी असली फॅशन केलेली पाहिलं होतं.. बट एनीवेज हु केअर्स, प्रिती वॉज लुकींग गॉर्जीअस…”

आणि मग माझं लक्ष पाठमोर्‍या बसलेल्या नेहाकडे गेलं आणि वास्तवाचं भान आलं. तिचा चेहरा दिसत नसल्याने, नक्की काय झालं असावं ह्याचा अंदाज येत नव्हता.

मी आत येत असतानाच प्रितीचं माझ्याकडे लक्ष गेलं.
मी नजरेनेच काय झालं विचारलं, पण ती काहीच बोलली नाही.

मी नेहा शेजारची खुर्ची ओढुन बसलो.

“हाय!.. काय झालं? एव्हढ्या गडबडीने का बोलावलंस?”, मी नेहाच्या चेहर्‍यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत म्हणालो.

“प्रॉब्लेम है..”, वैतागलेल्या सुरात नेहा म्हणाली.
“काय झालं? जरा निट सांगशील का…”, मला थोडा धीर आला होता.

“उद्या मला बघायला येणार आहेत..”, नेहा नजर टाळत म्हणाली..
मला तर एक सेकंद.. अत्यानंदाने पायाखालची जमीन सरकल्यासारखंच वाटलं..

“काsssssssय?? काय बोलती आहेस तु??”, मी मनातला आनंद आणि चेहर्‍यापर्यंत आलेलं हसु लपवत म्हणालो..

“हो ना अरे.. कोण तरी पाटील आहेत, नारायणगावचे, बाबांच्या ओळखीतलेच आहेत.. त्यांचा मुलगा आहे..”, नेहा

“अरे.. पण तु फक्त २४ ची आहेस, मग इतक्या लवकर काय हे मध्येच लग्नाचं??”, मी
“ए काय रे? म्हणजे मला बघायला येणार आहेत, त्याचं तुला काहीच वाटत नाहीए का?”, नेहा
“ओके.. ओके.. शांत.. गदाधारी भीम.. शांत.. मला निट सांग, कोण आहे मुलगा?, काय करतो?”

“अरे नारायणगावचे पाटील आहेत.. गडगंज श्रीमंत आहेत.. दोन पेट्रोल पंप, गुलाबाची मोठ्ठी नर्सरी आणि द्राक्षांचे मळे आहेत त्यांचे..”, नेहा तिच्या वडीलांची भाषा बोलत होती..

“वॉव्व.. सहीच यार… श्रीमंत झाली म्हणजे तु..”
नेहा चिडुन माझ्याकडे बघत होती..

“तु पाहीलं आहेस..मुलाला?”
“हो.. फोटो पाहीला.. तसा ठिक आहे.. अगदीच काही वाईट नाही.. पण..”

“मग प्रॉब्लेम काय आहे..”, मी
“असं काय करतोस.. अरे, मला इतक्यात लग्न नाही करायचंय. आणि माझं लग्न झालं की मी तुला भेटू शकेन का रे?”, नेहा

“का? त्याला काय झालं? तुझा नवरा काय इतक्या क्षुद्र विचारांचा आहे का? लग्नानंतर सुध्दा कुणीही आपले मित्र-मैत्रीणी जपु शकतंच की..”, मी अ‍ॅक्च्युअली तिला कन्व्हींन्स करायचा प्रयत्न करत होतो.

माझ्या दृष्टीने तो जो कोणी मुलगा होता तो आधीच नेहाचा ‘नवरा’ झाला होता.

“हो.. मित्र-मैत्रीणी ठिक आहेत.. पण बॉयफ्रेंड..?? तो बरा खपवुन घेईल..”, नेहा

“बरं मग एक सांग.. तुझ्याच कास्टचा आहे का तो?”
“अर्थात.. हा काय प्रश्न झाला? त्याशिवाय का बाबा….”

“हम्म.. मग तु सांग ना सरळ, मला शिक्षण पुर्ण करुन मगच लग्न करायचं आहे म्हणुन..”, बोलताना नकळत तळहाताची बोटं मी क्रॉस केली होती.

“सांगीतलं.. ते सुध्दा सांगीतलं. पण त्यांना माझ्या शिक्षणाला काहीच हरकत नाही. लग्नानंतरही शिक्षण पुर्ण करु शकशील म्हणतात…”

“बस्सं तर मग..”, मी मनातल्या मनात म्हणालो.. “तिच्या आणि मुलाकडच्या आई-बाबांनी सगळं ठरवुनच टाकलेलं आहे.. आता नेहाने कितीही.. आणि काहीही सांगीतलं तर कोणीही तिचं ऐकणार नाहीए..”

माझं सहज लक्ष प्रितीकडे गेलं. ती माझ्या चेहर्‍यावरुन माझ्या मनात चाललेले विचार ओळखण्याचा प्रयत्न करत होती..

मी पटकन नजर दुसरीकडे वळवली.

पुढचा अर्धा तास आम्ही वेगवेगळ्या पर्यायांवर निरर्थक चर्चा केली, पण त्यातुन मार्ग काहीच निघाला नाही. नेहा बहुतेक थोडीशी निराश आणि वैतागलेली होती. बहुतेक तिला माझ्याकडुन बर्‍याच अपेक्षा होत्या.. मी काहीतरी मार्ग काढीन ह्या आशेने बहुदा संध्याकाळी तिने मला भेटायला बोलावलं होतं. पण शेवटी मार्ग काहीच निघत नव्हता.

“मगं? आता काय करायचं रे?”

नेहा खुपच सेन्टी झाली होती. तिच्या दृष्टीने एकदा का मुलाला पहाण्याचा कार्यक्रम झाला की त्यातुन दुसरा बाहेर पडण्याचा मार्ग नव्हताच. लग्न कन्फर्मच होणार होते.

मी तिच्या डोळ्यात पाहीलं. तिचे पाणीदार डोळे लाल झाले होते. नाकाचा शेंडा गुलाबी भासत होता.

हीच का ती माझी नेहा? नेहमी हसणारी, दुसर्‍याला हसवणारी.. चुलबुली नेहा…

टेबलावरचा टिश्यु उचलुन तिने तिचे ओलसर झालेले डोळे टिपले.

“कमऑन नेहा.. डोन्ट डु दॅट.. निदान उद्या मुलाला भेट तरी.. कदाचीत त्याला तु आवडणार नाहीस..”, मी नेहाच्या जवळ जात म्हणालो..

नेहाने अचानक मला मिठी मारली…”आय डोन्ट वॉन्ट टु गो तरुण.. आय डोन्ट वॉन्ट टु लिव्ह यु…”
तिच्या डोळ्यातुन निघणारे गरम अश्रु माझ्या खांद्यावर पडत होते. खूप प्रेशीअस होते ते आश्रु कारणं ते माझ्यासाठी होते. नेहा टिश्युने डोळे पुसत होती आणि पुन्हा पुन्हा ते नेहाच्या डोळ्यातुन घरंगळत होते. माझ्या डोळ्यात मात्र टिपुसही नव्हता.. कदाचीत.. कदाचीत ज्या दिवशी प्रितीला भेटलो.. त्याच दिवशी मी ह्या रिलेशनशीपमधुन बाहेर पडलो होतो.

नेहाला रडताना पाहुन वाईट वाटले, पण शेवटी हे कधी-ना-कधी होणारच होते. वुई हॅड आस्कड फॉर इट. आज प्रिती होती म्हणुन कदाचीत मी नेहामध्ये इतका इन्व्हॉल्व्ह नव्हतो.. त्यामुळेच मे बी मी ह्या मोमेंटलाही रिलॅक्स होतो.. नाही तर कदाचीत आज नेहासारखेच माझ्याही डोळ्यात अश्रु आले असते.

मी नेहाच्या खांद्यावरुन प्रितीकडे बघीतले. ती मोबाइलवरचे मेसेजेस वाचत होती.

“सेव्ह युअरसेल्फ फ्रॉम मी बेब्स.. आय एम अ फ्री बर्ड नाऊ…” मी मनातल्या मनातच म्हणालो..

**************************************

दुसर्‍या दिवशी संध्याकाळीच नेहाचा मेसेज आला..

“आय एम नो लॉगर युअर्स तरुण.. आज मी दुसर्‍या कुणाची तरी झाले.. आय गॉट एंन्गेज्ड…”

छातीमध्ये खस्सकन कुणीतरी सुरा खुपसावा तस्सच माझं झालं. मी तो मेसेज दोन-तिनदा वाचला. प्रत्येक वेळी तीच भावना..

मी पट्कन तिला रिप्लाय करायला घेतला आणि परत तिचा दुसरा मेसेज आला…

“प्लिज डोन्ट कॉल ऑर मेसेज मी.. इथे सगळे फॅमीली लोकं आहेत.. तुझा फोन आला तर… आय वोन्ट बी एबल टु कंन्ट्रोल.. ttyl”

दोन्ही मेसेज मध्ये शेवटचं नेहमीचं.. “लव्ह यु.. नेहा..” मिसींग होतं.

एकदा वाटलं, गेलं खड्यात, काही होतं नाही, करावा फोन सरळं. पण मग दुसरा विचार आला, नेहाचंही बरोबर होतं, उगाच ति तेथे रडायला लागली आणि कुणी आमचे मेसेजेस वगैरे बघीतलं तर अर्थाचा अनर्थ व्हायचा. तिचं ठरलेलं लग्न मोडायचं.

“आय गॉट एन्गेज्ड..”, एका शब्दाने आम्हाला दोघांना एकमेकांपासुन कित्ती दुर करुन टाकलं होतं. इतकं की तिला फोन करायला पण आज मला विचार करावा लागत होता. क्षणार्धात तिचं जग आणि माझं जग वेगवेगळं झालं होतं. तिच्या बोटात काल-पर्वापर्यंत आमच्या लेखीही नसणार्‍या कोणा पाटलाच्या पोराने अंगठी काय घातली.. आजपर्यंत फक्त माझी असणारी नेहा आज त्याची झाली होती… फक्त त्याची..

खुप्पच विचीत्र वाटलं. जणु काही मला अर्धांगवायु झाला होता. सर्व शरीर बधीर झालं होतं. शेवटी काही झालं तरी मी आणि नेहा २-३ वर्ष एकत्र होतो. कित्तेक क्षण आम्ही एकत्र घालवले होते. कित्तेक मुव्हीज, म्युझीक कॉन्सर्ट्स, छोट्या छोट्या गोष्टींचे शॉपिंग, लॉग राईड्स, एकमेकांची सुख-दुखः, एकमेकांना चिअर केले होते, एकमेकांचे विनींग मोमेंट्स सेलेब्रेट केले होते. एकमेकांच्या बर्थ-डे ला सगळ्यात पहीलं विश केलं होतं.

कित्ती सारे मेसेजेस, कित्ती सारं “लव्ह यु..”, कित्ती सारं..”मिस्स यु सो मच..”

अचानक छाती भरुन आली. मुलगा बघायला जाणं इथपर्यंत ठिक होतं.. पण असं अचानक.. एन्गेज्ड?
सगळं संपल्यासारखं वाटू लागलं.

ह्यापुढे कित्तीही प्रयत्न केले तरी पुन्हा तो पुर्वीचाच तरुण आणि पुर्वीचीच नेहा असणार नव्हते.

मी चुक होतो.. कदाचीत मी त्या रिलेशनशीपमधुन अजुन पुर्ण बाहेर आलो नव्हतो. मी टीव्ही बंद केला आणि उशीमध्ये डोकं खुपसुन पडुन राहीलो.

अनेक दृष्य.. काही स्पष्ट, तर काही केलीडोस्कोपसारखी चित्र-विचीत्र आकारांची डोळ्यासमोरुन झरझर सरकत होती. मध्येच कधीतरी आई जेवणासाठी हाक मारुन गेली, पण पोटात एक मोठ्ठा खड्डा पडला होता, इतक्यात तो कुठल्या गोष्टीने भरुन येईल असं ते वाटत नव्हतं.


सकाळी उठलो तेंव्हा मोबाईलचा व्हॉट्स-अ‍ॅपचा दिवा लुकलुकत होता.

नेहाचा मेसेज होता..

“गोईंग टु नारायणगाव विथ फॅमीली टु सी द हाउस.. माय हाऊस… उद्याच भेटेन.. बाय..”

किती रुक्ष मेसेज होता तो. अगदी फुग्यातली हवा काढुन टाकल्यासारखा.. डोकं सॉल्लीड जड झालं होतं. ऑफीसला फोन करुन सिक-लिव्ह टाकुन दिली आणि परत अंथरुणात पडुन राहीलो.

मन शांत झाल्यावर प्रितीचा विचार डोक्यात आला.. नेहाने तिला पण सांगीतलं असेल का?

प्रितीला भेटणं आवश्यक होतं. सकाळचा वेळ कसाबसा घालवला आणि दुपारी लगेच सिटी-लायब्ररीला पळालो. प्रिती खालच्याच मजल्यावर होती.

आय वॉज इन ग्रिफ अ‍ॅन्ड पेन. नेहापासुन असा अचानक वेगळा तोडुन टाकल्यामुळे कसंतरीच वाटत होतं आणि बहुतेक ते माझ्या चेहर्‍यावर दिसुन येत होतं. मी नेहमीचा ‘मी’ नव्हतो.. नसणारच होतो.

प्रिती काऊंटरचे काम दुसर्‍या कुणालातरी देऊन माझ्याकडे आली.

“यु ओके?”, माझ्या डोळ्यात खोलवर पहात तिने विचारलं.

मी अस्वस्थपणे इकडे तिकडे बघत होतो. हातांची बोटं मोडत नसतानाही उगाचच मोडण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होतो. काय बोलावं, काय नाही.. काहीच कळत नव्हतं.

“कॉफी?”, प्रितीने अचानकच विचारलं.

मी क्षणभर चकीत झालो. इतक्या दिवसात मी कधी प्रितीला कॉफीबद्दल विचारावंसं वाटत असुनही विचारु शकलो नव्हतो, आणि तिनेही कधी विचारलं नव्हतं. त्यामुळे आज मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

पण मग मी काय करायला हवं होतं.?. प्रितीबरोबरची.. खरं तर फक्त प्रितीबरोबरची पहीली कॉफी.. मी खुश व्हायला हवं होतं की नेहापासुन दुर झाल्याच्या दुःखातच रहायला हवं होतं?

प्रिती कॉफी आणायला गेली आणि मी लायब्ररीच्या बाहेरच्या गार्डनमध्ये मांडलेल्या टेबल्सवर जाऊन बसलो.

“माझं हे असं का होतं आहे? काहीच कळत नव्हत.. मी अजुनही नेहावर प्रेम करतो का? मी नेहाला त्या पाटलाशी लग्न करण्यापासुन थांबवायला हवं का? कसं ही करुन माझ्या आणि तिच्या आईवडीलांना कन्व्हींन्स करुन नेहाला लग्नाची मागणी घालावी का?”

“का हे क्षणभराच्या भावना आहेत..? इतक्या वर्षांचा मित्र आपल्याला सोडुन परदेशात जाणार असेल तरी कदाचीत आपल्याला असंच झालं असतं की… सत्य हेच आहे की प्रितीच्या बाबतीत मनाला जे संकेत मिळाले, ज्या भावना उमटल्या तसं नेहाच्या बाबतीत कध्धीच झालं नव्हतं. प्रितीच ती आहे जिच्यावर माझं प्रेम आहे..”

मनाने मांडलेले अनेक प्रश्न आणि मनानेच त्याला शोधुन काढलेली उत्तर.. सगळाच विचीत्र प्रकार होता.

प्रिती कॉफी घेऊन आली. बहुतेक वेळं तिच बोलत होती आणि मी ऐकत होतो. शक्यतो तिने नेहाचा विषय काढणं टाळलं.. ह्याउलट ती लायब्ररी बद्दलच बोलत राहीली.

आम्ही १०-१५ मिनीटं गप्पा मारल्या आणि मग प्रिती तिच्या कामाला निघुन गेली आणि मी घरी आलो. काल संध्याकाळनंतर पहील्यांदाच थोडं रिलॅक्स वाटलं. निदान काही काळासाठी का होईना, नेहाचा विषय मनातुन बाहेर गेला होता.

मी फक्त प्रितीबद्दलच विचार करायचा प्रयत्न केला, पण मन पुन्हा पुन्हा नेहाकडेच धाव घेतं होतं. संध्याकाळ हळु हळु आपले रंग घेऊन मनामध्ये उतरली.. पण ते रंग फिक्केच होते.

आईने उगाच प्रश्न विचारु नयेत म्हणुन संध्याकाळी कसं बसं जेवलो आणि खोलीत जाऊन पडलो.

इतक्या वर्षात पहील्यांदाच माझा मोबाईल इतका शांत होता. ना नेहाचा फोन, ना मेसेज, ना व्हॉट्स-अ‍ॅप

डोळ्यामध्ये पुन्हा अश्रु जमा व्हायला लागले. मी नाईट-लॅम्प बंद करुन टाकला आणि डोक्यावरुन अंथरुण ओढुन झोपेची वाट पहात पडुन राहीलो.

खुप रात्री कधी तरी झोप लागली..

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED