chandani ratra - 2 books and stories free download online pdf in Marathi

चांदणी रात्र - २

सकाळी आठ वाजता राजेश स्वारगेटला पोहोचला. ऑटोने तो घरी आला. दरवाजाला कुलूप नव्हतं म्हणजेच रवी परत आला होता. राजेशने बेल वाजवली पण दरवाजा उघडला नाही. त्याने पुन्हा बेल वाजवली पण पुन्हा तेच. तिसऱ्या बेलनंतर मात्र दरवाजा उघडला. समोर रवी डोळे चोळत उभा होता. त्याच्याकडे पाहूनच कळत होतं की त्याची झोपमोड झाली आहे. “अरे राजेश! काय माणूस आहेस राव तू. तुला एवढे फोन केले तर तुझा फोन स्वीच ऑफ. अन एक फोन करता येत नाही होयरे तुला. मला वाटलं काय गचकला की काय हा.” एवढे बोलून रवी मोठयाने हसू लागला. “मला आत तर येउदे पहिलं. सांगतो की सगळं.” राजेश रवीला म्हणाला व घरात गेला. थोड्यावेळाने फ्रेश होऊन राजेश हॉल मध्ये आला. रवी टीव्ही पहात होता. राजेश सोफ्यावर रवीच्या बाजूला बसला. “रवी, तुझ्या वडिलांची तब्येत कशी आहे आता?” राजेशने विचारलं. “तशी ठीक आहे तब्येत परवाच डिस्चार्ग मिळाला. म्हणूनच मी काल निघालो. तू काय सांगणार होतास ते सांग आता.” रवी म्हणाला. राजेशने सर्व काही रवीला सांगितलं. स्वारगेटवरच्या प्रसंगापासून अलिबाग पर्यंत सर्व काही त्याने सांगितलं. “खरच एखादया सस्पेन्स स्टोरीसारखं वाटतंय. पण तुला खरच काही आठवत नाही?” रवीने राजेशला विचारलं. “नाहिरे आईशपथ मला काहीसुद्धा आठवत नाही.” राजेश म्हणाला.

रात्री बराच वेळ रवी आणि राजेशच्या गप्पा झाल्या. राजेशला सकाळी कॉलेजला जायचं होतं त्यामुळे तो रात्री अकरा वाजताच झोपायला गेला. रवीला मात्र झोप येत नव्हती. त्याची नाइट ड्युटी असल्यामुळे त्याची झोपायची वेळच उशिराची होती. बेडवर पडल्यापडल्याच राजेशला गाढ झोप लागली. काही तासांनी अचानक राजेश दचकून जागा झाला. त्याने टॉर्च ऑन केला व भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. पहाटेचे चार वाजले होते. अजूनही राजेशला ते स्वप्न आठवत होतं. फारच विचित्र स्वप्न होतं ते. यापूर्वीही राजेशला बऱ्याच वेळा स्वप्न पडलं होतं पण हे स्वप्न काहीतरी वेगळं होतं. कारण हे स्वप्न राजेशच्या डोक्यातून जातच नव्हतं. असं पहिल्यांदाच होत होतं. आता काही आपल्याला परत झोप येणार नाही हे राजेशला जाणवलं. राजेश उठून बाथरूम मध्ये गेला व त्याने चेहेऱ्यावर पाणी मारलं. तरी देखील त्या स्वप्नात घडलेले प्रसंग अजूनही राजेशच्या मनात घर करून होते. आता शेवटचा पर्याय म्हणून राजेश स्वयंपाकघरात गेला व त्याने शेगडीवर दुधाचं पातेलं तापवायला ठेवलं. दोन मिनिटात चहा तयार झाला. चहाचा कप हातात घेऊन राजेश हॉलमध्ये आला व सोफ्यावर बसला.

चहाचा घोट पोटात गेल्यावर राजेशला थोडा उत्साह वाटला. त्या स्वप्नामुळे का होईना बऱ्याच दिवसांनी राजेश आज पहाटे उठला होता. त्याने टीव्ही चालू केला व मराठी बातम्यांच चॅनेल लावलं. पण दहा मिनिटातच तो कंटाळला. खून, बलात्कार, दरोडा, अपघात, घोटाळा यासारख्या नकारात्मक बातम्या पाहून त्याने कंटाळून गाण्यांचे चॅनेल लावले. पण रवी अजूनही झोपला असल्यामुळे त्याला आवाज वाढवणं ठीक वाटलं नाही. राजेशने टीव्ही बंद केला व हॉलची खिडकी उघडली. बाहेर छान वारं सुटलं होतं. राजेशला बाहेर एक फेरफटका मारायची इच्छा झाली. कपडे बदलून राजेश घराबाहेर पडला. हवेतला गारवा चांगलाच जाणवत होता. रस्त्यावर चिठपाखरू देखील नव्हतं. त्याने घड्याळात पाहिले, आता पाच वाजले होते. काही क्षण त्याने कुठे जावं याचा विचार केला व तो कर्वे उद्यानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात तो कर्वे उद्यानात पोहोचला. उद्यानात सर्वत्र प्रसन्न वातावरण होतं. एका मंचकावर काही वृद्ध पुरुष व स्त्रिया योगासने करत होते. एकाबाजूला दोन शाळकरी मुलं बॅडमिंटन खेळत होती. जॉगिंग ट्रॅकवर अनेकजण जॉगिंग करत होते. त्यातील काही अतिशय फिट दिसत होते तर काही बऱ्यापैकी स्थूल होते. जवळच एका उंच झाडाखाली बसून एक वृद्ध मनुष्य रेडिओवरील भक्तीगीत अतिशय तल्लीन होऊन ऐकत होता. त्या गाण्याला जणू पार्श्वसंगीत दिल्याप्रमाणे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. हे सर्व पाहून राजेशच्या मनावरील मरगळ उतरली व तो जॉगिंग ट्रॅकवरून धावू लागला. पाचच मिनिटे धावल्यावर राजेशच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. कितीतरी वर्षांनी राजेश असा मनसोक्त धावला होता. शाळेत असताना धावण्याच्या शर्यतीत पुणे जिल्ह्यात पहिला आलेला राजेश आज पाचच मिनिटात दमला होता. राजेशला जुने दिवस आठवले व तीन वर्षात आपण एवढे कसे बदललो हा विचार त्याच्या मनात येऊन गेला. तसा आताही तो खूप स्थूल वगैरे झाला नव्हता. इंचभर चरबी मात्र त्याच्या शरीरावर चढली होती इतकच. गावात असताना त्याच्या वडिलांच्या धाकामुळे त्याला रोज व्यायाम करावा लागे. पण बी.इच्या पहिल्या वर्षाला राजेशने पुण्याच्या एका नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व तो गाव सोडून पुण्याला आला. गाव सोडल्यावर वडिलांचा धाकही संपला व व्यायामही थांबला. आभ्यास मात्र राजेश मनापासून करायचा. शाळेत असताना राजेशने कधी पहिला नंबर चुकवला नाहीच पण गावातल्या कॉलेजमध्ये व आता पुण्यातल्या कॉलेजमध्ये देखील पहिल्या पाच नंबरात राजेशचं नाव फिक्स होतं. पुण्यासारख्या शहरात राहून देखील राजेशला कोणत्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. त्याच्या आईवडिलांचे संस्कारच तसे होते. राजेशचे वडील जनार्दनराव पाटील गावातली मोठी असामी. सत्तर एकर बागायती शेती, एका साखर कारखान्याचे चेअरमन तसेच एका सहकारी संस्थेचे डायरेक्टर एवढं असूनदेखील जनार्दनरावांनी कधी एका पैशाची देखील फेरफार केली नाही. स्वतः जरी फारसे शिकले नसले तरी आपल्या एकुलत्या एक मुलाने खूप शिकावं ही त्यांची इच्छा होती. राजेशने देखील कधी आपल्या वडिलांच्या गावातील वजनाचा फायदा घेतला नाही की पैशाची मस्ती दाखवली नाही. राजेशची आई गृहिणी होती. पण तिच्याएवढी प्रेमळ आणि उदार बाई आख्या गावात सापडणार नाही. शेतात काम करणाऱ्या कामगारांना देखील ती स्वतःच्या हाताने जेऊ खाऊ घालायची तेही अगदी आग्रहाने. आपल्या आईवडीलांमधील सद्गुण राजेशमध्ये देखील आले होते.
राजेशने रुमालाने कपाळावरचा घाम पुसला व समोरच्या झाडाच्या शेंड्यावर आलेल्या सुर्यबिंबाकडे पाहिले. त्याला गावाकडची आठवण झाली. दिवसेंदिवस काँक्रीटचे जंगल बनत चाललेल्या पुणे शहरात उभ्या असलेल्या उंचच उंच इमारतींमुळे उगवत्या सूर्याचं दर्शनही आता दुर्लभ झालं आहे असं राजेशला वाटलं. त्याने घड्याळात पाहिलं, सहा वाजले होते. राजेशने जॉगिंग ट्रॅकवर चालत एक फेरी मारायचं ठरवलं व तो बाकावरून उठला. एक राऊंड झाल्यावर राजेश उद्यानाच्या बाहेर आला व घराच्या दिशेने चालू लागला.

राजेश जेव्हा घरी पोहोचला तेव्हा रवी गाढ झोपला होता. श्वासोच्छ्वासामुळे त्याचं वाढलेलं पोट वरखाली होत होतं. तशी राजेशची आणि रवीची ओळख काही महिन्यांपूर्वीचीच. रवी येण्यापूर्वी राजेश एकटाच त्या फ्लॅटमध्ये रहात होता. रवी फ्लॅटच्या मालकाचा लांबचा नातेवाईक होता. रवी आल्यापासून राजेशचं भाडं निम्मं झालं पण त्याचा एकांत मात्र हरवला. तसा रवीचा राजेशला काही त्रास होत नव्हता पण मुळात राजेशला एकटं राहायला आवडायचं. रवी राजेशपेक्षा वयाने मोठा होता. तो एका कॉलसेन्टरमध्ये नोकरी करत होता. तो दुपारी दोनला घरातून बाहेर पडायचा व रात्री बाराला घरी परतायचा. त्यामुळे राजेशची व रवीची भेट केवळ शनिवारी व रविवारीच व्हायची करण त्यादिवशी रवीला सुट्टी होती. राजेश रोज सकाळी नऊ वाजता कॉलेजला जायला घरातून निघायचा व तो गेल्यावर साधारण एक तासाने म्हणजेच दहा वाजता रवी जागा व्हायचा. तसा शनिवारी व रविवारी देखील रवी थोडाच वेळ घरी असायचा. बराचसा वेळ तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत घालवायचा. घरी असताना मात्र रवीची बडबड सतत सुरू असायची. राजेशला फारसं बोलायला आवडत नव्हतं पण तो रवीची बडबड सहन करायचा. बहुतांश वेळा रवीचा बोलण्याचा विषय त्याची गर्लफ्रेंडच असायचा. गर्लफ्रेंडबद्दल बोलून झाल्यावर रवी त्याच्या मित्रांचे एकेक किस्से राजेशला सांगायचा. राजेशसुद्धा अगदी मनापासून सर्वकाही ऐकून घ्यायचा पण अभ्यासाची वेळ झाल्यावर मात्र राजेश रवीला तसं स्पष्ट सांगायचा. बोलता बोलता मध्येच असं आडवल्यामुळे रवीचा मुड ऑफ व्हायचा व तो “काय नुसता आभ्यास करतो. एखादी मस्त पोरगी पटव. माझ्यासारखं लाईफ एन्जॉय करायला शिक.” असं म्हणायचा. हे ऐकून राजेश काही न बोलता नुसतं हसायचा व परत पुस्तकात डोकं खुपसून बसायचा.

राजेशने झोपलेल्या रवीकडे एकदा पाहिले व रवीच्या तोंडावर एक पेला पाणी मारून याला उठवावं व व्यायामाचे महत्व सांगावे असा विचार राजेशच्या मनात आला पण तो विचार मनातच ठेवून राजेश अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. थोड्यावेळात आवरून झाल्यावर राजेश कॉलेजला जायला घरातून बाहेर पडला. त्याने पार्किंगमधून बाईक बाहेर काढली व अर्ध्या तासात तो संदीपच्या घरापाशी पोहोचला. संदीप देसाई हा राजेशचा सर्वात जवळचा मित्र. तो देखील राजेशसारखाच अभ्यासू व मेहनती होता. पण दोघांच्या परिस्थितीत मात्र जमीनआसमानाचं अंतर होतं. राजेश तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्मला होता तर संदीपची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्याच्या घरी वडील, आई व दोन बहिणी असा मोठा परिवार होता. संदीपचे वडील एका मोठ्या कंपनीत कारकून होते. त्याची आई चार घरात जाऊन स्वयंपाक बनवायची. संदीपच्या दोनही बहिणी त्याच्यापेक्षा लहान होत्या व दोघीही अजून शाळेत शिकत होत्या. आपल्या परिस्थितीमुळे संदीपला लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करून स्वतः च्या पायांवर उभं राहणं गरजेचं होतं. त्यामुळे डिग्री मिळवून एखादी चांगली नोकरी मिळवणं हेच त्याचं ध्येय होतं व त्यासाठी कितीही कष्ट करायची त्याची तयारी होती. राजेश व संदीपच्या परिस्थितीतील फरकामुळे त्यांच्या मैत्रीत कधीच बाधा आली नाही. उलट त्यांची मैत्री दोन वर्षात अजूनच दृढ झाली होती.

राजेश जेव्हा संदीपच्या घरापाशी पोहोचला तेव्हा संदीप घराबाहेरच उभा होता. संदीपकडे स्वतःची गाडी नव्हती त्यामुळे तो राजेश बरोबरच कॉलेजला जायचा. थोड्याच वेळात ते कॉलेजात पोहोचले. तरुण तरुणींच्या स्वच्छंदी वावरामुळे कॉलेजचा परिसर तारुण्याने न्हाऊन निघाल्यासारखा भासत होता. राजेश व संदीप वर्गात पोहोचले. पहिला तास सुरू व्हायला अजून थोडा वेळ बाकी होता. प्राध्यापक अजून वर्गात यायचे होते. त्यामुळे बहूतांश मुलं आपापल्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यात दंग होते. राजेश-संदीप सारखी काही मोजकी मुलं मात्र सर आज काय शिकवणार याचा विचार करत पुस्तकात डोकी खुपसून बसली होती. थोड्याच वेळात पांढराशुभ्र सदरा व काळी पॅन्ट घातलेले सहस्त्रबुद्धे सर वर्गात आले. त्यांना पाहताच संपूर्ण वर्ग शांत झाला. त्यांचा दराराच तसा होता. सरांच्या पाठोपाठ एक मुलगी वर्गात आली व सर्व मुलांच्या नजरा त्या सुंदर मुलीकडे वळल्या. पण काही क्षणातच सहस्त्रबुद्धे सरांच्या आवाजाने सारे भानावर आले. सरांनी खूण करताच ती मुलगी समोर उभी राहिली. सर बोलू लागले, “ही वृषाली गंधे. वृषालीच्या वडिलांची नाशिकहून पुण्यात बदली झाली. त्यामुळे तिला तीचं आधीचं कॉलेज सोडावं लागलं. आजपासून ती या वर्गात बसेल. ती इथे नवीन असल्यामुळे तुम्ही तिला लागेल ते सहकार्य कराल अशी मी अपेक्षा करतो. वृषाली तू आता बसू शकतेस.” वृषाली पुढच्याच बेंचवर एका मुलीच्या बाजूला बसली. पाहता पाहता सहस्त्रबुद्धे सरांचा तास संपला व ते वर्गातून निघाले. पुढचे प्राध्यापक वर्गात येईपर्यंत मुलांची बडबड पुन्हा सुरू झाली. एकानंतरएक तास संपत गेले व पाहतापाहता कॉलेज सुटलं. इतकावेळ ताटकळलेली मुलं कॉलेजातून बाहेर पडली.


क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED