दुर्गानवमी
आश्विन शुद्ध नवमी म्हणजे दुर्गानवमी किंवा महानवमी म्हणतात.
शक्ती व संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात
सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात.
केळीचे खांब व पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर तयार करतात.
या पूजा विधानात पुष्पांजली अर्पण झाल्यावर गंधाक्षतायुक्त व साग्र अशा ४८ दुर्वा ललितेला वाहतात.
नैवेद्यासाठी लाडू, घारगे, वडे वगैरे पदार्थ करतात.
पूजेच्या अंती घारग्यांचे वाण सवाष्णींना दिले जाते .
रात्रौ जागरण व देवीच्या कथांचे श्रवण करतात.
दुसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन करतात.
दुर्गामाता ही या व्रताची देवता आहे. प्रत्येक मासात भिन्न उपचारांनी देवीची पूजा करणे व उद्यापनाचे वेळी कुमारिकांना भोजन घालणे हा या व्रताचा विधी आहे.
या काळात नऊ प्रकारच्या माळा वाहिल्या जातात
पहिली माळ,शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची
दुसरी माळ,अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची
तिसरी माळ,निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांची
चौथी माळ,केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाच्या फुलांची
पाचवी माळ,बेल किंवा कुंकवाची .
सहावी माळ,कर्दळीच्या फुलांची
सातवी माळ,झेंडू किंवा नारिंगीच्या फुलांची .
आठवी माळ,तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची
नववी माळ यावेळी कुंकुमार्चन करतात
आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजे दसरा असे म्हणतात. चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे.
दसऱ्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्वही आहे म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असेही म्हणतात.
साडेतीन मुहूर्तातील तो एक मुहूर्त समजला जातो.
या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा या चार पुजा करतात.
यादिवशी घरोघरी जाऊन आप्तेष्टांना आणि नातेवाईकांना आपट्यांची पाने सोने म्हणून दिले जातात व त्यांचे आशीर्वाद घेतले जातात .
दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात.
रामायणात रामाने नऊ दिवस उपवास करून शक्तीची म्हणजे देवीची उपासना केली आणि त्या देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली म्हणून रामाने रावणाचा वध केला. रामाला विजय मिळाला म्हणून या सणाला विजयादशमी असे म्हणतात. या दिवशी भारतात ठिकठिकाणी रावण प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा आहे.
कोल्हापुरात दसरा चौक या नावाचा एक चौक असून तेथे राजर्षी श्री शाहू छत्रपतींचा उभा मोठा पुतळा आहे .
या जागी कोल्हापूरच्या राजांचे संध्याकाळी आगमन होते .व पारंपारिक पद्धतीने सोने दिले घेतले जाते याला “सोने लुटणे “ असे म्हणतात .
पूर्ण शहराच्या दृष्टीने हा सन्मानाचा सोहळा मानला जातो .
१८ व्या शतकात दसरा हा सण पेशव्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या कुटुंबात मोठ्या थाटाने साजरा केला जाई. दसरा सण साजरा झाल्यावर मराठे सरदार महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात लष्करी मोहिमा काढण्याची तयारी करीत असत याला सीमोल्लंघन म्हणत.
या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटली जातात .
परस्परामधील स्नेह कायम राहावा म्हणून ही पाने देताना
“सोने घ्या सोन्यासारखे राहा असे म्हणले जाते “
महाभारतात याच वेळी पांडवांचा बारा वर्ष वनवास व एक वर्ष अज्ञातवास काल संपला व त्यांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत लपवलेली आपली शस्त्रे बाहेर काढली होती
नवरात्र उत्सवातील साड्यांचे रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना आहे ,जी नवरात्र उत्सवाशी अलीकडील काही वर्षात जोडली गेल्याचे दिसून येते.
नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते.
महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत त्या ठरावीक रंगाच्या साड्या नेसतात. या संकल्पनेची सुरुवात २००४ सालापासून झाली होती .
२००४ साली मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नऊ दिवस नेसवल्या जाणाऱ्या साड्यांचे रंग 'महाराष्ट्र टाइम्स' या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले.
मुंबईतील महिलांनी नऊ दिवस त्या त्या रंगांच्या साड्या नेसून त्याला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर हे दरवर्षी घडत गेले.
महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील प्रांतांतही ही संकल्पना महिलांनी स्वीकारलेली दिसते.
उत्सव आणि सणाचे बदलते सामाजिक आयाम या संकल्पनेतून दिसून येतात.
ही नवरात्रीच्या दिवसांच्या नऊ रंगांची मूळ कल्पना एकोणिसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती.
उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी
चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा
मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल
या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत जसे की...
बुधवारचा निळा,
गुरुवारचा पिवळा,
शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी, हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.
नवरात्रात एक दिवस नवदुर्गांचे दर्शन घेण्याची प्रथा आहे .यासाठी अनेक बायका एकत्रित जमून वेवेगळ्या देवींच्या मंदिरात जातात .
पेशव्यांचा नवरात्रोत्सव
मराठा राजवटीत दसरा सण साजरा करण्यापूर्वी नऊ दिवस दुर्गा देवतेच्या पूजेचा व मानसन्मानाचा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव साजरा होत असे.
महाराष्ट्रातील भोसले घराण्याचे आद्य दैवत दुर्गा भवानी होते, त्यामुळे शाहू महाराजांच्या मृत्यूनंतरही सातारा येथील दरबारात दसरा सणापूर्वी दुर्गोत्सव आनंदाने साजरा होई.
पेशव्यांनीही पुणे येथील पेशवे दरबारात दसरा सणापूर्वी हा वार्षिक दुर्गोत्सव मोठ्या थाटामाटात व भव्यपणे साजरा करण्याची प्रथा चालू ठेवली होती.
या उत्सवासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद पेशव्यांनी केली होती, हे तत्कालीन कागदपत्रांच्या नोंदीवरून स्पष्ट होते.
या नऊही दिवसांत भवानी देवतेची आराधना करून तिच्यासमोर नंदादीप प्रज्वलित करून तिला नैवेद्य दाखवून पूजा केली जाई.
देवीचे भक्त म्हणून ओळखले जाणारे भुते आणि गोंधळी हे गोंधळ घालून जागर करीत.
प्रतिपदेच्या दिवशी खुद्द पेशव्यांच्या हस्ते अंबेची घटस्थापना होत असे. उपस्थित जनसमुदाय ’देवीचा उदो’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून टाकत असे .
द्वितीयेला रेणुकाआदी चौसष्ट योगिनींची पूजा करून कस्तुरी मळवट भरून उदो करीत.
तृतीयेला अंबा अष्टभुजा शिणगार करून विराजमान होत असे.
चतुर्थीला सरकारवाड्यातील व बाहेरील नागरिक निराहार उपवास करून विश्वव्यापक भवानीची सामुदायिक प्रार्थना करीत.
पंचमीला श्रद्धेने देवीची पूजा करून लोक रात्रीचे जागरण करीत.
षष्ठीला दिवट्यांचा गोंधळ घातला जाई. काही वेळा पेशवे स्वतः कवड्यांची माळ गळ्यात घालून जोगवा मागीत असत.
सप्तमीला सप्तशृंग गडावर पेशवे जातीने आदिमायेची पूजा बांधत असत.
अष्टमीला देवीपूजनाचे वेळी ’अष्टभुजा नारायणी देवी शेषाद्री पर्वतावर उभी देखिली’ असा देखावा डोळ्यासमोर उभा आहे अशी उपस्थित लोक कल्पना करीत.
नवमीला होमहवन, जपजाप्य, षोडश पक्वान्नांचा देवीला नैवेद्य, ब्राह्मण-सुवासिनी भोजन आणि विडा दक्षिणा देत असत
दशमीला अंबा मिरवणुकीने शिलंगणास जाई. गावाबाहेर शमीपूजन होऊन नंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होऊन अंबा मिरवणुकीने परत येई.
भारतातील इतर प्रांतातील नवरात्र
गुजरात
गुजरातमध्येदेखील नवरात्री उत्सव उत्साहाने साजरा केला जातो.
दांडिया किंवा दांडिया रास हे गुजरातमधील लोकनृत्य आहे.
हे समूहनृत्य विशेष करून नवरात्रात नाचले जाते. गुजरातमध्ये कोणत्याही सणाला किंवा शुभप्रसंगी हे नृत्य करण्याची परंपरा आहे.
दांडिया साठी काठेवाडी पद्धतीची बंडी व रंगीबेरंगी धोतर असा पुरुष पोशाख तर महिला साठी चनिया चोली व ओढणी हा पोशाख असतो
सर्व पोशाख रंगी बेंरंगी आणि आरसे लावून सुशोभित केलेले असतात दांडिया खेळताना लागणाऱ्या टिपर्यावर सुद्धा रंगीत रेबिनी बांधलेल्या असतात .
रोज रात्री एका खुल्या पटांगणात दांडिया खेळला जातो
दांडियाचे उपप्रकार असतात जसे की पनघट,पोपटी,योहुड्डा,हिच
याशिवाय गुजरातमधील गावांच्या नावावरूनदेखील प्रकार आहेत जसे की
अहमदाबादी दोडियो (अहमदाबादचा)
बरोडो दोडियो (बडोद्याचा)
सुरतला (सुरतचा)
गरबा खेळणे म्हणजे काय ?
गरबा खेळणे म्हणजे टाळयांच्या किंवा बहुधा लाकडी दांड्यांच्या म्हणजे टिपर्यांच्यालयबद्ध गजरामध्ये देवीची भक्तिरसपूर्ण गाणी म्हणणे.
टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे हा उद्देश असतो.
टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते, अशी श्रद्धा आहे. टाळ्यांमुळे देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्तियुक्त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते.
यामध्ये छिद्र असलेल्या रंगीबेरंगी मातीच्या घड्यात दिवे लावले जातात आणि त्याभोवती गोलाकार नाचण्याची पद्धत आहे.
दुर्गेजवळ अखंड दीप तेवत ठेवतात. नंतर दुर्गास्तोत्राचा पाठ करतात. दुर्गेवर फुलांची माळ बांधतात.
नंतर एका कुमारिकेचे पूजन करून तिला भोजन घालतात, ब्राह्मण भोजनही घालतात.
क्रमशः