chandani ratra - 6 books and stories free download online pdf in Marathi

चांदणी रात्र - ६

राजेशने चहा बनवण्यासाठी दुधाचं पातेलं गॅसवर ठेवलं व तो दात घासण्यासाठी बाथरूममध्ये गेला. दात घासुन झाल्यावर राजेश परत स्वयंपाकघरात गेला व चहा बनवून चहाचा कप घेऊन तो हॉलमध्ये आला. रवी नेहमीप्रमाणे झोपला होता. राजेशने टीव्ही चालू केला व टीव्ही पाहतच चहा संपवला. आज रविवार असल्यामुळे कॉलेजला सुट्टी होती. आजचा दिवस कसा घालवायचा याचाच राजेश विचार करत होता, तेवढ्यात त्याचा फोन वाजला. फोन वृषालीचा होता. एका क्षणाचाही विलंब न करता त्याने फोन उचलला. “खूप बोर होतंय. ये ना घरी. आई-बाबा पण गावाला गेलेत. मी तुझ्यासाठी सँडविच बनवते मग आपण एखादी मुव्ही पाहुयात.” वृषाली झोपाळलेल्या, आळसावलेल्या आवाजात म्हणाली.

“हो येतोच, मला फक्त अर्धा तास दे. आणि चीझ आहे ना घरात? का आणू येताना?” राजेश उत्साहात म्हणाला.
“काही नको आणू. सगळं आहे घरात. आणि गाडी हाळू चालवं. बाय, चल मी फोन ठेवते.” एवढं बोलुन वृषालीने फोन ठेवला. वृषालीला भेटायच्या विचारानेच राजेश खुश झाला. त्याने पटापट आवरलं व विसाव्या मिनिटाला तो घरातून बाहेर पडला. एकोणतीसाव्या मिनिटाला राजेश वृषालीच्या घराच्या दारात उभा होता. त्याने बेल वाजवली. बराच वेळ दरवाजा बंद होतं. राजेशने पुन्हा बेल वाजवतात वृषालीने दरवाजा उघडला. समोर नाईट गाऊन मधल्या वृषालीला पाहून तिला मिठीत घ्यायची तीव्र इच्छा राजेशला झाली पण त्याने स्वतः ला आवरलं. ती नुकतीच झोपेतून उठून आल्यासारखी वाटत होती पण तरीसुद्धा फार सुंदर आणि मोहक दिसत होती.

राजेशची प्रश्नार्थक नजर पाहून वृषाली म्हणाली, “अरे मी आत्ताच उठले. तुला फोन लावला आणि फोन झाल्यावर अजून थोडा वेळ आराम करावा म्हणून बेडवर पडले तर गाढ झोप लागली. आता बेलच्या आवाजाने जाग आली. तू थोडा वेळ टीव्ही पहात बस, मी जरा आवरते.” एवढं बोलून ती आत जाणार तेवढ्यात राजेश तिला म्हणाला, “कशाला आवरतेस अशीच खूप छान दिसतेस!” हे ऐकून वृषाली चक्क लाजली व “काहीतरीच काय” असं म्हणून आत गेली.

थोड्यावेळाने अंघोळ वगैरे आटोपून वृषाली हॉलमध्ये आली. तिच्या एका हातात फोन तर दुसऱ्या हातात टॉवेल होता. ती तिच्या आईशी फोनवर बोलत होती व दुसऱ्या हातातल्या टॉवेलने ओले केस पुसत होती. राजेशने तिच्याकडे पाहिले व बोटानेच “छान” अशी खूण केली. वृषाली राजेशकडे पाहून हसली. थोड्यावेळाने तिने फोन ठेवला व ती राजेशला म्हणाली, “ही आई पण ना, इतक्या सूचना देते. हे कर ते करू नकोस. बाहेर जास्त फिरू नकोस. मी काय आता लहान आहे का?” “इतकी सुंदर मुलगी असल्यावर कोणत्याही आईला काळजी वाटणारच.” राजेश मिश्कीलपणे म्हणाला. राजेशच्या शब्दांनी वृषाली खुश झाली पण तसे दाखवू न देता ती म्हणाली, “शाहरुखची नवीन मुव्ही आली आहे. खूप छान आहे असं माझी मैत्रीण म्हणाली. मी आपल्यासाठी सँडविच बनवते, ते खाऊन आपण लगेच निघुयात.” खरंतर राजेशला शाहरुखच्या मुव्हीज फारश्या आवडत नव्हत्या पण वृषालीला नाही म्हणायचं त्याचं धाडस नव्हतं. आणि तसही वृषालीच्या सानिध्यात वेळ घालवायला मिळतोय यातच त्याला आनंद होता. “जशी तुमची आज्ञा रणीसरकार.” राजेश चेष्टेत म्हणाला.

वृषाली एका प्लेटमध्ये सँडविच घेऊन आली. काही क्षणातच त्यांनी ती संपवली. ते दोघे घराबाहेर पडले. काही वेळात ते मुव्ही थिएटरपाशी पोहोचले. राजेशने दोन तिकिटे खरेदी केली व ते आत गेले. मुव्ही सुरू झाली. वृषाली अतिशय मनापासून मुव्ही पहात होती. राजेशचं लक्ष मुव्हीपेक्षा वृषालीकडेच जास्त होतं. एकदाची मुव्ही संपली. तिथून ते थेट वृषालीच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये गेले. “पुढचा काय प्लॅन आहे?” जेवण आटोपताच राजेशने वृषालीला विचारलं. “तुला कंटाळा नसेल आला तर मला थोडं शॉपिंग करायचंय. इथून जवळच एक नवीन मॉल झालंय. तिथे फार छान ड्रेस मिळतात असं मी ऐकलंय.” “ठीक आहे.” राजेश वृषालीला म्हणाला. पण त्याच्या आवाजात नेहमीसारखा उत्साह नव्हता. हे वृषालीला देखील जाणवलं. “काळजी करू नकोस. इतर मुलींप्रमाणे बॉयफ्रेंडच्या पैशांवर शॉपिंग करणारीतली मी नाही.” वृषाली म्हणाली. खरंतर राजेशला पैशांचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्याला शॉपिंगचा कंटाळा होता. तो थोडा चिडून वृषालीला म्हणाला, “पैशांवरून मी तुला कधी बोललोय का?” “अरे मला तसं नव्हतं म्हणायचं.” वृषाली म्हणाली. यावर राजेश काहीच बोलला नाही. तो बाईकवर बसला व बाईक स्टार्ट केली. “तुला कंटाळा आला असेल तर आपण नंतर कधीतरी जाऊ.” वृषाली समजावणीच्या सुरात म्हणाली. “बस बाईकवर” राजेश म्हणाला. त्याचा राग केव्हाच निवळला होता.

थोड्याच वेळात ते मॉलपाशी पोहोचले. मॉलमध्ये जाताच वृषाली वेगवेगळे ड्रेस पाहण्यात मग्न झाली. तिने एक ड्रेस उचलला व ती चेंजिंग रूममध्ये गेली. “हा कसा दिसतोय?” चेंजिंग रूममधून बाहेर येताच तिने राजेशला विचारलं. “छान” राजेश म्हणाला. तिने तो ड्रेस बास्केटमध्ये ठेवला. तिने दुसरा ड्रेस उचलला व चेंज करून आली. “हा कसा दिसतोय?” वृषालीने पुन्हा राजेशला विचारलं. राजेशचं पुन्हा तेच “छान”. वृषालीने अजून दोन ड्रेस ट्राय केले. तिने राजेशला विचारलं पण राजेशची प्रतिक्रिया एकच-छान. “प्रत्येक ड्रेसला छान काय म्हणतोयस. यातला कोणता घेऊ सांगना.” वृषाली वैतागून म्हणाली. “तुझ्यावर कोणताही ड्रेस छानच दिसतो.” राजेश म्हणाला. “तरीपण यातला कोणता घेऊ सांग ना.” वृषाली म्हणाली. “सगळे घे.” राजेश सहज बोलून गेला व तिनेही आज्ञाधारकपणे चारही ड्रेस बास्केटमध्ये ठेवले व ती बिल पे करण्यासाठी काउंटरपाशी गेली. राजेशही तीच्या मागे गेला. पैसे देण्यासाठी तिने बॅगेतून तिची पर्स काढली. तेवढ्यात राजेशकडे त्याचं कार्ड परत देत काउंटरवरची मुलगी म्हणाली, “सरांनी पेमेंट केलय मॅम.” वृषाली राजेशकडे पाहातच राहिली. राजेश काहीच न बोलता तिथून बाहेर आला. मॉल मधून बाहेर येताच तो वृषालीला म्हणाला, “जवळच माझ्या एका मित्राचं कॉफीशॉप आहे. आपण तिथे जाऊन मस्त कॉफी पिऊयात.” “अरे तू अजून मी बनवलेली कॉफी नाही प्यायल्यास. एकदा पिऊन तर बघ. परत बाहेरची कॉफी पिणार नाहीस.” वृषाली उत्साहात म्हणाली. “जशी आपली आज्ञा राणीसरकार.” राजेश म्हणाला व ते दोघे बाईकवर बसले. थोड्याच वेळात ते वृषालीच्या घरी पोहोचले. घरी पोहोचताच फ्रेश होऊन वृषाली कॉफी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. राजेश वरच्या मजल्यावर वृषालीच्या बेडरूममध्ये गेला. त्याने वृषालीचा हेडफोन मोबाईलला जोडला व गाणी ऐकू लागला. बऱ्याच वेळानंतर त्याने वृषालीला आवाज दिला पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. ‘कॉफी बनवायला एवढा वेळ का लागतोय?’ राजेशच्या मनात विचार आला. तसेच गॅसचा उग्र वास येत होता. राजेशने कानावरून हेडफोन उतरवले व तो खोलीबाहेर आला. राजेश जिना उतरत होता तेवढ्यात एखादा बॉम्बस्फोट व्हावा तसा प्रचंड आवाज झाला.

राजेश दचकून जागा झाला. किती भयानक होतं हे स्वप्न. राजेशने घड्याळात पाहीलं. रात्रीचे तीन वाजले होते. घामाने डबडबलेला चेहेरा धुण्यासाठी तो बाथरूममध्ये गेला. तो बराच वेळ स्वप्नाबद्दल विचार करत होता. कदाचित वृषालीला झालेल्या एक्सिडेंटमुळे आपल्याला तिच्याबद्दल जी काळजी वाटतेय, त्यामुळे आपल्याला हे स्वप्न पडलं असावं असा विचार राजेशच्या मनात आला. पण आपली अजून वृषालीशी साधी ओळख देखील नाही तरीसुद्धा आपल्याला तिच्याबद्दल एवढी आपुलकी, एवढी काळजी का वाटतेय हेच राजेशला समजत नव्हतं. स्वप्न संपलं होतं व राजेश झोपेतून पूर्णपणे जागा झाला होता. पण तरीही त्याचं मन अजून स्थिर झालं नव्हतं. त्याचं अंग तापलं होत. अंगात बारीक कसर होती. राजेश अंथरुणातून उठला व पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेला. पाणी पिऊन तो झोपण्यासाठी अंथरुणावर आडवा झाला. पण काहिकेल्या त्याला झोप लागेना. सारखे वृषालीचेच विचार त्याच्या मनात येत होते. तिला भेटण्याची तीव्र इच्छा राजेशला झाली होती पण ती नाशिकला हॉस्पिटलमध्ये होती. त्यामुळे हे शक्य नव्हतं. आणि ती पुण्यात जरी असती तर तो भेटू शकला नसता.

काही केल्या झोप लागेना म्हणून राजेशने टीव्ही चालू केला व त्याचं आवडतं इंग्रजी गाण्यांचं चॅनेल लावलं. रवी झोपलाय हे तो विसरला होता. त्याने मनातील विचार थांबवण्यासाठी टिव्हीचा आवाज एकदम वाढवला. आवाजामुळे रवी जागा झाला. त्याने त्रासिक चेहऱ्याने राजेशकडे पाहिले व म्हणाला, “&#$%^ ही काय वेळ आहे का गाणी ऐकायची! गप गुमान टीव्ही बंद कर अन झोप.” रवीला पाहताच राजेशने टीव्ही बंद केला व तो रवीला म्हणाला, “बरं झालं तू उठलास. तुझ्याशी जरा बोलायचंय. झोपू नकोस लगेच.” “इथे माझी झोपमोड झालीये अन तुला काय बोलायला सुचतय. गप झोप.” रवी वैतागून म्हणाला. पण राजेश काही माघार घ्यायला तयार नव्हता. तो म्हणाला, “एकतर तू कधी भेटत नाहीस. मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. मला फक्त पाचच मिनिटं दे.” “बर बोल.” रवी म्हणाला. राजेशने स्वप्नात घडलेलं सगळं काही रवीला सांगितलं. वृषालीला झालेल्या एक्सिडेंटबद्दलही त्याने रवीला सांगितलं. सर्वकाही ऐकून घेतल्यावर रवी त्याला म्हणाला, “तू त्या मुलीच्या प्रेमत पडलायस अन त्यामुळेच तू तिच्याबद्दल इतका पझेसिव्ह झालायस. बाकी काही नाही.” राजेशच्या मनातलं रवी बोलला होता त्यामुळे त्याला ते पटलं. “पण माझ्या मनातून तिच्याबद्दलचे विचारच जात नाहीयेत, मग मी काय करू?” राजेशने रवीला विचारलं. “हे बघ मी काय यातला तज्ञ नाही. पण एक करून बघ. स्वप्न कागदावर लिहून काढ. कदाचित तुझं मन थोडं हलकं होईल.” एवढं बोलून झाल्यावर राजेश अजून काही बोलायच्या आधीच रवीने पांघरूण ओढून घेतलं व काही क्षणात तो घोरायला लागला. राजेशने रवीने सांगितल्याप्रमाणे स्वप्नात घडलेल्या घटना एका वहीत लिहिल्या व तो पुन्हा अंथरुणावर आडवा झाला. थोड्याच वेळात त्याला गाढ झोप लागली.


क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED