पिंपळपार Pravin Gaikwad द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पिंपळपार

भीमा... गावातला एक रांगडा गाडी. वय वर्षे ३२. सकाळ-संध्याकाळ तालमीत जाऊन आणि दिवस रात्र शेतात राबून बनलेली पिळदार शरीरयष्टी, भरदार मिशा आणि अस्सल गावरान बाज असलेलं आकर्षक व्यक्तिमत्व. गावात तो पैलवान म्हणूनच प्रसिद्ध होता. तसा तो कुस्ती वैगेरे करत नव्हता, पण तालमीतली कसरत, घरचा खुराक आणि घरच्या म्हैशींचे दूध याच्यामुळे पण त्याची शरीरयष्टी कुस्ती करणाऱ्या पैलवानांसारखी होती.

रामा, शिवा, बाळ्या, बबन्या आणि जितू हे सगळे भीमाच्याच वयाचे त्याचे मित्र. सगळेच अंगापिंडाने सुदृढ होते. १०वी -१२वी झालेल्या या सगळ्या लोकांचं जगण्याचं मुख्य साधन शेती हेच होत. आप-आपल्या वाट्याला आलेल्या वडिलोपार्जित जमिनी कसून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करत होते. आर्थिक परिस्थिती सगळ्यांची बऱ्यापैकी चांगली होती.

दिवसभर काबाडकष्ट मारून संध्याकाळी थोडासा वेळ मिळत होता तेव्हा ते कट्ट्यावर जमून गप्पा मारायचे. त्यांच्या या गप्पांमध्ये गाव पातळी, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश-विदेशातील राजकारण, गावात कुणाचं काय चाललं आहे, भूत-खेतं, वातावरण, पाऊस, वर्तमान परिस्थिती यांच्या सारखे काहीही विषय असायचे. एकदा असंच यांच्या गप्पा चालू असताना भूत असत कि नसतं असा विषय चालू झाला. प्रत्येक जण आपला आपला भूता बद्दलचा अनुभव सांगू लागला.

रामाने सांगितलं कि कसे जमिनीच्या कागदपत्रांच्या कामांसाठी तो तालुक्याच्या ठिकाणी गेला होतो. काम होता होता खूप वेळ झाला होता. रात्री माघारी येताना तालुक्यच्या ठिकानाहून थोडं पुढे आल्यानंतर एका आडवळनाला एका पांढरी साडी नेसलेल्या बाईने त्याला लिफ्ट मागण्यासाठी हात केला. तो थांबला नाही. पण पुढे जाऊन त्याने मागे वळून पाहिले तर ती बाई त्या गयब झाली, ती बाई त्या ठिकाणी नव्हती.

बाळ्याने सांगितलं कि, एके दिवशी रात्रपाळीला त्याच्या ऊसाच्या शेताला पाणी पाजून माघारी येत असताना गावाच्या वेशीच्या बाहेरच्या पिंपळावरून त्याला कुणी तरी मदतीसाठी हाक मारत होत. पण तो तिकडे न पाहता, सरळ लगबगीने गावाच्या वेशीच्या दिशेने आला आणि वेशीत प्रवेश केल्या नंतर त्याने सुटकेचा निश्वास टाकला. गावाबाहेरचा तो पिंपळपार भुतबाधित होता असं गावातल्या लोकांचं म्हणणं होतं.

बबन्याने नदीकाठच्या रस्त्याला भेटणाऱ्या म्हाताऱ्या बाबांचा आत्मा जो मानगुटीवर बसतो आणि तंबाखू आणि चुना मागतो त्याचा प्रसंग सांगितला, आणि असं काही झालं तर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून न बघता चालत राहायचं आणि त्यांनी जर तंबाखू आणि चुन्याची पुडी मागितली तर द्यायची नाही हेही सांगायला तो विसरला नाही.

शिवाने त्याच्या घराला लागून असलेल्या पडकं घर कसं शापित आहे. त्या घराच्या ठिकाणी कसं दार-रोज रात्री लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. तिथे राहात असलेल्या लोकांची शापामुळे कशी वाताहत झाली. आणि आता ती जागा कुणीच विकत घेत नाही. याचे वर्णन केले.

जितूने त्याच्या सासरवाडीतल्या एका पडक्या वाड्यात वास्तव्यास असलेला एका म्हाताऱ्या बाईचा अतृप्त आत्मा कसा अमावस्या आणि पौर्णिमेच्या मध्यरात्री गावातल्या घरांचे दरवाजे ठोठावतो आणि पाणी मागते. पण गावातल्या सगळ्या लोकांना हे माहिती असल्यामुळे कुणी दरवाजा उघडत नाही. या गोष्टीचे रसभरीत वर्णन केले.

भीमाचा मात्र भूत-खेतांवर विश्वास नव्हता. सगळ्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी त्याला निव्वळ ऐकीव गोष्टी आणि अफवा वाटत होत्या. सगळ्यांच्या गोष्टी ऐकून तो हसत होता. ते पाहून बाकीच्या लोकांनी मग त्याच्या बरोबर एक पैज लावली. गावाबाहेर जो पिंपळपार होता. तो अश्या भूत-खेतांच्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता. लोकांचं म्हणणं असं असं होत कि त्या पिंपळावर एक हडळ राहात होती. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री तिकडे कुणी गेलं तर त्यांना ती हडळ हाका मारून स्वतःकडे बोलवत होती आणि त्यांना भुतबाधित करत होती. दिवसा तिकडून लोक येत-जात होती, पण रात्रीच्या वेळी मात्र लोक त्या बाजूला जायचं टाळत असत.

तर पैज अशी होती कि, गावाबाहेरच जो पिंपळपार आहे, येत्या अमावस्येच्या रात्री भीमाने तिकडे जाऊन न घाबरता एक लाकडी खुट्टा रोवून यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बाकीचे लोक जाऊन भीमाने खुट्टा रोवला आहे कि नाही याची शहानिशा करून येतील. जर भीमाने न घाबरता तो खुट्टा रोवला तर बाकीचे लोक त्याला एक-एक करून प्रत्येक आठवड्याला मांसाहारी जेवणाची मेजवानी देतील. जर भीमाने खुट्टा नाही रोवला किंवा भूत असतं हे त्याने मान्य केलं तर त्याला बाकीच्या लोकांना मांसाहारी जेवणाची मेजवानी द्यायला लागेल.

२ दिवसांनी अमावास्येचा दिवस उगवला. दिवसभर शेतात काम करून संध्याकाळी सगळे मित्र कट्ट्यावर जमले. कट्ट्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर पैजेचा विषय निघाला. सगळ्यांनी जेवण वैगेरे यावरून पुन्हा रात्री ११ वाजता कट्ट्यावर भेटायचे असं ठरलं. नंतर सगळे आप-आपल्या घरी गेले. जेवण वैगेरे आवरून रात्री ११ वाजता सगळे पुन्हा कट्ट्यावर जमले. भीमाने येताना आपल्या सोबत एक लाकडी खुट्टा आणि हातोडा आणला होता. थंडीचे दिवस असल्याने अंगावर शाल गुंडाळली होती.

गावाच्या वेशीपर्यंत सगळे त्याला सोडायला गेले. आणि तिथून पुढे त्याला एकट्याला वाजायला लागणार होते. भीमाला तिथे सोडून सगळे लोक आप-आपल्या घरी निघून गेले. तिथून पुढे त्याला अजून अंदाजे १ किलोमीटर जायचे होते. भीमा पुढे चालू लागला. वातावरणात एक भयाण शांतता होती. त्याच्या चालण्याने होणार आवाज आणि आणि त्याच्या होणाऱ्या श्वासोच्छवासाचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. मधूनचं कुठे तरी रडणाऱ्या कुत्र्यांचा आवाज त्या भयाण शांततेला चिरत होता. गावाच्या बाहेर आल्यानंतरच्या गार वाऱ्यामुळे त्याला जास्तचं थंडी जाणावी लागली. त्याने दोन्ही हात जी शाल होती तिच्या आत घेतले. एका हातात खुट्टा, एका हातात हातोडा, पाठीवर घेतलेली शाल, दोन्ही खांद्यावरून आलेली शालेची दोन्ही टोके छातीजवळ दोन्ही हातात घट्ट पकडली होती.

अशा भयाण आणि वीरान शांततेत, एवढ्या रात्री एकटं जाण्याचा प्रसंग त्याच्या वर याच्या आधी कधीच आलेला नव्हता. जसं-जसं तो गावापासून दूर जाऊ लागला तसं-तसं अंधार जास्तच गाढ होऊ लागला. अपुऱ्या चांदण्यांच्या प्रकाशात अंदाजानेच तो पिंपळाच्या दिशेने चालत होता. आता गावापासून तो बराच दूर आला होता. त्याच्या हृदयाची धड-धड आता वाढू लागली होती. त्या भयाण शांततेची आणि विरानतेची एक प्रकारची त्याला भीती वाटू लागली. मधूनच येणारे चित्र विचित्र आवाज आणि कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज त्याची भीती अजून वाढवत होता. अंगात असलेलं सगळं बाळ एकवटून, स्वतःच्या मनाला धीर देऊन तो पुढे चालत होता.

थोडा वेळ चालल्या नंतर तो पिंपळाजवळ पोहोचला. सुटलेल्या गार वाऱ्यामुळे होणारी पिंपळाच्या पानांची सळ-सळ त्याठिकाणी भीतीच एक वातावरण तयार करत होती. पिंपळाच्या जवळ गेल्या नंतर त्याला वातावरणात एक वेगळ्या प्रकारचा थंडावा जाणवला, एक वेगळ्या प्रकारचा सुगंध जाणवला. इतक्यात पिंपळाच्या झाडामध्ये बसलेली टिटवी आजूबाजूच्या हालचालींमुळे टिव-टिव करत उडून गेली. टिटवीच्या टिवटिवाने वातावरण अजूनच भयानक बनविले. एवढ्या थंडगार वातावरणात सुध्द्धा भीमाला आता घाम फुटायला लागला. घाबरत घाबरतच तो खुट्टा रोवण्यासाठी पिंपळाच्या बुंद्यापाशी खाली बसला. अंगात जेवढं काही त्राण शिल्लक असेल तेवढ्याने तो खुट्टा रोवू लागला. २-५ मिनिटात तो खुट्टा रोवून झाला.

खुट्टा रोवून झाल्या नंतर तो उठू लागला. पण उठताना त्याला असं जाणवलं कि आपली शाल कोण तरी पकडून कुणी तरी त्याला मागे ओढत आहे. त्याने मागे वळून पाहिले पण अंधारात त्याला नीटस नाही दिसलं पण एक विचित्र अशी आक्राळ विक्राळ आकृती त्याच्या मागे उभी होती. अंधारात त्याला काही तरी चमकताना दिसलं, बहुधा त्या आकृतीचे ते डोळे होते. आता मात्र भीमाला दरदरून घाम फुटला होता. आता आपली काही खैर नाही हे त्याला जाणवले. तसेच तो पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण मागून ती आकृती शाल पकडून त्याला मागे ओढत होती.

भीमाने आपली शाल तिथेच टाकून जिवाच्या आकांताने धूम ठोकली. अंधारातून मिळेल त्या वाटेने, खाचा-खळग्यातून भीमा धावू लागला. काट्या-कुट्याचा कशाचाच विचार न करता धावल्यामुळे त्याचे पाय रक्तबंबाळ झाले होते. भीमा जिवाच्या आकांताने एवढ्या जोरात धावत होता कि, जिथे त्याला जाताना ३०-४० मिनिटे लागली होती, तिथे तो फक्त १० मिनिटात त्याच्या घरी पोहोचला. घरी येऊन तो तिथेच कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्याच्या बायकोने आणि मुलांनी त्याला पलंगावर झोपवले. सकाळ होताच डॉक्टर बोलावून आणले. भीमाला खूपच ताप आला होता. डॉक्टरांनी भीमाला तपासून त्याला गोळ्या आणि औषधे दिली.

इकडे बाकीचे सगळे मित्र सकाळी उठून भीमाने खुट्टा रोवला कि नाही हे पाहायला पिंपळापाशी पोहोचले. तर तिथे नजारा काही वेगळाच होता. झालेलं असं कि भीतीच्या आणि गडबडीच्या भरात भीमाने बसून तो खुट्टा रोवताना आपल्या अंगावर घेतलेली जी शाल होती, त्याच्या मध्येच रोवला होता, त्यामुळे उठताना त्याला कुणी तरी मागे ओढत आहे असा भास झाला. अंधारामध्ये त्याला ते समजलंच नव्हतं. पिंपळाच्या आक्राळ विक्राळ आणि विचित्र खोडाच्या आकाराला तो विचित्र आकृती समजला होता आणि तिथे उडणाऱ्या काजव्यांना आकृतीचे डोळे.

सगळं विसरून भीमाला पूर्णपणे बरा होण्यासाठी ८-१० दिवस लागले. त्याच्या मित्रांनी मात्र खरं काय झाले आहे ते भीमाला कधीच सांगितलं नाही, भीमाकडून त्यांनी भूत असत हे मान्य करवून घेतलं आणि बरं झाल्यानंतर भीमाकडून मेजवानीचा ताव मारला.
------------------------------------------------------------
विनंती- तुम्हीहि तुमच्या आसपास असलेल्या अशा पछाडलेल्या ठिकानांबद्दल नक्कीच ऐकलं असेल. अशा पछाडलेल्या ठिकानांबद्दल कमेंट मध्ये जरुर कळवा.