दुर्गापूजा
बंगाल आणि बिहार ,ओडीसा ,उतर प्रदेश या राज्यांत साजरे होणारे हे सहा दिवसांचे नवरात्र असते.
ललिता पंचमीच्या दुसर्या दिवसापासून, म्हणजे षष्ठीपासून ते दसर्यापर्यंत हा उत्सव चालतो.
महाअष्टमी(दुर्गाष्टमी)ला बकर्याचा आणि महानवमीला रेड्याचा बळी दिला जातो.
दुर्गापूजा हा बंगाली लोकांचा वर्षातील महत्त्वाचा सण आहे. सुरुवातीला बांधकाम करणारे गवंडी, सुतार वगैरे लोक विश्वकर्म्याची सार्वजनिक पूजा करतात. दुर्गापूजा हा मूळचा धार्मिक सण होता, पण सध्या त्याला सामाजिक स्वरूप आले आहे.
आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस दुर्गेचे नवरात्र मानतात. नवरात्रात नित्य दुर्गापूजा केली जाते.
पूजा करताना घरचे मुख्य पुरुष सकाळी पाण्यात पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करतात. मग सपत्नीक बसून देशकालोच्चारपूर्वक पूजेचा संकल्प करतात.
यावेळेस घरातील महीला त्यांचा पारंपारिक पोशाख म्हणजे मोठ्या लालभडक काठाची पांढरी शुभ्र साडी बंगाली पद्धतीने नेसतात तसेच कपाळावर मोठा लाल कुंकवाचा टिळा डोळ्यात काजळ आणि भांगात सिंदूर भरतात .
नंतर गणपतीपूजन, स्वस्तिवाचन इ. करून मातीच्या वेदीवर एका कलशाची स्थापना करतात व षोडशोपचारे पूजा करतात.
बंगालमधील अनेक लोक दुर्गेला आपली कुलदेवता मानून तिची नित्य पूजा करतात. ते तिला दुर्गतिनाशिनी म्हणतात. पुराणांत व अनेक तंत्रग्रंथांत दुर्गापूजेचे महत्त्व वर्णिले आहे.
दुर्गापूजेच्या दिवशी संध्याकाळी दुर्गेला प्रिय असणाऱ्या बेलाच्या वृक्षावर तिचे आवाहन करतात.
षष्ठीच्या दिवशी संध्याकाळी अधिवास नामक विधी करतात. यात देवीच्या निरनिराळ्या अंगांना विविध पवित्र वस्तूंनी स्पर्श करतात व त्यांना पावित्र्य आणतात.
सप्तमीच्या दिवशी देवीच्या पूजेला सुरुवात होते. प्रथम बेल, डाळिंब, अशोक, हरिद्रा इ. नऊ प्रकारच्या पल्लवांची एक जुडी करतात व ती अपराजिता नावाच्या वेलीने बांधतात.
मग त्या जुडीला स्नान घालून साडी नेसवतात. तिला कलाबहू (कदलीवधू) असे म्हणतात.
ती गणपतीची पत्नी मानली जाते .
उत्सवमूर्तीच्या मांडणीत गणपतीच्या शेजारी तिची स्थापना करतात. त्यानंतरचा महत्त्वाचा विधी म्हणजे महास्नानाचा असतो .
त्यावेळी एका कलशावर आरसा ठेवतात आणि त्यात देवीचे जे प्रतिबिंब पडते, त्यावर स्नानाचे सगळे उपचार समर्पित करतात. देवीच्या स्नानासाठी थंड व उष्ण जल, शंखोदक, गंगाजल, समुद्रजल, इ. जले, पंचगव्य, पंचामृत, आणि गोठा, चौक, वारूळ, नदीचे पात्र इ. ठिकाणची माती आणतात.
त्यानंतर देवीची तिच्या परिवारासहित पूजा करतात.
मग तिच्यासमोर पशुबळी देतात.
पूर्वी हे बलिदान फार मोठ्या प्रमाणावर होत असे, पण सध्या त्याचे प्रमाण खुपच कमी आहे .
अशीच पूजा दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही करतात.
याशिवाय संधिपूजा नावाची एक विशेष पूजा अष्टमी आणि नवमी या तिथींच्या संधिकाली करतात.
ही पूजा दुर्गेच्या चामुंडा या रूपाची असते.
त्या रात्री गायन, वादन, खेळ यांच्या योगाने जागरण करतात.
यावेळेस सिंदूर खेळा म्हणजे एकमेकांवर सिंदूर उडवणे धुनुची नृत्य म्हणजे मातीच्या भांड्यात नारळाचा काथ्या व विस्तव ठेवला जातो व त्यानेच दुर्गेची संध्या आरती केली जाते, यात शंख फुंकणे याला फार महत्व असते.
हे नृत्य सप्तमीला सुरु होऊन अष्टमी पर्यंत खेळले जाते
यानंतर या उत्सवाची समाप्ती होते .
चौथ्या दिवशी संध्याकाळी देवीची मिरवणूक काढून तिचे नदीत कींवा तळ्यात विसर्जन करतात.
दुर्गा ही या दिवसात सासरहून माहेरी आलेली असते अशी समजूत आहे. म्हणूनच बंगालमधल्या गृहिणी या माहेरवाशिणीसाठी नाना प्रकारची पक्वान्ने करतात.
कोणताही बंगाली माणुस दुर्गापुजेला आपल्या घरी आल्याशिवाय राहत नाही मग तो कोणत्याही कारणाने जगाच्या काना कोपर्यात असला तरीही ...
अशा प्रकारे दुर्गापूजा घरगुती पातळीवर साजरी केली जाते.
बंगालमध्ये सार्वजनिक दुर्गापूजा सुद्धा केली जाते .
सुमारे चारशे वर्षे बंगालमध्ये हा उत्सव चालू आहे असे मानले जाते. दुर्गापूजेच्या प्रारंभी दुर्गेची मातीची दशभुजा मूर्ती बनवितात. तिचे रूप सिंहारूढ महिषासुरमर्दिनीचे असते. तिच्या दोन्ही बाजूंना कार्तिकेय, गणेश, लक्ष्मी व सरस्वती यांच्या मूर्ती असतात.
या मुर्ती उंच व अवाढव्य असतात .
या मुर्ती बनवण्या साठी दहा ठिकाणची माती वापरली जाते .
यासाठी खास करून वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या अंगणातली माती आणली जाते .
येथील कुमरटली भागात सर्वात जास्त मुर्ती बनवल्या जातात .
देवीचा सहचर असलेल्या भगवान शंकराला तिच्या मस्तकाच्या वरच्या बाजूला स्थान दिलेले असते.
या मुर्ती अत्यंत मोहक असतात विशेषतः त्यांचे मोठे मोठे डोळे लांबसडक मोकळे सोडलेले काळेभोर केस लक्ष वेधून घेतात .
देवीची मुर्ती त्रिशूल धारी असते व तिच्या पायतळी महिषासुर राक्षस असतो मागे वाहन सिंह असते .
सार्वजनिक दुर्गापूजे साठी ठिकठिकाणी देवीचे मोठे मोठे पंडाल उभारले जातात .त्यावर रोषणाई केली जाते .
बंगाली लोक नवे कपडे घालून मिठायांचा आस्वाद घेत रात्री उशिरा पर्यंत हे पंडाल पहात हिंडतात .
दुर्गा दुर्गापूजेची परंपरा सुमारे ४०० वर्ष जुनी आहे असे मानले जाते. बंगालमधील तारिकपूर भागात ही प्रथा सुरू झाली.
बंगालमधून ही प्रथा बनारसला व आसामलाही पोहोचली. तिथून इ.स.१९११मधे दिल्लीत ही पूजा सुरू झाली.
स्वातंत्र्यलढ्यात या पूजांची केंद्रे ही राजकीय आणि सामाजिक चर्चांची महत्त्वाची ठिकाणे बनली होती.पूजेच्या काळातच बंकिमचन्द्र चॅटर्जी यांना "वंदे मातरम" हे गीत स्फुरले आणि नंतर ते स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले असे मानले जाते.
सार्वजनिक पातळीवर दुर्गापुजेची सुरुवात बंगालमधील कोलकत्ता शहरामध्ये इ.स. १७५७ साली सावोबाजारच्या राजा नबदेव याने केली. प्लासीच्या लढाईत लॉर्ड क्लाईव्ह याने सिराज-उद-दौला याच्यावर विजय मिळवल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हे साजरीकरण केले गेले होते.
या पूजेसाठी राजाने लॉर्ड क्लाईव्हला आमंत्रित केले. लॉर्ड क्लाईव्ह देवीच्या पूजेसाठी एक बकरे, एकशे एक रुपये रोख आणि फळांनी भरलेली टोपली घेऊन आला होता.
ह्या पहिल्या सार्वजनिक साजरीकरणामध्ये फक्त तत्कालीन अमीर उमरावांना बोलावणे धाडले गेले होते, परंतु पुढे जाऊन दुर्गापूजेचे सार्वजनिक साजरीकरण सुरू झाले. आणि दुर्गापूजेचा मंडप, त्याची सजावट आणि त्या सजावटीचे स्वरूप याला राजकीय स्वरुप्प आले आहे .
अगदी इंग्रजांपासून, साम्यवाद्यांसारख्या राजकीय पक्षापासून ते अलीकडच्या एड्सवर काम करणाऱ्या संस्थां, संघटनांपर्यंत अनेकांनी तसेच विविध चळवळींनी ह्या साजरीकरणाचा उपयोग करून घेतला आहे.
समाप्त