नवरंगी नवरात्र भाग १
नवरात्र ,नऊ रंग आणि नऊ दिवसांचा अत्यंत उत्साहवर्धक सण...!!
शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव असुन ते देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.
शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणजे ते शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजाअर्चा केल्या जातात .
नवरात्र आपण तीन राज्यातले पाहणार आहोत
एक म्हणजे महाराष्ट्र दुसरे गुजरात आणि तिसरे कलकत्ता म्हणजे बंगाल प्रांतातले .
आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून , नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव.
पुराणकाळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा.
अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.
निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धीच्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा असतो.
हिंदू धर्मातील सर्व सण जोतिष शास्त्रावर अवलंबुन असतात.
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो.
यामुळे आपल्यामध्ये नवीन शक्ती,नवा उत्साह,नवी उमेद निर्माण होत असते.
बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणा-या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो.
सृष्टीत होणारे परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.
आदिमायेची उपासना,यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.स्मरणशक्ती चांगली होवून बौद्धिक विकास होतो.
म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काल आहे असे मानले जाते.
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले.
देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात.
उमा, गौरी,पार्वती,जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे असून दुर्गा, काळी,चंडी,भैरवी , चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत
चार नवरात्री प्रामुख्याने मानल्या जातात. सर्व नवरात्रीत देवी प्रमुख देवता असते.
शारदीय नवरात्र सप्टें अखेर अथवा ऑक्टोबर सुरवातीस येते.
शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते असा समज आहे. आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपासहित भ्रमण करणे, म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणार्या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे, अशी समजूत आहे.
महाराष्ट्रातले नवरात्र हे एक काम्य व्रत आहे . अनेक घराण्यांत या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.
त्यासाठी घरात पवित्र जागी एक लहान मंडप उभारला जातो .
तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्तिवाचनपूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात.
मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात.
घरातल्या एका व्यक्तीने हे व्रत घेतलेले असते .
त्या व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ रहायचे असते.
आश्विन शुद्ध नवमीपर्यंत हे व्रत चालते. या व्रतात नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करतात, अखंड दीप लावतात. घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात.
क्वचित होमहवन व बलिदानही करतात.
काही घरातून नऊ दिवस रोज कुमारीकेची पूजा करून तिला भोजन करण्यासाठी बोलावले जाते .
दररोज एक पक्वान्न व कुमारिकेच्या आवडीचे भोजन बनवले जाते शेवटच्या दिवशी या कुमारिकेला बांगड्या ,माळ, कपडे ,दागिने अशा स्वरूपात भेट दिली जाते तसेच केळीची फणी अथवा इतर फळे देऊन व ओवाळून त्यांची पूजा केली जाते .
काही वेळेस अनेक कुमारिका ची सुद्धा पूजा केली जाते
शेवटी स्थापित घट व देवी यांचे उत्थापन करून नदीत विसर्जन केले जाते .
काही कुटुंबात देवीला कडाकण्या बांधण्याची पद्धतही प्रचलित आहे
मैद्याच्या पिठात साखर घालून कडक पुर्या तळतात त्याला कडाकण्या असे म्हणतात याची माळ करून देवीच्या गळ्यात घातली जाते .
देवीच्या नेवेद्यासाठी पाच कडाकण्या या फक्त डाळीच्या पीठाच्या बनवल्या जातात .
ललिता पंचमी
आश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी हे व्रत करतात.हे काम्य व्रत असून स्त्री व पुरुष दोघानाही हे करता येते.
ललिता देवी ही या व्रताची देवता आहे. या व्रतात एखाद्या करंडकाचे झाकण देवीचे प्रतीक म्हणून पूजेला घेतात.
कोल्हापूर भागात टेंबलाई देवीची पूजा या दिवशी पूजा केली जाते.
त्या दिवशी त्या भागात जत्रा भरलेली असते .
एका कुमारिकेला देवीचे रूप मानून तिच्याकडून “कोहळा फोडणे “ हा विधी केला जातो .
या कोहाळ्याचा एखादा तुकडा मिळवून तो पवित्र म्हणून घरात ठेवला जातो .
यानंतर येते ती महाअष्टमी
महाअष्टमी हे एक काम्य व्रत आश्विन शुद्ध अष्टमीला करतात. यामध्ये चंदनाने लक्ष्मीची प्रतिमा काढतात .
तिच्या शेजारी सोळा दोरे एकत्र केलेला आणि सोळा गाठी मारलेला दोरक ठेवतात .
मग महालक्ष्मीची षोडषोपचारे पूजा करतात .
देवीला सोळा प्रकारच्या पत्री व फुले वाहतात ,
सोळा घारग्यांचा नैवेद्य दाखवावा.
पिठाचे सोळा दिवे करून आरती करतात .
मग दोरकाची पूजा करून तो डाव्या मनगटात बांधतात .
मग सोळा दुर्वा आणि सोळा अक्षता हातात घेऊन महालक्ष्मीची कथा ऐकतात, अशी या व्रतातली पूजा आहे.
दुपारचे हे पूजाविधान झाल्यावर त्याच दिवशी प्रदोषकाली महालक्ष्मीची दुसरी पूजा करतात.
तांदुळाच्या पिठाचा मुखवटा
चित्पावन लोक नवरात्रीतील अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचे पूजन करतात.
त्यासाठी तांदुळाच्या पिठाची उकड करून तिचा महालक्ष्मीचा मुखवटा करतात.तो काजळ कुंकवाने सजवतात.
हे काम फार कडक सोवळ्याने केले जाते.
मग तो मुखवटा सुशोभित मंडपाखाली एका भांड्याच्या उतरंडीवर घट्ट बसवतात .
चित्पावन समाजात विवाहानंतर कुटुंबातील नववधू पाच वर्षे अष्टमीला खडे व दोरकाची पूजा करतात व संध्याकाळी या देवीपुढे ते अर्पण करून ओटी भरतात अशी प्रथा आहे .
देवीची ओटी भरताना देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असते,कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.
दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहातात.
देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करतात.
साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करतात. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरतात. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे प्राधान्याने ओटीत तांदुळाचा समावेश केला जातो.
त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करतात व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करतात.
उतरंडीवर भरजरी लुगडे नेसवतात.मग कापडाच्या पिशव्यांचे मुद्दाम तयार केलेलं हात देवीला जोडतात.
मंगलागौरीप्रमाणेच या पूजेसाठीही अनेक सवाष्णी बोलावतात.त्या सर्व मिळून देवीची पूजा करतात.
आरती झाल्यावर रात्री देवीसमोर घागरी फुंकणे हा विशेष कार्यक्रम असतो.
घागर उदाच्या धूपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात. यामुळे श्वसन मार्ग शुद्ध होतो असे मानले जाते.
कोकणस्थ ब्राह्मण समाजातील महिलांमध्ये घागर फुंकणे या प्रकाराला विशेष महत्त्व आहे.
क्रमशः